आटा, तांदूळ, तूरडाळ आणि 'इत्यादि'..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
15 Sep 2019 - 2:35 pm

मला बोरिंग वाटणारी अनेक कामेआहेत. त्या सगळ्यांची नावे सांगत बसायला मला बोअर होतंय. पण काही नमुन्यादाखल सांगते. गूळ चिरणे, भाजी निवडणे, उरलेले अन्न काढणे, दरमहा लागणार्‍या वाणसामानाची यादी करणे.

लिस्ट करायची म्हणजे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आपल्याला कायकाय लागते ते आठवणे. अगदी पेस्ट, साबण लायझॉल, गार्बेज बॅगपासून ते रात्रीच्या गुडनाइट रीफीलपर्यंतची यादी करायची.

माझ्या सासूबाईंनी फार पूर्वी मला सारख्या सूचना करताना ज्या काही आचरणात आणण्यायोग्य सूचना दिल्या, त्यापैकी ही एक खरोखरीची उपयुक्त सूचना, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय समान लागते ते क्रमवार आठवून, त्याची क्रमवार यादी करायची म्हणजे कोणताही पदार्थ, वस्तू विसरत नाही. वगळली जात नाही.

तर अशी ही यादी दरमहा करायचा मला कंटाळा येतो. आधी स्वयंपाकघरात काय आणायला हवंय, काय संपलंय ते बघायचं आणि मग यादी करायची. एकूण ४०-४५ वस्तू होतात. त्या सगळ्या लिहायच्या. नेहमीच्या दुकानदाराला, म्हणजे अमुकतमुक "सुपरमार्ट" किंवा "शॉपी"ला फोनवरून डिक्टेट करायच्या.. त्यात पंधरा मिनिटे जातात. मग तो सामान कधी घेऊन येतोय, याची वाट बघायची. त्याची येण्याची वेळ म्हणजे आपण स्नानासाठी गेल्याची किंवा आपली दुपारची हलकीशी डुलकी काढण्याची वेळ असते. बरे हे लोक एकदा बेल वाजवून दार उघडायची वाट पाहत नाहीत तर दार उघडेपर्यंत सतत बेल वाजवतात. तर त्यांची वाट बघायची. तो आला की लिस्ट प्रमाणे सामान आहे की नाही ते चेक करायचे. तेव्हा मात्र तो अति घाईत असल्याप्रमाणे अस्वस्थ होऊन चुळबुळत उभा राहणार. त्याला पैसे द्यायचे. त्याच्याकडे सुटे पैसे नसतात. मग आपल्याजवळचे सुटे पैसे शोधायचे, त्याला द्यायचे. किंवा त्यावर पाणी सोडायचे.

कॅशलेस व्यवहार करावा म्हणून कार्ड पुढे करावे तर तो मशीन विसरलेला असतो किंवा ते नादुरूस्त असतं. यादीतल्या काही वस्तू तो विसरलेला असतो. काही त्याच्या दुकानात नसतातच. काही वस्तु तो जास्तीच्या, चुकीच्या आणतो. आणि फ्री मिळणार्‍या वस्तू आणायच्या विसरतो. मग त्याला परत दुकानात पाठवायचे. आलेल्या वस्तूंची क्वालिटी पारखायची. तो एक्सपायरी डेट जवळ आलेल्या वस्तू पाठवतो. कांदे बटाटे अती मोठे किंवा अगदी लहान आकाराचे पाठवतो.

शी, किती बोअरडम! मग मी ठरवलं, आपण आणि सूनबाईने 'बझार 'मध्ये जायचे. स्वतःच्या हातांनी वस्तू उचलायची, पारखायची, एक्सपायरी डेट चेक करायची आणि मगच ती घ्यायची.

ज्या दिवशी किमतीमध्ये घसघशीत सूट होती त्याच दिवशी आम्ही 'बझार 'मध्ये गेलो. तिथे गेल्यावर आम्हाला एवढी गर्दी दिसली की आपण चुकून एखाद्या ट्रेड फेयरला आलोय की काय असं आम्हाला वाटलं. आम्ही धीर एकवटून प्रयत्नपूर्वक आत शिरलो. सामान भरण्यासाठी एक ट्रॉली घेतली. ट्रॉली ढकलत ढकलत आम्ही आत शिरलो आणि त्या मोहमायाजालात, भान हरपून एक एक वस्तु ट्रॉलीमध्ये टाकत राहिलो.

तर्‍हेतर्‍हेची चॉकलेट्स, केक्स, रेडी टू ईट पदार्थ. फक्त उकळते पाणी टाकायचे की नाश्ता तयार, मॅगीचे १० प्रकार, इतर नूडल्सचे १५ प्रकार, मफीन्स, किंवा गोठवलेले पदार्थ थेट गरम तेलात सोडून नुसते तळले की ब्रेकफास्ट तयार! पती ,मुले,आणि त्यांची नेहमी फ्रेश दिसणारी, सडपातळ,सपाट पोटाची, मोकळे केस, थोडे पाठीवर,थोडे दोन्ही खांद्यावरून पुढे घेतलेली सुंदर आई. सगळेच खुश, सुखी,आनंदी !

पिझ्झा बेसचे कित्येक प्रकार, तयार बर्गर,पॅटीस, ब्रेड पॅटीस, कॉफी, डिप डिप चहा, आयुर्वेदिक चहा, लोणची २० प्रकारची,चटण्यांचे २१ प्रकार, चीज स्प्रेडचे २५ प्रकार, ब्रेडला लावायच्या बटरचे २६ प्रकार.

चायनीज रेडी टू ईट नाश्ता, इटालियन नाश्ता, तयार पराठे, घरी जाऊन फक्त भाजायचे. त्या पराठ्यांचे त्रिविध प्रकार, कितीतरी प्रकारचे मसाले! शिवाय कितीतरी प्रकारची सौन्दर्यप्रसाधने, कोल्ड्रिंक्स, माऊथ फ्रेशनर्स, पावडरी, लिपस्टिक्स, नेलपेण्ट्स, भांडी, कुकर्स, कपडे, शोभेच्या वस्तू..

बाप रे ! इतक्या सगळ्या वस्तू घेता घेता आमची त्रेधातिरपीट उडाली. फार चॉईस असला की मन थकून जातं. शिवाय भूक लागलेली असताना शॉपिंग करु नये म्हणतात. तर असो. आम्हाला आणखी एक ट्रॉली घ्यावी लागली. सगळीकडे हिंडून,हिंडून पायाचे तुकडे पडले.

बझारचा चकचकीत, चमकदारपणा पाहून डोळे थकले. बझार एसी होता पण घामटे निघाले. सगळे ओझे ढकलत ढकलत आम्ही बिलिंगच्या रांगेत उभ्या राहिलो. रांग एवढी लांबलचक होती की, बिलिंग मशीन आणि काउंटर आम्हाला दिसतच नव्हते. अगदी विमुद्रिकरणांनंतर बँकच्या पुढे धरलेली रांग आठवली.

एकेकजण मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होता. सगळ्यांनीच तडस लागेपर्यंत सामान घेतले होते.

अर्ध्या तासाने आम्ही काउंटरपाशी आलो. मला तहान लागली होती.

सोबत नेलेले पाणी संपले होते. आम्हा दोघींचेही डोळे आत खेचले जात होते. चक्कर येणार असे वाटत होते. एकेक वस्तू काढून काउंटर वर ठेवत गेलो. बिल तयार होत होते. बिल झाले. आठ हजार रुपये. माझे पांढरे झालेले डोळे मिटत मी मुकाट्याने माझे कार्ड स्वाईप करायला दिले. कारण वाण्याकडून सामान न मागवता शॉपिंगला जायची आयडिया माझी होती.

कारमध्ये समान कोंबून घरी आलो. आल्याआल्या आधाशासारखे पाणी प्यायलो. भानावर आलो आणि लक्षात आलं, मी अगदी सुरवातीलाच, बेभान होण्यापूर्वी, होशोहवासमध्ये असताना, ५ किलो तांदूळ आणि २ किलो तूरडाळ आणि ५ किलो आटा ट्रॉली मध्ये टाकला होता. तेवढे सोडल्यास मी केलेल्या यादीतील एकही वस्तू मी आणली नव्हती.

मी सुनेला म्हटले 'वरण भाताचा कुकर लाव'. मुलगाही जस्ट घरी परत आला होता, तो आणि ती म्हणाले ,'कुकर कशाला आता, उकळते पाणी नूडल्स मध्ये टाकून खाऊ, दोन मिनिटात तयार होतात, रेडी टू ईट.

मी म्हटलं,'ओके..!!'

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

15 Sep 2019 - 4:00 pm | पद्मावति

मस्तं लिहिलंय :)

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2019 - 8:50 am | प्राची अश्विनी

+111

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2019 - 4:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

मी सुद्धा यादी घेऊन जातो, पण, यादीपेक्षा १०-१२ जास्त गोष्टी उचलून आणतो. म्हणून, हल्ली मला महिन्याच्या खरेदीसाठी ड्रायव्हर बनायचेही आमंत्रण येणे बंद झाले आहे. ;) =))

आमंत्रण बंद व्हावे म्हणून तुम्ही कशावरून असे मुद्दाम केले नसेल? =))

आमंत्रण बंद व्हावे म्हणून तुम्ही कशावरून असे मुद्दाम केले नसेल? =))

बलिवर्दनेत्रभंजक प्रश्न.. टेल टेल म्हात्रेकाका, नेशन वॉन्टस टु क्नो..

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2019 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही म्हणता म्हणून टेलतोच आता ...

त्याचं असं आहे, यादीतल्या वस्तूंच्या अगोदर मी माझ्या आवडीच्या (पण यादीत नसलेल्या) चॉकलेट्स, बिस्किट्स, फरसाण, इत्यादी अनेक वस्तू फटाफट ट्रॉलीत टाकतो. मग त्या वस्तू डाळ-तांदुळ-साखरेच्या वजनदार पिशव्यांखाली चिरडून जाऊ नयेत म्हणून मग दुसरी ट्रॉली आणावी लागते, हे लोकांना आवडत नाही त्याला मी काय करणार? ;)

पण, यामुळे मी अजिबात हतोत्साह होत नाही. आपल्या मनाने स्वतंत्रपणे जाऊन आपल्या जीभेचे चोचले पुरवणार्‍या वस्तू घेऊन येतो... स्वतंत्रपणे जाण्याचा अजून एक फायदा असा की. '(मला आवडते हे माहीत असूनही) हे कशाला?', '(मला वजनाबिजनाचा त्रास माही हे माहीत असूनही) इतकं कशाला?' असे भुवया वक्रीकरणासह येणारे नकारात्मक प्रश्न आपोआप टळतात. शिवाय, तास दीड तास ताटकळत उभे रहावे लागत नाही ते वेगळेच. ;) :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Sep 2019 - 3:29 pm | ज्ञानोबाचे पैजार

एकंदर काय वाण्या कडे जा किंवा सुपर मार्केट मधे जा मनाजोगती खरेदी होतच नाही. कधी वस्तु चांगल्या मिळत नाहीत तर कधी पैसे जास्त जातात.

या शिवाय मी जर एकटा जाउन खरेदी करुन आलो तर घरी आल्यावर साधारण खालील प्रकारे संभाषण होते

"अरे? पतंजलीच मीठ का घेतल? मी टाटाचे लिहीले होते"
"पतंजलीचे १५ रुपये किलो तर टाटा २५ रुपये होते म्हणून ते घेतले"
"अरे पण त्या पतंजलीचे मीठाला पावसाळ्यात पाणी सुटते"
"बरं, पुढच्या वेळी लक्षात ठेवतो"
"नको... तो पर्यंत पाउस संपलेला असेल आणि हे काय आपण नेहमी रेड लेबलचा चहा घेतो?"
"तो ४५० रुपये किलो तर हा २५० रुपये किलो त्या शिवाय याच्यावर एक कंटेनर फुकट होता"
"अरे तुला माहित आहेना बाबा रेड लेबलचाच चहा पितात ते, दुसरा केला की त्यांना लगेच समजते, आता प्रत्येक चहाला विचारत रहातील "खरेदीला चिरंजीव गेले होते का?" आणि हे काय? एवढे महागडे तेल का आणलेस?"
"अगं ते हार्टला चांगले असते म्हणून"
"असं काही नसतं, पुढच्या वेळी आपले नेहमीचे तेलच आण, याची फोडणी चांगली होत नाही"

असा प्रत्येक वस्तुचा पंचनामा होतो,

हा संवाद मुलींसमोरच होतो, त्यामुळे होते कसे, की त्यांच्या बरोबर कुठे दुकानात गेलो तरी आपल्या बाबाला काही समजत नाही अशा थाटात त्या स्वतःच दुकानदाराशी संवाद साधत असतात. आपण मधे काही बोलायला गेलो की दुकानदार लगेच म्हणतो "साहेब तुमच्या मुली पण हुषार आहेत, त्या सुध्दा वहिनींसारख्या बेस्ट क्वालिटीच्या वस्तुच घेतात, उगाच दोनचार रुपयांकडे पहात नाहीत"

मी निमुट पणे झालेल्या बिलाचे पैसे देतो आणि पिशव्या उचलून चालू लागतो.

(फक्त पिशव्या उचलण्याचीच लायकी असलेला) पैजारबुवा,

मैद्याच्या नूडल्स आणल्यास की गव्हाच्या आज्जे?

मदनबाण's picture

15 Sep 2019 - 5:19 pm | मदनबाण

छान लिहलयं !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरे लिये धड़कता है... :- Aashiqui

तुषार काळभोर's picture

15 Sep 2019 - 5:39 pm | तुषार काळभोर

आम्ही चार वस्तू स्वस्तात घ्यायच्या म्हणून डीमार्टला जातो.
त्या घेतो.
डिस्काउंट जाऊन त्यांची किंमत 500 असते.
बिलावरचा शेवटचा आकडा 1276 असतो.
आम्ही कार्ड स्वाईप करतो.
बाहेर येतो.
परत इकडे यायचं नाही असं ठरवतो.
दर वेळी सारखं.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Sep 2019 - 6:07 pm | अमरेंद्र बाहुबली

आटा?? हे काय असतं?

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2019 - 6:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

गहू दळल्यावर लगेच मिळतो तो आटा, चाळून चाळून त्यातलं रफेज काढण्याचा आटापिटा केल्यावर उरतो तो मैदा.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Sep 2019 - 12:05 am | अमरेंद्र बाहुबली

सुहास सर मग पीठ काय असतं?

माझ्या मते साधारणपणे पदार्थाच्या पॅकिंग / कव्हर इत्यादींवर जे शब्द असतात ते शॉपिंग आणि ऑर्डर करणे या संदर्भात तसेच वापरले जातात. मॅगी नूडल्स, मिक्स फ्रुट जॅम, आशीर्वाद आटा, सोया बडी / सोया चंक्स, पिल्सबरी पॅनकेक मिक्स,

मॅगी शेवया, मिश्र फळ मुरांबा, आशीर्वाद पीठ, सोयाचे गोळे, पिल्सबरी गोडाचे धिरडे मिश्रण असं शक्यतो कोणी म्हणत नाही. उलट जे पदार्थ मराठी नावाने पॅकिंगवर छापून येतात त्यांनाही मराठी शब्दाने आपोआप उल्लेखित केलं जातं. बेडेकर लोणच्याचा मसाला, थालीपीठ भाजणी, राजगिरा पीठ, घावन पीठ, फणस पोळी, चितळे दूध, आंबा वडी, कोकम आगळ.

तिथे बेडेकर अचार मसाला, थालिपीठ मल्टिग्रेन मिक्स, घावन आटा, कोकम कॉन्सनट्रेट, चितळे मिल्क असंही कोणी म्हणताना दिसलं नाही.

असं एक व्यक्तिगत निरीक्षण.

सस्नेह's picture

16 Sep 2019 - 7:36 am | सस्नेह

उचित निरीक्षण
=)) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Sep 2019 - 1:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

(मराठी भाषेत) गव्हाचे पीठ = (हिंदी भाषेत आणि बर्‍याचदा मराठी बोलीभाषेतसुद्धा) आटा

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Sep 2019 - 1:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

मराठीवर होणारे हिंदीचे आक्रमण चिंताजनक आहे ।

या वाक्यात (पक्षी : काडीत), हा धागा अनेक शतकी बनविण्याची ताकद आहे ! ;) =))

याशिवाय, या वाक्याच्या शेवटी पूर्णविरामासाठी "." ऐवजी "।" चा उपयोग केला आहे... खरेच, हिंदीचे आक्रमण चिंताजनक आहे ! ;) =)) =)) =))

अर्रर्र, चुकून गलती झाली वाटतं.
मला खरं तर उद्गारवाचक चिन्ह द्यायचं होतं बर का !

एका क्षुल्लक चुकीने कोणाचाही गैसमज होणे साहजिकच आहे.

बादवे : सही पकडे है.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2019 - 12:35 am | डॉ सुहास म्हात्रे

जराशी चंमतग केली. बाकी काही नाही. =))

ज्योति अळवणी's picture

15 Sep 2019 - 7:19 pm | ज्योति अळवणी

मस्त लिहिलं आहे. या अवास्तव वस्तू आणण नको म्हणून अलीकडे फक्त फोनवरून मागवते. तरीही गडबड होतच असते बुवा

जालिम लोशन's picture

15 Sep 2019 - 9:29 pm | जालिम लोशन

छान

जे यादी तयार ठेवेल रिमाइंड करेल हवे नको ते ऐड रिमूव करून दुकान दराला वाट्स करेल :) काय म्हणता ?

सस्नेह's picture

16 Sep 2019 - 7:37 am | सस्नेह

अगदी खरं गं आज्जे !
बाकी या वयात तुम्ही इतकं चालू शकता हे चांगलं आहे आजीबाई.

सर्वसाक्षी's picture

16 Sep 2019 - 9:32 am | सर्वसाक्षी

मी माझ्या मित्र मैत्रिणींपैकी कुणी मुला-मुलीचं लग्न ठरल्याची बातमी सांगितली की आवर्जुन विचारतो
मॉल की वाण्याचं दुकान?
पारंपारिक पद्धतीने मुलगी पाहुन ठरवलेलं लग्न म्हणजे वाण्याच्या दुकानातली खरेदी - काय हवय ते निश्चित करुन नेमकं तेच खरेदी करणं
मॉल म्हणजे आकर्षक सजावट, वेष्टण, जबरदस्त देकार वा कुणाच्या तरी स्मितहास्याला ब्ळी पडून केलेली खरेदी - "पटकन डोळ्यात भरलं म्हणून घेतलं

बाई बाई बाई,जळली मेली ती shopping!!!!!

श्वेता२४'s picture

16 Sep 2019 - 4:20 pm | श्वेता२४

मी ग्रोफर्स ॲप वरुन सामान मागवते व महिन्यातून साधारण २ ते ३ वेळा सामान मागवते. बऱ्याचदा ऑफर्स असतात, स्वस्त असतात म्हणून आपण जास्तीचे सामान घेतो. म्हणून माझी एक सवय की यादी करुन मगच एकेक पदार्थ सिलेक्ट करत जाते. ती ऑर्डर पूर्ण झाली, की आकर्षक सवलतींचे जिन्नस वगैरे सर्फींग करत राहते व ते जिन्नस कार्ट मध्ये टाकते पण खरेदी करत नाही. काही दिवसांनी परत काही वाणसामान खरेदी करायचे असते त्यावेळी खरच हा पदार्थ आवश्यक आहे का? याचा पुन्हा विचार करते व तो घटक रद्द करते. याने होते की खरेदी केल्याचे तात्पुरते समाधान मिळते व कालांतराने तो घटक अत्यावश्यक नाही हे आपल्यालाच पटते. हा माझा अनुभव आहे की याने माझे हजारो रुपये वाचलेत.
बाकी खुसखुशीत लेख

पद्मावति- धन्यवाद.पद्मावति की पद्मावत!!

प्राची अश्विनी-थँक्यू

सुहास म्हात्रे- बरं झालं की!त्रास वाचला.

यशोधरा- मैद्याच्याच, अशी कबुली देते..

मदनबाण- तसं वाटत असेल तर आनंद आहे.

पैलवान-अगदी खरं.

अमरेंद्र बाहुबली, चामुंडराय -मराठीत पीठ.इंग्रजीत फ्लोअर.तिथे पॅकवर आटा असतं ना, तेच तोंडात बसतं. तांदूळ डाळ खुली वजनावर आणल्याने त्या बाबतीत मूळ शब्द राहतो. पण दावत बासमती पॅकेट आणलं की चावल असंच डोक्यात येतं.

ज्योती अळवणी-फोनवर सामान मागवून जे घोटाळे होतात ते लेखात दिलेच आहेत.

जालीम लोशन-धन्यवाद.

जॉनविक्क-हा मार्ग चांगलाय.

स्नेहांकिता-मssssग!

सर्वसाक्षी-हाहाहा!वा!

अडाणी सखू-तर काय! अगदी

सर्वसाक्षी- तुलना गंमतशीर आहे.

श्वेता - ऍप वगैरे नव्याने शिकून जुळवून घेणं जड जात. त्याबद्दल लिहीन कधी जमलं तर.

मराठीत पीठ. इंग्रजीत फ्लोअर

अगं आज्जे, फ्लोअर नाही काई... फ्लॉवर, फ्लॉवर

कालच ते कॉलेज समोरचे वैल्यू फ़ॉर मनी मधे गेलो 5 रूपयला खारी पेटिस, 5 रूपयला कटलेट, 12 ला चॉकलेट ब्राउनी म्हणून एक एक करत 80 रूपयांची खदाडी करून आलो. हेच एखादया पोहा उपमा प्लेट मधे भागुन गेले असते.

छान लिहिलंय, मजा आली लेख आणि प्रतिसाद दोन्ही वाचून 😀

सुबोध खरे's picture

17 Sep 2019 - 8:36 pm | सुबोध खरे

एक वेगळा विचार --

आम्ही दोघं मुलांबरोबर डी मार्टला खरेदीला जातो त्यात मुलांच्या( आणि आमच्या) अनेक आवडीच्या परंतु अनावश्यक अशा वस्तू विकत आणल्या जातात. एकंदर महिन्याला ५-६००० रुपये आवश्यक गोष्टींना आणि २-३००० अनावश्यक ( चैनीच्या) विकत आणल्या जातात. यात मॅगी नूडल्स, केलोंगचे चोको, चोको चिप्स सारखी बिस्किटे, फळांचे रस, ऍपी फिझ,शीतपेये, चिक्की, पिझ्झा चीज सारख्या गोष्टी मुले स्वतःच्या हाताने निवडून घेतात.

एकंदर मारवाडी हिशेब केला असताना माझा एकदा हॉटेलला जायचा खर्च (चार जण गेले तर मुंबईत खर्च कमीत कमी १५००च्या आसपास होतो) वाचला तरी हे पैसे वसूल होतात. त्यातून मुलांना आपल्या आवडीच्या वस्तू विकत आणता येतात उदा. त्यांना हवी असणारी टूथपेस्ट, साबण, डिओ स्प्रे, हेअर जेल, शाम्पू इ.

इतकी वर्षे त्यांना घेऊन जात असल्याने नकळत किमतीची तुलना करून चांगली वस्तू कोणती आणि कोणती वस्तू स्वस्त मिळू शकते याचे तारतम्य मुलांमध्ये आले आहे हा एक मोठा फायदा आहे.

डी मार्ट मध्ये गोष्टी ३० ते ४० % स्वस्त मिळतात. एकदा आमच्या घरात तेल संपले म्हणून समोरच्या मारवाड्याकडे गेलो तेंव्हा तो तेलाचे १०५ रुपये (कमाल किमतीला) विकत होता मी त्याला विचारले कि डी मार्ट मध्ये ७५ रुपयाला आहे मग त्याने मला तेच तेल ८० रुपयाला दिले.
पूर्वी वाणी लिहिलेल्या किमतीलाच माल देत असे. म्हणजे जाण्यायेण्याचा रिक्षाचा खर्च सुद्धा परवडेल अशी स्थिती आहे.
आता वाचलेल्या पैशात चैनीच्या चार वस्तू विकत घेता येतात याचे समाधान आहे आणि त्यात मुलांचे व्यवहार शिक्षण सुद्धा झाले आहे.

आजी's picture

23 Sep 2019 - 12:34 pm | आजी

हिशोब मजेशीर आहे.