सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ६: स्पिलो ते नाको

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
12 Sep 2019 - 7:06 pm

६: स्पिलो ते नाको

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ४: रामपूर बुशहर ते टापरी

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ५: टापरी ते स्पिलो

३१ जुलैच्या सायंकाळी स्पिलोतील हॉटेलवाल्या लोकांसोबत चांगल्या गप्पा झाल्या. इथे आता बौद्ध समुदाय मुख्य दिसत आहे. राहणीमान आणि खाणं अशा गोष्टीही लदाख़सारख्या वाटत आहेत. किन्नौरच्या ह्या अगदी आतल्या भागात गावं कमीच आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात हॉटेल, रेशन, होम स्टे, बँक अशा सुविधा असतात. इथे आधी ब्लास्टिंग आणि पुढच्या रस्त्याविषयी विचारलं. मी गेल्यानंतर परवा स्पिलोच्या थोडं पुढे ब्लास्टिंग केलं जाणार आहे. रस्ता सध्या तरी ठीक आहे. स्पिलोमध्ये चांगलं नेटवर्क मिळत आहे. त्यामुळे पुढच्या रूटविषयी माहिती घेतली. जेव्हा इंटरनेटवर पू (पूह) गावाबद्दल शोधलं तेव्हा कळालं की, १९०९ मध्ये इथपर्यंत एक विदेशी‌ आला होता व त्याच्या लक्षात आलं की, पू (पूह) मध्ये सगळे जणं तिबेटीच बोलतात! मला उद्या म्हणजे १ ऑगस्टला तिथूनच जायचं आहे. निघण्यापूर्वी प्रेअर व्हीलच्या जवळ फिरत होतो तेव्हा काही जणांनी माझी‌ विचारपूस केली. त्यांना माझ्या अभियानाची उत्सुकता होती, कौतुकही केलं. इथे श्री सुरिंदर नेगी भेटले. त्यांनी मला नाकोच्या हॉटेलवाल्याचा संपर्क दिला व शुभेच्छाही दिल्या. आलू पराठ्याचा नाश्ता करून निघालो. आज बहुतेक हॉटेल कमीच लागतील, म्हणून बिस्कीट आणि केळीही‌ घेतली. कालच्या तुलनेत आज मस्त ऊन पडलंय, त्यामुळे आकाश निळं दिसतंय! स्पिलोमधून निघताना तरी चेह-यावर हसू आहे...

स्पिलोच्या थोडंच पुढे ब्लास्टिंग केलं जाणार आहे तो भाग आला. रस्ता अगदीच दुर्दशेच्या स्थितीत आहे. आणि आता ह्या रस्त्याला जगातील सर्वांत दुर्गम रस्ता का म्हणतात, ह्याचे पुरावे मिळायला सुरुवात झाली. अगदीच बाद झालेला रस्ता. तुटलेले आणि तुटणारे दगड- पहाड! अगदीच खडकाळ रस्ता. आणि आज सलग चौथ्या दिवशीसुद्धा सतलुजचं कूजन! अर्थात् आज सतलुज- स्पीति संगम येईल आणि नंतर मी सतलुजचा निरोप घेऊन स्पीतिकडे कूच करेन. प्रशासकीय दृष्टीने नाको किन्नौरमध्ये येतं, पण प्राकृतिक दृष्टीने संगमानंतर स्पीति खोरं सुरू होईल. परवा व कालच्या अनुभवानंतर महा- दुर्गम रस्त्यासाठी सज्ज आहे... ब्लास्टिंगचा भाग तीन- चार किलोमीटरपर्यंत आहे. त्यानंतर एक तिबेटी मंत्र पताका असलेला दगड आला. म्हणजेच हा जुन्या काळातला कोणता तरी ला असावा- कोणता तरी छोटा घाट असावा. पुढे चांगला रस्ता मिळणार. आणि तसंच झाली. काही अंतरासाठी तरी चांगला व सुरक्षित रस्ता मिळाला! मध्ये मध्ये बीआरओचे लोक सोडून बाकी वाहनं फारच तुरळक दिसत आहेत. अचानक कुठून तरी हिमाचल परिवहनची बस येऊन जाते! 'देवभूमि हिमाचल' बस चालकांना माझा (साष्टांग) नमस्कार!

आज आकाश बरंच निरभ्र असल्यामुळे उंच पर्वत दिसत आहेत. आणि काही हिमाच्छादित शिखरही दिसत आहेत. हिमाचलच्या काही भागांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. पण इथे पावसाचं वातावरण नाहीय. पावसाची शक्यता नसल्यामुळे आता जरा निश्चिंत वाटतं आहे. पावसाच्या भितीचा मुख्य पट्टा मी पार केला आहे. पुढे लाहौलपर्यंत फार पाऊस लागणार नाही. स्पिलोच्या हॉटेलवाल्याने हेच सांगितलं होतं. काही वेळ निळं निरभ्र आकाश बघून छान वाटलं. पण थोड्या वेळाने ऊन्हामुळे गरम व्हायला लागलं. आणि रस्ता सतलुजच्या सोबतच जातो आहे, त्यामुळे दमट हवाही आहे.

आता पूह गावाची वाट बघतोय. कारण आजच्या रस्त्यावर कमीच गावं लागतील आणि अगदी चहा- बिस्किटाचीही हॉटेल्स कमीच लागतील. पूहच्या आधी काही मिलिटरी युनिटस लागले. काही हॉटेल बंद आहेत. ऊन्हामुळे थकवा वाटायला लागला. समोर एक रस्ता वर चढताना दिसत होता. माझ्या मॅपप्रमाणे खाब संगमापर्यंत तर जवळजवळ समतल रस्ता आहे. आणि वर जाणारा हा रस्ता पूह गावाकडे जातो आहे, हे बघून बरं वाटलं. गावाआधी पारंपारिक मानेही दिसला (एका पांढ-या खडकासारखी बौद्ध रचना). आता हॉटेल मात्र पाहिजेच. एके जागी खूप ट्रक्स दिसत होते. अनेक ठिकाणी बीएसएफचे युनिटसही आहेत. त्या जवानांसोबत थोडसं बोललो. हा सगळा इनर लाईन परमिटचा भाग आहे. काल पोवारीजवळ परमिट तपासण्याची जागा आहे. आता भारतीय नागरिक परमिट न घेता जाऊ शकतात, त्यामुळे मला जाऊ दिलं होतं. विदेशी लोकांना पासपोर्ट व परमिट दाखवावा लागतो. मिलिटरी युनिटसच्या मधून जाताना कधी पूह गाव संपलं कळालंच नाही. आणि एका ट्रकवाल्याने सांगितलं की, पुढचं हॉटेल खाबमध्येच मिळेल, म्हणजे अजून १३ किलोमीटर दूर! मला हॉटेलपेक्षाही पाण्याची जास्त तातडी आहे. खाण्यासाठी केळी आणि बिस्किटं आहेतच. एका जागी थांबून केळी व बिस्किटं खाल्ली. ऊन लागत असल्यामुळे पाणी सारखं प्यावं लागतंय. त्यामुळे सोबत घेतलेलं बाटलीतलं पाणी संपत आलंय. आणि खूप वेळेपासून रस्त्याच्या बाजूला पिण्यायोग्य पाण्याचा नैसर्गिक झरा लागलेला नाहीय. तशातच एका जागी हापसा दिसला. रस्त्याच्या थोडा बाजूला. तिथे जाऊन पाणी उपसण्याचा प्रयत्न केला. अनेकदा खाली- वर हापसल्यानंतर थोडं पाणी आलं. तेवढं बाटलीत भरलं. तेव्हा जाणवलं की, हापसण्याची मेहनत त्यातून मिळणा-या पाण्यापेक्षा कमी आहे! मग थोडं पाणी पिऊन घेतलं व थोडं भरून घेतलं. आता चलो खाब- अर्थात् स्पीति- सतलुज संगमाकडे...

इथून तिबेट सीमा जेमतेम वीस किलोमीटर दूर आहे. तिथले हिमाच्छादित पर्वतही आता दिसत आहेत! वा! किती विलक्षण प्रदेशातून जायला मिळतंय! इथे काही जे- के १० नंबर प्लेटच्या गाड्या दिसल्या. काल मोबाईलमध्ये बातम्या बघितल्या होत्या की, जम्मू- कश्मीरमध्ये दहा हजारांहून जास्त निमलष्करी दळांना पाठवलंय. नक्कीच तिथे काही तरी घडत आहे. असो. आज सतलुजपासून दूर जाणार असल्यामुळे काही वेळ तिला न्याहाळत राहिलो. रामपूर बुशहराच्या ३० किलोमीटर अलीकडेपासून मी सतलुजसोबतच जातोय! आणि इतकं अंतर ओलांडल्यानंतर सतलुजसुद्धा आता कमी रुंदीची पर्वतीय जलधारा झाली आहे! रमणीय आहेच, पण कुठे कुठे अतिशय भितीदायकसुद्धा! अगदी हिरव्यागार हिमालयापासून आता शुष्क रखरखीत हिमालयापर्यंत! नजा-यांचा आनंद घेत राहिलो. पण परत थकायला झालं. आता पोटाला चांगलं‌ इंधन पाहिजे. चांगला नाश्ता हवा. आणि असं एक हॉटेल मिळालं. दुब्लिंग गावाकडे एक फाटा जात आहे. इथेच सतलुजवर एक पूल आहे आणि तिथेच एक हॉटेलही आहे. गंमत म्हणजे हॉटेलात श्रेया घोषाल आहे! वा! नंतर रफी साहेबही आले. त्यांचं अगदी समर्पक गाणं लागलं- मंजिल से राहें बड़ी असं काही. ओळखीचं होतं, पण ओळी लक्षात नाही राहिल्या. किन्नौरमध्ये अनेक हॉटेलमध्ये महिला असतात. इथेही एक ताई होत्या. त्यांनी मला पराठा बनवला. चहा- बिस्कीट आणि पराठ्याचा नाश्ता केला. पुढच्या गावाविषयी विचारलं. त्यांनी सांगितलं की, पुढे संगमावर (खाब ब्रिज) हॉटेल असेल आणि नंतर का गाव येईल व मग नाको. पूहच्या काही अंतर आधीपर्यंत मोबाईल नेटवर्क होतं. इथे तर मोबाईलसुद्धा अवाक् झाला.

निघाल्यानंतर खाबच्या आधी परत बीएसएफचे युनिटस लागले. एक जे- के रायफल्सचं युनिटही लागलं. मुख्य रस्ता- राष्ट्रीय महामार्गावरून बाजूच्या डोंगरावर युनिटकडे जाणारे रस्ते दिसले. आणि अगदी जवळच तिबेटचे पर्वत! लवकरच खाब ब्रिज आला. इथे गाव असं काही नाहीय. फक्त संगम व त्यावर पूल आहे. स्पीति नदी! इथे सतलुजमध्ये एकरूप होणारी स्पीति अगदी पहाडी नदी आहे! मोठ्या गर्जनेसह खळखळ नाचणारी कोसळणारी! इथून तिबेट जेमतेम १० किलोमीटर दूर आहे! तिबेटमधले पर्वत तर दिसतच आहेत! व्वा! जीवन सार्थक झाल्यासारखा अनुभव वाटतोय हा. ब्रिज ओलांडल्यावर स्पीतिसोबत पुढे जाणा-या रस्त्याविषयी तर काय सांगू! काही वेळ तर वाटलं की हा रस्ताच नाहीय. फक्त एक ट्रेक पाथ आहे व तो नदीच्या बाजू बाजूने डोंगरात वर चढतोय! इतक अरुंद रस्ता आणि डावीकडे घाबरवणारी स्पीति! इतका छोटा रस्ता आणि तीव्र वारे! त्यामुळे नियम बाजूला ठेवून सरळ उजव्या बाजूने सायकल चालवायला लागलो. इथे वाहनं अगदीच कमी लागत आहेत, त्यामुळे हे शक्य आहे. रस्ता इतका छोटा आहे की, अगदी कार किंवा जीप आली तरी जागा देण्यासाठी मला जागा शोधावी लागते आहे आणि काही सेकंद थांबावं लागतंय! अशा रस्त्यांवर बस आणि ट्रकही जातात! वा! संगम नेहमी कमी उंचीवर असतो. म्हणजेच, संगमानंतर चढ सुरू होतो. सुरुवातीला हा चढ बराच तीव्र आहे. नंतर थोडा कमी तीव्र झाला. आणि रस्ताही स्पीतिपासून थोडा वळून डोंगरातल्या आतल्या बाजूला आला. स्पीति आता थोडी खाली वाहताना दिसते आहे. पण तरीही दरी आहेच. इथे जे फोटो घेतले आहेत, ते घाबरत घाबरतच घेतले आहेत आणि एक्स्पोजरपासून दूर आल्यावरच घेतले आहेत.


खाब ब्रिजनंतरची स्पीति!

काही अंतर चढून गेल्यावर पुढचं दृश्य स्पष्ट झालं. समोर अनेक वळणं घेऊन रस्ता वर चढतोय. कमीत कमी सात- आठ लूप आणखी असतील! आणि प्रत्येक लूप अर्ध्या किलोमीटरचं आहे. इथे दरीचं एक्स्पोजर कमी झालं, पण चढच भितीदायक आहे! आणि खरं तर विश्वास बसत नाहीय की, मी "अशा" रस्त्यांवर आणि "इतक्या" चढावर सायकल चालवतोय! इथेही सातत्याने रस्ता दुरुस्ती सुरूच आहे. मध्ये मध्ये बिचा-या दुर्दैवी कर्मचा-यांचं दर्शन होतं. त्यांना नमस्ते म्हणतो. काही लोकांना आश्चर्य वाटतं. काही लोक तर यंत्रवत झाले आहेत. इथे कच्चा रस्ता लागला. त्यात छोटे खडे व दगडही आहेत. त्यामुळे वेग कमी आहे. पण... पण नजारे! मी अशा दुर्गम डोंगरातून जातोय जिथे आता चारही बाजूंना उंच पर्वत दिसत आहेत! आता अनेक हिम शिखर दिसत आहेत! आणि रस्ता जसा वर चढत जातोय, तशी स्पीति आणखी खाली दिसते आहे. इथे एका जागी वाटलं की, रस्ता नदीला समांतर पुढे गेलेला असावा. पण मध्ये काही पॅच तुटले होते, रस्ता वाहून गेला असणार. म्हणून नवीन रस्ता वर चढून जाणारा बनवावा लागला असणार. संगमानंतर सात किलोमीटरसाठी सव्वा तास लागला! अगदी अवाक् करणारा अनुभव! कदाचित माझ्या आयुष्यातल्या सर्वांत कठीण राईडपैकी एक- May be one of the life time toughest ride! विश्वासच बसत नाहीय की, मी अशा जागी सायकल चालवतोय. खाब संगम सुमारे २६०० मीटर उंचीवर आहे; तिथून रस्ता ७ किलोमीटरमध्ये अर्धा किलोमीटर म्हणजे ५०० मीटर तरी वर चढला असणार. आता तर स्पीतिचा आवाजही हळु ऐकू येतोय. दूर कुठे तरी पाताळातून ती वाहताना दिसते आहे. हा टप्पा अगदी पाताळयात्रेसारखा झाला- पाताळातून कातळात- पर्वतात! काही काही ठिकाणी मागे वळून बघताना खालून वर येणारा रस्ता दिसतोय. विश्वासच बसत नाहीय की, मी "तिथून" वर आलोय! मध्ये मध्ये बिस्कीटस खात राहिलो, पाणी पीत राहिलो. पण ५०० मीटर उंचीचा फरक फार मोठा असतो. त्यामुळे परत थकवा वाढायला लागला. आणि हवामान आता मध्ये मध्ये थंड होतं आहे. त्यामुळे शरीरात तपमान नियंत्रित करणा-या प्रक्रियेवर परिणाम होण्यास सुरुवात झाली. कधी थंड तर कधी गरम वाटतंय. आता का गावाची डेस्परेटली वाट बघतोय. तसं‌ नाको इथून फक्त १८ किलोमीटर दूर आहे. पण त्याआधी मला नीट जेवावं लागेल. बिकट अवस्थेमध्ये गावात पोहचलो. इथे मस्त हॉटेल मिळालं! जर हे हॉटेल इथे नसतं, तर...


नदीपासून वर येणा-या रस्त्याचा एक टप्पा!

हॉटेलातल्या लोकांनी मला बरीच मदत केली. आधी विचारपूस केली. मग पाणी दिलं. चहा- जेवणही दिलं. मुख्य म्हणजे मला एकटं वाटू दिलं नाही. इथे जवळपास दिड तास थांबलो. बिस्कीटाबरोबर दोनदा चहाही घेतला. भात व पोळी भाजीही घेतली. इथे एक सरदारजी बसले होते. त्यांची कार इथेच बंद पडली आहे. आणि मिसिंग कंप्लेंट करण्याच्या ते विचारात आहेत. कारण इथून टो करून नेण्याचा खर्च फार जास्त असेल! हॉटेलात आदरणीय दलाई लामांचा फोटो बघूनही बरं वाटलं! Don't be a gama in the land of Lama! हॉटेलवाल्याने मला सांगितलं की, पावसामुळे लोसर- ग्राम्फूमधला रस्ता बंद झाला आहे. लोक लोसरवरून परत आले आहेत. हॉटेलात बसल्या बसल्या स्थानिक लोकांचं बोलणं ऐकलं. ते एकमेकांना नमस्कारासाठी जुले जुलेच म्हणत आहेत! तेव्हा विचारलं की, लदाख़मध्ये जुले जुले म्हणतात, तसंच स्पीतिमध्येही म्हणतात (किन्नौर असला तरी स्पीति भाग सुरू झाल्यासारखाच होता) का? त्यावर ते म्हणाले की, स्पीतिच नाही तर किन्नौरमध्येही जुले जुलेच म्हणतात! एकदमच छान वाटलं! जुले किन्नौर, जुले स्पीति! नंतर हॉटेलवाल्याने सांगितलं की, इथून नाकोपर्यंतही चढ आहे. पण इतकी तीव्र नाही. मला वाटतंय की, सलग सात- आठ किलोमीटर चढलोय, २६०० मीटरवरून ३२०० मीटरपर्यंत आलोच असेन. आणि नाको ३७०० मीटरवर आहे, म्हणजे १६ किलोमीटरमध्ये ५०० मीटर चढायचं आहे. म्हणजे तितका तीव्र चढ नसणार! पण हा अंदाच बराच चूक होता! कारण का गावानंतर थोडा उतारही आहे! आणि ३१०० मीटर उंचीवर सायकल चालवणंही वेगळी गोष्ट आहे!

का वरून निघाल्यानंतर दोन- तीन किलोमीटर सोपे गेले. पण हळु हळु परत कठीण जायला लागलं. रस्त्याचा चढ इतका तीव्र असा वाटला नाही. पण २५०० मीटरवर पेडल मारताना जो फोर्स मिळत होता, तो आता ३१०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर मिळत नाही आहे. कारण इथली हवा सामान्य हवेच्या तुलनेत ६२% असते. त्यामुळे लवकर धाप लागते आहे आणि थकवाही वाढतो आहे. पण तरीही अगदी सायकल चालवताच येत नाहीय, अशी स्थिती नाही आहे. सगळ्यांत खालच्या १-१ गेअरवर सायकल चालवू शकतोय! आणि हेही आश्चर्यच आहे माझ्यासाठी. हळु हळु पुढे जात राहिलो. चांगली गोष्ट ही आहे की, का च्या पुढे आता रस्ता खूपच चांगला आहे. जय बीआरओ! इथेही काही लूप्स आहेत. अशाच एका चढावर शिमल्यानंतर पहिल्यांदाच एमएच गाडी दिसली! आत्तापर्यंत तर गुजरात किंवा एमपीच्या गाड्याही 'आपल्या' वाटायला लागल्या होत्या! हाताने इशारा केल्यावर ते थांबलेसुद्धा. थोडा वेळ बोलणं झालं. त्यांनी माझे फोटो काढले, विचारपूस केली. पाच मिनिट त्यांच्याशी बोलून छान वाटलं. एक कार आणि दोन बाईकर्स शिमला ते मनाली जात आहेत. रस्ता आता इतका वर आला आहे की, स्पीति फक्त पाताळातली एक रेषेसारखी दिसते आहे! इथे दोन बुलेटवालेही दिसले. थायलंडचे आहेत. त्यांची बुलेट फार गरम झाल्यामुळे ते थांबले आहेत. इथे एका वेळी‌ वारा वाहत असेल आणि ढग आले तर फार थंड वाटतंय आणि ऊन असताना तितकंच गरमही होतंय!


देखा एक "खाब" तो ये सिलसिले हुए (चढांचे)!

वाटेत एक रस्ता इथून खाली जाऊन चांगो गावाच्या दिशेला जाणारा लागला. रखरखीत डोंगरांच्या मध्ये असलेल्या दरीत जी हिरवळ आहे, ते तेच गाव आहे. इथे दोन महिलांना रस्ता विचारला. मला वर चढणा-या रस्त्यानेच नाकोला जायचं आहे! इथून नाको आठ किलोमीटर असेल. पण पूर्ण रस्ता चढावाचा. एक एक लूप चढत गेल्यावर खाली असलेल्या दोन स्त्रिया आणि तो फाटा छोटा होताना दिसत गेला. खाली थांबलेले बुलेटवालेही दिसत राहिले. मी वर पोहचेपर्यंत ते मला क्रॉस करून गेले नाहीत. श्वास घेण्यासाठी हवा विरळ असली तरी वारं सघन आणि तीक्ष्ण आहे! थंडी व गर्मीचा लपंडाव चालू राहिला. अगदी संथ लयीत सायकल चालवत राहिलो. इतकं बिकट जात असूनही एकदाही वाटलं नाही की पायी पायी जावं लागेल. सायकल चालवतच राहिलो. ह्या मोहीमेत पुढे कशा राईडस असतील नसतील, पण आजची राईड माझ्यासाठी आयुष्यभराची उपलब्धी ठरेल!

दुपार जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा ढगही दाटून आले. थोड्या वेळाने आसपासच्या पर्वतांवरही काळे ढग दिसले. थोडे थेंबही पडले. त्यानंतर थंडी वाढली. गरम होत असल्याने मास्क लावलं नव्हतं. कारण ते लावलं की, लगेच घाम येतो आणि श्वास घेतानाही अडचण होते. त्याच कारणामुळे पातळ टी- शर्टच्या वर काही जॅकेटही घालता येत नाही. त्यामुळे त्या थंडीला तसंच सहन करत राहिलो. मध्ये मध्ये बीआरओच्या ट्रक्सचा काफिला क्रॉस झाला. त्यांना सॅल्युट केलं तेव्हा त्यांनीही मला उत्तरादाखल सॅल्युट केलं! काय बोलू त्यावर! काय दिवस जातोय आजचा. असं वाटतंय की, नाको हे ह्या रस्त्यावरचं उंच स्थान असणार. म्हणजे नाकोपर्यंत रस्ता चढेल आणि मगच उतार मिळेल. नाकोच्या काही अंतर आधी मलिंग गावाचा फलक दिसला. कुप्रसिद्ध मलिंग नाल्याचंच हे गाव असणार. इथूनही नाको पुढे आहे. कसंबसं जात राहिलो. जेव्हा काही घर व शेत आले, तेव्हा वाटलं आलं नाको. पण नाको नाही हे! नाको तर आणखी वर आहे. थांबत थांबत जात राहिलो. सरतेशेवटी संध्याकाळी पावणेसहाला नाकोच्या जवळ पोहचलो. रस्त्यावरच काही हॉटेल्स आहेत. मला नाकोतल्या ज्या हॉटेलवाल्याचं नाव सांगितलं गेलं होतं, ते विचारलं. ते विचारताना इथल्याच हॉटेलातही होम स्टे आहे हे कळालं. ती खोली बघितली, थोडा भाव केला आणि घेतली लगेच. मला आत्ता जवळजवळ ताप आल्यासारखं वाटतंय. पोहचलो तर आहे, पण अवस्था गलितगात्र आहे. त्यामुळे तेव्हाच ठरवलं की, उद्याचा दिवस नाकोमध्येच आराम करेन. आरामसुद्धा आणि अक्लमटायजेशन सुद्धा. कारण २५०० मीटर वरून ३७०० मीटर वर आलो आहे. लगेच पुढे गेलो तर शरीराला आणखी कठीण जाईल. एक दिवस थांबून गेलो तर शरीर तोपर्यंत एडजस्ट झालेलं असेल.

पण काय दिवस होता हा! आज सुमारे ६३ किलोमीटर सायकल चालवली आणि पाच दिवसांमध्ये सुमारे ३१७ किलोमीटर झाले! आजचे चढ अंदाजापेक्षा फार जास्त होते. जेव्हा सायकल रूट मॅप बनवले होते, तेव्हा चढांचं जे एस्टिमेट केलं होतं, त्यामध्ये आजचा चढ मोठा होताच तसा, पण तो शिमला- नार्कंडा चढाच्या तुल्यबळ होता आणि तो तर मी आरामात केला होता. नक्कीच त्या एस्टिमेटमध्ये- रूट मॅपमध्ये काही चूक झालेली असणार! पण किती अविश्वसनीय राईड झाली ही! मला आत्ताही विश्वास बसत नाहीय आणि कदाचित भविष्यातही माझा सहज विश्वास बसणार नाही की, मी "इथे" सायकल चालवली आहे! ह्या मोहीमेचे ५ दिवस पूर्ण झाले. सुमारे २०- २१ दिवसांच्या योजनेतले पहिले ५ दिवस तर योजनेनुसारच झाले. म्हणजे चार टेस्ट मॅचच्या मालिकेतली पहिली मॅच मी जिंकली! खरंच ही मोठीच कसोटी होती आणि मी पास तर झालोय. पण आता आराम हवा आहे. तापासारख्या स्थितीतून रिकव्हर व्हायला पाहिजे. बघूया पुढे कसं जमतंय.


आजचा रूट


चढ

पुढील भाग- सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ७: नाको ते ताबो

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

जीवनमानक्रीडाआरोग्य

प्रतिक्रिया

भन्नाट राईड! सुरेख लिहिलंय.

प्रथम प्रचिबद्दल. या वेळेस वर्णन कमी पण प्रचिनी भरपाई केलेली दिसते. सर्वात जास्त चांगले चित्र कोणते हे पाहात होतो. आणि ध्यानात आले की शब्द थिटे पडतील. निसर्गाचे रौद्रभीषण सौंदर्य, भव्यता, सारे काही कल्पनातीत. केवळ थरारक.

वर्णनात थरार आणि आशानिराशेचा खेळ जाणवतो. परफॉर्मन्सचे यश आपल्या डोक्यात गेले नाही. तब्येतीची चिंता तुमच्याबरोबर वाचकाच्याही मनात दाटून येते आहे.

प्रत्ययकारी हा एकच शब्द मनात येतो. धन्यवाद.

मार्गी's picture

14 Sep 2019 - 2:24 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!