ह्या शॉर्ट-फिल्मविषयी वाचण्यापुर्वी एकदा Afterglow पहावा आणि मग वाचावे ही विनंती.
आवडलेल्या, थोड्या अनोळखी शॉर्ट-फिल्मविषयी इतरांना सांगावे; त्यात काय भावले, काय स्पर्शून गेले ते लिहावे हा हेतू. लिखाणाच्या ओघात काही स्पॉइलर्स येतील, त्याची वेगळी सूचना नाही. कोर्या मनाने फिल्म पाहूनच हे वाचावे ही पुन्हा एकदा विनंती.
मृत्यू, विरहाची एखादी दु:खद कथा हलकी-फुलकी ठेवूनही किती हळूवार, संवेदनशीलपणे दाखवता येते हे पहायचे असेल तर Afterglow ही शॉर्ट-फिल्म अवश्य पहावी. दिग्दर्शक कौशल ओझाने रोहिंटन मिस्त्रीच्या Condolence Visit ह्या कथेने प्रेरित होऊन Afterglow ही शॉर्ट-फिल्म बनवली आहे. फिल्म २० मिनिटांचीच आहे पण ती अतिशय सुरेखपणे मुंबईतील 'टिपीकल' पारशी घर, मिनोचर-मेहेरचं सहजीवन आणि तिथले जगणे टिपते.
कौशल ओझाच्या Afterglow ह्या फिल्मला २०१२ सालचे Best short-film on family values हे नॅशनल अॅवार्ड मिळाले आहे शिवाय कित्येक आंतरराष्ट्रीय शॉर्ट-फिल्म महोत्सवातही ती दाखवली आहे. मृत्युसारखा विषय मेलोड्रामॅटीक न करता विनोदाच्या साथीने, तरीही तरलपणे दाखवण्याचे कसब कौशलकडे आहे. असाध्य रोगामुळे पतीचा नुकताच मृत्यू झालेल्या पत्नीची घालमेल, आणि तिच्या आठवणी ही ह्या फिल्मची कल्पना, पण तिचं सादरीकरण असं केलंय की त्याची दखल घ्यावीच लागते.
अनहिता ओबेरॉय आणि सोहराब अर्देशीर - दोघंही रंगभुमीवर नावाजलेले कलाकार आहेत. त्यांनी मेहेर आणि मिनोचरच्या भुमिकांमध्ये जीव ओतलाय. बहुतांशी पारशी लोकांच्या भुमिका पारशी कलाकारांनीच केल्यात, आणि त्यातील काहींनी तर ह्या भुमिका विना-मोबदला केल्यात.
मिनोचरच्या (सोहराब अर्देशीर) मृत्युनंतर काही दिवस उलटून गेलेत, पण अजूनही मेहेरला (अनहिता ओबेरॉय) त्याच्यासाठी लावलेला दिवा विझवायचं मन होत नाही. थोडी प्रेमळ, बरीचशी आगाऊ नजमाई तिला दिवा लावण्याचे आणि वेळेवर विझवण्याचे महत्त्व सांगते, पण ती ते कानाआड करते. तिच्या कानात गुणगुणतात त्याच्या आवडत्या रेकॉर्डस् आणि त्या दोघांच्या गप्पा. अर्थात लग्नाला खूप वर्षे झालीत, त्यामुळे गोड-गोड गप्पा कमीच आहेत. त्यांच्या मस्त मुरलेल्या लोणच्याच्या खारासारख्या बोलण्याचा खुमार संवादात नेमका उतरलाय. मिनोचर आजारी असतांना एखाद्या क्षणी त्याच्या अटळ अंताच्या कल्पनेने हळवे, दु:खी होऊन दोघांची नजरानजर होते, पण दुसर्याच क्षणी सावरून मेहेर त्याला टोचते किंवा काहितरी विनोद करते. थोडेच दिवस उरलेत त्याचे, रडायचे कशाला? हे छोटे-छोटे पॉझेस् फार सुरेख घेतलेत दिग्दर्शकाने आणि कलाकारांनीही. मिनोचर त्याचे काल्पनिक funeral चे बोलणे, तिचा वैताग एका छोट्याशा वॉकमन मध्ये साठवत राहतो. त्यात त्याचे बेस्ट बसच्या इंजिनासारखे झालेले लिव्हर, त्याचा घास-फुस खायचा कंटाळा आणि मग तिने आवडती डिश केल्यावर त्याने हळूवारपणे तिलाच भरवत सांगणे - "I know I can't have it jaanu, but this comes closest to making me feel that I can." ती आठवणींनी डोळे पुसत राहते, आणि त्याच्यासाठी लावलेल्या दिव्यात तेल टाकत राहते. मग एखाद्या क्षणी, रोजच्यासारखा चहा ओततांना लक्षात येते, आता दुसरा कप भरायची गरज नाही...
ह्या शॉर्ट-फिल्मच्या पटकथेत (पटकथा कौशल ओझाचीच आहे) मेहेरच्या आठवणी अगदी सहजच विणल्या आहेत, त्या वारंवार तुकड्या-तुकड्याने येतात. त्या अर्थाने linear-narration नाही. कुठला प्रसंग वर्तमानात सुरू आहे आणि कुठला भूतकाळातला आहे हे आपल्याला लक्षात येते, पण त्यासाठी फ्लॅशबॅकचे काही खास इफेक्टस् नाही. रोजच्या जगण्यात जशा पदोपदी मेहेरला मिनोचरच्या आठवणी येतात, तशाच अलगदपणे हे प्रसंग निवेदनात गुंफलेत. मिनोचरच्या मृत्युनंतरच्या दिवसात मेहेरसाठी काळ निराळ्याच गतीने चाललाय - त्यात एक आभासीय वर्तमानाची आणि भूतकाळाची सरमिसळ आहे. पुढे-मागे होणार्या काळाचा हा तोल कौशल ओझाने निवेदनात फार खुबीने सांभाळला आहे. तंत्रापेक्षाही कथेची गरज म्हणून ही treatment मला फारच आवडली.
तसाच संकलनात वापरला जाणारा L-cut (ज्यात आधीच्या प्रसंगातला आवाज पुढील प्रसंगातही ऐकू येतो) ह्या शॉर्ट-फिल्ममध्ये कित्येकदा चपखलपणे वापरला आहे. आधीच्या भूतकाळातील प्रसंगात ऐकू येणारे संगीत हळूवारपणे नंतरच्या वर्तमानकाळातल्या आठवणीत उतरते. इथेही तंत्रापेक्षा निवेदनाची शैली म्हणून ह्याचा परिणामकारक वापर खूप अल्हाददायक आहे.
ह्यातील संगीतही एखाद्या कलाकारासारखेच महत्वाचे आहे. Johannes Helsberg ह्या जर्मन संगीतकाराने जर्मनीत असतांना कथेने प्रभावित होऊन हे संगीत केलंय. त्याच्याबरोबर संगीताचे सगळे काम व्हायला ६ महिने लागले. कौशल ओझा त्या काळात इंटरनेटवरून त्याच्या संपर्कात होता. कथेच्या सॉफ्ट, रेट्रो छायांकनाच्या जोडीला हे संगीत फिल्मचा मूड अचूक पकडते. टागोरांच्या एका उधृताने सुरू झालेली ही फिल्म मनाच्या एखाद्या निवांत कोपर्यात एखाद्या विलंबित ख्यालासारखी रेंगाळत राहते.
मेहेरचा अपरिहार्य स्वीकार शांतपणे येतो. मिनोचरची लग्नातली पारशी पगडी ती एका भावी वराला देऊन टाकते. दिव्यात तेल टाकत रहाण्याचा फोलपणा तिला जाणवतो. एका मोठ्या, जुन्या खोलीतल्या एका कोपर्यात एकटीच मेहेर रॉकिंग चेअरवर एकाच जागी मागे-पुढे होत रहाते. तेल संपलेला दिवा हळूहळू विझून जातो. स्क्रीनवरचा तो उबदार afterglow हळूवारपणे झिरपत आपल्यापर्यंत येतो.
हाच लेख माझ्या ब्लॉगवरही प्रकाशित केला आहे.
प्रतिक्रिया
6 Sep 2019 - 1:24 pm | यशोधरा
अतिशय तरल आणि सुरेख फिल्म.
अगदी.
6 Sep 2019 - 1:35 pm | अनिंद्य
@ मनिष,
फिल्म आणि तुमचे लेखन दोन्ही आवडले.
L कट चा उल्लेख विशेष वाटला, तुमचे निरीक्षण आणि अभ्यास जबरदस्त, बहुतेकांच्या ते लक्षात येत नाही.
6 Sep 2019 - 8:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर चित्रपट, सुंदर रसग्रहण !
6 Sep 2019 - 10:48 pm | जालिम लोशन
शाॅर्ट फिल्मची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
7 Sep 2019 - 12:56 am | पद्मावति
खुप सुंदर रसग्रहण.
8 Sep 2019 - 12:21 am | मनिष
वेळ काढून फिल्म बघणार्या आणि प्रतिसाद देणार्या सगळ्यांचेच मनापासून आभार...
8 Sep 2019 - 8:44 am | सुधीर कांदळकर
नितांतसुंदर फिल्म. भिडणारे संगीत त्वरित मनाचा कबजा घेते. मला जाणवले ते कौशल्यपूर्ण ध्वनिमुद्रण. ध्वनीयंत्रणा कशी वापरावी याचा उत्कृष्ट वस्तुपाठ. मृत्यूवर एवढी संवेदनशील तरीही परिणामकारक कलाकृती बनू शकते! पारितोषिके मिळाली यात अजिबात आश्चर्य नाही. मु़ख्य म्हणजे जेवढा विषय तेवढीच चित्रपटाची लांबी. आशयघन. हॅट्स ऑफ.
लेख पण तितकाच सुंदर. एलकट वगैरे तपशील तर उलगडून सांगितलेच रसग्रहणाची भाषाही चित्रपटाएवढीच संयत आणि सुंदर. एका अलौकिक अनुभूतीबद्दल धन्यवाद.
9 Sep 2019 - 2:42 pm | मनिष
खरंय. खूपच संवेदनशील फिल्म आणि उत्तम संगीत. २० मिनिटांच्या फिल्मसाठी खूप मेहनत घेतलीय सगळ्यांनीच.
कौशल FTII चा विद्यार्थी होता, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट आहेच फिल्म.
तुमच्या प्रतिसादबद्दल मनःपुर्वक आभार.