भाषा सरिता इव

Primary tabs

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
14 Aug 2019 - 11:10 pm

।। भाषा सरिता इव ।।

भाषा नद्यांसारख्या असतात.संस्कृतीच्या अत्त्युच्च शिखरांवरून उगम पावतात. पृथ्वीच्या अंतरंगातील ज्वालामुखीच्या कणांकणांतून शुद्ध केलेली बीजं, खनिजांचा कणखरपणा, मातीतील जीवनरसांचा ओलावा, या आभाळाशी नातं जोडणाऱ्या दुर्दम्य इच्छाशक्तीची इंद्रधनुष्य फुलवंत अथक वाहत असते. दोन्ही तीरांना समृद्ध करत, साहित्याची नवनवीन बेटं तयार करत त्यांभोवती वळणं घेत घेत नवनवीन अर्थांना जन्म देत राहते.
वाऱ्यावर हिंदकळणाऱ्या ऊर्मितरंगांना मनांमनांत उमटवंत आयुष्यभर साथ देते. खेड्यापाड्यात मातीशी दोस्ती करत गोड गावरान ढंग ऐकवते, सांजच्या वेळी पारावर बसलेल्या शिळोप्याच्या गप्पांत पुरीया मिसळवत किलबिल झाडांमध्ये रेंगाळते. कुठे घरात सात्विक समईसमोर लेकराबाळांना स्तोत्रं ऐकवते. तिच्या घाटांवरील मंदिरांमध्ये घंटानाद करत हवेत उठणाऱ्या धुम्रगंधाचा दरवळ देवांपर्यंत घेऊन जाते.
माणसाचे सर्व अपवित्र व पवित्र शब्द जणू क्षार जे वाहत राहतात. किनाऱ्यांवर संतांच्या गाथा, भजनं, अभंग,स्तवनं, पसायदान उगवतात, डोलतात. त्याचबरोबर 'हर हर महादेव', 'जय भवानी जय शिवाजी' चा घोषही गर्जत राहतो. कुठे भारतमातेची काव्ये, तर कुठे देवादिकांच्या आरत्या,थोरांची चरित्रं वा कविश्वरांची कवने, काय काय म्हणून नाही देत ही भाषारूपी नदी. नाही म्हणायला कोणाच्याही आयाबहिणींचा स्वस्त उद्धारही याच भाषेने होत राहतो,नवनवीन अपशब्दांचा सढळ जीव्हेने अभिषेकही होत राहतो. याचे श्रेय श्री सरस्वतीला द्यावे की काय? जिच्या प्रेरणेने, आशीर्वादाने आपण आपल्या भावना सुयोग्य प्रकारे आयुष्यभर दुसऱ्यांपर्यंत पोचवत राहतो, अर्थाचे किल्ले, राजवाडे रचतो, उपभोगतो, तिच्या पदरी हा अभिशापही अलगद सोडून जातो.
आईच्या प्रेमाला भाषा नसते, हे खरेच. भाषाच आईला प्रसन्न होऊन तिच्याशी एकरूप होऊन, प्रेमाचे बाळ(भाषा)कडू पाजत असते. जे त्याच्या / तिच्या जिभेवर जन्मभर गोडी घेऊन राहणार असते. "माझी शोनुली, बबडू,चिंगी..."असल्या बोबड्या अर्थहीन शब्दांना त्या पिलाला हसवायची ताकद कोण बरं देत असेल? तुम्ही कधी आई आणि बोलता न येणाऱ्या बाळाचा संवाद ऐकलाय का? त्याला लौकिकार्थाने/व्याकरणदृष्ट्या काही मूल्य असते का? फक्त प्रेमाची नदी, ओढा, धबधबा काय म्हणायचंय ते म्हणा, वाहताना अनुभवास येईल. अमृत चाखायला जीभ हवी का कान तुम्हीच ठरवा. ही भाषा आईमधून आपल्या आत शिरते आणि प्रवाहीत होत राहते. तिचे 'दिन' दीन झालेत की नाही , हे मला उमगत नाही. अजून ज्यांच्या ओठावर आईच्या दुधाबरोबरच मातृभाषेची चव रेंगाळते, ज्यांच्या कानात आईच्या हाकेबरोबर, मायमराठीची साद न देताही ऐकू येते, ज्यांच्या हृदयांत आईचे काळीज आणि मराठीचे शब्द धडधडते, ज्यांच्या डोळ्यात भाषा जिवंत दिसते, न उच्चारता जाणता येते, भावते, आपल्याला हरवून टाकते,स्वतःला नव्याने सापडवून देण्यासाठी.ज्यांच्या सुर्योदयात रोज नवीन शब्दरंग झळकतात, सुर्यास्तात ते रंग ठळक होऊन क्षितिजावर पसरतात, जे बघून आपणच तिथे संधीप्रकाशात व्यक्त होत आहोत, असा भास होतो. अश्या व्यक्तींसाठी मराठीभाषा अजून शिल्लक आहे. निदान ते भाषेशी विदेही होऊन मिसळेपर्यंत. त्यांची संख्या मोजायची गरज नाही. सरितेच्या उगमाला थेम्बभरच अस्तित्व पुरेसं असतं, समुद्रात विलीन होईपर्यंत ती अथांग आणि विशाल बनतेच.

- अभिजीत श्रीहरी जोगळेकर

वाङ्मयविचार

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

29 Aug 2019 - 7:55 am | कुमार१

अमृत चाखायला जीभ हवी का कान तुम्हीच ठरवा. ही भाषा आईमधून आपल्या आत शिरते आणि प्रवाहीत होत राहते.

>>>> + ११

नि३सोलपुरकर's picture

29 Aug 2019 - 10:30 am | नि३सोलपुरकर

"भाषा नद्यांसारख्या असतात.संस्कृतीच्या अत्त्युच्च शिखरांवरून उगम पावतात. "... सुदंर
"अमृत चाखायला जीभ हवी का कान तुम्हीच ठरवा. " --- अप्रतिम

ता.क : आज २९ ऑगस्ट " तेलुगु भाषा " दिवस आहे आणी हा लेख वाचायला मिळाला , धन्यवाद _/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Aug 2019 - 10:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाषेचं कौतुक वाचायला आवडलं.

-दिलीप बिरुटे
(मराठी भाषिक)

मायमराठी's picture

29 Aug 2019 - 9:41 pm | मायमराठी

भाषेचं ऋण फेडणं कर्मकठीण. तिच्यावरच लिहून जुनं ऋण फेडायचं आणि नवीन ऋण डोक्यावर घेऊन पुढे जायचे, अजून काय?

प्रमोद देर्देकर's picture

30 Aug 2019 - 8:02 pm | प्रमोद देर्देकर

खूप छान मुक्तक.
आवडले.

मायमराठी's picture

3 Sep 2019 - 1:11 pm | मायमराठी

प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार