श्रावणातल्या कहाण्या

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
30 Aug 2019 - 1:09 pm

श्रावणातल्या कहाण्या

आज श्रावणातला शेवटचा शुक्रवार! या शुक्रवारची आणि श्रावणातल्या रविवारची आठवण कायम मानत घर करून आहे; श्रावणामध्ये घरच्या देवांची पूजा झाल्यानंतर आजी दर शुक्रवारी जीवत्यांची पूजा करून त्यांची कहाणी वाचायची; आणि रविवारी आदित्यराणूबाईची कहाणी वाचायची. या कहाण्या ऐकायला  घरात असणाऱ्या सर्वांनी बसलंच पाहिजे असा तिचा नियम होता. मी, भाऊ, बाबा, आई एवढंच नाही तर अगदी आमचे माळी मामा, ड्रायव्हर दुबेजी, घरी कामाला येणाऱ्या लक्ष्मीबाई सर्वांना हातावर तांदळाचे तीन दाणे घेऊन देवासमोर बसायला बोलावलं जाई. त्यावेळी कहाणी ऐकणं म्हणजे काहीतरी वेगळं करतो आहोत म्हणून मस्त वाटायचं आम्हाला. मी आणि माझा भाऊ जसजसे मोठे झालो तसे ही कहाणी आम्ही आवडीने वाचायला लागलो होतो. आजी या कहाण्या एका वेगळ्याच ताला-सुरात वाचायची. मग पुढे जेव्हा आम्ही वाचायला लागलो त्यावेळी आम्ही देखील तसंच वाचायला लागलो. एक वेगळीच मजा वाटायची या कहाण्या वाचताना.

शुक्रवारची जीवत्यांची पूजा ही प्रामुख्याने आपल्या घरातल्या पोरा-बाळांसाठी केली जाते. या जीवत्यांची आरती करताना निरांजनासोबत पिठीसाखरेची आरती ताम्हणात असते. म्हणजे पिठीसाखर तुपात भिजवून त्याची लांब लडी करून ती ताम्हणात ठेवायची; आणि मग बोटांनी त्यात खळगे करायचे. जणूकाही त्यात गोड दिवे लावले आहेत. आरतीच्या अगोदर मात्र कहाणी वाचली जाते. जीवत्यांची कहाणी देखील खूपच बोधपूर्ण आहे. एका गरीब ब्राम्हणीचा भाऊ सहस्त्र भोजन घालतो. मात्र बहिणीला बोलवत नाही कारण ती गरीब असते. मात्र 'भाऊ विसरला असेल' असा विचार करून ती सहस्त्र भोजनास मुलांबरोबर जाते. तेथे भाऊ तिचा अपमान एकदा नव्हे तर तीन वेळा करतो. बहिणीला वाईट वाटतं आणि ती तिच्या मुलांना घरून तिथून निघते. पुढे तिला आर्थिक सुबत्ता लाभते. तिच्या श्रीमंतीची डोळे दिपलेला भाऊ स्वतः तिला जेवणाचं आमंत्रण करतो. ती आमंत्रण स्वीकारून जेवणाला जाते; मात्र तिथे गेल्यावर आपली उंची वस्त्र आणि दागिने पाटावर मांडून त्यांच्यावर अन्न ठेवते. भाऊ तिला विचारतो 'ताई, तू हे काय करते आहेस?' ती उत्तर देते 'तू ज्यांना जेवायला बोलावलं आहेस त्यांना जेवायला घालते आहे.' भाऊ या उत्तराने काय ते समजतो आणि माफी मागतो. बहीण देखील मोठ्या मनाने माफ करते.

लहानपणी ही कथा वाचून झाली की आई नेहेमी सांगायची; आहे त्यात समाधान मानावं आणि कधीच कोणालाही पैशांनी तोलू नये. त्यावेळी तिचं ते सांगणं आम्ही फक्त ऐकायचो. कारण त्यावेळी सगळं लक्ष त्या पिठीसाखरेच्या दिव्यांमध्ये असायचं. मलाच जास्त दिवे मिळाले पाहिजेत हा प्रयत्न! पण आईचे ते शब्द नकळत मनात रुजले होते; हे आता लक्षात येतं. आज एक जवाबदार व्यक्ती म्हणून जगताना जेव्हा जेव्हा ही कहाणी आठवते त्यावेळी आईचे शब्द मनात उमटतात. या कहाणीमधील अजून एक विचार देखील स्पष्टपणे मनाला भिडतो. ज्याप्रमाणे भावाने माफी मागताच बहिणीने त्याला माफ केले; त्याप्रमाणे आपण देखील कोणी माफी मागितली असता मनात किल्मिश न ठेवता विषय संपवला पाहिजे. महत्व समोरच्या व्यक्तिला त्याची/तिची चूक आपणहून कळणे याला आहे. उगाच शत्रुत्व मनात ठेऊन सतत भांडत राहाणं हा उपाय नाही कोणत्याही वादाचा.

ज्याप्रमाणे शुक्रवारी जीवत्यांची कहाणी वाचली जायची; त्याच प्रकारे रविवारी आदित्यराणूबाईची कहाणी वाचली जायची. ही मुळात सूर्यनारायणाची उपासना आहे. ही कहाणी थोडक्यात सांगायची तर.... एका ब्राम्हणाच्या दोन उपवर कन्यांचे लग्न होत नसते; म्हणून तो दुःखी असतो. त्याला नागकन्या, देवकन्या एक व्रत सांगतात. ते व्रत तो ब्राम्हण करतो; त्यानंतर त्याच्या एका मुलीच लग्न राजाशी आणि दुसऱ्या मुलीच लग्न प्रधानाशी होत. नंतर ब्राम्हण मुलीचा समाचार घेण्यासाठी जातो. अगोदर राजाच्या राणीकडे जातो. तिला म्हणतो 'मला कहाणी सांगायची आहे ती तू ऐक.' पण 'राजा पारधीला जाणार आहे'; अस सांगून ती नाकारते. ब्राम्हण रागावून प्रधानाच्या राणीकडे जातो. तिथे तो कहाणी 'मनोभावे सांगतो' आणि ती 'चीत्तभावे ऐकते'. पुढे राजाची राणी दरिद्री होते आणि प्रधानाच्या राणीचं चांगलं होत. मग राजाच्या राणीची चारही मुलं एक एक करत मावशीकडे जातात. मावशीच्या घरी त्याचं चांगल आदरातिथ्य होतं. पण तिने दिलेले पैसे मात्र ती मुले स्वतःच्या घरी घेऊन जाऊ शकत नाहीत. शेवटी स्वतः राजाची राणी जाते बहिणीकडे. मग बहिण तिला रागावते आणि वडिलांनी केलेलं व्रत सांगते. पुढे राजाची राणी ते व्रत करते.... त्यावेळी ती कहाणी ऐकण्यासाठी मोळीविक्या, माळी, एक दु:खी म्हातारी, आणि एक विकलांग यांना बोलावते. कहाणी ऐकल्यानंतर हे सर्व देखील व्रत करतात आणि यासर्वांच भलं होत. 

या कहाणीमधून हे स्पष्ट होतं की; देव आणि व्रत-वैकल्य सर्वांसाठीच सारखी असतात. देवपूजा ही कोणा जात-धर्माची मक्तेदारी नाही. 'तुम्ही जे काही कराल ते मनोभावे प्रामाणिक प्रयत्नातून करा; म्हणजे त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळेल'; हा विचार महत्वाचा. या कहाणीमुळे त्या शाळकरी वयातच मला हे स्पष्ट कळल होतं की कोणाच्या कामावरून किंवा जाती वरून त्याव्यक्तीचं अस्तित्व ठरवणं चूक आहे. मुख्य म्हणजे एरवी इथे हात नको लाऊस... हे सोवळ्यातलं आहे.... तू पारोशी आहेस.... असं सांगून सारखं थांबवणारी आजी ज्यावेळी आमच्या सोबत आमच्या मांडीला मांडी लावून काम करणाऱ्या सर्वांना कहाणी ऐकायला बसवायची; त्या तिच्या धोरणातून देखील एक मोठा विचार मनात रुजला होता त्या कोवळ्या वयात. 

आज मी या श्रावणातल्या कहाण्या वाचत नाही किंवा कोणतंही व्रत देखील करत नाही. मात्र श्रावण सुरु झाला की मला हमखास शुक्रवारची जीवत्यांची कहाणी आणि रविवारची आदित्याराणुबाईची कहाणी आठवते; आणि त्यातून जो विचार मनात रुजला आहे त्याचे समाधान वाटते. 

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

30 Aug 2019 - 1:42 pm | यशोधरा

ह्या कथा खरेच गोड असतात.

पिठीसाखर तुपात भिजवून त्याची लांब लडी करून

हा लडी करायचा व्हिडिओ/ फोटो असते तर बघायला आवडले असते. खूप वापरावे लागतात का दोन्ही घटक? प्रमाण काय?

ज्योति अळवणी's picture

30 Aug 2019 - 4:52 pm | ज्योति अळवणी

छे छे

पिठीसाखर भिजेल इतकंच तूप घ्यायचं. त्याची लांब सुरळी करायची ताम्हणात. कडबोळ्यासाठी करतो तशी. आणि मग एका बोटाने हलकेच सार खळगे करायचे. त्यात दिवे लावणं अपेक्षित नसतं.

करून बघेन. पिठीसाखर अशी वळता येईल का, असं कुतूहल आहे.

जॉनविक्क's picture

30 Aug 2019 - 3:13 pm | जॉनविक्क

ज्याप्रमाणे भावाने माफी मागताच बहिणीने त्याला माफ केले; त्याप्रमाणे आपण देखील कोणी माफी मागितली असता मनात किल्मिश न ठेवता विषय संपवला पाहिजे. महत्व समोरच्या व्यक्तिला त्याची/तिची चूक आपणहून कळणे याला आहे. उगाच शत्रुत्व मनात ठेऊन सतत भांडत राहाणं हा उपाय नाही कोणत्याही वादाचा

हा जरा मजेशीर मामला आहे. जेंव्हा समोरचा औपचारिकता म्हणून न्हवे तर प्रांजळपणे माफी मागतो तेंव्हा आपणही आपसूकच तो विषय विसरून जातो