मानवी भावभावना किती सुरेख असतात, नाही? त्यातही कित्येक वर्षांपासून चर्चिला जाणारा आणि पुढील अनेक वर्षात देखील अजिबातच शिळा न होणारा विषय म्हणजे प्रेम! त्यातही हे प्रेम जर प्रियकर प्रेयसी या प्रकारातले असेल तर मग विचारायलाच नको. आपण वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असलो तरी हा विषय टाळता येणं तसं अवघडच. बरं गंमत म्हणजे ह्या नात्यात काही ठराविक मार्गच नेहमी आपलेसे केले जातात. एकदा प्रेमात पडलात की कोणी काय करायचं आणि त्याहीपेक्षा काय नाही करायचं हे जवळपास ठरलेलंच असतं. म्हणजे बघा ना कितीही नवी पिढी असली तरी काही गोष्टी ह्या क्वचितच बदलतात. ह्या सुंदर नात्यात खूपशा भावना आहेत. प्रेमात दोघेही असले तरी काही भावना मात्र प्रेयसीच्या आणि काही फक्त प्रियकराच्या अशी एक विभागणी आपसूक झालेली दिसते, अर्थात त्यालाही अपवाद आहेतच म्हणा.
अशीच एक नितांत सुंदर भावना मला नेहमी आवडते. ती म्हणजे रुसणे! साधारणपणे ह्या भावनेचा copyright हा प्रेयसी वर्गाकडे आहे. त्यांनी रुसायचं आणि प्रियकराने तिची समजूत काढायची ही एक जगन्मान्य अशी प्रथा. पण नेमकं काय होतं की प्रियकर देखील रुसू शकतो हेच कोणी लक्षात घेत नाही. ही एक मानवी भावना असल्यामुळे त्याला देखील ती असणार पण याबाबतीत पुरुष बिचारे दुर्दैवी. त्यांच्या वाटयाला हे जवळपास येतच नाही. ते आपले सतत समजूत काढण्याच्या भावनेत गुंतलेले असतात.
चित्रपट हा समाजचा आरसा त्यामुळे तिथे देखील हीच उपेक्षा! पण ह्याला देखील अपवाद आहे आणि तो अपवाद देखील इतका देखणा आहे की विचारता सोय नाही. काही मोजकीच गाणी अशी आहेत की त्यात रुसलेल्या प्रियकराची समजूत काढताना प्रेयसी दिसते. त्यापैकीच एक गाणं म्हणजे काला पानी ह्या चित्रपटातलं एक गाणं...अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना...!!! हे गाणं नितांत सुंदर असंच आहे, पाहायला आणि ऐकायला देखील. रुसलेला देखणा देव आनंद आणि त्याची समजूत काढणारी मधुबाला. ह्या गाण्यातली मधुबाला तिच्या आयुष्यतली सर्वात सुंदर दिसणारी अशीच आहे. इतके अवखळ भाव आहेत तिच्या चेहऱ्यावर की काय सांगावं? देव आनंद पेक्षाही कितीतरी सुंदर अभिनय ह्या गाण्यात तिने केलाय. जोडीला मजरुह सुल्तानपुरी ह्यांचे बोल. छोटी छोटी कडवी आणि एकदम छान असं संगीत. पांढऱ्या साडीमध्ये हसणारी मधुबाला आणि तिचं ते सौदर्य इतकं छान वाटतं न बघायला! प्रियकराचा रुसवा देखील खोटा खोटा आहे हे तिलाही माहितीय पण तो अगदी हसत खेळत दूर करते ती. कुठेही न रागावता. तो देखील त्याला जास्त ताणत नाही. एका ठिकाणी असं वाटतं की हा काही ऐकत नाही हे बघून हिला आता रडूच फुटेल. तळहातावर आपला गाल आणि हनुवटी ठेवून बोटे हालवत जेव्हा मधुबाला जो अभिनय करते त्याला तोड नाही. असं वाटत की तिला माहितीय की आता कुठल्याही क्षणी तिला रडू फुटेल, पण तिला ते होऊ द्यायच नाहीय कारण तसं झालं तर ह्या लुटूपुटूच्या लढाईत तिचा पराभव नक्की आहे, महत्प्रयासाने तिने ते अश्रू थोपवले आहेत आणि दुसऱ्याच क्षणाला ती अशी काही हसते की आपण चक्क चक्रावून जातो. एकदा हा अभिनय बघाच. अशा गोड प्रेयसीवर कितीही रागावला तरी प्रियकर किती वेळ रागावू शकतो, मला सांगा? तसंच होतं, तिच्या ह्या गाण्यावर आणि सोंदर्यावर भाळून देव आनंद शेवटी हात टेकतो.
मी विचार केला की अशी अजून किती गाणी असतील? मला फक्त 2 गाणी सापडली. एक म्हणजे देव आनंदचा मित्र गुरू दत्त ह्याच्यावर चित्रित झालेलं गाणं! ह्या गाण्याच्या बरोबर 10 वर्षांपुर्वी आलेलं! ये लो मै हारी पिया हुई 'तेरी जीत रे...!!! हे ते गाणं. रुसलेल्या गुरू दत्तची समजूत काढणारी ती प्रेयसी. हे गाणं मला ऐकायला जास्त आवडतं. ह्याच एक कारण म्हणजे ह्या गाण्यातला गुरू दत्तचा भावरहित चेहरा. तो बघवतच नाही, मी काही फार मोठा समीक्षक नाही पण गुरू दत्तने ही संधी गमावली आहे असं मला वाटत. गंमत म्हणजे हे गाणं देखील मजरुह सुल्तानपुरी यांनीच लिहिलं आहे. त्यानंतर ह्याच theme वर लक्षात राहील असं गाणं मला सापडलंच नाही आणि मग एकदम सरफरोश ह्या चित्रपटात असं गाणं आहे. रुसलेल्या, प्रेम करत असताना ते नाकारणाऱ्या आमीर खानची समजूत काढणारी सोनाली बेंद्रे. एकदम खट्याळ असं गाणं आहे. खूप छान संगीत आहे. सोनाली बेंद्रे देखील एकदम गोड दिसते ह्या गाण्यात आणि आमिर खानचा अभिनय देखील साजेसाच..!
का असेल असं? ह्या भावनेवर गाणी का नसतील? मला जाणवलेली काही कारणं सांगतो. पहिलं म्हणजे पुरुषांनी रुसणे हे आपल्या समाजाला तितकसं मान्य नाही. तिथे स्त्रियांची मक्तेदारी असा एक समज प्रबळ आहे. त्यामुळे हा प्रकार कमी हाताळला जात असेल.
दुसरं कारण जरा अवघड असंच आहे. एक गंमत बघा, आपल्याकडे सगळे गीतकार हे पुरुषच आहेत. नवे जुने सगळेच. अपवादात्मक सुद्धा स्त्री गीतकार नाहीत. खरी बोंब इथेच आहे. कितीही प्रतिभावान असला तरी पुरुष गीतकार स्त्रीच्या भावना ओळखण्यात कमीच पडत असणार. स्त्री मनाचा थांगपत्ता लागणं ही अशक्यच्या जवळ जाणारी बाब आहे. मग प्रेमाच्या बाबतीत देखील हेच होत असेल किंबहुना असंच झालं आहे असं मला वाटतं. नेमक्या काय भावना असतील एखाद्या प्रेयसीच्या प्रियकराचा रुसवा काढताना? सांगणं कठीण आहे हो! हे प्रतिभावान बहुदा तिथेच कमी पडले. शब्दांवर हुकूमत असली तरी भावनेची कल्पकताच नसेल तर काय उपयोग? ती देणारी सरस्वती सुद्धा शेवटी स्त्रीच! त्यामुळे तिनेच जर हात आखडता घेतला असेल तर आपण पुरुष तरी काय करणार?
अमोल कुलकर्णी
प्रतिक्रिया
29 Aug 2019 - 6:12 pm | पद्मावति
सुरेख लिहिलंय. खरंच आहे नायक रुसलाय आणि नायिका समजूत काढतेय या सिनॅरिओ वर पटकन गाणी आठवत नाहीत.
काही गाणी आठवताहेत ती म्हणजे तिसरी मंझिलचं 'ओ मेरे सोना रे' आणि यादों कि बारातचं ' ये लडका हाय अल्ला' यामधे काजल किरण किती गोड दिसलीय.
बाकी अच्छा जी मै हारी विषयी काय बोलावं आणि किती बोलावं... मधुबाला म्हंटलं कि विषय संपला. स्क्रीनवर देवानंद आणि मधुबाला हे दोन प्रचंड देखणे मनुष्यप्राणी, आशा भोसलेंचा आवाज आणि बर्मन सिनियरचे संगीत ...केवळ आणि केवळ __/\__
29 Aug 2019 - 7:34 pm | जॉनविक्क
31 Aug 2019 - 12:00 pm | जगप्रवासी
मधुबाला म्हटलं की विषयच संपला.
29 Aug 2019 - 7:43 pm | फेरफटका
बरीच आहेत अशी गाणी असं मला वाटतं. वानगीदेखील ही दोन पटकन सुचली: रूठे-रूठे पिया मनाऊँ कैसे (कोरा कागज), वो हैं ज़रा खफ़ा खफ़ा (शागीर्द),
29 Aug 2019 - 10:11 pm | रविकिरण फडके
आज की रात पियां दिल ना तोडो (बाझी, देवानंद, कल्पना) आणि
बलम अनाडी मन भाये (बहुरानी, गुरुदत्त, माला सिन्हा)
अशी दोन गाणी पटकन आठवली. पण अर्थात 'अच्छा जी' च्या आसपासही कुठलं गाणं येईल का, मला शंका आहे. कुठल्याच निकषावर.
चित्रीकरणाच्या आधी गाणं तयार असतं, निदान तेव्हा असायचं, हे लक्षात घेतलं तर माझं कौतुक आणखीनच वाढतं. आधी ती situation सगळी visualize करायची, त्यानुसार गायकांनी गाण्यात ते भाव आणायचे, संगीत आहेच, मधले ब्रेक्स, विशिष्ट ध्वनी आणि आघात, आणि मग चित्रीकरणाच्या वेळी अभिनेत्यांनी ते सगळं समजून घेऊन व्यक्त करायचं (ह्या शेवटच्या व महत्वाच्या टप्प्यावर नायक किंवा नायिकेने सगळ्याची माती केलेली असंख्य उदाहरणे आपणा सर्वांना माहीत आहेत)... अवघड आहे. ह्या गाण्यात मात्र हे सगळं रसायन इतकं उत्तम जमलंय! आणि ते जिन्यावरून सगळं पाहणारे शेजारीसुद्धा!
And yes, ह्या थीमवर किती गाणी असतील हा विचार माझ्याही मनात गेली ४-५ वर्षे होता. तुम्ही तो पुढे आणलात, धन्यवाद!
30 Aug 2019 - 12:52 pm | ज्ञानोबाचे पैजार
या शिवाय हिरवणीने हिरो ला मनवणारी अजून दोन चार गाणी...
राजा हिंदुस्तानी मधले "पुछो जरा पुछो मुझे क्या हुवा है"
हिरो नं १ मधले "सोना कितना सोना है"
हद करदी आपने "कुडी कुवारी तेरे पिछे पिछे पिछे जाता कहा है सोनिया"
दिल चाहता है "जाने क्यो लोग प्यार करते है"
कोरा कागज मधले "रुठे रुठे पिया मनाउ कैसे"
इमान मधले "बाबुजी मुझे माफ कर दो जरासा इन्साफ कर दो"
सौतन मधले "शायद मेरी शादी का खयाल"
मैने प्यार किया "आजा शाम होने आयी"
कर्मा मधले "ना जैयो परदेस"
अजून आठवली तर लिहितो
पैजारबुवा,
31 Aug 2019 - 3:54 pm | ब्रिज
' ये लो मै हारी पिया हुइ तेरी जीत रे, काहे का झगडा बालम नयी नयी प्रीत रे'
मराठी मधील ' का रे दुरावा, का रे अबोला'...
31 Aug 2019 - 3:59 pm | ब्रिज
' होले होले चलो मोरे साजना हम भी पीछे है तुम्हारे'
5 Sep 2019 - 7:11 pm | किल्लेदार
आवडलं ...