इसाई पुयलची थीम

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
28 Aug 2019 - 9:22 am

मार्च ९५ ला ' बॉम्बे' प्रदर्शित झाला. कोणत्या तरी एका शनिवारी संध्याकाळी चित्रपट बघून घरी परतलो. उरलेला शनिवार व संपूर्ण रविवार हरवलो होतो. माझा मला सापडतंच नव्हतो. मणीरत्नमचं लेखन व दिग्दर्शन, राजीव मेननचं छायाचित्रण, सगळ्या कलाकारांचा अभिनय आणि 'इसाई पुयल' ( मूळ तामिळ शब्द, अर्थ संगीतातील वादळ) रहमानने तर कोणाकोणाने म्हणून नाही हेलावून सोडले?
बॉम्बे थीम बद्दल लिहायला, ती ऐकून काय होतं, होऊ शकतं, हे असं सगळं वर्णन करायला साधे शब्द नाही चालत, मागवायला लागतात, कुठून मागवायचे ते माहीत नाही. पहिल्यांदा ऐकली तेव्हाच सैरभैर व्हायला झाले. ती चित्रपटातल्या विविध प्रसंगांवर इतकं बेमालूमपणे ओघळते की क्षणभर असे वाटलं की ही थीम 'अपौरुषेय' आहे. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार ते संगीत बदलते, आपल्याला आपण असू त्या भावनेत मनोमन भिजवून ठेवते.
एकदम संथपणे वाहणारा छोटासा ओढा बासरीतून आपल्या पायापायातून अलगद सरकत जातो, तळपाय नाजूकपणे ओले करत आपल्याला त्याच्या मागोमाग यायला सांगतो, दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आपण त्यात स्वतःला नकळत गुंतत जातो. गूढघ्यापर्यंत पाणी आल्यावर आपण मागे बघतो, किनारा तर लांब राहिला, गड्या! असं मनाला समजावताय तोवर व्हायोलिनच्या सरी कोसळू लागतात. आता हा छोटा ओढा नव्हे, हा तर नदीचा उडी घ्यायच्या आधीचा घनगंभीर नाद. सरींची म्हणा किंवा सुरावटींची, एकदोन आवर्तनं होईपर्यंत आपण एखाद्या बेलाग कड्यावरून खूप खाली अनेक हातांनी फेसाळत, आकाश भिजवत, सूर्यकिरणांनी स्वतः च्या शरीरावर इंद्रधनुष्य रेखाटता रेखाटता आपल्यालाही कवेत घेणाऱ्या शुभ्र प्रपातात समावलेलो असतो. उरलेले काही आपल्या हातात नाही. खालच्या जलाशयात,वाद्यांच्या लाटांवर हेलकावे खात,मधेच एखादी लाट उंच घेऊन जाते, आपल्याच आयुष्यातील दोन चार रेशीमक्षण दाखवते आणि अलगद खाली वास्तवात आणून डुंबत ठेवते.
कोट्यावधी वेळेला ऐकलीय बॉम्बे थीम, चांदण्याने गच्च आभाळात स्वतःला शोधताना, पहाटे सूर्य दरबारात यायच्या आधीची शांत लगबग पूर्वेला सुरू होते जेव्हा आभाळाचा कॅनव्हास बघता बघता डोळे सताड उघडे ठेवूनही रंगसंगती कुठून , कसे, कोण सजवून गेलं ते कळत नसतं तेव्हा,सर्व शरीराचे डोळे व कान हे दोनच अवयव शिल्लक असतात. कानांत थीम ओतत ओतत एखाद्या घडलेल्या अपराधाला आठवताना डोळे कितीही बंद करून घेतले तरीही बाहेर यायला जागा शोधत येणाऱ्या आसवांना थोपटत, असंच काहीही कारण नसताना आसपास धावणारे विश्व न्याहाळत त्यातून आपल्याला बाजूला काढताना, कधी अचानक टीव्ही वर एखाद्या शो मधे कोणा अपंग, मतिमंद स्पर्धक स्टेजवर येताना किंवा कोणाचे पालक मागे उभे आहेत आणि स्पर्धक मागे बघतो तेव्हा परस्पर वाहणाऱ्या अश्रूंच्या एंट्रीला हमखास.
कधी ऐकल्यावर एकदम रिकामं, पोकळ वाटू लागतं, कधी सरसरणारा काटा अंगावर येताना काहीतरी जगावेगळं करूनच दाखवीन असं काहीतरी समुद्र मागे रेटण्यासारखं मनात टवटवतं. कधी निसर्गात अडकायला होतं, एखादं घरटं होतो, त्यातली नवशिकाऊ कोमल शय्या, दुनियेपासून लपतलपवत आणलेले दोन शिळेपाळे घास चारदोन चिवचिव जीवांना भरवतोय असं वाटतं. अचानक आपल्यावर अगदी व्यवहाराच्या बाहेर जाऊन कोणी परक्याने केलेले उपकार आठवतात पण त्याचे धन्यवाद मानले की नाही ते पण स्मरत नसतं. आपल्या आईबाबांनी आपण झोपेच्या सीमेवर असताना ' आज खूप दमला हो..' असं म्हणत म्हणत आपले पाय कुरवाळून देणं, पायाची बोटं हलकेच दाबून देणं, मधेच हळुवारपणे केसांत हात फिरवत फिरवत ' उद्या चांगलं तेल चोपडून देते आंघोळीच्या आधी' असं लटक्या रागाने म्हणणं आठवतं, घनघोर पावसात घालवलेल्या दिवसांमधे सह्याद्रीच्या कुशीतून बागडतानाचे उनाड पराक्रम, रानावनात भिजत भिजत आपले शरीर हिरवे झालं होतं, हे दिसत राहतं.
आयुष्यातील अनेक क्षण त्यांच्या रंगासह साठवून ठेवलेत या थीममधे. अजून अनेक ठेवले जात आहेत, ठेवले जातील. अख्खी थीम सदैव मनाच्या कुपीत असते. रोज वाजली नाहीतरी ऐकायला येतेच दिवसभरात एकदा तरी. मोगरा माळून कोणीतरी बाजूने जावं किंवा लांबून परिजातकाच्या संन्यासी देठाला उगवलेल्या विरक्त पाकळ्या दिसाव्या तसं वाटत राहतं. उद्या अजून सुगंधी आणि आकर्षक करायला बॉम्बे थीम खूप आवश्यक आहे.

- अभिजीत श्रीहरी जोगळेकर

चित्रपटलेख

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

28 Aug 2019 - 12:52 pm | जॉनविक्क

सिध्दहस्त.