श्रीकृष्ण

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
5 Aug 2019 - 11:31 am

श्रीकृष्ण (महाभारतातील व्यक्तिचित्रे )

काही वर्षांपूर्वी " महाभारतातील व्यक्तिचित्रे " या लेखमालिकेत भीष्म, द्रौपदी, पार्थ, इ. पांच पात्रांचा; महाभारतात म. व्यासांनी त्यांच्याबद्दल काय लिहले याचा परिचय करून दिला होता. एका विषयावर किती लेख लिहावयाचे व असे लेख किती लांबवावयाचे याबद्दल मीच साशंक असतो त्यामुळे वाचकांचा आग्रह होता तरी थांबलो. पण हेही खरे की श्रीकृष्णाबद्दल लिहले नाही तर "महाभारताबद्दलच " लिहावयाचे राहिले असे म्हणावे लागेल ! कृष्ण व कर्ण समोर ठेवून तर महाभारत लिहले. श्रीकृष्णाविषयी म. व्यास काय लिहतात ते जाणले नाही तर तुम्ही महाभारत वाचले नाही: ना तुम्हाला श्रीकृष्ण कळला. आता तुम्ही म्हणाल " महाभारत न वाचताही आम्ही लहानपणापासून भगवान श्रीकृष्णाला जाणत आलो आहोतच.कीं ! अगदी खरे. तुम्ही भगवान कृष्णा ला ओळखत आलात. पण महाभारतात "विश्वदर्शन, जयद्रथवधाच्यावेळी सूर्य झाकाळणे, पांडवांच्या मृत नातवाला जिवंत करणे असे मोजके प्रसंग सोडले तर म. व्यासांनी श्रीकृष्णाला भगवान म्हणून वर्णलेच नाही. तो या पृथ्वीवरील एक मानवच आहे, मान्य, महामानव आहे, पण मानव च.

महाभारतात श्रीकृष्ण कसा रेखाटला आहे हे पहाण्याआधी आपण श्रीराम व श्रीकृष्ण यांच्याकडे
वळू. दोघेही विष्णूचे अवतार मानले जातात. अवतार का घेतले जातात ? गीतेत त्याचे उत्तर आहे "अभ्युत्थानार्थ धर्मस्य " प्रत्येक युगातल्या धर्माच्या पालनाकरिता, धर्म नष्ट होऊ नये, म्हणून
अवतार. आता प्रत्येक युगात धर्म एकच असता तर भगवानाचे काम सोपे झाले असते. पण तसे दिसत नाही.

राम व कृष्ण यांच्या समोर धर्म म्हणून जी तत्वे होती ती अगदी निरनिराळी होती. समाजाच्या संघटनेत कुटुंब हा पहिला घटक व अनेक कुटुंबे वा कुल यांनी बनणारा समाज हा दुसरा घटक. या दोन घटकांचा धर्म भिन्न भिन्नच असणार. रामाच्या वेळीं कुटुंब हा प्रमुख घटक होता व त्यामुळे कुटुंबाचा प्रमुख जो "पिता", त्याची आज्ञा सर्वांनी पाळणे हा "धर्म" होता. ती आज्ञा चूक कीं बरोबर याला महत्व नव्हते. लक्ष्मण रामाला ती आज्ञा चूक हे पटवून देण्याचा प्रयत्न अनेक वेळा, परोपरीने करतोही. रामही ते कवूल करतो. पण ती आज्ञा मोडावयाचे तो नाकारतो. रामाच्या वेळच्या धर्माचे पालन तो करतो.
कृष्णाच्या वेळीं परिस्थिती बदलेली असते. आता विस्तारलेल्या लोकसंख्येमुळे, अनेक कुलांमुळे, समाज हा प्रमुख घटक झालेला असतो. समाजाच्या धर्मात पित्याने दिलेली आज्ञा जर चुकीची असेल, त्याने समाजावर विपरित परिणाम होणार असेल तर ती पाळणे धर्माच्या विरुद्ध झाले असते.
महाभारतात म्हटले आही कीं
त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत !
ग्रामं जानपदस्यार्थे आत्मार्थं पृथिवीं त्यजेत !!

कुळासाठी कुटुंबातील एकाचा त्याग करावा, गावासाठी कुलाचा, देशासाठी गावाचा आणि आत्म्यासाठी पृथ्वीचा.
इथे स्पष्टपणे देशासाठी, समाजासाठी व्यक्तीचा-कुळाचा त्याग करावयास सांगितले आहे. रामाच्या जागी कृष्ण असता तर त्याने दशरथाची आज्ञा मुळीच पाळली नसती.

हे सर्व प्रथम सांगण्याचे कारण महाभारतातील कृष्ण समाजपालनासाठी झगडला आहे. "परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम" कशासाठी ? तर समाजधारणेसाठी. पण हे सर्व त्याने "मनुष्य" रूपाने निभावले आहे.
समाजरक्षण हा धर्म ठरवल्यानंतर त्याने अत्यंत विवारपूर्वक "धर्म" म्हणजे काय ह्याचा अभ्यास केला. गीतेमधे सर्व उपनिषदांचे सार आहे असे म्हणतात. याचा अर्थ त्याने सर्व उपनिषदांचा खोल अभ्यास केला होता हे स्पष्ट दिसून येते. आपल्या तत्वज्ञानात एकमेकाविरुद्ध विचार प्रकट झालेले आहेत. कृष्णाने आपल्याला पटलेले विचार उचलले.
त्याकाळी प्रचलित असलेल्या धर्मकल्पना, जशा युधिष्टिराच्या होत्या, त्यांना त्याने विचारपूर्वक मुरड घातली. भीष्म-द्रोणाचार्य यांसारखे महात्मे अन्यायाच्या बाजूने लढतात हे विदारक सत्य आहे व धर्माने लढून त्यांना जिंकणे अशक्य आहे हे त्याला माहीत होते. "अश्वथामा मेला" अशी अफवा पसरवून द्रोणांना शस्त्रसंन्यास घ्यावयास लावून त्यांचा वध करणे त्याला मान्य होते. भले त्यामुळे युधिष्टिराचा रथ चार अंगुले खाली उतरून जमिनीला टेकला याची त्याला पर्वा नव्हती. नच, तो रथ जमिनीत गाडला गेला असता हे तो पुरेपुर जाणून होता. कृष्ण मोठा व्यवहार पंडित होता. मानवी व्यवहारातील शक्याशक्यतेच्या मर्यादा तो जाणून होता. तारतम्याचे अवलोकन हे त्याच्या बुद्धीचे वैशिष्ट्य होते. त्याच्या मते धर्माची विचारसरणी म्हणजे व्यवहारपांडित्य. जयद्रथ-दुर्योधन वचाच्या वेळीं त्याने हा दृष्टिकोन ठेवला. अशा सर्व वेळीं त्याचा धर्म "मानुष" होता. भगवान श्रीकृष्णाला असे करावयाची गरजच पडली नसती.

जरासंध हा जुलुमी सम्राट होता.पण तो अतिशय शूर होता. सतरा वेळा युद्ध करूनही त्याचा बिमोड करणे शक्य नाही हे पाहिल्यावर कृष्ण नुमाटपणे द्वारकेला निघून गेला. तो राजसूय यज्ञाच्या वेळी युधिष्ठीराला म्हणतो " तीनशे वर्षे लढूनही आम्हाला त्याला जिंकता आले नसते." एका मानवा "ची कबुली.

जयद्रथ वचाची अर्जुनाची प्रतिज्ञा ऐकून तो म्हणतो, "आम्हाला न विचारता तू अशी मूर्खासा
रखी प्रतिज्ञा कां केलीस ?" त्याला रात्रभर झोप येत नाही. तो दारुणाला, आपल्या सारथ्याला, आपला रथ सज्ज कराववास सांगतो. "अर्जुनाला अपयश आले तर मी युद्ध करून कौरवांचा पाडाव करीन" असे तो म्हणतो. इथेही कृष्ण मानवच आहे.

पांडवांवर आलेला सर्वात घोर प्रसंग म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण.यावेळी तो पांडवांना उपयोगी पडत नाही. पुढे वनात असलेल्या पांडवांना तो भेटतो तेव्हा तो म्हणतो ’मला याची कल्पना नव्हती; मी दुसरीकडे गुंतलो होतो;नाही तर मी द्युत होऊनच दिले नसते." हीही एका मानवाची कबुली. भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला वस्त्रे पुरवली अशी कथा महाभारतात नाही.

जरासंधाला युद्धात जिंकणे शक्य नाही हे जाणून तो त्याला भीमाकडून वैयक्तिक युद्धात मारतो. इथेही तो माणुस आहे; नाहीतर भगवानाला एका राजाला मारणे अशक्य होते काय ? त्या पुढील भाग महत्वाचा आहे. जरासंधाने कैदेत टाकलेल्या राजांना तो मुक्त करतो व जेव्हा त्यांनी कृतज्ञतापूर्वक विनविले "आम्हास काही सेवा सांगा" त्या वेळी त्याने "तुम्ही युधिष्ठिरास साह्य करावे अशी आज्ञा केली. पांडवांना उद्या गरज लागली तर या सर्व राजांची मदत निश्चित केली. त्याने जरासंधाचे राज्य खालसा न करिता त्याच्या मुलाला दिले हे लक्षात घेण्यासारखे आहे ही इहलोकातील राजकीय खेळी आहे.

मानवी स्वभाव हा विश्वातला एक मोठा चमत्कार आहे. परस्पर विरोधी गुण त्याच्या मनात एकाच वेळीं नांदू शकतात..विवेक, व्यवहारदृष्टी, स्थिर प्रज्ञा, हा कृष्णाच्या प्रकृतीचा स्थायी भाव पण त्याचे वंयक्तिक जीवनातले रागद्वेष अतिशय तीव्र होते असे दिसते

शिष्टाईकरिता कृष्ण जाणार होता त्यावेळी द्रौपदीला भीती वाटली की हा युधिष्ठिराच्या इच्छॆनुसार समेट वगैरे करतो कीं काय.. तिच्या आक्रोशाला उत्तर देतांना कृष्ण म्हणतो ’कृष्णे, भिऊ नकोस. कौरव स्त्रीया विधवा होऊन रडत असलेल्या लवकरच तुझ्या दृष्टीला पडतील रणांगणात कौरवांची प्रेते कोल्हेकुत्री खातांना दिसतील यात शंका बाळगू नकोस." आपल्या प्रिय भगिनीची दुर्दशा करणा‍‍‍र्‍या
कौरवांबद्दल त्याच्या मनात इतका द्वेष होता की तो शिष्टाईकरता गेला नव्हताच. त्याला युद्ध पाहिजेच होते . कौरवांकडे जाण्याचे कारण कुंतीला भेटावयाचे आणि कर्णाला फोडता येते का हे पहावयाचे एव्हढेच होते

तो शिष्टाईकरिता आला असतांना दुर्योधन त्याला भोजनाचा आग्रह करू लागतो. कृष्ण प्रथम सौम्यपणे ते नाकारतो पण फारच आग्रह होऊं लागल्यवर ताडकन सांगतो "लोक दुसर्‍याकडे भोजनाकरिता जातात ते दोन कारणांनी. पहिले म्हणजे दोघांमधील प्रेमाने व दुसरे म्हणजे घरी जेवावयास काही नाही म्हणून. तुझ्या माझ्यात प्रेम नाही व मी अन्नाला अजून महाग झालेलो नाही." एका तडफदार माणसाने द्यावे असेच हे उत्तर आहे.

यादवीच्या वेळी शक्य असूनही तो ती टाळत नाही. नियतीशी संघर्ष करण्याऐवजी शांतपणे एकांतात, अरण्यात तो आपली जीवनयात्रा संपवितो.

असो. जास्त उदाहरणे देण्याची गरज नाही. पण त्याच्या जीवनकालातच भीष्म, विदूर, कुंती अ शा ज्येष्ठ व्यक्ती, आणि सर्वसाधारण माणसे त्याला "अवतार" मानत होते असे दिसते. याचे कारण म्हणजे त्याची श्रेष्ठ नीतीमत्ता, असाधारण शौर्य, अलौकिक धर्मधारणा, सत्य-असत्य यातील सूक्ष्म फरक जाणण्याची प्रगल्भता. सर्वथा योग्य असूनही त्याने कधीही सम्राटपदाची इच्छा बाळगली नाही. स्वत:करिता काहीही न अपेक्षिता समाजकल्याण हे एकच ध्येय त्याच्या समोर होते. युद्धानंतर गांधारी त्याला "तू हे युद्ध टाळण्यास समर्थ असतांना तसे कां केले नाहीस ? असे विचारते व त्याला शापही देते. कृष्ण तो शांतपणे स्विकारतो.
महाभारत हे भारतभूमीचे वैभव आहे. कृष्ण हा त्या वैभवातला कौस्तुभमणी

शरद

वाङ्मयविचार

प्रतिक्रिया

मृणालिनी's picture

5 Aug 2019 - 12:11 pm | मृणालिनी

मस्त!

महाभारत हे भारतभूमीचे वैभव आहे. कृष्ण हा त्या वैभवातला कौस्तुभमणी!

बरोबर! _/\_ :)

मृणालिनी's picture

5 Aug 2019 - 12:17 pm | मृणालिनी

अभ्यासी लेखन आवडले. मला मात्र श्रीकृष्ण देवावतार वाटतात. आणि वाटत राहतील.

यशोधरा's picture

5 Aug 2019 - 12:27 pm | यशोधरा

सुरेख लिहिलेत!

संग्राम's picture

5 Aug 2019 - 2:00 pm | संग्राम

हे बदलता आले तर पहा
"नाहीतर भगवा नाला एका राजाला मारणे अशक्य होते काय ?"

जालिम लोशन's picture

5 Aug 2019 - 3:05 pm | जालिम लोशन

सुरेख

उगा काहितरीच's picture

5 Aug 2019 - 3:25 pm | उगा काहितरीच

छान लिहीलंय !

रच्याकने , मला कृष्ण ही एक ऐतिहासिक व्यक्तीरेखा होती. हे न मानता देव वगैरे मानलं यामुळेच आपल्या इतिहासाची हानी झाली. असं माझं मत आहे. एक सामान्य वा असामान्य ऐतिहासिक व्यक्ती मानलं की व्यवस्थित विश्लेषण शक्य होऊन वास्तविक माहीती उपलब्ध होऊ शकते. पण देव मानलं तर ते शक्य नाही होऊ शकत. अजून पुढे जाऊन असंही म्हणेल की जी चूक आपण महाभारत, कृष्णाच्या बाबतीत केली तीच चूक आपण शिवाजी महाराजांच्या बाबतीत करतोय.

कृष्णाच्या बाबतीत केली तीच चूक आपण शिवाजी महाराजांच्या बाबतीत करतोय.

या दोघांबाबत मर्यादीत नाही तर एकुणच व्यक्तीपुजा आणि व्यक्तीद्वेष दोन्ही टाळले पाहीजे, व्यक्तींच्या / व्यक्तीरेखांच्या कृती आणि विचार याचे कोणत्याही दबावा शिवाय समिक्षण करता येण्याचा आदर्श हवा याचे मला समर्थन करावेसे वाटते.

पण मानवी स्वभाव पहाता जसे पुस्तक पुज नको म्हणणार्‍यांच्या पुस्तकांच्या पुजा होतात तसे व्यक्तीपुजा नको म्हणणार्‍यांच्याही व्यक्ती पुजा होतात. अशावेळी पोथ्यांना बासनात आणि व्यक्तींना मुर्तीत बद्ध करून पुजा करावी फुले वहावीत आणि प्रत्यक्ष व्यवहारात कालसुसंगत किंवा तर्कपुर्ण नसलेली गोष्ट पोथीने सांगितली अथवा व्यक्तीने केली होती म्हणून करण्यापेक्षा, पोथीत काय लिहीले व्यक्तीने नेमके काय केले होते हे विसरून नास्तिका प्रमाणे कालसुसंगत तर्कपूर्ण विचाराच्या आधारांवर व्यवहार करावेत. असे माझे मत.

आणि कृष्णनितीच्या नावावर बहुधा घागा लेखकही आडपडद्याने माझ्या शब्दात 'व्यक्तीपुजेच्या मर्यादा समोर येताच 'नास्तिक मुर्तीपुजक' व्हावे या विचारापर्यंत येऊ शकण्याची शक्यता वाटते. असो.

असो.

जॉनविक्क's picture

5 Aug 2019 - 5:52 pm | जॉनविक्क

अख्या जगात एकच व्यक्ती इतका हुशार, सर्वगुण संपन्न यशस्वी, राजा, देव, तत्त्ववेत्ता , योगी, नटखट बालक होता आणि बाकी सगळेच अगदी बिंडोक होते ही गोष्टच अनैसर्गिक वाटते. देवाचा अवतार म्हणूनही वावरलेले श्रीराम जिथे न्यायाच्या बाबतीत घोड चुका म्हणता येतील असे आचरण करत असताना श्रीकृष्ण मात्र एक शेवटचा शाप सोडला तर दर वेळी पोलिटिकली करेक्टच असतं ही गोष्टच अनैसर्गिक वाटते.

अशक्य.

आदिजोशी's picture

7 Aug 2019 - 2:08 pm | आदिजोशी

श्रीराम जिथे न्यायाच्या बाबतीत घोड चुका म्हणता येतील असे आचरण करत असताना

उदाहरणार्थ?

जॉनविक्क's picture

7 Aug 2019 - 2:21 pm | जॉनविक्क

लव आणि कुशच जास्त चांगले स्पष्ट करतील

आदिजोशी's picture

7 Aug 2019 - 3:16 pm | आदिजोशी

खपल्या गेले आहे

जॉनविक्क's picture

7 Aug 2019 - 3:40 pm | जॉनविक्क

बोलघेवडा's picture

5 Aug 2019 - 6:18 pm | बोलघेवडा

वा वा !!! वाचनीय. सुंदर लिहिले आहे

प्रमोद देर्देकर's picture

5 Aug 2019 - 6:33 pm | प्रमोद देर्देकर

खूप आवडले. पण त्रोटक वाटतंय.
का क्रमशः टाकायला विसरला आहात.

सोत्रि's picture

5 Aug 2019 - 8:03 pm | सोत्रि

रामाच्या जागी कृष्ण असता तर त्याने दशरथाची आज्ञा मुळीच पाळली नसती.

ही गडबड झाली. ह्या वाक्याने रामही कळला नाही आणि कृष्णही अस वाटण्याची शक्यता निर्माण होते.

कृष्णाने आपल्याला पटलेले विचार उचलले.

कृष्ण अवतारी पुरुष होता, त्याला विचार उचलण्याची गरज नसवी. तो, अर्जुनाला पक्षी भवसागरात गोन्धळून गेलेल्यास, 'अन्तीम सत्य' काय ह्याची जाणीव करून देताना ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग ह्या रूपात वेद आणि उपनिषदांचे सार गीतेतून सांगतो. हे ज्ञान त्याला उपजतच आहे कारण तो ज्ञानी आहे.

फारच सिम्पलीफिकेशन होतय ह्यातून श्रीकृष्णाचे.

- (कृष्णभावनामय) सोकाजी

जॉनविक्क's picture

5 Aug 2019 - 8:10 pm | जॉनविक्क

, 'अन्तीम सत्य'

हा हा हा.

अर्जुनास युद्धाला प्रवृत्त केले इतपत ठीक आहे :)

गीता फक्त अर्जुनाला युद्धास उद्युक्त करण्यास सांगितली होती अस वाटत असेल तर लोकमान्य टिळकांचे ‘श्रीमद्भगवगीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र’ वाचाण्याची विनंती करतो!

- (कर्मयोगी) सोकाजी

अशी विंनती करतो.
- गीतारहस्य माहीत असलेला जॉनविक्क

गीता फक्त अर्जुनाला युद्धास उद्युक्त करण्यास सांगितली होती अस वाटत असेल तर लोकमान्य टिळकांचे ‘श्रीमद्भगवगीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र’ वाचाण्याची विनंती करतो!

- (कर्मयोगी) सोकाजी

ज्योति अळवणी's picture

5 Aug 2019 - 9:48 pm | ज्योति अळवणी

उत्तम लेख. पण त्रोटक वाटला. आजूनही खुलवता आला असता. किंवा असं म्हणू की माहितीपूर्ण लिहिला असता तर वाचायला मजा आली असती.

चांगलंय. अर्थात् कृष्णाच्या मनातले विचार व्यक्त तरी कसे करायचे? एक माणूस म्हणून ते होणे अशक्य होते.
कृष्णाच्या लीला, त्याचे पराक्रम, त्याचे विचार, त्याचे उद्बोधन आणि योग्य-अयोग्य हे घडवून आणण्याची प्रचंड क्षमता.. हे सर्व मानवातीत जाणवतं.
ते कृष्ण आणि बाणासूर, शाल्व, दंतवक्र, पौंड्रक, शिशुपाल, कालयवन यांच्या बद्दलही लिहावे. यातले काही तर निश्चितच मानवातीत वध होतेत.
खांडववन दहन हाही एक अशक्य कोटीतला भाग वाटतो. असो.

मुळात जय, भारत आणि महाभारत असं बनतांना नक्की कशाकशाची भर पडली तेच कळत नाही.
गीता ही व्यासांच्या महाभारतात मांडली नाही म्हणतात. पण ती इतकी परिपूर्ण असावी की त्यासाठी टीका म्हणून ज्ञानेश्वरी व्हावी लागली यातच सारं आलं.

कृष्णाला मानवांत बसवायचं म्हटलं तरी अतीमानवांत बसवावं लागेल. माझ्यासाठी तो आपला अपार प्रेममय हरीच बरा! :-)

मूकवाचक's picture

6 Aug 2019 - 10:09 am | मूकवाचक

+१

प्रचेतस's picture

7 Aug 2019 - 10:02 am | प्रचेतस

कालयवन तर उघड उघड नंतरची भर आहे. यवन म्हणजे ग्रीक. प्राचीन ग्रीस अर्थात आयोनिया प्रांतातून आलेल्या आक्रमकांना आयोनियन म्हणत त्यांचाच पुढे यवन असा अपभ्रंश झाला. कालयवनाची कथा माझ्यामते नंद साम्राज्यानंतर किंवा चंद्रगुप्त मौर्यांनंतर महाभारतात आली असावी.

होऊ शकेल, शक्यता नाकारता येत नाही. कारण मुळात कालयवनाच्या एका लढाईशिवाय आणिक कोणता यवन असा उल्लेख मला तरी महाभारताबद्दल जे काही आतापर्यंत वाचले त्यात सापडला नाही. बाकी म्लेंच्छ असा उल्लेख असलेले म्हणजे कोण? माझा जरा त्यात गोंधळ आहे.

जय, भारत आणि महाभारत या मूळ तीन ग्रंथांपैकी कोणत्याही ग्रंथाची प्रत / लिंक सध्या उपलब्ध आहे काय? असल्यास कृपया माहिती द्यावी.
तसे नसेल तर सध्या या गोष्टीवर काथ्या कुटून काहीच निष्पन्न होणे नाही.

प्रचेतस's picture

7 Aug 2019 - 11:49 am | प्रचेतस

महाभारतात यवनांचे चिक्कार उल्लेख आहे. नामोल्लेखित असा मात्र कालयवन. भारतीय युद्धातही यवनांची सेना होतीच.
म्लेंच्छ म्हणजे संस्कृत न जाणणारे, अनार्य, तत्कालिन प्रचलित चार वर्णाव्यतिरिक्त बाहेरुन आलेले लोक. महाभारतात म्लेच्छांना रानटी, असंस्कृत, लांब दाढी असलेले, मुंडन किंवा अर्धमुंडन केलेले असे वर्णिले आहे. ह्या बहुधा मध्यपूर्वेतील रानटी टोळ्या असाव्यात. ह्या व्यतिरिक्तही महाभारतात शक, हूण, दरद, चीन आदी परकीय आक्रमकांचे देखील उल्लेख आहेत.

मग हे सर्व उल्लेख नंतरचेच काय? कारण हूणांचा कालखंड हा साधारण इ.स. च्या ५ व्या शतकाच्या आसपासचा आहे आणि महाभारत इ.स.पूर्व.

अनार्य म्हणजे आर्यांची यज्ञसंस्कृती न मानणारे सर्व लोकं असे मी समजत होतो.

म्लेंच्छ भाषा युधिष्ठीराला आणि विदुरांना येत होती असाही उल्लेख कुठेतरी वाचलेला आठवतो, पण बहुदा कोणती कादंबरी असावी.. त्यामुळे ऑथेंटीक नाही..

होय. हूण आदींचे उल्लेख नंतरचे आहेत. महाभारतात साधारण इसवी १० व्या शतकापर्यंत भर पडत होतीच. भार्गव संस्करण (अंदाजे इसपू २००) आणि गुप्त काळातील संस्करण (इस ३०० ते ५००) हे जास्त महत्वाचे, कृष्णाचे दैवतीकरण, विविध अवतारनिर्मिती ह्याच कालखंडात झाली. संपूर्ण महाभारताच्या २/३ वाचनांनंतर नक्की भर कुठे पडत गेली, हरदासी कथा कोणत्या हे अंदाजे ओळखता येते.

अवांतरः रामायणात चक्क तथागत अर्थात गौतम बुद्धाचा उल्लेख आहे.

जॉनविक्क's picture

7 Aug 2019 - 1:50 pm | जॉनविक्क

अवांतरः रामायणात चक्क तथागत अर्थात गौतम बुद्धाचा उल्लेख आहे.

आणि जैन श्रमणांच्या तीर्थंकरांच्या कथात राम वनवासाला गेलेला भेटल्याचे उल्लेख आहेत तसेच महाभारतातील कृष्णांशी संबधीत अरिष्टनेमि आदि नावे जैन परंपरेतील आहेत. महाभारतकालात नेमिनाथ हे तत्कालीन जैन धर्म प्रमुख होते असा उल्लेख आहे. मनुस्मृतीत लिच्छवी, मल्ल, नाथ आदी क्षत्रियांना व्रात्य असे संबोधले जात होते.

प्रचेतस's picture

7 Aug 2019 - 2:21 pm | प्रचेतस

होय. :)

व्रात्य म्हणजे उपनयन न झालेला :)

सोत्रि's picture

7 Aug 2019 - 3:18 pm | सोत्रि

रामायणात बुद्ध असा उल्लेख आहे कि गौतम बुद्ध असा?

(यथा हि चोर: स तथा हि बुद्ध असं गुगलल्यावर दिसलं)

कारण, बुद्ध ही अवस्था आहे. सिद्धार्थ गौतमाच्या आधिही बुद्ध होऊन गेलेत आणि नंतरही.

- (साशंक) सोकाजी

प्रचेतस's picture

7 Aug 2019 - 4:01 pm | प्रचेतस

'तथागत' असा उल्लेख आहे जो गौतम बुद्धाशी थेटपणे संबंधित आहे.

तथागत - ज्या प्रमाणे बोलतो त्या प्रमाणे कृती करतो.

हीसुद्धा उपाधीच आहे. जसं ‘भगवान बुद्ध‘ तसंच ‘तथागत बुद्ध‘

आपल्याला ती गौतम बुद्धाच्या संदरभात माहिती असल्याने ती व्यक्तिशी निगडीत करतोय.

- (अजुनही साशंक) सोकाजी

प्रचेतस's picture

7 Aug 2019 - 4:27 pm | प्रचेतस

पूर्ण श्लोक असा आहे.

यथा हि चोरः स तथा हि बुद्धस्तथागतं नास्तिकमत्र विद्धि ।
तस्माद्धि यः शङ्‌क्यतमः प्रजानांन नास्तिके नाभिमुखो बुधः स्यात्||

ज्या प्रमाणे चोर हा दंडनीय असतो त्याप्रमाणेच बौद्धमतावलंबीही दंडनीय आहेत., तथागत आणि नास्तिक ह्यांनाही ह्याच प्रतीचे समजले पाहिजे त्याप्रमाणे त्यांना शक्यतो त्यांना चोराप्रमाणे दंडित करावे मात्र हे शक्य नसल्यास त्यांच्याशी वार्तालापही करु नये.

उपरोक्त संवाद हा अयोध्याकाण्डातील राम जाबाली संवादात आहेत. जाबाली चार्वाक(नास्तिक्)मत सांगून श्रीरामास अयोध्येस परत येण्यास विनवतो मात्र राम आस्तिकमत स्थापन करुन नास्तिकमताचे खंडन करतो(जे बरेच गंडलेले आहे, आपल्याला जाबालीची बाजूच पटत राहते :) ) येथे तथागत अथवा बुद्ध हा अर्थ गौतमबुद्धाशी संबंधित का तर बौद्धमत हे वेदविरोधी, यज्ञसंस्थेविरोधी आहे म्हणून.

संस्कृत सामासिक शब्दांची फोड एकापेक्षा अधिक पद्धतीने होऊ शकते, शब्दांचे एका पेक्षा अधिक अर्थ होऊ शकतात, आपण दिलेल्या श्लोकांचा मी वेगळ्या पद्धतीनेही अर्थ वाचलेला आहे.

( खरे म्हणजे एका लेख मालेतला हा विषय हाताळलेला एक प्रदीर्घ लेख गूगल डॉकवर अर्धवट स्थितीत पडलेला आहे मला तो पूर्ण करण्याचा मूड आणि मुहुर्त नंतर निघालेला नाही केव्हा होईल माहित नाही)

सोत्रि's picture

9 Aug 2019 - 7:36 pm | सोत्रि

बौद्धमतावलंबीही

हे शब्द प्रयोजन तुमचे आहे का? बौद्ध अस काहीच नसत. बुद्धची शिकवण (buddha's teaching) अस असत!

रामायणाचा कालखण्ड आणि गौतम बुद्धाचा कालखण्ड बघता, रामायणात गौतम बुद्धाचा उल्लेख असणे जरा अतिशयोक्त वाटतय.

- (अजूनही साशंकच) सोकाजी

माकडतोंड्या's picture

9 Aug 2019 - 7:49 pm | माकडतोंड्या

जर रामायण लिहिलेच इ पु२ ते इस २ शतक या कालावधीत असेल तर इ पु ५-६ शतकातला बुद्ध येईलच कथनामधे

सोत्रि's picture

9 Aug 2019 - 8:12 pm | सोत्रि

बुद्धाचा कालखण्ड ~ ५५० BCE म्हणजे ~ २६०० वर्षापूर्वीचा आहे आणि रामायणाचा काल़खण्ड आहे २५००-३००० BCE म्हणजे ~ ४५००-५००० वर्षापूर्वीचा.

म्हणून...

- (गणित आणि इतिहासात कच्चा असलेला) सोकाजी

प्रचेतस's picture

9 Aug 2019 - 8:38 pm | प्रचेतस

रामाचा कालखंड जुना, रामायण मात्र अगदी अलीकडे लिहिले गेले. रामायणाची कथा थोड्याफार फरकांनी महाभारतात येते, अभिमन्यू वधानंतर आलेल्या षोडशराजकीय आख्यानात रामाला बहुतांशी मानवी स्वरूपातच वर्णिले आहे. त्यातही रामाचा कालखंड वेदोत्तरकालीन आहे.
मोबाईलवर फार काही टंकता येत नाही म्हणून सध्या इतकेच.

प्रचेतस's picture

9 Aug 2019 - 8:08 pm | प्रचेतस

ही शब्दयोजना माझीच, बौद्धमतावलंबी म्हणजे बुद्धाच्या मताचा पुरस्कार करणारे, यज्ञसंस्थाविरोधी.

माकडतोंड्या's picture

6 Aug 2019 - 12:35 pm | माकडतोंड्या

कृष्ण ही कॄष्ण हे नाव नसलेल्या १ किंवा २ किंवा ३ किंवा अधिक ऐतिहासिक व्य्कतींवर बेतलेले पात्र आहे
प्रत्येकाचे गुण एकाच व्यक्तित दाखवल्यामुळे डाव्या विचारांनी प्रेरीत झालेल्या आणि पाश्चिमात्यांच्या आदरास पात्र होण्याची पूर्तता करण्यासाठी हिंदूंना तुच्छ लेखण्याचा निकष पूर्ण करण्याचा विडा उचललेल्या व्यक्तींना हे सर्व थोतांड वाटणे साहजिक आहे.

शरद's picture

7 Aug 2019 - 7:43 am | शरद

सप्रेम नमस्कार.

मिपावर आपले स्वागत.

"कृष्ण ही कॄष्ण हे नाव नसलेल्या १ किंवा २ किंवा ३ किंवा अधिक ऐतिहासिक व्य्कतींवर बेतलेले पात्र आहे." ही माहिती मला अगदीच नवीन आहेव. कृपया संदर्भ द्याल तर आभारी होईन.

आता जयदेवाने राधा हे पात्र 8-9 व्या शतकांत कृष्णाला जोडले. राधा-कृष्ण ही नवीन जोडी अंमळ जास्तच लोकप्रीय झाली तसेच " द्रौपदीला कृष्णाने वस्त्रे पुरविणे " वगैरे गोष्टी पुराणिकांनी नंतर घुसडल्या आहेत. इत्यादी मान्य. पण महाभारतात (इ.स.पहिल्या शतकाच्या आसपास) कोणी ऐतिहासिक व्यक्ती शोधणे आणि त्यांच्यावरून नवीन कृष्ण बेतणे अवघड वाटते. जर आपणास असे म्हणावयाचे असेल कीं महाभारतानंतरच्या काळातील कृष्णाबद्दल हे मत आहे तर तसेही म्हणावयास हरकत नाही. पण तरीही संदर्भ बघावयास आवडेल.

प्रत्येकाचे गुण एकाच व्यक्तित दाखवल्यामुळे डाव्या विचारांनी प्रेरीत झालेल्या आणि पाश्चिमात्यांच्या आदरास पात्र होण्याची पूर्तता करण्यासाठी हिंदूंना तुच्छ लेखण्याचा निकष पूर्ण करण्याचा विडा उचललेल्या व्यक्तींना हे सर्व थोतांड वाटणे साहजिक आहे.

मला तर याचा अर्थ काय व त्याचा लेखाशी संबंध काय हे कळलेच नाही. जरा विस्ताराने लिहा ना.
आपला
शरद
(नवीन लेखकाच्या लिखाणात आवड असलेला)

माकडतोंड्या's picture

9 Aug 2019 - 1:02 pm | माकडतोंड्या

स्वागता बद्दल आभार

"कृष्ण ही कॄष्ण हे नाव नसलेल्या १ किंवा २ किंवा ३ किंवा अधिक ऐतिहासिक व्य्कतींवर बेतलेले पात्र आहे." ही माहिती मला अगदीच नवीन आहेव. कृपया संदर्भ द्याल तर आभारी होईन.

तर गोष्ट अगदी साधी आहे. सहज कळते.
महाभारत जसे लिहिले आहे तसेच झाले आहे का? नाही. कुणीही विचारी मनुष्य असा दावा करणार नाही.
का? सतत भर पडत गेली.
कधी ? इ पू ३१०० पासुन आजपर्यंत
कशी? कालाच्या ओघात घडलेल्या गोष्टी समाविष्ट करत राहिल्याने
का सामावल्या? घडलेले पुढल्या पिढीला कळावे म्हणून

तर आता बघा कुणीतरी कधीतरी समुद्र किनारी मोठ शहर वसवल. समृद्ध केलं. कुणी केले नक्की माहित नाही.
कुणीतरी कधीतरी मगधच्या सम्राटाच्या अनेक आक्रमणांना तोंड दिलं. कुणी कधी नक्की कसे ते माहित नाही.
या कथा सांगोवांगी दंतकथा बनून समाज मनात झिरपत राहिल्या.

कधी तरी व्यास नामक लेखकाने एक अशा शेकडो हजारो कथांचा एकत्रित पट विणला, त्यात त्या कथा पात्रांची नावे बदलून महाकाव्य तयार केले.

महाकाव्यात जे दिले ते तसेच घडले असे नाही पण कथा उपकथांमधून इतिहास डोकावतोच. उगाच नाही सरस्वती आटण्याचा उल्लेख येत, असेच आणि असेच अनेक मुद्दे.

वरील वाक्याचा खुलासा झाला असावा. न झाल्यास माझ्या समजावण्यात कमतरता आहे असे म्हणावे आणि सोडून द्यावे.

मला तर याचा अर्थ काय व त्याचा लेखाशी संबंध काय हे कळलेच नाही. जरा विस्ताराने लिहा ना.

गेल्या दोनशे वर्षांतील तथाकथित आंग्ल इतिहासकार, हिंदूं मधील सुशिक्षित, साम्यवादी विचारवंत , इस्लामी हितचिंतक तसेच मिपावरील विचारवंत यांच्या विचारांचा मागोवा घेतला तर संबंध कळेल. कळावाच असा आग्रह नाही.

(नवीन लेखकाच्या लिखाणात आवड असलेला)

लेखक अथवा लेखन आवडावा असा आग्रह नाही. आवडल्यास हरकत नाही

आपला

सदा सदैव
माकडतोंड्या

प्रचेतस's picture

7 Aug 2019 - 9:58 am | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच उत्तम लेखन.

शरद's picture

7 Aug 2019 - 9:30 pm | शरद

थोडासा खुलासा
(1) लेख त्रोटक वाटतो.
अगदी बरोबर. लिहण्यासारखे आणखी बरेच होते. आणखी उदाहरणे देणे व कृष्णाचे संभाषण देणे सहज शक्य होते पण तसे न करण्याचे कारण अगदी वैयक्तिक आहे. माझे मत असे की येथील लेखांची मर्यादा ही लेख 5 ते जास्तीत जास्त 10 मिनिटात वाचून व्हावा. हे झाले माझे मत. ते बरोबरच आहे असा दावा अजिबात नाही. पण शक्य तो तसे करण्याचा मी प्रयत्न करितो. त्यामुळे मला किमान 50 % काटछाट करावी लागते. माझ्या आवडत्या कविता रसग्रहणांच्या लेखात तर कितीतरी जास्त. मी रिकामटेकडा, रिटायर्ड माणूस. मला वेळेचे बंधन नाही. पण सर्वसाधारण मिपा वाचकाचे काय ? त्यांनाही तसाच वेळ मिळत असेल असे धरणे बरोबर कीं चूक ? असो. माझ्या पुढील लेखात "मेरा दर्द न जाने कोई "जरा लेखणी सैल सोडीन म्हणतो. बघू वाचक काय म्हणतात,

(2) किंवा असं म्हणू की माहितीपूर्ण लिहिला असता तर वाचायला मजा आली असती. ज्योति अळवणी

तरुणपणापासून पुस्तके जमवण्याचा नाद लागला. त्यामुळे वाचन भरपूर. आता सर्व मित्रांना तेव्हडा वेळ काढणे शक्य असेलच असे नाही. त्यामुळे मला ज्या पासून आनंद मिळतो त्यात इतरांनाही सहभागी करून घ्यावे असे मनापासून वाटते. आपण मित्रांशी गप्पा मारतांना बोलतो तसे लिहण्याचा प्रयत्न करतो. उपनिषदे यांवरील लेख केवळ थोडक्यात माहिती करून देण्याकरिताच लिहले पण इतर लेखांत
अभ्यासपूर्ण माहिती देणे हा उद्देशच नाही. त्याकरिता आमचे मित्र श्री. माहितगार आहेतच कीं. कै. वसंत बापट यांची पन्नास वर्षांपूर्वीची एखादी कविता देण्यात तुम्हालाही मला मिळाला तसा आनंद मिळावा हाच उद्देश. कृपया इथे तसे काही शोधण्याचा प्रयत्न करू नका.

(3) रामाच्या जागी कृष्ण असता तर सोत्रि

मला असे म्हणावयाचे आहे कीं राम आणि कृष्ण यांच्या वेळचे धर्म निराळे होते. कृष्णाच्या काळी धर्मच बदलला गेला असल्यामुळे त्याने पित्याची आज्ञा "अंतीम" म्हणून पाळली नसती. यात रामाचे चुकले असे काहीही म्हणावयाचे नाही. कृष्ण पित्याची आज्ञा पाळत नव्हता असेही म्हणावयाचे नाही. "राजा कालस्य कारणं " च्या धर्तीवर "धर्म: कालस्य कारणं " असे म्हणणे उचित ठरेल.

(4) आणि कृष्णनितीच्या नावावर बहुधा घागा लेखकही आडपडद्याने माझ्या शब्दात 'व्यक्तीपुजेच्या मर्यादा समोर येताच 'नास्तिक मुर्तीपुजक' व्हावे या विचारापर्यंत येऊ शकण्याची शक्यता वाटते. असो. माहितगार

म्हणजे काय बोवा ?

शरद

माहितगार's picture

8 Aug 2019 - 10:58 pm | माहितगार

मला असे म्हणावयाचे आहे कीं राम आणि कृष्ण यांच्या वेळचे धर्म निराळे होते. कृष्णाच्या काळी धर्मच बदलला गेला असल्यामुळे त्याने पित्याची आज्ञा "अंतीम" म्हणून पाळली नसती. यात रामाचे चुकले असे काहीही म्हणावयाचे नाही. कृष्ण पित्याची आज्ञा पाळत नव्हता असेही म्हणावयाचे नाही. "राजा कालस्य कारणं " च्या धर्तीवर "धर्म: कालस्य कारणं " असे म्हणणे उचित ठरेल.

भारतीय संस्कृतीच्या कालौघातील विकासात आदर्श (अवतारी) पुरुषांच्या जागा सातत्याने बदलल्या असे म्हणायचे असल्यास बर्‍यापैकी सहमत असेल .

कृष्णपिता वसुदेव हे महाभारतातील मुख्यपात्र नाही त्यामुळे श्रीकृष्णाच्या पितृआज्ञा पालनाची परिक्षा घेतली जाण्याचा प्रसंग कृष्णावर येत नसेल. युद्धात ज्येष्ठ आप्तस्वकिय असतील तरी नमन कर आणि कर्यव्यासाठी उद्धही कर हा नवा नॅरेतीव्ह कृष्णकथेतून नक्कीच उभा रहातो. भीष्म / माधवी या दोन केसेस मध्ये पितृइच्छा सन्मानाचे टोक दिसून आपोआपच मर्यादा लक्षात येईल हे नॅरेटीव्हमधून नक्कीच साध्य होते - कंस ते कौरव पितृसन्मानाची आदर्श उदाहरणेही नव्हेत-

कृष्ण आला आणि कर्तव्यासाठी पितामहाशी युद्धही करावे लागेल तर करावे -पितामह आले की त्यात पित्याला समान क्रायटेरीया लावला जाईल हा नॅरेटीव्ह मान्य होतो ह्या धागा लेखकाच्या मताशी या पॉईंट पर्यंत सहमत होता येते. कर्तव्यासाठी पित्याशी संघर्षाचा हा एकमेव नॅरेटीव्ह नव्हे, गणपती कथेत मातृ आज्ञेसाठी गणपती पित्यासमोर बलीदान देतो. दुसर्‍या बाजूस रेणूका कथेतील परशुरामा व्यतरीक्त इतर बंधू न पटलेली पितृ आज्ञा स्विकारत नाहीत स्वकीयांची हत्या करून सुद्धा पितृआज्ञेच्या महत्तेचा नॅरेटीव्ह गिरवले जाणे परशुराम आधीचा की नंतरचा याने थांबत नाही. भारतीय नॅरेटीव्ह मध्ये पितृआज्ञा श्रेष्ठच असल्याचे वारंवार गिरवले जाते. भीष्म /माधवी कथेतही पितृआज्ञापालनाचे टोक गाठले जाऊनही मर्यादांची अप्रत्यक्ष जाणीव दिलीतरी पितृआज्ञा पालन आदर्श असल्याच्या नॅरेटीव्हला कृष्ण कथेमुळे भारतात पुर्णतः बदलतो असे वाटत नाही. कंसाचे आणि औरंगजेबाचे पित्याला कैदेत टाकून सत्ता हस्तागत करणे पारंपारीक भारतीय सांस्क्रुतिक मनाला सारखेच खटकते. नेपाळचा राजपूत्र माता पित्यांचा नाश करतो यावर सर्वसामान्य हिंदूंना चटकन विश्वास ठेवणेही कठीण जाते.

रामायण महाभारतातील नॅरेटीव्हज मध्ये केवळ पितृआज्ञा बद्दलच्या दृष्टीकोणातून स्पर्धा होत नाही ती इतरही बर्‍याच नॅरेटीव्हमध्ये स्पर्धा करतात त्यात एक उदाहरण अतिथीदेवोभवच्या नॅरेटीव्हचेही उदाहरण घेतले तर महाभारत नॅरेटीव्ह अतिथीदेवोभव टोकास जाऊनही स्विकारताना दिसतात तर सीताहरण , शुर्पणखेला दिली जाणारी वागणूक यात आतिथी आदर अगदीच गेला असे नाही पण अतिथीदेवोभवच्या महाभारत नॅरेटीव्हला रामायण काऊंटरकरते का ?

रामायण आणि महाभारत यांचे नॅरेटीव्हज एकमेकांशी स्पर्धा करतात हे खरे पण धागा लेखक या दोन्ही ग्रंथांची संपूर्ण रचना एक आधी मग दुसरा अशा स्वरूपाची गृहीत धरून लेखन करतो असे वाटते. यात या दोन्ही ग्रंथांच्या प्रक्षिप्तता भराच्या शक्यता लक्षात घेतल्या जात नाहीत.

प्रक्षिप्त पौराणिक लेखन जसे -अंशतः भाटगिरी- तसे राजपूत्रांना चातुर्य कथा सांगण्यासाठी जसे जोडले गेले असु शकते तसे ते पौराणिक कथाकथनाच्या प्रक्रीयेतूनही विकसीत होऊ शकते तसे ते कथांच्या नाट्यप्रदर्शनाच्या दरम्यानही विकसीत होऊ शकते. कथांच्या नाट्यप्रदर्शनाच्या दरम्यान प्रेक्षकांना नाट्य कलेने मोहीत करण्याच्या दृष्टीनेही कथाविकास स्पर्धात्मक स्वरुपाचा झाला असू शकतो ही शक्यता पुरेशी लक्षात घेतली जाताना दिसत नाही.

युद्धात ज्येष्ठ आप्तस्वकिय असतील तरी नमन कर आणि कर्यव्यासाठी उद्धही कर हा नवा नॅरेतीव्ह कृष्णकथेतून नक्कीच उभा रहातो.

हा नवा नरेटीव्ह कसा?
युद्ध हाच योद्ध्याचा धर्म आहे. अर्जुन तो विसरला होता, त्याला त्या धर्माची आठवण करून देण्याच काम कृष्णांने केले. नविन त्यात काही नाही.

यात या दोन्ही ग्रंथांच्या प्रक्षिप्तता भराच्या शक्यता लक्षात घेतल्या जात नाहीत.

100% सहमती. मौखिक स्वरूपातून लिखित स्वरूपात येण्याची सुरुवात 2500-3000 वर्षांपासून झाली आणि प्रत्यक्ष घटना त्याआधि होऊन गेल्या होत्या त्यामुळे त्यात भर पडलीच नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

रामायण महाभारतातील नॅरेटीव्हज मध्ये केवळ पितृआज्ञा बद्दलच्या दृष्टीकोणातून स्पर्धा होत नाही

रामायण आणि महाभारत यांचे नॅरेटीव्हज एकमेकांशी स्पर्धा करतात हे खरे

अशी स्पर्धा करतात असे का वाटते? दोन स्वतंत्र ऐतिहासिक महाकथा आहेत त्या.

कथांच्या नाट्यप्रदर्शनाच्या दरम्यान प्रेक्षकांना नाट्य कलेने मोहीत करण्याच्या दृष्टीनेही कथाविकास स्पर्धात्मक स्वरुपाचा झाला असू शकतो ही शक्यता पुरेशी लक्षात घेतली जाताना दिसत नाही.

नाट्यरूपात जरी कथा आल्या असतील तरी स्पर्धा का हा मुद्दा अनुरत्तीच राहतो.

- (अर्जुन) सोकाजी

माहितगार's picture

9 Aug 2019 - 3:05 pm | माहितगार

सर्वप्रथम आपण खुप चांगले प्रश्न उपस्थित केलेत त्यासाठी आपले अभिनंदन, मला अशा पद्धतीने प्रश्न टाकणारी मंडळी क्वचितच भेटतात मला आपल्या प्रश्नांची उत्तरे देणे कितपत जमते ते बघतो.

स्पर्धा

माझ्या व्यक्तिगतमतानुसार भारतात तत्वज्ञान प्रसार ज्या दोन दोन-तीन मार्गांनी झाला त्यातील एक इथे केवळ अनुषंगिक म्हनुन मांडतो . एक मार्ग गुरु मंडळींचे आपापसातील शास्त्रार्थ होत सामान्य व्यक्ती/कुटूंबे आपापल्या गुरूंना फॉलो करत तेव्हा त्यांच्यावर तत्वज्ञानाचे लेक्चर पाजण्याचे प्रत्यक्ष प्रयोग फारसे होत नसावेत वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन गुरु म्हणेल तसे करावे हा सर्वसामान्य मानवी स्वभाव असावा.

दुसरा एक मह्त्वाचा मार्ग काव्यकथा आणि नाट्य यांच्या रंजनातून तत्वज्ञान अप्रत्यक्षपणे उभेकरणे, वेगवेगळ्या कथेतील वेगवेगळ्या - अगदी परस्पर विरोधीही गोष्टी ऐका आणि परिस्थिती अनुरूप तुमच्या स्वबुद्धी समजेल कृतीत आणता येईल ते कृतीत आणा . काव्यकथा नाट्यकार आणि तत्वज्ञ यांचा संबंध आणि स्पर्धा नेमक्या कोणत्या स्तरावर होत होत्या तर त्या आश्रय देणार्‍या राजांचा आश्रय आणि दानात अधिक वाटा मिळवण्यासाठी होत असणार . अर्थात काही प्रमाणातील वैचारीक देवाण घेवाण रंजनकार मंडळी प्रवास करत तेव्हा प्रवासात आणि एकत्र उतरण्याच्या स्थानी होत असणार. ज्या धार्मिक कथाकाराला फॉलोवींग जास्त त्याला राजाश्रय मिळण्याची शक्यता अधिक हे आताच्या राजकारण्याप्रमाने तेव्हाही काही अंशात होतच असणार.

मार्केटींग आणि मिडीया मध्ये सहसा व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याचा उल्लेख टाळून -बेसिकली व्यक्तीगत टिका टाळून - प्रतिस्पर्ध्याच्या पेक्षा आपल्याकडे अधिक काय आहे हे सांगण्याचे तंत्र वापरले जाते आणि हेच तुम्हाला भारतीय सर्वधर्मीय पौराणिक कथांमध्ये दिसेल की प्रतिस्पर्धी धर्माचे उल्लेख कमित कमी येताहेत. आता हि कथा आणि नाट्यकार मंडळी आजच्या मार्केटींग तज्ञांकडून प्रशिक्षीत तर नव्हती सर्वसाधारण माणूस प्रतिस्पर्ध्याचे नाव घेऊन टिका करेल आणि एकजात सगळे पुराण कथा लेखक हे टाळताहेत असे का?

मला वाटते दोन तीन गोष्टी माहिती संसाधनाचा अभाव असलेल्या काळात प्रत्येक आश्रयदात्याला केवळ एका अतिथीकडून येणार्‍या माहिती वर विसंबता येत नाही ह्याच कारणाने अतिथी देवो भवचा नॅरेटीव्ह त्यामुळे सहसा प्रत्येक अतिथीचे स्वागत करून संधी देणार आणि जो प्रभावी त्याला अधिक दान मिळण्याच्या संधी म्हणजे आश्रयदाते आश्रयतर सहसा सर्वांनाच देतील म्हणजे काही केले तरी प्रतिस्पर्ध्याला आश्रय देऊ नका असे म्हणता येत नाही पण तो स्पर्धेतून मागे पडला पाहीजे मग तु तशी कविता कथा करून पांडीत्य दाखवले तर मी अशी कविता कथा रचुन पांडीत्य दाखवतो. आणि पांडीत्य दाखवाताना प्रतिस्पर्ध्याचे नाव न घेता त्याची तात्विक भूमिकाही परास्त करायची आहे. न जाणो एखादा आश्रय दाता श्रद्धेवर टिकेमुळे बिथरला तर जिवावरही बेतु शकते. त्या शिवाय सर्वच भारतीय नॅरेटीव्ह प्रत्यक्ष मत्सरावर नियंत्रण ठेवण्यास सांगतात.

हि स्पर्धा बौद्ध जैन वैदीक आणि आगम त्यांचे उपगट अशी आहेच मग प्रत्येकाच्या गीता वेगळ्या असतात, प्रत्येकाची रामायण कथाही वेगळी असते जी त्यांच्या त्यांच्या तत्वज्ञानात बसवण्याचा प्रयत्न केला जातो. स्पर्धेच्या स्वरुपाचे आणखी एक उदाहरण देतो शाक्त की स्त्रीवादी पण रामायण आहे ज्यात आधीच्या रामायणाला फारसा धक्का न लावता अजून एक कथा लिहितो ज्यात वनवासातुन परत आलेल्या रामाला अजून एका रावणाशी लढायला जावे लागते या वेळी तो जिंकत नाही तेव्हा देवी सिता स्वतः युद्ध करून रामाला वाचवून घेऊन येते. म्हणजे वैचारीक स्पर्धा एक ग्रंथ ते दुसरा ग्रंथ इथपर्तंतही मर्यादीत नाही ती ग्रंथातल्या ग्रांथातही प्रत्येक पिढी दर पिढी होणार्‍या प्रक्षिप्त विकासातही होत रहाते कारण प्रक्षिप्तता आणणार्‍या प्रत्येक पिढीतले तत्वज्ञानही काही अंशाने बदलत असते. अशा प्रक्षिप्तता स्विकारल्या जाण्या मागची आणखी एक भूमिका अशी की ज्ञानवंताच्या बुद्धीला जे काही सुचले ते इश्वरेच्छा असल्या शिवाय सुचू शकत नाही मगते त्यावेळचे सत्यच असले पाहिजे मग एका ग्रंथात परस्पर विरोधी माहिती संकलित झाली तरी चालते.

एकीकडे ब्राह्मण हत्याकरू नये अशी नॅरेटीव्ह रंगवली जातात - द्सरीकडे रामायणात राम ब्राह्मण रावणाचे काम तमाम करून जातो आणि हे सर्व उघड टिका न करता होते. काही जण येतात विश्वामीत्र आणि परशुरामाचे नॅरेटीव्ह वापरत क्षत्रीय ब्राह्मण संघर्ष वेगवेगळ्या ग्रंथात वेगवेगळ्या कोनातून मांडून जातात - हे सशस्त्र संघर्ष प्रत्यक्षात झाले असतीलच असे नाही काही नॅरेटीव्हज शुद्ध चातुर्य कथा उद्देशाने येताना दिसतात त्यात इतर संघर्षही दिसतात. बटू वामनाची कथा टेक्निकली चातुर्य कथा असते पण ती इतर झालेल्या अथवा न झालेल्या संघर्षाची माहिती देते आपल्याला हवा असलेला नॅरेटीव्ह पुढे सरकवते आणि उघडपणे अवाक्षर न काढता प्रत्येकजण आपापला नॅरेटीव्ह पुढे सरकवते. स्पर्धा होती आणि अशि काही स्पर्धा होतेय हे ध्यानात पण येत नाही. रामायणातल्या रामायणात पुरुषसत्ताकवादी आणि स्त्रीवादी दोन्ही नॅरेटीव्ह स्पर्धा करतात सामान्य वाचकाला दोन नॅरेटीव्हज्ची स्पर्धा चालू असल्याचे लक्षात पण येणार नाही एवढे हे प्रक्षिप्त पदर बेमालुम पद्धतीने विणले जातात.

सोत्रि's picture

9 Aug 2019 - 8:02 pm | सोत्रि

स्पर्धा नेमक्या कोणत्या स्तरावर होत होत्या तर त्या आश्रय देणार्‍या राजांचा आश्रय आणि दानात अधिक वाटा मिळवण्यासाठी

रामायण किंवा महाभारत कोणत्याही आश्रयाच्या अपेक्षेने किंवा दानाच्या अपेक्षेने लिहीलेली महाकाव्य नसावीत.

प्रतिस्पर्धी धर्माचे

प्रतिस्पर्धी धर्म हे आजच्या परिप्रेक्षात कदाचित तार्किक वाटू शकेल. पण ज्या काळात अवतारी पुरुष किंवा सिद्धपुरुष आदर्श शिकवण देत होते त्या परिप्रेक्षात तस असाव अस म्हणण धाडसी असेल.

हि स्पर्धा बौद्ध जैन वैदीक आणि आगम त्यांचे उपगट अशी आहेच

ही स्पर्धा, त्या त्या शिकवणीच्या फॉलोअर्सनी केलेली आहे. कारण मूळ शिकवण विसरून कर्मकाण्डाच्या मागे लागत, शिकवणीचे वेगवेगळे अर्थ लावून, सम्प्रदाय तयार झाले. आणि सम्प्रदाय मोठे करण्यासाठी फॉलोअर्स लागतात, ते मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली असे म्हणता येऊ शकेल.

- (अर्जुन) सोकाजी

मला असे म्हणावयाचे आहे कीं राम आणि कृष्ण यांच्या वेळचे धर्म निराळे होते.

धर्म सनातन असतो किंवा कालातीत असतो. त्यामुळे धर्म: कालस्य कारणं हे कस शक्य होईल?

कृष्णाच्या काळी धर्मच बदलला गेला असल्यामुळे त्याने पित्याची आज्ञा "अंतीम" म्हणून पाळली नसती.

उलटपक्षी, रामाने पित्याची आज्ञा पाळत, पुत्रधर्माचे पालन करून, कृष्णाने पुढे गीतेत सांगितलेला 'कर्मयोग'च आचरणात आणला होता. त्यामुळे धर्म बदलला जात नाही असे म्हणता येते.

--------------------------------------------------------------------------------------------
ईथे धर्म म्हणजे सम्प्रदाय नव्हे, धर्म म्हणजे निसर्गनियम किंवा निसर्गदत्त आचरण

sameerzero's picture

8 Aug 2019 - 10:11 am | sameerzero

खूपच जास्त सुंदर

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Aug 2019 - 7:09 pm | llपुण्याचे पेशवेll

अभ्युत्थानम अधर्मस्य आहे, म्हणजे अधर्म नष्ट करण्यासाठी. बाकी पूर्ण लेख वाचून प्रतिसाद देतो

प्रचेतस's picture

8 Aug 2019 - 8:36 pm | प्रचेतस

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्

ह्यातले अभ्युत्थानम अधर्मस्य हे बरोबर मात्र अभ्युत्थानम चा अर्थ चुकीचा.
अभ्युत्थानम म्हणजे उदय होणे, वाढणे.

जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माची वृद्धी होते तेव्हा माझे सृजन होते (मी अवतार धारण करतो)

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 2:06 pm | तमराज किल्विष

कृपा करून हा लेख मायबोलीवर प्रकाशित करा. तुम्हाला शक्य नसेल तर मला अनुमती द्या.‌ तिकडे हिंदी मालिका पाहून लिहिणारांचे फार स्तोम माजले आहे.

शरद's picture

9 Aug 2019 - 5:38 pm | शरद

खुशाल कोठेही प्रसिद्ध करा.
शरद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Aug 2019 - 2:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, कृष्ण आवडला. लेखन आवडलेच.

-दिलीप बिरुटे
(शरदसरांचा विद्यार्थी) :)

उपेक्षित's picture

9 Aug 2019 - 6:06 pm | उपेक्षित

वाह उत्तम लेख आणि भर म्हणून एकसो एक अभ्यासपूर्ण प्रतिसाद.
---------------------------
माझे असे अनुमान आहे कि एकूणच महाभारतकाळात झालेल्या प्रचंड हिंसाचारामुळे तर जैन धर्माचा उदय/ प्रसार झाला नसेल न ?

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 7:16 pm | तमराज किल्विष

शरद सर खूप धन्यवाद. करतो मी.

कंजूस's picture

9 Aug 2019 - 9:00 pm | कंजूस

थोडक्यात छान समजावले..
कृष्णचरित्र एवढं मोठं आहे की त्याचे तीन भाग करावे लागतील. बाललीला, द्वारका,
मथुरानिवासी,
युद्धकाल.

प्रमोद देर्देकर's picture

9 Aug 2019 - 10:38 pm | प्रमोद देर्देकर

नेहमी मागा यांचे प्रतिसाद पाहून ते टाळून / वरवर वाचून पुढे जावे अअसं वाटते पण आज मात्र ही जुगलबंदी 3/4 वेळा वाचून काढली. खूप छान माहिती मिळत आहे.
किती वेगळ्या द़ृष्टीने / मार्गाने माणूस विचार करतो याचं ज्वलंत उदाहरण आहे.
आम्ही वाचतोय तेव्हा येवु दे अजुन.
दोघांनाही अनेक धन्यवाद.
अजून पु. पे. ही लिहणार आहेतच.

prahappy's picture

14 Aug 2019 - 11:43 am | prahappy

छान लेख !

निनाद बेडेकरांची आठवण आली , त्यांचा कृष्ण आणि शिवराय ह्यांच्या वरचं व्याख्यान आणि मतं नक्की ऐका

https://www.youtube.com/watch?v=hzOr7O-26Dk : मोठी आणि विस्तृत लिंक

https://www.youtube.com/watch?v=4Kopq6xSork : टीझर का काय ते

तमराज किल्विष's picture

15 Aug 2019 - 6:51 pm | तमराज किल्विष

Prahappy hi khup dhanywad!

तमराज किल्विष's picture

15 Aug 2019 - 6:52 pm | तमराज किल्विष

Ji cha hi zala.