विळखा -४
डॉ पै यांच्या बाह्य रुग्ण विभागात येऊन सकाळी आठ वाजताच दाखल झालो.माझा एक वर्ग मित्र टाटा मध्ये विभागप्रमुख आहे त्याला फोनकरून सांगून ठेवले होते कि डॉ. पै यांच्याशी बोलून ठेव. नऊ वाजेपर्यंत तेथे १०० एक रुग्णांची गर्दी झाली. यथावकाश त्यांचे सहाय्यक तेथे आले आणि रुग्ण पाहायला सुरुवात केली. आमचा नंबर लवकर आल्यामुळे बराच लवकर लागला. आत गेलो आणि मी डॉक्टर आहे अशी ओळख करून दिली आणि सर्व पार्श्वभूमी त्या डॉक्टरना समजावून सांगितली( मानेला गाठ कधी आली पासून येथपर्यंत कसे पोहोचलो पर्यंत) त्यांनी आईला तपासले फाईल मध्ये नोंदी केल्या आणि सांगितले कि तुम्ही बाहेर बसा डॉक्टर पै येतीलच.
आता आम्ही बाहेर बसलो दोन अडीच तास झाले तरी डॉक्टर पै काही आले नव्हते. मग मी माझ्या मित्राला फोन केला. त्यावर त्याने मला सांगितले कि डॉक्टर पै ना त्याने फोन केला तो त्यांनी उचललेला नाही आणि त्यांच संदेश पाठवला होता त्याचे उत्तर आलेले नाही. मी परत एकदा प्रयत्न करतो.
साधारण साडे बारा वाजता त्याच परत फोन आला. तो म्हणाला डॉक्टर पै काल केलेल्या तातडीच्या शल्यक्रियेत पहाटे तीन पर्यंत रुग्णालयातच होते त्यानंतर काही तरी गुंतागुंत झाल्यामुळे शेवटी पहाटे पाच साडेपाच ला घरी गेले. परंतु ते साडे आठला रुग्णालयात परत आले आहेत परंतु काहीतरी महत्त्वाच्या मिटिंग मध्येच आहेत आणि त्यांनी माझा व्हॉट्स ऍप चा संदेश अजून पाहिलेला नाही. पण ते बाह्य रुग्ण विभागात नक्की येणार आहेत.
आता आम्ही मधल्या काळात थोडे खाऊन घेतले आणि परत वाट पाहत बसलो. शेवटी अडीचला मित्राचा फोन आला कि आताच मी त्यांना जेवणाच्या टेबल वर भेटलो. ते जेवून तेथेच येत आहेत. त्यांना मी तुझ्या आईबद्दल बोलून ठेवले आहे.
साधारण तीन वाजता डॉक्टर पै आले. आल्या आल्या त्यांनी आम्हाला बोलावणे पाठवले. आईला तपासले मी केलेला सिटी स्कॅनच्या प्रतिमा आणि अहवाल पाहिला आणि मी त्यांना प्रथम अहवाला नुसार MTC असण्याची शक्यताच जास्त आहे असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आमच्या आईला समजावून सांगितले कि हा कर्करोग तेवढा काही आक्रमक नाही. शल्यक्रिया केल्यावर तुम्हाला ५ वर्षे नक्की मिळतील आणि पुढच्या ५ वर्षाबद्दल ५०:५० आहे.
मग माझ्याशी बोलताना त्यांनी काही तपासण्या DOTA PET स्कॅन( हा कर्करोग शरीरभर पसरला आहे का यासाठी), एन्डोस्कोपी आणि एंडोस्कोपिक सोनोग्राफी( कर्करोग अन्न नलिकेच्या आणि स्वरयंत्राच्या आत शिरला आहे का यासाठी) टाटा मधूनच करून घ्या. बाकी काही रक्त चाचण्या(CALCITONIN) ज्या टाटात अजून उपलब्ध नाहीत त्या बाहेरून करून घ्या असे सांगितले. या सर्व चाचण्या झाल्या कि मग आपण शल्यक्रियेची तारीख नक्की करू. MTC आहे त्यामुळे तेवढी घाई नाही पण जर ATC असता तर मी त्यांना यादीत कुठेतरी कसातरी घुसवलं असतं.
चार पाच मिनिटात त्यांच्या बरोबर सल्ला मसलत आटोपली( त्यांनी पाहण्यासाठी ३० ते ३५ रुग्ण त्यांच्या सहाय्यकानी थांबवून ठेवलेले होते) आणि आम्ही बाहेर आलो. हि गोष्ट २४ जून ची.
टाटा रुग्णालयाची सद्य स्थिती-- २४ जून पासून सर्व चाचण्या पूर्ण करून मी ८ जुलै रोजी परत डॉ पै यांच्याकडे सल्ला मसलत आणि शल्यक्रियेच्या तारखेसाठी गेलो. तेंव्हा सर्वात लवकरची तारीख २५ जुलै ची मिळत होती. अर्थात यात आमच्या आईला छाती आणि मान अशा दोन शल्यक्रिया एकाच वेळेस करणे आवश्यक आहे आणि असे दोन्ही शल्यचिकित्सकांचा गट फक्त गुरुवारी उपलब्ध असतो. त्यामुळे आठवड्यातील एकच दिवस अशा शल्यक्रियांना उपलब्ध आहे. दुर्दैवाने २५ तारीख ठरली असताना छातीची शल्यक्रिया करणारे चिकित्सक उपलब्ध नव्हते त्यामुळे आता हि शल्यक्रिया १ ऑगस्ट रोजी होणार आहे.
टाटा या रुग्णालयाची स्थिती मुंबईच्या लोकल सारखी आहे. तुम्ही पहिल्या वर्गाचे तिकीट काढले तरीही गर्दीत फारसा फरक पडत नाही. आणि या प्रचंड वाढत्या गर्दीचे कुणीच काहीही करू शकत नाही.
तेथिल कर्मचारी वर्ग अतिशय संयमी आणि सेवावृत्तीने काम करतो हे मी डोळ्याने पाहिलेले आहे. मी इतक्या दिवसात एकही कर्मचाऱ्याला कोणावरही ओरडताना पाहिलेले नाही.( अशा स्थितीत डोके शांत ठेवणे हे फार कौशल्याचे काम आहे)
मी स्वतः डॉक्टर असल्याने मला जरी प्राधान्य द्यायचे असले तरीही तेथील डॉक्टरना ते शक्य नाही. अगोदर दिलेल्या तारखेला एखादा रुग्ण जर आला नाही तरच तुमचा नंबर लागू शकतो.
DOTA PET ची तारीख मला लवकर मिळाली याचे कारण त्या दिवशी तारीख दिलेल्या एका रुग्णाला २६ हजार रुपये परवडत नसल्याने त्याने पुढची तारीख मागून घेतली त्यात माझा नंबर लागला. (मी मुंबईत राहणार आहे आणि डॉक्टर आहे त्यामुळे त्यांनी मला फोन केला कि मी बाकी सर्व सोडून तेथे खात्रीने पोहोचणारच यामुळे त्यांनी आदल्या दिवशी मला बोलावून घेतले.)
या रुग्णाला तेथे असलेले समाजसेवक पैशाची उपलब्धता करून देतात पण त्यासाठी लागणारी प्रक्रिया करावीच लागते कारण कुठेही गेलात तरी लांबच लांब रांग असतेच.
तेथील डॉक्टर हे कामाच्या बोज्याने अत्यंत वाकलेल्या स्थितीत आहेत. मी माझ्या मित्राला भेटायला गेलो (तो लहान मुलांच्या ल्युकेमियाचा विशेषज्ञ आहे) दुपारी अडीच वाजता त्यांच्याकडे( तो आणि इतर त्याचे तीन सहाय्यक) १८५ रुग्ण प्रतीक्षेत होते.
अशी रुग्णालये प्रत्येक राज्यात किमान चार तरी असली पाहिजेत तरच टाटा वर येणार हा लोंढा थांबेल. अर्थात हि स्थिती माझ्या आयुष्यात तरी येणार नाही याची मला पूर्ण जाणीव आहे
मी "टाटा मध्येच" जाण्याचे कारण--
१) मला मुंबईतील कोणत्याही खाजगी रुग्णालयात शल्यक्रिया करणे परवडधा, परंतु रोज रोज अशा शरीराच्या दोन ठिकाणी एकत्र शल्यक्रिया करणारी टीम कमी रुग्णालयात आहे आणि त्यातून ते सातत्याने अशी शल्यक्रिया करत नाहीत याउलट टाटा येथे अशा शल्यक्रिया नित्यनियमाने होत असल्याने तेथे जायचा निर्णय घेतला शल्यकौशल्य हे सतत धार लावलेल्या शस्त्रासारखे अणकुचीदार असते.
२) डॉ प्रथमेश पै यांच्या कौशल्याबद्दल या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वानीच खात्री दिली.
३) आपण (सर्वसामान्य माणूस) वैद्यकीय सेवा आणि इतर सेवा यात गल्लत करतो.
रुग्णालयात गर्दी नाही, भेटायचे तास सोयीचे आहेत, घराच्या जवळ आहे, वेगळी खोली आहे, तेथे जेवण घरून न्यावे लागत नाही, टीव्ही चांगला आहे या सर्व इतर सेवा आहेत.
शल्यक्रिया करणारे डॉक्टर किती निष्णात आहेत या बरोबरच शल्यक्रियेच्या नंतर काळजी घेणारा कर्मचारी वर्ग किती निपुण आहे यावरसुद्धा बऱ्याच वेळेस शल्यक्रियेचे यश अवलंबून असते.
४) आमच्या घरापासून रुग्णालय लांब असले तरीही आई भरती झाल्यावर तिला प्रवास करायचा नाही. माझ्या त्रासाची किंमत माझ्या आईने चुकवायचे काहीच कारण नाही.
५) आईच्या कर्करोगासाठी शल्यक्रिया हाच सर्वात उत्तम पर्याय आहे आणि अगदी आतापर्यंत या कर्करोगासाठी उपयुक्त अशी रेडिएशन किंवा केमोथेरपी उपलब्धच नव्हती. गेल्या ३-४ वर्षात असे उपचार उपलब्ध झाले आहेत.
६) आईचा कर्करोग मंदगतीने वाढणारा आहे आणि तीन इतर तज्ज्ञांकडून खात्री करून घेतली आहे कि एक महिना थांबण्याने फारसा फरक पडणार नाही.
सामान्य माणसांसाठी सल्ला (आगाऊ)-- असे असले तरीही ज्यांच्या नातेवाईकांच्या कर्करोगासाठी अशी गुंतागुंतीची शल्यक्रिया लागणार नाही त्यांनी परवडत असेल तर टाटा ऐवजी टाटा मध्ये प्रशिक्षित डॉक्टरांकडून इतर ठिकाणी शल्यक्रिया करून घ्या असाच सल्ला मी देईन.
कारण आपण जर मुंबईत राहत नसलात तर प्रत्येक वेळेस मुंबईत खेपा मारणे शक्य होणार नाही.
माझा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे मला "रजा" हा प्रश्न नाही. हा प्रश्न "काट्यावर" नोकरी असणाऱ्या माणसासाठी गंभीर प्रश्न असू शकतो.
टाटा मध्ये आपल्या संयमाची अगदी परीक्षा होते. तेंव्हा उतावीळ असणाऱ्या माणसाने तेथे जाऊच नये.
हि लेखमाला टाकण्याचा हेतू -- कर्करोगासारख्या दुर्धर आजार झाल्यावर प्रत्यक्ष स्थिती काय होते हे यथातथ्य आणि सद्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न आहे.
प्रत्येक माणसाची अशा स्थितीस सामोरी जाण्याची मानसिक स्थिती वेगवेगळी असू शकते. सामान्य पणे कितीही गंभीर स्थिती असली तरी माझी विचारशक्ती स्थिर असते म्हणून मी अजून शल्यक्रिया व्हायची असतानासुद्धा मी हे लेख लिहू शकलो.
यात शल्यक्रियेनंतर अजून काही लिहिण्यासारखे असेल तर लिहेन.
सर्व मिपाकरांना त्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि दाखवलेल्या काळजी साठी मनापासून शुभेच्छा आणि दंडवत.
मी आपला ऋणी आहे __/\__
प्रतिक्रिया
29 Jul 2019 - 9:04 pm | यशोधरा
शल्यक्रिया झाल्यावर ती यशस्वी झाली हे जरूर सांगा ह्या धाग्यावर. सर्वच मिपाकर ह्या बातमीकडे लक्ष ठेवून असतील.
तुम्हां कुटुंबीयांना शुभेच्छा!
29 Jul 2019 - 9:16 pm | उगा काहितरीच
+१
29 Jul 2019 - 9:27 pm | श्वेता२४
लिहायचे होते
29 Jul 2019 - 9:35 pm | राजाभाउ
+१
29 Jul 2019 - 9:48 pm | मुक्त विहारि
+1
30 Jul 2019 - 10:51 am | नंदन
म्हणतो.
30 Jul 2019 - 12:48 pm | नावातकायआहे
+१
29 Jul 2019 - 9:08 pm | जॉनविक्क
शब्दा शब्दाशी सहमत.
29 Jul 2019 - 10:05 pm | नाखु
आम्हा सर्वांच्या सदिच्छा आपल्या बरोबर आहेत.
तपशीलवार माहिती आणि नेमकं निदान याबद्दलची सविस्तर माहिती दिली ही फारच मोठी आणि मोलाची आहे
टोकदार अनुभव घेतला आहे.
पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु
29 Jul 2019 - 10:57 pm | जालिम लोशन
ईश्वर तुम्हाला बळ देवो.
30 Jul 2019 - 9:34 am | स्नेहल महेश
सर वाचतेय
आई लवकर बर्या होवोत हिच प्रार्थना!!
30 Jul 2019 - 9:40 am | नि३सोलपुरकर
तुम्हां कुटुंबीयांना शुभेच्छा ... _/\_
30 Jul 2019 - 10:01 am | खटपट्या
आमच्या सदिच्छा सदैव तुमच्या पाठिशी आहेत...
30 Jul 2019 - 10:24 am | टर्मीनेटर
टाटा मेमोरियल मधील तद्न्य डॉक्टरांवर पूर्ण विश्वास असल्याने १ ऑगस्ट रोजी होणारी शल्यक्रिया यशस्वी होणारच याची खात्री आहे.
सर्व मिपाकरांच्या सदिच्छा तुमच्या कुटुंबासोबत आहेत _/\_
30 Jul 2019 - 10:34 am | कानडाऊ योगेशु
आपल्या मातोश्री लवकर सुखरुप होवोत हीच इश्वरचरणी प्रार्थना.
असा किंवा तत्सम कर्करोग होण्याची कारणे काय असावीत.
कंबर दुखी किंवा मानेचे दुखणे हे स्त्रियांच्या बाबतीत हमखास दिसणारे व दुर्लक्षित करण्यात येणारे आजार आहेत.
साधारणपणे अश्या प्रकारचे दुखणे व कर्करोगाची लक्षणे ह्यात साम्ये काय असु शकतील.?
30 Jul 2019 - 10:55 am | सुबोध खरे
कंबर दुखी किंवा मानेचे दुखणे
कर्करोग साधारणपणे दुखत नाही. त्यामुळे कंबरदुखी किंवा मानेचं "दुखणं" याचा कर्करोगाशी संबंध नाही.
अगदीच जेंव्हा शेवटच्या टप्प्यात कर्करोग पाठीच्या कण्यात शिरतो तेंव्हा "दुखणं" चालू होतं.
मणक्याच्या सांध्यातील जागा कमी झाल्यामुळे त्यातून बाहेर पडणाऱ्या नसांवर दाब आल्यामुळे किंवा तेथील अस्थिबंधन (लिगामेंट) किंवा स्नायूबंध (tendon) यावर ताण आल्यामुळे हे दुखणे चालू होते. हा प्रकार वयोमानानुसार (५०-५५ नंतर) होतो. परंतु आजकाल संगणकावर केवळ बसून काम करणाऱ्या लठ्ठ किंवा व्यायाम न करणाऱ्या लोकांमध्ये हा तिशीपासूनच दिसून येतो.
30 Jul 2019 - 11:06 am | टर्मीनेटर
थोडं अवांतर : दहा वर्षांपूर्वी आमच्या आईची कर्करोगावरील शस्त्रक्रिया झाल्यानंतर केमोथेरपी दिली गेली. त्याआधी तिला गुढघे दुखीचा फार त्रास होत असे .केमोथेरपी नंतर होणारे सर्वसामान्य त्रास तिलाही झाले होते पण त्यानंतर जवळपास २ वर्षे पूर्णपणे थांबलेली तिची गुढघेदुखी मात्र नंतर पुन्हा सुरु झाली. याचे काय कारण असावे?
30 Jul 2019 - 11:17 am | राजाभाउ
डॉक,
हे लेख म्हणजे अश्या प्रसंगात धीर न सोडता कसे वागावे याचा वस्तुपाठ आहे. देव करो आणि असा प्रसंग कुणावरही ना येवो, पण जरा आलाच तर हा लेख मार्गदर्शक ठरू शकेल
तुमच्यावर अशी परिस्थिती ओढवली असतानासुद्धा मिपाकरांना या बाबतीत माहिती मिळावी, मार्गदर्शन सल्ला मिळावा म्हणून हे लेख तुम्ही लिहिले त्यातून तुमची सदहृदयता दिसून येते. मनापासून धन्यवाद
तुमच्या आईची शल्यक्रिया उत्तम होईलच त्यांना व तुम्हालाही मनापासून शुभेच्छा.
हे सगळं जून मध्ये सुरु झाले म्हणजे आता पर्यंत तुमच्या वडिलांची तब्येत पण उत्तम झाली असेल असे वाटते
30 Jul 2019 - 11:36 am | नगरीनिरंजन
आपल्या मातोश्रींसाठी सदिच्छा.
30 Jul 2019 - 11:43 am | डॉ सुहास म्हात्रे
अश्या प्रसंगातून जात असताना, ती माहिती व परिस्थितीचे विश्लेषण मिपावर लेख लिहून सांगण्याचा विचार तुमच्या मनात आला हेच फार विशेष आहे. त्याबद्दल धन्यवाद व अभिनंदन.
अशी परिस्थिती कोणत्याही मिपाकराच्या जीवनात येऊ नये हीच इच्छा आहे. पण तरीही, दुर्दैवाने, कोणाला अश्या परिस्थितीतून जावे लागले तर ही लेखमाला त्याला आधार मिळण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल.
आपल्या मातोश्रींचा उत्तम इलाज होऊन त्यांना दीर्घ आयुरारोग्य मिळावे यासाठी अनेकानेक शुभेच्छा.
30 Jul 2019 - 11:59 am | सुबोध खरे
केमोथेरपी नंतर होणारे सर्वसामान्य त्रास तिलाही झाले होते पण त्यानंतर जवळपास २ वर्षे पूर्णपणे थांबलेली तिची गुढघेदुखी
एक शक्यता
केमोथेरपी मुळे रुग्णाचे वजन कमी होते त्यामुळे गुढघेदुखी कंबरदुखी सारखे आजार तात्पुरते बरे झाल्यासारखे होतात. शिवाय या औषधाचा एक सुपरिणाम म्हणजे सांध्याची सूज कमी होते. एकदा केमोथेरपीचा परिणाम कमी झाला आणि रुग्ण खाऊपिऊ लागला कि त्याचे वजन परत पूर्वस्थितीस येते मग आपले मूळ आजार परत येतात. ( रुग्ण सुधारला आहे याची एक पावती आहे)
30 Jul 2019 - 12:15 pm | टर्मीनेटर
हो, अगदी असंच झालं होतं. माहितीसाठी अनेक आभार _/\_
30 Jul 2019 - 12:03 pm | आंबट गोड
इतक्या कठीण परिस्थितीतून जात असतानाही इतक्या संयमाने लेख लिहील्याबद्दल तुमचे खरंच कौतुक आहे. आणि मुख्य म्हणजे तुमच्या आईचेही . शांत पणे, पूर्ण विश्वासाने आणि धीराने परिस्थितीला सामोरे जाण्या बद्दल!
आमच्या कडे तर ब्लेम गेम च सुरु होतात!
अम्हाला विश्वास आहे ही शस्त्रक्रिया यशस्वी होईल आणि आईंना उत्तम आरोग्य मिळेल.
30 Jul 2019 - 12:43 pm | राघव
तुमच्या रॅशनल विचार प्रणालीला सलाम डॉक्. _/\_
शल्यक्रियेसाठी आईंना आणि तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. पुढील लेखाची आतुरतेने वाट बघतोय.
30 Jul 2019 - 1:13 pm | इरसाल
श्री. डॉ. खरे,
ज्या हिमतीने आणी धीरोदात्तपणे तुम्ही आलेल्या परिस्थितीला सामोरे गेलात व जात आहात त्याबद्दल तुमचे करावे तितके कौतुक थोडेच आहे.
आईस लवकरात लवकर उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच देवाचरणी प्रार्थना.
30 Jul 2019 - 1:41 pm | प्रमोद देर्देकर
डॉ पै आणि त्यांच्या सारखे इतर सेवा भावी डॉ यांना अभिवादन.
त्यांचा सल्ला /मार्गदर्शन मिळाल्यावर तुम्ही अर्धी लढाई जिंकलीच आहे .
आता शस्त्रक्रिया सुखरूप झाली की आई 100% बऱ्या होतील.
पु. वा. शुभेच्छा
30 Jul 2019 - 2:08 pm | बाप्पू
खरे सर,
तुमच्या जिद्दीला आणि डिसीझन घेण्याच्या ताकदीला सलाम..
तुम्ही हे मोठे संकट ज्या शांततेने आणि संयमाने हाताळत आहात ते खरंच ग्रेट आहे...
30 Jul 2019 - 2:27 pm | समीरसूर
आपल्या हिंमतीला सलाम! आपले लेखनकौशल्य अफलातून आहेच.
आपल्या मातोश्रींच्या १ ऑगस्ट रोजी होणार्या शस्त्रक्रियेसाठी अनेक शुभेच्छा! शस्त्रक्रिया यशस्वी होणारच यात तीळमात्र शंका नाही. देव त्यांना पुढील कित्येक वर्षे आरोग्यपूर्ण आणि समाधानी आयुष्य देवो ही प्रार्थना!
30 Jul 2019 - 5:48 pm | उपेक्षित
तुमच्या आईच्या जिद्दीला (या वयातही जगण्याची इच्छा फार कमी जणांमध्ये असते.) सलाम डॉक, त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने तुम्ही हे सर्व हाताळत आहात तुमचे पण कौतुक वाटते.
एक विनंती (जर वेळ असेल आणि मनस्थिती ठीक असेल तरच ) कर्करोग नक्की काय असतो वगैरे थोडे सोप्या बाषेत सांगता आले तर उत्तम, आणि हो काही मदत लागली तर हक्काने सांगा.
30 Jul 2019 - 7:51 pm | फेरफटका
सुबोधजी, सर्वप्रथम, आपल्या मातोश्रींच्या तब्येतीस लवकर आराम पडो ही सदिच्छा!
दुसरं म्हणजे, लेखमाला नेहमीप्रमाणे संतुलित आणी इन्फॉर्मेटीव्ह आहे. गुड लक!
31 Jul 2019 - 4:48 pm | सदस्य११
आम्हा सर्वांच्या सदिच्छा आपल्या बरोबर आहेत. आपल्या मातोश्रींच्या १ ऑगस्ट रोजी होणार्या शस्त्रक्रियेसाठी अनेक शुभेच्छा! शस्त्रक्रिया यशस्वी होणारच यात तीळमात्र शंका नाही. देव त्यांना पुढील कित्येक वर्षे आरोग्यपूर्ण आणि समाधानी आयुष्य देवो ही प्रार्थना!
1 Aug 2019 - 9:02 pm | बाप्पू
आज आपल्या आईंची शल्यक्रिया व्यवस्थित पार पडली असेल आणि त्या आता ठीक असतील अशी अपेक्षा करतो..
काळजी घ्या..
1 Aug 2019 - 9:53 pm | सुबोध खरे
आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद यामुळे आमच्या आईची शल्यक्रिया उत्तम रीतीने पार पडली आणि कर्करोगाचे शरीरातून उच्चाटन करण्यात आले.
सर्वाना मन:पूर्वक धन्यवाद!
1 Aug 2019 - 10:04 pm | महेश हतोळकर
वाचून बरं वाटलं डॉक्टर साहेब. पुढील सुधारणाही अशाच होओत.
1 Aug 2019 - 10:14 pm | सुमेरिअन
वाचून खूप बरं वाटलं डॉक्टर साहेब. अगदी हेच वाचण्यासाठी सकाळ पासून थांबलो होतो. ऑफिस मध्ये आल्या आल्या अधीरतेने मिसळपाव उघडलं.
आपल्या मातोश्रींना लवकरात लवकर आराम मिळो आणि त्यांचं throw ball खेळणं लवकर चालू होवो अशी सदिच्छा!
- टेक्सास मध्ये राहणारा सुमेरियन
1 Aug 2019 - 10:43 pm | यशोधरा
डॉ. खूप चांगली बातमी. काकूंच्या प्रकृतीला अजून आराम पडू देत, अशी सदिच्छा.
2 Aug 2019 - 12:50 am | नेत्रेश
वाचून खूप बरं वाटलं. तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा.
2 Aug 2019 - 1:00 am | फेरफटका
wishing your mother a speedy recovery!
2 Aug 2019 - 3:42 am | अनन्त अवधुत
वाचून बरं वाटलं .
आपल्या मातोश्रींना लवकरात लवकर आराम मिळो
1 Aug 2019 - 9:57 pm | जॉनविक्क
यावर एक उपसंहार अवश्य लिहावा अशी विनंती आहे.
2 Aug 2019 - 1:02 am | अभ्या..
वा, डॉक्टरसाहेब,
खूप छान बातमी. वाचून एकदमच हायसे वाटले. तुमच्यासारखे चिरंजीव असता मातोश्रीना रोगमुक्त व्हायचेच होते. त्यांना एकदम बऱ्या झाल्या आणि थ्रो बॉल खेळायला पुन्हा सुरुवात केली की आमच्या शुभेच्छा कळवा.
तुमचेही अभिनंदन.
2 Aug 2019 - 7:32 am | नाखु
प्रकृतीस आराम मिळो व आपल्या मनावरील ताण नाहीसा झाला.
तुमच्या धैर्याचा आणि कुशलतेने परिस्थिती हाताळण्याची क्षमता लाजवाब आहे.
डॉ क अभिनंदन.
नाखु
2 Aug 2019 - 8:33 am | गवि
अत्यानंद झाला..शुभेच्छा..
2 Aug 2019 - 1:44 pm | स्वधर्म
डाॅक्टर साहेब, या मालिकेतले अाधीचे भाग वाचनात अाले नव्हते. अापल्या मातोश्रींची शल्यक्रिया यशस्वी झाली हे ऐकून खूप बरे वाटले. त्यांची तब्येत लवकर सुधारावी यासाठी मनापासून शुभेच्छा. तसेच तुमच्या अनुभवाचा फायदा इतरांना व्हावा यासाठी अापण लेख लिहीलात, त्याबद्दल धन्यवाद.
2 Aug 2019 - 2:15 pm | सस्नेह
ऑपरेशन यशस्वी झाले याबद्दल आनंद आणि समाधान वाटले.
आईंची प्रकृती लवकरच उत्तम होऊदे.
शुभेच्छा !
2 Aug 2019 - 3:38 pm | नि३सोलपुरकर
तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा.
2 Aug 2019 - 3:54 pm | शेखरमोघे
शुभेच्छा. केवळ इतरांच्या (उपयोगी) ज्ञानात भर घालण्याकरता स्वतः ची मनस्थिती बाजूला ठेवून अशी माहितीपूर्ण मालिका लिहिल्याबद्दल अभिनंदन.
"सामान्यपणे कितीही गंभीर स्थिती असली तरी माझी विचारशक्ती स्थिर असते म्हणून मी अजून शल्यक्रिया व्हायची असतानासुद्धा मी हे लेख लिहू शकलो" या आपल्या म्हणण्यात केवळ आपला विनय दिसतो - कारण अशा परिस्थितीत असे लिहिता येणे हे असामान्य. .
2 Aug 2019 - 3:55 pm | स अर्जुन
ऑपरेशन यशस्वी झाले याबद्दल आनंद आणि समाधान वाटले.
आईंची प्रकृती लवकरच उत्तम होऊदे.
शुभेच्छा !
3 Aug 2019 - 1:50 pm | उपेक्षित
चांगली बातमी, त्या लवकरात लवकर बर्या होवो.
तुम्हा सर्व कुटुंबियांची पण खूप धावपळ झाली असेल सो सर्वांची काळजी घ्या.
21 Feb 2020 - 6:10 pm | llपुण्याचे पेशवेll
डॉक्तर तुमचा लेख आज पाहिला. माझ्या ओळ्खीचे डॉ बाणावली म्हणून आहेत टाटाला आणि तेही अत्यन्त सेवभावी आहेत.