आमची धमाल मसुरी - ऋषिकेश सहल!

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
24 Jul 2019 - 4:57 pm

आमचा दहा जणांचा गृप. त्यापैकी आठ जण (किरण, दीपक, सचिन, धनंजय, आनंद, केदार, संतोष, आणि मी) एकाच अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियंते झाले. अस्मादिक त्या आठपैकी एक. राहिलेले दोन जण (गजानन, संजय) नंतर मित्र झाले. अगदी जवळचे! आजदेखील आमचा हा गृप अभेद्य आणि अखंड आहे. काही "सामायिक सद्गुणांच्या आणि आवडींच्या" भक्कम पायावर ही मैत्री गेली २३ वर्षे टिकून आहे. नुसती टिकलेलीच नाही तर बहरलेलीदेखील आहे आणि चविष्ट लोणच्याप्रमाणे मुरलेलीदेखील आहे. इतकी मुरलेली आहे की कुणी नुसतं "कधी?" असं विचारलं की बाकीच्या सगळ्यांना लगेच अचूक संदर्भ लागतो. साधारण संध्याकाळी सहा वाजेच्या आसपास "कधी?" असा प्रश्न कुणी विचारला तर उत्तरादाखल दिनांक, दिवस, आणि ठिकाण ही माहिती कळवली जाते. कुणाचे आक्षेप असल्यास ताबडतोब साक्षी-पुरावे होऊन निर्णय घेतला जातो. या खटल्याला फार वेळ लागत नाही. मुळात कुणाचे आक्षेप सहसा नसतातच. तर अशी ही आमची झकास मैत्री!

आमचे कॉलेजचे मित्र श्री. अजित जोशी सध्या चंदीगडचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. गौरी या अगदी काल-परवापर्यंत पंचकुला (हरियाणा) च्या जिल्हाधिकारी होत्या. अजित हा आमच्या अगदी जवळच्या मित्रांपैकी एक. अतिशय हुशार आणि तडफदार व्यक्तिमत्व! (आमचा संपूर्ण गृपच तडफदार आहे असं म्हणायला तसा थोडा वाव आहे) अगदी लहानपणापासून अजितची नजर 'आएएस'वरच होती आणि अपार परिश्रमांचा सागर पार करून त्याने त्याचे ध्येय २००३ मध्ये गाठले. मैत्रीसुलभ भावनांनुसार आम्हा सगळ्यांना त्याकाळी त्याचा खूप हेवा वाटला. काहींचे बाहू फुरफुरले आणि ते बाह्या सरसावून 'आएएस'च्या तयारीला लागले पण काही सेकंदातच त्यांना आपल्याला यापेक्षा अधिक महत्वाची खूप कामे आहेत हे जाणवले आणि त्यांनी हृदयावर अक्षरशः दगड ठेवून मागे परतण्याचा निर्णय घेतला. काय करणार? तर मुद्दा हा की आमचा संपूर्ण गृपच तडफदार असावा असे समजण्यास वाव आहे...

मागील वर्षी (२०१८) जुलैच्या १९, २०, २१, आणि २२ तारखेला आम्ही सगळ्यांनी चंदीगडची सहल केली होती. अजितने आमची व्यवस्था चोख ठेवली होती. आम्ही हिमाचल प्रदेशातील सुबाथू या अतिशय सुंदर अशा हिल स्टेशनला गेलो होतो. अजितमुळे तिथल्या लष्कराच्या एका कँम्पमध्ये दोन दिवस राहण्याची संधी आम्हाला मिळाली होती. ती सहल जबरदस्त झाली होती. यावर्षीदेखील अजितने अशीच सहल आखली. आम्ही सगळे दहा जण १७ जुलै २०१९ (बुधवार) रोजी रात्री ८:३० वाजता बाणेरच्या एका हॉटेलमध्ये भेटलो. या दहा जणांपैकी दोन जण (आनंद आणि संतोष) अमेरिकेत असतात. ते सुटीनिमित्त भारतात आले होते. त्यांना येता यावं म्हणून मागच्या वर्षीची आणि या वर्षीची सहल आम्ही जुलै महिन्यात आयोजित केली. हॉटेलात सगळे एकमेकांना कडकडून भेटले. सगळे जय्यत तयारी करून आले होते. कौटुंबिक सहल नसल्याने सगळ्यांच्या चेहर्यावर आगळेच तेज दिसत होते. झणझणीत चिकनवर ताव मारता मारता एकमेकांची ख्यालीखुशाली विचारणे चालू होते. संतोषने अमेरिकेतून जी वारुणी आणली होती ती आता हळूहळू सगळ्यांच्या सगळ्या चिंता दूर सारुनि आपली लाघवी जादू दाखवत होती. एकमेकांची खेचता खेचता आपली कशी धरून ठेवायची ही कसरत रंगात आली होती. रात्री १२ वाजता आम्ही सगळे पुणे विमानतळावर पोहोचलो. रेड-आय फ्लाईटने प्रवास करावा लागणं हा नशिबाचा भाग आहे. पहाटे आम्ही दिल्लीला पोहोचलो आणि तिथून पुढची फ्लाईट घेऊन आम्ही सकाळी ७:३० वाजता (जुलै १८) देहरादूनला पोहोचलो. तिथला जॉली ग्रँट एअरपोर्ट अगदीच पिटुकला आहे. शुरू होते ही खतम हो गया. एक प्रशस्त हॉल आणि तिथेच १-२ सामानवाहक पट्टे असा आटोपशीर प्रकार बघून मौज वाटली. देहरादूनवरून आम्ही दोन गाड्यांमधून ऋषिकेशला गेलो. रात्र जागून काढल्यामुळे डोळ्यांवर अशक्य गुंगी होती. लक्ष्मण झुला आधीच्याच शुक्रवारी (जुलै १२) शासनाने बंद केला होता. बंदोबस्ताला असलेले पोलीस मात्र सहृदय होते. झुल्यावर थोडंसं पुढे जाऊन फोटो काढणार्या पर्यटकांकडे दुर्लक्ष करत होते. आम्ही झुल्यावर जाऊन मनसोक्त फोटोग्राफी केली. खाली गंगा खळखळत होती आणि पलिकडे उंच डोंगर आणि मंदिरे आपले सौंदर्य गंगेच्या पाण्यात न्याहाळत होते. अतिशय सुंदर असे ते दृष्य होते. आम्ही खाली उतरून एका घाटावर गेलो. तिथून गंगेचे विस्तृत पात्र दिसत होते. प्रवाह चांगलाच वेगवान होता. पाणी कमालीचे थंड होते. तिथे थोडा वेळ घालवल्यानंतर आम्ही बंजी जंपिंग आणि राफ्टिंगच्या शोधार्थ निघालो. तशी आम्हाला आधीच कुणकुण लागली होती आणि नेमकी ती खरी निघाली. दोन्ही स्पोर्ट्स पावासाळ्यामुळे बंद होते. आम्ही जरासे खट्टू झालो पण काही ईलाज नव्हता. मध्येच एका साधूबाबांकडे आम्ही कसलीशी चौकशी केली तर ते आमच्याशी चक्क मराठीत बोलायला लागले. अधिक चौकशी करता कळले की ते शिर्डीचे राहणारे होते. गेली कित्येक वर्षे ऋषिकेशमध्ये गंगाकिनारी वास्तव्यास असतात. आम्ही त्यांना थोडे पैसे दिले आणि तिथून निघालो. अजितच्या सांगण्यावरून आमचा पुढचा मुक्काम धनौल्टीला होता. अंतर कमी असले तरी घाटातला नागमोडी वळणांचा रस्ता असल्याने वेळ खूप लागत होता. हळूहळू हवा थंड होत गेली. संध्याकाळी साधारण साडेपाचच्या आसपास आम्ही धनौल्टीच्या ड्राईव्ह-इन हॉटेलला पोहोचलो. ऑफ सीझन असल्याने संपूर्ण रस्ता निर्मनुष्य होता. रस्त्यावरचे हॉटेलचालक आमच्याकडे आश्चर्ययुक्त नजरेने पाहत होते. तसेही त्यांना दुसरे काहीच काम नव्हते. धनौल्टी समुद्रसपाटीपासून ८००० फुटावर आहे. मलमली धुके आणि मऊसूत ढग धनौल्टीच्या त्या मुख्य रस्त्यावर मुक्कामाला आले होते.

तो वळणावळणाचा, निर्मनुष्य रस्ता बघून मला अकारण "ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा" आठवले. दुकाने बंद होती. दोन-तीन किरकोळ हॉटेले सुरू होती. तिथे काय मिळेल यापेक्षा काय मिळणार नाही याचीच यादी लांबलचक होती. ड्राईव्ह-इन हे एक छोटेखानी पण सुबक हॉटेल आहे. आत गेल्यावर तिथल्या ऊबदार, पाश्चात्य पद्धतीच्या सजावटीने लक्ष वेधून घेतले. गुबगुबीत सोफे, चॉकलेटी रंगाच्या लाकडाने आच्छादलेल्या भिंती, एका भिंतीवर जुने मोठे घड्याळ, ऊब देणारे दिवे, झोकात वर जाणारा चकाकणारा लाकडी जिना, जिन्याजवळच्या भिंतीवर लावलेली जुन्या पद्धतीची पेंटिंग्ज...आम्ही वर खोल्यांमध्ये गेलो. खोल्यांची सजावट सुरेख होती. खिडक्यांमधून धुक्याच्या कापसात सुस्तावलेले धनौल्टी दिसत होते. थोड्या वेळाने रेस्त्राच्या बाल्कनीमध्ये आलो. तोच तो लडिवाळ रस्ता दिसला. तिथून रस्त्यावर उभा असलेला किरण अगदी पंधरा फुटावर असावा. थोडे खाऊन आम्ही ईको पार्कला गेलो. निरनिराळे पॉईंट्स बघता बघता आमचे ३-४ किलोमीटर्सचे दणदणीत ट्रेकिंग केव्हा झाले ते आम्हाला कळलेच नाही. सगळीकडे ढगांच्या मुंडावळ्या बांधून हिरवाईने नटलेले हिमालयाच्या कुशीतले उंचच उंच डोंगर दिसत होते. बटाट्याची शेती दिसत होती. एव्हाना हवा चांगलीच गार पडली होती. सगळीकडे पूर्ण शांतता होती. इतका शांतपणा अनुभवायची संधी आजकाल फारशी मिळत नाही. एक कुत्री आमच्यासोबत खालून निघाली होती. दोन-अडीच तास आमच्यासोबत भटकून तिने आम्हाला पुन्हा आम्ही जिथून सुरुवात केली होती तिथे आणून सोडले. कृतज्ञता म्हणून गजाननने तिच्यासाठी एक बिस्कीटचा पुडा घेतला आणि तिच्यासमोर दोन बिस्कीटे टाकली. तिने खाली बघून आमच्याकडे पाहिले. तिने बिस्कीटांना स्पर्शदेखील केला नाही. तिच्या प्रेमाचा तो तिला अपमान वाटला बहुधा. रात्री एका खोलीमध्ये जय्यत तयारी झाली. रेस्त्रामधून चमचमीत स्टार्टर्स मागवले गेले आणि मैफिलीला सुरुवात झाली. मनसोक्त गप्पा आणि धुंद करणारी गाणी सुरू होती. "रिमझिम गिरे सावन", "प्यार तुम्हे किस मोड पे ले आया", "आवारगी", "तुम्हारे खत में", "नीले नीले अंबर पर" अशी अनेक गाणी अस्मादिकांनी म्हटली. अजितच्या हरिद्वारमधील एका माणसाने हॉटेलला एक भलामोठा खोका आणून दिला होता. ते बघून हॉटेलचा मॅनेजर जरा बिचकला. आम्ही गाणी गात असतांना त्याचा फोन आला. हॉटेलमध्ये डान्स फ्लोअर होता आणि मॅनेजर फक्त आमच्यासाठी तो डान्स फ्लोअर उघडून द्यायला तयार होता. मग काय! आम्ही सगळे खाली गेलो. ही खोलीदेखील सुंदर होती. लाकडी फर्निचर, ऊबदार दिवे, आणि गाणी! आनंद आणि संतोष सुरेख नाचतात. "छैय्या छैया"वर त्यांनी अफलातून डान्स केला. "ओ साकी साकी"वर संजयने केलेला इंप्रॉम्च्यू डान्स जबरा होता. जे जे हलवता येणं शक्य होतं ते ते त्याने अजिबात हलवलं नाही. संपूर्ण अंगाला अभिनव पद्धतीने वाकवून त्याने नृत्याची नवीन अशी शैली शोधून काढली जी आम्हाला सगळ्यांना बेहद्द आवडली. नंतर शिरस्त्याप्रमाणे "बाई जरा जपून दांडा धर", "नवीन पोपट हा" अशी अर्थपूर्ण गाणी झाली आणि आम्ही त्या गाण्यांच्या अभिजात सुरावटींमध्ये मनसोक्त भिजलो. रात्री १२ च्या आसपास जेवण उरकून आम्ही बाहेर फेरफटका मारायला निघालो. भयानक थंडी होती. रस्ता सुनसान होता. हसत-खिदळत आम्ही थोडं चालून परत आलो आणि दुसर्या दिवशीच्या प्लॅनविषयी बोलायला लागलो. सकाळी नाश्ता करून साडे-आठ वाजता आम्ही सुरकंडा देवीच्या दर्शनासाठी सज्ज झालो. धनौल्टीच्या रस्त्याच्या पातळीपासून साधारण १२०० फूट उंच असे हे प्रसिद्ध देवस्थान आहे. दीड किलोमीटरचा प्रचंड चढाचा हा रस्ता आहे. हे ऐकून आमचे टायर पंक्चर झाले. "पुढे जायला उशीर होईल", "पाऊस आला तर वाट लागेल", "खूप वेळ जाईल" अशा विविध सबबींच्या दुलईखाली हा ट्रेक हाणून पाडण्याचे मनसुबे रचले जाऊ लागले. आमच्यापैकी काहींनी मुद्दा लावून धरला आणि शेवटी आम्ही निघालो. चढ भयानक होता पण प्रत्येक टप्प्यावर हिमालयातील पर्वतरांगांचे अप्रतिम दृष्य दिसत होते. ढग आणि धुके मधूनच आपली हजेरी लावून जात होते. उंच पर्वत आणि निवांत पहुडलेली अतिविस्तीर्ण दरी निसर्गाच्या गूढ अस्तित्वाचे प्रतिनिधी भासत होते. काय आहे हा सगळा पसारा? अंतिमतः काय प्रयोजन आहे या अनंत सृष्टीचे आणि आपल्या असण्याचे? कुठे अंत आहे याचा? असे असंख्य प्रश्न मनात घोळवत आणि गप्पा मारत आम्ही वर चढत होतो. केदार आणि आनंद यांचे इरादे नेक दिसत नसल्याने दीपक त्यांच्यासोबत चालत होता. हळूहळू आम्ही पर्वताच्या टोकावर पोहोचलो. मंदिर सुरेख होते. प्रसन्न होते. इतर मंदिरात असतात तसे पाकिटावर डोळा असणारे पुजारी नव्हते. आम्ही थोडा वेळ मंदिरात बसलो. समोर एक शंकराचे आणि हनुमानाचे मंदिर आहे. तिथले दर्शन घेतले. सचिनने सगळ्यांचे "आज खुश तो बहुत होंगे तुम" स्टाईलमध्ये घंटा वाजवतांनाचे सुरेख फोटो काढले. साधारण ११ वाजता आम्ही खाली उतरलो आणि मसुरीच्या प्रवासाला निघालो.

मसुरीमध्ये आमचे हॉटेल अजितने बुक करून ठेवले होते. डोंगरदर्यांमधून प्रवास करत करत आम्ही दुपारी दोन वाजेच्या आसपास मसुरीतील प्रसिद्ध अशा कंट्री-इन बाय रॅडिसन या हॉटेलमध्ये पोहोचलो. हॉटेल बाहेरून बघून आमचे तोते भुर्र उडून गेले. अतिशय महागडे असे ते हॉटेल दिसत होते. आम्ही आत शिरलो आणि रुम्स ताब्यात घेतल्या. रुम्स प्रशस्त आणि आरामदायी होत्या. थोड्या वेळाने खाली जेवायला आलो. रेस्त्रां मस्त होता. जेवण रुचकर होते. चिकन आणि मटण मनसोक्त हादडले. तेवढ्यात अजित आला. सगळ्यांची आस्थेने चौकशी केल्यानंतर आम्ही मसुरीतील केंम्प्टी धबधब्याकडे जायला निघालो. शुक्रवार असल्याने आणि ऑफ सीझन असल्याने मसुरी शांत वाटत होते. हवा कमालीची उत्साहवर्धक होती. केंम्प्टी धबधबा जिथे कोसळतो तिथे एक छोटे तळे आहे आणि त्या तऴ्याच्या चारही बाजूला दुमजली दुकाने आहेत. ही सगळी दुकाने कपडे भाड्याने देतात आणि कपडे बदलण्यासाठी खोली उपलब्ध करून देतात. मुख्य रस्त्यापासून हे तळे खूप खाली आहे. उतरतांनाच आमच्या लक्षात आले की परत वर येतांना वाट लागणार आहे. किरण, संजय, संतोष, दीपक, सचिन, आनंद, आणि केदार पाण्यात उतरले. माझी हिम्मत होत नव्हती. पाणी मरणाचे थंड होते. मी 'श्यामच्या आई'मधल्या श्यामसारखा पुढे जाई, पाण्यात पाय टाकी, आरडाओरडा करत परत मागे येई. शेवटी सगळे मला ओढून घेऊन गेले. एकदा पाण्यात उतरल्यानंतर थंडी पळून गेली. धबधब्याखाली उभे राहिल्यावर पाठीत कुणीतरी हातोड्याचे दणके देत आहे असे वाटत होते. खूपच अनोखा असा हा अनुभव होता. नंतर चहा पिऊन आम्ही पुन्हा ट्रेक करून वर आलो. वर येण्याच्या रस्त्यावर दुतर्फा दुकाने आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या विविध वस्तू या दुकानांमध्ये मिळतात. तांब्याची, लाकडाची खेळणी, कपडे, पारंपारिक पेहराव, मसाले, दागिने अशा कित्येक वस्तूंनी सजलेली इथली दुकाने भुरळ पाडतात. केंम्प्टी धबधब्यावरून आम्ही लँडोर पॉईंटला गेलो. थंडी मी आणि फक्त मीच म्हणत होती. हा पॉईंटदेखील सुंदर होता. तिथून आम्ही आमच्या रुम्सवर आलो. रात्री पुन्हा जय्यत तयारी झाली. साधारण अकरा वाजेच्या आसपास आम्ही मॅनेजरला एका रुममध्येच सगळा बुफे लावण्याची विनंती केली. ती त्याने मान्य केली. पहाटे अडीचपर्यंत तुफान गप्पा आणि गाणी झाली. अस्मादिकांनी "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या", "सो गया ये जहां", "तुम जो मिल गये हो", "कह दो के तुम हो मेरी वरना", "फिर छीडी रात बात फूलों की", "कोई ये कैसे बतायें" अशी भरपूर गाणी म्हटली. सगळ्यांनी ही गाणी खूप एंजॉय केली असे समजायला किंचित वाव होता.

रुममधली मौज सुरू झाल्यानंतर धनंजयने मॉडरेटरचे काम चोख बजावले. कब किसको क्या चाहिये हे बघणे हे काम त्याने स्वखुशीने पार पाडले. गप्पांमध्ये बर्याच गहन विषयांना स्पर्श करण्यात आला. ते विषय अगदी नेहमीचेच असतात. "बॉईज - ओन्ली" मेजवान्यांमध्ये नियमितपणे चघळले जाणारे हे विषय जितके जुने होत जातात तितकी त्यांची लज्जत वाढत जाते. आठवणींचे कढ निघतात; पोकळ सुस्कारे सोडले जातात; डोळ्यांमध्ये व्याकूळता येते; आणि असे बरेच काहीबाही होत असते. ते सगळे रीतसर झाले आणि पहाटे पावणे-तीन वाजता आम्ही झोपलो.

शनिवारी (जुलै २०) आम्हाला थोडे उशीरा उठता आले. नाश्ता संपवून आम्ही पेंगुळलो होतो तेवढ्यात अजितचा फोन आला. त्याने आम्हाला सगळ्यांना 'लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅड्मिनिस्ट्रेशन' बघायला बोलावले होते. भारतातले सगळे आयएएस ऑफीसर्स इथे ट्रेनिंग घेतात. आम्ही दुपारी एक वाजता तिथे पोहोचलो. अतिशय नयनरम्य, स्वच्छ, आणि शिस्तबद्ध असा तो परिसर बघून आम्ही भारावून गेलो. तिथेच आमच्या अजित आणि सौ. गौरी यांच्याशी तास-दीड तास गप्पा झाल्या. अजितने हरियाणामधल्या गंभीर अशा पाणीप्रश्नावर माहिती दिल्यानंतर आम्ही सुन्न झालो. मराठवाडा, विदर्भ या भागातील पाणीप्रश्नावर त्याने खूप उपयुक्त माहिती पुरवली. सौ. गौरी यांनी त्यांचा अॅकेडमीमधील नवीन जबाबदार्यांविषयी माहिती दिली. लवकरात लवकर पुढील सहल पुण्याजवळ आयोजित करायचे असे ठरवून आम्ही तिथून निघालो.

तिथू अजित आम्हाला 'क्लाऊड एंड' नावाच्या उंचावरील एका रिसॉर्टला घेऊन गेला. इथे जाण्यासाठे थोडे ट्रेकिंग करावे लागले. तिथे गरमागरम पराठे, मॅगी, खेकडा कांदाभजी (ही तिथल्या माणसांना अजितने शिकवली होती) असे जेवण झाले. गजाननची संकष्टी होती आणि त्याला मात्र खायला काहीच मिळाले नाही. तरीदेखील बाकीच्यांना खायला व्यवस्थितपणे मिळतेय की नाही हे त्याने जातीने लक्ष घालून पाहिले. इथे एक जुन्या फोटोंचे प्रदर्शन आहे. ते पाहिले आणि थोडा वेळ आराम करून आम्ही जॉर्ज एवरेस्टला गेलो. इथे आमचे अजून जबरा ट्रेकिंग झाले. हे एक सुंदर घर आहे. ज्या एवरेस्टच्या नावावरून एवरेस्ट शिखराला नाव मिळाले हे त्याचे घर होते. परंपरेप्रमाणे प्रेमीयुगुलांनी इथल्या भिंतींवर त्यांच्या प्रेमाचे पाढे, गणितं, निबंध, पत्र असं सगळं काही कोळशाने रंगवून ठेवलं आहे. हे खरं अक्षर साहित्य! इतक्या सुंदर इमारतीची दैना उडालेली पाहून वाईट वाटले. तिथेच एक मोठा गृप उघड्यावर गाणी वाजवत दारू पीत बसला होता. हुक्क्याचा धूर निघत होता आणि खाण्यापिण्याच्या बाटल्या, कचरा सगळीकडे फेकला जात होता. आमचा ड्रायव्हर म्हटला की हरियाणा-दिल्ली या भागातले हे तरूण कुणालाच जुमानत नाहीत. रग्गड श्रीमंतीच्या जोरावर सगळीकडे माज करत फिरत असतात. अजून एक माहिती अजितने पुरवली. इकडे ठिकठिकाणी मॅगी पॉईंट दिसतात. इथे मुख्य पदार्थ मॅगीच मिळतो. मॅगीवर बंदी आल्यानंतर या छोट्या हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले होते. बाकी या जॉर्ज एवरेस्टला मानलं! कुठल्या कुठे घर बांधून राहत होता. इथे दोन जिने चढायचं जिवावर येतं आणि हा ब्रिटिश बाबा मसुरीमधल्या सगळ्यात उंच ठिकाणी घर बांधून राहत होता. काय म्हणावं याला? ये खुजली कुछ और ही थी...

तिथून आम्ही मॉल रोडला गेलो आणि थोडीफर खरेदी केली. मॉल रोड खूप मस्त आहे. कितीही पायी फिरा, थकवा जाणवत नाही. आम्ही इतकं फिरल्यानंतरही इथे ३-४ किलोमीटर फिरलो पण थकवा जाणवला नाही. रात्री साडे-नऊ वाजता अजित डिनरसाठी हॉटेलमध्ये येणार होता. आम्ही घाई-घाईने रुमवर पोहोचलो आणि 'तयार' होऊन खाली जेवायला आलो. खाली येऊन पाहतो तो काय? लियाकत अली नावाचा स्थानिक कलाकार आपल्या सुंदर आवाजात गाणी म्हणत होता. "तुमसे मिल के", "रंजीश ही सही" वगैरे गाणी झडत होती आणि आम्ही त्याला मनमुराद पावती देत होतो. काही वेळाने आनंद, सचिन, संजय वगैरे दोस्तांनी तिथे मला गाणी म्हणायचा आग्रह केला. साला, आपण कधी कराओकेवर गाणे नाही म्हटलेले. त्यांनी मॅनेजरला पटवून माझा नंबर लावला. मी कसाबसा तयार झालो. "एक तरफ उसका घर" म्हटले. लियाकतने मला बरीच मदत केली. पोरांना आवडले. नंतर "रिमझिम गिरे सावन" म्हटले. बहुधा ते ही बरे झाले असावे असे वाटले. संजयने या दोन्ही गाण्यांचे सुरेख चित्रण करून सगळ्यांना पाठवले. नंतर मी व्हिडिओ पाहिले. माझी दोन्ही गाणी ठीकठाकच झाली होती. एक दुसरा गॄप जेवत होता. त्यांनी माझी गाणी होत असतांना एकदाही ढुंकूनदेखील पाहिले नाही. पण जाम मजा आली. पहिलाच अनुभव खूप आनंद देऊन गेला. जेवण झाल्यानंतर अजितसोबत गप्पांची आणि गाण्यांची मैफिल जमली. "मालवून टाक दीप", "सुन्या सुन्या" वगैरे गाणी झाली. भरपूर गप्पा झाल्या आणि रात्री दोन वाजता आम्ही झोपलो. सकाळी (जुलै २१ -रविवार) आठ वाजता अजित आला. मसुरीतील आमच्या या वास्तव्याचे बिल अजितने भरले. सकाळी नऊ वाजता आम्ही तिथून निघालो आणि देहरादून - दिल्ली - पुणे असा प्रवास करून संध्याकाळी सहा वाजता पुण्यात दाखल झालो.

संपूर्ण सहल अविस्मरणीय झाली. अजितने आम्हाला भरपूर वेळ दिला आणि आमच्याशी मनसोक्त गप्पादेखील मारल्या. निघतांनाच त्याने पुढील वर्षाच्या सहलीची पूर्वकल्पना देऊन ठेवली. किरणने सगळ्या सहलीचे आयोजन, नियोजन, संयोजन, संचलन केले. शिवाय तो त्याच्या ऑफीसचेदेखील काम करत होता. त्याच्या या कौशल्याचा आम्हा सगळ्यांनाच हेवा वाटतो. सहलीमध्ये याच कारणामुळे त्याच्याशी फार पंगा नाही घेता येत; नाहीतर तो "घे, कर मग तू!" असं म्हणून मोकळा होतो. म्हणजे आली का पंचाईत! शिवाय तो जे करतो ते सगळ्यांसाठी योग्यच असते म्हणून आम्ही हट्टीपणा करत नाही. सगळे शहाण्या मुलांसारखे त्याचे ऐकतात. त्याच्या या कौशल्यामुळे आमच्या बर्याच सहली यशस्वी झालेल्या आहेत.

ही सहल अविस्मरणीय झाली कारण आम्ही सगळे जीवश्च-कंठश्च मित्र सोबत होतो आणि आम्ही भरपूर वेळ एकत्र चालत, ट्रेकिंग करत, खात-पित एकत्र घालवला. कुठलीच गोष्ट अशीच किंवा तशीच झाली पाहिजे असा आम्ही अट्टहास ठेवला नाही. सगळे चार दिवस एकमेकांना धरून राहिले. कुठल्याच गोष्टीत आम्ही कमीपणा मानला नाही. अगदी टूथपेस्ट, केसांचे क्रीम, दाढीचे क्रीम, तेल एकमेकांना मागून वापरले. ठरवून एकत्र राहिलो आणि ठरवून एकमेकांची मनमुराद खिल्ली उडवली. पण कुणी मनावर नाही घेतले. दोस्ती में और क्या चाहिये? असली मजा जिंदगी दुसरों के साथ बांटने में होता हैं...बरोबर ना?

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

कंजूस's picture

25 Jul 2019 - 5:43 am | कंजूस

वा!

श्वेता२४'s picture

25 Jul 2019 - 10:48 am | श्वेता२४

पण फोटो असते तर अजून मजा आली असती.

समीरसूर's picture

26 Jul 2019 - 12:04 pm | समीरसूर

फोटो....असायला पहिजे होते पण इथे चढवणे जमत नाही. :-(

संजय पाटिल's picture

25 Jul 2019 - 11:04 am | संजय पाटिल

मस्त धमाल केलीत तर!
जरा फोटो असतील तर टाका....

समीरसूर's picture

26 Jul 2019 - 12:05 pm | समीरसूर

फोटो....असायला पहिजे होते पण इथे चढवणे जमत नाही. :-(

जॉनविक्क's picture

25 Jul 2019 - 5:21 pm | जॉनविक्क

अँड यु टू

गोरगावलेकर's picture

25 Jul 2019 - 5:40 pm | गोरगावलेकर

तीन वर्षांपूर्वी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केलेल्या सहलीची आठवण झाली.
केम्प्टी धबधब्याच्या गोठवून टाकणाऱ्या गार पाण्यात उतरायचे धाडस मात्र झाले नाही. पाण्यात अर्धवट टाकलेला पाय झटकन ओढून घेतला होता. नवऱ्याने मात्र पुरेपूर आनंद घेतला. फोटोत मध्यभागी उघडाबंब! (मिपाकर 'विपा')

लक्ष्मण झुला

समीरसूर's picture

26 Jul 2019 - 12:07 pm | समीरसूर

फोटो छान आहेत पण लक्ष्मण झुल्याखालची गंगा गढूळ होती. निळी किंवा हिरवी नव्हती. मेबी, जुलै महिन्यात गढूळ असावे...
केम्प्टी धबधबा भयानक गार होता. तुमच्या ह्यांनी डिसेंबरमध्ये त्यात आंघोळ केली म्हणजे ग्रेटच! पण अनुभव जबरा आहे!

चौथा कोनाडा's picture

27 Jul 2019 - 9:18 pm | चौथा कोनाडा

गोरगावलेकर, भारी आहेत फो टो !
पहिल्या फोटोतील धबधब्या चे पाणी तर क्लासिकच !

गोरगावलेकर's picture

28 Jul 2019 - 7:45 pm | गोरगावलेकर

समीरसूर यांना वर्णन करता येते पण फोटो द्यायला जमत नाही आणि मला फोटो टाकता येतात पण शब्दांकन जमत नाही. थोडा प्रयत्न केला तर त्यांना मिपावर फोटो चढवणे सहज शक्य होईल. माझी झेप फक्त फोटो देण्यापूरतीच.

समीरसूर's picture

29 Jul 2019 - 12:05 pm | समीरसूर

धन्यवाद! वर्णन करणं काही विशेष नाही हो...तुमचं लिखाणदेखील खरोखर चांगलं आहे.

मला तेवढं फोटो चढवण्याचं सोप्प्यातलं सोप्पं तंत्र कृपया सांगा.

चौथा कोनाडा's picture

25 Jul 2019 - 6:06 pm | चौथा कोनाडा

वाह, सुंदर भटकंती !


संतोषने अमेरिकेतून जी वारुणी आणली होती ती आता हळूहळू सगळ्यांच्या सगळ्या चिंता दूर सारुनि आपली लाघवी जादू दाखवत होती. एकमेकांची खेचता खेचता आपली कशी धरून ठेवायची ही कसरत रंगात आली होती.


भारी पार्टी क्षण ! इथली अशी वर्णने वाचून मजा आली !


मध्येच एका साधूबाबांकडे आम्ही कसलीशी चौकशी केली तर ते आमच्याशी चक्क मराठीत बोलायला लागले.

बरेच उच्चशिक्षित मराठी लोक बेरोजगारीला कन्टाळुन जाऊन तिकडे असे सेटल झाले आहेत असे ऐकण्यात आले होते.

आमची मसूरी ट्रिप आठवली. केम्प्टी फॉल्स पाण्यात उतरताना चांगलीच फाटलेली. पण जमलं त्या बर्फाळ थंड पाण्यात उतरायला.
धनोल्टी तर अप्रतिम आहे. आयुष्यात विसरणार नाही.

समीरसूर _/\_ भन्नाट भटकंती. फोटो टाका राव, म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स देता येतील.

समीरसूर's picture

26 Jul 2019 - 12:07 pm | समीरसूर

फोटो....असायला पहिजे होते पण इथे चढवणे जमत नाही. :-(

जॉनविक्क's picture

27 Jul 2019 - 11:47 pm | जॉनविक्क

बरेच उच्चशिक्षित मराठी लोक बेरोजगारीला कन्टाळुन जाऊन तिकडे असे सेटल झाले आहेत असे ऐकण्यात आले होते.

हम्म, ही शक्यताही गृहीत धरता येउ शकते :) काही उदा. नजरेसमोर आहेत पण हे इतके सरसकटी करण पहिल्यांदाच नजरेसमोर येतय.

चौथा कोनाडा's picture

28 Jul 2019 - 6:24 pm | चौथा कोनाडा

हा ... हा ... हा ... !

काही इलाज नाही सध्या ! स्पिरिच्युअल क्षेत्र जोमाने वाढतेय ! तिथं जास्तीतजास्त कमाईच्या संधी निर्माण झालायत !
बाकी तिथं पण हुशार अन नंबरात पाहिजे !

समीरसूर's picture

29 Jul 2019 - 11:59 am | समीरसूर

आता फ्लिकर, पिकासा वगैरे चालू नाहीत. अशा कठीण समयी काय करावे हे सोपे करून सांगता का प्लीज? मी याबाबतीत खरंच ढ आहे हो. :-(

चौथा कोनाडा's picture

29 Jul 2019 - 12:12 pm | चौथा कोनाडा

गुगल फोटोज वर शेअर्ड फोल्डर क्रियेट करुन त्यात फोटो अ‍ॅड करायचे. आणि त्याच्या लिन्का लेखात टाकायच्या.
मी नेहमी गुगल फोटोजवर अपलोड करून अशी प्रोसेस करतो. सोपं आहे !

समीरसूर's picture

30 Jul 2019 - 2:30 pm | समीरसूर

सवड मिळताच हा प्रयत्न करून बघतो...धन्यवाद!

मुक्त विहारि's picture

27 Jul 2019 - 11:43 pm | मुक्त विहारि

नशीबवान आहात....

एक तर काॅलेजचे मित्र अजून टिकून आहेत आणि त्या मित्रांबरोबर सहल करायला बायको परवानगी देते.

समीरसूर's picture

29 Jul 2019 - 12:03 pm | समीरसूर

नशीबवान आहे की नाही माहित नाही पण कॉलेजमधले मित्र अजून टिकून आहे, आम्ही दर एक-दोन महिन्यांनी भेटतो, वर्षातून १-२ सहली करतो, धमाल करतो, आणि बायको (आम्हा सगळ्यांच्याच) अशा प्रकारची मौज करायला अडकाठी करत नाही हे मात्र खरे! :-)

मुक्त विहारि's picture

29 Jul 2019 - 2:12 pm | मुक्त विहारि

बायकोच्या बाबतीतही नशीबवान आहात. ...

मुक्त विहारि's picture

29 Jul 2019 - 3:50 pm | मुक्त विहारि

आम्हाला चंद्रावर पण जाऊ देत नाही.

अनुभव लिहिला आहे.

जॉनविक्क's picture

29 Jul 2019 - 4:52 pm | जॉनविक्क

मिपाकरांना फार स्वस्तात विविध ग्रहांवर ते पाठवतात असे वाचून आहे

मुक्त विहारि's picture

29 Jul 2019 - 5:14 pm | मुक्त विहारि

तरी बरं आजकाल परा शेठ नसतात.

अभ्या..'s picture

29 Jul 2019 - 6:05 pm | अभ्या..

कुठलं काय,
मी ग्राहशांतिस्तव अनुग्रह मागितला तर पूर्वग्रह सोडून उपहारग्रहात ये असं आग्रहानं सांगितलं माऊलींनी.

समीरसूर's picture

30 Jul 2019 - 2:31 pm | समीरसूर

चंद्रावर काही नाही. पाणी आहे असं म्हणतात. बाकीची सोय कशी होणार? ;-)