जंजीरा चा अर्थच मुळी समुद्राने वेढलेला किल्ला, तसा जंजीरा आपल्या स्वराज्या साठी अजेय राहिला. मुरूडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. जंजिरा किल्ला राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटा वर बांधलेला आहे. भक्कम बांधकाम आणि समुद्र या शिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या ५७२ तोफा ह्या मुळेच जंजिरा अभेद्य होता. या तोफां मध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती.
जंजिरा स्वतंत्र कोळी राजाच्या सत्तेखाली होता, कदाचित हा शासक जंजिऱ्याचा जनक असला पाहिजे. यादव राज्य बुडून सुलतानी राज्य आल्या नंतर पण सन १४९० पर्यंत हा किल्ला स्वतंत्र होता, १४८५ मध्ये जुन्नरच्या मलिक अहमद ने जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा कोळ्यांचा नेता होता रामभाऊ कोळी. अभेद्य किल्ला आणि रामभाऊचा पराक्रम ह्या पुढे मलिक ने हात टेकले. ह्या घटनेच्या चार वर्षा नंतर एक व्यापारी जहाज जंजिऱ्याच्या तटाला लागले. पेरीमखान नावाचा व्यापारी व त्याच्या सिद्दी नोकरांनी सुरतेहून आल्याची बतावणी केली व आसरा मागितला. एतबारराव ह्या किल्लेदाराने मंजुरी देताच पेरीमखानाच्या मालाचे पेटारे किल्ल्यामध्ये आले. रात्री त्या पेटाऱ्यांतून ११६ हत्यारबंद लोक बाहेर पडले. रात्रीच्या अंधारात भयंकर कापाकापी झाली, किल्ला अहमदनगरच्या निजामशहाच्या अंमलाखाली आला (१४९०). निजामशहाने किल्ल्याची जबाबदारी सिद्दी सरदारांकडे सोपवली व किल्ल्याचे नामकरण 'जंजिरे मेहरूब' असे केले.
सर्वप्रथम १४ ऑगस्ट १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्या हाती जंजिऱ्याची मोहीम दिली होती पण त्या स्वराज्याच्या पहिल्या मोहिमेत अपयश हाती आले. मे १६६९ ला महाराजांनी स्वतः मोहीम आखली. पायदळाने दंडा -राजपुरी वर व जंजिऱ्या वर नौदलाने स्वारी करून जंजिऱ्याची कोंडी करायची असा बेत होता. जंजिऱ्याचा सिद्दी होता फत्तेखान व त्याच्या हाताखाली संबूल, कासीम व खैर्यत हे सेनानी होते. फत्तेखान स्वतः दंडा-राजपुरीत होता. त्याच्या अमलांतील प्रदेशात इतर सात किल्ले होते. स्वराज्याचे आरमार जंजिऱ्याला उभे ठाकले. जंजिऱ्याचे पूर्ण बळ खर्ची पडत होते. पायदळाने एका मागोमाग एक असे फत्तेखानाचे सातही किल्ले काबीज करून दंडा-राजपुरी कडे वळाले होते. मराठी आरमारापुढे जंजिऱ्याची कलाल बांगडी तोफ लंगडी पडली. दंडा-राजपुरी काबीज झाल्या मुळे जंजिऱ्याची सर्व बाजूंनी कोंडी झाली होती. फत्तेखानाने मुंबईकर इंग्रजांना मदती साठी पत्र लिहिले, पण सुरतेच्या वरिष्ठ इंग्रजांनी महाराजां विरुद्ध पाऊल उचलण्या पेक्षा तटस्थ राहण्याचा सल्ला मुंबईकर इंग्रजांना दिला. (जून १६६९)
सिद्दीने मोगलांकडे आर्जव केले, त्या नुसार वेढा उठवण्याची आज्ञा महाराजांना झाली. पुरंदरचा वेढा, तह, महाराजांची आग्रा भेट व तिथले पलायन ह्याला फार वेळ झाला नव्हता. तहातले गेलेले किल्ले मिळवून स्वराज्याची घडी नीट बसवे पर्यंत महाराजांना मोगलांचे अंकित असल्याचे नाटक वठवायचे होते. तरीही ती आज्ञा दुर्लक्षीत करून महाराजांनी वेढा अजून बळकट केला. महाराजांनी फत्तेखानाची झालेली कोंडी ओळखली होती, त्यांचा मुक्काम पेण जवळ होता (नोव्हेंबर १६६९). त्यांनी फत्तेखानाला सन्मानाने कळविले की, जंजिरा आमच्या स्वाधीन करा त्या बदल्यात आम्ही तुम्हाला भरपाई म्हणून मोठी रक्कम देऊ व स्वराज्यात योग्य असा मान देखील बहाल करू. जर्जर सिद्दी ह्यास कबूल झाला पण इतर सेनानी हे पाहून उसळले. त्यांनि फत्तेखानाला तुरुंगात डांबले व जंजिरा ताब्यात घेतला. सिद्दी संबूल हा जंजिऱ्याचा मुख्य सिद्दी झाला व सिद्दी कासिम आणि सिद्दी खैर्यत हे अनुक्रमे जंजिऱ्याचे किल्लेदार व हवालदार बनले. विजापूरच्या दरबाराचे अंकित झुगारून त्यांनी औरंगजेबाकडे अर्ज केला. औरंगजेबाची आरमारी ताकद ह्या मुळे वाढली, त्याने सिद्दीच्या गादीला असलेला 'वजीर' हा किताब रद्द करून नवीन 'याकूतखान' हा किताब दिला व तिघांनाही मनसब, जहागीरदारी आणि सुरतेहून गलबतांचा काफिला दिला (डिसेंबर १६६९).
१६६९ च्या मोहिमेत अपयश हाती आले पण महाराजांनी जिंकलेल्या भागाची चोख व्यवस्था ठेवली होती तसेच दंडा राजपुरीला आरमारी गलबतांचा काफिला सज्ज ठेवला होता.
१६७१ च्या सुमारास महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. जंजिरा फत्ते करणाऱ्यास त्यांनी एक मण सोन्याचे बक्षीस देण्याचे ठरवले होते. जंजिऱ्या हून तीन कोसांवर महाराजांचा तळ होता. त्याच रात्री दंड्याचा ठाण्यावरती छुपा हल्ला करण्यास सिद्दी कासीम तयारी करत होता (१० फेब्रुवारी १६७१) . हे ठाणे म्हणजे किनाऱ्या वरील किल्ला होता. मराठी फौज किल्ल्यात तैनात होती. सिद्दी कासीम समुद्रामार्गे तर सिद्दी खैर्यत जमिनी मार्गे असा दुतर्फा हल्ला करण्याची कासीम याची योजना होती. होळीचा सण असल्याने गस्तीच्या सैनिकां शिवाय किल्ल्यातली फौज बेसावध होती. कासिमच्या नावा किल्ल्याच्या तटाला लागताक्षणी खैर्यत ने किल्ल्यावर हल्ला चढवला. साहजिकच किल्ल्याची ताकद हा हमला थोपवण्या साठी गेली व त्यामुळे समुद्राच्या दिशेने होणाऱ्या हमल्या कडे दुर्लक्ष झाले. तटाला शिड्या लावून कासीमची फौज किल्ल्या वर आली आणि एकच कल्लोळ माजला. गस्तीच्या सैनिकांनी शिकस्त केली पण ताकद विभागली गेली होती. दरम्यान किल्ल्या वरील दारूगोळा कोठारात भयंकर स्फोट झाला. प्रचंड धूर उसळला. सगळे जणू ह्या स्फोटाच्या धक्क्याने स्तब्ध भारावले होते. ह्या अतीव शांततेत कासीमची ललकारी गुंजली. परत लढाईला तोंड फुटले, पण मराठ्यांच्या प्रत्युत्तरातली हवाच जणू निघून गेली होती. कासीम आणि खैर्यतची फौज भारी पडत होती, ह्या रणकंदनात मराठी फौजेचा धुव्वा उडाला आणि दंडा राजपुरी स्वराज्यातून परत सिद्दी कडे गेली.
जंजिऱ्या च्या पलीकडे असलेल्या बेटावर महाराजांनी पद्मदुर्ग वसविण्याचे दिव्य सुरु केले, किल्ल्याचा बांधकामात मोठा अडसर होता तो जंजिऱ्या वरून होणाऱ्या तोफेच्या वर्षावाचा. तरीही नेटाने काम चालू होते. दरम्यान महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम चालू केली, आरमाराचे बळ वाढविले. सिद्दीने वेंगुर्ल्यावर स्वारी करून वेंगुर्ले जाळले. मराठी आरमाराने राजापुराहून व विजयदुर्गापासून सिद्दीचा पाठलाग केला पण तो निसटून जंजिऱ्यास पोहोचला. जंजिऱ्याला मराठी आरमाराचा वेढा पडला, जंजिऱ्याच्या तटावर मराठी तोफा आग ओकू लागल्या. मोठमोठ्या तरफांवर तोफा चढवलेल्या होत्या आणि त्या तराफा जंजिऱ्याच्या सभोवती तरंगत तरत्या तोफखान्याचे काम करत होत्या. सिद्दि संबूळ जो ह्या वेढाच्या वेळेस वेंगुर्ल्याच्या बाजूस गेला होता तो आपल्या आरमारासह परतला पण मुसंडी देऊन त्याने हा वेढा मोडून काढला.
ऑगस्ट १६७६, मोरोपंत यांनी जंजिऱ्याची मोहीम आखली. ह्या वेळी सिद्दी कासीम हा सुरतेहून जंजिऱ्याकडे आरमारासह परतत होता. जंजिऱ्यावर मराठ्यांच्या तोफा पुन्हा कडाडू लागल्या. होड्या-मचव्यावर बांधलेल्या तोफांचा गराडा जंजिऱ्याला पडला. जंजिऱ्याचा तट अजस्र होता, तोफ गोळ्यांचा काही एक परिणाम होत नव्हता. मोरोपंत प्रयत्नांची शिकस्त करत होते आणि त्यांच्या डोक्यात एक धाडसी विचार आला, जंजिऱ्याच्या तटावर शिड्या लावून चढायचे व सिद्दीची फौज कापावी. विचार अगदी घातकी होता पण अजून उपाय तरी काय होता. तरीही बरेच प्रश्न पुढ्यात होते. तटावर शिड्या कश्या लावायच्या? कुणी लावायच्या? तटाखालच्या समुद्राचे काय? तटावरच्या बंदोबस्तात शिड्या आणि माणसे कसे पोहोचवायचे?
लाय पाटील ह्याने हा मनसुबा,ही जबाबदारी स्वतः वर घेतली. लाय पाटील ह्याने तटावर शिड्या लावून द्यायच्या व मोरोपंतांनी हजार बाराशेची फौज तटावर चढवायची अशी योजना होती. मध्यरात्री नंतर लाय पाटील आपल्या साथीदारां बरोबर लहान होड्यां मधून शिड्या घेऊन गेला. तटावरच्या पहारेकऱ्यांना चुकवत अलगद जंजिऱ्याच्या तटाजवळ ते पोहोचले. अंधारात आवाज होता तो केवळ तटाला भिडणाऱ्या समुद्राच्या लाटांचा. लाय पाटील अत्यंत अधीरतेने वाट पाहत होता मोरोपंतांच्या तुकडीचा. वेळ भरभर पळत होता आणि इथे मोरोपंतांचा पत्ता नव्हता. कधी तटावरील गस्तकऱ्यांना चाहूल लागेल आणि फटाफट गोळ्या सुटतील ह्याचा नेम नव्हता. अशक्य कोटीतली कामगिरी तर लाय पाटलाने निभावली होती, पण पंतांचा पत्ता नव्हता. पहाटेची वेळ आली, शिड्यांची चाहूल लागली असती तर गस्तकरी सावध झाले असतेच पण हा बेत परत कधीही यशस्वी झाला नसता. हताश होत लाय पाटील आणि त्याचे साथीदार शिड्या काढून झपाट्याने परत निघून आला. नेमका काय घोटाळा झाला? कोणाची चूक होती? हे केवळ इतिहासालाच माहीत. मोरोपंतांनी ह्या मोहिमेच्या अपयश स्वतः स्वीकारले. माहाराजांना ही घटना कळताच त्यांनी लाय पाटलाचा सन्मान करण्यास त्याला बोलावले व त्यास पालखीचा बहुमान देऊ केला. पण त्या स्वराज्याच्या इमानी सेवकाने नम्रपणे तो बहुमान नाकारला. हे पाहून कौतुकाने महाराजांनी लाय पाटलासाठी गलबत बांधण्याचे फर्मान सोडले व त्यास "पालखी" असे नाव दिले. एका दर्यावीराचा यथोचित सत्कार महाराजांनीच करावा. थोरल्या महाराजांनंतर शंभू महाराजांनी देखिल १६८२ मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता.
असा हा अजेय जंजिरा, सिद्दि मुहमंदखान हा शेवटच्या सिद्दी असताना २० सिद्दी सत्ताधीश व त्याच्या राज्याच्या ३३० वर्षांनी ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संघराज्यात विलीन झाले.
================================================
संदर्भः- "राजा शिवछत्रपती", विकीपेडिया
प्रतिक्रिया
5 May 2009 - 3:59 pm | उमेश__
छान लेख....उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद्
5 May 2009 - 4:05 pm | विशाल कुलकर्णी
मस्त माहिती, छान लेख
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
5 May 2009 - 4:39 pm | धमाल मुलगा
आणखी एका किल्ल्याची उत्तम माहिती. धन्यवाद सुमीत!
बाकी, लायजी पाटलाच्या ह्या धाडसी निर्णयाला मोरोपंतांनी आधी परवानगी का दिली, दिली तर मोरोपंतांना कुमक घेऊन येणे का जमले नाही ह्या बाबी इतिहासात का नाहीत हे कळत नाही. मोरोपंतांनी ह्या अपयशाचे कारण महाराजांना सांगितले असेलच, परंतु इतर बाबींचा जसा उल्लेख येतो तसा ह्या मोठ्या धाडसी अश्या रचलेल्या डावाविषयी उल्लेख का नसावा ह्याचा एक खंतवजा प्रश्न राहुन राहुन सतावतो.
असो. बाकी, जंजीरा दुर्ग आहे मोठा खासा! हा पाडायचा तर सिंहाचं काळीज घेऊनच लढावे लागले असणार हे नक्की. :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
5 May 2009 - 6:46 pm | अवलिया
सुरेख ! हा पण लेख छानच !!
येवु दे अजुन !!
लेखाबरोबर फोटो पण देता आला तर बघा ! :)
--अवलिया
5 May 2009 - 6:59 pm | अभिषेक पटवर्धन
माहीती थोडीशी तोकडी वाटली...संभाजी महाराजांनी हा कील्ला जिंकण्यासाठी पाषाणांचा सेतु बांधयचं ठरवलं. रात्रंदिवस होणार्या गोळा गोळीतही काम बंद पडलं नाही..पण शेवटी औरंगजेबने उत्तर कोकणात जोरदार हल्ला चढवला...त्याला थोपवण्यासाठी महाराजांना जातीनं जाणं भाग पडलं आणि जंजीर्याची मोहीम अर्ध्वट राहीली. पेशवाई मधे देखील जंजीरा जिंकण्याचा असफल प्रयत्न झाला..पण यश कोणालाच आले नाही...शेवटपर्यन्त हा कील्ला अजिंक्यच राहीला.
अवांतरः पु.लं. नी भाषांतरीत केलेलं 'कान्होजी आंग्रे' नावाचं पुस्तक फार वाचनीय आहे. फारसा माहीती नसलेला आणि पेशवाई च्या सुरुवातीच्या काळात महत्वाची भुमीका बजावणार्या एका अद्वीतीय सरखेलाचं दर्शन ह्या पुस्तकात होतं. शिवाय मराठी राज्याबद्दल एका अमराठी व्यक्तीच्या नजरेतुन बघताना मजा येते.
5 May 2009 - 7:49 pm | क्रान्ति
हा ही लेख उत्तम. शिवरायांचे गड हे नेहमीच मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय आहेत. अजून लेखांचं स्वागत!
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
6 May 2009 - 12:37 pm | नभा
क्रांती, जंजिरा शिवरायांचा गड नाही.
माझ्या माहितीप्रमाणे जंजिरा किल्ला कोळ्यांनी नव्हे तर सिद्दी (हबशी)लोकांनी बांधला.
सिद्दी आफ्रिकेतून आले होते. जंजिरा हा शब्द जझिरा या उर्दू शब्दावरून आला असावा ज्याचा अर्थ बेट असा आहे.
जंजिरा संस्थानाला 'हबसाण जंजिरा ' असे म्हणत. त्या वेळच्या नाण्यांवरही हबसाण जंजिरा असा उल्लेख आहे. जंजिर्याच्या प्रवेशद्वारावर एक मुद्रा कोरली आहे, ज्यात सिद्दी लोकांचे चित्र दिसते.
जंजिरा किल्ला बांधताना दोन दगडांच्या सांध्यात शीशे ओतले आहे असे म्हणतात्.त्यामुळे दगड झिजले तरी सांधे अजूनही तसेच आहेत.
जंजिरा अभेद्य राहण्याचे सर्वात मोठे कारण त्याचे लोकेशन आहे. तिन्ही बाजुंनी अफाट समुद्र.... फक्त एका बाजुलाच समुद्र किनारा दिसतो (राजपुरी गाव). त्यामुळे येणार्या शत्रूवर नजर ठेवणे अतिशय सोपे होते.
जवळ जवळ १९६० पर्यंत किल्ल्य्या त मनुष्य वस्ती होती. नंतर त्या सर्व लोकांना किल्ला सोडण्याचा आदेश दिला गेला. मग ते मुरुड आणि नजिकच्या परिसरात रहायला गेले.
6 May 2009 - 10:53 pm | क्रान्ति
माहितीबद्दल धन्यवाद नभा. [गड म्हटलं की शिवाजी महाराज, इतकंच इतिहासाचं ज्ञान उरलंय आता काळाच्या ओघात!] खूप छान माहिती मिळतेय मिपाच्या लेखांमधून. धन्यवाद.
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
6 May 2009 - 12:56 pm | जागु
चांगली माहीती मिळत आहे.
6 May 2009 - 3:04 pm | रम्या
मूळ लेख आणि जंजीरा बद्दलची माहीती उत्तम.
शिवरायांना आणि त्यानंतर संभाजी महाराजांना समुद्री आरमाराचं महत्व पुरेपूर माहीत होतं.
संभाजी महाराजांनी जंजीरा घेण्याचा प्रयत्न केला असता बरेच मराठे सैनिक हबशांच्या हाती लागले. हबशांनी या सर्व मराठ्यांची डोकी कोयत्याने तोडून ती टोपल्यात भरून मुंबईला ब्रिटीश व्यापार्यांकडे पाठवल्याचा इतिहास आहे. यासर्व मराठ्यांची धडे तशीच समुद्रात टाकून देण्यात आली.
चतूर ब्रिटीश व्यापार्यांना समुद्री आरमार मराठ्यांकडे गेल्यावर होण्यार्या व्यापारी आणी राजकिय गैरसोईची पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे हबशांना नेहमीच ब्रिटीशांचा पाठींबा राहीला.
अवांतरः
भारतात आलेली अफ्रिकन हबशी हि जमात अजूनही भारतात पहावयास मिळते. गुजरात मधे हे लोक राहतात अशी बातमी एकदा टिव्हीवर बघीतली होती. ते स्वतःला गुजरातीच म्हणवून घेतात आणि अगदी छान गुजराती बोललात.
थोडे गुगलले असता विस्तॄत माहीती येथे मिळाली.
आम्ही येथे पडीक असतो!
20 Jan 2020 - 9:21 pm | चौथा कोनाडा
क्लिप :
6 May 2009 - 3:59 pm | सुमीत
मला अशीच माहीतीची देवान घेवाण अपेक्षीत होती,
धमु, तू अगदी विषयालाच हात घातलेस. तसं घास अगदी तोंडा पर्यंत आला होता पण तो उदरात नाही गेला, कारणे अजून माहित नाहीत कींवा ती प्रकाशात आलीच नाहीत.
इतिहास पण संभाजी राजां बद्द्ल गरळ ओकतो पण तो खरा आहे का? त्यांचे बदफैली आणि सत्ता लोलूप असे चित्र रंगवले ते मूळातच काही वैयक्तीक आकसा तून अणि त्या टिका कारांनी लिहिलेल्या बखरीतून हा इतिहास उभा राहीला.
नाना (अवलिया) फोटो देतो, लवकरच.
अभिषेक्,नभा, रम्या
मला तुमची माहिती देखील रंजक वाटली.
पुढच्या वेळीस आपण अशीच आपली माहीती वाढवूया.
6 May 2009 - 10:28 pm | मुशाफिर
तुमच्या लेखात जुन्नरचा 'मलिक अहमद' असा उल्लेख आहे. मला वाटतं तो जुन्नरचा सुभेदार 'मलिक अंबर' असा असायला हवा. मलिक अंबर स्वतःही आफ्रिकेतून गुलाम म्हणून भारतात आला होता. तो आपल्या कर्तृत्वाने जुन्नरचा सुभेदार झाला. तसेच पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी यशस्वीरित्या वापरलेल्या 'गनिमी काव्या' चा जनक ही तोच होता, हे यशवंत रायकर यांच्या 'हबशी' लोकांविषयीच्या एका लेखात वाचले होते. जंजीरा जिंकता आला नसला, तरी सरखेल कान्होजी आग्रें यांनी हबशांच्या सागरावरील संचाराला आणि प्रभवाला चांगलाच आळा घातला होता.कान्होजी आंग्रेनी मराठा आरमार किती सशक्त बनवले होते? याचं एक उदाहरण म्हणजे, ईंग्रज आणि इतर परकिय आरमारांविरुद्द लढण्यासाठी त्यानी केलेला अंदमान बेटांचा वापर होय! साधारण पावणे चारशे वर्षांपूर्वी स्वरा़ज्यापासून एव्हढ्या दूर एका बेटावर आपला तळ उभारून त्याचा वापर परकीयांना जरब बसविण्यासाठी करणारा, तो एक द्रष्टा आणि अजेय सेनानी होता.
मुशाफिर.
अवांतरः कर चुकवून पळालेल्या व्यापार्याला मराठा आरमाराने पाठलाग करून मस्कतच्या बाजारातून मुसक्या बांधून स्वराज्यात आणले आणि त्याला शि़क्षा झाली होती, हे दाउदला दुबईहून भारतात आणण्याच्या वल्गना करणार्यांना कोणी सांगेल का?
7 May 2009 - 9:41 am | सुमीत
धन्यवाद मुशाफीर.
फार मोलाची माहिती दिलीत, मराठी आरमार अंदमान बेटांचा वापर केला होता ही अगदी नवीन माहिती आहे.
7 May 2009 - 11:54 am | पाषाणभेद
सरखेल कान्होजी आग्रें हे म्हणजे आपल्या ईतिहासातले मानाचे पान आहे.
त्यांना माझा मानाचा मुजरा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
16 Mar 2014 - 9:40 am | माहितगार
आंग्र्यांनी हे साध्य केले असेलतर छानच; हे ऑनलाईन बर्याच ठिकाणी वाचलं पण नेमका ऐतिहासिक संदर्भ उधृत केलेला कुठे आढळला नाही.
17 Mar 2014 - 10:43 pm | आदूबाळ
इंग्रजी वाङ्मयात / इतिहासात "कोन्नाजी आंग्रिया" हा चाचा, लुटारू म्हणून दाखवला जातो**. त्याला कंटाळून कान्होजी आंग्र्यांचं चरित्र मनोहर माळगांवकर यांनी इंग्रजीतून लिहिलं. त्याचा मराठी अनुवाद पु. ल. देशपांड्यांनी केला आहे. मूळ पुस्तक आणि अनुवाद दोन्ही अतिशय वाचनीय आणि संग्राह्य आहेत.
--------
** पायरेट्स ऑफ कॅरिबियन मालिकेतल्या एका चित्रपटातही आंग्रिया हा चाच्यांचा सरदार म्हणून दाखवला आहे.
7 May 2009 - 2:27 pm | परिकथेतील राजकुमार
अप्रतिम लेख आणी तेव्हडीच जतन करुन ठेवावी अशी माहितीची देवाण घेवाण.
आमचे ज्ञान समृद्ध करणार्या तुम्हा सर्वांचे आभार.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
7 May 2009 - 3:27 pm | दशानन
असेच म्हणतो मी पण.
थोडेसं नवीन !
16 Mar 2014 - 7:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जंजी-याला पोहोचलो :)
-दिलीप बिरुटे
16 Mar 2014 - 9:46 am | माहितगार
सातत्याचा वेढा देण इतर युद्धांमुळे शिवाजी महाराज, संभाजी महाराज ते राणी ताराबाई या काळात जमल नसाव पण पेशव्यांना दीर्घ कालीन वेढा लावण शक्य होत, आंग्रेंच्या काळानंतर इंग्रजांना तर त्याही पेक्षा अधिक शक्य होत. पण त्यांनी त्याकडे अंशतः दुर्लक्ष केल असेल ?
16 Mar 2014 - 11:04 am | मृगजळाचे बांधकाम
सुंदर माहितीपूर्ण लेख'
खूप मौलिक माहिती मिळाली
17 Mar 2014 - 10:26 am | आशु जोग
हे कुठलं घाणेकरांचे पुस्तक आहे का..
कुणी बांधला ? कधी बांधला ? आर्किटेक्चर कुणाचे ?
स्वतंत्र झाला तो कुणाच्या प्रयत्नामुळे... माहीत आहे का
17 Mar 2014 - 2:24 pm | तुमचा अभिषेक
छान लेख आणि माहिती.
फोटोंची कमतरता मात्र जाणवली. स्वता जाऊन आल्याने बघणे झाले आहे, तरीही.
17 Mar 2014 - 3:20 pm | निनाद मुक्काम प...
उपयुक्त माहिती
मागे एका वृत्त पत्रात वाचले होते
आजही जंजिरा येथे पर्यटन करतांना गाईड म्हणून हे स्थानिक हबशी आहेत ते इतिहास सांगतांना महाराजांचा उल्लेख एकेरी करतात व मराठ्यांना हा किल्ला जिंकता आला नाही ,आम्ही अजिंक्य होतो हे देखील पर्यटकांना आवर्जून सांगतात.
हा किल्ला इंग्रजांनी आपला ताब्यात का घेतला नाही ,
ते भारतात सत्ताधीश झाल्यावर सिद्धी त्यांचे मांडलिक झाले का
ह्यावर प्रकाश पडला तर उत्तम आहे.
अवांतर
ह्या किल्यात आजही रात्री हा खेळ सावल्यांचा थोडक्यात भुताटकी चे प्रकार चालतात असे वाचून होतो
18 Mar 2014 - 9:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जंजीरा किल्ल्याला पोहचतांना गुगलवर सर्च मारल्यावरचा सुमितचा हा माहितीपूर्ण लेख मिपावर सापडला आणि खूप आनंद झाला. तिथले मार्गदर्शक म्हणजे एक अजब नमुना आहे. तीन तीनशे रुपये देऊन नसती झकमारी केली असे वाटले. माहिती सांगतांना सिद्दी सत्ताधीशांच्या ताब्यातला हा किल्ला (तुम्हारा) शिवाजी भी जीत न पाया म्हणतांना त्याला कोन अभिमान वाटत होता कोणास ठाऊक. असो. किल्ल्यात पाहण्यासारखे केवळ अवशेष उरले आहेत. पण हा समुद्रात उभारलेला किल्ला एक आश्चर्य वाटावे असेच त्याचे रुप आहे. बाकी, किल्ला पाहणे एक दिव्यच आहे. तीकिट काढल्यानंतर तासभर वाट पाहावी लागते. तासाभरात किल्ला पाहून शिडाच्या नावेत बसवून नेण्याची त्यांच्या त्या सोसायटी करुन नावा चालवणा-या नावाड्यांची धंदा व्हावा म्हणून पर्यटकांची जी दमवणूक करतात ते कठीण काम वाटलं. असो, पण एकदा चक्कर टाकायला हरकत नाही.
(शिडाच्या नावेतून असे कोंबून किल्ल्यापर्यंत पोहचावे लागते. सुरक्षिततेची अजिबात न घेतलेली काळजी)
(मुख्य प्रवेशद्वारावर अशी गर्दी होते. उतरण्यासाठी ताटकळत बसावे लागते.)
(सात मजली इमारत होती म्हणतात आता उरली ती इतकी)
(सर्वात मोठी तोफ पुढच्या बाजूने बांगडी तोफ, गोमूख तोफ )
-दिलीप बिरुटे
23 Jul 2019 - 4:21 pm | srahul
ज्या कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्याच्या सह शिवाजी महाराजांच्या काळात पन्हाळा जिंकला....त्याच कोंडाजी फर्जंद यांनी संभाजी महाराजांच्या काळात जंजिरा जिंकण्याचा एक अयशस्वी धाडसी प्रयत्न केला......ते व्यापाऱ्याच्या वेशात त्यांच्या सैनिकांसह किल्ल्यात घुसले.......योग्य संधीची वाट ते पाहत होते.....पण कुणी तरी फितुरी केली .....सर्व जण पकडले गेले आणी सर्वांचा शिरच्छेद झाला.....
25 Jul 2019 - 10:00 am | विनोदपुनेकर
कोंडाजी फर्जंद व्यापारी नाही तर संभाजी महाराजांशी बिनसले असे भासवून सिद्दी च्या चाकरीत गेले होते योग्य वेळ पाहून जंजिरा वरील दारुगोळा कोठार उडवायचा त्यांचा बेत होता पण त्यांचे तिथल्या वास्तव्यात एका दासीशी जवळीक झाली होती तिने ऐन वेळी कोंडाजी बरोबर तिथून पळून जाण्याचा हट्ट धरला त्यामुळे हि खबर सिद्दी ला मिळाली नंतर सिद्दी ने कोंडाजी चे मुंडके महाराजांकडे पाठवले असा उल्लेख संभाजी या कादंबरी मध्ये आहे.
23 Jul 2019 - 5:52 pm | हस्तर
विजापूरच्या दरबाराचे अंकित झुगारून त्यांनी औरंगजेबाकडे अर्ज केला. औरंगजेबाची आरमारी ताकद ह्या मुळे वाढली,??
काही भाग वगळला आहे का ?
6 Dec 2019 - 5:40 pm | विनोदपुनेकर
किल्ला खरंतर खूप छान आहे पाहण्यासारखा तटबंदि, तोफा, मोठाल्या विहिरी पण सगळ्यात त्रासदायक तिथपर्यंत पोचणे
कमालीची अरेरावीची भाषा थोडक्यात दादागिरी, गाईड घेतला तर बोलणे असे कि सिद्दी साब मसाले के बडे व्यापारी थे और शिवाजी और संभाजी ये किला कभी भी जीत नहि पाये.... खरंतर राग आला आणि पुन्हा या जंजिरा वर न जाण्याचा मनाणे ठरावे सो पुन्हा कितीदा तिकडे गेलो पण पण त्या मग्रुरी च्या जागी गेलो नाही.
12 Jan 2020 - 11:38 am | हंटरब्राव्हो
ह्या किल्ल्यावरची तथाकथित गाईड लोकांची दादागिरी मी देखील अनुभवली आहे. ‘तुम्हारा शिवाजी भी इसे जीत नही पाया ‘ असं ऐकल्यावर मात्र त्याला मी लगेच ‘ हाँ क्योंकि बाकी हिंदुस्थान अपने कब्जे में मराठे ले चुके थे और तभी आज हम मस्जिद नही मंदिर में मथ्था टिकाते है. और तो और हमारे शिवाजीके मराठोने तुम्हारे औरंगजेब को इसी मिट्टी में दफनाया दिया था ! जब मुघल काट डाले तो सिद्दी फिद्दी जैसे मामुली लोग रहे क्या और जिये क्या ?‘ हे ऐकवलं होतं. त्याचा वरमलेला चेहरा आसुरी आनंद देऊन गेला.
20 Jan 2020 - 6:16 pm | चाणक्य
तोंडच पडलं असेल त्याचं. लक्षात ठेवीन हे उत्तर मी.
16 Jun 2020 - 9:14 pm | सुमीत
जीव ओवाळुन टाकला पाहिजे, काय ते बेफाम उत्तर दिलेस
20 Jan 2020 - 9:34 pm | चौथा कोनाडा
सुंदर धागा, उत्तम चरचा !