उपवासाचे ढोंग

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
20 Sep 2017 - 8:16 am

सर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी अन्न खावे तर लागतेच, पण खाण्यासाठीच जगणारा मात्र माणूस हाच एकमेव प्राणी असावा ! आपल्या उठसूठ ‘चरण्याच्या’ प्रवृत्तीला थोडा तरी आळा बसावा या उद्देशाने उपवासाची संकल्पना मांडली गेली असावी. आठवड्यातून निदान एक दिवस तरी एक वेळचे भोजन न घेणे आणि दुसऱ्या वेळेस पचायला अत्यंत हलका व मित आहार घेणे हा अर्थ उपवास करण्यामागे अभिप्रेत आहे. आपल्यासाठी सतत राबणाऱ्या आपल्या पचनसंस्थेला अधूनमधून विश्रांती देणे हा त्यामागचा खरा हेतू आहे. ( या मुद्द्याबाबत पारंपरिक आरोग्यशास्त्रे आणि आधुनिक वैद्यक यांच्यात मतभेद आहेत असेही दिसून येते). परंतु वास्तव काय दिसते? नियमित उपवास करणाऱ्या कित्येकांना हा अर्थ समजलेला नाही, असे खेदाने म्हणावे लागेल. ‘कळतंय पण वळत नाही’ असा प्रकार बहुतेकांच्या बाबतीत दिसून येतो.

जरा नजर टाकूयात का मराठी माणसाच्या उपवासाच्या खास ‘मेन्यू’ वर? त्यातला ‘default’ पदार्थ म्हणजे साबूदाण्याची खिचडी ! त्यात स्टार्चने खच्चून भरलेला साबुदाणा, दाणे, तूप आणि ती अधिक चविष्ट करण्यासाठी त्यात बटाटाही घातलेला.तेव्हा या पदार्थाच्या उष्मांक मूल्याची कल्पनाच केलेली बरी. आता त्या दिवसभराच्या मेन्यूतील इतर पदार्थ बघा: रताळ्याचा कीस, गोडगोड रताळ्याच्या चकत्या, दाण्याची आमटी, दाण्याचा कूट घालून केलेली व तुपाची फोडणी दिलेली कोशिंबीर, ‘मधल्या’ वेळेस खायला बटाटा वेफर्स, साबुदाणा वडा, गोड राजगिरा चिक्की...... जाउद्यात, आता पुरे करतो, नाहीतर या यादीनेच एक परिच्छेद भरायचा! तेव्हा असे बरेच पदार्थ दिवसातून तीनदा यथेच्छ खाल्यावर तो दिवस हा ‘उपवासाचा’ म्हणता येईल?

अशा अशास्त्रीय पद्धतीने उपवास ‘साजरे’ करून तथाकथित धार्मिकता जोपासली जाते. पण, त्याचा आपल्या आरोग्याला कोणताही फायदा होत नाही. उलट तोटाच होण्याची शक्यता अधिक.
उपवासाला खायला काय ‘चालते’ आणि काय ‘चालत नाही’ हा तर एखाद्या लघुप्रबंधाचा विषय होईल! त्यातून देशभरातील ‘उपवासपंथीयांमध्ये’ याबाबत एकवाक्यता तर बिलकूल नाही. एखाद्या राज्यात अजिबात न ‘चालणारा’ पदार्थ दुसऱ्या राज्यात मात्र अगदी व्यवस्थित ‘पळत’ असतो ! किंबहुना, पचायला हलके पण जिभेला फारसे प्रिय नसलेले पदार्थ उपवासाला चालत नाहीत ! उलट, जिभेचे चोचले पुरवणारे, जठराम्ल वाढवणारे आणि मेदवृद्धी करणारे पदार्थ मात्र उपवासाच्या ‘मेन्यू’ मध्ये उच्च स्थानावर असतात. अनेक नियतकालिकांतून ‘उपवासाच्या पाककृती’ ची वर्णने करणारी सदरे जोरात असतात. त्यातून नवनवीन पदार्थांची भर या ‘मेन्यू’ मध्ये सतत होत असते.

थोडक्यात काय तर उपवासाचा दिवस म्हणजे ‘साबुदाणा – दाणे – बटाटा’ या त्रिकुटाची रेलचेल असलेला दिवस होय. काही विशिष्ट कालावधीत तर या त्रिकुटाचा सप्ताह देखील साजरा होताना दिसतो ! एकदा सहज गंमत म्हणून मी घरातील एका ज्येष्ठ व्यक्तीचा उपवास-दिन आहार बारकाईने पाहिला. तो असा होता:

सकाळी उठल्यावर : साखरयुक्त चहा.हे एक उत्तेजक पेय पण ते पाहिजेच कारण त्याच्याशिवाय ‘’मला होतच नाही’’!
सकाळचा नाश्ता: साबुदाण्याची दूध-साखरयुक्त खीर
औषधे : मधुमेह व उच्चरक्तदाबाच्या गोळ्या. नेहेमीचे एक आयुर्वेदिक चूर्ण मात्र टाळले गेले कारण त्यात हळद असते ( जी खरे तर आरोग्यदायी आहे) व ती ‘चालत नाही.’
दुपारचे जेवण: साबू-खिचडी, रताळ्याचा कीस, काकडीची फोडणी दिलेली कोशिंबीर, दाणे व कोथिंबीर यांची चटणी व ताक (अर्थातच ते साखर व मीठयुक्त).
औषधे: मधुमेहाची गोळी. नेहेमीची बडीशेप (जी खरे तर पाचक असते) मात्र टाळली कारण ती ‘चालत नाही’.

संध्याकाळचे खाणे: राजगिरा- शेंगदाणे चिक्की (विकतची) व चहा
रात्री: वरईचा भात व चवदार दाण्याची आमटी. घरी त्यांच्या नातवाने आईसक्रिम आणले होते ते थोडे खाल्ले कारण ते ‘चालते’.
तेव्हा या ‘उपवास-दिनाने’ त्यांच्या आरोग्याला काय फायदा झाला यावर काही भाष्य करण्याची गरज नाही. किंबहुना अशा दिवसाला नेहेमीपेक्षा ‘वेगळे पदार्थ खाण्याचा दिवस’ असे संबोधणे योग्य राहील.

आपल्याकडे बहुतेक लोक हा वरीलप्रमाणे ‘दुप्पट खाशी’ प्रकारचा उपवास करतात. परंतु, खरोखर आरोग्यदायी उपवास करणारेही लोक आहेत. जरी ते अल्पसंख्य असले तरी त्यांच्या उपवासाच्या पद्धती या नक्कीच अनुकरणीय आहेत. त्या खालील प्रकारच्या आढळून येतात:
१. दिवसाचे १२ तास अन्न व पाणी पूर्ण वर्ज्य
२. दिवसभर अन्न वर्ज्य पण, पाणी भरपूर पिणे. उष्ण हवामानाच्या प्रदेशात हा प्रकार सर्वोत्तम आहे.
३. फक्त द्रव पदार्थ पिणे (पाणी, शहाळे, सरबत इ.)
४. फक्त फळे खाणे. तीही पाणीदार व कमी गोडीची.

वरीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने उपवास केल्यास त्याचा आरोग्यास उत्तम फायदा होतो हे निःसंशय
आता थोडेसे माझ्याबद्दल सांगतो. लहानपणी घरी पारंपारिक ‘दुप्पट खाशी’ प्रकारचे उपवास हे लादलेलेच होते. तेव्हा अर्थातच ती चंगळ वाटायची आणि ते पदार्थ मनमुराद खात असे. बहुतेक मुले ही त्यासाठी उपवास-दिनाची वाट पाहत असत. महाविद्यालयीन वयात या प्रकारातील फोलपणा ध्यानात आला होता.पण, घरात वाद नकोत म्हणून तसे उपवास ‘साजरे’ करत होतो. मात्र जेव्हा स्वतंत्र संसार थाटला आणि निर्णयस्वातंत्र्य मिळाले तेव्हा विचारपूर्वक या ढोंगातून बाहेर पडलो. मग स्वतःच्या पद्धतीने उपवास संकल्पना आचरणात आणली. सुरवातीस आठवड्यातून एक दिवस रात्रीचे जेवण बंद केले. पुढे वयाची चाळीशी उलटल्यावर तर रोज रात्रीचे ‘जेवण’ हा प्रकार बंद करून त्याऐवजी फक्त फलाहार ठेवला. याचे फायदे चांगलेच जाणवले.

मग ‘उपवास’ या संकल्पनेवर खोलवर विचार करू लागलो. खऱ्या उपवासातून जसा आरोग्याला फायदा होतो त्याचबरोबर एक प्रकारचा मनोनिग्रह आपण शिकतो. जरी एखाद्याने आपल्याला त्या दिवशी आपला सर्वात आवडता चमचमीत पदार्थ देउ केला तरी तो नाकारण्याचे बळ आपल्याला मिळते.

पुढे जाउन असे वाटले, की असा मनोनिग्रह फक्त खाण्याबाबतच का असावा? गेल्या काही दशकांत आपली जीवनशैली खूप चंगळवादी बनली आहे. सतत ‘दिल मांगे मोअर’ असे वातावरण अवतीभवती दिसते. बौद्धिक श्रमांच्या आहारी गेल्याने आपण शारीरिक श्रमांना हीन लेखत आहोत. स्वावलंबनाचा आपल्याला विसर पडतो आहे. तर या दृष्टीने आपण अजून काही गोष्टींचा निग्रह करू शकू का असे स्वतःला विचारले. त्यातून एक कल्पना स्फुरली. ती म्हणजे आपण आठवड्यातून एक दिवस ‘मनोनिग्रह दिन’ पाळावा. त्या दिवशी खालील निग्रह करण्याचे ठरले:
१. चहा, कॉफी बंद. ही उत्तेजक पेये म्हणजे सौम्य व्यसनेच होत.
२. दिवसातले एक मुख्य जेवण नाही.
३. गार पाण्याने अंघोळ
४. स्वतःचे जेवणाचे ताट स्वतः घासणे आणि रोजचे कपडेही धुणे.
५. स्वतःचे स्वयंचलित वाहन रस्त्यावर आणायचे नाही.त्यादिवशीची कामे चालत, सायकलने अथवा सार्वजनिक वाहनातून जाऊन करायची.

असा दिवस पाळण्यास आपल्या साप्ताहिक सुटीचा दिवस उत्तम ठरतो. सुरवातीस या सर्व गोष्टी एकदम करणे जरा जड गेले पण, टप्प्याटप्प्याने सर्व जमत गेल्या. असा हा दिन खरोखर आनंददायी ठरला आणि त्याचा शारीरिक व मानसिक आरोग्यास चांगला फायदा झाला, हे सांगणे नलगे

सध्याच्या सामाजिक आरोग्यावर नजर टाकता काही आजार ठळकपणे उठून दिसतात. मधुमेह, उच्च-रक्तदाब, स्थूलता, हृदयविकार हे त्यापैकी प्रमुख. आपली बिघडलेली जीवनशैली आणि अरबट चरबट खाणे हे त्यांच्या मुळाशी आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियमित स्वरूपात एखाद्या उपवासदिनाची नक्कीच गरज आहे. मात्र तो उपवास हा खराखुरा हवा. त्याचे निव्वळ ढोंग नको.

परंपरा आणि आरोग्यविज्ञान यांची सांगड घालणाऱ्या काही अभ्यासकांबरोबर या विषयाची एकदा चर्चा झाली. त्यातील एकांनी प्रचलित ‘उपवास-पदार्थांबाबत’ अशी शक्यता सांगितली. पूर्वजांना ‘’खऱ्या” उपवासादिनी कडकडीत ‘उपास’ करणे अपेक्षित असावे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा-दाणे-बटाटे हे उच्च उष्मांकयुक्त पदार्थ अधिक उर्जा देण्यासाठी योग्य वाटले असावेत. म्हणजेच, हे ‘उपवास सोडण्याचे पदार्थ’ म्हणून सुचविले गेले असावेत. पण, ज्याप्रमाणे अनेक परंपरांच्या मागचा खरा अर्थ आपण विसरून जातो आणि मग त्यांचे निव्वळ कर्मकांड बनते, तसेच काहीसे याही बाबतीत झाले असावे.

ज्यांना या विषयाकडे गांभीर्याने बघावेसे वाटते त्यांनी आपण करीत असलेल्या पारंपरिक उपवास पद्धतीकडे (म्हणजे साबूदाणा, दाणे, बटाटा इ.) डोळसपणे पाहावे. त्यावर जरूर विचार करावा. जेव्हा आपल्या अंतरंगात अशी विचार परिवर्तनाची ‘खिचडी’ शिजू लागेल तेव्हा आपण उपवासाच्या दिवशी साबुदाण्याच्या खिचडीची नक्कीच सुटी करू शकू!

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

तिमा's picture

20 Sep 2017 - 9:51 am | तिमा

थोडे विषयांतर होईल पण उपास करणार्‍या एका प्रातिनिधिक गटावर ही कविता फार पूर्वी केली होती.

घरोघरी एक रिमोट असतो
हातात वैराग्याची माळ धरुन असतो
लक्ष मात्र,प्रत्येक बाबतीत ठेऊन असतो
जप वरच्याचा करत असतो
उद्धार मात्र, खालच्यांचा करतो
आपले वेगळेपण राखून असतो
सणाच्या दिवशीच याचा उपास असतो

कुमार१'s picture

20 Sep 2017 - 10:52 am | कुमार१

तीमा, मस्त! चपखल आहे कविता.

सतिश गावडे's picture

20 Sep 2017 - 12:31 pm | सतिश गावडे

उपवासाला सोलकढी चालते हे सोलकढीच्या जवळपास प्रत्येक पोस्टरवर लिहिलेले असते. हे चालणं कोण ठरवतं कोण जाणे.

जॉनविक्क's picture

12 Jul 2019 - 3:22 pm | जॉनविक्क

पण सोलकढीला चालताना सोडा रांगतानाही मी अजून पाहिलं नाहीए :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2019 - 5:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

बरोबर आहे. सोलकढी किमान रांगत तरी असती तर, या प्रतिसादाला इथे प्रकट व्हायला जवळ जवळ दोन वर्षे इतका मोठा वेळ लागला नसता, नाही का ?! ;) :)

सुबोध खरे's picture

20 Sep 2017 - 12:41 pm | सुबोध खरे

असं कसं असं कसं ?
डॉक्टर आमच्या कडे फक्त आषाढी आणि कार्तिकीला साबुदाण्याचे वडे, रताळ्याचा कीस, वरी तांदूळ आणि दाण्याची आमटी असे पदार्थ केले जातात. इतर दिवशी मुद्दाम केले जात नाहीत मग आम्ही काय करायचं? ती संस्कृती कि काय म्हणतात ते जतन कसे करायचे?
बाकी मी एकदा दोनदा रात्रीचे जेवण नको म्हणून प्रयत्न केले तर आमच्या सौ. ने डोळ्यात पाणी बिणि आणून विचारलं, माझी काही चूक बिक झाली का? मग काय करायचं? तसं वजनाच्या बाबतीत म्हणायचं तर आम्ही चौघे कमी वजनाचेच आहोत. मुलं तर दूधच पितात. मला चहा कॉफी काहीच "लागत"नाही. शनिवारी "कसं तरी" हि होत नाही( म्हणजे मी दारू पितच नाही). मग आमच्या उपासावर गदा का?
ह. घ्या. हो!
बाकी लेख छान आणि मुद्देसूद आहेच.

कुमार१'s picture

20 Sep 2017 - 12:56 pm | कुमार१

सुबोध, आभार !

अनिंद्य's picture

20 Sep 2017 - 4:02 pm | अनिंद्य

@ कुमार१

.......मनोनिग्रह फक्त खाण्याबाबतच का असावा? ..... विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

बाकी जगाच्या पाठीवर 'उपवासाला चालणाऱ्या' पदार्थांची जेवढी रेलचेल / व्हरायटी महाराष्ट्रात आहे तेवढी अन्यत्र कुठेच नसावी. बेस्टेस्ट व्हरायटी :-)

कुमार१'s picture

20 Sep 2017 - 5:15 pm | कुमार१

अनिंद्य, सहमत

स्वामि, दया करा. इतके चमचमित पदार्थ खाण्यावर बंधनाचा आदेश काढू नका. आम्ही दोननार नावडत्या गोष्टी सोडून सर्वांना न्याय देत असतो.

स्वामि, दया करा. इतके चमचमित पदार्थ खाण्यावर बंधनाचा आदेश काढू नका. >>>> सही !

कुमार१'s picture

12 Jul 2019 - 1:52 pm | कुमार१

उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा !

वर्षातून फक्त तीनच उपवास करतो हो मि. महाशिवरात्र, आषाढी आणि कार्तिकी एकादशी. आणि हे तीनच दिवस साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, साबुदाण्याचे थालीपीठ, उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ, बटाट्याची उपवासाची भाजी, बटाट्याचा कीस, रताळ्याचा कीस, वरीच्या (भगर) तांदुळाचा भात, शेंगदाण्याची आमटी असे एकसेएक चविष्ट पदार्थ खायला मिळतात आणि हे पदार्थ मनापासून आवडतात. बाकी इतर दिवस कधीही काहीही खायला तयार असतो.

लेख आवडला! आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! जय हरी विठ्ठल! __/\__

इरामयी's picture

12 Jul 2019 - 3:31 pm | इरामयी

छान लेख.

माझा उपास दुप्पट खाशी प्रकारातच मोडतो.

कळतं पण वळत नाही. कारण उपासाचे पदार्थ चवदार असतात

जालिम लोशन's picture

12 Jul 2019 - 3:50 pm | जालिम लोशन

छान

आम्लपित्ताचा त्रास होतो म्हणून मी कधीच उपास करत नाही पण उपासाचे पदार्थ मात्र खायला आवडतात!

fasting

कुमार१'s picture

12 Jul 2019 - 5:56 pm | कुमार१

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.

एका परिसंवादात एक वेगळाच मुद्दा निघाला. त्यावर निव्वळ वैद्यकीय दृष्टीने बघायचे आहे. मनोनिग्रह पूर्ण वेगळी बाब आहे. तो विचार असा आहे:

हृदय व फुफ्फुसे जर क्षणभरही विश्रांती न घेता सतत काम करतात, तर मग पचनसंस्था- जी थांबून थांबून च काम करत असते तिला 'उपास' करून 'विश्रांती' कशाला द्यायची ?

…… यावर मी काही विचार केला आहे पण अजून मनाचे पूर्ण समाधान झाले नाही. आधी वाचकांचे मत वाचण्यास उत्सुक.

Rajesh188's picture

12 Jul 2019 - 7:34 pm | Rajesh188

माणसाला भूक लागली आहे ह्याची जाणीव शरीर करून देते आणि पोटात कसतरी होते (आता कसतरी होते ह्या शब्दाचा अर्थ स्वानुभव नुसार लावावा)आणि शरीर इशारे देत असून सुधा आपण अन्न ग्रहण न करणे मला तरी निसर्गाच्या विरूद्ध आहे असे वाटत .
मनो निग्रह करून न जेवणे ही जबरदस्ती झाली .
लिफ्ट मध्ये आपण अडकलो की गुदमरतो आहे असे वाटते हे वाटण म्हणजे शरीराला oxygen Kami पडत आहे आणि त्याची पूर्तता करण्याचे आदेश मेंदू सर्व अवयवांना देते .
खूप धावलो तर दम लागतो heart beat वाढतात आणि तुम्ही थांबावे असे आदेश मेंदू कडून पायाला दिले जातात तरी तुम्ही धावला तर काय होईल .
एकंदरीत आपल्या ला भुकेची जाणीव करून देणे आणि बाकी दोन्ही उदाहरणे ह्यांचा मेळ बसवला की उत्तर मिळेल

सुधीर कांदळकर's picture

13 Jul 2019 - 8:17 am | सुधीर कांदळकर

क्रिया आणि पचन क्रिया यात एकच फरक दिसतो आहे तो म्हणजे आंत्रस्थ जंतूंची उपस्थिती. या जंतूंचा प्रत्यक्ष रासायनिक सहभाग किती हे डॉक्टर लोकच जाणू शकतील. परंतु उपवास या तात्विक संकल्पनेला विज्ञानाची जोड देणे चुकीचे आहे असे माझे स्पष्ट मत आहे. उपवासाबद्दल प्राचीन वैद्यकात उल्लेख असतीलही. परंतु सध्याची प्रचलित उपवास ही संकल्पना वैद्यांची नसून धार्मिकांची वा तत्त्वज्ञानींची असावी. त्यामुळे त्या संकल्पनेला वैद्यकीय आधार नक्कीच नसावा. उपवासाला ढोंग हे फक्त काही व्यक्तींच्या बाबतीत म्हणता येईल. सरसकट सर्व उपासकर्‍यांच्या बाबतीत नाही. गांधीजी तर पंचतारांकित उपवास करीत. बकरीचे दूध, खजूर आणि सुका मेवा. याला नक्कीच ढोंग म्हणता येईल.

असो. वरील बहुतेक प्रतिसाद आणि माझे निरीक्षण इ. वर विचार केल्यावर गंमत वाटली. दुप्पट खाशी हा प्रकार खरेच इतका सर्वव्यापी आहे?

मी पाहिलेल्या लोकांपैकी बहुतेक नोकरदार स्त्रीपुरुष उपासादिवशी खरेच अतिशय तुटपुंजा आहार घेतात. बहुतेकांचे उपवास हे सोमवार, गुरुवार, शनिवार, संकष्टी, एकादशी वगैरे असतात. एक बशी साबुदाण्याची खिचडी आणि दुसरे वेळी एखादा राजगिर्‍याचा लाडू, एकदा कपभर दूध एवढा आहार. या आहाराची पोषणमूल्ये ही तीनचार चपात्या, दोन मूद भात, एक वाटी आमटी आणि एकदोन वाट्या भाज्या, दोनचार चमचे कोशिंबीर या आहारापेक्षा खरेच जास्त आहेत?

मला प्रकर्षाने जाणवला तो त्यांचा 'माझा उपवास हा मला पुण्य देतो आणि देव त्याची नोंद ठेवतो' हा विश्वास. काही लोक कर्मण्येवाधिकारस्ते ...... या भावनेने करतात. 'पापपुण्य काही मिळो वा न मिळो मला मन्।शांती तर लाभते' या भावनेने पण काही लोक उपवास करतात.

अर्थात माझे निरीक्षण फक्त मी पाहिलेल्या लोकांपुरते सीमित आहे. परंतु हे पदार्थ मिळणार्‍या हॉटेलात ते चापायला आम्ही बरेचदा जात असू. त्यानंतर या पदार्थांचे (उपासाचाच) मीठमसाला लावलेली वर्णने करून उपासकर्‍यांची टवाळी करायला जास्त मजा येत असे.

कार्यालयातली एक विशाल महिला उपासाच्या दिवशी काही बोलली तर काय हो **** तुम्ही दिसत का नाही? तुमचा आवाज मात्र येतोय. कडक उपासामुळे अदृश्यच झालात की काय? असे मी विचारत असे.

माझा उपवास पुणे मालवण या प्रवासात आपोआप घडतो. या प्रवासात मी बाहेरचे खात नाही. पाण्याच्या बाटलीबरोबर थर्मासमधून चहा, भाजलेले पदार्थ म्हणजे बिस्किटे आणि खारे शेंगदाणे घेऊन जातो आणि भूकमारी म्हणून तात्पुरते खातो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jul 2019 - 11:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

परंतु सध्याची प्रचलित उपवास ही संकल्पना वैद्यांची नसून धार्मिकांची वा तत्त्वज्ञानींची असावी. त्यामुळे त्या संकल्पनेला वैद्यकीय आधार नक्कीच नसावा.

महत्वाची सूचना : या प्रतिसादात "उपवास" याची व्याख्या "१२ तास किंवा अधिक वेळेसाठी अन्न पूर्ण वर्ज्य करणे" अशी गृहित धरलेली आहे. अर्थातच, एकादशी दुप्पट खाशी किंवा पोटभर उपवासाचे पदार्थ खाणे, यासारखे प्रकार या उपवासाच्या व्याख्येत गणलेले नाहीत.

भारतात उपवास या रुढीची सुरुवात कशी झाली हे १००% खात्रीने माहित करून घेणे कठीण आहे. पण, तिचा जन्म कसा झाला यापेक्षा ती उपयोगी आहे की नाही, इकडे लक्ष देणे जास्त महत्वाचे आहे.

सद्या चालू असलेल्या आधुनिक शास्त्रिय संशोधनामध्ये उपवासाचे (सतत १२ ते २४ तास काहीही न खाणे) फायदे खात्रीलायकरित्या नजरेस येऊ लागले आहेत... इतके की २०१६ सालचे "वैद्यकविज्ञान किंवा शरीरविज्ञान नोबेल बक्षिस (The 2016 Nobel Prize in Physiology or Medicine)" याच विषयावरच्या योशिनोरी ओसुमी (Yoshinori Ohsumi) यांच्या संशोधनाला मिळालेले आहे.

योशिनोरी ओसुमी यांनी असे सिद्ध केले आहे की, मधून मधून केलेला (intermittent) उपवास व दीर्घ भुकेलेपणा / उपासमार (starvation) या अवस्थांमध्ये चयापचय प्रक्रियेत होणार्‍या बदलामध्ये शरीराच्या पेशी स्वभक्षण (autophagy), पुनर्वापर (recycle) व पुनर्निर्माणाचे (cell regeneration) काम जोमाने करतात.

या संशोधनापासून मिळणार्‍या बोधाचे सार असे सांगता येईल:
१. मधून मधून केलेला (intermittent) उपवास हा सर्वसामान्य माणसात आरोग्यवर्धक असतो हे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे.
२. दीर्घ भुकेलेपणा (starvation) सुरुवातीला उपयोगी असू शकतो पण, ती अवस्था जास्त दिवसांकरिता झाली तर, शरीरातील निरोगी असलेल्या महत्वाच्या संरचना आणि प्रक्रियांनाही धोका पोहोचायला सुरुवात होऊन जीवालाच धोका पोहोचू शकतो... तेव्हा "अती सर्वत्र वर्जयेत" आणि "अती तेथे माती" या म्हणी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.
३. ज्यांना अगोदरच चयापचय क्रियेशी संबंधीत समस्या/आजार आहेत त्यांनी आपल्या आरोग्यसल्लागारांच्या सल्ल्यानेच उपवास अथवा दीर्घ भुकेलेपणा यांचे प्रयोग करावेच, हे सांगायला नकोच.

उपवासामुळे निर्माण होणार्‍या अन्न (व पक्षी) उर्जेच्या कमतरतेमुळे, आवश्यक उर्जा मिळविण्यासाठी, पेशी स्वतःमधील जगण्यास त्रासदायक, अनुपयोगी आणि कमी उपयोगी प्रथिनांचे विघटन : यामध्ये, पेशीत असलेले विषाणू (viruses), बॅक्टेरिया आणि पेशीच्या संरचनेमधील नुकसान झालेले भाग, इत्यादींचे विघटन केले जाते.

सर्वसाधारण आरोग्यासाठी आणि दीर्घ उपासमारीत (उदा : दुष्काळ) अत्यावश्यक असलेला हा प्रकार सर्व जीवांच्या (एक पेशीय जीव ते माणूस यांच्या) निरोगी पेशींमध्ये सतत चालत असतोच, उपवासामध्ये तो अधिक जोमाने केला जातो. बहुपेशीय आणि विशेषतः (माणसासह) मोठ्या प्रामाणात उत्क्रांत झालेल्या प्राण्यांत हे काम करण्यासाठी खास जनुके निर्माण झालेली आहेत. या जनुकांमध्ये दोष निर्माण झाल्यास, पेशींचे स्वास्थ्य बिघडून अनारोग्य निर्माण होते.

या प्रक्रियांमुळे खालील फायदे होतातः

१. जुने, निकामी, धोकादायक पदार्थ नष्ट केल्यामुळे, अर्थातच पेशीचे (व पर्यायाने बहुपेशीय जीवाचे) आरोग्य सुधारते. ही प्रक्रिया वृद्धत्वाबरोबर अधिकाधिक कमकुवत होते. त्याविरुद्ध, काही उपाय मिळाला तर आरोग्यपूर्ण दीर्धायुष्याची (? अमर्त्य होण्याची !) चावी मिळाल्यासारखे होईल, नाही का? :)

२. मार बसून इजा झालेले, सूजेमध्ये (inflammation) निर्माण झालेले दुषित/अनुपयोगी भाग नष्ट करून सूज आणि आजार बरे होण्यास मदत.

३. नियमित व्यायामामुळे ही प्रक्रियेला उत्तेजित करतो

४. पेशींच्या चयापचय प्रक्रियेवर परिणाम झाल्यामुळे निर्माण होणार्‍या अनेक रोगांच्या संशोधनात आणि उपचारात, उपवासावर चाललेल्या संशोधनातून मिळालेली माहिती अमूल्य ठरत आहे. त्यापैकी काही महत्वाच्या निरोगी/रोगी अवस्था अश्या आहेत...
अ) उपवासाने निरोगी माणसाला मिळणारे आरोग्यवर्धक फायदे
आ) वृद्धत्व
इ) सूज (inflammation)
ई) स्मृतीभ्रंश (dementia)
उ) पार्किनसोनिझम (Parkinsonism)
ऊ) मेदवृद्धी (obesity)
ए) प्रकार-२ मधुमेह (Type 2 Diabetes)
ऐ) कर्करोग,
इ इ इ

१९६०च्या दशकात, सुरुवातीला यीस्ट या जीवावर सुरू केलेल्या या संशोधनाची व्याप्ती ओसुमी यांच्या अथक प्रयत्नांनी १९८०च्या दशकापर्यंत इतकी वाढली आहे की, सुरुवातीला वर्षभरात २० पेक्षा कमी असलेली आंतरराष्ट्रिय दर्जाचे संशोधननिबंधांची संख्या सद्या वर्षाला ५,००० पेक्षा जास्त इतकी वाढलेली आहे.

तेव्हा, धार्मिक कारणांसाठी करा की शास्त्रिय, योग्य प्रकारे केलेला उपवास (एकादशी दुप्पट खाशी, नव्हे !), आरोग्याला हितकारकच ठरेल, हे आधुनिक शास्त्रिय सत्य आहे.

******

अजून काही महत्वाचे...

१. सर्वच संशोधनाची सुरुवातीची वाटचाल "निरिक्षण आणि/किंवा अनुभव ---> त्यांचे विश्लेषण ---> निष्कर्षांचा व्यवहारात उपयोग ---> घडलेल्या बदलांचा अभ्यास ---> खात्रीपूर्ण निष्कर्षांचा दीर्घकालीन स्वीकार" असाच असतो... मग ते प्राचीन संशोधन असो की आधुनिक.

२. आधुनिक संशोधनात या प्रक्रियेमध्ये अजून खूप भर पडली आहे ती म्हणजे...
अ) सतत विकसित होत असलेल्या शास्त्रिय प्रगतीने निर्माण झालेल्या अत्याधुनिक प्रयोगशाळा व प्रमाणित संशोधन तंत्रे
आ) सहजपणे मिळणार्‍या झालेल्या संचारव्यवस्थेमुळे, जगभरातील शास्त्रज्ञांमधी ज्ञानवितरण आणि ज्ञानसहकार्य
इ) संशिधनाचे प्रमाणिकरण करण्याची सहसंशोधक व्यवस्था (पियर रिव्हू)
इत्यादी.

परंतू, वर सांगितलेल्या प्रक्रियेतून बाहेर पडलेले आणि आता रुढी बनलेले असे बरेच उपयोगी ज्ञान आझी आस्तित्वात आहे. फक्त त्याची शेकडो वर्षांच्या अंधश्रद्धा आणि अशास्त्रिय रुढींबरोबर सरमिसळ झाली आहे.

थोडक्यात, आपल्याकडे परंपरेने चालत असलेले प्रत्येक ज्ञान अथवा रुढी टाकाऊ असेल असेच नाही.
पूर्वग्रहदृष्टी सोडून,
नवीन शास्त्रिय परिमाणांत पारखून,
त्यांची केवळ रुढीजन्य असलेल्या अंधश्रद्धांपासून फारकत करून,
योग्य त्या ज्ञानाचा स्विकार करून त्याचा फायदा आपल्या नावावरच ठेवण्याची गरज आहे.

केवळ पूर्वांपार रुढी आहे इतक्याच कारणाने जुन्या ज्ञानाची वंचना अथवा हेटाळणी केल्यास ते नष्ट होईल. मग नंतर एखाद्या अमेरिका, जपान, ब्रिटन, जर्मनी अश्या विकसित देशात संशोधनाने सिद्ध झाल्यावर, आपण झिडकारलेले पण पश्चिमेकडून आलेले ज्ञान स्विकारवे लागेल हे सद्याही दिसते आहेच... हा शिरस्ता अधिक भक्कम बनेल. त्याची उत्तम उदाहरणे म्हणजे...
(अ) "योग" केवळ भारतिय आहे म्हणून त्याला 'डाऊनमार्केट" समजले जात होते व झिडकारले जात होते... आता पाश्चिमेकडून तो "योगा" बनून आल्यावर लगेच "अपमार्केट" झाला आहे !
(आ) भारतिय स्वयंपाकघरात दिवसातून दोनतीनदा तरी वापरल्या जाणार्‍या हळदीच्या आरोग्याला उपयोगी परिणामांना आपण आरोग्यादायक उपयोगांच्या बाबतीत "आजीच्या बटव्यातील मुळी" यापेक्षा जास्त महत्व देत नव्हतो... त्याच हळदीवर पाश्च्यात देशांत संशोधन होऊन तिचे आरोग्यासंबंधी अनेक उपयोग सिद्ध झाल्यावर आता आपण तिचे गुणगान गात आहोत. दोनतीन वर्षांपूर्वीच, त्याच हळदीचे पेटंट बनवून घेऊन जगभराच्या हळदीच्या उपयोगावर नियंत्रण मिळवून फायदा लाटणाच्या अमेरिकन कंपनीच्या कारवायांना, भारतीय सरकारने अमेरिकन कोर्टात खटला, चालवून पायबंद घातला. ते केले नसते तर, आपल्या रोजच्या जीवनात वापरणात असलेल्या हळदीच्या किंमतीतील एक वाटा (पेटंट फी) अमेरिकन कंपनीला द्यावा लागला असता !
(इ) सर्पगंधा (Rauvolfia serpentina) या सर्व भारतात भारंभार वाढणार्‍या वनस्पतीचे रक्तदाबावरचा उपयोग आयुर्वेदात आहे. पण, त्या वनस्पतीवर संशोधन करून त्यातील indole alkaloids रक्तदाबावर उपयोगी आहेत हे पाश्चिमात्य देशांत सिद्ध केल्यावरच आपल्याला त्याचे महत्व समजले आणि पटले. यामुळे, ते संशोधन केलेल्या पाश्चिमात्य कंपनीने अनेक दशके, कित्येक बिलियन डॉलर्स कमावले आणि ती किंमत भरण्यात भारतिय रुग्णही सामील होते !

असे अनेक दाखले देता येतील. पण, मुद्दा सिद्ध करण्यासाठी इतके पुरे आहेत.

संदर्भ :

https://www.bluezones.com/2018/10/fasting-for-health-and-longevity-nobel...

https://osher.ucsf.edu/patient-care/integrative-medicine-resources/cance...

"fasting and health" अशी विचारणा गुगलवर केल्यास शेकडो विश्वासू संदर्भ मिळतील.

जॉनविक्क's picture

15 Jul 2019 - 12:36 am | जॉनविक्क

मार बसून इजा झालेले, सूजेमध्ये (inflammation) निर्माण झालेले दुषित/अनुपयोगी भाग नष्ट करून सूज आणि आजार बरे होण्यास मदत.

मला हे पटतय कारण

माझा घसा वर्षभर अस्वस्थ होता सतत खवखव करत असे, सूज असावी पण दुखणे ना वाढत होते ना कमी व घशाला थंडी लागू दिली नाही अथवा गाणे वगैरे म्हणताना जास्त ताणला नाही तर प्रकरण अजिबात वाढत नसे. म्हणून अंगावर काढले होते.

मी वर्षातून फक्त एकच उपवास करतो, निर्जळी करतो तो म्हणजे महाशिवरात्र. सुर्योदया पासून दुसऱ्या दिवशीच्या सुर्योदया पर्यंत काहीही सेवन करायचे नाही. आणि 2018चा उपवासही याला अपवाद नाही. फक्त तो सोडताना एकच चमत्कार झाला माझा घसा विनाउपचार खखडीत बरा झाला होता. कितीही ताण दिला तरी परत त्रास झाला नाही.

जी गोष्ट मी चमत्कार समजत होतो त्यामागील खरे गूढ हा प्रतिसाद वाचता लख्खकन उलगडले :)

कुमार१'s picture

15 Jul 2019 - 7:40 am | कुमार१

अभ्यासपूर्ण छान प्रतिसाद, धन्यवाद !

कुमार१'s picture

13 Jul 2019 - 8:30 am | कुमार१

सुधीर,
अभ्यासपूर्ण संतुलित प्र आवडला. लहानपणापासून माझ्या पाहण्यात 'दुप्पट खाशी' लोक जास्त पाहण्यात आले. अगदी मोजकेच एकभुक्त किंवा फलाहारवाले.

अलीकडे काही जण वरई व राजगीरा हीच धान्ये त्या दिवशी खातात; साबुदाणा कटाक्षाने नाही.

बटाटा व रताळे हे कंद असून ते वायू निर्मिती बरीच करतात. त्यामुळे ते निदान पावसाळ्यातील उपवसांना टाळावेत असे वाटते.

उपवासाचे असंख्य फायदे आहेत हे संशोधनाने सिद्ध झालेले आहे. त्यातील काही शोध निबंध खाली देत आहे. छोटेसे पण मनोरंजक असे हे निबंध आहेत. जरूर वाचून पहा.

https://www.johnshopkinshealthreview.com/issues/spring-summer-2016/artic...
https://www.health.harvard.edu/blog/intermittent-fasting-surprising-upda...

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5411330/

कदाचित आपल्या पूर्वजांना हे फायदे माहित असावेत. ( त्याची कारणे माहिती नसली तरीही)

यामुळे हि गोष्ट समाजाच्या गळी उतरवण्यासाठी त्याला धार्मिक रंग दिला गेला असावा. कारण सर्व धर्मात उपवासाचे महत्त्व कसे काय आढळून येते?

हि गोष्ट (धार्मिक रंग) सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे कोणताही पुरावा नाही/ किंवा तेवढा अभ्यास नाही. परंतु हा माझा तर्क आहे.

वैद्यक शास्त्र शिकू लागल्यावर अशा असंख्य गोष्टी माझ्या लक्षात येत गेल्या ( लक्षात येत आहेत) कि त्यामागचा कार्यकारण भाव माहिती नाही पण अनुभवातून आलेले बोल आहेत.
उदाहरण- नुकत्याच बाळंत झालेल्या स्त्रीने सात्विक आहार खावा आणि तिखट मसालेदार गोष्टी टाळाव्या. याचे कारण सर्व तर्हेच्या मसाल्यात सुगंधित तेलं (AROMATIC OILS) असतात. उदा लवंग दालचिनी मिरी इ. हि तेलं आईच्या दुधात उतरतात आणि यामुळे लहान बालकाच्या पोटात मुरडा होतो. ( पोट दुखणे)
याचा अनुभव आम्ही स्वतः मुलीच्या वेळेस घेतला आणि अनेक जवळच्या नातेवाईकांत सुद्धा असेच आढळून आले. याचे कारण अर्थात नंतर अभ्यास केल्यावर लक्षात आले( वर दिले आहे).

शास्त्रात रूढी बलियसी या न्यायाने मूळ मुद्दा राहिला बाजूला आणि कर्मकांड प्राधान्य पावते झाले. यामुळे उपवासाचा मूळ हेतू बाजूला राहिला.

कुमार१'s picture

13 Jul 2019 - 11:07 am | कुमार१

उपयुक्त माहितीबद्दल !

मुक्त विहारि's picture

14 Jul 2019 - 7:25 pm | मुक्त विहारि

ज्या दिवशी बरेच जण शाकाहार करतात नेमक्या त्याच दिवशी नकळत मांसाहार होतो. बहुतेक वेळा सकाळी अंडा भुर्जी बनवली की लक्षात येते की अरेच्चा, आज तर एकादशी....

माझे आणि गणपती चतुर्थीचे पण असेच नाते आहे. चतुर्थीला हमखास कोंबडीचे पदार्थ खाण्यात येतात....

उपवास करणे आमच्या नशिबात नाही.

पण उपवासाचे पदार्थ मात्र अगदी मनापासून खातो. ..

मधुमेह, उच्च-रक्तदाब, स्थूलता, हृदयविकार हे त्यापैकी प्रमुख. आपली बिघडलेली जीवनशैली आणि अरबट चरबट खाणे हे त्यांच्या मुळाशी आहे.

जिभेचे चोचले न पुरवणाऱ्या साधूंनाही हे रोग होतात कारण भारतात ते सुप्त आहेत.
खाण्याशी काही संबंध असताच तर ते त्यांना झाले नसते.((योगा शिकवणारेही यातून सुटत नाहीत किंवा रोग झालेल्यांचा रोग योगाने(निव्वळ) बरा होत नाही.

रोगाचा त्रास रोग्याला आणि फायदा दुसऱ्याला असा एकूण प्रकार चालतो.

कुमार१'s picture

15 Jul 2019 - 8:02 am | कुमार१

मधुमेह, उच्च-रक्तदाब, स्थूलता, हृदयविकार हे त्यापैकी प्रमुख. आपली बिघडलेली जीवनशैली आणि अरबट चरबट खाणे हे त्यांच्या मुळाशी आहे.>>>>

लेखातील हे विधान वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झालेले आहे. ते बहुसंख्य रुग्णांना लागू होते. अल्पसंख्य अपवाद नेहमीच असतात.

मुळात हे आजार multifactorial कारणांनी होतात. त्यात अनुवंशिकतेचा ही वाटा असतो. सुयोग्य आहाराने त्यांच्या प्रतिबंध किंवा नियंत्रणास नक्कीच मदत होते.

सुधीर कांदळकर's picture

15 Jul 2019 - 9:28 am | सुधीर कांदळकर

माहितीत भर पडली.तिघांनाही धन्यवाद.
@ डॉ. म्हात्रे: उपवासाच्या शास्त्रीय व्याख्येबद्दल धन्यवाद. याला मी आव्हान देत नाही, आव्हान देण्याची माझी योग्यता नाही. परंतु प्रचलित उपवास या संकल्पनेत मिताहार देखील अपेक्षित आहे. मिताहार, लंघन, एकभुक्त राहणे, निर्जळी हे उपवासाचेच प्रकार समजले जातात. काही लोक अमुक वारी फक्त अमुक रंगाचे अन्न खातात आणि ते याला उपास म्हणतात. पण फक्त पांढरे वगैरे अन्न खाणे हा मात्र टवाळी करण्याजोगाच प्रकार झाला.

@ डॉ. कुमारः
१. माझ्या मुस्लिम मित्राला मी रोजे करून काय मिळते असे विचारले होते. तो म्हणाला, संयम, सहनशीलता याबरोबरच भूक ही किती गंभीर बाब आहे हे कळते. ज्याची उपासमार होते त्याच्यावरच्या संकटाची तीव्रता समजते आणि त्यामुळे भुकेल्याबद्दलची अनुकंपा आपल्यामध्ये निर्माण होते. म्हणूनच अनेक धार्मिक स्थळी अन्नदान करतात.

२. माझ्या मंत्रालयात बैठे काम करणार्‍या तीर्थरूपांचा मधुमेह निवृत्तीनंतर त्यांच्या वयाच्या साठीनंतर मिताहार आणि काही योगासने यांच्या साहाय्याने पूर्ण बरा झाला.

कुमार१'s picture

15 Jul 2019 - 3:25 pm | कुमार१

तीर्थरूपांचा मधुमेह निवृत्तीनंतर त्यांच्या वयाच्या साठीनंतर मिताहार आणि काही योगासने यांच्या साहाय्याने पूर्ण बरा झाला.

अरे वा ! हे खूप आदर्श आहे. बऱ्याच मधुमेहींना त्यांचा हेवा वाटेल.

सुधीर कांदळकर's picture

15 Jul 2019 - 9:31 am | सुधीर कांदळकर

एखादे दिवशी अति खाणे झाले तर आमचे मित्रमंडळ दुसरे दिवशी मिताहार आणि जास्त व्यायाम करून भरपाई - कॉम्पेन्सेट करते.

कंजूस's picture

15 Jul 2019 - 9:41 am | कंजूस

सतत खाण्याचाच अथवा न खाण्याचाच विचार करत राहिल्यानेही रोग होत असतील.

Sanjay Uwach's picture

15 Jul 2019 - 6:09 pm | Sanjay Uwach

खरं सांगू का ,मला लहान पणा पासून मनाला भेडसावणारा एक मोठा प्रश्न ,म्हणजे अमुक हा पदार्थ उपवासाला चालतो ,तर अमुक एखादा पदार्थ उपवासाला चालत नाही ,हे कोण ठरवते,कुणास ठाऊक ?? . कदाचीत पूर्वीच्या काळी एखादे ऋषी मुनींचे नियूक्त केलेले पॅनेल (अर्थातअखिल भारतीय ....... वगैरे ) असावे ,ते या बाबत संयुक्तीक निर्णय घेत असावेत आणि यांचा सन्मान किंव्हा आठवण म्हणून कांही ठिकाणी "ऋषीचा उपवास " देखील केला जात असावा . आता बघा ना ,कायम एकत्र राहणारे धणेजीरे ,मात्र उपवासाला जिरे चालतात तर धणे नाही . किती हि ताटातूट , कोथींबीर मात्र चालते . आलू मटार मधील आलू म्हणजे बटाटे चालतात तर मटार निषिद्ध मानले जातात . बडीशेप ने मागल्या जन्मी काय पाप केले आहे कुणास ठाऊक ? . मला तर उपवासाच्या दिवशी मिसळ खावी वाटते . किती ही प्रयत्न करून बघितले ,पण त्या दिवशी राजा आणि उंटाच्या गोष्टी प्रमाणे डोळ्या समोरून कट घातलेली मिसळ डोळ्या समोरून जात नाही . तरी हे ठीक म्हणावे लागेल कारण कांही कांही माणसांना राग आला किंव्हा त्यांच्या मना विरुद्ध कांही घडले तर समोर असेल त्या खाद्य पदार्थांचा ते फडशा पाडतात, मग तो उपवासाचा पदार्थ असो कि नसो .

सुबोध खरे's picture

15 Jul 2019 - 7:29 pm | सुबोध खरे

शास्त्रात रूढि: बलियासी-- या नात्याने जसे धर्माच्या मूळ हेतूला लोकांनी हरताळ फासला तसाच सुरुवातीच्या उपवासाच्या मूळ रूपाला हरताळ फासला आहे.
बाकी कोणती गोष्ट खावी आणि खाऊ नये हे कर्मकांड आहे.
उपवास चा शब्दशः अर्थ उप वास म्हणजे परमेश्वराच्या जवळ वास करणे असा आहे.
यात सर्वात प्रिय असे अन्न (आणि निर्जळी उपवास असेल तर पाणी) बाजूला ठेवून (निग्रह करून) प्रार्थना करून चित्त शुद्धी करणे हा आहे.
यावर मुळात विश्वासच नसेल तर उपवास कशाला करायचा?
पण आता उपासाला बिअर चालेल का? किंवा फळापासून केलेली दारू (उदा. काजू किंवा नारळाची फेणी) का चालणार नाही? असे विचारणारे लोक आहेत?
त्यांना मी तुम्ही उपास नाही केला तरी चालेल असेच सांगतो.
जाता जाता-- मोह हि अशी गोष्ट आहे कि जिच्या पासून लांब राहिले तर फायदा होतो आणि लांब राहिले नाही तर अजूनच फायदा होतो- स्वामी भंपकानंद

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jul 2019 - 9:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

उपवासांच्या पदार्थांमधील विरोधाभास मोठा रोचक आहे...

बटाटा, साबूदाणा (cassava/tapioca/sago) आणि मिरची हे पदार्थ बहुतेक उपवासाच्या पदार्थांत असतात. हे मूळात मध्य/दक्षिण अमेरिकेतल्या वनस्पतींपासून मिळणारे पदार्थ, (ज्यांना भारतातील धर्म बुडवण्यात रस होता अश्या) वसाहतवाद्यांनी, इसवीसनाच्या सतरा-अठराव्या शतकात, भारतात आणले. त्याअगोदर भारतियांना त्यांची माहितीही नव्हती !

सुरुवातीच्या काही विरोधानंतर (जो, हे पदार्थ खाल्ले तर धर्म बुडतो, इतपर धारदार होता), आता हे पदार्थ आता भारतिय धार्मिक उपवासाशी अनिवार्यरित्या जोडले गेलेले आहेत... आहे की नाही मज्जा ???!!! =)) =)) =))

कुमार१'s picture

15 Jul 2019 - 9:36 pm | कुमार१

त्यामुळेच अशा उपवासावरील विश्वास केव्हाच उडाला.
असो...

अधाशी's picture

15 Jul 2019 - 9:49 pm | अधाशी

एवढे जड जड विषय वाचून झाल्यावर आता भलतीच भूक लागली आहे. हा मी चाललो चमचमीत बटाटेवडा हाणायला.