ट्वेन्टी इयर्स ऑफ सरफरोश....फिफ्टीन इयर्स ऑफ लक्ष्य वगैरे ट्रेंड सुरु आहेत.
पण ट्वेंटी इयर्स ऑफ 'धांगडधिंगा' विषयी कोणी काहीच कसं बोलत नाहीये !
९९ साली आलेल्या ह्या सिनेमाची जाहिरात 'टायटॅनिकला मराठी उत्तर' अशी करण्यात आली होती.
टायटॅनिकमध्ये शेवटी लाकडी फलटीवर पुरेशी जागा असतानाही जॅकने मरण का स्वीकारले ह्याचे उत्तर हा सिनेमा बघितल्यावर मिळते.
धांगडधिंगा सिनेमाची कथा कोर्टाच्या पार्श्वभूमीवर घडते. टायटॅनिक जहाजातून वाचलेल्या सातशे प्रवाश्यांनी धांगडधिंगा बघितल्यावर, आम्हाला का वाचवले म्हणून जहाजाच्या कॅप्टनवर त्याच कोर्टात केस केली होती म्हणे. एवढंच नाही, टायटॅनिक सिनेमात ती म्हातारी शेवटी गळ्यातला हिऱ्याचा हार समुद्रात फेकते ते आठवतंय का? तर धांगडधिंगा या 'सिनेमॅटिक जेम' समोर गळ्यातल्या हिऱ्याचे काहीच मोल नाही ह्याची पुरती जाणीव तिला झाली होती. म्हणूनच तिने हे पाऊल उचलले.
केट विन्स्लेटने तर किशोरीताई आंबीयेंचा डाएट प्लॅन फॉलो करायला सुरवात केली होती. जेम्स कॅमेरूनच्या केबिनमध्ये 'आमचे श्रद्धास्थान' म्हणून आजही महेश कोठारेंचा फोटो आहे. धांगडधिंगाची पटकथा जेम्सने देवघरात ठेवलीये. अवतार सिनेमा करण्याआधी धांगडधिंगाचाच हॉलीवूडी रिमेक करण्याचा प्रस्ताव घेऊन एक निर्माता जेम्सकडे गेला होता. पण 'क्लासिकस् अँड कल्ट्स कॅन नॉट बी रीमेड. अँड धांगडधिंगा इज अ जेम विच शुड ओन्ली बी व्ह्यूड अँड शुड नॉट बी इव्हन टच्ड' असे म्हणून जेम्सने तो प्रस्ताव धुडकावून लावला.धांगडधिंगा हा माझ्या लायर लायर ह्या सिनेमावरून प्रेरित आहे असा आरोप खुद्द जिम कॅरीने केला होता. जेम्सने त्याचा विरोध करत "जिम कॅरीचे डोके ठिकाणावर आहे का?" असा अग्रलेख लिहिला. अवतारच्या पटकथेत जेम्सने महेश कोठारेंची मदत मागितली होती. पण कोठारे त्यावेळी 'जबरदस्त' या सायन्स फिक्शनच्या कामात बिझी असल्याने ते होऊ शकले नाही.
तरी नशीब धांगडधिंगा सिनेमात महागुरू नव्हते. नाहीतर लियोनार्डो डिकार्पियोने त्यांची दीक्षा घेण्यासाठी भारतात स्थलांतर केले असते. धांगडधिंगात महागुरुंचे नसणे आणि म्हणूनच लियोनार्डोने त्यांना फॉलो न करणे हेच त्याला ऑस्कर मिळण्यासाठी इतकी वर्ष थांबावे लागण्याचे कारण आहे.
इतके अनन्यसाधारण महत्त्व असलेला धांगडधिंगा !
ह्या सिनेमाला अनुल्लेखाने मारल्याबद्दल तमाम सिनेरसिक,विश्लेषक, समीक्षक आणि लेखक ह्यांचा जाहीर निषेध !
चिनार
प्रतिक्रिया
19 Jun 2019 - 3:18 pm | श्वेता२४
खतरनाक लिवलंय.
29 Jun 2019 - 1:15 am | Chandu
उदा.चेकमेट,
19 Jun 2019 - 3:41 pm | गवि
मिठारे , खोटारे वगैरे खास कोठारे ब्रँड ठसठशीत नावे आठवून धमाल आली.
हा चित्रपट कुठेही ऑनलाईन मिळत नाही.
29 Jun 2019 - 8:42 am | मदनबाण
हा चित्रपट कुठेही ऑनलाईन मिळत नाही.
इथे संपूर्ण चित्रपट पहावयास मिळेल :- Dhangad Dhinga
एक निरिक्षण :- त्यावेळी ट्रान्सपरन्ट साड्यांची फॅशन देखील होती... ;)
जाता जाता :- ज्याला पापा तांडेल माहित नाही त्याला मराठी चित्रपटांची खरी मजा कळलीच नाही ! :प
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पहले ताे कभी कभी ग़म था... :- Altaf Raja
29 Jun 2019 - 9:34 am | गवि
धन्यवाद मबाशेठ..
19 Jun 2019 - 4:21 pm | टीपीके
मला आज स्वतःचीच लाज वाटली. मला असा महान चित्रपट माहीत नाही.
19 Jun 2019 - 5:27 pm | समीरसूर
मराठीत त्याकाळी एकजात भिकार, टुकार चित्रपट येत होते. आपल्या चित्रपटांचा आवाकाच साला बालिश...सगळं कसं बालिश, हास्यास्पद, गरीब-गरीब, 'कंटेट'चा मुखवटा मिरवणारं...
लेख झकासच!!! मजा आली वाचतांना...हा चित्रपट आठवतोय.
19 Jun 2019 - 5:47 pm | चौथा कोनाडा
खरंच काही सिनेमा विषयी आपण कोणी काहीच कसं बोलत नाहीये, हे उमजून शरम वाटली !
धांगडधिंगा सारखा कल्ट सिनेमा अनु ल्लेखांनं मारला जातोय ही तमाम मराठी भाषिकांसाठी लाजिरवाणी बाब आहे !
चिनार, दंडवत घ्यावा !
19 Jun 2019 - 11:43 pm | जालिम लोशन
झकास
20 Jun 2019 - 12:33 am | अभ्या..
चिनारा, अजून थोडे जास्त लिव्हला असतास तर तुला पार्टी मिळाली असती.
असो, लिहिशीलच.
20 Jun 2019 - 8:40 am | लई भारी
खुसखुशीत, आवडलं :)
पंचेस जबरदस्त आहेत!
20 Jun 2019 - 9:19 am | सुहासवन
झी५ वर उपलब्ध आहे...
20 Jun 2019 - 10:33 am | भंकस बाबा
चिनार भाऊ एकदम भारी !
त्या काळातले मराठी चित्रपट आठवले की धडकी भरते.
लक्ष्या, अशोक सराफ आणि महागुरु असा काही आचरटपणा करायचे की झक मारली आणि शिनेमाला आलो असे वाटता
20 Jun 2019 - 10:40 am | गवि
एकेकाळी मराठी चित्रपटांची नावं अशी होती:
चल गम्मत करू..
टोपीवर टोपी..
धमाल बाबल्या गणप्याची
थरथराट..
धडाकेबाज..
कमाल माझ्या बायकोची..
हळद रुसली कुंकू हसलं..
खट्याळ सासू नाठाळ सून ..
गंमत जंमत ..
दे दणादण..
हमाल दे धमाल..
गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं
ठकास महाठक
घनचक्कर
एका धाग्याची जाहिरात:
https://www.misalpav.com/node/15483
निशाणा..तुला दिसला ना..?
20 Jun 2019 - 2:03 pm | समीरसूर
माहेरची साडी, हिरवा चुडा सुवासिनीचा, ताईच्या बांगड्या, सासरचे धोतर, पळवा पळवी, आली अंगावर, बोट लावीन तिथे गुदगुल्या, गोंद्या मारतंय तंगडं, कमिंग सून, येडा की खुळा, चिकट नवरा, लावू का लाथ?, बायको शेर, नवरा पावशेर, दोघात तिसरा, आता सगळं विसरा....नावावरूनच चित्रपट किती भिकार असतील याची कल्पना येते. मराठी चित्रपटात कल्पकतेची प्रचंड वानवा आहे. सगळं कसं उथळ, कामचलाऊ...केविलवाणं!
20 Jun 2019 - 2:43 pm | गवि
बायको चुकली स्टँडवर
हे राहिलं.
बाय द वे
असं वर्तमानकाळात बोलू नका बुवा.. आताचा सरासरी मराठी सिनेमा अतिशय उत्तम असतो.
20 Jun 2019 - 3:19 pm | समीरसूर
खूप कमी उत्तम असतात. बाकी सगळे यथातथाच असतात. अगदी कट्यार काळजात घुसली, सैराट, घाणेकर, मुळशी पॅटर्न वगैरे अपवाद सोडल्यास तसा बर्यापैकी आनंदच आहे. तांत्रिक सफाई आली आहे, अभिनय बर्यापैकी सुसह्य झाला आहे, संगीत-नृत्य पूर्वीपेक्षा बरे आहे, चकचकीतपणा आला आहे पण चित्रपट मनावर घट्ट पकड नाही घेऊ शकत अजूनही. मी मागे 'होम स्वीट होम', 'सविता दामोदर परांजपे' वगैरे चित्रपट पाहिले. आवर्जून टॉकीजला जाऊन पहावेत असे हे चित्रपट नव्हतेच. दर आठवड्याला रतीब असतो आजकाल मराठी चित्रपटांचा. कुठे आहेत नशीबवान, पाटील, विराट, वाघेर्या, मस्का, उंडगा, झिपर्या, माझ्या बायकोचा प्रियकर, माझा अगडबम, तुला कळणार नाही, बंध नायलॉनचे, कंडिशन्स अप्प्लाय...? हे सगळे अलिकडचे चित्रपट आहेत. एका आठवड्यात टॉकीजच्या बाहेर...अशा चित्रपटांची संख्या खूप जास्त आहे.
20 Jun 2019 - 4:22 pm | चिनार
अलीकडल्या काळातला सर्वात ओव्हररेटेड चित्रपट.... दुनियादारी..
नुसता चकचकीत..
सिनेमाची रीळ चार दिवस सर्फ एक्ससेल मध्ये भिजवून काढल्यासारखा..
कन्टेन्ट शून्य..
20 Jun 2019 - 5:06 pm | समीरसूर
दुनियादारी बघून मी अक्षरशः कंटाळून गेलो होतो...
20 Jun 2019 - 4:33 pm | मराठी कथालेखक
झी टॉकिज आणि फक्त मराठी हे दोन्ही चॅनेल्स तेच तेच चित्रपट लावत राहतात .. वेगळं काही पोहोचंतच नाही रसिकांपर्यंत .. नेटवरही लवकर मिळत नाहीत
त्यामुळे मराठी चित्रपटाची जी प्रतिमा रसिकांच्या मनात निर्माण झाली आहे त्याला हे चॅनेलवाले पण जबाबदार आहेत असं मी म्हणेन कारण अखेर प्रेक्षक काही प्रत्येक चित्रपट थिएटरला जावून बघत नाही. तसेच चित्रपटाचे हक्क ज्यांच्याकडे आहेत त्यांनी युट्यूबवरही ते चित्रपट अपलोड करायला हवेत .. यामुळे जरी त्यांना पैसे मिळणार नाही (युट्युबवरही एखादा व्हिडिओ सशुल्क ठेवता येतो.. पण हा पर्याय मराठी चित्रपटांसाठी सध्या योग्य नाही) पण त्या चित्रपटाची , कलाकाराची एकूणच मराठी चित्रपटांची लोकप्रियता वाढायला मदत होईल .. मार्केट मोठं होवू शकेल .. पण निर्माते हा सगळा विचार करताना दिसत नाहीत.. या निर्मात्यांचं अर्थिक गणित कसं जुळून येतं याबद्दल मला उत्सुकता आहे... असो.
20 Jun 2019 - 5:12 pm | समीरसूर
मुळशी पॅटर्न चांगला होता हो. जबरदस्त होता. टॉकीजला बघायला पाहिजे होता. टीव्हीवर मजा नाही येत.
स दा प - ओके होता. काही खास नाही.
हम्पी नाही पाहिला. बघण्याची इच्छाच झाली नाही. पिक्चर मात्र सडकून आपटला. तसाच अजिंठा होता. पडला.
लपाछपी मी टॉकीजला पाहिला होता. मस्तच होता. झकास बनवला होता. एकदम हट के...
मांजा नाही पाहिला.
वायझेड बरा होता.
फर्जंद - पोस्टर बघूनच बघण्याचा कंटाळा आला. ऐतिहासिक आणि त्या टाईपचे पिक्चर लई म्हणजे लईच बोरिंग वाटतात. सगळ्या डेव्हिड धवन छाप स्टोर्या असतात. दहामध्ये एखादी पुसट खरी असते.
आपला मानूस - चांगला होता पण शेवट लईच पांचट होता. त्यामुळे सगळ्या पिक्चरचा मजा किरकिरा झाला. खूप अपेक्षेने हा चित्रपट बघायला दुसर्याच दिवशी गेलो होतो.
मागे मी दामलेंचा 'भो भो' पाहिला होत. युट्युबवर आहे. बरा सस्पेन्स होता. एकदा बघायला हरकत नाही.
20 Jun 2019 - 5:23 pm | जॉनविक्क
इतक्यात आपणच तो दिला, तुनळी वर मिळाला होता बघायला. छान सस्पेन्स कॉमेडी आहे पण परत तेच... नाटक चालू असल्याप्रमाणे सर्व भर बॉडी language वर पण मूळ कथानक आणि अर्थातच प्रशांत सर मस्तच. 1 time watch तो बनता है
20 Jun 2019 - 2:53 pm | लई भारी
तुमचा जुना धागा आणि प्रतिसाद वाचून वारलोय मी :D
20 Jun 2019 - 3:43 pm | समीरसूर
https://www.misalpav.com/node/15483
बाय द वे, बाकी गविसाहेबांच्या या धाग्यावर प्रतिसाद देणारे बहुतेक मिपाकर्स मिपावरून गायब झालेले आहेत...अगदीच २-३ जण असतील शिल्लक...
21 Jun 2019 - 5:52 pm | योगी९००
त्या धाग्यावरील प्रतिसाद देणार्यांपैकी मी आहे हो... समीरसूर तुमचीही प्रतिक्रिया मस्त होती..
बाकी धागडधिंगा कसा काय मिस केला कोणास ठावूक. यु ट्युब वर आहे का ते बघतो...
25 Jun 2019 - 4:42 pm | नंदन
आहे मीपण!
(हे 'शेवंता जित्ती हाय!'च्या चालीवर वाचावे!)
25 Jun 2019 - 6:11 pm | अभ्या..
ह्या सगळ्या गोंधळात एक गरीबी हटाव पिक्चर पण आलेला. धुमाकूळ. पूर्ण पिक्चर जसाचा तसा धडाकेबाजचा प्लॉट.
महेश कोठारे आणि लक्षाला रिप्लेस म्हनून प्रशांत दामले आणि विजय चव्हाण चक्क. हिरवीणी अलकामावशी आणि किशोरी शाणे वीज. व्हिलनगिरीसाठी अगेन राहुल सोलापूरकर. लालगेंडा (त्याकाळी आसामी का कोणी लालडेंगा नामक राजकीय नेता चर्चेत होता म्हणे) हे नाव धारण केलेला सोलापूरकर अचाट लाल रंगाच्या पोशाखात. बाकी सगळे सेम. हिरोंना २ तासात ३ फूटावरुन पिस्तुलाने मडकी उडवायचे ट्रेनिंग दिले की ते कमांडोच झाले अशा आवेशात उभे राहतात हा पार्ट सगळ्यात हास्यास्पद. व्हिलनाच्या कैदेत जेवण दिल्यावर आपले दामले बुवा हात जोडून वदनी कवळ घेता म्हनतात. बाकी बँका लुटणे, व्हिलनचा अड्डा, व्हिलनचे साथीदार, हिरोंचा बावळटपणा, त्यांच्या हिरवीणीचे अद्वितीय फॅशनसेन्स असलेले ड्रेस, त्यांची मिळून गाणी आणि नाच, भोळे का बावळट हे समजू नये असे नातेवाईक आणि साईड कॅरेक्टर आदी टीपिकल मराठी चित्रपटांचा कर्मदरीद्री, जन्मदरिद्री आणि अष्टदरिद्रीपणा दाखवणारे लक्षणे प्रत्येक फ्रेममध्ये सापडतील.
29 Jun 2019 - 8:09 am | तुषार काळभोर
प्रशांत दामले , विजय चव्हाण, अलका कुबल (चक्क फ्रॉक सदृश्य ड्रेस), राहुल सोलापूरकर .
विजय चव्हाण नेहमीप्रमाणे एक अधिक स्त्री भूमिकेत.
कुठल्यातरी संस्थानाचा राजकुमार सापडत नसतो. मग प्रशांत दामले येतो.
तिकडे राहुल सोलापूरकर मी होणार राजा/युवराज/प्रिन्स, हो हो, मीच होणार राजा/युवराज/प्रिन्स असं पालुपद येताजाता म्हणत असतो.
असा पण एक पिच्चर आहे.
29 Jun 2019 - 9:28 am | गवि
अगदी अगदी.
मला राजा व्हायचंय, हो मलाच व्हायचंय राजा..!!
या लाईनमध्ये लेखकाला असा काय पंच दिसला हे गूढच आहे. सिनेमाभर हेच वाक्य रिपीट मोडवर.
याच सिनेमात एका क्षणी मात्र तेव्हा भरपूर हसलो होतो. एका फाईट सिक्वेन्समध्ये कोणी गुंड हा प्रशांत दामलेला हाणताना त्याचा हात मागून पकडून पिरगाळतो. त्या क्षणी परफेक्ट टायमिंग साधून जणू टाईम प्लीज घालावी तसा प्रशांत दामले दुसऱ्या हाताच्या तर्जनीने आपल्याच दुसऱ्या पिळल्या जात असलेल्या हाताच्या ठराविक भागाला पिनपॉईंट करत त्याला म्हणतो "ए ए, थांब, इथे दुखतंय"..
29 Jun 2019 - 12:12 pm | लंबूटांग
ह्या धाग्यावरून youtube वर गेलो आणि related videos बघता बघता हे एक महान रत्न सापडले.
29 Jun 2019 - 11:01 pm | चौथा कोनाडा
हा ...हा हा ... लै भारी संदर्भ, लंबूटांग साहेब !
व्यायामाचे मोजके बेसिक प्रकार पाहून खो खो हसायला आलं !
दिलीप प्रभावळकर (ओम फट्ट स्वाहा ) अन कुबल तै !
या असल्या स्टेप्स बहुधा जस्ट शूटिंग करायच्या आधी कॅमेरामनने करायला सांगितल्या असणार ! कश्याला पाहिजे नृत्य दिग्दर्शक ?
सगळीच इकॉनॉमी ! सॉलिड कॉस्ट इफ्फेक्टिव्ह !
20 Jun 2019 - 1:16 pm | भंकस बाबा
चिनार भाऊ एकदम भारी !
त्या काळातले मराठी चित्रपट आठवले की धडकी भरते.
लक्ष्या, अशोक सराफ आणि महागुरु असा काही आचरटपणा करायचे की झक मारली आणि शिनेमाला आलो असे वाटता
20 Jun 2019 - 8:30 pm | गवि
देऊळ, रेगे, tcgn हे काही आवडलेले
पूर्वीच्यात लपंडाव, वजीर, सरकारनामा इत्यादि.
25 Jun 2019 - 2:24 pm | गीतांजली टिळक
एक डाव भुताचा , कळत नकळत पण ठीक आहेत
25 Jun 2019 - 10:46 pm | राघव
नारबाची वाडी, प्रेमाची गोष्ट, हरिश्चंद्राची फॅक्टरी, तार्यांचे बेट, संदूक.. हे काही नवीन आणि आवडलेले.
20 Jun 2019 - 10:46 pm | मित्रहो
आमच्या सारख्या फॅनच्या भावना दुखावल्या. ते डॅम इट, ते वेड्यासारख महेश महेश असे ओरडणै, हिरो हिरोईनने ए मिस्टर करीत भांडणे आणि मग प्रेमात पडणे. काय नव्हत. मिपाचा विभाग तयार होईल.
20 Jun 2019 - 10:55 pm | जॉनविक्क
सहमत आहे. अशीही बनवाबनवी तर आजही बघून रिफ्रेश होतो
21 Jun 2019 - 10:22 am | मित्रहो
आवडतो. त्यात महागुरू होते कोठारे नव्हते
21 Jun 2019 - 10:33 am | गवि
कोठारे आणि पिळगावकर असे दोन समांतर पण वेगवेगळी वैशिष्ट्ये असलेले सिनेप्रकार एक दशकभर जवळपास मोनोपली स्वरूपात चालू होते.
कोठारे ब्रँड जास्त ठसठशीत (चित्रपट आणि पात्रांच्या नावांपासून ते कथा आणि ट्रीटमेंटपर्यंत). शाब्दिक विनोद, कोट्या वगैरेपेक्षा शारीरिक विनोद महत्त्वाचा मानणारा. खेड्यात आणि शहरात दोन्हीकडे अपील शोधण्याचा प्रयत्न.
पिळगावकर ब्रँड थोडा (किंचित) अपमार्केट, शहरी पब्लिकला जास्त अपील होणारा. हलकाफुलका, किंचित जास्त वास्तविक वाटू शकेल असा. शाब्दिक विनोदाला किंचित तरी जागा देणारा.
मुख्यतः विनोदीच. तेव्हा तीच गरज होती कदाचित.
आता ते कालसुसंगत राहिले नसतील किंवा बोगस वाटत असतील पण तेव्हा घट्ट विळखा पडलेल्या तमाशा, ऐतिहासिक आणि ग्रामीण (नाटकी कृत्रिम संवाद, स्टेजचा प्रभाव, जुने कॅमेरा आणि एडिटिंग तंत्र) या प्रकारातून जरा वेगळं वळण देण्याचं काम त्यांनी नक्की केलं. काही सिनेमे पाहून तेव्हा हसू यायचं हे मान्य केलं पाहिजे.
21 Jun 2019 - 12:27 pm | चिनार
ह्या दोघांचेही सिनेमे मनोरंजक होते ह्यात वादच नाही. इतर कोणी नसताना ह्यांनी इंडस्ट्री टिकवली हे ही तितकेच खरे.. पण धांगडधिंगा..आयडियाची कल्पना वगैरे अतिशयच पुचाट आणि पांचट होते. हे सिनेमे त्यांच्याच लेगसीला शोभणारे नवहते. कोठारे आणि सचिन ह्यांचे शेवटचे चांगले सिनेमे म्हणजे अनुक्रमे झपाटलेला आणि नवरा माझा नवसाचा (ह्याला काठावर पास करता येईल). ह्या दोघांच्या जुन्या काळातील सिनेमाचा मी आजही चाहता आहे.
21 Jun 2019 - 12:59 pm | गवि
धांगडधिंगा आणि आयडियाची कल्पना या दोन्हीबाबत अतीव सहमत. लायर लायर आधी पाहिलेला असल्याने धांगडधिंगा अगदीच सुमार वाटला (लायर लायर अत्यंत दर्जेदार आहे असं म्हणणं नाही).. मला तर "खबरदार" देखील अपेक्षाभंग करणारा वाटला. तो कोणाचा आहे आठवत नाही. पछाडलेला या चित्रपटाविषयी हेच मत (लक्ष्याचा शेवटचा चित्रपट?)
आयडियाची कल्पना पूर्ण बघणं अशक्य झालं. असह्य प्रकार आहे.
असंच म्हणायचं झालं तर अशोक सराफचा तुलनेत हल्लीचा "एक डाव धोबीपछाड" हा खूप मजेदार वाटला. तो सतीश राजवाडेंचा आहे.
पण अशोक सराफ या नावामुळे पकडा पकडी हा चित्रपट पाहण्याचा प्रयत्न केला असता साफ अयशस्वी झालो. अगदीच बोगस.
21 Jun 2019 - 1:56 pm | चिनार
२००२-०३ च्या दरम्यान मराठी इंडस्ट्री अगदीच मरायला टेकली होती. त्यावेळी श्वास सिनेमा रिलिज झाला. श्वास खरोखरच उत्तम सिनेमा होता. श्वास च्या रिलीज साठी बहुतेक डिस्ट्रिब्युटर मिळत नव्हते. त्यावेळी गावागावात जाऊन तिथल्या सांस्कृतिक संस्थांच्या मदतीने सिनेमाचे शो दाखवल्या जात होते. अमरावतीतल्या सुरभी संस्थेमार्फत हा सिनेमा मी बघितला होते. अप्रतिम सिनेमा..
आणि या सिनेमामुळे मराठीला सिनेमाला संजीवनी मिळाली.
पण खेद ह्याचा वाटतो की पुढचे २-३ वर्ष केवळ श्वास च्या भरवश्यावर कितीतरी टुकार मराठी सिनेमे चालले. सातच्या आत घरात सारखा ओव्हर रेटेड सिनेमा त्यातलाच एक.
मराठीत खूप चांगले लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आहेत. पण मराठी सिनेमाविषयीच माझं एक निरीक्षण सांगतो.
मराठी सिनेमाचा विषय खूप छान असतो. पण बहुतांश सिनेमात फक्त विषयच छान असतो. विचायच्या मांडणीत सिनेमा पूर्ण फसतो.
21 Jun 2019 - 4:13 pm | मराठी कथालेखक
श्वासमुळे मराठी सिनेमा बदलला .. एक नवे पर्व सुरु झाले ह्याबद्दल अत्यंत सहमत..
24 Jun 2019 - 1:30 pm | चौथा कोनाडा
सातच्या आत घरात : ओव्हर रेटेड ???
निषेध, जाहीर निषेध !
21 Jun 2019 - 6:45 pm | जॉनविक्क
ओव्हर रेटेड ? पुण्यात घडलेल्या एका सत्य घटनेच्या पार्श्वभूमीवर ज्याची कथा बेतली होती, माझ्या जनरेशन मधे पहिल्यांदाच बलात्कार हा विषय इतक्या सक्षमपणे हाताळलेला तो बहुदा पहिलाच चित्रपट असावा विशेषत: पिडीत स्त्री चे खंबीर चित्रण असलेला माझ्या आयुष्यातील तो पहिला चित्रपट.
असो
21 Jun 2019 - 4:12 pm | मराठी कथालेखक
काही चांगले मराठी चित्रपट
गजेंद्र अहिरेंचे काही चित्रपट चांगले आहेत त्यात
तर
नीळकंठ मास्तर सारखे काही अगदी गंडलेले .. पण गाणी सगळी अप्रतिम
इतर चित्रपटात
गजर (काहीसा वैचारिक --फारसा मनोरंजक नसला तरी चांगला)
मातीच्या चुली
मंगलाष्टक वन्समोअर
21 Jun 2019 - 4:40 pm | Namokar
भारी लिहिलय..
21 Jun 2019 - 7:34 pm | धर्मराजमुटके
चालायचचं ! अहो, चित्रपटात फुलाला फुल लागून मुलं व्हायचा तो काळ होता. सत्ययुगात शिनेमे सात्विक होते. आता कलीयुगात शिनेमात काय काय बघावं लागतयं !
26 Jun 2019 - 8:57 am | भुमन्यु
अप्रतिम लिहिलंय. पण खेदाने नमुद करावे लागेल की धांगडधिंगा सारखी अजरामर कलाक्रुती मिसली आहे.
28 Jun 2019 - 8:55 pm | सदानंद पाटील
दोनेक वर्षांपूर्वी "चि.व चि.सौ.कां."येऊन गेला. जाम आवडला.पुन्हा बघायला आवडेल.
28 Jun 2019 - 10:57 pm | शाम भागवत
एकापेक्षा एक आणि नवरी मिळे नवऱ्याला कसे आहेत?
29 Jun 2019 - 12:52 pm | जॉनविक्क
तुमची आमची पुन्हा भेट आठवतंय का कोणाला :D