लाल परी

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
3 Jun 2019 - 11:21 pm

दादरच्या रस्त्यावरून संध्याकाळनंतर मुंबईबाहेर जाणाऱ्या एसटीच्या लालपरी रातराण्या पाहिल्या की मला आजही, इतक्या वर्षांनंतरही गावाकडची आठवण येते, आणि मी उत्सुकतेने गाडीचा बोर्ड पाहू लागतो. कधीकधी तो वाचता येत नाही. मग गाडीच्या मागे नंबरखालची अक्षरे शोधतो, आणि देवरूख डेपोची गाडी दिसली की मनानेच गावाकडच्या आठवणींचा, भूतकाळाचा प्रवास सुरू होतो...
... आजही तसेच झाले. देवरूख डेपोची ‘मुंबई-देवळे मार्गे -पाली’ गाडी दिसली, आणि आठवणींचे सारे झरे जिवंत झाले.
या गाडीने मी पूर्वी मुंबईहून देवरूखला, देवरूखहून साखरप्याला, पालीहून देवळ्याला, अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर असंख्य वेळा प्रवास केला आहे. या गाडीचा जिव्हाळा वाटण्याचे ते एक कारण आहेच, पण माझ्या दृष्टीने या गाडीचे एका अविस्मरणीय इतिहासाशी नाते आहे. माझ्या आठवणींत ते नाते आजही ताजे आहेच, पण एका हरवलेल्या काळाची ती हळवी आठवणही आहे!
... आज ही गाडी दिसली, आणि मला खूप जुना, बहुधा १९६५-७० च्या काळातला तो प्रसग आठवला. मी तो पाहिलेला नाही. पण तो जसा ऐकला, तसाच्या तसा घडलेला असणार याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही.
**
मुंबई सेंट्रलवर या गाडीची वाट पाहात एक गृहस्थ उभे होते. खाकी शर्ट, खाकी हाफ पॅन्ट, किंचित वाढलेले दाढीचे खुंट डोक्यावरचे तुरळक बारीक केस आणि पाच फुटांहून कमी उंचीचे हे गृहस्थ फलाटावर बाकड्यावर बसले होते. गळ्यातल्या पट्ट्याच्या पिशवीत भरलेले कपडे एवढेच सोबतचे सामान!... गाड्या फलाटावर लागत होत्या आणि प्रवाशांची धावाधाव सुरू होती. हे गृहस्थ शांतपणे ते सारे मनात जणू टिपून घेण्यासाठी निरीक्षण करत बसले होते.
... अचानक कुणीतरी खुणेनंच त्यांना बोलावलं. एक उंची कपड्यातला, बूट घातलेला माणूस आपली बायको व मुलांसोबत उभा होता. बाजूला एक मोठी बॅग होती. त्या माणसाने खुणेनेच या गृहस्थास बोलावले, आणि हे शांतपणे उठून खांद्यावरची आपली पिशवी सावरत त्याच्यासमोर उभे राहिले.
‘ही बॅग गाडीवर टाक!’... त्याने हुकमी आवाजात या गृहस्थास फर्मावले.
क्षणभर नजर चमकली. चेहऱ्यावर एक मिश्किल हास्यरेषाही उमटली, आणि काहीच न बोलता या गृहस्थांनी वाकून ती बोजड बॅग डोक्यावर घेतली व बघता बघता बसगाडीची शिडी चढून बॅग गाडीच्या टपावर ठेवून ते खाली उतरले...
खांद्यावरच्या चतकोर रुमालाने चेहरा पुसत त्यांनी त्या पॅन्टबूटवाल्याकडे पाहिले. पुन्हा डोळ्यात तीच चमक, अन् चेहऱ्यावर तेच मिश्किल हास्य...
त्या पॅन्टबूटवाल्याने खिशात हात घातला, अन् रुपयाची नोट या गृहस्थासमोर धरली.
हमाली म्हणून!
हे गृहस्थ मंद हसले...
त्यांनी मानेनेच रुपया घेण्यास नकार दिला, आणि म्हणाले, ‘सुदैवाने मी आमदार असल्याने पुरेसे मानधन मला मिळते. मी तर तुम्हाला केवळ मदत केली आहे!’
पॅन्टबूटवाल्याचा खजिल चेहरा न पाहाताच ते बाजूला फलाटावर लागलेल्या मुंबई देवळे मार्गे पाली गाडीत चढले!
**
त्यांचे नाव होते, आमदार शशिशेखर काशिनाथ आठल्ये. तेव्हाच्या लांजा मतदार संघात त्यांना लहानथोर माणसे ‘आठल्ये गुरुजी’ म्हणूनच ओळखत. समाजवादी विचारांचे आठल्ये गुरुजी १९५७, ६२, व ६७ अशा तीन टर्ममध्ये आमदार होते. पण आयुष्याच्या अखेरीस, सन २०११ मध्ये, वयाच्या ९९ व्या वर्षी, अखेरचा श्वास घेतला तेव्हा उपचाराचे पैसे देण्यासाठी त्यांच्या कुटुंबास जमवाजमवच करावी लागली होती!!
... म्हणून या गाडीचे एका इतिहासाशी नाते आहे, असे मी मानतो!!

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

4 Jun 2019 - 12:09 am | जालिम लोशन

+1

रीडर's picture

4 Jun 2019 - 12:24 am | रीडर

छान लेख

रीडर's picture

4 Jun 2019 - 12:24 am | रीडर

छान लेख

ग्रेट माणूस ... छान लिहिलं आहे .

मनो's picture

4 Jun 2019 - 5:24 am | मनो

नुकतंच निवडून आलेल्या खासदारांची यादी पाहीली- महाराष्ट्रातले सर्व ४८ कोट्याधीश आहेत ...

https://adrindia.org/download/file/fid/6791

सुबोध खरे's picture

4 Jun 2019 - 11:22 am | सुबोध खरे

"कोट्याधीश" ची आज किंमत काहीही नाही. मुंबईत बांद्र्याला झोपड्पट्टी पुनर्विकास योजनेत फुकट बांधलेल्या झोपडीबद्दल मिळालेल्या ३५० चौ फूट घराची किंमत एक कोटी ५ लाख रुपये आहे.
मी २००४ साली १८ लाखाला घेतलेल्या ५६० चौ फुटाच्या घराची किंमत दीड कोटी आहे.

ज्योति अळवणी's picture

4 Jun 2019 - 7:46 am | ज्योति अळवणी

अप्रतिम.

ज्योति अळवणी's picture

4 Jun 2019 - 7:46 am | ज्योति अळवणी

अप्रतिम.

श्वेता२४'s picture

4 Jun 2019 - 11:19 am | श्वेता२४

अशा खऱ्या लोकसेवकाला

सुबोध खरे's picture

4 Jun 2019 - 11:26 am | सुबोध खरे

१९५७, ६२, व ६७ अशा तीन टर्ममध्ये आमदार होते.

एक टर्म आमदार असलेल्याना सुद्धा उदरर्निर्वाहास पुरेल एवढे निवृत्तीवेतन आहे आणि वैद्यकीय उपचाराची संपूर्ण फुकट सुविधा आहे

त्यामुळे

पण आयुष्याच्या अखेरीस, सन २०११ मध्ये, वयाच्या ९९ व्या वर्षी, अखेरचा श्वास घेतला तेव्हा उपचाराचे पैसे देण्यासाठी त्यांच्या कुटुंबास जमवाजमवच करावी लागली होती!!

हे वाक्य लेखात अप्रस्तुत आहे.

आणि कदाचित या सुंदर लेखाला गालबोट लावणारे आहे.

दिनेश५७'s picture

4 Jun 2019 - 9:12 pm | दिनेश५७

यांच्या अखेरच्या काळात माझा त्यांच्याशी संपर्क नव्हता. पण आमदारकीच्या काळात त्यांनी गोरगरीब मतदारांसाठी आपले खिसे खुले ठेवले होते हे मला माहीत आहे.
त्यांच्या निधनाच्या बातमीतही या संदर्भाचा निसटता उल्लेख आहे.
https://www.dnaindia.com/mumbai/report-athalye-guruji-from-pune-passes-a...

दिनेश५७'s picture

4 Jun 2019 - 9:12 pm | दिनेश५७

यांच्या अखेरच्या काळात माझा त्यांच्याशी संपर्क नव्हता. पण आमदारकीच्या काळात त्यांनी गोरगरीब मतदारांसाठी आपले खिसे खुले ठेवले होते हे मला माहीत आहे.
त्यांच्या निधनाच्या बातमीतही या संदर्भाचा निसटता उल्लेख आहे.
https://www.dnaindia.com/mumbai/report-athalye-guruji-from-pune-passes-a...

सुबोध खरे's picture

4 Jun 2019 - 11:27 am | सुबोध खरे

The ex-legislators currently get a pension of Rs 50,000 and additional Rs 10,000 a month as per the terms he/she served as an MLA or MLC

https://www.hindustantimes.com/mumbai-news/ex-legislators-in-maharashtra...

लई भारी's picture

4 Jun 2019 - 2:18 pm | लई भारी

आज अशा व्यक्तिमत्वाची कल्पना पण करू शकत नाही.

विजुभाऊ's picture

28 Jan 2022 - 7:00 pm | विजुभाऊ

या लेखाची चोरी http://misalpav.com/node/49835 या इथे केले गेली आहे.
नोम्द घ्यावी