सोबत आणि सोबतीचे परिणाम
अनादी काळापासून मनुष्य प्राणी हा कायम समुहात राहातो. एकटेपणा त्याला आवडत नाही; हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणूनच कदाचित् आपण नाती निर्माण केली. सर्वात अगोदर मैत्रीच नातं निर्माण झालं असावं अस मला वाटतं. मग हळूहळू गरजेनुसार पती-पत्नी आणि मग या नात्याच्या अनुषंगाने येणारी इतर नाती निर्माण झाली असावीत. कालांतराने एकटेपणा आवडत नसल्याने आपण ही नाती निर्माण केली आहेत हे मनुष्यप्राणी विसरला. त्यामुळे ही नाती म्हणजेच आयुष्य झालं आपलं. त्यामुळे आयुष्य जगण्याला एक वेगळाच अर्थ आला हे नक्की. एका अर्थी नाती जपणं आणि या नात्यांमधला ओलावा वृद्धिंगत कारण हा आपल्या आयुष्याचा स्थायीभाव झाला.
मात्र आयुष्याचा स्थायीभाव आणि मनुष्य स्वभाव या दोन वेगळ्या गोष्टी आहेत; हे आपण लक्षातच घेत नाही. आपण म्हणतो आपल्याला नात्यांची म्हणजेच पर्यायाने माणसांची सोबत असते. पण खर सांगायचं तर आपण आयुष्यभर एक वेगळीच सोबत जपत असतो; आणि या सोबतीचा परिणाम आपल्या नाते जपण्यावर होतो.
ही सोबत म्हणजे... क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या भावना! आपण या भावनांपैकी ज्या भावनेची ज्यावेळी सोबत घेतो; त्यावरून आपण त्यावेळी एखादं नातं कसं जपू ते ठरतं. म्हणजे आपण रागावलेले असलो की कधी कधी एखाद्या शुल्लक गोष्टीसाठी देखील आपण एखादं नातं संपवून टाकतो. एखादा विषय चर्चा करून सोडवता येत असेल तरी आपण समोरच्या व्यक्तीने काहीही म्हणायच्या अगोदरच आपला राग दाखवून मोकळे होतो. त्यामुळे सहज चर्चा होऊन जो विषय संपू शकतो तो कधीच संपत नाही; किंबहुना एखादं नातं संपतं आणि त्याचा सल आपण आयुष्यभर जपतो. म्हणजे तुटलेलं नातं कायम आपल्या मानत असतं; पण तरीही ते परत जुळावं यासाठी आपण कधीच प्रयत्न करत नाही. हा सल आपण जपायला तयार असतो पण आपला अहम् सोडायला तयार नसतो... हे किती दुर्दैवी!
कदाचित आपल्याला पुढील कथा माहीत देखील असेल; पण माझा मुद्दा सांगताना ही कथा सांगणं अत्यंत योग्य आहे अस मला वाटतं. एक वृद्ध आणि एक तरुण सन्यासी एकदा हिमालयाच्या पायथ्याशी तपश्चर्येसाठी असणाऱ्या आश्रमाच्या दिशेने प्रवास करत असतात. ते एका नदीकिनारी येतात. ती नदी दुथडी भरून वाहात असते आणि काठावर एक अत्यंत देखणी, कमनीय बांध्याची तरुणी उभी असते. ते दोघे सन्यासी नदी पार करण्यासाठी पाण्यात पाय ठेवतात. त्यावेळी ती तरुणी त्यांच्याजवळ येऊन पाण्याची भीती वाटत असल्याने पलीकडच्या किनाऱ्यापर्यन्त त्यांच्या सोबत जाण्याची इच्छा व्यक्त करते. वृद्ध सन्यासी काही बोलण्याच्या अगोदरच तरुण सन्यासी तिला होकार देतो आणि त्या तिघांचा प्रवास सुरू होतो. थोड्या वेळाने प्रवाहाची धार वाढते आणि ती तरुणी नकळत तरुण सन्याशाचा हात धरते. वृद्ध संन्याशाला ते पटत नाही. परंतु तो काहीच बोलत नाही. काही वेळाने प्रवाहाची धार खूपच वाढते. ती तरुणी घाबरून जाते. तरुण सन्यासी तिला धीर देतो आणि तिला उचलून घेऊन पलीकडचा किनारा गाठतो. किनाऱ्यावर पोहोचताच तो तिला खाली ठेवतो. ती त्याचे आभार मानते आणि निघून जाते. वृद्ध सन्यासी हे सर्व पाहात असतो; त्याला तरुण सन्याशाचे वागणे पटलेले नसते मात्र तो काही बोलत नाही. ते दोघेही त्यांचा पुढील प्रवास सुरू करतात. ते हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचतात. तेथील आश्रमात दोघेही पोहोचतात. 'इथे येताना तुमच्या मनात संन्यस्त जीवन आणि पंचत्वात विलीन ही भावना असावी;' असे त्यांचे गुरू त्यांना सांगतात. त्यावेळी तो वृद्ध सन्यासी तरुण संन्याशाला बाजूला घेऊन म्हणतो;"तू संन्यस्त जीवन जगण्याच्या भावनेने इथे आलेला नाहीस." तरुण संन्याशाला खूप आश्चर्य वाटते आणि तो विचारतो;"तुम्हाला असे का वाटते?" त्यावेळी वृद्ध सन्यासी म्हणतो;"आपण ज्यावेळी दुथडी भरलेली नदी पार करत होतो त्यावेळी तू एका अत्यंत सुंदर आणि कमनीय तरुणीला उचलून घेतले होतेस. तू तिला स्पर्श केलास याचा अर्थ तुझ्या मनात संन्यस्त जीवन जगण्याची भावना नाही." हे ऐकून तरुण सन्यासी हसतो आणि म्हणतो;"आपण वयाने माझ्याहून जेष्ठ आहात. मी आपणास काय सांगावे. तरीही.... माझ्या मनात त्याक्षणी फक्त मदत ही भावना होती. ती मदत मी कोणाला करतो आहे याचा विचार मी क्षणभर देखील केला नाही. मात्र तुमच्या मनात जर शंका होती तर तुम्ही तिचे निरसन त्यक्षणीच करायला हवे होते. कारण मी समोरील तीरावर त्या तरुणीला सोडल्या क्षणी विसरून गेलो. मात्र इथे आश्रमात येईपर्यंत आपण आपल्या मनात संन्यस्त जीवनाची भावना कमी आणि त्या तरुणीचा विचार जास्त ठेवला आहात."
मला वाटतं की राग, लोभ, मोह, मद (गर्विष्ठपणा), आणि मत्सर या भावनांच्या भरात ज्यावेळी आपण एखादे नाते संपवतो त्यानंतर जर परत ते नाते जोडले गेले नाही तर आपली अवस्था त्या वृद्ध सन्याशासारखी होते. आपले मन विविध भावनांचे आगरच आहे. किंबहुना आपण माणूस आल्याचीच ती खूण आहे. त्यामुळे राग, लोभ, मोह, मद आणि मत्सर असूच नये असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र केवळ याच भावनांचा पगडा मनावर जास्त असणे वाईट. या भावना क्षणासाठी असल्या तरी त्यातुन बाहेर पडण्याची सवय आपण स्वतःला लावून घेणे खूप महत्वाचे. मात्र आपण एकदा मनात दुजाभाव निर्माण केला की त्यापासून दूर जायला तयार होत नाही त्याचे कारण म्हणजे ते म्हणजे आपण स्वतः! आपला अहम्! आपला Ego!
या अहम् ची सोबत आपण जितकी जास्त जपतो तितके आपण आपल्या नात्यांपासून दूर जातो. प्रांजळपणे विचार केला तर क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे या अहम् चे वेगवेगळे पैलू आहेत. तुम्ही जितकी जास्त या भावनांची सोबत घ्याल तितके तुम्ही जोडलेल्या नात्यांपासून दूर जाल.
"काय समजतो तो स्वतःला? गेला उडत." क्रोध दिसतो यातून....
"तिच्या सारखे दागिने... महागड्या साड्या... आलिशान बंगला मला देखील हवा" या वाक्याचा संबंध लोभाशी.
"त्याचं जे आहे तेच मला हवं" यातून मोह दिसतो.
"माझ्यासारखा दुसरा कोणी शोधून तर दाखव." मद... गर्विष्ठपणा जाणवतो या वाक्यात.
"भला मेरी साडी उसकी साडीसे सफेद कैसे?" मत्सराचे हे उदाहरण किती योग्य आहे.
म्हणूनच वाटत की आपण ज्या भावनेची किंवा ज्या प्रमाणात आपल्या अहम् ची... इगोची... सोबत घेऊ तितकेच आपले सखे-सोबती आणि नाती आपल्यापासून दूर जातील. त्यामुळे नाती महत्वाची की अहम् महत्वाचा हा विचार आपण प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.
सरतेशेवटी केवळ इतकेच की मनुष्याने नाती निर्माणच केली एकटेपणा जावा म्हणून. मग या नकारात्मक भावनांना मनात थारा देऊन आपण आपल्या मूळ स्वाभावाशी फारकत का घ्यावी बरं?
प्रतिक्रिया
24 May 2019 - 10:25 am | विजुभाऊ
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्म्ना
24 May 2019 - 10:35 am | जालिम लोशन
+१
24 May 2019 - 10:14 pm | अन्या बुद्धे
चांगलाय.. थोडे मतभेद.. पण ठिके..
29 May 2019 - 9:41 am | शित्रेउमेश
सुरेख.... भावला लेख मनाला...
30 May 2019 - 12:11 pm | ज्योति अळवणी
धन्यवाद