लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ८

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
20 May 2019 - 12:04 am

(भाग १ ते भाग ५ यांमधील लिखाण मुख्यतः "दिल्ली, बहादूरशहा आणि १८५७" याबद्दलचे होते. या मालिकेतील पुढील भाग "अवांतर " म्हणायला हरकत नाही. हा भाग या मालिकेंतील शेवटचा भाग आहे . )

भाग १: http://www.misalpav.com/node/44368
भाग २ : http://www.misalpav.com/node/44372
भाग ३: http://www.misalpav.com/node/44375
भाग ४: http://www.misalpav.com/node/44381
भाग ५: http://www.misalpav.com/node/44386
भाग ६ : http://www.misalpav.com/node/44424
भाग ७:http://www.misalpav.com/node/44480

सप्टेंबर १८५७ नंतर दिल्लीतील उध्वस्त केलेल्या जागांच्या यादीत "बरफ खाना" असे वाचनात आल्यावर प्रश्न पडला की ज्या काळांत वीजपुरवठा (आणि म्हणून त्यावर चालणारी शीतपेटी -refrigerator or ice maker) अस्तित्वातच नव्हता त्या काळांत दिल्लीत "बरफ खाना" कसा काय असेल आणि असलाच तर काय ती चीज असेल ? १८५७ नंतरच्या काळांत इंग्रजाना दिल्लीत झालेल्या "त्रासांत" आणि गैरसोयींच्या यादीत बर्फ खाने उध्वस्त झाल्याने उन्हाळ्यांत "बर्फ न मिळणे" हे देखील वाचले तेव्हा उत्सुकता आणखीनच वाढली - म्हणजे त्या काळांत मे १८५७च्या पूर्वीच्या दिल्लीत बर्फ ही वस्तू इंग्रजांना नेहमीची वाटत होती आणि "बर्फ न मिळणे" असे होत नव्हते हे कसे शक्य होते?

मुघल बादशहा जहांगीरच्या काळात काश्मीरमधला बर्फ बैलगाड्यांतून दिल्लीत आणून त्याला पेंढा, मातीची घरे अशा अनेक पद्धतीने आच्छादून ठेवत वितळून जाण्यापासून (जमेल तेव्हढे) वाचवून "दिल्लीतल्या उन्हाळ्याकरता" "फक्त शाही उपयोगाकरता" उपलब्ध असे. दिल्लीत नंतरच्या काळांत काय होत असे याची कल्पना नाही पण अशाच पद्धतीने लाहोरमध्ये महाराजा रणजीतसिंग यांच्या उपयोगाकरतादेखील बर्फ पुरवला जाई. १८५७ पर्यंत दिल्लीमध्ये आणखी सुबत्ता झाल्याने किंवा इंग्रजांसारखे "उन्हाळ्यांत बर्फ़ाखेरीज जगायचे तरी कसे" अशा विचाराचे (आणि पुरेसे श्रीमंत, ज्यांना अशा खटाटोपांकरता लागणारा खर्च "परवडत" असे) लोक पुरेसे वाढल्याने, मागणी तसा पुरवठा हे तत्व प्रत्यक्षांत येत, दिल्लीत बऱ्याच ठिकाणी वीज (किंवा शीतपेटी, ज्या दोन्हीचा शोधही अजून लागायचा होता) उपलब्ध नसतानाही "बरफ खाना"हा व्यवसाय चालू होता.

आपल्या "पुष्पकविमानाच्या" (किंवा इतर पौराणिक) technology बद्दल बराच उहापोह झाला, पण या आता low tech वाटणाऱ्या पण त्यांच्या काळांत high tech असलेल्या उद्योगांबद्दल कुठेही आताच्या काळांत चर्चा झालेली नाही. ज्यांनी मिठागरे पाहिली असतील त्यांच्या हे लक्षांत आले असेल की पसरट उथळ खड्ड्यात साठवलेल्या समुद्राच्या खारट पाण्यातल्या पाण्याचे बाष्पीभवन केल्याने (सूर्य किरणांमधील उष्णतेचा वापर करून ते पूर्णपणे वाफेच्या रूपाने हवेंत घालवून टाकल्याने) मीठ तयार होते. साधारण तशाच पूर्ण नैसर्गिक बदलांचा उपयोग करून या बर्फखान्यात वापरल्या जाणाऱ्या low tech प्रक्रियेत पसरट उथळ खड्ड्यात किंवा खापरांत साठवलेल्या गोड्या पाण्याचे "थंड वारे" वापरून "घनीभवन" करून बर्फ तयार केला जाई.

हे सगळे एकाच वाक्यात जरी लिहिले गेले असले तरी "शीतपेटी उघडली की ठरावीक कप्प्यात बर्फ मिळतो" इतके (च) तांत्रिक ज्ञान असलेल्यांकरता आणखी माहितीची जरूर लागेलच.

हिवाळ्याची सुरवात होतांना हवेचे तपमान तसेच हवेच्या सान्निध्यातल्या पाण्याचे तपमान (उदा. तळ्यातले पाणी) जसजसे कमी होते तशी पाण्याची घनता वाढत जाते. ४ अंश सेंटीग्रेड या तपमानाला पाण्याची घनता सगळ्यात जास्त असते. त्यामुळें थंड होत जाणाऱ्या हवेच्या सान्निध्यातल्या पाण्याचे तपमान जेव्हा उतरत उतरत ४ अंश सेंटीग्रेडला पोचते तेव्हा हे पाणी सगळ्यात जास्त घन असल्याने पाण्याच्या साठ्याच्या सगळ्यांत तळाशी जाऊ पहाते आणि त्यामुळे खालचे पाणी वर येऊ लागते. हवा जसजशी आणखी थंड होते तसतसे ज्या वेळी सगळ्यांत वरच्या पाण्याच्या थराचे तपमान १ अंश सेंटीग्रेडला पोचते तेव्हा त्या थंड पाण्याच्या थराचे बर्फात रूपांतर होऊ लागते. या जमत जाणाऱ्या बर्फ़ाच्या थराची उष्णता अवरोधक शक्ती (insulation capacity) पाण्यापेक्षा जास्त असल्याने सगळ्यात वर जमा होऊ लागलेला बर्फ़ाचा थर त्याखालच्या पाण्याला आणखी थंड होण्यापासून रोखतो. त्यामुळेच थंड हवेच्या प्रदेशात बऱ्याच वेळा तळ्यातल्या सगळ्यात वरच्या पाण्याचा बर्फ झाला तरी त्याखालचे पाणी थंड पण प्रवाही राहू शकते. परंतु जेव्हा वेगाच्या वाऱ्यामुळे पाण्याच्या वर जमू लागलेला बर्फ़ाचा थर खाली ढकलला जातो आणि खालचे पाणी वर येऊ शकल्याने ते ही थिजू लागते तेव्हा पाणी आणि बर्फ यांचे थर वेगवेगळे राहण्याऐवजी (stratification by density) सगळ्याच पाण्याचे थिजणे शक्य होते. त्याखेरीज पाणी साठवण्याची जागा जितकी पसरट व उथळ असेल तितके पाणी आणि बर्फ यांचे थर वेगवेगळे राहण्याऐवजी एकत्र होणे सुकर झाल्याने घनीभवनाची क्रिया सुलभ आणि जलद होते.

हे सगळेच वर्णन कितीही "त्यात काय आहे" असे साधे आणि "low tech" वाटणारे असले तरी दिल्लीत "बर्फ खाना " चालवणारे लोक त्यांच्या अनेक पिढयांनी मिळवलेले "तांत्रिक ज्ञान" वापरून त्यांचा उद्योग चालवीत असावेत. हे बर्फ खाने तुर्कमानगेटाच्या जवळपास तसेच सध्याच्या कॉनॉट प्लेसच्या भागात होते. हा उद्योग कडक थंडीच्या दिवसांतच, मुख्यतः डिसेंबर, जानेवारी या महिन्यात चालत असे. जमिनीत खोदलेल्या ६ फूट x ६ फूट x १ १/२ फूट (खोली) या मापाच्या खड्ड्यांमध्ये तऱ्हेतऱ्हेच्या पेंढ्याने खड्ड्याचा तळ आणि बाजू झाकलेल्या असत. अशा अनेक खड्ड्यांचे जाळे बनवून प्रत्येक खड्ड्याजवळ गोड्या पाण्याचे घडे ठेवलेले असत. बर्फ बनवणाऱ्या लोकांच्या "तांत्रिक" अंदाजाप्रमाणे ज्या रात्री "पुरेशी" थंडी पडेल असे त्यांना वाटे, त्या रात्री या खड्ड्यांत स्वच्छ कापड अंथरून त्यांत गोड्या पाण्याचे घडे रिकामे करून त्या पाण्याचा साधारण १-२ इंचांचा सगळ्यांत वरचा थर जेव्हा पहाटेपर्यंत थिजून जात असे तेव्हा तो गोळा करून वेगळ्या आणखी चांगल्या आच्छादलेल्या आणि (बर्फ वितळल्याने होणारे) पाणी ओघळून जाण्याची व्यवस्था असलेल्या खड्ड्यांत साठवला जाई. असे बर्फ साठवलेले खड्डे, पेंढा, गवताच्या चटया आणि माती अशा उष्णता अवरोधक (insulating) थरांनी इतक्या व्यवस्थित बंद केले जात की हा बर्फ लागेल तसा काढला जात उन्हाळ्याच्या सुरवातीपासून ऑगस्टपर्यंत टिकत असे.

"बर्फ खाना " चालवणाऱ्या लोकांची technology खड्ड्यांची रचना, हवेचा अंदाज, बर्फ़ाची साठवणूक अशा अनेक बाबींकरता उपयोगी पडत असे. आणि हा काही पिढ्या चाललेला व्यवसाय असावा आणि म्हणूनच दिल्लीत बर्फ ही वस्तू वीज नसतांनाही इंग्रजांना उन्हाळ्यांत नेहमीच (निदान १८५७ पर्यंत) मिळत राहिली होती.

असेच काहीसे तंत्र वापरून अलाहाबाद, लखनौ, जयपूर अशा इतर मोठ्या शहरांतदेखील "बर्फ खाने" चालवले जात. अलाहाबादला चालवल्या जाणाऱ्या एका "बर्फ खान्या"त (१८५७च्या पेक्षा बऱ्याच आधीच्या काळातल्या वर्णनाप्रमाणे) थोडी वेगळी technology वापरली जाई. साधारण ३० वर्ग फूट क्षेत्रफळ आणि दोन फूट खोल असलेल्या खड्ड्यांच्या तळाशी वाळलेला ऊस, वाळलेल्या मक्याच्या कणसांचे बुडखे किंवा धान्याची वाळलेली धाटे अशासारख्या उष्णतारोधक आणि ज्यांच्या ढिगातून हवा खेळू शकेल अशा वस्तूंचा साधारण ९ ते १२ इंच उंचीचा थर बनवला जाई. या थरावर पातळ खापराची उथळ भांडी (की ज्यांतून पाणी पाझरू शकत असल्याने ती लक्षात येण्याइतपत ओली होत आणि ओली रहात) ओळीने आणि दाटीवाटीने लावली जात. ज्या रात्री "पुरेशी" थंडी पडण्याचा अंदाज असेल त्या संध्याकाळी या खापरांमध्ये उकळलेले गोडे पाणी १-२ इंचांचा थर होईल इतपत ओतले जाई. सूर्योदयाच्या सुमारांस ही सगळी खापरे बाहेर काढून वेताच्या टोपल्यांत रिकामी केल्याने बर्फ आणि थिजलेल्या पाण्यामधून पाणी गाळून जाई. असा जमा झालेला बर्फ साठवण्याकरता खास वेगळे खड्डे बनवले जात. या १५ फूट खोलीच्या खड्ड्यांत सगळीकडून पेंढा, गोणपाट, गवत अशा उष्णता अवरोधक (insulating) वस्तू लपेटून एक न विस्कटणारा जाडा थर तयार करून त्यांत ठोकून ठोकून बर्फ भरला जाई. बर्फ़ाने खड्डा पूर्ण भरल्यावर पुन्हा विविध उष्णता अवरोधक ( insulating) वस्तू वापरून तो बंद केला जाई. म्हणजे आता बर्फ साठवण्यासाठी ज्या "well insulated" पेट्या बनतात त्यांचाच हा जमिनींत गाडलेला नमुना असे म्हणावे लागेल. अशा खड्डयांतून लागेल तसा बर्फ उन्हाळ्यांत काढला जाई आणि मग खड्डा पुन्हा काळजीपूर्वक बंद केला जात असे.

दिल्ली तसेच अलाहाबाद, लखनौ, जयपूर अशा इतर मोठ्या शहरांत एरवी नैसर्गिकपणे बर्फ पडत नसतानाही अशा तऱ्हेचा "बर्फ खाना " चालू शकण्याचे वैज्ञानिकदृष्ट्या पटणारे कारण त्या काळातल्या माहितीतून शोधणे कठीण आहे. अशा एका अलाहाबादच्या बर्फ खान्याच्या इंग्रज मालकाच्या मते अगदी थंड झालेल्या पण खेळत्या ठेवलेल्या हवेमुळे अशा हवेत रात्रभर राहीलेल्या पाण्याने संपृक्त तसेच "पुरेश्या सच्छिद्र" खापरांतील उष्णता त्यातल्या पाण्याचे बर्फ बनेपर्यंत शोषून घेणे शक्य होत असे.

अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या बर्फ खान्यांच्या मालकाना किंवा त्यांतल्या "कारागिरांना" आपल्या गावातल्या वर्षांतल्या काही महिनेच थंड होणाऱ्या हवेच्या वापराने कशा पद्धतीने पाण्याचे बर्फ बनेल (कशा तऱ्हेचे खड्डे बनवणे, त्यांत पाणी कसे भरणे आणि विविध उष्णता अवरोधकांचा वापर इ.इ.) याचे प्रात्यक्षिक ज्ञान अनेक काळच्या प्रयोगानंतर बरोबर जमत असे त्यांचाच धंदा चालू राहात असावा. पिढीजात अनुभवाचा उपयोग करणाऱ्या अशा लोकांची technology १८५७ पर्यंत तरी दिल्लीतील (तसेच इतरत्र "बरफ खाना" असलेल्या मोठ्या शहरांतल्या) गोऱ्या आणि श्रीमंत लोकांना भर उन्हाळ्यांत गारेगार करत राहिली होती. १८५७ नंतर दिल्लीतील (तसेच इतरत्र झालेल्या ) उलथापालथींत गोऱ्या लोकांनी हिंदुस्थानी लोकांची धास्ती घेऊन त्यांना शहरांतून शक्य तेव्हढे दूर हाकलल्याने आणि आपल्या सुरक्षिततेकरता अनेक मुहल्ले भुई सपाट केल्याने त्यांचेच "उन्हाळ्यांत गारेगार होणे" कठीण झाले.

आपल्या सुखसोयींकरता technology वापरणाऱ्या आणि त्याकरता लागणारा खर्च परवडणाऱ्या - मुख्यतः गोऱ्या - लोकांकरता आणखीही एक सोय १८५७च्या आधीही सुमारे २० -२५ वर्षे उपलब्ध होती पण ती फक्त सागरी बंदरातल्या लोकांकरता. "बर्फ़ाचा ठोकळा जितका मोठा तितका त्याचा वितळण्याचा वेग कमी" (कारण बर्फ़ाच्या सगळ्यांत बाहेरच्या वातावरणाशी संलग्न थराच्या उष्णता अवरोधन शक्तीमुळे आंतल्या थरांचे वितळणे अवरोधित होते) या वैज्ञानिक तत्वाचा वापर करत अमेरिकेतून जहाजे भरभरून बर्फ मुंबई, कोलकाता, मद्रास (आता चेन्नई) अशा भारतातीलच नव्हे पण हाँग काँग, जकार्ता अशा इतर आशियाई देशातल्या बंदरांत १८३०-१८४० या काळात पोचत असे आणि वापरला जात असे, पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

ज्यांना ज्यास्तीची माहिती हवी आहे त्यांनी पाहावे:

https://www.thehindu.com/features/metroplus/society/a-connection-so-cool...
https://www.huffingtonpost.in/sachin-garg/the-astonishing-story-of-how-i...

https://www.atlasobscura.com/articles/how-did-people-get-ice

https://oldphotosbombay.blogspot.com/2011/02/how-ice-came-to-india-1833....

https://www.gatewayhouse.in/breaking-the-ice-u-s-trade-with-bombay/

https://indianexpress.com/article/lifestyle/art-and-culture/the-last-sol...

https://www.britannica.com/science/lake-ice#ref65638

https://pazhayathu.blogspot.com/2012/02/water-cooler-air-conditioning-be...

http://www.shikshantar.org/sites/default/files/PDF/1DharampalJiCollected... (पृष्ठ १७१)

https://www.scmp.com/lifestyle/travel-leisure/article/1996007/stories-be...

(समाप्त)

मांडणीविचार

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

20 May 2019 - 7:57 am | तुषार काळभोर

धन्यवाद मोघेसाहेब.

गारा पडत असल्याने बहुतेक सगळ्या भारतातील लोकांना बर्फ माहिती असेलच ना?

शेखरमोघे's picture

20 May 2019 - 8:35 pm | शेखरमोघे

गारा पडत असल्याने बहुतेक सगळ्या भारतातील लोकांना बर्फ माहिती असेलच ना?

बर्फ ही काय चीज आहे ही माहित असली तरी वीज उप्लब्ध नसताना उन्हाळ्यात - जरूर असेल तेव्हा, गारा पडतील तेव्हा नव्हे- बर्फ कुठून येत असे अशा शोधातून मिळवलेली माहिती या भागात होती.
प्रतिसादाबद्दल आभार.

श्रीरंग_जोशी's picture

20 May 2019 - 8:21 am | श्रीरंग_जोशी

पहिले पाच भाग तर उत्तम होतेच पण नंतरचेही सर्व भाग अत्यंत रोचक माहितीने परिपूर्ण आहेत.
बरफखाना या प्रकाराबद्दल प्रथमच वाचले. या लेखमालिकेसाठी अनेक धन्यवाद.

शेखरमोघे's picture

20 May 2019 - 8:47 pm | शेखरमोघे

प्रतिसादाबद्दल आभारी.

अनिंद्य's picture

20 May 2019 - 4:20 pm | अनिंद्य

@ शेखरमोघे,

बरफ खानाची माहिती मजेदार आहे. चिनी लोकांचे आईस्क्रीम बनवण्याचे आणि उन्हाळ्यात टिकवण्याचे तंत्र मोगल दरबारांनीं आयात केल्याचे वाचले आहे.

लेखमाला उत्तम आहे, फक्त पूरक चित्रांची कमतरता वाटते.

पु ले शु,

अनिंद्य

शेखरमोघे's picture

20 May 2019 - 9:17 pm | शेखरमोघे

या आधीच्या काही प्रतिसादात पूरक चित्रांची कमतरता असल्याचा सूर होता. परन्तू जालावर अनेक चित्रे उपलब्ध असली तरी त्यातील बरीच फक्त इन्ग्रजान्चा गौरव करणारी असल्यामुळे (आणि आमचा "कथानायक" बहादुरशहा याची चित्रे अगदी शाही इतमामात बसलेला किन्वा दैन्यावस्थेत पहुडलेला अशा दोनच थाटात असल्यामुळे) वर्णनाशी पूर्णपणे जुळणारी अशी कुठली चित्रे निवडावीत हा प्रश्न सोडवणे कठीण गेले. जर सप्टेम्बर १८५७ मध्ये "काश्मिरी दरवाजा इन्ग्रजानी कसा काबीज केला" हे (जालावर सहज उपलब्ध असलेले चित्र) दाखवायचे असेल तर मे १८५७ मध्ये याच "काश्मिरी दरवाजातून कसेबसे पळून जाणारे इन्ग्रज" अशी चित्रे उपलब्ध (अर्थातच) नाहीत.

लिखाणाचा गाभा होता "मेरठ किन्वा इतरही ठिकाणी सापडलेल्या इन्ग्रजाना सम्पवून, हिन्दुस्थानी सैनिक नेतृत्वाचा शोध करत किन्वा पुढे काय करायला हवे याचा काहीही विचार न करता जे पुढे भरधाव निघाले, त्यानन्तर (दिल्लीत) काय घडले". या लिखाणासाठी उपयोगी आणि तरीही मोजकी अशी कुठली चित्रे निवडावीत हा प्रश्न कदाचित मी जास्तीच्या माहितीकरता दिलेल्या सन्केतस्थळान्चा उपयोग करून सोडवता यावा.

जालिम लोशन's picture

20 May 2019 - 11:31 pm | जालिम लोशन

सुरेख लिहले आहे.

शेखरमोघे's picture

21 May 2019 - 1:12 am | शेखरमोघे

आभारी आहे.

प्रमोद देर्देकर's picture

21 May 2019 - 1:46 am | प्रमोद देर्देकर

अतिशय रोचक माहिती .
पण ही मालिका लवकर संपली

शेखरमोघे's picture

21 May 2019 - 6:22 am | शेखरमोघे

धन्यवाद. "१८५७" दिल्लीपुरते मर्यादित ठेवल्यामुळे खरे म्हणजे बहादुरशहाबरोबरच ५व्या भागाबरोबर लिखाण सम्पवायला हवे होते. त्यानन्तरचे भाग "अवान्तर पण सम्बन्धित" असल्यामुळे आणखी काही "वेगळे" सापडले तर पुन्हा पेश होईलच.

टर्मीनेटर's picture

22 May 2019 - 8:18 am | टर्मीनेटर

छान लेखमालिका! तुम्ही अवांतर म्हणत असलात तरी पुढचे भागही माहितीपूर्ण आहेत. बरफ खान्या बद्दल पहिल्यांदाच वाचले.
धन्यवाद. पुढील लेखनास शुभेच्छा!

शेखरमोघे's picture

23 May 2019 - 8:26 am | शेखरमोघे

प्रतिसादाबद्दल आभार!