स्वर्गामधे देवांची वार्षिक सभा व स्नेहसम्मेलन भरले होते. कोट्यवधी देवांनी यंदाच्या सम्मेलनाला उपस्थिती लावली होती. संध्याकाळी नित्याप्रमाणे सौंदर्यावलोकन करायला विविध मार्गिकांतून आज सर्वजण बाहेर पडले होते. गर्दी टाळून यमदेव एकटेच नंदनवनाकडे वळले.
अतिशय सुंदर हवा पडली होती. नंदनवनात अनेक लतापल्लवी, लक्षावधी वल्लरी, रंगीबेरंगी आणि सुगंधी फुले बहरली होती, मोहक सडा पडला होता. सुगंधी वायू वाहात होता. पक्षी सुरेल सुस्वरामधे कूजन करत आनंदात विहरत होते. क्षणभर यमदेवांना परिपूर्ण शांतीचा आस्वाद घेता आला. समाधानाने त्यांचा ऊर भरून आला.
इतक्यात गरुडाचे तिथे आगमन झाले. एकांताची यमराजांची तंद्री भंग झाली. पण मिळालेले समाधान इतके विलक्षण होते, की त्या येण्याचा त्याना एक प्रकारे आनंदच झाला. कोणालातरी आपल्याप्रमाणेच एकांतवास प्रिय आहे, याचेही त्याना बरे वाटले. तसा त्यांचा आणि गरुड देवाचा स्नेह ही युगानुयुगांचा.
"राम राम यमराज" गरुडाने थोडी पृच्छा करत नंदनवनाकडे नजर वळवली. ते सौंदर्य पाहाण्यात दोघेही रममाण झाले. गरुडाने एकदम एका पक्ष्याकडे यमराजाचे लक्ष वेधले.
"किती सुंदर आहे नाही हा? काय सुरेख आहेत याचे निळे निळे पंख! आणि काय छान नाचतोय, बागडतोय! जीवनाच्या ऐन बहराला आला असावा असे भासते!"
"हो ना, मी ही पाहातोय त्याला मगापासून!" यमराज उत्तरले. "फक्त मला राहून राहून आश्चर्य वाटते आहे, की हा अजून इथे कसा!"
"म्हणजे? आपल्याला काय म्हणायचे आहे तरी काय?" गरुडाला बसलेला धक्का लपवता आला नाही. आपल्या मुळे गरीबाचा जीव धोक्यात आल्याची भावनाही त्या प्रश्नातून डोकावत होती.
"नव्हे तसे काहीच नाही;" यमराज सावरत म्हणाले, "पण मी इतकेच म्हणत होतो, की याचा खरेतर आता काळ जवळ आला आहे!" विषय पटकन आटोपत ते उत्तरले.
आता मात्र गरुडाला राहावेना. तो यमराजाला म्हणाला, "मी पाहातो कोण त्याला काय करतो ते!"
"अहो अहो!" यमराजाचे हे शब्द हवेतच विरले. क्षणार्धात गरुडाने उड्डाण केले, झपाट्याने त्या मनमोहक पक्षाला आपल्या डाव्या पंखाखाली घेतले आणि त्याच वेगाने खूप उंच आणि लांबवर त्याने अवकाशात भरारी घेतली. सप्त सागरांच्या ही पलिकडे, अशा ठिकाणी, की जिथे काळही पोचू शकणार नाही! त्या पक्ष्याला त्याला अशा स्थळी नेऊन पोचवायचे होते की जेथे त्याला कोणाचेही भय असणार नाही.
आपल्या ती़क्ष्ण नजरेने परिसर न्याहाळत प्रचंड वेगाने मार्गक्रमण करीत असताना गरुडाने खूप उंच असा एक सुळका पाहिला. सूर्यास्ताचा काळ नजीक येत होता. तो सुळका गरुडाला उत्तम भासला. अशी ही एक जागा होती की जिथे नजरही ठरत नव्हती. अन्य कोणाही जीवित प्राणी अथवा पक्ष्याचे तिथे अस्तित्व असणे शक्यच नव्हते अशी गरुडाने खात्री करून घेतली.
विचार करून झाला होता. गरुडाने हळूहळू खाली यायला सुरूवात केली. अत्यंत प्रेमाने त्याने अलगद पणे त्या सुंदर निळ्या पंखांच्या पक्ष्याला त्या सुळक्याच्या ठिकाणी उतरवले, आणि क्षणातच पुन्हा उड्डाण केले. त्याला आता यमराजाला विचारायचे होते, की इथे तर नाही ना पोचू शकले तुमचे दूत!
त्या पक्ष्याचे नृत्य पुन्हा एकवार मनमुरादपपणे पाहाण्यासाठी त्याने सहज आपली नजर त्या सुळक्याकडे वळवली, आणि पाहातो तो काय!
गरूडाला हा धक्का अनपेक्षित होता! ज्या सुळक्याला त्याने अति सुरक्षित जागा समजली होती, तिथे एका भयानक अजगराने त्या पक्ष्याला लक्ष्य केले होते!
निराशेने आणि खिन्न मनाने आपली हार मनातल्या मनात मान्य करून गरुड परत नंदनवनाकडे वळला.
दुसर्या दिवशी सकाळच्या पर्वात त्याला यमराजाचे दर्शन झाले नाही. आज सभेचा शेवटचा दिवस होता. दुपारच्या स्नेहभोजनाला गरुडाला खरेतर जावेसेही वाटत नव्हते. यमराजाला मात्र एकदा भेटावेसे जरूर वाटत होते. पण आश्चर्य म्हणजे, यमराज मात्र आपल्याला भेटायचे टाळत आहेत असे गरुडाच्या लक्षात आले. तेव्हा मात्र युक्ती करून तो यमराजाच्या जवळ जेवायलाच जाऊन ठाकला.
त्याची खिन्न मुद्रा पाहून यमराजाने त्याला नजरेनेच विचारले, "काय झाले?"
"तुम्ही म्हणालात तसेच झाले! मी त्याला इतक्या लांबवर घेऊन गेलो; याच विचाराने, की इथवर इतक्या वेगाने माझ्या शिवाय कोणीही पोचू शकणार नाही. अगदी निर्धास्त मनाने मी त्याला जमिनीवर सोडले, आणि माझी नजर वळताच तुमचा दूत अजगराच्या रूपाने तिथे हजर!"
यमराज उत्तरले, "बा गरुडा, मी जेव्हा म्हणालो, की हा अजून इथे कसा, तेव्हा मला अगदी हेच म्हणायचे होते; मीही आश्चर्य करत होतो की याचा काळ तर जवळ आला आहे, मात्र याला इथून खूप दूर वर जायचे आहे, आणि तो इतका दूर जाणार कसा? हा विचार माझ्या तोंडून फक्त प्रकटायला आणि तू झेप घ्यायला एकच गाठ पडली!"
"आता माझा दूत अजगर की कोण हे ज्याने त्याने ठरवायचे!
एक नि:शब्द शांतता त्या नंदनवनातही गरुडाला जिणे असह्य करीत होती. आपणच त्या पक्ष्याचे मृत्युदूत बनलो या भावनेची पीडा फार मोठी होती!
त्याच वेळी मृत्यूची सत्ताही त्याच्या मनात स्पष्टपणे अधोरेखित होत होती!
प्रतिक्रिया
10 Jan 2009 - 4:11 am | अनामिक
खुप छान कल्पनाविस्तार!
फक्तं एक प्रश्न - मरायच्या आधीच पक्षी स्वर्गात कसा गेला? (ह.घ्या.)
जिवासवे जन्मे मृत्यू हे शिर्षक आवडलं!
अनामिक
10 Jan 2009 - 8:05 am | अनिल हटेला
मरायच्या आधीच पक्षी स्वर्गात कसा गेला? (ह.घ्या.)
असेच म्हणतो...
बाकी कल्पनाविस्तार आवडला..छान जमलीये कथा..
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
10 Jan 2009 - 1:41 pm | मॅन्ड्रेक
फक्तं एक प्रश्न - मरायच्या आधीच पक्षी स्वर्गात कसा गेला? (ह.घ्या.)
गर्दी टाळून यमदेव एकटेच पूथ्वि वरील नंदनवनाकडे वळले.
असा बदल केल्यास - ? प्रश्न रहाणार नाही.
खुप छान कल्पनाविस्तार!
10 Jan 2009 - 2:26 pm | परिकथेतील राजकुमार
हि कथा आपली स्वतःची आहे का ?
एका पुस्तकात हि कथा गौतम बुद्धांनी आपल्या कोणा एका शिष्याच्या शंकेचे समाधान करताना त्याला सांगीतली असा उल्लेख आहे. तर एका पुस्तकात हि कथा जातक कथा म्हणुन वाचल्याचे स्मरते.
परिकथेतील शंकासुर
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
10 Jan 2009 - 3:20 pm | लिखाळ
गोष्ट छान आहे.
मी सुद्धा ही गोष्ट या पूर्वी बरेचदा ऐकली आहे.
-- लिखाळ.
10 Jan 2009 - 3:40 pm | बिपिन कार्यकर्ते
छानच लिहिलंय. मूळ कथाबीज थोडं वेगळ्या स्वरूपात ऐकलं होतं. पण इथे छान खुलवली आहे गोष्ट.
बिपिन कार्यकर्ते
10 Jan 2009 - 4:53 pm | शशिधर केळकर
प्रश्नाबद्दल धन्यवाद!
ही कथा अर्थातच माझी नाही. ऐकूनही कित्येक वर्षे झाली. मागच्या लिखाणात मी म्हटले होते, की कुठेना कुठे वाचलेल्या कथा - त्यांचा उगम माहीत नसल्याने पण त्या अजूनही मनात रुंजी घालत असल्याने - नव्याने लिहीत आहे. त्यांतीलच ही एक कथा. या कथा अशा रीतीने प्रकाशित केल्याने काहीही गैर होत असल्यास तसे कृपया सूचित करावे ही विनंती. नाहीतर असेही करता येईल की प्रत्येक कथा लिहिताना सुरुवातीला मी असे स्पष्ट करावे, की ही कथा किंवा हा कथा विषय माझा नाही.
यापैकी जे योग्य श्रेयस्कर असेल ते तसे करावे / सांगावे.
10 Jan 2009 - 5:09 pm | बिपिन कार्यकर्ते
नाहीतर असेही करता येईल की प्रत्येक कथा लिहिताना सुरुवातीला मी असे स्पष्ट करावे, की ही कथा किंवा हा कथा विषय माझा नाही.
हे बरं राहिल.
बिपिन कार्यकर्ते
10 Jan 2009 - 5:16 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत. असेच म्हणतो.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
13 Jan 2009 - 4:20 pm | श्रेया
कल्पना छान आहे
19 Mar 2009 - 11:47 pm | एकशुन्य
" One often meets his destiny on a path he choose to avoid it .."
"....आणि असेल मग फक्त शांतता.."
20 Mar 2009 - 3:07 am | बेसनलाडू
(वाचक)बेसनलाडू
20 Mar 2009 - 8:27 am | llपुण्याचे पेशवेll
अशा आशयाची कथा गरुडाची आई विनता हिच्या बाबतीत घडली होती. तिचा मृत्यूसमय जवळ आल्याचे कळल्यावर आपल्या आईला पाठीवर घेऊन गरुडाने उड्डाण केले आणि हिमालयातील दुर्गम गुंफेत आईला नेऊन ठेवले. तेव्हा पाहीले तर यमधर्म तिथे आधीच हजर होते. त्यावर गरुडाला खेद झाला आणि यमधर्माला आनंद. यमधर्म गरुडाला म्हणाले 'तुझ्या मातेचा मृत्यू या ठीकाणी होणार असे विधीलिखित होते, पण मला चिंता अशी की इथवर पोहोचणार कशी? असो तू माझे काम सोपे केलेस'.
अशी कथा गरूडपुराणात आहे.
लेखकाचा कल्पनाविस्तार, शैली दोन्ही छान. कथा आवडली.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984