व्हिडीयो कोच..

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
8 May 2019 - 5:23 pm

९३-९४ साली प्रायव्हेट बस ही संस्था अगदी नवीन होती. शिवा ट्रॅव्हल्स, सदानी ट्रॅव्हल्स वगैरे कंपन्या नुकत्याच उदयाला आल्या होत्या. अमरावती-अकोला, अमरावती-यवतमाळ वगैरे गाड्या राजापेठ चौकातून निघायच्या. नोकरीसाठी अप-डाऊन करण्याऱ्या लोकांसाठी ह्या गाड्या सोयीच्या होत्या. दिवसभर ऑफिसमधून थकूनभागून घराकडे निघाल्यावर एसटीतुन उभं राहून प्रवास करण्यापेक्षा हे बरं होतं. किंवा दिवसभर खरेदीसाठी वगैरे अमरावतीत आलेल्या कुटुंबांना रात्री गावाकडे परतण्यासाठी सुध्दा ह्या बसेसचा पर्याय उपलब्ध झाला. पण खाजगी क्षेत्र म्हटलं की स्पर्धा आली. स्पर्धा म्हटलं की नवनवीन डावपेच आले. आलेला प्रवासी जागा नसल्याकारणाने निसटून जाऊ नये म्हणून दोन्हीकडच्या सीट्सच्या मध्ये जी जागा असते त्यात स्टूल ठेवण्यात यायचे. त्या स्टूलवर लहान मुलांना बसवले की आईबाप मांडीवर घेण्याच्या त्रासातून मोकळे. पण ब्रेक लागला की सगळे स्टूल लायनीत एकमेकांवर आदळायचे. त्यामुळे काही दिवसांनी स्टूलवर बसायला कोणी तयार होईना. आणि दुसरीकडे स्पर्धा वाढतच होती.

मग प्रवासांना आकर्षित करण्यासाठी एक शक्कल लढवण्यात आली. व्हिडीयो कोच !!

२ x २ आरामदायी बस (व्हिडीयो कोच उपलब्ध) अश्या जाहिराती बसवर लिहिल्या जाऊ लागल्या. बसच्या समोरच्या भागात आणि ड्रायवर केबिनच्या मागे टीव्ही लावलेला असे. आणि व्हीसीआरवर कॅसेट लावून सिनेमे दाखवायचे. तेवढाच तास-दोन तास प्रवाश्यांचा वेळ चांगला जायचा. मलाही सुरवातीला ह्या व्हिडीयो कोचवाल्या बसेस फार आवडायच्या. इतरवेळी बघायला न मिळणारे बरेच सिनेमे तिथे बघायला मिळायचे. मिथुन, अजय देवगण, सुनील शेट्टी, अक्षय कुमारच्या त्याकाळातील सिनेमांचे थेयटरपेक्षाही जास्त शोज ह्या व्हिडीयो कोच बसमध्ये जास्त झाले असतील. त्यावेळी खान त्रिकुट आणि गोविंदा हे चलनी नाणे होते. त्यामुळे त्यांचे सिनेमे बसमध्ये लावणे म्हणजे प्रीमियम कॅटेगरी होती. अगदीच एखाद्यावेळेला त्यांचे सिनेमे लावायचे. पुढे जाऊन गोविंदाचे चलनीमूल्य कमी झाले. आणि त्याच्या सिनेमाची रवानगी जनरल कॅटेगिरीत झाली. आणि गोविंदाचे चाललेले जुने सिनेमे ही व्हिडीयो कोचची ओळख बनली. इंगजी सिनेमेवगैरे बसमध्ये कधीच लावत नव्हते. कारण समोर फॅमिली ऑडियन्स असायचा. आणि भारतीय फॅमेल्या हिंदी सिनेमातले बलात्काराचे प्रसंग आणि सीरियलमधले कौटुंबिक कटकारस्थानं चालतील पण इंग्रजी सिनेमे नको ह्यावर अजूनही ठाम आहेत.

असो. पण कुठलाही सिनेमा लावला तरी एक समस्या कायमच असायची. अमरावती -अकोला किंवा यवतमाळ हे अंतर दोन तासांचं. आणि त्याकाळात कोणताच हिंदी सिनेमा दोन तासात संपत नसे. त्यामुळे शेवटी हिरोच्या आईला किंवा हिरोईनला व्हीलेनच्या दुष्ट आदमींनी नुकतंच पकडून नेलंय. आणि हिरोला आत्ताच ही बातमी शेजाऱ्याकडून मिळालीये. आणि हिरो माँ कसम वगैरे म्हणून फायटिंग मोड ऑन करून व्हीलेनच्या अड्ड्यावर पोहोचणार तेवढ्यात 'चलो अकोला बसस्ट्यांड' अशी आरोळी ऐकू यायची. की उतरा बसमधून. माझ्या व्हिडीयोकोच बस प्रवासाच्या कारकिर्दीत टायटल्सपासून क्रेडिट्सपर्यंत पाहिलेला एकही सिनेमा मला आठवत नाही. तश्या आणखीही बऱ्याच समस्या होत्या. बसमधल्या मागच्या सीटवर टीव्हीचा आवाज पोहोचत नसे. मग काही दिवसांनी तिथे स्पीकर लावण्यात आले. आधीच लाऊड सिनेमे आणि त्यात फाटलेल्या आवाजाचे स्पीकर्स म्हणजे कानावर अत्याचार व्हायचा. आणि एखाद्यावेळी चांगला सिनेमा, चांगली जागा आणि व्यवस्थित आवाज हे सगळं जुळून आलं की टीव्हीवरचं चित्र खराब असायचं. ह्या असल्या कारणांनी व्हिडीयो कोचचं आकर्षण कमी झालं.

पुढे अमरावती-पुणे, सुरत वगैरे लांब पल्ल्याच्या २ x २ सीटर बसेस सुरु झाल्या. ह्यात व्हिडीयो कोच ही सुविधा नसून गरज होती. कारण एवढे मोठाले कंटाळवाणे प्रवास मनोरंजनाशिवाय करणं अशक्य होतं.ह्यात साधारण दोन सिनेमे तरी बघून व्हायचे. नंतर व्हीसीआर जाऊन सीडी प्लेयर आले. सीटर बसेसला स्लीपर कोचचा पर्याय आला. मग एसी स्लीपर कोच आलेत. पण स्लीपर कोचमध्ये एकाबाजूला झोपून समोरच्या टीव्हीकडे बघणं त्रासदायक होतं. ह्यावर उपाय म्हणून स्लीपर कोचच्या प्रत्येक कम्पार्टमेन्टला स्वतंत्र स्क्रीन देण्यात आली. मग शेजारी बसलेल्या अनोळखी सहप्रवाश्याला सिनेमा बघायचा नसेल तर काय हा प्रश्न उपस्थित झाला. त्यासाठी एकाच कंपार्टमेंटमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या. आणि आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक प्रवाश्याला एकेक हेडफोन! आताशा उपलब्ध असलेल्या सिनेमातून आपल्या आवडीचा सिनेमा निवडण्याचीही सुविधा आहे. एवढं असताना आजकाल आलिशान एसी बसमधून प्रवास करताना इयर फोन लावून स्वत:च्याच लॅपटॉपवर वेब सिरीज बघण्याची पद्धत आहे.

डिजिटल क्रांती का काय म्हणतात ते हेच असावं...

असो. आणि आम्ही काय करतो? तर त्या लॅपटॉपवल्याच्या आजूबाजूच्या कंपार्टमेंटमध्ये आमच्या लेकीला झोपवण्याचा केविलवाणा प्रयत्न.

"अगं तो टीव्ही खराब झालाय. तो नाही लागणार. झोप तू."

आणि ह्यावर सुपर मिलेनियल जनरेशनची आमची लेक आम्हाला ऐकवते,

"मग मला यु त्यूबवल व्हीदियो लाऊन द्या..आनि तुमी झोपा"

समाप्त

चित्रपटविरंगुळा

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

8 May 2019 - 5:29 pm | चांदणे संदीप

भारी प्रवास!

Sandy

टवाळ कार्टा's picture

8 May 2019 - 5:46 pm | टवाळ कार्टा

खिक्क...मुंबैच्या लोकांचा व्हिडीओ कोच वेगळा असतो ;)

अन्या बुद्धे's picture

9 May 2019 - 12:15 pm | अन्या बुद्धे

:)

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 May 2019 - 2:05 pm | राजेंद्र मेहेंदळे

मलापण शीर्षक वाचून पहीले तेच वाटले होते. माझ्या एका कॉलेजच्या मित्राचा हा पहिल्या वर्गाचा व्हिडिओ कोच म्हणजे अर्धा लेडीज आणि अर्धा जेंट्स डब्बा एकदम लाडका होता. त्याला भेटायचे म्हणजे तोच डब्बा पकडायचा हे ठरलेले. तासभर आरामात निघुन जायचा.

सरल मान's picture

9 May 2019 - 2:43 pm | सरल मान

मला पण लोकल कोचचा विचार आला पण हे वेगळेच निघाल्.....

महासंग्राम's picture

8 May 2019 - 5:47 pm | महासंग्राम

अकोला-अमरावती, अकोला-अकोट-परतवाडा अश्या चालणाऱ्या २x२ YS ट्रॅव्हल्स ला त्यावेळेस तोड नव्हती. आता पार भंगार झाल्या त्या.
त्यांची प्रवासी गोळा करण्याची पद्धत पण भारी होती, "बस २ जन बाकी अभी निकलेगा गाडी" म्हणत २ तासांशिवाय जागची हलायची नाही बस.
बाकी आजकाल त्या स्लीपर कोच मधले सिनेमे पण बंद झाले.

प्रसाद_१९८२'s picture

8 May 2019 - 6:27 pm | प्रसाद_१९८२

"बस २ जन बाकी अभी निकलेगा गाडी"
--

साधरण अशीच परिस्थिती सोलापूर बसस्थानका बाहेर थांबणार्‍या खासगी बसवाल्यांची आहे. सोलापूर बसस्थानकात पुण्याला जायला उभ्या असणार्‍या प्रवाशांना, 'पुण्याला जाणारी एसटी अजून दिडएक तासांनी आहे, आमची बस बाहेर उभी आहे व लगेच सूटेल' असे सांगून बस जवळ नेतात व तिकिट हातात देऊन तिथे उभ्या असलेल्या एका बस मधे जाऊन बसायला सांगतात आणि त्यानंतर किती ही वेळ लागो संपूर्ण बस भरल्याशिवाय गाडी काही निघत नाही.

अभ्या..'s picture

8 May 2019 - 11:54 pm | अभ्या..

अ‍ॅक्चुअली,
सोलापूर बसस्थानकाच्या शेजारीच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी(पांजरापोळ चौकात) सगळ्या खाजगी ट्रॅव्हल्सची ऑफिसे आहेत. बस स्थानकात जाताना इथूनच जावे लागते. रिक्शावालेही इथेच उतरवतात. बॅग घेऊन कुणी दिसला की "हाय का पुणे" असे विचारणारे कमीत कमी १० जण तरी अंगावर येतात. कानावर फुल्ल चार इंच मशीन मारुन वर र्रंगवलेले केसाचे टोपले, हिरवे पिवळे टीशर्ट, जीन्स आणि त्यालाच सूट होणारे लालनिळे स्पोर्टस शूज घातलेले, धनुषला सौन्दर्याचा पुतळा मानुन त्यालाच फॉलो करणारे हे नग पुस्तकी भाषेत "सर, म्याडम, एसी स्लीपर हाय ना" असे म्हनत गणपतीच्या पट्ट्याची बुके असावीत अशी तिकिटे फडकावत असतात. अगदी बस स्थानकाच्या प्लॅटफॉर्मपर्यंत हे मागेच असतात. पुणे जाणार्‍या बसेसचा प्लेटफॉर्म कंट्रोलर केबिन आणि स्टँड ड्युटी पोलीस केबिन समोर असूनही ते बिलकुल जुमानत नाहीत. पुण्याच्या बसमध्ये चढणार्‍या प्रवाशाची बॅग पकडून "चार तासात निगडीला" हि ऑफर द्यायचे डेरिंग त्यांचे असते. ही ऑफर मात्र ट्रॅव्हल्स फुल्ल झाल्यानंतरचे चार तास अशी टर्म्स वर असते. कोंडुसकर, व्हीआरएल आणि डॉल्फीन व्हॉल्व्हो सारखे रेप्युटेड ट्रॅव्हल्स वगळता सारेच हमसफर, लब्बैक, अपना, विजय, माता अशा गाड्या एजंटच्या जीवावर गाड्या चौकात लावतात आणि त्यांच्याच वेळाने हलवतात. सोलापूर पुणे एक्स्प्रेस वे होण्याआधी ह्यांनी भरपूर कमवून घेतले. आता इंटरसिटी, शिवशाही, एशियाड, कर्नाटक आणि आंध्राच्या बसेस आणि खाजगी वहाने इतक्या पर्यायासमोर त्यांचा निभाव लागत नाहिये. रेडबस वगैरे आधुनिक पर्यायानी त्यांना वेळा पाळायला आणि बार्गेन करायला शिकवले आहे. तरीही उन्हाळी सुट्टी आणि सणांच्या वेळी पाचशेचे तिकिट हजाराला विकायची नियत जात नाहीये. ट्रान्स्पोर्टमधून मात्र कमवायला ट्रॅव्ह्ल्स कंपन्या आता चांगल्याच शिकल्या आहेत. सर्व गावात कुरीयर आणि पार्सल ऑनलाईन डॉकेट करुन ऑफिस डिलिव्हरीचा त्यांचा बिझनेस वाढला आहे. कोंडुसकर सारखी कंपनी अवैध रक्कम वाहतुकीसारखे शिक्के पडूनही जोरात सांगली, मिरज, पुणे, मुंबई, ठाणे वन डे पार्सल पोहोचवतात.
पुणे प्रवासास कमी झालेला वेळ आणि जास्त झालेले पर्याय पाहता नागपूर, अमरावती कडे जाणार्‍या खुराना, हमसफर आदी स्लीपर कोचना मात्र फुल गर्दी असते आणि ती राहणारच.

कानावर फुल्ल चार इंच मशीन मारुन वर र्रंगवलेले केसाचे टोपले, हिरवे पिवळे टीशर्ट, जीन्स आणि त्यालाच सूट होणारे लालनिळे स्पोर्टस शूज घातलेले, धनुषला सौन्दर्याचा पुतळा मानुन त्यालाच फॉलो करणारे हे नग

ह्यात एका लेखाचं पोटेन्शिअल आहे अभ्या भौ..
होऊन जाऊ द्या..

शाम भागवत's picture

9 May 2019 - 11:10 am | शाम भागवत

अभ्याजींच्या सोलापूरच्या आठवणींमुळे आठवतंय हे.

८७-८८ साल असावं. माझी बहिण सोलापूरला होती त्यावेळेस. किर्लोस्कर न्यूओप्लॅनची बस गिरिकंदने पुणे सोलापूर रस्त्यावर सुरू केली होती. वेळा पाळायची. एसी बस असायची. धक्के व आवाज एकदम कमी असायचे.

मागे इंजिन असलेली भारतातील पहिली गाडी असावी बहुतेक. गाडीच्या इंजिनाचा आवाज येत नाही. खिडक्या बिलकुल आवाज करत नाहीत याचे अप्रुप वाटायचं.

भाडे भरपूर होते पण कमी वेळात म्हणजे ४ तासात प्रवास पूर्ण व्हायचा. रस्ते छोटे होते. रोड डिव्हायडर वगैरे काहीही नव्हते. ओव्हरफ्लायची कल्पना स्वप्नातही नसायची. १०० किमीचा वेग म्हणजे त्यावेळेस अतिप्रचंड वाटत असे. ही बस तो वेग अगदी सहज पकडायची पण आतल्या माणसाला आपण वेगात जातोय हे जाणवत नसे.

मी बऱ्याच वेळेस अपडाऊन केलय त्या बसमधून. कोणतीच गाडी हिला ओव्हरटेक करायची नाही. ही मात्र सगळ्यांना धपाधप मागे टाकत जाणार. मजा यायची. पहिल्या किंवा दुसऱ्या रांगेत बसलं की, पुढचं सगळं ड्रायव्हरला दिसतं तसचं दिसायचं. पुढची भली मोठी एकसंध काच ही कल्पनाच नाविन्यपूर्ण वाटायची.

संध्याकाळी पुण्यातून चितळेंचा खाऊ घेऊन निघायचे. १० वाजता सोलापूर. भाचा व भाची झोपलेले असायचे. तास दोन तास बहिणीशी मेव्हण्यांशी गप्पा. काय हवं नको ते बघायंच. १२ ते ५ झोप झाली की सकाळी ६ वाजता निघून १० वाजता पुण्यात हजर. कामाचा अजिबात खोळंबा व्हायचा नाही. हेच खरेतर महत्वाचे कारण होते या बसने प्रवास करण्याचे.

सोलापूरातल्या त्या चाळीतल्या लोकांना मी येऊन गेल्याचे खरे पण वाटायचे नाही. पण चितळ्यांचा खाऊ हा पुरावा असल्याने खात्री पटायची. सगळा प्रकारच अनोखा होता तो.

लई भारी's picture

9 May 2019 - 11:30 am | लई भारी

कोल्हापूर स्टॅन्ड ला अगदी हीच परिस्थिती असायची. एशियाड आणि खाजगी व्होल्वो तुफान चालत असताना शिवनेरी अशा पद्धतीने चालू केली होती की चाललीच नाही.
१० एक वर्ष कोल्हापूर-पुणे बस प्रवास असायचा पण अगदी मोजक्या वेळी असल्या २x२ व्हिडिओ कोच मधून प्रवास केलाय, त्यांची वेळेची बोंब आणि कर्कश आवाज सहन व्हायचा नाही.
कधी कधी तर ते प्रवाशी बोंबलताहेत म्हणून गाडी सोडायचे आणि पुढे जाऊन परत यू-टर्न घेऊन आहे तिथेच :)

नि३सोलपुरकर's picture

9 May 2019 - 4:09 pm | नि३सोलपुरकर

अंबिका ट्रॅव्हल्स राहिलाय , अभ्या .

उगा काहितरीच's picture

8 May 2019 - 6:12 pm | उगा काहितरीच

वाट पाहीन पण एसटीनेच जाईन ! अशा विचाराचे वडील असल्यामुळे असा प्रवास कमी झालाय.अगदी नाईलाज असला तरच खाजगी बसने प्रवास होत असे. तरी वर लिहीलेली प्रत्येक गोष्ट अनुभवलेली आहे.

प्रसाद_१९८२'s picture

8 May 2019 - 6:33 pm | प्रसाद_१९८२

पूर्वी कल्याण-उस्मानाबाद व्हिडीओ कोच एसटी बसने प्रवास केलाय. त्या एसटी बसमधील रंगीत टिव्ही व व्हिसिआर त्या बसच्या ड्रायव्हर कंडक्टरनेच विकत घेऊन बस मधे बसविला होता. एकदा त्या बसच्या कंडक्टरला त्याचे कारण विचारले असता त्यांने सांगितले की त्या रंगीत टिव्ही व व्हिसिआरमुळे त्यांची डुट्यी ह्याच मार्गावर कायम असते.

दुर्गविहारी's picture

8 May 2019 - 11:09 pm | दुर्गविहारी

मस्त लिहिले आहे. फारसा खाजगी बसने प्रवास केला नसला तरी वाचायला मजा आली.

जालिम लोशन's picture

9 May 2019 - 12:10 am | जालिम लोशन

मस्त.

सोन्या बागलाणकर's picture

9 May 2019 - 3:25 am | सोन्या बागलाणकर

आवडेश!

असले प्रवास कमी केले आहेत पण तरी थोडे फार अनुभव आहेत. त्यामुळे भावना पोचल्या.

.......व्हिडिओ कोच मधून केला.पण तो शेवटचाच.

एक क्षण पण शांतता लाभली नाही.

mrcoolguynice's picture

9 May 2019 - 11:00 am | mrcoolguynice

लेख छान....

विजुभाऊ's picture

9 May 2019 - 3:43 pm | विजुभाऊ

काय असेल समजत नाही पण ज्या ज्या वेळेस व्हिडीऑ कोच ने प्रवास केलाय त्या त्या वेळेस रामसे ब्रदर्स चेच पिक्चर हमखास पहायला मिळायचे.
मग तो प्रवास पुणे बंगलोर , मुंबई सातारा , पुणे इंदोर , पुणे बडोदा असला तरीही.

गामा पैलवान's picture

9 May 2019 - 6:49 pm | गामा पैलवान

मी २००९ साली गोव्यास गेलो होतो कोचने. नशिबाने व्हिडियो नव्हता. रात्रीचा प्रवास असल्याने झोपेत बराच वेळ गेला. गाडी व्यवस्थित चालवली. पण एकंदरीत परिस्थिती बघून परत कधी कोकणातनं रस्त्याने रात्रीचा प्रवास करायचा नाही असं ठरवलं. रात्री रेल्वे पकडून बरं पडतं. खाजगी वाहन पण नको वाटतं. अगदीच तातडीची वेळ आली तर आकाशमार्ग आहेच.

-गा.पै.

आपण आंग्लशब्दयुक्त प्रतिसाद दिल्याने सखेद आश्चर्य वाटले.

नशिबाने व्हिडियो नव्हता.

चलतचित्र ?

रात्री रेल्वे पकडून बरं पडतं.

लोहमार्गगामीणी ?

गामा पैलवान's picture

10 May 2019 - 5:10 pm | गामा पैलवान

mrcoolguynice,

समर्पक निरीक्षण आहे. शब्द आंग्ल असले तरी त्यांची व्युत्पत्ती संस्कृत/देशी आहे.

व्हिडियो <== विद् धातु
रेल्वे = रेल + वे
रेल <== री धातु
वे <== व्यय = वि + अय् धातु

धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

10 May 2019 - 5:14 pm | गामा पैलवान

वरील संदेशातली चिन्हे हटमळखुणा म्हणून वापरली गेल्याने सादरीकरण (= रेंडरींग) बिघडलं आहे. म्हणून परत लिहीतोय.

mrcoolguynice,

समर्पक निरीक्षण आहे. शब्द आंग्ल असले तरी त्यांची व्युत्पत्ती संस्कृत/देशी आहे.

व्हिडियो == विद् धातु
रेल्वे = रेल + वे
रेल == री धातु
वे == व्यय = वि + अय् धातु

धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

अभ्या..'s picture

10 May 2019 - 5:56 pm | अभ्या..

अतिशय अप्रतिम खटमलखुणा गांपै,
तुमचा प्रतिसाद पन ऐरणीच्या घणासारखा
ऐरण = आयर्न = लोह धातू
घण = घ = घासणे धातू= भांडी घासणे
भांडी +घासणे=पीतांबरी
पीतांबरी= बायकोचे माहेरपण
बायकोचे माहेरपण+रिकामा टाइम= धातूच धातू, सॉरी सॉरी धु तू.
.
जाऊदे तिच्या मायभाषेच्या प्रत्ययाला अन समिकरणाला.....

तुषार काळभोर's picture

11 May 2019 - 1:14 pm | तुषार काळभोर

त्याच ऐरण->आयर्न->आर्यन->आर्य->कार्य->क्रम-> कृ -> कृती -> खतरा-> खतरनाक सिद्धांतावर आधारित एक गाणं आठवलं.

*तळटीप - आमच्या प्रतिभेच्या आणि कल्पनेच्या उड्डाणाला मर्यादा असल्याने चूभूदेघे.

साबु's picture

9 May 2019 - 6:55 pm | साबु

कोन्डुसकरने नागपुर ला कामानिमित्त गेलेलो आहे..२-२ सिनेमे बघायचो.

नाखु's picture

9 May 2019 - 7:26 pm | नाखु

दुय्यम दर्जाची असली व्यवस्था म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशीच आहे.

हप्ते अर्थसंबध असल्यानेच मराप काही कारवाई, अटकाव करीत नाही हेच खरे दुखणं आहे

लेख उत्तम

"बापसे बेटी सवाई"

यावर विश्वास असलेला पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

फेरफटका's picture

9 May 2019 - 7:57 pm | फेरफटका

पुण्याहून नागपूर ला जायला महाराष्ट्र एक्सप्रेस नावाची, दगडुशेठ च्या कृपेनं पुण्यातून कधीतरी निघून पुढच्या ३६-४० तासात कधीतरी नागपूर ला पोहोचण्याची रेल्वे च्या सोयीच्या (!) काळात, संध्याकाळी ४ वाजता पुण्यात बसून, दुसर्या दिवशी सकाळी १० पर्यंत नागपूरात पोहोचवणार्या प्रसन्न ट्रॅव्हल्स ने एके काळी चांगलच मार्केट कॅप्चर केलं होतं. प्रायव्हेट गाडी ला प्रसन्न हा प्रतिशब्द झाला होता (फोटोकॉपी ला झेरॉक्स म्हणतात तसं).

आमच्या कॉलेज जवळून एका खाजगी कंपनीच्या गाड्या निघायच्या. आमच्या चहाच्या टपरीवर, मागच्या बाजूच्या नळावर ती बस निघण्याआधी कंपनीचा माणुस 'बिसलरी' च्या बाटल्या भरून त्या सील करत बसलेला असायचा. नंतर बर्फानं भरलेल्या घमेल्यात त्या बाटल्या ठेवायचा. :)

शेखरमोघे's picture

9 May 2019 - 8:55 pm | शेखरमोघे

खाजगीकरणाची माझी एकदम जुनी आठवण - गोवा मुक्तीकरणानन्तर एक वर्षाने गोवा "बघायला" गेलो होतो. शाळेतल्या मित्राचा मोठा भाऊ आधी वर्षभर भारतीय सैन्याचा भाग म्हणून तिथे होता, तो आमच्या बरोबर होता. अनेक लहान मोठ्या - Hino, Mercedes अशा त्याकाळातल्या अनोळखी आणि एकदम "चकाचक" असलेल्या ४०-५० "शिटान्च्या" वाहनापासून ते धडधडत आणि धडपडत चालणार्‍या ८-१० "शिटान्च्या" वाहनापर्यन्त सगळीच वाहने - खाजगी प्रवासी वाहनान्तून आम्ही तीघे ५-६ दिवस उभे आडवे गोवाभर फिरलो. आम्हाला जिथे जायचे होते त्या गावातच नव्हे तर त्या ठिकाणाच्या जवळात जवळ आम्हाला पोचवायचे हे आधीच वाटाघाटीने ठरवून आम्ही वाहनात बसत असू आणि पुढे मार्गस्थ होण्याकरता रस्त्यावर कुठेही येताना दिसणारे प्रवासी वाहन थाम्बवत असू. खाजगीकरणामुळे मिळालेली जवळ जवळ "door to door service" नन्तर कधीच अनुभवली नाही.

भंकस बाबा's picture

12 May 2019 - 10:44 am | भंकस बाबा

असा व्हिडिओ कोच प्रवास केला होता 98 साली.
मुंबई ते नाशिक, म्हात्रे पेन कंपाउंड दादर ते नाशिक.
साल्याने दादरचा टिळक पुल चारदा पार केला आणि तितक्याच वेळा एलफिंस्टन स्टेशन पण दाखवले. सीटा भरल्या पाहिजे ना!
उशीर होतो आहे बोललो, तर हायवेवर कव्हर करू बोलला.
शहेनशाह पिक्चर लावले होते. पण एकदा हाइवे पकडला चालकाने तेव्हा शहेनशाह पिक्चर राहिला बाजूला, बादशाह आपला ड्रायव्हर होता. जी तूफान गाड़ी हाणली, मधला एक सूसू ड्रॉप सोडला तर अख्खा वेळ आपला पायलट एक्सीलेटरवर उभाच होता .

भंकस बाबा's picture

12 May 2019 - 10:45 am | भंकस बाबा

असा व्हिडिओ कोच प्रवास केला होता 98 साली.
मुंबई ते नाशिक, म्हात्रे पेन कंपाउंड दादर ते नाशिक.
साल्याने दादरचा टिळक पुल चारदा पार केला आणि तितक्याच वेळा एलफिंस्टन स्टेशन पण दाखवले. सीटा भरल्या पाहिजे ना!
उशीर होतो आहे बोललो, तर हायवेवर कव्हर करू बोलला.
शहेनशाह पिक्चर लावले होते. पण एकदा हाइवे पकडला चालकाने तेव्हा शहेनशाह पिक्चर राहिला बाजूला, बादशाह आपला ड्रायव्हर होता. जी तूफान गाड़ी हाणली, मधला एक सूसू ड्रॉप सोडला तर अख्खा वेळ आपला पायलट एक्सीलेटरवर उभाच होता .

मी चिमुर कर's picture

13 May 2019 - 6:20 pm | मी चिमुर कर

एक जुनी आठवण झाली. 1995 च्या आसपास चिमुर नागपूर तीन वेळा आणि नागपूर चिमुर तीन वेळा व्हीडीओ कोच असायची. तीन तास प्रवासात एक चित्रपट पुर्ण पाहून व्हायचा. बरेच चित्रपट त्या प्रवासात पाहून झाले.
नाश्त्यासाठी एकच स्टेप, उमरेड समोर उदासा स्टापवर पोहे मिळायचे .आम्ही त्याला हळदपोहे नाव दिले होते, गर्दीमूळे आलेया भोगासी निव्वळ हळद मीठ टाकलेले चना रश्श्यासोबत मस्त लागायचे.

गड्डा झब्बू's picture

13 May 2019 - 7:30 pm | गड्डा झब्बू

मिथुनचे कैक फालतू पिक्चर बळे बळे बघाया लावले या व्हिडीओ कोच वाल्यांनी. लेख भारी लिहिल्याव.