किरमीजी शिडे

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
18 Apr 2019 - 5:57 pm

उपकार त्या युट्युबाचे. काय नाही दिले त्याने? जगाच्या कोपर्‍यात कुणा हौशाकडे असलेल्या क्लिपा, व्हिडिओ अपलोड केल्या जातात, दुसर्‍या कोपर्‍यात कुणाच्या तरी आठवणीत त्या पुसट झालेल्या पुन्हा ताज्या होतात. काय, कुठे, कसे मिळून जाईल सांगणे मुश्कील.
कलर कोड चेक करताना अचानक एका रंगाचे नाव दिसले क्रिम्सन. कोण जाणे पण क्रिम्सन नावाची आठवण ताजी झाली. नुसत्या क्रिम्सन शब्दाने किती मोठी सफर घडवली. क्रिम्सन सेल्स.
शाळेतला मी उन्हाळ्याच्या सुट्टीत हमखास मोठ्या आत्याकडे राहायचे वेध लागलेले. मोठ्या आत्याचे यजमान एअरफोर्स रिटायर्ड. कुटुंबाचा बराचसा काल पठाणकोट, अंबाला अशा ठिकाणी गेलेला. आत्येभावंडाचे फ्लुयेन्ट हिन्दीइंग्लिश आणि पुस्तकी मराठी हा जरी आम्हा इतर भावंडासाठी हसायचा विषय असला तरी त्यांचे वाचन आणि हजरजबाबीपणा आमच्यात नावालाही नव्हता.
आत्याचे घर म्हणले की आठवायचा तो प्रशस्त बंगला, तितकेच प्रशस्त मागे पुढे असणारे अंगण. पेरु, जांभळे आणि आंब्याची डेरेदार झाडे. वाळ्याचे पडदे लावलेला मोठा व्हरांडा आणि काट्यांच्या मध्यभागी मोठे होत जाणारे गायरोस्कोपिक डिझाईन असलेले घड्याळ, कॅसेटचा ढीग आणि मोठा टूइनवन, फोर्सवाल्यांची खूण म्हणजे हाताने फिरवायचे शिलाई मशीन आणि पत्र्याच्या काळ्या ट्रंका. खूप सार्‍या सामानात एक खोली भरली होती पुस्तकानी. त्या खजिन्यातच गवसले मला क्रिम्सन सेल्स.
भारत सोविएट मैत्रीच्या काळात रादुगा मॉस्कोच्या प्रकाशनाची कित्येक रशिअन पुस्तके मराठीत अनुवाद होऊन यायची. अनिल हवालदारांचे अनुवाद असत बहुधा. त्यात मिळालेली कादंबरी 'किरमीजी शिडे' अर्थात अलेक्सांद्र ग्रीन ची क्रिम्सन सेल्स. कधी १९२३ ला लिहिलेली. अनुवाद बराच नंतर झालेला.
........................
लाँग्रेन हा खलाशी सुट्टीला आपल्या घरी येतो तेंव्हा त्याला कळते की आपली बायको मेरी मुलीला जन्म देऊन स्वर्गवासी झालेली आहे. शेजारणींने त्या मुलीला सांभाळले आहे. मेरीला आजारपणात पैसे हवे असतात पण गावातील गुत्तामालक मेन्नर्स पैशासाठी तिच्याकडे अनैतिक संबधांची मागणी करतो. ती झिडकारते पण पावसात भिजून न्युमोनियाने मरते. लाँग्रेन मुलीसाठी खलाशाची नोकरी सोडतो आणि खेळण्यातील छोट्या बोटी बनवून त्या विकून उदरनिर्वाह चालू करतो. आईवेगळ्या आस्सोलचे पालनपोषण तो अत्यंत प्रेमाने करत असतो पण त्याच्या मूळच्या एकलकोंडेपणामुळे गावांशी जास्त संपर्क टाळतो. एक दिवस मेन्नर्स समुद्रात बुडत असताना शक्य असूनही तो त्याला मदत करत नाही. मेन्नर्स ही कथा सार्‍या गावकर्‍यांना सांगून मरतो. सारे गाव लाँग्रेनवर अघोषित बहिष्कार टाकते. ह्याचे पडसाद त्या चिमुरड्या आस्सोलवरही पडतात. गावातल्या मुलांच्या चेष्टेचा विषय असलेली आस्सोल मात्र तिच्या निरागस भावनात आणि वडीलांच्या बाहुपाशात सुरक्षित असते. एक दिवस त्या खेळण्यातील एक छोटे जहाज (ज्याची शिडे लालभडक सॅटिनच्या कापडाची असतात) ती ओढ्याच्या पाण्यात सोडते. ती वाहत वाहत एका भटक्याला सापडते. भटका तिला ते खेळणे परत देतो पण एक भविष्य सांगतो. एक दिवस अशाच एक लाल शिडाच्या जहाजातून एक राजपुत्र येईल आणि आस्सोलला घेऊन जाईल.
आस्सोल हे सारे बापाला सांगताना एक भिकारी ऐकतो आणि हि बातमी गावभर होते. किरमीजी शिडाची आस्सोल हे नवीन नाव तिला मिळते. बापाचा व्यवसाय फारसा चालत नसला तरी तारुण्यात पदार्पण केलेली आस्सोल ते किरमीजी शिडांचे स्वप्न उराशी जपून असते.
उमराव घराण्यातल्या लिओनेल ग्रेचा एकुलता एक वारस ऑर्थर ग्रे हा स्वभावतःच बंडखोर असतो. अभ्यासापेक्षा दर्यावर्दी जीवनाची आवड त्याला एक दिवस पळून जायला भाग पाडते. जहाजावर पोर्‍याचे काम करत करत तो खलाशी होतो, खलाशाची बढती कप्तानपदाकडे व्हायला वेळ लागत नाही. एक दिवस स्वतःचे जहाज घेऊन तो धाडसाने व्यापार चालू करतो.
एक दिवस आस्सोल रात्रभर घरातील कामे करुन भल्या पहाटे घराजवळील समुद्राशेजारी असलेल्या झाडीत फिरतानाच थोडीशी झाडाखाली लवंडते. त्याच वेळी मासे पकडण्यासाठी आलेला ग्रे तिला पाहतो. तिचे निरागस लावण्य पाहून तिच्या प्रेमात पडतो. आस्सोल झोपेत असताना खूण म्हनून एक अंगठी अलगद तिच्या बोटात सरकावून निघून जातो. गावात तिची चौकशी करताना तिच्या किरमीजी शिडांचा इतिहास त्याला समजतो.
पुढे काय? एक सुंदर परिकथा पूर्ण होते. ऑर्थर ग्रे आपल्या जहाजाला किरमीजी शिडांनी सजवूनच त्या गावात प्रवेश करतो. आस्सोलला घेऊन जातो.
.........................
कथा साधीशीच, सोपी. निरागस अन देखणी. त्या आस्सोलसारखीच.
जेंव्हा हे पुस्तक वाचले तेंव्हाच त्याच्या प्रेमात पडलो. कित्येक पारायणे केली. भाषा फारशी सुरेख नव्हती, कित्येक रशिअन संदर्भ कळायचे नाहीत पण मन मोहून टाकणारं असं काहीतरी त्यात होते. हे पुस्तक कितीजणांनी वाचलंय, ते प्रसिध्द आहे का नाही, जगात त्याबद्दल काय काय बोललं जातं हे कळायचं ते वय नव्हतं आणि गरजही नव्हती.
.........................
पुस्तके जमा करायचा अन वाचायचा काळ संपलाही पण मनात दडलेली किरमीजी शिडे एक दिवस गवसली इंटरनेटवर. तिथे मात्र पुस्तकाने क्रिम्सन सेल्स नाहीतर स्कार्लेट सेल्स नाव धारण केलेले. क्रिम्सन की स्कार्लेट. दोन्ही शेडस ब्राईट रेडच्याच. कुठल्याही दुसर्‍या रंगाचा प्रभाव नसणार्‍या. पूर्ण आरक्त.
इंटरनेटने चक्क ह्या कादंबरीवर झालेली रशिअन फिल्मही सजेस्ट केली. Алые паруса नावाची. १९६१ ला सोविएट फिल्मसने निर्मीती केलेली. आस्सोल होती अ‍ॅनास्ताशिया वर्तिनस्काया आणि ग्रे होता वासिली लेनोव्हाय. सबटायटल असलेल्या ह्या चित्रपटाने ती आस्सोल अगदी जशी मनात होती तशीच दाखवली. रुबाबदार ऑर्थर ग्रेही अगदी तस्साच. लालभडक शिडांचे जहाज कापेर्नाकडे येताना जमा झालेले सारे गाव, आश्चर्यचकीत अन भांबावलेली आस्सोल, तिला तसेच उचलून प्रेमाची कबुली देणारा अन घेणारा ऑर्थर. सजवलेल्या सिक्रेट(जहाजाचे नाव) कडे नेणारा कप्तान ऑर्थर. शेवटी निरागसपणे "माझ्या लाँग्रेनला घेशील ना बरोबर?" हा प्रश्न विचारणारी अन ग्रे च्या होकारानंतर समाधानाने त्याच्या कुशीत विसावणारी आस्सोल.
आह्ह्ह. व्हरांड्यातल्या कोपर्‍यात बसून ते पुस्तक वाचतानाचा एकेक क्षण पुन्हा अनुभवला गेला. अगदी यथार्थपणे उभा झाला. इतक्या बॉलीवूडी, हॉलीवूडी अन साउथी फिल्मस्च्या मारधाडी पाहून ह्या साध्यासुध्या अन इतक्या जुन्या चित्रपटात मी का गुंतलो गेलो? की आधी गुंतलेला मी फक्त हे क्षण शोधित होतो? तो निरागसपणा नसेल आजच्या जगात पण आस्सोल अन ग्रे भेटल्यावर उगीच डोळे ओले झाल्यासारखे का वाटले कुणास ठाऊक.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

बऱ्याच दिवसांनी काहीतरी भारी.
थ्यांक यू!

तेजस आठवले's picture

18 Apr 2019 - 6:36 pm | तेजस आठवले

छान लिहिलं आहे.लहानपणी वाचलेल्या ज्या पुस्तकांनी आपण बालपणी भारावून गेलेलो असतो, ते पुस्तक नंतर परत हातात पडल्यानंतर होणार आनंद हा अविस्मरणीय असतो.

उगा काहितरीच's picture

18 Apr 2019 - 7:04 pm | उगा काहितरीच

छान लेख. आवडला !

शेखरमोघे's picture

18 Apr 2019 - 7:14 pm | शेखरमोघे

छान लिहिले आहे.

अभ्या..'s picture

19 Apr 2019 - 1:38 pm | अभ्या..

धन्यवाद मोघेसाहेब, यशोमैय्या, तेजस आणि उकासाहेब.

चांदणे संदीप's picture

18 Apr 2019 - 7:15 pm | चांदणे संदीप

बऱ्याच वर्षांनी जुनं आठवणीतलं काहीतरी सापडावं यासारखा आनंद नाही.

चित्रपट सवडीने पाहिला जाईल त्याआधी पुस्तक वाचून काढले पाहिजे.

यूट्यूबवर थोडी सुरूवात पाहिली आत्ताच, लॉंग्रेन तर डिट्टो अब्राहम लिंकनच दिसू राहिला. लोल!

Sandy

अभ्या..'s picture

19 Apr 2019 - 1:39 pm | अभ्या..

पुस्तकच वाच सॅन्डीबाबा,
माझ्याकडे वर्ड किंवा पीडीएफ आहे इंग्लिश मध्ये. व्हाटसपावर पाठवीन म्हन्लास तर.
नंतर पिक्चर बघ.

पद्मावति's picture

18 Apr 2019 - 8:19 pm | पद्मावति

सुरेख लिहिलंय.

कुमार१'s picture

18 Apr 2019 - 8:28 pm | कुमार१

छान लिहिलं आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Apr 2019 - 9:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

मनोगत सुंदर शब्दबद्ध केले आहे !

अभ्या..'s picture

19 Apr 2019 - 1:40 pm | अभ्या..

थ्यांक्स पद्माक्का, डॉक्टरसाहेब आणि एक्काकाका.
खूप धन्यवाद

चित्रगुप्त's picture

19 Apr 2019 - 12:33 am | चित्रगुप्त

..

बालपणीचा काळ सुखाचा ... त्यातल्या त्या रम्य आठवणी, त्यात रुतून बसलेले किरमिजी शिडांचे जहाज...... आणि आता मोठेपणी पुन्हा तो खजिना एका सुंदर चित्रपटातून गवसणे.... सारेच अद्भुत, सुरस आणि चमत्कारिक.... आणि हे सर्व इथे ओघवत्या भाषेत इथे मांडले याबद्दल शतशः धन्यवाद.
बालपणी चांदोबा आणि टारझन मधे गुंग झालो, पुढे मुलांच्या बालपणी जितके मिळाले तेवढे सुंदर चित्रांनी नटलेले रशियन आणि चिनी बालसाहित्य आणले. अजून तो सगळा खजिना जपून ठेवलेला आहे.
खरोखर जगभरातल्या असंख्य कलावंतांनी चित्रित करून ठेवलेले बालसाहित्य हा एक अनमोल खजिनाच आहे.
आणि आता यूट्यूबवर तर विचारायलाच नको.

अभ्या..'s picture

19 Apr 2019 - 1:41 pm | अभ्या..

मस्त चित्रे चित्रगुप्तजी.
तुमच्या खजिन्याचा हेवा वाटतो हो.

चित्रगुप्त's picture

19 Apr 2019 - 2:39 pm | चित्रगुप्त

@ अभ्या; ..... तुमच्या खजिन्याचा हेवा वाटतो हो.....
हे बरे सांगितले. कारण मुले आता 'बाप' बनलीत, आणि परदेशात वाढणार्‍या त्यांच्या लेकरांना त्या जुन्या पुस्तकात रुची असण्याची शक्यता कमीच आहे. पुढे (लवकरच) व्याप आवरता घेताना हा खजिना कुणाला सोपवायचा, हा प्रश्न आता सुटला.

चित्रगुप्तजी, ज्यांची चित्रे बघून बघून आम्ही मोठे झालो त्या प्रत्यक्ष चित्रकाराचा स्नेह लाभणे हाच मोट्ठा खजिना आहे आमच्यासाठी.

राघवेंद्र's picture

19 Apr 2019 - 2:06 am | राघवेंद्र

मस्त बे अभ्या !!!
सिनेमा बघण्यात येईल

रुपी's picture

19 Apr 2019 - 4:21 am | रुपी

सुरेख लिहिलंय!
वाचायच्या पुस्तकांच्या यादीत टाकलं. सिनेमा उपलब्ध असला तरी शक्यतो जमलं तर आधी पुस्तक वाचायला जास्त आवडेल.

पुस्तक आणि चित्रपटाचा परिचय आवडलाच. पण ते आत्याच्या घराचंही वर्णन छान केलंय. मनाने त्या व्हरांड्यात बागडून आले :)

थ्यांन्कू राघवेन्द्रा आणि रुपी.
@रुपी: अ‍ॅक्चुअली आत्याचे घर हा स्वतंत्र लेखनाचाच विषय आहे पण किरमीजी शिडे गवसली तिथेच तेंव्हा उल्लेख आला. खरोखर भारी होते ते सोलापूरातले घर.
पुस्तकाची पीडीएफ लिंक देईन मी हुडकून. आहे आंतरजालावर.
एक दिवस मलाच त्याचा अनुवाद करायची हुक्की आलेली. सुरुवात केली अन लैच मोठ्या शिवधनुष्याला हात घातल्यागत झाले. जमल्यास करीनही ते कधीतरी.
हा बघ मासला.
..............
दहा वर्षाच्या नोकरी नंतर लाँग्रेनने 'ओरायन' या तीनशे टनी मालवाहू जहाजाचा निरोप घेतला. आईच्या कडेवर चिकटून बसायची सवय असलेल्या मुलासारखी समुद्राची सवय झालेल्या या खलाशाला समुद्राचा विरह सोसवत नव्हता.
पण परिस्थितीच तशी होती. प्रत्येक वेळी घरी येताना लांबूनच हात ऊंचावून धपापत्या उराने त्याच्याकडे पळत येणारी मेरी आज नव्हती. त्याएवजी त्याची वाट पाहात होते घरातल्या मोडक्या वस्तूत भर झालेला एक पाळ्णा आणि त्याशेजारी खिन्न उभी असलेली शेजारीण !
"मी हिला तीन महिन्यापासून सांभाळतेय" शेजारीण म्हणाली "ही तुझी मुलगी..."
त्याच्या दाढीकडे लुकलुकत्या नजरेने पाहणार्या त्या मांसाच्या गोळ्याकडे लॉग्रेन वाकून विदिर्ण अंतःकरणाने बघत राहीला. थोड्या वेळाने तो खाली बसला अन जणू काही पावसात भिजल्याप्रमाणे मिशीला पीळ देत राहिला.
"मेरी कधी गेली..?" त्याने विचारले.
शेजारणीने ती शोकांतिका परत सांगायला सुरुवात केली. बाळाला खेळवता खेळवता तिने लाँग्रेनला ग्वाही दिली की मेरी स्वर्गातच असणार. अज्ञातापलिकडे निघून गेलेल्या मेरीला, एका साध्या कंदिलाच्या प्रकाशातली ती लाकडी खोली आणि एकत्र असलेले तिघे हेच स्वर्गापेक्षा जास्त प्रकाशमान वाटले असते....
तीन महिन्यापूर्वीच त्या दुर्दैवी मातेची पैशाची पुंजी संपत आली होती. खर्चासाठी म्हणून लाँग्रेनने ठेवलेल्या पैशातले निम्मे अधिक तर तिच्या बाळाच्या औषधोपचारासाठीच खर्च होऊन गेले होते. शेवटची पेनी संपल्यावर मात्र तिला मेन्नर पुढे हात पसरण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. एक दारुचा गुत्ता आणि लहानसे दुकान चालवणारा मेन्नर त्या लहानशा गावातला सावकार होता.
..........................

शिव कन्या's picture

4 May 2019 - 10:46 am | शिव कन्या

काळजाला हात घालणारे लेखन. फार फार आवडले.
वाचल्या क्षणापासून विचार करत आहे.
अनुवादाचे मनावर घ्याच.

टर्मीनेटर's picture

6 May 2019 - 10:54 am | टर्मीनेटर

एक दिवस मलाच त्याचा अनुवाद करायची हुक्की आलेली. सुरुवात केली अन लैच मोठ्या शिवधनुष्याला हात घातल्यागत झाले. जमल्यास करीनही ते कधीतरी.
हा बघ मासला.

झलक वाचूनच हे शिवधनुष्य तुम्ही लीलया पेलाल ह्याची खात्रीच पटली. अनुवादाचे मनावर घ्याच आता!
छान लिहिलंय, आवडलं!

महासंग्राम's picture

19 Apr 2019 - 9:36 am | महासंग्राम

भारी अभ्या शेठ, चित्रपट पहाणार आता.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Apr 2019 - 10:32 am | ज्ञानोबाचे पैजार

आता नियमित लिहायचे मनावर घ्या अभ्याशेठ
पैजारबुवा,

गोरगावलेकर's picture

19 Apr 2019 - 12:39 pm | गोरगावलेकर

खूप छान. मराठी अनुवाद मिळाला तर निश्चित वाचणार.

खिलजि's picture

19 Apr 2019 - 12:55 pm | खिलजि

अपना भी एक सपना हय

तेरेजैसा लिखणा हय

सुंदर सुशील शालीन सोज्वळ ओघवते आणि बरेच काही

माझ्याकडे शीड आहे पण ती नौका नाही

किरमिजी शिडे वाचले , खूप आवडले

म्हणून लगेच रामदास आठवले

अभ्या..'s picture

19 Apr 2019 - 12:58 pm | अभ्या..

अरारा,
लैच तुपातले लिखाण झाले काय?
पुढच्या धाग्यात विणू कायतरी निब्बार.

खिलजि's picture

19 Apr 2019 - 12:59 pm | खिलजि

येक नंबर लिखाण झालेय मित्रा .. बोलायचेच काम न्हाय

अनिंद्य's picture

19 Apr 2019 - 2:20 pm | अनिंद्य

@ अभ्या..,

ओघवते लेखन आणि 'पेनफुल यट स्वीट' कथा - आवडली. ...... being simple is the most difficult thing !

चित्रगुप्त यांची सुस्वरूप चित्रे पण अगदी अनुरूप.

उपेक्षित's picture

19 Apr 2019 - 7:56 pm | उपेक्षित

अतिशय सुंदर लिखाण अभ्या भौ.

लहानपणीचा काळ वेगळाच असतो राव.

सुंदर ओळख. चित्रपट नक्की बघेन.

अभ्या..'s picture

20 Apr 2019 - 1:38 pm | अभ्या..

धन्यवाद मंदारा, आमचे माऊली, गोरगावलेकर, दोस्त खिलजी, अनिंद्यराव, उपेक्षितराव आणि वीणाताई.
खूप खूप धन्यवाद.

अनन्त्_यात्री's picture

20 Apr 2019 - 6:04 pm | अनन्त्_यात्री

अभ्या.. टच ! मस्त!

एमी's picture

20 Apr 2019 - 6:36 pm | एमी

मस्त लिहलंय!

संजय पाटिल's picture

21 Apr 2019 - 1:04 pm | संजय पाटिल

मस्तच हो...
पुस्तकाच्या पिडीयेफ ची लिंक असेल तर व्यनी करा म्हणजे आधी पुस्तक वाचून मग तूनळी वर बघतो..

चौथा कोनाडा's picture

21 Apr 2019 - 10:40 pm | चौथा कोनाडा

वाह, अतिशय सुंदर निरागस ओळख !

बालपणी वाचलेल्या काही कहाण्यांची आठवण झाली.

बालपणी पाहिलेलं ते जग, त्या अनुभव मनात पिंपळपानागत जपून ठेवलेल्या अश्या आठवणीचा पुनः प्रत्यय या लेखाने दिला !

अभ्या __/\__

मास्टरमाईन्ड's picture

22 Apr 2019 - 2:10 pm | मास्टरमाईन्ड

माझ्याकडे होतं "किरमिजी शिडे" मराठी अनुवाद.

बालपणी पाहिलेलं ते जग, त्या अनुभव मनात पिंपळपानागत जपून ठेवलेल्या अश्या आठवणीचा पुनः प्रत्यय या लेखाने दिला !

एकदम पटलं

पाषाणभेद's picture

22 Apr 2019 - 3:47 pm | पाषाणभेद

Video unavailable असे सांगतेय.
निट लिंक द्या.
अन हो. जग गोल आहे. कधीना कधी मनी वंचीताची भेट होतेचे.

अभ्या..'s picture

22 Apr 2019 - 4:08 pm | अभ्या..

कायतरी घोळ आहे दफोराव,
तुम्ही युट्युबावर स्कार्लेट सेल्स सर्च मारा. सापडेल.

पाषाणभेद's picture

6 May 2019 - 4:01 pm | पाषाणभेद

नाही सापडले. कृपया लिंक द्या.

तुषार काळभोर's picture

6 May 2019 - 8:32 pm | तुषार काळभोर
अभ्या..'s picture

6 May 2019 - 9:38 pm | अभ्या..

स्पसिबा हिंदकेसरी

तुषार काळभोर's picture

6 May 2019 - 10:05 pm | तुषार काळभोर

वाटलंच होतं!!
स्पसीबा वाचल्यावर मला जे अभिप्रेत होतं, ते गुगळेबाबाने बरोबर ठरवलं.
;)
-पै. झिबिस्को

ताक- वेलकम लिहायचा प्रयत्न केला पण त्याचा उच्चार चौदा वेळा ऐकूनपण जमाना.

अभ्या..'s picture

6 May 2019 - 10:12 pm | अभ्या..

वेलकम - दोब्रो पोझाल्वेत
.
बादवे रुस्तुमेहिंद हरबानसिंग आणि झिबिस्कोच्या फाईटची बालभारतीतली चित्रे आठवली. ;)

सेम सिल्याबस बॅच असतंय की रे.. आपलं ..

प्रचेतस's picture

22 Apr 2019 - 10:28 pm | प्रचेतस

जबरीच.
लेखनशैली तर भन्नाटच.
लिहीत राहा.

प्रभू-प्रसाद's picture

22 Apr 2019 - 11:05 pm | प्रभू-प्रसाद
प्रभू-प्रसाद's picture

22 Apr 2019 - 11:06 pm | प्रभू-प्रसाद
mayu4u's picture

23 Apr 2019 - 11:59 am | mayu4u

परिचय आवडला. अनुवादाचा प्रयत्न पण मस्त जमलाय. पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे.

श्वेता२४'s picture

23 Apr 2019 - 1:12 pm | श्वेता२४

कसं काय वाचायचं राहून गेलं कुणास ठाऊक. अतीशय आवडलं तुमचं लिखाण

तुषार काळभोर's picture

23 Apr 2019 - 4:54 pm | तुषार काळभोर

अभ्या एक्दाच येतो अन धुराळा करून जातो!
लेख आवडला.
लेखातली गोष्ट आवडली. वाचायला पाहिजे. परीकथा अशी पाहिजे (आयुष्य नाही!). डोळ्यातून पाणी काढणारं बालपण अन मग हेवा वाटावा असं तारुण्य!

बंगल्याचं वर्णन आवडलं. अशा एका बंगल्यात ४-५ वेळा जाणं झालंय. जन वैद्य मार्ग ( क्वीन्स गार्डन परिसर ) सरकारी अधिकार्‍यांची घरं आहेत. तिथं एका घरी. सहा-आठ गुंठ्याचा प्लॉट अन त्यात अडिच तीन हजार स्क्वे फुटाचा एकमजली बंगला. बाहेर एक २००-२५० स्क्वे फुटाचं औटहौस. आणि बाकी लॉन. बरीच झाडं (वृक्ष!).

book

लई भारी's picture

30 Apr 2019 - 4:11 pm | लई भारी

सुटून गेलं होत वाचायचं. खूप आवडलं!

रातराणी's picture

3 May 2019 - 10:21 am | रातराणी

बालपणीच्या आठवणीत रमायला लागलास. म्हातारपणी आठवणीत रमता यावं म्हणून आताही तसाच निरागस रहा हो..
- अभ्याची ताई

जोक्स अपार्ट, फार छान शब्दात गुंफलीस आसोल. आवडली.

मुक्त विहारि's picture

6 May 2019 - 1:34 am | मुक्त विहारि

मस्त.

जालिम लोशन's picture

6 May 2019 - 11:52 pm | जालिम लोशन

सुरेख

श्रीरंग_जोशी's picture

20 May 2019 - 8:27 am | श्रीरंग_जोशी

रशियन बाल / कुमार साहित्य याबाबतच्या आठवणींचे उल्लेख व ही कथा दोन्हीही खूप भावले.

लहानपणी वाचलेली मूळची रशियन पण अनुवादित पुस्तके आठवली (इवान, माणुस महाबलाढ्य प्राणी कसा बनला?, माणसाने पृथ्वीच्या आकाराचा शोध कसा घेतला इत्यादी). त्या पुस्तकांसारखा गुळगुळीत कागद पुन्हा कधी आढळला नाही.

चौथा कोनाडा's picture

20 May 2019 - 1:43 pm | चौथा कोनाडा

+१

त्या काळी सोव्हिएत देश आणि सोविएत रशिया अशी दोन मासिकं यायची, त्यांचे कागद पण बऱ्यापैकी गुळगुळीत असायचे.
त्यात सुंदर रशियन कथांची मेजवानी असायची, छान छान चित्रं असायची, त्याची सुखद आठवण झाली या कमेंटमुळे.

अनिंद्य's picture

29 May 2019 - 6:25 pm | अनिंद्य

+१

कथा आणि वैज्ञानिक विषयांवरचे लेखन, उत्तम छपाई आणि गुळगुळीत कागद. चंगळ वाटायची लहानपणी.

रशियन आणि जर्मन साहित्य टपालानी येणारे आमचे बहुदा एकटेच घर होते त्या आडवाटेच्या छोट्या शहरात.

सुधीर कांदळकर's picture

21 May 2019 - 9:21 pm | सुधीर कांदळकर

साहित्याबद्दल लिहावे तेवढे थोडेच. बेल्कीनच्या कथा सुंदरच. काही वर्षापूर्वी सुनीति अशोक देशपांडे यांनी मटामध्ये अनुवादित केल्या होत्या. मोत्सार्टच्या जीवनातली मछळ कोणत्या भाषेतील आठवत नाही.

छान काहीतरी वाचायला दिलेत. धन्यवाद

मंदार कात्रे's picture

30 May 2019 - 1:15 am | मंदार कात्रे

सुरेख लिहिलंय!

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

31 May 2019 - 1:57 pm | प्रलयनाथ गेंडास...

छान लिहिलंय!

diggi12's picture

15 Sep 2024 - 2:59 am | diggi12

सुंदर