भर्तृहरी एक राजा व महाकवि देखील होता. त्याच्या उत्तरकाळात त्याने तीन मुख्य काव्यरचना केल्या. त्यापुढे शतकत्रयी नावाने प्रसिध्दीस पावल्या. यातीलल एक आहे नीतिशतकम.
या मध्ये एक रचना येते ती अशी
सागरशुक्तिसंपुटगतं सन्मौक्तिकं जायते !
याचा अर्थ असा की स्वाति नक्षत्रामध्ये होणा-या पावसाचे थेंब जर शिंपल्यांमध्ये गेले तर त्याचे मोती होतात. भर्तृहरीचा काळ ठरविण्यात अजुनही अभ्यासकांची एकवाक्यता नाहीये. पण १५०० ते २००० वर्षापुर्वीचा त्याचा काळ असावा असा अंदाज आहे. याचा अर्थ स्वाति सोबतच इतरही नक्षत्रांविषयी आपल्या पुर्वजांस किमान १५०० वर्षापुर्वीपासुन ज्ञान होते हे लक्षणीय आहे.
ज्यास आपण वैदिक काळ म्हणु शकतो त्या काळापासुनच स्वाति नक्षत्रास विशेष महत्व आहे. अथर्व संहिता म्हणते –
स्वातिः सुखो मे अस्तु !
म्हणजे स्वाति नक्षत्र आमच्या साठी सुखकारक होवो. याच संदर्भामध्ये आणखी एक लोककथा भारतात हजारो वर्षांपासुन प्रचलित आहे. चातक नावाचा पक्षी उन्हाळ्यात याच नक्षत्राकडे पाहुन इतका मुग्ध होतो की या नक्षत्रातील पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत तो पृथ्वीवरील दुसरे कुठलेच पाणी पिण्याचे टाळतो. व स्वाति नक्षत्रातील पहिल्यापावसाचे थेंब अलगद चोचीमध्ये झेलुन आपली तहान भागवतो. अर्थात ही केवळ कवि कल्पनाच आहे. वास्तव नाही. सोबतच भागवतामध्ये देखील पुढील रोचक मिथके सापडतात. स्वाति नक्षत्रातील हेच थेंब जर सापाच्या मुखामध्ये पडतील तर त्याचे विष बनते व जर केळीच्या पानावर पडतील तर त्यापासुन कर्पुर बनतो.
स्वाति शब्दाचा अर्थ तलवार असा देखील आहे. पण भारतीय खगोल शास्त्रामध्ये याकडे एक मोती म्हणुनच पाहिले जाते.
स्वाति नक्षत्र ओळखणे अगदी सोपे आहे. यापुर्वी लिहिलेल्या लेखांमधील चित्रा, सप्तर्षी जर तुम्हाला ओळखता आले तर स्वाति ओळखणे अगदीच सोपे आहे. खालील आकृती पहा.
सप्तर्षी च्या शेवटच्या ता-यापासुन निघणारी ही वर्तुळाकार रेषा, सर्वप्रथम स्वाति या नक्षत्राला छेदते व मग पुढे चित्रा व हस्त या नक्षत्रांपर्यंत जाते.
ही जी आकृती आहे हिलाच म्हणतात आकाशातील मोतीमाळ. यातील कविकल्पना अशी आहे की सप्तर्षीमधील शेवटुन चार ता-यांशी एखादा मोती जर ठेवला तर तो घरंगळत स्वाति नक्षत्रापर्यंत येऊन, तिथुन पुढे चित्रा नक्षत्राच्या पुढे जाऊन हस्त नक्षत्रामध्ये म्हणजे प्रजापतीच्या हातामध्ये स्थिरावेल. तुम्ही जर कधी निरभ्र व नितळ आकाशामध्ये या चार ही नक्षत्रांना (सप्तर्षी, स्वाति, चित्रा व हस्त ) एका दृष्टीक्षेपामध्ये पाहिले तर तुम्हाला ही कविकल्पना मनापासुन पटेल. हिच आहे आकाशातील मोतीमाळ.
स्वाति नक्षत्र व अर्जुन वृक्षाचा संबंध आपल्या पुर्वजांनी जोडला आहे. नक्षत्रवन नावाची जी संकल्पना आहे त्यात २७ नक्षत्रांच्या २७ वृक्षांसाठी विशिष्ट रचनेमध्ये वृक्षारोपण केले जाते. त्यातच स्वाति साठी अर्जुन वृक्षाचे योजना केली आहे.
पाश्चात्य व आधुनिक खगोल व ज्योतिषामध्ये स्वाति नक्षत्राचा जो मुख्य तारा आहे त्यास Arcturus असे म्हणतात. Arcturus हा तारा आकाशातील २० सर्वात तेजस्वी ता-यांच्या क्रमवारीमध्ये सहाव्या क्रमांकाचा सर्वात तेजस्वी, प्रकाशमान तारा आहे. Arcturus तारा ज्या तारकामंडलाचा भाग आहे त्यास बुईटीज किंवा बोयटीज असे म्हणतात.
Bootes चा शब्दशः अर्थ आहे गुराखी. किंवा त्याकडे अस्वलांना लांब हुसकावुन लावणारा गुराखी म्हणुन देखील युनानी लोकांनी पाहिले. त्याच्यासोबत दोन कुत्रे देखील आहे, जे गुराख्याच्या वर दिसताहेत. खालील आकृत्या पहा.
टॉलेमी नावाच्या युनानी खगोलविदाने इसवीसनाच्या दुस-या शतकात ज्या ४८ नक्षत्रांची ओळख केली त्यामध्ये बुईटीज चा समावेश आहे. सोबतच आधुनिक खगोलशास्त्राने देखील जी ८८ तारकामंडले प्रमाण म्हणुन मांडली आहेत त्यात देखील याचा समावेश आहे. भारतीय भाषांमध्ये यास भुतेश किंवा भुतप असे ही म्हणतात.
प्राचीन बेबिलोन संस्कृतीमध्ये या तारकामंडलीतील ता-यांना शु पा असे म्हंटले जायचे. प्राचीन बेबिलोन मधील शेतक-यांचा प्रमुख व नंतर देवता म्हणुन नावारुपस आलेल्या एलिल (Elil) हा देव, म्हणजेच आकाशातील बुईटीज तारकापुंज. त्यामुळे यास नांगरणीचा शोध लावणारा असे देखील पाहिले जाते. याचा संबंध शेतीशी जोडला आहे. त्यामुळे चित्रामध्ये तुम्हाला गुराख्याच्या हातामध्ये खुरपे देखील दिसेल. दिसले का?
प्राचीन इजिप्त मध्ये या तारकापुंजाकडे प्राण्याचा पुढचा पाय म्हणुन पाहिले जायचे.
प्राचीन ग्रीक मधील होमर नावाच्या एका महाकविने या तारकापुंजाचा पहिला उल्लेख केला. त्याच्या ओडीसी या काव्यामध्ये त्याने या तारकापुंजाकडे समुद्रातील प्रवासासाठीचे दिशाज्ञानासाठीचा एक बिंदु म्हणुन पाहिले. प्राचीन ग्रीममध्ये या तारकापुंजाकडे नांगरणी करणारा शेतकरी म्ह्णुन पाहिले आहे. जर शेतकरी आहे तर मग नांगर कुठय? तर आपण ज्याला सप्तर्षी म्हणतो त्यालाच प्राचीन ग्रीक मध्ये नांगर म्हणायचे.
प्राचीन काळात लॅटीन लेखक होऊन गेला, त्याचे नाव हाय्जीनस. त्याच्या साहित्यामध्ये आयकेरीयस नावाच्या एका शेतक-याला स्वर्गातील देव, डायोनिसस याने द्राक्षापासुन मदिरा बनविण्याची कला शिकविली. एकदा त्याने आयकेरीयस ने उच्च प्रतीची मदिरा घरी बनवली व तिचा आस्वाद घेण्यासाठी गावातीलच मित्रांना आमंत्रित केले. त्याची मदिरा इतकी चांगली होती की तिचा प्रभाव मित्रांवर इतका झाला की त्यांना दुस-या दिवशी पर्यंत शुध्दच नव्हती. काय झाले याविषयी अनभिज्ञ असल्याने, त्या मित्रांना असे वाटले की आयकेरीयस ने मित्रांना विषप्रयोग करुन मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या मित्रांनी आयकेरीयसची हत्या केली. आयकेरीयसच्या कुत्र्याने धावत जाऊन त्याच्या मुलीला, एरीगोन ला, मृतदेहाजवळ आणले. मग काही वेळाने कुत्रा व एरीगोन या दोघांनी ही आत्महत्या केली. स्वर्गातील देव, झिऊस नी मग या तिघांनाही उचित सन्मान मिळावा म्हणुन स्वर्गात स्थान दिले. त्यातील आयकेरीयस म्हणजेच बुईटीज, एरीगोन म्हणजे कन्या राशी व कुत्रा म्हणजे सिरीयस तारा (सिरीयस तारा म्हणजे मृगनक्षत्रातील व्याध)
ग्रीक पुराणांमध्ये आणखी एक कथा येते. यात देवाधिदेव झिऊस चे मन कॅलिस्टो नावाच्या आर्टेमिस च्या दलातील एका कन्येवर येते. झिऊस देव आहे. तरीदेखील कॅलिस्टो शरीरसंबंधांना तयार होईल की नाही याची खात्री नसल्याने, तो आर्टेमिसच्या रुपात येऊन कॅलोस्टो सोबत शरीरसंबंध प्रस्थापित करतो. त्यामुळे तिला गर्भ राह्तो. आर्टेमिस ला हे समजल्यावर कॅलिस्टो ला ची हकालपट्टी करण्यात येते. मुलाचा जन्म होतो. व त्याचे आजोबा लायकान मुलाचा सांभाळ करतात. लाकयान हा अर्केडिया राज्याचा राजा असतो. एकदा झिऊस लायकन कडे जेवणासाठी जातो. आलेला पाहुणा खरच देवांचा राजा झिऊस आहे का याची परीक्षा घेण्यासाठी, लायकन, स्वतःच्या नातवाला मारुन त्याचे मांस झिऊस ला खाऊ घालतो. झिऊस ला हे समजल्यावर, तो रागावुन लायकन ला कोल्हा बनण्याचा शाप देतो व नातवास, म्हणजेच स्वःतच्या मुलास पुनः जिवंत करतो. त्या मुलाचे नाव आर्कस असे आहे.
झिऊस ची बायको हेरा, हिला जेव्हा कॅलोस्टो बाबत समजते तेव्हा ती, कॅलिस्टो ला अस्वल बनवते. हे मादी अस्वल जंगलामध्ये फिरत असताना, एकदा आर्कस च्या समोर येते. आर्कस त्या जंगली अस्वलास मारणार इतक्यात झिऊस प्रकट होऊन कॅलोस्टो ला आकाशात स्थापित करतो. तिलाचा आपण सप्तर्षी म्हणजे उर्सा मेजर म्हणतो. व तिच्या रक्षणासाठी आर्कसला देखील आकाशात स्थान देतो. तो म्हणजे Arcturus म्हणजेच स्वाति.
प्राचीन चीन मध्ये देखील या तारकामंडलास खुच महत्व होते. त्यांच्या नवीन वर्षाच्या सुरुवात याच तारकामंडलाच्या स्थानावरुन निर्धारीत केली जायची. या तारकामंडलास निळ्या ड्रॅगचा शिरपेच देखील मानले गेले आहे.
प्राचीन मुळ अमेरीकन संस्कृतीमध्ये, ता तारकापुंजाकडे मासे पकडण्यासाठी वापरले जाणारे साधन, किंवा फास म्हणुन पाहिले जायचे.
काही वैज्ञानिक तथ्ये
स्वाति नक्षत्र व तारा, आपल्यापासुन ३७ प्रकाशवर्षे इतका दुर आहे. आपल्या सुर्यापेक्षा २५ पट मोठा असलेला हा तारा, पृष्टभागाच्या तापमानाच्या बाबतीत सुर्यापेक्षा कमी उष्ण आहे. सुर्याचे पृष्टभागाचे तापमान ६००० डिग्री इतके तर स्वातिचे ५००० डिग्री इतके आहे.
हा तारा आपल्याला इतका जवळ आहे याच्यापासुन उत्सर्जित होणा-या उर्जेचा उपयोग अंतरीक्षामध्ये सोडल्या जाणा-या मानवविरहित यानांना ऊर्जा मिळविण्यासाठी कसा करता येईल याचा ही अभ्यास शास्त्रज्ञ करीत आहेत.
सुर्य स्थिर आहे तसेच आकाशातील सर्वच तारे स्थिर आहेत असा समज पुर्वी होता. पण समज चुकीचा ठरला तो स्वाति या ता-याच्या अभ्यासामुळेच. सर एडमंड हेली यांनी १७१७ मध्ये, या ता-याच्या गतिचा अभ्यास केला व जगजाहीर केला. हेली यांच्या या शोधामुळे खगोलसम्शोधनाला एक नवीनच दिशा मिळाली.
भुतप म्हणजेच बुईटीज च्या पुर्वेला थोड्याच अंतरावर कोरोना बोरीयलीस नावाचे आणखी एक छोटे तारकामंडळ आहे. याच उत्तरेकडील मुकुट म्हणतात. युनानी, रोमन व यहुदी लोक या तारकामंडलाकडे मुकुट किंवा मोतेमाळ म्हणुन पाहायचे.
स्वाति नक्षत्राच्या थोडे वर, पुर्वेकडे M3 नावाचा एक तारकापुंज, आपणास, चंद्रप्रकाश विरहीत रात्री, उघड्या डोळ्यांना देखील दिसतो. या तारकागुच्छामध्ये ३० हजार तारे आहेत. दुर्बिणीमधुन हा तारकागुच्छ अधिक तेजस्वी दिसतो. खालील छायाचित्र पहा.
हा तारकागुच्छ आपल्या पासुन ४५००० प्रकाशवर्षे इतका दुर असुन, तो दर सेकंदाला १५० किमी या वेगाने आपल्या सौरमालेकडे सरकत आहे.
आकाशातील चित्तरकथांच्या या मालिकेमध्ये आपण आजवर अनेक नक्षत्रे, राशी, तारकामंडले याविषयी खोलवर माहिती घेतले आहे.
भारतामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व आकाशदर्शनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी व भविष्यातील महान अंतराळ संशोधक भारतात निपजण्यासाठी आपणास हे ज्ञान आपल्या नागरीक, मुलांमध्ये पसरवले पाहिजे. अवश्य लेख शेयर करा.
आमच्या लेखांविषयी अपडेट्स मिळविण्यासाठी, पेज च्या शेवटी असलेल्या बॉक्स मध्ये आपला इमेल ॲड्रेस लिहुन ‘GO’ या बटणावर क्लिक करा.
कळावे,
आपला
हेमंत सिताराम ववले
निसर्गशाळा
प्रतिक्रिया
11 Apr 2019 - 2:24 pm | यशोधरा
छान माहिती देत आहात. धन्यवाद.
11 Apr 2019 - 5:32 pm | चांदणे संदीप
अद्भुतरम्य!
Sandy
11 Apr 2019 - 8:09 pm | कंजूस
वा छानच माहिती.
12 Apr 2019 - 10:48 am | ज्ञानोबाचे पैजार
मस्त माहिती,
मजा येते आहे वाचायला.
पैजारबुवा,