लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग २

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
10 Apr 2019 - 7:45 am

(या आधी मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते. ती चूक आता सुधारली आहे)

भाग १: http://www.misalpav.com/node/44368#comment-1030023

१८५७ सालाच्या काही काळ आधी दिल्लीच्या भवितव्याबद्दलच्या इंग्रजांच्या काही हालचाली पडद्यामागे सुरू होत्या. कांही वर्षांपासूनच मुघल बादशाहीचा भारतावरचा जो काही पगडा शिल्लक राहिला होता तो देखील कसा कमी होईल किंवा काढूनच टाकता येईल आणि "बहादूरशहानंतर काय" हा विचार इंग्रजांच्या डोक्यांत सुरू झाला होता. दिल्लीची आणखी "छाटणी" करण्याकरता मिर्झा फक्रु या बहादुशाहाच्या सगळ्यांत मोठ्या शहाजाद्याबरोबर केलेल्या एका गुप्त करारानुसार इंग्रजांनी "लाल किल्ला रिकामा करून इंग्रजांच्या ताब्यात देणे आणि राज्यकारभाराची जागा मेहरौलीला हलवणे" या अटींवर बहादूरशहानंतर त्याला गादीवर बसवण्यास पाठिंबा दाखवला होता. तरीसुद्धा (कदाचित या गुप्त कराराची माहिती नसल्याने) बादशहाची सगळ्यांत तरुण राणी बेगम झीनत महल ही आपल्या "मिर्झा जवान बख्त" या मुलाला बहादूरशहानंतर गादीवर बसवण्यास इंग्रजांचा पाठिंबा मिळवण्याकरता खटपट करत होती आणि त्याकरता तिने कांही मातब्बर इंग्रज आणि इंग्रजांशी मैत्री असणारे दिल्लीकर यांच्याशी गुप्त पत्रव्यवहार, बोलणी आणि सल्लामसलत चालू ठेवली होती. १८५७ च्या आधीच मिर्झा फक्रु मरण पावल्याने, त्याच्याबरोबरच्या गुप्त कराराचे बंधन इंग्रजांना राहिले नव्हते.

१० मे १८५७ नंतर दररोज उत्तर हिंदुस्थानांतल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून इंग्रजांच्या फौजेतून फुटलेल्या हिंदुस्थानी सैनिकांच्या लाटांवर लाटा दिल्लीत पोहोचू लागल्या.येणाऱ्या प्रत्येक पलटणीला बादशहाला भेटायचे होते, आपण केलेल्या पराक्रमाचे वर्णन करून बादशहाकडून बक्षीस आणि मानमराबत मिळवून, दिल्लीतल्या इंग्रजाना आणि बाटून ख्रिस्ती झालेल्या लोकांना ठार मारून त्यांच्याकडूनच नव्हे तर मिळेल तेथून मिळेल तेव्हढी लूट गोळा करायची होती. बहादूरशाह आणि त्याचा मोजका लवाजमा (सैनिक, दरबारी, कोतवाल आणि त्यांचे शिपाई) आणि त्याचा थोडकासा खजिना तसेच तोटका शस्त्रास्त्र संभार या सगळ्या उसळत्या समुद्राला थोपवण्याला, वळवण्याला किंवा शांत करायला पूर्णपणे असमर्थ ठरत होता. या अगांतुकांना दरबारी रीत ठाऊक नव्हती, दिवाण-ए-आम, दिवाण-ए-खास, राजवाड्यातील बादशहाचा खाजगी वापराचा भाग यात हे सैनिक कुठेही घुसत, आरडाओरडा करत आणि मुक्काम ठोकत. या रानवटांना तोंड देण्याकरता कधी बादशहा दरबारांत त्रागा करे ("माझे जर तुम्ही ऐकत नसाल तर मी हाजला निघून जाईन"), कधी त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करे तर कधी चक्क त्यांना टाळत असे. मिर्झा मुघल या शहाजाद्याच्या नेतृत्वाखाली बनवलेल्या एका समितीला सैनिकांची आणि शहराची व्यवस्था बघण्याचे अधिकार दिले गेले, पण त्यांचे नियम न पाळणाऱ्याना शिक्षा करण्याकरता त्यांच्याकडे काहीच यंत्रणा नव्हती. शहरातली रिकामी जागा अपुरी असल्याने आलेले सैनिक शहराबाहेर तंबू ठोकून किंवा जमेल त्या ठिकाणच्या लोकांना हाकलून त्यांच्या घरातून, देवळांत, मशिदींमध्ये आणि जिथे जिथे शक्य होते तिथे मुक्काम ठोकून होते. त्यांना अडवणारा दिल्लीत कोणीही नव्हता. बरेच शिपाई जवळच्या बंदुका आणि दारुगोळा वापरत, आपला सुभेदार किंवा सुभेदार मेजर यांची पर्वा न करता शहरभर मन मानेल तसे फिरून, वाटेल त्या इमारतीत घुसून, बादशहाच्या बागांत मुक्काम ठोकून, सापडेल त्याला मारत, ठोकत, लुटता येईल ते लुटत होते. शहरातली आधीची वस्ती आणि नवीन येत राहिलेले सैनिक (आणि त्यांच्या बरोबरीचे घोडे आणि वाहतुकीकरता वापरायचे बैल किंवा हत्ती) यांना सगळ्यांनाच पुरेल येव्हढे अन्नपाणी मिळवण्याची आणि वाटपाची तर सोडाच पण मेलेल्या आणि जखमी लोकांकरता आणि जनावरांकरता लागणारी व्यवस्था हे सगळेच कोलमडू लागले होते. त्यामुळे उपासमार आणि रोगराईला सुरवात झाल्याने सगळीकडेच अंदाधुंदी सतत वाढतच होती.

आणि ११ मे १८५७ ला दिल्लीहून पळ काढण्याआधी तारायंत्रांद्वारे पाठवलेल्या संदेशांमुळे हळू हळू कां होईना पण सगळ्याच मोठ्या इंग्रज फौजी ठाण्यांमध्ये दिल्ली परत मिळवण्याकरता (आणि फुटीर सैनिकांना "धडा शिकवण्याकरता") इंग्रजांच्या संघटित हालचाली सुरू झाल्या. ज्या लोकांना चुचकारत, पैसे चारत किंवा "त्यांची काळजी घेण्याचे" आश्वासन देत (जसे बेगम झीनत महल आणि तिचे सल्लागार) इंग्रजधार्जिणे राखता आले त्यांच्याकडून जमेल तशी दिल्लीमधील परिस्थिती कळण्याचे मार्ग इंग्रजांकडून तयार केले जात राहिले.

जून १८५७ च्या सुरवातीला अंबाला, कर्नाल, अलीपूर अशा ठिकाणांहून एकत्र झालेली इंग्रज फौज (सुमारे ४,००० सैनिक आणि अधिकारी) दिल्ली पुन्हा ताब्यांत मिळवण्याच्या उद्देशाने दिल्लीच्या दिशेने येताना त्यांची कांही हिंदुस्थानी पलटणींबरोबर बदली-की-सराई (दिल्लीपासून १० कि. मी.) इथे हातघाईची लढाई झाली. त्या लढाईत हिंदुस्थानी पलटणींना मागे ढकलत दिल्लीच्या तटाबाहेर सुमारे २ कि.मी. वायव्येला असलेल्या टेकाडांपर्यंत पोचल्यावर इंग्रजांना हा अंदाज आला की दिल्लीवर हल्ला करण्याइतकी जरी त्यांची शक्ती तूर्त नसली तरी तेथे मोर्चे बांधून आणखी कुमक मिळेपर्यंत कांही काळ लढता येईल. तेथून दुर्बिणीतून इंग्रजांना इंग्रजांच्या मोर्चांवर हल्ला करण्याकरता दिल्लीमधून बाहेर पडण्याकरता एकत्र होणाऱ्या हिंदुस्थानी सैन्याचा मागोवा घेता येई आणि आपल्या थोड्या उंचीवर असण्याचा फायदा घेत हिंदुस्थानी सैनिक माऱ्याच्या टप्प्यात येताच लगेच गोळाबाजी करून दारूगोळ्याचा अपव्यय न करता जीवहानी कमीत कमी राखत हिंदुस्तानी सैन्याला थोपवता किंवा पांगवता येत असे. हिंदुस्तानी सैन्याला पुन्हा एकत्रित होईपर्यंत जो मध्ये वेळ मिळत असे, तेव्हढ्यात इंग्रजांना आरामांत त्यांच्या मोर्चांची दुरुस्ती किंवा जखमी झालेल्या सैनिकांना हलवून त्याजागी इतरांना नेमून, संपत आलेल्या दारूगोळ्याची पुन्हा व्यवस्था करता येत असे.

या वेळेपर्यंत दिल्लीत जमा झालेल्या हिंदुस्थानी सैनिकांच्यात एकी तर नव्हतीच पण वेगवेगळ्या पलटणींचे समर्थपणे एकत्रित नेतृत्व करणाराही कोणी नव्हता. हिंदू तसेच मुस्लिम, सगळ्याच हिंदुस्थानी सैनिकांना सगळेच कंपनीचे लोक जे सैनिकांचा धर्म बुडवू पाहात होते, ते आता "काफर" वाटत होते आणि त्यांना बादशहाच्या नेतृत्वाखाली या "काफरांना" कायमचे दिल्लीतून हाकलून द्यायचे होते. बहादुरशहा जरी स्वतः जाणून असला की आता तो वयपरत्वे (वय वर्षे ८२) अशा मोहीमेचे नेतृत्व करू शकणार नाही तरी सगळ्याच हिंदुस्थानी सैनिकांना फक्त त्याचेच नेतृत्व मान्य होते. शहरातला अन्नपाण्याचा साठा झपाट्याने संपत होता आणि त्यात बाहेरून कुठल्याच प्रकारे फारशी भर पडत नव्हती. त्यामुळे यावेळेपर्यंत सैनिकांनी लुटालूट कितीही केलेली असो, त्यांच्या (आणि त्यांच्या जनावरांच्या) खाण्यापिण्याचे आणि औषधपाण्याचे हाल होऊ लागले होते. त्यामुळे हिंदुस्थानी सैनिकांना "त्यांच्या बादशहाने" त्यांच्या पोटापाण्याचे व्यवस्था करावी, त्यांच्या दारूगोळ्याची आणि मलमपट्टीचीही व्यवस्था करावी आणि "जिहाद" सुरू करून, इंग्रजांवर तुटून पडावे असे सगळे (त्यांच्या बादशहाला मात्र अडचणीत टाकणारे आणि त्याच्या पूर्ण आवाक्याबाहेरचे) तांतडीने करायला हवे होते. त्यांना बहादूरशहाच्या अडचणींची कल्पनाही नव्हती आणि पर्वाही नव्हती आणि जितका "जिहाद"ला उशीर होत होता तितके हे सैनिक आणखीनच बिथरत होते.

तात्पुरती व्यवस्था म्हणून मिर्झा मुघल या शहाजाद्याच्या नेतृत्वाखाली बनवलेल्या समितीला सैनिकांचे नेतृत्व कुणी आणि कसे करावे आणि शिस्तीने शहराच्या तटाच्या थोड्याशाच बाहेर मोर्चे लावून बंदुका आणि तोफा सज्ज करून हिंदुस्थान सैनिकांना टिपणाऱ्या इंग्रजांवर कसा हल्ला करावा हे ठरवता येत नव्हते. शहराच्या थोड्याशाच बाहेर व्यवस्थित मोर्चे बांधून ठाण मांडलेल्या इंग्रजांच्या शिस्तबद्ध बंदुका आणि तोफांच्या भडीमारांत प्रत्येक हल्ल्यात शेकडो सैनिक गमवावे लागल्याने खच्ची होणारे सैनिकांचे धैर्य आणि वाढणारी आपापसातील भांडणे यांना कसा आळा घालावा हे कुठल्याच पलटणींच्या नेत्यांना ठरवता येत नव्हते.

आणि बादशहाला ठरवता येत नव्हते की मिळालेल्या सुवर्णसंधीचा फायदा घेत, सर्वस्व एकदाच पणाला लावून सैनिकांचे नेतृत्व स्वीकारून परिणामांची पर्वा न करता इंग्रजांचे जोखड कायमचे फेकून देण्याची "आखरी बाजी" लावावी अथवा तात्पुरते काहीतरी करून, सैनिकांना चुचकारत ठेवून इंग्रजांचे पारडे पुन्हा जड होईल या आशेवर इंग्रजांशी वैर ओढवून घेण्याचे टाळावे?

(क्रमशः)

मांडणीविचार

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

10 Apr 2019 - 8:20 am | चित्रगुप्त

चांगली चालली आहे लेखमाला.
फारच बिकट परिस्थिती असणार तेंव्हा सर्वच दिल्लीकरांची.
.
Rebel Sepoys at Delhi, 11 May 1857
Description -- Illustration by William Heysham Overend (1851-1898) from Cassell's Century Edition History of England, pub circa 1901. Info from wiki: Early on 11 May, the first parties of the 3rd Cavalry reached Delhi. From beneath the windows of the King's apartments in the palace, they called on him to acknowledge and lead them. Bahadur Shah did nothing at this point, apparently treating the sepoys as ordinary petitioners, but others in the palace were quick to join the revolt. During the day, the revolt spread. European officials and dependents, Indian Christians and shop keepers within the city were killed, some by sepoys and others by crowds of rioters.

लेखमालेतील प्रसंगांवरील बरीच ब्रिटिश चित्रे - नकाशे वगैरे जालावर उपलब्ध आहेत. लेखमालेत त्यांचा समावेश केल्यास आणखी मजा येईल. या निमित्ताने तात्कालीन चित्रकलेचा अभ्यासही घडून येईल.

शेखरमोघे's picture

10 Apr 2019 - 7:32 pm | शेखरमोघे

ब्रिटिश चित्रे - नकाशे, पत्रव्यवहार वगैरे प्रकारे इतकी माहिती उपलब्ध आहे की ती वाचून, सम्पदित करून वापरणे हा एक मोठाच वेळ लागणारा प्रकार झाला असता. आपण एक सुन्दर चित्र समाविष्ट केल्याबद्दल आभार.

शेखरमोघे's picture

10 Apr 2019 - 7:32 pm | शेखरमोघे

ब्रिटिश चित्रे - नकाशे, पत्रव्यवहार वगैरे प्रकारे इतकी माहिती उपलब्ध आहे की ती वाचून, सम्पादित करून वापरणे हा एक मोठाच वेळ लागणारा प्रकार झाला असता. आपण एक सुन्दर चित्र समाविष्ट केल्याबद्दल आभार.

चित्रगुप्त's picture

10 Apr 2019 - 8:31 am | चित्रगुप्त

मिर्झा मुगल आणि मिर्झा फक्रु या दोन मुलांसोबत बहादुरशहाचे चित्रः

.

Ghulam 'Ali Khan (active c. 1820-c. 1840)
The Last Mughal Emperor, Bahadur Shah II, with Two Sons; The Heir Apparent, Fakhrud-din Mirza at His Right, and Mirza Farkhanda. Mughal, North India, Delhi, dated in the month of Rabi I, A.H. 1254 (May-June 1838)

अरविंद कोल्हटकर's picture

10 Apr 2019 - 8:35 am | अरविंद कोल्हटकर

वरील पुस्तकामध्ये हेच सर्व चित्रण केलेले आढळते.

शेखरमोघे's picture

10 Apr 2019 - 7:44 pm | शेखरमोघे

मी नुक्तेच हे पुस्तक वाचताना जुना "लाल किला" हा सिनेमा आठवला. त्यातली फक्त गाणी लक्षात होती. मराठ्यानी पानिपतच्या खर्चाकरता दिल्लीचे तख्त फोडले पण दिल्लीच ताब्यात घेऊन आपल्याकडे असलेल्या चौथाई वगैरे हक्कान्चा वापर करत "बादशाही" का ताब्यात घेतली नाही, हा प्रश्न बरेच दिवस डोक्यात होता त्या करता आणखीही त्या सम्बन्धातले बरेच वाचले. ब्रिटिशानी लिहिलेली बरीच माहिती उपलब्ध आहे. हिन्दुस्थानी मूळ माहिती उर्दू मध्ये असलेली पण नन्तर इन्ग्रजीत अनुवादित अशीही बरीच आहे. या सगळ्यातून "बहादूरशहा"वर थोदक्यात लिहिणे महाकठिण वातळे, पण एक प्रयत्न केला आहे.

शेखरमोघे's picture

10 Apr 2019 - 7:46 pm | शेखरमोघे

वरील मजकुरातील शेवटचे वाक्य असे वाचावे "या सगळ्यातून ......... थोडक्यात लिहिणे महा कठिण वाटले , पण एक प्रयत्न केला आहे."

अस्वस्थामा's picture

12 Apr 2019 - 3:52 pm | अस्वस्थामा

मराठ्यानी पानिपतच्या खर्चाकरता दिल्लीचे तख्त फोडले पण दिल्लीच ताब्यात घेऊन आपल्याकडे असलेल्या चौथाई वगैरे हक्कान्चा वापर करत "बादशाही" का ताब्यात घेतली नाही, हा प्रश्न बरेच दिवस डोक्यात होता त्या करता आणखीही त्या सम्बन्धातले बरेच वाचले.

याबद्दल जरा सविस्तर लिहाल का ? नक्की काय तात्पर्य सापडलं वगैरे पण.

कुमार१'s picture

10 Apr 2019 - 9:05 am | कुमार१

छान ! पुभा प्र

सिरुसेरि's picture

10 Apr 2019 - 12:47 pm | सिरुसेरि

+१००

विजुभाऊ's picture

10 Apr 2019 - 1:03 pm | विजुभाऊ

बहादूर शहा आणि मिर्झा मुघल यांना कोणतेच सैनीक जुमानत नव्हते.
बहादूर शहा ला तर बंडखोरांनी आपल्यासोबत एखादे प्यादे बाळगावे तसे बाळगले होते.
आयुश्य भर पतम्ग उडवणे आणि कविता रचणे यांव्यतीरीक्त काहीच केलेले नसल्याने त्याला आणि त्याच्या शहजाद्याना कसलाच अनुभव नव्हत.
बहादूर शहा जफर ला हिंदुस्थानचा अखेरचा शहेनशह म्हणणे हा त्या शब्दाचा केवळ अपमान नसून एक मोट्।ठा विनोद आहे.
त्या वेळेस बहादूर शहा जफर चे राज्य शहाजहानाबाद म्हणजे लाल किल्ल्या तील भिंतीपुरते सीमीत झालेले होते. त्याचे नोकरदेखील त्याचे ऐकत नव्हते. इतका तो केवीलवाणा झालेला होता

शेखरमोघे's picture

10 Apr 2019 - 7:57 pm | शेखरमोघे

बहादूरशहाचे थोडक्यात वर्णन मलाही "वीतभर राज्य आणि मैलभर बिरुदावली" असे करावेसे वाटले. पण सगळीकडून इन्ग्रज फौजेतून फुटून निघणार्‍या हिन्दुस्थानी सैनिकाना इतर कुठेही न जाता, दिल्लीत आणि/किन्वा बहादुरशहापाशी (ज्याला युद्धाशी सम्बन्धित कसलाच अनुभव नव्हता) केन्द्रित व्हावे असे का वाटावे यावर बराच शोध करून पटेल असे उत्तर सापडले नाही.

.

प्रमोद देर्देकर's picture

10 Apr 2019 - 1:32 pm | प्रमोद देर्देकर

वाचतोय

शेखरमोघे's picture

10 Apr 2019 - 7:58 pm | शेखरमोघे

आभारी आहे.