आकाशाची मोतीमाळ – कन्या (उत्तरा फाल्गुनी, हस्त व चित्रा नक्षत्रे)

हेमंत ववले's picture
हेमंत ववले in जनातलं, मनातलं
4 Apr 2019 - 4:09 pm

भारतीय नक्षत्रांच्या यादीमध्ये पुर्वा व उत्तरा फाल्गुनी नंतर येणारे नक्षत्र म्हणजे हस्त त्यानंतर चित्रा व त्यानंतर आहे स्वाती. लक्षात असुद्या नक्षत्र म्हणजे चंद्राचे घर. २७ नक्षत्रे आपण मानतो व ही २७ नक्षत्रे म्हणजे चंद्राची आकाशातील स्थाननिश्चिती करण्यासाठी योजलेली त्याचे घरे मानली आहेत.
वैदिक कालापासुनच या सा-या नक्षत्रांना (हस्त, चित्रा व स्वाती नक्षत्रे) विशेष मानले गेले आहे. प्रत्येक नक्षत्र ऋतुमानातील बदलांचे सुचक आहेत. जसे ऋतुमानातील बदल आहेत तसेच, त्याच बदलांवर आधारीत कृषि संस्कृतीशी जोडलेले कृषिचक्र देखील आहेच. कित्येक हजारो वर्षांपासुन आपले पुर्वज या शुध्द वैदिक विज्ञानाचा वापर दैनंदिन जीवन अधिक सुखकर कसे करता येईल याचा सर्वंकष विचार आपल्या पुर्वजांनी केला आहे.
अथर्व-संहितेमध्ये एक प्रार्थना आहे. खुप मोठी प्रार्थना आहे ही. अत्यंत उदात्त व उन्नत असे जीवनदर्शन या प्रार्थेनेमधुन घडते आहे. यातील एक श्लोक खालील प्रमाणे आहे.
पुण्यं पूर्वा फल्गुन्यौ चात्र हस्तश्चित्राः वा स्वाति सुखो मे अस्तु ॥
याचा अर्थ आहे की दोन्ही ही फाल्गुनी (पुर्वा व उत्तरा) नक्षत्रे, हस्त नक्षत्र तसेच स्वाती, ही सर्व नक्षत्रे माझ्यासाठी सुखकारक होवोत. इथे माझ्यासाठी या शब्दाचा अर्थ मी म्हणजे केवळ मी नसुन यच्चयावत मानव समुह असा आहे.
उत्तराफाल्गुनी विषयी माहिती आपण मागील एका लेखामध्ये घेतली आहेच. आता पुढे पाहु!
यात सर्वप्रथम येते ते म्हणजे हस्त नक्षत्र. आपल्या कडील ग्रामीण भाषेत याला हत्ती नक्षत्र असे म्हंटले जाते. पावसाळ्यातील ‘हत्तीचा पाऊस’ ही शब्दजोडी आठवतेय का? या शब्द जोडीतील हत्ती म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन हस्त नक्षत्र आहे. हे नक्षत्र म्हणजे प्रजापतिच्या हाताचा पंजा आहे तर चित्रा नक्षत्र म्हणजे प्रजापतिचे मस्तक आहे, असे तैतिरीय ब्राम्हण या ग्रंथामध्ये लिहिले आहे. हस्त म्हणजे हात. व त्याचाच अपभ्रंश मराठी मध्ये हत्ती असा झालेला आपणास दिसतो. इंग्रजीमध्ये हस्त या नक्षत्राला वेगळे नाव आहे. याला कॉर्वस (Corvus) असे म्हणतात. भारतीय ज्योतिषामध्ये हस्त नक्षत्र, कन्या राशीचा भाग आहे. तर पाश्चात्य ज्योतिषामध्ये कॉर्वस कन्या राशीचा म्हणजे व्हर्गो (Virgo) या राशीचा भाग नाहीये.
virgo
कॉर्वस विषयी युनानी पौराणिक साहित्यात एक कथा येते. अपोलो देवाचे वाहन म्हणुन या नक्षत्राकडे पाहिले जाते. कॉर्व्हस म्हणजे रावेन म्हणजेच कावळा.
भारतीय पुराणकथांमध्ये ज्याप्रमाणे इंद्र ऐषोआरामी, रंगेल दर्शवला आहे तसेच युनानी कथांमधील विविध देव देखील आहेत. या अपोलो चे देखील विवाह बाह्य संबंध होते. त्यातील एक म्हणजे कोरोनीस. अपोलो स्वर्गात राहणारा देव तर कोरोनीस पृथ्वीवर राहणारी स्त्री. काही काळाने, कोरोनीस गर्भवती राहीली. त्यामुळे झिऊस ने एका कावळ्याला तिच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले.
कालांतराने कोरोनीस एका मर्त्य पुरुषाच्या प्रेमात पडते. ही बातमी कावळा अपोलो ला सांगतो. अपोलो रागाने इतका चिडतो की त्याच्या भयंकर दृष्टीक्षेपाने कावळ्याचे पंख जळुन जातात. पुढे दयेपोटी त्या कावळ्यास अमर करण्यासाठी अपोलो त्याला स्वर्गात स्थान देतो.
बॅबिलोनियन संस्कृतीमध्ये या तारकासमुहास अदाब म्हणजेच पाऊस व वादळाचा देव म्हणुन पाहीले जाते. याचे कारण त्या विशिष्ट ऋतुमध्ये, या नक्षत्रातील तारे उगवल्या नंतर पाऊसकाळा सुरु होतो. याचा संबंध आपल्या कडील हत्तीच्या पावसाशी जोडला जाऊ शकतो.
चित्रा नक्षत्रावरुन तुम्हाला काही आठवले का?
motimal
गुढीपाडवा येतोय थोड्याच दिवसांमध्ये. गुढीपाडवा म्हणजे आपला नवीन वर्षारंभ. एक वर्ष संपुन दुसरे सुरु होणार आणि पुढच्या वर्षातील पहिला महिना देखील सुरु होणार. हा पहिला महिना म्हणजे चैत्र मास! चैत्र हे नाव याच चित्रा नक्षत्रावरुन ठेवलेले आहे. इंग्रजीमध्ये याला स्पायका (spica) असे म्हंटले जाते.
स्पायका हा तारा आपल्या सुर्यापेक्षा १२ हजार पटींनी जास्त तेजस्वी आहे. आपल्या सुर्यमालेपासुन २६० प्रकाशवर्षे इतक्या अंतरावर चित्रा नक्षत्र आहे.
हाच तारा आहे ज्याच्या मदतीने प्राचीन ग्रीक खगोली हिप्पार्कस ने वसंत विषुव व शरद विषुव (इक्विनॉक्स) यांच्या विषयी निर्णय केला होता.
या विश्वाचा सतत विस्तार होत आहे असा निष्कर्ष मांडणारा निकोलस कोपरनिकस ने याच ता-याच्या अभ्यासानंतर असा निष्कर्ष काढला.
इंग्रजी व्हर्गो राशीतील मुलगी व तिच्या डाव्याहातामध्ये स्पायका आहे. स्पायका म्हणजेच चित्रा! तर व्हर्गो म्हणजेच कन्येच्या डाव्या हातामध्ये चित्रा च्या रुपात गहुची लोंबि मानली गेली आहे. कन्येच्या हातामध्ये अशाप्रकारे धान्याची लोंबि दाखवणे व मानने हे जगातील सर्वच प्राचीन संस्कृत्यांमध्ये प्रचलित होते. याला अपवाद अगदी चीन ची प्राचीन संस्कृती देखील नाही.
युनानी संस्कृती व परंपरेमध्ये कन्या तारकामंडलाकडे न्यायदेवता डाईक म्हणुन देखील पाहिले जाते. या पौराणिक कथांमध्ये चक्क सुवर्णयुग, कांस्ययुग, लोहयुग अशी अनेक युगे येतात. यातील सुरुवातीच्या सुवर्ण युगामध्ये डाईक ही देवता, मृत्युलेकी जन्म घेते. तिच्या न्यायदानाच्या कुशल कामामुळे त्या काळी पृथ्वीतलावर सर्वत्र भरभराट झाली. धनधान्यांच्या राशींच्या राशी लोकांस मिळु लागल्या. सदासर्वदा हिवाळा म्हणजे पाऊस पण नाही आणि तापदायक ऊन देखील नाही. हवाहवासा हिवाळा. लोकांना वार्धक्य म्हणजे काय याचा विसर पडला. सर्वत्र शांती, आनंद, सुख यांची रेलचेल होती. त्यानंतर देवादिकांच्या पुर्वकल्पित योजनेनुसार झिऊस ने त्याच्या वडीलांस सिंहासनावरुन पायउतार केले व स्वर्गाचे राज्याचा ताबा घेतला. त्यानंतर रजतयुग सुरु झाले. हे युग सुवर्णयुगासारखे भरभराटीचे नव्हते. झिऊस ने मग वर्षाचे चार भाग करीत चार ऋतु निर्माण केले. हे सगळे सुरु झाल्याने डाईक नाराज झाली व तिने लोकांस भविष्यातील आणखी वाईट घटनांपासुन सावध राहण्याचा सल्ला दिला. पुढे लोहयुगामध्ये मनुष्य एकमेकांशी युध्दे करु लागली ते पाहुन ती स्वर्गात दाखल झाली. अन्य एका कथेमध्ये व्हर्गो ही धन धान्याची देवता म्हणुन मानली गेली आहे. प्राचीन सिरियन देवता एरीगोन म्हणजे प्रजननाची देवता म्हणुनदेखील व्हर्गो कडे पाहिले जाते.
virgo
भारतीय राशीचक्रातील कन्या राशी साठी विशिष्ट कथा भारतीय पुराणांमध्ये येत नाहीत. अशा राशीचक्रांच्या कथा भारतीय पुराणांमध्ये येत नाहीत याचे कारण मी मागील लेखांमध्ये सांगितले आहेच. तरीही भारतीय ज्योतिषामध्ये या तारकासमुहासाठी जे चित्र दाखवले जाते त्यामध्ये कन्येच्या हातामध्ये गव्हाची लोंबि देखील दाखवली आहे.
ही डाईक म्हणजेच कन्या, आकाशामध्ये आहे व ती ज्याने साधनाने न्यायदान करायची ते म्हणजे तुला. याला इंग्रजीमध्ये Libra म्हणतात. Libra हे देखील एक तारकामंडळ, राशी आहे. याविषयी आपण पुन्हा कधीतरी पाहुयात.
या झाल्या चित्तरकथा आकाशातील. आता पाहुयात कन्या तारकासमुहामधील एक रोचक माहिती.
खालील फोटो पहा. यामध्ये तुम्हाला कन्येच्या चेह-यासमोर व छातीसमोर लाल रंगाच्या वर्तुळाकार आकृत्या दिसतील. या चित्रामध्ये त्या संख्येने खुपच कमी दिसत आहेत.
virgo super cluster
त्यातील एकेक वर्तुळ म्हणजे आपल्या आकाशगंगेसारखेच एकेक आकाशगंगा (मंदाकिनी) होय. आकाशाच्या या भागात तीन हजाराच्या आसपास आकाशगंगा आहेत. मोठ्या आकाराच्या दुर्बिणीने आपण त्या पाहु शकतो. उघड्या डोळ्यांना दिसणार नाहीत. पण आकाशाचा तो भाग ओळखता आला तरी खुप झाले.
आजवर आपण तारकापुंज, तारकासमुह, तारकामंडळ असे शब्दप्रयोग वापरले. आता आपणास एक नवीन शब्द वापरावा लागतोय. तो म्हणजे मंदाकिनी समुह, मंदाकिनीपुंज, मंदाकिनीमंडल आदी. इंग्रजी मध्ये याला virgo super cluster असे म्हणतात. या व्हर्गो मंदाकिनी पुंजा पर्यंत च्या प्रवासाचा एक सुंदर व्हिडीयो तुम्हाला नक्की आवडेल. हा संपुर्ण महापुंज आपल्या आकाशगंगेपासुन दुर दुर जात आहे व त्याचा वेग तासाला १२०० किमी इतका आहे.
या सुपरक्लस्टर विषयी सविस्तर माहितीपट इथे पहा!
https://www.youtube.com/watch?v=YX3GUYsy0q
आकाशातील मोतीमाळ हे या लेखाचे शीर्षक असुन देखील अजुन मोतीमाळेचा उल्लेख का नाही झाला असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आकाशातील मोतीमाळ समजण्यासाठी आपणास हस्त, व चित्रा ही नक्षत्रे माहिती असणे, ओळखता येणे गरजेचे आहे. त्यानंतर अन्य दोन नक्षत्रे आपण पुढच्या लेखामध्ये शिकुयात. म्हणजे आपण आकाशातील मोतीमाळेचे दर्शन घेऊ शकु!
माहिती तुम्हाला आवडली असेल तर अवश्य शेयर करा.
कळावे
आपला
हेमंत सिताराम ववले,
निसर्गशाळा, पुणे

भूगोलप्रकटन

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Apr 2019 - 4:50 pm | ज्ञानोबाचे पैजार

आज रात्री शोधायचा प्रयत्न करतो
धन्न्यवाद
पैजारबुवा,

आनन्दा's picture

4 Apr 2019 - 5:06 pm | आनन्दा

वा वा
छान माहिती

विजुभाऊ's picture

4 Apr 2019 - 5:39 pm | विजुभाऊ

वा मस्त माहिती.
यात स्वातीच्या तार्‍याजवळ भूतप नावाचा तारा आढलतो . त्याबद्दल काही सांगाल का?

हेमंत ववले's picture

5 Apr 2019 - 2:19 pm | हेमंत ववले

मला तुमच्या कडुन पहिल्यांदाच समजले. नक्की माहिती घेऊन सांगेन !!

भुतप विषयी माहिती सविस्तर लिहिललेखामध्ये नुकत्याच लेखामध्ये, त्यासाठे माझा मिसळपाव वरील नवीन लेख वाचा, किंवा खालील लिंक वर क्लिक करुन मुळ लेख वाचा! धन्यवाद

https://nisargshala.in/the-necklace-of-sky-swati-virgo-chitra-hasta-corv...

खूपच छान लेख. आकाशात तारे पाहता पाहता गोष्टी ऐकायला आवडतात आणि वेळ मजेत जातो.

लेख आवडला. निसर्गशाळेमध्ये नक्षत्रे बघण्यासाठी काही कार्यक्रम वगैरे आयोजित होतात का?

हेमंत ववले's picture

5 Apr 2019 - 2:20 pm | हेमंत ववले

प्रत्येक सहलीमध्ये आकाशदर्शन चा कार्यक्रम असतोच

स्वोन्नती's picture

4 Apr 2019 - 8:18 pm | स्वोन्नती

मस्त.

अजय देशपांडे's picture

14 Apr 2019 - 11:31 am | अजय देशपांडे

खूप छान माहिती
पुढील भाग लवकर येवूद्या