वात्सल्य

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
1 Apr 2019 - 10:59 am

सहा एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे.

मी सकाळी साधारण १० वाजण्याच्या सुमारास दवाखान्यातून जवळच्याच बँकेत चाललो होतो. आमच्या इमारतीला लागून असलेल्या शेजारच्या इमारतीच्या भिंतीच्या लोखंडी जाळीच्या समोर एक गरिबांचे गोंडस मूल बसलं होतं. त्याच्या कडे पाहिलं तर ते मतिमंद( मंगोल) आहे हे जाणवलं. साधारण दोन वर्षाच्या आसपास वय असेल त्याचे. त्याच्याकडे पाहत असताना ते मूल उठलं आणि समोर चालायला लागलं तर त्याच्या कमरेला एक नायलॉनची दोरी बांधलेली होती. त्या दोरीमुळे त्या मुलाला ४ फुटाच्या पलीकडे कुठेही जात येत नव्हतं.

एखाद्या बकरीला बांधावं तसं बांधलेलं होतं. ते दृश्य बघवेना म्हणून मी मान वळवून घाईघाईने बँकेत गेलो. जाताना डोक्यात विचार हाच होता कि कोण याची आई आहे जी मुलाला असं जनावरासारखं बांधून गेली आहे. मूल मतिमंद आहे म्हणून असं बांधून जावं अशी निर्दय आई कोण असू शकेल.
बँकेतून परत येताना पाहिलं तर ते मूल तिथेच होतं. पण ते मूल परत उठून पुढे जाणार होतं तर दोरीमुळे जाऊ शकलं नाही. आणि त्याच्या पुढे दीड फूट खड्डा खणलेला होता. आणि तेथे रिलायन्सची पाटी लावलेली होती

दवाखान्याच्या समोरच्या रस्त्याच्या कडेला रिलायन्सच्या ऑप्टिकल फायबरची केबल टाकण्याचे काम चालू होते. त्यासाठी फूटभर खड्डा खणण्याचे काम चालू होते. त्यात काम करणारी मजूर बाई असावी जिने आपले मूल असे बांधून ठेवले होते.हा खड्डा लांबपर्यंत खणणे चालू होते.

साडेबारा वाजता दवाखान्याची वेळ संपली म्हणून घरी जाण्यासाठी मी परत बाहेर आलो तेंव्हा या खड्ड्याच्या पुढे ते मूल त्याची मोठी बहीण जी साधारण ४ वर्षाची होती हे आपल्या आईच्या बरोबर हसत खिदळत जेवण जेवत होते. पोळ्या होत्या, कसलातरी लाल भडक रस्सा होता आणि एक हिरवी भाजी होती.
मुलगी टिवल्या बावल्या करून मुलाला दाखवत होती. ते मूल छान हसत होतं आणि त्याच्याकडे आई कौतुकाने बघत त्याला आणि त्याच्या बहिणीला अन्नाचा घास भरवत होती.
थोड्या वेळापूर्वी किती निर्दय बाई म्हणून विचार करणारा मी, मला एकदम लखकन प्रकाश पडल्यासारखं जाणवलं. मुलगी शहाणी होती त्यामुळे ती आईच्या आसपास होती. खड्डा खणत खणत पुढे जाणाऱ्या आईला मूल खड्ड्यात पडेल किंवा चालत चालत रस्त्यावर येईल म्हणून अपघात होईल हि काळजी असल्यामुळे मुलाला तिने नाईलाजाने बांधून ठेवले होते. मी बाजूला पडलेल्या दोरीकडे पाहिले ती दोरी नायलॉनची होती पण तिच्या टोकाला मुलाच्या कमरेला बांधायचं वेटोळं मात्र मऊ साडीचं होतं ज्यामुळे मुलाच्या कमरेला काचू नये.

हातावर पोट आणि आभाळाचे छप्पर असलेल्या घरात राहणारी आई अजून काय करू शकेल?

आई गरीब असली किंवा मूल मतिमंद असलं तरी वात्सल्य हि निसर्गाची देणगी आहे. ती काही कमी होत नाही

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

1 Apr 2019 - 11:14 am | श्वेता२४

मन हेलावून गेलं हे वाचताना

जयंत कुलकर्णी's picture

1 Apr 2019 - 11:15 am | जयंत कुलकर्णी

+१

chittmanthan.OOO's picture

1 Apr 2019 - 11:22 am | chittmanthan.OOO

हृदयाला हात घातला एकदम

श्वेता२४'s picture

1 Apr 2019 - 12:19 pm | श्वेता२४

यशोधरा यांचा सल्ला मनावर घेतला हे बरे झाले :) पहिल्यावहिल्या अभिप्रायाबद्दल अभिनंदन

चौथा कोनाडा's picture

2 Apr 2019 - 5:42 pm | चौथा कोनाडा

+१

पहिल्यावहिल्या अभिप्रायाबद्दल चित्तमंथन.ट्रिपलओ यांचे अभिनंदन !

तुषार काळभोर's picture

1 Apr 2019 - 11:26 am | तुषार काळभोर

का बांधले होते, नायलॉनच्या दोरीचा त्रास कमीत कमी होण्यासाठी घेतलेली काळजी, नंतर मुलाशी त्याच्या छोट्याशा (थोरल्या! )बहिणीचे व आईचे वागणे, एक एक गोष्ट समोर आल्यावर 'सत्य' उलगडले.

आई गरीब असली किंवा मूल मतिमंद असलं तरी वात्सल्य हि निसर्गाची देणगी आहे. ती काही कमी होत नाही

खरंय!

कुमार१'s picture

1 Apr 2019 - 11:37 am | कुमार१

+ १

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Apr 2019 - 12:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

हृदयस्पर्शी !

पूर्ण माहिती असल्याशिवाय मत बनवू नये (Do not judge book by its cover), हे अधोरेखीत करणारा अनुभव.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Apr 2019 - 12:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

हृदयस्पर्शी !

पूर्ण माहिती असल्याशिवाय मत बनवू नये (Do not judge book by its cover), हे अधोरेखीत करणारा अनुभव.

एमी's picture

1 Apr 2019 - 1:30 pm | एमी

बाप कुठे होता?

> जाताना डोक्यात विचार हाच होता कि कोण याची आई आहे जी मुलाला असं जनावरासारखं बांधून गेली आहे. मूल मतिमंद आहे म्हणून असं बांधून जावं अशी निर्दय आई कोण असू शकेल. > बापाबद्दल असे विचार का येत नाहीत मनात पटकन?

मुल अगदी काही स्तनपान करण्याच्या वयाचं नाहीय तरीही लहान मुलाला नेहमी आईशीच का असोसिएट केलं जातं? वत्सल्याचा ठेका आईकडेच का असतो?

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Apr 2019 - 2:24 pm | ज्ञानोबाचे पैजार

समस्त बाप लोकांनी वत्सल्याचा ठेका पोरांच्या आयांकडून हिसकावून घ्यायला पाहिजे.
बर्‍याबोलाने दिला नाही तर ओरबाडून घ्यावा.

पैजारबुवा,

सुबोध खरे's picture

1 Apr 2019 - 6:52 pm | सुबोध खरे

आपण म्हणताय ते मान्य आहे कि स्त्री पुरुष समान असायला हवेत.

परंतु जग तसंच असेल असं नव्हे. जगभर लहान बालकांची जबाबदारी ९९ % वेळेस आईलाच घ्यावी लागते

माझ्या मुलीला जन्म देणे आणि दूध पाजणे एवढं सोडलं तर मी सर्व गोष्टी (पार्श्वभाग धुण्या पासून) आनंदाने केलेल्या आहेत. परंतु आम्ही कुठेही बाहेर गेलो ( उदा. गोव्यात असताना समुद्र किनाऱ्यावर) तर माझ्या मुलीला आपल्या भावाकडे लक्ष दे ( माझा मुलगा तिच्यापासून सव्वा दोन वर्षांनी लहान आहे) असे सदा सर्वदा लोक सांगत असत. मी असे कधीही सांगितले नाही कारण आमचा मुलगा हि आमची( मी आणि बायको) जबाबदारी होती. सव्वा चार वर्षाच्या मुलीला धाकट्या भावाची जबाबदारी घ्यायला लावणे हि चूक गोष्ट आहे.
मी माझ्या मुलीला आपल्या धाकट्या भावाकडे बघ असे कधीही सांगितले नाही. घरात सुद्धा घरकाम करण्यात दोघांना समान न्याय लावला जातो. परंतु मुलीला सुद्धा हि जाणीव करून दिलेली आहे कि जग तुला समानतेने वागवेलच याची खात्री नाही.
आदर्श आणि वास्तव यात फरक असतो हे स्वीकार करणे अपरिहार्य आहे.

अतिशय टचिंग अनुभव. मोजक्या शब्दांत प्रभावीपणे..

चौथा कोनाडा's picture

1 Apr 2019 - 2:39 pm | चौथा कोनाडा

ह्रूदय हेलावून टाकणारं निरिक्षण !

अशी बरीच दृष्ये आपण काही वेळा पहात अस्सतो, काही करू शकत नाही.

अमच्या जवळच्या हायवेला पण अशी लहान मुले वाली कुटुम्बे आहेत, जे सिग्नलवर फुगे, खेळणी, बॉलपेन्स, वेस्ट कॅरी बग्ज इ. विकत असतात त्यांचे जीवनमान पाहूनही असेच द्रवायला होते.
आपल्या प्रचंड लोकसंख्यावाल्या देशातील अजस्त्र समस्या कधीही संपणार्‍या नाहीत.

अन्या बुद्धे's picture

1 Apr 2019 - 3:38 pm | अन्या बुद्धे

अवघड आहे सगळं. आपली सुरक्षित अंतरावरची निरीक्षणं, घाईघाईने दिलेले निर्णय..

अन्या बुद्धे's picture

1 Apr 2019 - 3:39 pm | अन्या बुद्धे

अशा चुका आपणही करत असतो.. याची चरचरीत जाणीव

सविता००१'s picture

1 Apr 2019 - 5:39 pm | सविता००१

ह्रुदय हेलावून टाकणारा अनुभव

मराठी कथालेखक's picture

1 Apr 2019 - 5:41 pm | मराठी कथालेखक

लहान मुलाला बांधून ठेवणे सामान्य आहे. इथे हा मुलगा तरी मतिमंद आहे पण असे नसतानाही तीन-चार वर्षाच्या मुलाला कधी बांधून ठेवणे सामान्य आहे. माझी एक काकू तिच्या मुलाला म्हणजे माझ्या चुलत भावाला बांधून ठेवायची (म्हणजे त्याचा पाय बांधायची इतकंच) जेणेकरुन तो घराबाहेर नाही जावू शकणार. यात निर्दयी वगैरे वाटण्यासारखं काही नाही.. असं करण्यात उगाचच अपराधीपणा वाटत असल्याने काही सुशिक्षित गृहिणी अनेकदा नवरा कामावर जाण्यपुर्वी घाईने आंघोळ उरकतात..कारण अवखळ/मस्ती करणारं मुल काय उद्योग करेल हे सांगता येत नाही म्हणून त्याला एकटं सोडता येत नाही. अशा वेळी खरंतर अर्धा एक तास मुलाला योग्य ठिकाणी बांधून ठेवण्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही.

सुबोध खरे's picture

1 Apr 2019 - 6:58 pm | सुबोध खरे

लहान मुलाला बांधून ठेवणे सामान्य आहे
हे पटले नाही.
बहुसंख्य घरात रांगणारे मूल असेल तर उंबऱ्याला एक किंवा सव्वा फूट उंचीची फळी लावत असत जेणेकरून मूल घराबाहेर जाणार नाही

आणि काचेच्या किंवा नाशवंत वस्तू आपोआप तीन फुटाच्या वर ठेवल्या जातात.

आमचा चुलत भाऊ अत्यंत आईवेडा होता.दोन मिनटे आई दिसली नाही तरी तो रडत असे. शेवटी नाईलाजाने त्याला न्हाणीघराच्या बाहेर रडत ठेवून आमची काकू अंघोळ करत असे.

अगदीच अपवादात्मक स्थितीत मूल फारच विधुळवाटे/ विध्वंसक असेल तरच बांधून ठेवले जात असेल. परंतु माझ्या इतक्या वर्षाच्या पाहण्यात असे कुठेही दिसले नाही.

चौथा कोनाडा's picture

2 Apr 2019 - 5:47 pm | चौथा कोनाडा

फार गैर वा टत नाहीय लहान मुलाला बांधून ठेवणे, फक्त त्याला इजा होणार नाही याची काळजी सर्वतो घ्यायला हवी !
चिल्डरन वॉकर हा सुद्धा असाच प्रकार आहे की, त्यानं बाळाच्या बर्‍याच हालचाली वर मर्यादा येतात !
(मला तर चिल्डरन वॉकर हा प्रकारच पटलेला नाही )

आई स्वयंपाक करत असेल तर जरा उभे राहणारे मुल ती उलट्या स्टुलात ठेवते आणि काम करता बोलत राहाते. ते मूलही हसत खिदळते पण खाली वाकून बाहेर पडायचे त्यास कळत नाही. हे पाहिले आहे. पण हेच मूल नुकतेच उभे राहू लागलेले तेव्हा शू केल्यावर एक रट्टा मागे देऊन आरडाओरड करून तिने त्यास हाताला धरून फरफटत नेले व बाथरुमात उभे केलेले पाहिले. दोन दिवस असे केल्यावर तेच मूल शू लागल्यावर हात खाली लावून उँउँउँ करायचे. ती बाई म्हणाली आम्ही अशीच सवय लावतो. वात्सल्यात शिस्तीचा कठोरपणाही असतो.
(( सगळ्यांनी असाच कठोरपणा दाखवला तर नॅपी उद्योग तोट्यात जाईल.))

आमच्या मुलीचा बेबी वोंकर होता. तिला त्यात आपले पाय मारून घरभर फिरता येत असे. शिवाय त्याचा पाया बराच रुंद असल्यामुळे तिच्या पायाला इजा होत नसे किंवा तो उलटत नसे. त्याला वरती दोऱ्या आणि हूक होते जे दाराला टांगून झोपाळा करता येत असे किंवा खिडकीत अडकवता येत असे.

आम्ही मुलीला खिडकीत बसवून हातात सूप स्टिक्स किंवा गाजर देत असू. ती पहिल्या मजल्यावरून गाजर चावत खाली रस्त्यावरची गम्मत बघत तासभर बसत असे.

फेरफटका's picture

1 Apr 2019 - 8:46 pm | फेरफटका

अत्यंत हृदयस्पर्शी अनुभव. तुम्हाला जे दिसलं, जाणवलं आणी नंतर इथे शेअर केलत, ते खूप छान.

मतिमंद मुलांचा प्रश्न फारच गंभीर आणि रोज यातना देणारा असतो. ओळखीच्या तिन कुटुंबात हा प्रश्न मी बघतोय. त्यांचे आईवडील (हो वडील सुध्दा) काय भोगतात ते बघतोय, विशेषत: वाढत्या वयातील मुलीचे पालक शक्य ते सर्व प्रयत्न यथाशक्ती करतात पण आपल्यामागे काय ही खंत सदोदित त्यांच्या डोक्यात असते.

भीमराव's picture

2 Apr 2019 - 2:39 pm | भीमराव

चार वर्ष झाली असतील आता, माथाडी काम करणाऱ्या मजुरांच्या चटई चाळीत निबार कालवा झालेला. एका मजुराची लहान दोन मुलं गायब झालेली. खुप शोधाशोध केली सगळ्या चाळीनं, त्यांना वाटलं कुणी तरी पळवून नेली. दोन तीन दिवसांनी सांडपाणी साठुन तयार झालेल्या मोठ्या डबक्यातुन दोन्ही फुगुन वर आलेली. दोन्ही पोरं आईचा डोळा चुकवून डबक्याशेजारी खेळत बसायची.

शेखरमोघे's picture

11 Apr 2019 - 7:57 pm | शेखरमोघे

सुन्दर लिहिले आहे.

लेख आवडला.
सध्या आम्ही उभयता आमच्या रांगत्या नातीसोबत आहोत. या वयातल्या बाळाबरोबर खेळणे आनंददायक असले, तरी ते किती जिकिरीचे आहे, याचा अनुभव घेत आहोत. घर खूप प्रशस्त असल्याने पूर्ण वेळ रांगणार्‍या पोरीच्या मागे मागे लक्ष ठेवत फिरावे लागते. मी रोज व्हॅक्यूम क्लिनर चालवतो शिवाय मध्यरात्री रात्री स्वयंचलित व्हॅक्यूम क्लिनर चालते. तरी तिला अगदी मोहरीच्या आकाराच्या वस्तु सापडतातच, आणि त्या तोंडात घालायच्या असतात. बाहेर भरपूर झाडे असल्याने कुठूनतरी सरडा, मधमाशी वगैरे घरात येते.
हे बघता त्या माउलीला भर रस्त्यावर लेकराला वाढवणे किती कठीण जात असेल, याची चांगलीच कल्पना आली.

सिरुसेरि's picture

12 Apr 2019 - 12:39 pm | सिरुसेरि

खरे आहे . +१००