झगमगाटातील अस्वस्थता....

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in जनातलं, मनातलं
14 Mar 2019 - 11:49 pm

एक जोरदार आळस देऊन मी उठलो. भ्रमणध्वनीवर 'ओला' निरोप पावला. Driver Saroj is reaching your address. 'सरोज? ओलाने लेडी ड्रायव्हर पाठवला की काय?' क्षणभर सुखावलेल्या माझ्या मनाला चालकाच्या तपशिलात छायाचित्र दिसले जे बाप्याचे होते. म्हंटले 'असो.' सामानाची बॅग उचलली आणि खाली आलो. चालक वाट पाहात होता. डिकीत (भारतात हाच शब्द प्रचलित आहे) बॅग ठेवली आणि पासपोर्ट, तिकिट थोडेफार भारतिय आणि ओमानचे चलन असलेला महत्वाचा चामड्याचा कसा उर्फ 'पाऊच' घेऊन मी चालकाशेजारी बसलो. परदेश प्रवास, विमान प्रवास तसा आता मला नविन नव्हताच. गेली ३८ - ३९ वर्षे परदेश प्रवास करीत आल्याने माझ्या हालचालीत, नवव्या बाळंतपणाला निघालेल्या एखाद्या ग्रामिण महिले इतकी सहजता होती. गाडीत बसल्याबसल्या भारतातील एकेका मित्रसमूहावर मी निघाल्याचा आणि मस्कतच्या मित्रसमुहांवर मी येत असल्याचा निरोप टाकला. एक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्यावर फेसबुक चाळत बसलो. भारतातील मित्रांचे 'आनंदित' हास्यमुद्रांचे शिक्के भ्रमणध्वनीवर येऊ लागले तर मस्कतच्या मित्रांचे 'रडवेले' शिक्के येऊ लागले. रजेचा दिवस असल्याने महामार्गावर विषेश रहदारी नव्हती. वेळेत विमानतळावर पोहोचलो. खाली उतरून मोठी बॅग उतरवली. 'ओला'वाल्याचे हात ओले केले. तो निघाला..निघाला...आणि दिसेनासा झाला. मी वळलो. बॅग उचलली आणि शरीरातून वीज सरसरली. पासपोर्ट, तिकिट असलेला पाऊच कारमध्येच राहीला होता. 'ओला' ड्रायव्हर मुंबईच्या रहदारीत विरघळला होता.

आता एकच मार्ग होता. चालकाला फोन करून बोलवायचे. पण भ्रमणध्वनीतील आलेले निरोप तपासून पाहता ड्रायव्हरचा भ्रमणध्वनी असलेला निरोप कुठे सापडेना. वेगवेगळ्या प्रकारे शोध घेऊन ही क्रमांक मिळेना आणि माझी अस्वस्थता वाढू लागली. ताबडतोब करण्यासारखी गोष्ट म्हणजे पोलीसात तक्रार करणे. पोलीस डेस्क विमानतळाच्या दूसर्‍या टोकाला होते. आता धावाधाव अटळ होती. वेळ पुढे सरकत होती. पोलीसांना सर्व हकीकत सांगितल्यावर त्यांनी आपापसात जरा विचारविनिमय करून मला 'ओला'च्या डेस्कवर तक्रार करायला सांगितले. 'ओला' डेस्क कुठे आहे हे विचारल्यावर त्यांनी समोरची इमारत दाखविली. 'सहाव्या मजल्यावर कोणालाही विचारा.' हा निरोप घेऊन मी लगबगीने (जमेल तेव्हढ्या) निघालो. सहाव्या मजल्यावर पोहोचलो. 'ओला'चे डेस्कही मिळाले. तिथे ५-६ जणं गर्दी करून उभे होते. डेस्कवर कोण बसलंय दिसत नव्हतं. गर्दीत घुसलो. तिथे एक 'तुला पाहते रे' आकाराची मुलगी बसली होती. तिला माझी समस्या सांगितल्यावर 'तिथे सुपरवाझरला सांगा' अशी सज्जड विनंती तिने मला केली. तिने दाखविलेल्या दिशेने पाहीले तर तिथे जवळ जवळ १५-२० माणसे अस्ताव्यस्त फिरत होती. 'अहो! त्यांच्यात सुपरवायझर कोण' असे विचारता 'तिथे विचारा होss!' अशा वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या. तिथे एकाच्या अंगावरील जा़कीटावर 'OLA' असं लिहीलं होतं. त्याला विचारलं 'तुम्ही सुपरवाझर आहात का?' त्यावर हो, नाही काही न म्हणता म्हणाला 'काय काम आहे?' मी कैफियत मांडली. त्या बरोबर 'त्यांना सांगा असे म्हणून अजून एका तिसर्‍याकडेच मला पाठवले. हे सर्व इतक्या तपशिलात लिहीण्याचा उद्देश हा की हातातून वाळू सरकावी तशी वेळ झरझर सरकत होती. तो 'ओला'चा चालक किती दूर गेला असेल, त्याला माझा पाऊच मिळाला असेल का? तो प्रामाणिक असेल का? पैसा आणि तिकिटा पेक्षा मला पासपोर्टची धास्ती होती. त्यावर माझे ओमान आणि युएस असे दोन वैध व्हिसा होते. नविन पासपोर्ट, नविन व्हिसा ह्यात बराच काळ गेला असता आणि तेव्हढा वेळ मला भारतात राहावे लागले असते आणि माझ्या व्यवसायाच्या दृष्टीकोनातून ते फार अडचणीचे झाले असते. त्यामुळे त्या भव्य विमानतळावरील झगमगाटात माझी अस्वस्थता वाढत होती.

सुपरवाझर अबोल असला तरी समजुतदार होता. माझी समस्या लक्षात घेऊन त्याने त्याच्या आसपास उभ्या असलेल्यां समस्या बाजूला सारुन मला प्राधान्य दिले. माझ्या भ्रमणध्वनीतुनच कुठेतरी एक नंबर फिरवला आणि म्हणाला, 'बोला'. फोनमधल्या माणसाला मी माझी समस्या सांगितली. आता समांतर नविन समस्या अशी होती की जिथून मी बोलत होतो तिथे खुप आवाज, गोंगाट होता आणि पलिकडच्या बाजूला मनस्वी खरखर होती. त्याला काय समजत होते तोच जाणे. तो मला फक्त 'होल्ड ऑन' म्हणाल्याचे मला समजले आणि होल्ड मोड मध्ये गेलो. थोड्या वेळाने (तो ही मला कितीतरी खूप खूप वाटला) तो म्हणाला,'तुमचा पाऊच ड्रायव्हरला मिळाला आहे आणि तो तो घेऊन विमानतळावर येतो आहे. त्याचा नंबर लिहून घ्या. म्हंटलं द्या. त्याने नंबर सांगायला आणि मी लिहून घ्यायला सुरुवात केली. दहापैकी ७ क्रमांक लिहून झाले आणि शेवटचे तिन क्रमांक काही नीट कळले नाहीत. 'हॅलो, अहो नीट ऐकू येत नाहीए. शेवटचे ३ क्रमांक पुन्हा सांगा. हॅलो.....हॅलो....!' पण माझे हॅलो..हॅलो खरखरात विरून गेले आणि फोन बंद झाला. आता झाली का पंचाईत. पुन्हा त्या सुपरवाझरला गाठलं. त्याने न चिडता पुन्हा नंबर जुळवून दिला. पण आता पलीकडचा माणूस बदलला होता. नशिब म्हणजे मघा सारखी खरखर नव्हती. त्याला मी सर्व केस समजाऊन सांगितली. त्याने मला ड्रायव्हरचा नंबर दिला. त्याचे धन्यवाद मानून मी फोन बंद केला आणि ड्रायव्हरला नंबर जुळवला. नशीब तो लगेच फोनवर आला. आमचं बोलणं झालं आणि तो येतो म्हणाला. 'तुम्हाला सोडलं होतं तिथेच थांबा.' झालं. पासपोर्ट मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने डोक्यावरचं बरचसं ओझं उतरलं होतं. पण त्याने सांगितलेली जागा इथून दूर होती. पुन्हा लगबग. २० किलोची बॅग घेऊन धावाधाव. कसाबसा पोहोचलो. ड्रायव्हर वाट पाहात उभा होता. पाऊच मिळला. हुश्श्श्श्श.....! ड्रायव्हरला बक्षिशी देऊन निघालो.

पुलवामा हल्ल्यानंतर विमानतळावर सुरक्षाव्यवस्था पराकोटीची होती. प्रवेशद्वारावरचा द्वारपाल प्रत्येक प्रवाशाचा पासपोर्टवरील कधीकाळी काढलेले छायाचित्र प्रवाशाच्या आजच्या चेहर्‍यामोहर्‍याशी जुळविण्याचा प्रयत्न करीत होता. तिकिटावरील तपशील, कोणाच्या भ्रमणध्वनीतील बोर्डींग पास वगैरे तपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत होता. रांग वाढत होती आणि सुस्तावल्या अजगराच्या चालीने सरकत होती. मला घाम फुटायला लागला. केव्हा मी आत जाणार आणि कधी विमानापर्यंत पोहोचणार? आधीच बराच वेळ फुकट गेला होता. एक समाधान होतं. विमान चुकलं तरी चालण्यासारखं होतं. एखाद दिवस उशीर झाला असता पण पासपोर्ट मिळाला होता हे महत्वाचे. कसाबसा विमानतळाच्या इमारतीत प्रवेश मिळाला. चेकइन काऊंटरला पुन्हा भरली थोरली रांग. मी तिथल्या एका कर्मचार्‍याला पकडले आणि 'माझ्या विमानाची वेळ होत आली आहे मला पुढे घ्या' अशी विनंती केली पण 'वेळ झाली की ते बोलवतीलच' असे म्हणून घाईघाईत तो कुठे तरी निघून गेला. बहूतेक त्याची 'वेळ' जवळ आली असावी. मुंगीच्या गतीने सरकत चेकइन काउंटरला पोहोचलो. बॅग स्विकारली गेली. मी माझा पासपोर्ट, पाऊच घट्ट धरून सुरक्षाकक्षाकडे धावलो. तिथेही हीssssss गर्दी. माझी अस्वस्थता कमालीची वाढली होती. इतर प्रवाशांची माफी मागत थेट काऊंटरला गेलो आणि माझ्या फ्लाईटची वेळ झाली आहे सांगत मला आधी तपासा अशी विनंती केली. त्या बाबाने माझं ऐकलं आणि सुरक्षातपासणी उरकली. पुढे गेलो आप्रवास (इमिग्रेशन) काऊंटरला पोहोचलो. आज नशिबच मार खात होतं. सगळीकडे खचाखच गर्दी आणि वेळ तर संपत आली होती. पुन्हा ते विनवाविनवी, मनधरणी. इतर प्रवाशांची आणि अधिकार्‍यांचीही. पण जमलं. इमिग्रेशन अधिकार्‍याने पासपोर्ट, बोर्डींगपास तपासला. त्याचा चेहरा चिंताग्रस्त दिसला. एकदा हातावरचे घड्याळ पाहीले. मला तिथेच तिष्ठत ठेवून तो त्याच्या वरीष्ठांना भेटायला गेला. मी अस्वस्थ. नवरीष्ठ, वरीष्ठ जवळच होता. अधिकार्‍याचे आणि त्याच्या वरीष्ठाचे काहीतरी बोलणे झाले आणि वरीष्ठाने कोणाला तरी फोन लावला. बहुधा विमान कंपनीच्या कर्मचार्‍याला असावा तिथून हिरवा कंदील मिळताच. तो अधिकारी परतला आणि माझ्या पासपोर्टवर जाण्याचे शिक्कामोर्तब झाले. अजूनही धोका टळला नव्हता. ऐनवेळी विमानाच्या दरवाज्यातूनही परत पाठतात. धावलो. गेट क्रमांक ७७. दरवाज्याला पोहोचलो तर बोर्डींग सुरु झाले होते. नंबर लागला बाबा एकदाचा. फायनल हुश्श्श्श्श करून निघालो. आता काही अडवत नाहीत. विमान भरले असणार आणि मी येताच विमान हलेल असा माझा अंदाज. पण विमानात पोहोचलो तर विमान ९० टक्के रिकामेच होते. जागेवर स्थानापन्न झाल्यानंतरही बराच वेळ प्रवासी येतच होते. विमान भरत होतं. विमानाला अर्धातास उशीर झाला होता.

विमान तळावारील झगमगाटात झालेल्या माझ्या अस्वस्थ जीवाला स्वस्थता लाभली. अर्धातास उशीराने का होईना विमान मला घेऊन एकदाचे हलले.

-समाप्त-

कथालेख

प्रतिक्रिया

फेरफटका's picture

15 Mar 2019 - 12:33 am | फेरफटका

मस्त जमलाय लेख. वर्णन वाचताना एकदम 'चश्मदीन गवाह' असल्यासारखं वाटत होतं.

कंजूस's picture

15 Mar 2019 - 5:06 am | कंजूस

धावतं वर्णन!

थरारक आणि चित्रदर्शी.

सिक्युरिटी आणि इमिग्रेशन काउंटर्सवर अचानक तुफान गर्दी नेमकी कधी होईल याचा अंदाज बांधणं कठीण.

इथून निघतानापेक्षा परत आल्यावरच्या शिक्क्याला रांग लागली तर आणखी त्रासदायक वाटतं.

यशोधरा's picture

15 Mar 2019 - 8:04 am | यशोधरा

बापरे! भलतीच धावाधाव की!
विसरलेलं पाकीट व्यवस्थित मिळालं ते एक बरं झालं.

विजुभाऊ's picture

15 Mar 2019 - 10:01 am | विजुभाऊ

कधी येवून गेलात ते कळालेच नाही

प्रभाकर पेठकर's picture

15 Mar 2019 - 10:56 am | प्रभाकर पेठकर

फेरफटका, कंजूष, गवि, यशोधरा आणि विजूभाऊ - मनापासून धन्यवाद.

गवि,
>>>>इथून निघतानापेक्षा परत आल्यावरच्या शिक्क्याला रांग लागली तर आणखी त्रासदायक वाटतं.<<<<
ह्यावेळी मला नविन मार्ग सापडला आहे. मला एक सिनिअर सिटीझन काउंटर दिसले. तिथे ४-५ प्रवासीच होते. तिथे मी खांदे पाडून उभा राहिलो. १० मिनिटात बाहेर पडलो.

यशोधरा,
>>>>विसरलेलं पाकीट व्यवस्थित मिळालं ते एक बरं झालं.<<<<
खरं आहे. पासपोर्ट हरविण्यासारख टेंशन नाही.

विजूभाऊ,
शेवटी आपलं बोलणं श्रीलंकेत झालं होतं. मला वाटलं अजून तुम्ही तिथेच रमला आहात. असो. ८-१० दिवसांत बरीच धावपळ होते. प्राधान्यक्रमाने कामे अक्षरश: उरकावी लागतात. भेटायला वेळच मिळाला नाही. पुन्हा मे महिन्यात येणार आहे. तेंव्हा नक्की एक कट्टा करू.

पुण्यात होणार ना कट्टा? तीन धागे निघाले पायजेलेत!! =))

अभ्या..'s picture

15 Mar 2019 - 11:13 am | अभ्या..

मस्त वर्णन एकदम. निर्दोष लिखाण हे तर काकांचे वैशिष्ट्य प्लस तडका मस्त जमलाय.
ओलाचे बुकिंगवेळी ड्रायव्हरचा वेहिकल आणि मोबाईल नंबर येतो ना अ‍ॅपवर आणि मेसेजवर असे वाटलेले पण राईड चालू असतानाच दिसतो. राईड संपून स्टारं वगैरे दिले की हिस्टरीमधून हुडकणे शक्य नाही दिसतेय.

प्रभाकर पेठकर's picture

15 Mar 2019 - 11:44 am | प्रभाकर पेठकर

तुमची ट्रिप संपली की त्या ट्रिप संबंधीचे सर्व मेसेजेस डिलीट होतात. त्यावर तुमचा कंट्रोल नसतो. पण स्क्रीनच्या डाव्या कोपर्‍यात ज्या ३ रेषा दिसतात त्यावर टिचकी देताच एक मेन्यू येतो. त्यातील Your rides सिलेक्ट केल्यावर तुमच्या सर्व ट्रिप्स ची यादी दिसते. त्यातील लेटेस्ट ट्रिप निवडल्यावर उजव्या हाताला खाली Support हा पर्याय निवडून जो मेन्यू येतो त्यात I left a belonging in the cab हा पर्याय निवडायचा. येणार्‍या स्क्रिन वर SHOW DRIVER DETAILS अशी निळ्या रंगातील ओळ दिसेल त्यावर टिचकी मारली असता ड्रायव्हरचा फोटो, नांव, गाडीचा नंबर, आणि फोनचे चित्र दिसते. त्यातील फोनच्या चित्रावर टिचकी मारताच ड्रायव्हरला फोन लागतो.
एव्हढा उपद्व्याप करायला लागण्यापेक्षा Your rides मधेच ड्रायव्हचे नांव आणि फोन नंबर दिला तर प्रवाशाचा बराच वेळ वाचेल. शिवाय नवोदित प्रवाशाला, त्यातून टेक्नॉलॉजी बद्दल अज्ञान असणार्‍या माझ्या सारख्या प्रवाशाला एव्हढे तपशील माहीत नसतात, कळत नाहीत. मला हे सर्व घडून गेल्यानंतर एका निवांत क्षणी माझ्या मुलाशी चर्चा करताना कळले. असो. अनुभव हा असा गुरु असतो जो प्रथम शिक्षा करतो आणि नंतर धडा शिकवितो.

प्रभाकर पेठकर's picture

15 Mar 2019 - 11:50 am | प्रभाकर पेठकर

शिवाय जेंव्हा पहिला मेसेज येतो की 'अमुक अमुक ड्रायव्हर तुमच्या लोकेशनला येतो आहे' त्यात ड्रायव्हरचा भ्रमणध्वनी क्रमांक असतो. त्यावर लगेच एक फोन करुन तो कुठपर्यंत पोहोचला आहे वगैरे जुजबी चौकशी करून ठेवली तर ते कॉल डिटेल्स तुमच्या कॉल लॉगबुक मध्ये सेव्ह होतात. ते तुम्हाला केंव्हाही, ट्रिप संपल्यावरही, उपलब्ध असतात. पण असा फोन करायला विसरलात तर वरील सर्व सोपस्कार करावे लागतात.

नवव्या बाळंतपणाला अनपेक्षित अडचण :-)
किस्सा आवडला.

प्रभाकर पेठकर's picture

15 Mar 2019 - 11:53 am | प्रभाकर पेठकर

>>>>>नवव्या बाळंतपणाला अनपेक्षित अडचण :-)>>>>

खरं आहे. कितीही अनुभव असला तरी 'भय इथले संपत(च) नाही.'

प्रचेतस's picture

15 Mar 2019 - 11:47 am | प्रचेतस

सहजसुंदर लेखन.

प्रभाकर पेठकर's picture

15 Mar 2019 - 11:54 am | प्रभाकर पेठकर

अभ्या.., अनिंद्य, प्रचेतस धन्यवाद.

वकील साहेब's picture

15 Mar 2019 - 1:01 pm | वकील साहेब

ओघवते लिखाण आवडले. नवव्या बाळंतपणाची उपमा, तुला पाहते टाईप मुलगी (हा हा हा )
सज्जड विनंती हा शब्दप्रयोग ही विशेष आवडला

तुषार काळभोर's picture

15 Mar 2019 - 1:46 pm | तुषार काळभोर

तुम्ही स्थानापन्न होईपर्यंत जीव मुठीत धरून वाचत होतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Mar 2019 - 3:56 pm | ज्ञानोबाचे पैजार

वेलकम ब्याक पेठकर काका,
अनुभव आवडला,
आता इकडे नियमित यायला लागा,
पुलेशु,

पैजारबुवा,

प्रभाकर पेठकर's picture

15 Mar 2019 - 4:16 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद वकिल साहेब, पैलवान आणि ज्ञानोबाचे पैजार.

टिवटिव's picture

15 Mar 2019 - 6:51 pm | टिवटिव

मस्त वर्णन !

उगा काहितरीच's picture

15 Mar 2019 - 7:04 pm | उगा काहितरीच

नववे बाळंतपण होते म्हणून ठीक , नाहीतर काही खरं नव्हतं . ;-)

प्रभाकर पेठकर's picture

15 Mar 2019 - 7:32 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद.

नूतन's picture

15 Mar 2019 - 7:39 pm | नूतन

आवडलं.चित्रदर्शी वर्णन.

डॉ.प्रसाद दाढे's picture

15 Mar 2019 - 8:24 pm | डॉ.प्रसाद दाढे

चांगलंच घाबरवून सोडलंत हो सगळ्यांना..अगदी पहिलटकरणीसारखं

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Mar 2019 - 8:51 pm | राजेंद्र मेहेंदळे

दाढे साहेब तुम्ही मिपावर?

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2019 - 8:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं अनुभव वर्णन ! बर्‍याच दिवसांनी तुमच्या खुसखुशीत शैलीचा आस्वाद घेताना, श्वास रोखला असतानाही, मजा आली. लिहित रहा.

प्रभाकर पेठकर's picture

15 Mar 2019 - 8:36 pm | प्रभाकर पेठकर

टिवटिव, नूतन, डॉ. प्रसाद दाढे, डॉ. सुहास म्हात्रे मन:पूर्वक धन्यवाद.

दादा कोंडके's picture

16 Mar 2019 - 1:48 am | दादा कोंडके

धावतं समालोचन जमलंय.

मिसळ's picture

16 Mar 2019 - 2:02 am | मिसळ

पण ह्या अनुभवातून जाताना तुमची अवस्था कशी झाली असेल याची कल्पना आहे. नेहमीप्रमाणे उत्तम लेखन.

ट्रेड मार्क's picture

16 Mar 2019 - 5:11 am | ट्रेड मार्क

कितीही प्रवास केला तरी प्रत्येकवेळी नवीन अनुभव असतो. स्वतःहून घातलेले गोंधळ किंवा इतर कोणीतरी घातलेले गोंधळ यामुळे काही प्रवास कायम आठवणीत राहतात. तुम्हाला पासपोर्ट वेळीच परत मिळाल्यामुळे लवकर सुटलात.

आम्हाला गेली काहीवर्षे विमानप्रवास अजिबातच धार्जिणा नाहीये असं वाटतंय. सुरवात या प्रवासापासून झाली आणि नंतर अजून २ अनुभव खात्यात जमा झाले आहेत. सवड झाल्यास ते पण लिहीन.

मित्रहो's picture

16 Mar 2019 - 8:52 am | मित्रहो

मिळाला हे महत्त्वाचे. थरारक अनुभव. ड्रायव्हरचा नंबर माहिती असणे गरजेचे असते.

सुबोध खरे's picture

16 Mar 2019 - 9:57 am | सुबोध खरे

पासपोर्ट व्हिसा आणि तिकीट असलेली बॅग हरवणे म्हणजे केवढे सव्यापसव्य झाले असते. पैशापरी पैसे आणि वर नस्ती कटकट.
नुसते परत मिळाले एवढेच नव्हे तर विमानही गाठता आले.
असे झाले कि अनेक वेळेस आपल्याला आपण पूर्वी केलेल्या चांगल्या कामांमुळे त्याचे फळ मिळाले अशी भावना येते.

मुक्त विहारि's picture

16 Mar 2019 - 10:09 am | मुक्त विहारि

हुश्श

गोरगावलेकर's picture

16 Mar 2019 - 10:25 am | गोरगावलेकर

आवडलं धावतं वर्णन.

प्रभाकर पेठकर's picture

16 Mar 2019 - 11:46 am | प्रभाकर पेठकर

दादा कोंडके, मिसळ, ट्रेड मार्क, मित्रहो, सुबोध खरे, मुक्त विहारी आणि गोरगावलेकर मन:पूर्वक धन्यवाद.

अनिता ठाकूर's picture

16 Mar 2019 - 4:45 pm | अनिता ठाकूर

टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते( नक्की शब्द माहित नाही. ) ठोक्यात! हात पाय गार पडणे, छातीत धडधडणे, घशाला कोरड पडणे, पोटात बागबुग होणे असं सगळं अनुभवलं असेल. इथून पुढे गळ्यातली बॅग वापरावी.

दुर्गविहारी's picture

16 Mar 2019 - 8:18 pm | दुर्गविहारी

थरारक वर्णन! पण वाचायला मजा आली आणि मुख्य म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे ते हि समजले. छान!

ज्योति अळवणी's picture

17 Mar 2019 - 6:23 pm | ज्योति अळवणी

मस्त वर्णन. वाचताना सुद्धा अस्वस्थ वाटत होतं

प्रभाकर पेठकर's picture

17 Mar 2019 - 8:09 pm | प्रभाकर पेठकर

अनिता ठाकूर - धन्यवाद. सल्याबद्दल नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल.
दूर्गविहारी, ज्योति अळवणी - मनःपूर्वक धन्यवाद.

बापरे.. वेळेवर पासपोर्ट हरवणे म्हणजे बापरेच..
असो.. अंत भला तो सब कुछ भला!

समीरसूर's picture

18 Mar 2019 - 2:56 pm | समीरसूर

सुंदर अनुभवकथन! मजा आली. :-)

चिगो's picture

18 Mar 2019 - 5:45 pm | चिगो

अत्यंत चित्रदर्शी आणि थरारक अनुभव.. आणि बरेच बरेच दिवसांनी तुमचं सुग्रास लेखन वाचायला मिळालं.
पुन्हा लिहीते व्हा, ही विनंती..

शेखरमोघे's picture

18 Mar 2019 - 8:33 pm | शेखरमोघे

मस्त......विशेष करून .....नवव्या बाळंतपणाला निघाल्याइतकी सहजता. . . . भारतातील मित्रसमूहाचे 'आनंदित' हास्यमुद्रांचे शिक्के. सुन्दर!

आपल्याला "चश्मदीन" बनवल्याचे वाचल्यावर आपला चश्मा या गोन्धळात हरवला की काय अशी शन्का आली, पण बहुतेक लिहिणार्‍याना चश्मदीद म्हणायचे असावे.

वर्णन आवडले.

प्रभाकर पेठकर's picture

19 Mar 2019 - 4:37 pm | प्रभाकर पेठकर

आनन्दा - पासपोर्ट गहाळ झाल्याची पहिली संवेदना आणि विजेचा २३० व्होल्टचा झटका जवळ जवळ सारखाच, असा अनुभव होता. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
समीरसूर - मलाही मजा आली. पण नंतर. आधी तोंडचे पाणी पळाले होते. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
चिगो - धन्यवाद. 'सुग्रास लेखन' शब्द लै भारी.
शेखर मोघे - धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

19 Mar 2019 - 5:13 pm | चौथा कोनाडा

खतरनाक लिहिलंय राव ! अतिशय धावतं वर्णन !

नवव्या बाळंतपणाला निघालेल्या एखाद्या ग्रामिण महिले इतकी सहजता
'ओला'वाल्याचे हात ओले केले
'तुला पाहते रे' आकाराची मुलगी

हा हा हा ..... भारी पंचेस !

प्रपेसाहेब, मजा आली लेख वाच ताना !

उपेक्षित's picture

20 Mar 2019 - 12:32 pm | उपेक्षित

चांगलीच धावपळ झाली काकांची, नशीब पाऊच मिळाला.

गडबडीच्या वेळी स्क्रीन शॉट काढून ठेवणे हा उत्तम पर्याय आहे, फोन बँकिंग च्या वेळी सुद्धा याचा उपयोग झालेला आहे.

चौथा कोनाडा's picture

20 Mar 2019 - 3:30 pm | चौथा कोनाडा

+१

मी देखील बऱ्याच वेळा काही स्क्रीन शॉट्स काढून संदर्भासाठी साठवतो.
जलद संदर्भासाठी एकदम उपयोगी !

मिसळपाव's picture

22 Mar 2019 - 4:14 am | मिसळपाव

पेठकरकाका,
हे सगळं ईथे लिहीताना कसं तरंगत, तरंगत लिहिलं असाल!! बाळंतीण थोडावेळ अडली खरी पण सुटली हे महत्वाचं :-) त्या तासा-दोन तासात जीव कसा कासावीस झाला असेल कल्पना आहे.

प्रभाकर पेठकर's picture

23 Mar 2019 - 2:53 pm | प्रभाकर पेठकर

चौथा कोनाडा, उपेक्षित, मिसळपाव मनापासून धन्यवाद.

सविता००१'s picture

27 Mar 2019 - 6:34 am | सविता००१

भारी अनुभव

प्रभाकर पेठकर's picture

1 Apr 2019 - 9:07 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद सविता ००१.