नकळत सारे घडले

शाम भागवत's picture
शाम भागवत in जनातलं, मनातलं
4 Mar 2019 - 10:23 pm

हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!!
(पाक प्रवक्ता हे मुख्य पात्र आहे. त्याचे नाव आहे फुरफुर. त्याने वॉररूम सारखी ट्विटररूम बनवली आहे. त्यात तो स्वत: व त्याचे तीन दुय्यम सहकारी बसलेले आहेत. सर्वाच्या पुढे फोन, मोबाईल, लॅपटॉप वगैरे सगळी अत्याधुनिक साधने आहेत. याच रूमला जोडून फुरफुरची एक साऊंडफ्रुफ केबीन आहे.)

भाग १

पहिला: सर, भारताची तीन विमाने पडली आहेत.
दुसरा: नक्कीच आपण पाडलेली असणार. आपण २४ पाठवली होती. त्यांची सगळी मिळून अशी किती असतील?
फुरफुर: १९९१ च्या गल्फ वॉरनंतर एवढं मोठ्ठ २४ विमानांच फॉरमेशन जगात प्रथमच होतंय. हेच तर आपलं धक्कातंत्र आहे. आपण एकदम एवढी विमाने पाठवू असा स्वप्नात देखील भारत विचार करणार नाही.
त्यामुळे त्यांच्याकडे फार विमाने नसतील. ८ असतील. १० म्हणजे डोक्यावरून पाणी.
धक्कातंत्राच यश वेगळेच. तीन पडली सुद्धा त्यांची. त्या मूडीला म्हणावं, आम्हालाही धक्कातंत्र येत.
तिसरा: हो पण त्यांची लोकेशन काय आहेत?
फुरफुर: ती आत्ता काय करायचीयेत? ते नंतर बघता येईल की. जमिनीवर पडल्यावर ती रांगत रांगत कुठेतरी जाऊन जागा बदलतील अस वाटतंय का?
(हशा)
फुरफुर (स्वगत): ह्याच्या कायम शंका घेणे चालू असते.

फुरफुर: (ट्विटरवर) : आम्ही भारताची तीन विमाने पाडली आहेत.

फुरफुर: तेवढं वैमानिकांच काय झालं ते बघा? ती जर हातात सापडली ना तर एकदम हुकमाचा एक्काच हातात येईल. बघा लवकरात लवकर काही कळतंय का ते?

पहिला (थोडा वेळ फोनवर बोलणं झाल्यावर स्वगत): रेंजरना दोनच पॅराशूट दिसताहेत. दोन वैमानिकांनी एकाच पॅराशूटमधून उडी मारली की काय? असे कसे होईल. नक्कीच तीन असणार. सापडेल तिसरे पण.

पहिला (एकदम उत्तेजीत स्वरूपात) : आकाशात तीन पॅराशूट दिसताहेत. त्यांना पकडायला काहीजण तिकडे निघाले आहेत असा मेसेज आलाय सर.
तिसरा: त्यांना पकडल्यावर लागलीच कळवायला सांगूया.

फुरफुर: (स्वगत): च्च. जरा गप की रे. मी आहे ना निर्णय घ्यायला. ह्याचे आपले चालूच.

फुरफुर: अरे ते जाऊन जाऊन कुठे जाणारेत? आणि पळून पळून किती पळणारेत?. भारतीय हद्द इथून खूप लांब आहे म्हणावं. आता घर वगैरे सगळं विसरांयच.
(तिसरा सोडून सगळे हसतात)

फुरफुर: (स्वगत): फार खुसपट काढतो बॉ हा.

फुरफुर: (ट्विटरवर): आम्ही भारताची तीन विमाने पाडली आहेत. तिन्ही वैमानिक आमच्या ताब्यात आहेत.

(थोड्यावेळाने)
दुसरा: सर, त्या तीन विमानातील एक हेलिकॉप्टर होत अस कळतंय.
फुरफुर: ऑ.

फुरफुर (स्वगत) : हेलीकॉप्टर? हे इथे काय करतय? आपल्या २४ फायटर विमानांशी लढायला भारत हेलीकॉप्टर पाठवतोय? येडे आहेत की काय?

तिसरा: म्हणजे ते भारतव्याप्त काश्मिरात पडल असलं तरी आता कळतंय की, आपली विमान तेथे जायच्या अगोदरच पडलंय. म्हणजे आपण काही ते पाडलेल नाही.

फुरफुर (स्वगत) : काय कटकट आहे. ह्याला आत्ताच पडायला काय झाल होत? आता विमानांची संख्या बदलणं आलं.
फुरफुर: (ट्विटरवर घाईघाईत): आम्ही भारताची दोन विमाने पाडली आहेत. तीन वैमानिक आमच्या ताब्यात आहेत.

फुरफुर: दोन विमाने व तीन वैमानिक हे गणीत काही कळेना.
(सगळेच काही काळ विचारमग्न. पण गणित सुटत नसल्यामुळे सगळेच गप्प.)
पहिला: सर, आत्ताच एक विमान पडल्याचा मेसेज आलाय. वेळ पण जुळतीय.
म्हणजे एकूण चार विमाने पडली आहेत अस दिसतंय. त्यातलं एक हेलीकॉप्टर असणार. म्हणजे आपण तीन विमाने पाडली हेच बरोबर आहे.
फुरफुर: हुश्श. सुटलो बॉ.
फुरफुर: (ट्विटरवर घाईघाईत): आम्ही भारताची तीन विमाने पाडली आहेत. तीन वैमानिक आमच्या ताब्यात आहेत.

(थोड्यावेळाने)
तिसरा: सर ते चौथं विमान भारताच्या हद्दीतच आतमध्ये पडलंय. मिग२१ होत ते. नेहमीप्रमाणे आपले आपणच पडलंय. आपण काहीच केलेलं नाहीये.
फुरफुर: छॅ. हे मिग२१ ना, नेहमी त्रास देत. १९७१ ला पण पिडलं होत आपल्याला. आतातर कोसळल्यानंतरही वैताग देतंय.
म्हणजे परत दोन विमाने व तीन वैमानिक होताहेत. कस ट्विट करायचे काही कळेना.
तिसरा: ट्विट करताना आपण वैमानिकाचा भाग गाळला तर?

फुरफुर: (स्वगत): याच डोकं चालत बॉ. त्यामुळेच याला टाळता येत नाही. असून अडचण नसून खोळंबा.

फुरफुर: (ट्विटरवर घाईघाईत): आम्ही भारताची दोन विमाने पाडली आहेत.
फुरफुर: चहा आणा रे जरा.

(चहा पिऊन ताजेतवाने वाटतय तोच.)
दुसरा: सर, एका वैमानिकाला लोकांनी पकडलंय व त्याला लोक धरून धुताहेत.
फुरफुर: बडवा म्हणावं. साले. काश्मीर पाहिजे काय?
दुसरा: लोक बडवताहेत तेच बरंय. लष्कराने एकदाका ताबा घेतला की मग, जिनेव्हा करारानुसार त्याला बडवता येणार नाही.
तिसरा: पण लोकांनीच बडवलं हे सिध्द कस करणार?

फुरफुर: (स्वगत): काय शिंची कटकट आहे ह्याची. पण बरोबर बोलतोय.

फुरफुर: लोक मारताहेत त्याचा व्हिडिओ काढून ठेवा. म्हणजे लष्कराच्या हातात वैमानिक येईस्तोवर लोकांनीच त्याला धुतला हे दाखवायला पुरावा राहील.
तिसरा: खरंय, ट्रंकसाहेबांना दाखवायला पुरावा पाहिजेच.

फुरफुर: (स्वगत): हा ट्रंक व ते मिग २१. छळवाद आहे नुसता. सगळा दिवस कसा छान चाललाय. पण याने ट्रंक साहेबांचे नाव काढून पार वाट लावली. बासुंदीत मिठाचा खडा.
पण ट्रंकसाहेबांपुढे हा पुरावा जायलाच पाहिजे.
मुद्दा महत्वाचा मांडलाय.

फुरफुर: व्हिडिओ अपलोड पण करून टाका म्हणजे ट्रंकसाहेबांना पण कळेल की लोकांनी मारलं. वैमानिकाला झालेल्या मारहाणीत पाक लष्कराचा काही संबंध नाही.

फुरफुर: (स्वगत) नाहीतर वैमानिकाला का मारलं? अस म्हणत सुरवात करेल तो दमबाजी करायला.

पहिला: (स्वगत) खरंय. त्याच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे.

तिसरा: (स्वगत) थेट ट्विटरच वापरतो राव. नाही. तू खूप मोठा आहेस. एकदम मान्य.
पण मग आम्हाला वेगळं बोलावून झाप की. आम्ही कुठे नाही म्हणतोय.
पण एकदम ट्विटरवर झापायचं म्हणजे फारच होत बॉ.
फटकन सगळ्या जगाला कळत की हो.
पार सगळी इज्जतच जाते.

फुरफुर: (स्वगत) अपलोड केलं की नक्कीच जाईल हे ट्रंकसाहेबांपुढे.
ते शिंच्च्च्च्च्च्च्च्च्च पेंटेगॉन. आपण लपवलेलं काय काय खणून काढून ट्रंकसाहेबांपुढे टेबलावर ठेवत असते.
हे तर नक्कीच जाईल.
लादेनला काय छान लपवला होता..... जाऊ दे. नकोच त्या आठवणी.
पण तो अगोदरचा फराक परवडला. झापायला ट्विटर तरी वापरत नव्हता. मूठ झाकलेली तरी राहायची.

दुसरा: सर, लोकांच्या हाती लागू नये म्हणून एक पळून गेलाय. दुसऱ्याला काय झालं माहीत नाही. प्रथम सावकाश चालत होता. पण नंतर एकदम जोरात पळायला लागला.
पहिला: आपण भारतातच आहोत अस सुरवातीला वाटलं असेल. थोड्या वेळाने ट्यूब पेटली असेल. त्या ट्यूबच्या उजेडात पाकिस्तान असल्याच जाणवलं असेल. मग लागला पळायला.
(हशा)

फुरफुर: ते दोघेपण सापडतील. जातात कुठे?
क्रमशः

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

4 Mar 2019 - 10:47 pm | आनन्दा

वा वा!

पिवळा डांबिस's picture

5 Mar 2019 - 12:59 am | पिवळा डांबिस

थेट ट्विटरच वापरतो राव. नाही. तू खूप मोठा आहेस. एकदम मान्य.
पण मग आम्हाला वेगळं बोलावून झाप की. आम्ही कुठे नाही म्हणतोय.
पण एकदम ट्विटरवर झापायचं म्हणजे फारच होत बॉ.
फटकन सगळ्या जगाला कळत की हो.
पार सगळी इज्जतच जाते.

हे तर मस्तच!!! :)

अभ्या..'s picture

5 Mar 2019 - 1:47 am | अभ्या..

लैच कंटाळवाणे लेखन.

बाकी "कंटाळवाणं" वगैरे म्हणणाऱ्या सो कॉल्ड आर्टिस्ट लोकांना मारा फाट्यावर. त्यांना स्वतः काही चांगलं करता येत नाही आणि दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही.

शाम भागवत's picture

5 Mar 2019 - 11:30 am | शाम भागवत

अहो, करू दे हो त्यांना त्यांचे मत व्यक्त.
तिखट खाणाऱ्याला गोडाचं जेवण जास्त जात नाही.
गोड खाणारा तिखट खाऊ शकत नाही.

पण म्हणून कोणालाही चूक म्हणता येत नाही. मला अभ्यासेठच्या मतांचाही आदर आहे.
:)

उपेक्षित's picture

5 Mar 2019 - 12:33 pm | उपेक्षित

ये बात शामराव आपला दृष्टीकोन आवडला.

बाकी लेखन फर्मास होते असलं वाचायची सवय नसणार्यांना कदाचित कंटाळवाणे वाटू शकते.

शिशिर's picture

10 Mar 2019 - 5:56 pm | शिशिर

मस्त...... खुसखुशीत लेखन ......

डँबिस००७'s picture

10 Mar 2019 - 9:12 pm | डँबिस००७

श्याम ,

जबरदस्त लेखन !! झकास !!