मी जेव्हा "श्यामची आई" पुस्तकात दिसणारा त्या काळाचा फोटो आल्बम, या विषयावर लेख लिहायला लागलो तेव्हा तो भसाभसा विस्कळीत होत गेला. कोंकणातल्या एखाद्या देवराईत कोणाच्या काटछाटीचं भय नसल्याने वाटेल तशी झाडं झुडपं अन वेली गुंताडा करत फोफावत जाव्यात तसं होत गेलं. त्याच काळातल्या एकमेकांच्या संदर्भांना साक्ष देणारी स्मृतिचित्रे, आमचा जगाचा प्रवास ही पुस्तकंही मी अर्धवट उष्टावून ठेवली. शेवटी क्रूरपणे खूप नोंदी "कापातल्या न्हाव्यांच्या" क्रूरतेने सपासप कापल्या आणि फक्त श्यामची आई या निरागसतेच्या पोथीवर फोकस ठेवला.
श्यामची आई हे पुस्तक मी लहानपणी आणि लहानपणभर सतत पुन्हापुन्हा वाचलं. आठ आणे, दीड रुपया अशा रेंजमधली परीकथांची पातळ पुस्तकं, रशियन भाषान्तरित रादुगाबिदुगा प्रकाशनं, मग उत्कर्षवाला फास्टर फेणे आणि भारांचे जवळजवळ सर्व हिरोज, हे सटासट येऊन जात असताना श्याम मात्र टिकून होता.
श्यामची आई हे पुस्तक कोणत्याही गावाच्या छपाईयंत्रावर का छापलं गेलं असेना, पण ते सर्व अर्थाने "कोंकणात छापून तेथेच प्रसिद्ध केले" प्रकारातलं आहे. कोंकणातच लहानपण जगलेला मी, म्हणून केवळ त्यातल्या वातावरणासाठी ते पुस्तक मनात टिकून राहिलं असेल. त्यातल्या "एज ऑफ इनोसन्स"च्या तात्त्विक चिंध्या होऊनही त्याचं कुठेतरी आकर्षण टिकून होतं.. आणि टिकून आहे. वाचक म्हणून वय वाढलं तरी आपल्याला श्यामच्या घरी एकदा तरी जायला मिळायला हवं होतं असं वाटत राहिलं.
तसं म्हटलं तर कोंकणातल्या आसपासच्या खेड्यांमध्ये अगदी तश्शी घरं आणि तस्सं वातावरण यांमध्ये जाऊन राहणं शाळूमित्रांमुळे असंख्यदा घडलं. माझ्या लहानपणच्या त्या काळात कोंकणात "बदल" या नावाखाली पाचोळाही इकडून तिकडे हलत नसे. त्यामुळे १९०० या शतकाच्या सुरुवातीच्या श्यामची संस्कृती माझ्या लहानपणीही अगदी पूर्ण कालबाह्य झाल्यासारखी वाटायची नाही.
साधारण तीच दशकं दाखवणारी आणखी काही पुस्तकं पुढे वाचण्यात आली. त्यातलं मुख्य म्हणजे स्मृतिचित्रे. पण तो एक स्वतंत्र विषय आहे. त्या पुस्तकात कोंकण नाही. पार्श्वभूमी वेगळी, पण काळाचे फोटो दाखवण्याबाबतीत ही पुस्तकं एकमेकांना साथ देतात.
त्याखेरीज इतरही अनेक पुस्तकं... काही पुस्तकांमध्ये ब्रिटिश, स्वातंत्र्यलढा, क्रान्तिकारक यावर फोकस असायचा. अशा पुस्तकांमध्ये काळाचे फोटो मिळाले तरी ते स्टुडियोतले वाटायचे. श्यामची आई आणि स्मृतिचित्रे यांमध्ये मात्र असा कोणताही एक फोकस नसल्यामुळे माणसांतले परस्परसंबंध, घरगुती नाती, ताणेबाणे, एकूण बाया आणि पुरुष यांच्या मनांची ठेवण, पैसाअडका, खाणंपिणं अशा सगळ्यासगळ्याची मनसोक्त हाय मेगापिक्सेल चित्रं दिसतात. स्वातंत्र्य, युद्ध, चळवळ, सत्याग्रह असा एक, डोळे तपासणीत असतो तसा काही कंपल्सरी "फिक्सेशन पॉईंट" श्यामची आई किंवा "स्मृतिचित्रे"त ठेवलेला नाही. त्यामुळे पेरिफेरल व्हिजनमध्ये धूसर काही दिसलं तर तिकडे सरळ वळून, रोखून आणि निरखून बघता येतं.
"मध्यमवर्गातल्या विसंगतींवर हसतखेळत भाष्य", किंवा "मी बुवा अगदी सामान्य मनुष्य, मला फार काही कळत नाही" असं म्हणत म्हणत दर चार ओळींनंतर उच्च फलसफे झाडणं असा कोणताही मुद्दाम स्वीकारलेला अभिनिवेश लेखनात नसल्याने हे पुस्तक म्हणजे लख्ख आरसा आहे.
या पुस्तकामध्ये त्या काळातलं मला काय दिसलं याविषयी मांडणी करणं अत्यंत विस्कळीत होणार आहे. आणि तसं मी करणार आहे.
या पुस्तकापुरताच आणि पालगड, दापोली, लाडघर, हर्णे आणि आसपासच्या परिसरापुरताच हा आल्बम आहे. त्यावेळी खरं जग पूर्ण वेगळंही असू शकेल. या आल्बममध्ये त्यावेळच्या उच्चजातीय घरातलेच फोटो जास्त आहेत. श्यामच्या घरी काम करणाऱ्या "मथुरी" कांडपिणीचा घरगुती आल्बम पूर्ण वेगळा असू शकेल. पण तो बनवलाच गेला नसेल ही शक्यता जास्त. तर या मर्यादा आहेतच.
श्यामची आई पुस्तकामध्ये दिसणारे पुरुष, विशेषतः श्यामचे बाबा हे अत्यंत अनाकलनीय आहेत. भाऊ म्हणजे श्यामचे बाबा हे वडवली गावाचे खोत. एकेकाळी प्रचंड वैभवात राहिलेले.. अशा गतवैभवाची वर्णनं करून, आठवणी काढून उसासे टाकणं हा आजही एका मोठ्या वर्गाचा आवडता टाईमपास असतो.
इथे श्यामच्या जन्मापासूनच अशी स्थिती आहे की "खोती सरली आहे. तेल आहे तर मीठ नाही". आर्थिक घसरण चालू झालेली आहे. काळ पाहून राहणीमानात बदल न करणं, पूर्वीच्या इतमामातच राहणं, कर्ज काढून लग्नमुंजीचा थाट करणं अशी कारणं पुस्तकातच उल्लेखलेली दिसतात. पण आवक का घटली? इनकमिंग ओघ का आटला ? याचं काही स्पष्टीकरण मिळत नाही. अशा घसरत्या परिस्थितीतच या पुस्तकातल्या जवळजवळ सगळ्या घटना घडतात.
श्यामचं सर्वकाही सांगून संपतं. पंधराएक वर्षांचा काळ कव्हर होतो. तरीही केवळ आला दिवस ढकलणे अशा अत्यंत निराशावादी परिस्थितीतून हे कुटुंब सूतभरही बाहेर येत नाही. "अहो शेणातले किडे का कायम शेणात राहतात ? तेही बाहेर पडतात" अशी "आशा" सावकाराच्या वसुली कारकुनाकडे लाचारीने व्यक्त करणारे श्यामचे बाबा पूर्ण काळात तितकेही बाहेर पडताना दिसत नाहीत. उलट दिवसेंदिवस फक्त शेण आणखी कुजतानाच दिसतं.
श्यामचे बाबा आणि एकूण कर्ते पुरुष दिवसभर बाहेर जाऊन काय करतात यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं, पण त्या दिनचर्येतल्या घरातली पूजा,स्नानसंध्या, देवळातली पूजा, भोजन एवढ्याच भागाचे तपशील मात्र ठळकपणे येतात. वडील हे घरात वसुली कारकून वाट पाहात ठाण देऊन बसलेला असतानाही, किंवा नंतर घराच्या जप्तीच्या दिवशीही आधी आंघोळ करुन देवपूजा करतात आणि देवळात जाऊन येतात.
भाजीत मीठ नसूनही श्यामचे बाबा खोटी वाहवा करत ती भाजी खातात आणि त्यामुळेच नंतर आईला प्रचंड गिल्ट देतात. आई मागाहून जेवायला बसेल तेव्हा तिला भाजीत मीठ नाही हे कळणारच असतं आणि हे बाबांना व्यवस्थित माहीत असतं. अशावेळी वडिलांनी जेवतानाच ते अळणीपण जाहीर केलं असतं तर चूक सुधारता आली असती. वेळीच वरुन मीठ लावून चव आणता आली असती. पण तसं न करण्यात आईला नंतर चरचरीत पश्चात्ताप व्हावा याखेरीज कोणताही उद्देश नसावा. आणि तो पश्चात्ताप तसा होतोच. तिच्या मनाला ते फार लागून राहतं. अखेरीस भाजीत मीठ नाही म्हणून वाईट वाटून घेणारी आई आणि तक्रार न करता अळणी भाजी खाणारे बाबा यांत "कोण जास्त महान" अशी स्पर्धा होते. त्याकाळी आजूबाजूला जगात किती जास्त वाईट वडील पुरुष दिसत असतील की ज्यामुळे हे वडील केवळ तक्रार न करण्याबद्दल महान वाटावेत, असा विचार मनात येतो.
दुर्वांची आजी ही एक नातेवाईक श्यामच्या घरातच कुटुंबाचा भाग बनून राहत असते. अत्यंत कठीण परिस्थितीतही, म्हणजे अगदी श्यामच्या आईच्या मृत्युपश्चातही ती अन्न शिजवून श्यामचे बाबा आणि त्यांची मुलं यांना खाऊ घालत असते. जप्ती ऑलरेडी आलेली असते. एव्हरग्रीन आणि प्रोग्रेसिव्ह दारिद्रयामुळे अर्थात नेहमीप्रमाणे घरात तेल, मीठ, भाजी काहीच नसतं.. "घरात स्वैपाकासाठी काहीच सामान नाही आता काय शिजवू?" अशी तक्रार दुर्वांची आजी करते तेव्हा त्याही परिस्थितीत दिलेलं श्यामच्या बाबांचं उत्तर रोचक आहे. "आमची अब्रू आणखी दवडू नका. नुसता भात शिजवून वाढा."
दुर्वांच्या आजीने हा उरलेला पीळ बघून गृहत्याग करायला हवा होता. पण तसं होत नाही. यावरुन नातेसंबंधातलं खूप काही अलिखित दिसून जातं. वास्तविक दुर्वांची आजी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. तिचं स्वतःचं शेत आहे. गावात सर्वांशी घरोबा आहे. ती भाऊरावांची "आई" नाही. तिने अडचण सहन करून खस्ता खात राहणं, भाऊंचा आणि त्यांच्या पोरांचा स्वैपाक करत राहणं अजिबात गरजेचं नाही असं आत्ताच्या काळच्या डिजिटल कलर फोटोमध्ये वाटलं असतं.
आईच्या शेवटच्या आजारात मावशी घरी येऊन राहते. ती शेवटच्या क्षणापर्यंत बहिणीची सर्व सुश्रुषा थुंकीमलमूत्रापासून सगळं बिछान्यावर पडल्याजागी करते. आईदेखील शेवटी हक्काने मुलांची जबाबदारी सरळ मावशीकडे देते. हाही फोटो त्याच आल्बममधला. जबाबदारी घेणं म्हणजे उचलून फक्त पैशाची मदत करणं ही आत्ताची व्याख्या त्यावेळी दिसत नाही. यात चांगलं वाईट काही नाही. फक्त स्नॅपशॉट्स.
श्यामचे मामा खुद्द श्यामला आणि त्याच्या भावंडांना त्याच्या घरी पुण्याला, मुंबईला शिकायला एकामागून एक सामावून घेतात. प्रसंगी स्वतः त्यांना घरी शिकवतात. ज्या घरी पोरंबाळं शिकायला पाठवली आहेत त्या घरी तांदळाचं पोतं इथून जावं आणि त्यांच्या घरी भाताची सोय व्हावी इतपतच व्यावहारिक देवाणघेवाणीचा उल्लेख आढळतो. पण इतकी नातेवाईकांची पोरं घरात ठेवून घेणं, "अडकून पडणं" (हा कलर आल्बममधला शब्द ?) आणि त्यांचे प्रताप सांभाळणं (जो विधुळेपणा श्याम करून दाखवतोच).. यामध्ये स्वतःच्या घराचं खाजगीपण, पती पत्नी आणि स्वतःची अपत्यं यांचा एक वेगळा गट असा भाव दूरान्वयानेही दिसत नाही. "प्रायव्हसी" हे पात्र कोणत्याही फोटोत दिसत नाही. अगदी स्मृतिचित्रे आणि अन्य अनेक पुस्तकं हेच दाखवतात. हा काळ साधारण वर्ष १९००च्या पुढेमागे काही दशकांचा. कोणालाही, नातेवाईक अथवा अगदी त्रयस्थ गरजूलाही सहज घरात ठेवून घेणं आणि पंगतीला पात्रं वाढवणं हे रुटीन असल्याचं दिसतं.
माणसाच्या जिवाची मात्र म्हणावी तितकी किंमत दिसत नाही. मेडिकल सोयी शून्यवत असल्याने माणसं पटापटापटा मरताना दिसतात आणि तसा फारसा शोक केलेला किंवा तीव्र सदमा घरच्या लोकांनीही घेतलेला दिसत नाही. प्रत्येकाने भरपूर मृत्यू लहानपणापासूनच पाहिलेले दिसतात. त्यामुळे अगदी लहान बालकं, स्वतःच्या पोटची पोरं लहान वयात वारल्यावरही ते काहीसं गृहीत धरलं गेल्यासारखं दिसतं. उपचार, जीव वाचवणं यासाठी जिवाचा आटापिटा, दूरचे प्रवास, सर्वस्व गहाण टाकणं असं डेस्परेशन दिसत नाही. "पोटफुगी"ने तडफडत, वेदनेने गडाबडा लोळत मरणारा श्यामचा लहानगा भाऊ यशवंत त्यात आहे.. दापोलीला आणि अन्य शहरांत डॉक्टर्स असल्याचा उल्लेख येतो. पण त्याचबरोबर "खेड्यात कुठला डॉक्टर आणि कसले उपचार" असा हताश विचार मांडलेला दिसतो. एरवी पुण्यामुंबईत नातेवाईक असूनही, आणि वडील दापोलीचा प्रवास अगदी नेहमी करत असूनही त्या पोटच्या गोळ्याला बैलगाडीत घालून तिथे शहरात नेऊन काही वेगळे उपचार करण्याचा प्रयत्नही दिसत नाही. कारुण्यापुरता त्या मृत्यूंचा थोडा उपयोग दिसतो, पण तो टळावा याची फारशी धडपड दिसत नाही. मेल्यानंतर मरणाच्या तिथीवरून यशवंत "पुण्यात्मा" मात्र ठरतो.
आजाराने येणारं मरण टाळण्यासाठी विशेष बजेट नसलेलं दिसतं. घरात कोणीतरी मरताना आणि मेल्यावर करण्याच्या वैद्यकीय वगळता अन्य प्रोसिजरची तपशीलवार माहिती मात्र सर्वांना असून त्या रीतसर पाळल्या जाणं एवढाच भाग दिसतो.
अगदी हेच श्यामच्या आईच्या आजाराबाबत. ती नेहमी आजारीच असलेली दिसते. आपल्या आजाराचं निराशाजनक वर्णन करण्याची एकही संधी श्यामची आई सोडत नाही.
"हिवताप लागला आहे पाठीस", "भूकच नसते. तोंडाला चवच नसते. आल्याच्या तुकड्यासोबत दोन घास कसेतरी घशाखाली दवडावे", "आला दिवस दवडला पाहिजे","आता खरेच जगावेसे वाटत नाही", "माझ्या अब्रूसह व सौभाग्यासह मला घेऊन जा" अश्यापैकी एकही डिप्रेसिंग वाक्य नसलेले आईचे संवाद सापडायला दुर्मिळ आहेत.
आनंदाच्या प्रसंगी, म्हणजे नवीन स्वतंत्र घराच्या गृहप्रवेशावेळी आकाशातला तारा तुटताना बघून "श्याम तुझ्या आईच्या आयुष्याचा तारा लवकरच तुटेल असे तर तो तारा सांगत नसेल ना ? मला वर बोलावण्यास तर तो तारा आला नसेल ना ?" असं आई विचारते.
अगदी हद्द म्हणजे शेवटच्या आजारात अंतिम टप्प्यात मुंबईत नोकरी करणारा मोठा मुलगा आईला भेटायला घरी आलेला असताना तिची अवस्था बघून केविलवाणा होतो आणि यासम म्हणतो: "मी तुझ्याजवळच राहू का? नको ती नोकरी. आईची सेवा करता येत नसेल तर नोकरीला काय अर्थ.. "
त्यालाही उत्तर देताना त्याच्या मनाला "दिलासा" देण्यासाठी आई म्हणते: "मी इतक्यात मरत नाही. तेवढं माझं भाग्य नाही. झिजत झिजत मी मरणार. तेव्हा फार झालं की तुला बोलावू. तू आता जा"
साने गुरुजींच्या पुढच्या आयुष्याविषयी वाचताना अनेकदा ते अत्यंत नैराश्याच्या गर्तेत असल्यासारखं वाटतं. याची मुळं लहानपणच्या अत्यंत निगेटिव्ह वातावरणात असतील का असा विचार मनात येतो.
इतकी वर्षं रेंगाळत आणि वाढत जाणारा आजार असूनही एकदाही आईला मुंबई किंवा पुण्याला नेलेलंही दिसत नाही. उपचार तर फार दूरची गोष्ट. तिचा एका तपानंतरचा पालगडबाहेर पडण्याचा पहिला प्रवास आहे कोपऱ्यावर असलेल्या लाडघरला जाण्यापुरता. तोही नवस फेडण्यासाठी.
गावातले वैद्य सर्व केसेसमध्ये केवळ "किती घटका उरल्या" हे खिन्नपणे सांगण्यापुरते आणि शेवटची चाटवायला म्हणून हेमगर्भाची मात्रा देण्यापुरतेच उपचारोपयोगी वाटतात.
पुढची नोंद तर्क या विषयाविषयी.
तर्क, विशेषतः वस्तुनिष्ठ तर्क या गोष्टीची कोणालाच तोंडओळख दिसत नाही. दिसतो शुद्ध भक्तिभाव.
लाडघरचा समुद्र लालसर रंगाचा दिसतो म्हणून त्याला तामस्तीर्थ म्हणतात. तिथे श्याम आपल्या आईसोबत जातो. कथेतला हा भाग अदरवाईज खूप हृद्य आहे. पण त्यात "समुद्राच्या पाण्याचा रंग लाल का?" या श्यामच्या प्रश्नाला दोन "उत्तरं" मिळतात.
सोबत आलेल्या मेव्हण्यांचं उत्तर :"देवाचा चमत्कार, आणखी काय?"
आईचा अंदाज:" इथे देवाने राक्षसाला मारले असेल. त्याच्या रक्ताने इथे पाणी लाल झाले असेल".
यावर मेव्हणे म्हणतात "हो. तसा तर्क करावयास हरकत नाही.."
हे एक प्रातिनिधिक उदाहरण. तर्कांचे जे काही ऑप्शन्स असतील ते "देव१","देव२","देव३" असे असल्याचं जागोजागी दिसतं. ते उपाय वस्तुनिष्ठ ठरतात. सर्व प्रश्नांवर "देव" किंवा "दैव" असे दोनच पर्याय निवडीसाठी उपलब्ध दिसतात.
मुलं खूप लहान वयात कर्तीसवरती व्हावीत याचं प्रचंड प्रेशर त्या काळात दिसतं. स्वतःच्या आयुष्याचा आणि मुलांना आधार देण्याच्या आर्थिक क्षमतेचा बापांना भरवसा अजिबात वाटत नसावा. अशात पोराबाळांचा निभाव लागायचा असेल तर तो "घरबशा" होऊ नये याची प्रचंड काळजी केली आणि घेतली जाताना दिसते. शाळा पूर्ण करण्यासाठी फी भरणं शक्य नाही म्हणून श्यामने नोकरीला लागावं असा वडिलांचा आग्रह असतो. मात्र श्यामला खूप शिकायचं असतं. त्यामुळे तो दूर औंध संस्थानात मोफत शिकायला जातो. तिथे वार लावून जेवतो. पण एकदा तिथून अगदी जोरदार प्लेगच्या साथीमुळे त्याला कोंकणात घरी तात्पुरतं परत यावं लागतं. तेव्हाही त्याचा मुक्काम काही दिवस लांबल्यावर वडिलांना लगेच कुशंका येते. तो प्लेगचं खोटं कारण सांगून आयतोबा बनून फुकटचं बसून खायला घरी परत आला आहे अशी त्यांना खात्री वाटते. ते कठोरपणे त्याला परत प्लेगच्या खाईत पाठवतात. तो दुखावलेला असूनही ते त्याला थांब म्हणत नाहीत. आई रडत रडत का होईना पण पतीला पाठिंबा देते.
पतीची बाजू घट्ट सांभाळणं हा एक आणखी कॉमन फोटो. पतीला बिनशर्त पाठिंबा हा पत्नीच्या जीवनमरणाचा प्रश्न असावा. श्यामची आई प्रत्येक प्रसंगात तातडीने पतीची बाजू घेते. ती बाजू वाचणाऱ्याला कितीही चुकीची, तर्कदुष्ट, निष्काळजी किंवा मूर्खपणाची भासत असली तरी. अर्थातच त्यावेळचं बाईचं पुरुषांच्या कमाईवर असलेलं संपूर्ण अवलंबित्व पाहता यात कणभरही आश्चर्य नाही. पण तरीही चुकूनही पतीविरोधात न गेलेलं दिसण्याची जिवापाड धडपड केविलवाणी वाटत राहते. ती घाई फार ठळकपणे दिसते. आजही ते अवलंबित्व बऱ्याच अंशी उरलेलं आहे, पण "श्यामची आई"नंतरच्या काळात हा ठळकपणा जास्त जाणवला नाही. नाईलाजाने पतीशी सहमती पुढच्या पुस्तकांत कुठे कुठे दिसू शकते, पण पतीच्या प्रत्येक निर्णयाचं, वागण्याचं पूर्ण व्होकल समर्थन श्यामची आई करताना दिसते. तिला दारिद्र्याच्या खाईत लोटणाऱ्या आणि तिथेच दाबून धरणाऱ्या पतीची बाजू घेण्याच्या अट्टाहासापायी श्यामची आई स्वतःच्या मुलांना, स्वतःच्या वडिलांना आणि इतर अनेकांना सुनावते, दुखावते, अल्टिमेटम्स देते.. यामागची तिची दडलेली खोल स्वतःच्या "सर्व्हायव्हल"ची भीती का कोण जाणे पण या अल्बमच्या अनेक फोटोंत दिसते.
श्यामच्या बाबांवर तरुणपणी लग्नानंतर लवकरच झालेला हल्ला असा एक प्रसंग आहे. तेव्हा पतीचा जीव वाचवण्याबद्दल देवीकडे मागितलेली भीक पतीविषयी प्रेम किंवा आदर यापेक्षा तो मारला गेला तर पुढे काय दिवस येतील याची भीती दिसते.
याचं कारणही नोंद घ्यावं असं आहे. पतीच्या कर्तृत्वहीनतेबद्दल बोलण्याची प्रत्येक संधी आई घेते. श्यामचे बाबा आईच्या पाटल्या विकून कच्चं, गोठ्यासारखं घर कसंबसं बांधतात. तेही आईच्या स्वतंत्र राहण्याच्या स्वाभिमानी विनंतीमुळे. या घराच्या गृहप्रवेशप्रसंगी ते सर्वांना लाजेकाजेस्तव सांगत असतात की "तात्पुरते लहान घर बांधले आहे, पुढे मोठे बांधू.." तेव्हा आई मुलांना म्हणते "यांच्याकडून आता मोठे घर कधी बांधून होणार.. ?" आणि "मोठे घर आता मला वर देवाकडे गेल्यावरच मिळेल" हा आपला खास "ट्रेडमार्क" टाकायलाही विसरत नाही. अनेक प्रसंगी पतीचा भरवसा धरता येत नसल्याचे उल्लेख जाणवतात. एकंदरीत पतीची बाजू तर घ्यायची पण तो काही परिस्थिती सुधारु शकेल यावर, अर्थात त्याच्या कुवतीवर पूर्ण अविश्वास दाखवायचा अशी मानसिकता दिसते.
असं बरंच काही आहे.. पण लिहीत राहण्याला मर्यादा आहेत. इतकं सगळं असूनही तीन पानांचं ठिकोळं, जांभळ्या चिऱ्याची थंड पाण्याने भरलेली डोण, थारळे, पानगी पातोळे आणि सोबत बोळू म्हणून लोणी.. घरात टांगलेलं तंवसं, पपनसे, बावेत पोहताना कमरेला बांधलेल्या सुखडी, दह्याची कोंडुली, तुळशीच्या नेवैद्याची लोणीसाखर, तांदळाचं धापट, थंड पौष्टिक धुवण, घराचा लाकडी माळा, त्यावरची कणगी, अंगाशी झळंबलेला लहानगा पुरुषोत्तम, त्याची परसाकडे बसण्याची ठाकुली, तांब्या फासाला लावून काढलेलं विहिरीचं ताजं पाणी.. आणि अशा असंख्य गोष्टींत अडकलेलं मन सुटणं अशक्य आहे. त्या निरागसतेच्या जगात, ते कितीही कालबाह्य, तर्कदुष्ट आणि हास्यास्पद ठरलं तरी, किमान स्वप्नात तरी जाऊन यावं अशी इच्छा का कोण जाणे, पण राहतेच.
-
(ऐसीअक्षरेवरील "काळ उघडा करणारी पुस्तके" या मालिकेतला लेख)
प्रतिक्रिया
2 Feb 2019 - 1:00 pm | मनिम्याऊ
चित्रदर्शी वर्णन
2 Feb 2019 - 1:09 pm | तुषार काळभोर
मला वैयक्तिक "शामची आई" हे लेखन अजिबात आवडत नाही/पटत नाही.
पण त्या लेखनातील काळाचे तुम्ही काढलेले फोटोग्राफ्स आवडले!!
2 Feb 2019 - 1:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गविसेठ, पहिल्या छुट तुमचं मनापासुन अभिनंदन की तुम्ही लिहिते झालात. एका सुंदर कवितेसारखं ओघवतं लेखन वाचतांना खुप आनंद झाला. छान वाटलं.
आपल्या परिसरातील चित्रण आलं की माणसं भाऊक होतात तसं तुमचं भावूक होऊन लिहिणे आलंय. आपलं गाव त्याची आठवण, परिसराचं चित्रण. सोबतीला शामळु शामची चित्तर कथा समीक्षा आणि काही पडलेले प्रश्न उत्तमच.
बाकी, लैच कारुण्यपूर्ण, लैच गरीबी, नैराश्यपूर्ण, दु;खद, कोंदाटेललं, आईबद्दलच्या भावनेचा प्रचंड लगदा झालेला, हजारो वर्षापासून सुर्याचा प्रकाश घरामधे पोहचलेला नाही, अशा घरात राहणार्या लोकांच्या घुसमटीचं वर्णन करणार्या एका आदर्शव्रत असणार्या पुस्तकाबद्दल तुम्ही खुप चांगली उकल केली आहे.
तीन पानांचं ठिकोळं, जांभळ्या चिऱ्याची थंड पाण्याने भरलेली डोण, थारळे, पानगी पातोळे आणि सोबत बोळू म्हणून लोणी.. घरात टांगलेलं तंवसं, पपनसे, बावेत पोहताना कमरेला बांधलेल्या सुखडी, दह्याची कोंडुली, तुळशीच्या नेवैद्याची लोणीसाखर, तांदळाचं धापट, थंड पौष्टिक धुवण, घराचा लाकडी माळा, त्यावरची कणगी, अंगाशी झळंबलेला लहानगा पुरुषोत्तम, त्याची परसाकडे बसण्याची ठाकुली, तांब्या फासाला लावून काढलेलं विहिरीचं ताजं पाणी.. आणि अशा असंख्य गोष्टींत अडकलेलं मन सुटणं अशक्य आहे.
इथं सालं आपल्याला वाकून नमस्कार केला. आपल्या शब्दसंपतीचा साठा मोठा आहे. ग्रेट.
बाकी, पुन्हा दुसर्या प्रतिसादात येईनच तो पर्यंत ही केवळ पोच.
-दिलीप बिरुटे
2 Feb 2019 - 4:35 pm | सिरुसेरि
तो खरवसाचा प्रसंग राहुन गेला की. बाकी आचार्य अत्रेंना "शामच्या आई"वर चित्रपट निर्मीत व दिग्दर्शीत करावेसे वाटले यातच सर्व काही आले .
2 Feb 2019 - 5:56 pm | बोलघेवडा
गवि शेट.
तुमचे पाय कुठेयेत? पाय काढून ठेवा. आम्हाला दर्शन घ्यायचय.
2 Feb 2019 - 8:07 pm | खिलजि
निशब्द करून टाकणारे लेखन .मस्त लिवलंय
2 Feb 2019 - 8:55 pm | बबन ताम्बे
लेख पटला. अतिभावनाशीलता आणि त्याचे उदात्तीकरण अजूनही आपले सिनेमे, मालिका यांत दाखवला जाते जाते.
अळणी भाजीचा प्रसंग मलाही वैयक्तिक पटला नाही.
2 Feb 2019 - 11:43 pm | मराठी कथालेखक
शामची आई पुस्तक मी वाचलेलं नाही पण तुमच्या लेखातुन एक वेगळ्या दृष्टीकोनातून केलेली समीक्षा आवडली.
"एव्हरग्रीन आणि प्रोग्रेसिव्ह दारिद्र्य" हे तर अगदी अप्रतिम विशेषण !!
3 Feb 2019 - 10:42 am | महाठक
अप्रतिम लेख आहे
3 Feb 2019 - 11:20 am | आनन्दा
लेख आवडला.. तुमचा खास टच त्या लेखाला आहे..
पण एक गोष्ट खटकली..
तुमच्या लेखातून त्या काळातील नकारात्मक बाजू जितक्या तीव्रतेने समोर येतात तितक्या तीव्रतेने सकारात्मक बाजू समोर येत नाहीत.. त्यामुळे लेख तितका समतोल वाटत नाही.
कदाचित श्यामची आई आपल्याला ज्या हेतूने वाचायला देतात त्या हेतूंमुळे त्या पुस्तकाकडे बघण्याचा झालेला नकारात्मक दृष्टीकोन याला कारणीभूत असेल. पण काहीतरी कमी वाटतंय या लेखात असे म्हणेन
3 Feb 2019 - 11:29 am | गवि
योग्य निरीक्षण. पटतंय.
3 Feb 2019 - 3:28 pm | उपेक्षित
बरचस तांत्रिक वाटल लिखाण म्हणजे ठरवून (नेम धरून) चुका काढल्या आहेत असे जाणवले.
जाता-जाता अजूनही हे पुस्तक पूर्ण वाचू शकलो नाहीये कारण खूपच दवणीय आहे.
3 Feb 2019 - 4:27 pm | दादा कोंडके
'शामची आई' वाचायचा लहान असताना अर्धवट प्रयत्न केला होता. त्यानंतर कितीतरी वर्षानी सखाराम बाईंडर पाहिल्यावर का कुणास ठाउक पण लक्ष्मी हे पात्र आल्यावर श्यामचा आईची आठवण आली होती. अर्थात त्या दोघी (तथा कथीत) नैतिकतेच्या दृष्टीकोनातून खूप वेगळ्या असतील पण तेव्ह्डेच डोसाईल आणि सबमिसीव्ह.
3 Feb 2019 - 8:01 pm | गामा पैलवान
गवि,
'श्यामच्या आई'ची दुसरी बाजू दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचं हे वाक्य वस्तुस्थिती चपखलपणे अधोरेखित करतं :
साने गुरुजींनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी आत्यंतिक निराशेने आत्महत्या केली. असो.
बाकी, मिठाचा अगदी असाच प्रसंग माझ्याही बाबतीत घडला आहे. २००६ साली कोकणात एकाकडे सांगून गेलो होतो. माऊलीने विविध पदार्थ केले होते. दुपारची वेळ होती. यजमानांसंगे भोजनास बसलो. एका भाजीत मीठ नव्हतं, पण आम्हांस गप्पांच्या नादात कळलंच नाही. जेव्हा माऊलीनं ती भाजी चाखून बघितली तेव्हा यजमानांवर उखडली. सांगितलं का नाही म्हणून. खरंतर ताटात लिंबाचं लोणचं असल्याने वेगळ्या मिठाची गरज भासली नाही. परंतु माऊलीस समजावून सांगणार कोण! तर सांगायचा मुद्दा असा की, ताट वाढायला मिठापासनं सुरुवात करतात. पण श्यामच्या घरची गरिबी इतकी की ते फुकट जाऊ नये म्हणून आई वाढीत नसे.
अशी काही किरकोळ स्पष्टीकरणं वगळता दुसरी बाजू तुम्ही यथार्थपणे दाखवलीये, असं माझं मत.
आ.न.,
-गा.पै.
3 Feb 2019 - 8:05 pm | गवि
इन धिस केस, ताटात मीठ असूनही ते लावले नाही असा उल्लेख पुस्तकात आहे. कारण म्हणे आईला शंका आली असती म्हणून.
म्हणून तो गिल्ट देण्याच्या उद्देशाचा विचार मनात आणखी बळावला.
4 Feb 2019 - 1:47 pm | गामा पैलवान
गवि,
मीठ असूनही लावलं नसेल तर इतर कारणं असू शकतात. आईला अपराधगंड देणं मुद्दाम केलं नसावं बहुतेक. मी स्वत: अळणी भाजी खातांना हात आपसूक लोणच्याकडे गेला. भाजीत मीठ नाही, याच्यापेक्षा ती लोणच्यासंगे छान लागते असा काहीसा अनुभव होता.
स्वानुभवामुळे संशयाचा फायदा श्यामच्या वडिलांना द्यावा असं माझं मत आहे. पण अर्थात, वस्तुस्थिती पार वेगळीच असू शकते हे मान्य.
आ.न.,
-गा.पै.
4 Feb 2019 - 1:56 pm | गवि
मीठ असूनही "आईला संशय येऊ नये म्हणून" लावलं नाही, तशीच अळणी भाजी "काय फाकडो झाली आहे" वगैरे स्तुती करत खाल्ली, असा उल्लेख पुस्तकात खुद्द साने गुरुजींनीच केला आहे. माझा तसा अंदाज नाही.
शिवाय त्यामुळेच कमी खाल्ली गेली भाजी असाही उल्लेख आहे.
6 Feb 2019 - 7:36 pm | सुबोध खरे
असा स्वभाव अंगात धमक नसलेल्या कर्तृत्वशून्य माणसांचा (विशेषतः पुरुषांचा) असतो.
कारण आपण काही करू शकत नाही त्यावर पांघरूण घालण्यासाठी आपण किती सालस आहोत हे दाखवण्याची गरज भासते.
त्यामुळे दुसऱ्याचे (बायकोचे) न बोलता उणे दुणे काढून आपण किती महान आहोत असे दाखवण्याचा हा प्रयत्न असतो.
मुळात मानसिक असुरक्षितता असल्यामुळे आपले व्यंग लपवण्यासाठी दुसऱ्याला अपराधीपणाची जाणीव करून देऊन असे वागणारी माणसे सर्वत्र दिसतात.
3 Feb 2019 - 8:17 pm | यशोधरा
पुस्तकात ज्या आयुष्याचं वर्णन आहे, ते आयुष्य जगणाऱ्या आणि पुस्तकरूपात शब्दबद्ध करणाऱ्या व्यक्तीची मनोवृत्ती, विचार धारा, त्यांच्या नजरेतून पाहिलेल्या घटना, त्यांनी त्या घटनांचा लावलेला अन्वयार्थ ह्याचा त्या लिखितावर जसा प्रभाव आहे, त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती जेव्हा ते पुस्तक वाचते, तेव्हा वाचकाची स्वतःची विचार करायची पद्धती, त्या विचारधारेला अनुसरून होणारं आकलन आणि पाहण्याची दृष्टी ह्याचाही एखादी घटना कशी दिसेल, वाटेल इत्यादि वर परिणाम होत असणार, ह्याची हा लेख वाचताना पुन्हा प्रकर्षाने जाणीव झाली.
4 Feb 2019 - 2:41 pm | समीरसूर
खूप सुंदर! बहुतेक त्यावेळेस असेच वातावरण होते. अगदी अजूनही असे वातावरण आहे.
माझी एक आत्या (७-८ वर्षांपूर्वी वारली) अशीच होती. आयुष्यभर तिला खूप त्रास सहन करावा लागला. दारिद्र्य, नवर्याकडून उपेक्षा, बेजबाबदार आणि लबाड नवरा, आजारपण, पुढे मुलांकडून उपेक्षा, आणि नंतर एक मोठा आजार, आणि मृत्यू! समाधान वाटावे असे सुख तिच्या वाटेला क्वचितच आले. ती अतिदक्षता विभागात असतांना डॉक्टरांनी सांगीतले होते की यांची जगण्याची इच्छा तीव्र असेल तर या वाचतील आणि बर्या होतील पण दुर्दैवाने तिची जगण्याची इच्छा खूप आधीच विझली होती. शेवटी गेली. खूप धार्मिक होती. एकादशीला नेहमीचं जेवण खाणं म्हणजे डुक्कर खाण्यासारखं आहे असं तिचं ठाम मत होतं. कायम तिचा "काय करणार? शेवटी सगळं त्याच्या इच्छेनुसार होतं" हा सूर होता. कुणास ठाऊक, कदाचित त्यामुळेच ती इतके दु:ख सहन करू शकली असावी.
4 Feb 2019 - 4:49 pm | चिगो
आज बर्याच दिवसांनी तुमचं लिखाण वाचलं, गवि.. लेख पटला.
मला 'श्यामची आई' हे पुस्तक अतिआदर्शवादी वाटतं. तुम्ही म्हणताय तश्या अनेक नैराश्यवादी, निगेटीव्ह गोष्टी त्यात भरभरुन आहेत. मी तरी ते पुस्तक 'कसं जगू नये हे शिकण्यासाठी वाचावं' म्हणून रेकमेंड करेन. स्पष्टच सांगायचं झाल्यास 'जसें पायांना माती लागू नये म्हणून जपतोंस, तसेंच मनाला माती लागू नये, म्हणून जप हों श्याम' हा माझ्यासाठी टिंगलीचा 'डायलॉग' आहे.
5 Feb 2019 - 4:03 am | विजुभाऊ
१०००००% सहमत.
लुळ्या पाम्गळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरीबी चांगली हा विचार देणारे त्याकाळचे लेखन.
6 Feb 2019 - 1:14 pm | पुंबा
आजिबात नाही. नीट वाचावे ही विनंती.
गुरूजी आणि श्यामची आई हे पुस्तक यांची टिंगल फॅशनेबल असतानासुद्धा हेच सांगावेसे वाटते की हे पुस्तक चांगले संस्कार करणारेच आहे. आणि ते संस्कते, ती तत्वे काळाबरोबर अधिकच रिलेव्हंट होत चालले आहेत.
(गवि चिडतील म्हणून तिकडची टेप परत इकडे वाजवत नाही.)
6 Feb 2019 - 4:02 pm | अजया
गवि, खूप दिवसांनी लिहिलंत. नेहमीप्रमाणेच अप्रतिम.
श्यामची आई फारसे आवडते पुस्तक नाही पण टिंगलीचा विषयदेखील वाटत नाही. तुमचा लेख अगदी यथार्थ आहे.
6 Feb 2019 - 6:20 pm | मराठी कथालेखक
"हम क्लोरोमिंट क्यो खाते है" या अनुत्तरीत राष्ट्रीय प्रश्नानंतर कदाचित "हम 'शामची आई' क्यो वाचते है" हाच प्रश्न असावा :)
6 Feb 2019 - 7:49 pm | सुबोध खरे
आपलं लेखन अतिशय आवडलं.
अशी माणसं आमच्या गावाला( श्री क्षेत्र परशुराम ता. चिपळूण) आमच्या वडिलांनी दाखवली होती.
काहीही न करता वडिलोपार्जित जमिनीवर बसून खाणारी, अठरा विश्वे दारिद्र्य असूनही जेमतेम पोटापुरते काम करणारी पण भला मोठा पोरवडा काढणारी आणि मोठ्या मुलांवर धाकट्यांची जबाबदारी टाकून आपण हातावर हात धरुन बसणारी कर्तृत्वशून्य माणसं आमच्या घराच्या आजूबाजूला बरीच होती.
लहानपणी सुद्धा मला ते पुस्तक फारसं आवडलं नव्हतं.
कारण माणसं फार दैववादी असल्यामुळे ठेविले अनंते तैसेचि राहावे अशा वृत्तीतून खुजीच राहतात हे वडीलानी न बोलता आम्हाला दाखवलं हे मोठे झाल्यावर कळले. अशी असंख्य घरं आजूबाजूला दिसतात जेथे कामसू माणसं बाहेर पडून पुण्या मुंबईला आली आणि त्यांनी आपली भरभराट करून घेतली.
पण अशी कर्तृत्वशून्य माणसं "घर सांभाळायला" कुणी तरी हवं" म्हणून मागे राहून आपण त्यागमूर्ती असल्याची जाणीव आपल्या भावंडाना सतत करून देताना आणि त्यांना अपराधगंड देताना पाहिली आहेत.
मुंबई पुण्यात येऊन भरभराटीस आलेले लोक आणि गावात राहून आहे त्या स्थिती राहून केवळ भरभराट करणार्याचा दुःस्वास करणारी माणसं फार दिसतात
अशा माणसांबाबत एक तिडीक बसलेली आहे.
आपण या पुस्तकाचे यथातथ्य विश्लेषण केल्यामुळे काही गोष्टींचं मनात असलेलं कोडं सुटल्या सारखं आहे.
धन्यवाद.
6 Feb 2019 - 8:24 pm | गवि
अगदी अगदी..
हा एक स्वतंत्र विषय आहे.
भावंडांच्या शिक्षणासाठी, लग्नांसाठी स्वतः लग्न न करता किंवा अन्य मार्गांनी आयुष्यभर त्याग करणं, खस्ता खाणं आणि पुढे ती भावंडं स्वतंत्र झाली, संसारात पडली की त्यांना ती जाणीव सतत असावी अशी अपेक्षा करत जबरदस्त गिल्ट देणं अशी खूप उदाहरणं असतात.
त्यात त्याग असतोही अनेक केसेसमध्ये. पण सतत गिल्ट डोसमुळे इतर भावंडांची मानसिक स्थिती सुख उपभोगताना वाईट होते.
6 Feb 2019 - 10:06 pm | जव्हेरगंज
जबरी लेख!!!
7 Feb 2019 - 1:41 pm | गामा पैलवान
अवांतर :
पुंबा,
अगदी १०० % सहमत. लहान वयात सुसंस्कार करणारं पुस्तक आहे. त्याविषयी शंकाच नाही. पण वय जसजसं वाढतं तसतशी दुसरी बाजू ध्यानात येऊ लागते. ती गविंनी मांडलीये इतकंच.
श्यामला जे संस्कार लाभले त्यांची पार्श्वभूमी फारशी आनंददायी नाही. या संदर्भात महाभारत व रामायणाचं वेगळेपण प्रकर्षाने उठून दिसतं. त्यातल्या बालवयात वाचलेल्या पराक्रमाच्या कथा मोठेपणी भुरळ पाडेनाशा झाल्या तरी त्यातनं मिळणारा बोध आयुष्यभर कामी येतो. गीतेचं उदाहरण देतो. हे खरंतर दोन अत्यंत कर्तृत्ववान मनुष्यांचं खाजगी संभाषण आहे. सामान्य माणसाला त्याचा फुटक्या कवडीइतकाही उपयोग नाही. तरीपण गीता असंख्य सामान्य आणि असामान्य लोकांच्या जीवनाचा आधार झाली आहे. 'कर्तृत्वाने मी अर्जुनाच्या पासंगालाही पुरणारा नसलो तरीही त्याच्याप्रमाणे आदर्श बाळगेन', ही प्रेरणा गीतेत कोणी भरली? व्यासवाल्मिकींची प्रतिभा गहिरी आहे. श्यामची आई कितीही हृदयस्पर्शी असलं तरी ते व्यासवाल्मिकींची उंची गाठू शकंत नाही.
आ.न.,
-गा.पै.
25 Feb 2019 - 7:04 pm | विजय नरवडे
आवडलं
25 Feb 2019 - 7:52 pm | राजेंद्र मेहेंदळे
रसग्रहण तरी कसे म्हणु?
लहानपणी श्यामची आई तुकड्या तुकड्यात वाचले आहे. फारसे आवडले असे काही नाही, पण हाती पडेल ते वाचत गेलो त्यात हे पण.
मॅक्झिम गॉर्कीची "आई" म्हणुन (अनुवादीत) एक कादंबरी वाचली त्यातही असाच काही सुर होता. म्हणजे कुटूंबाचा फाफट पसारा , दारीद्र्य , डोळ्यादेखत मरणारी माणसे, कोणालातरी भिउन वागणार्या स्त्रिया, कुटुंबाशी एकनिष्ठ मोलकरणी वगैरे वगैरे. फक्त रशियन पार्श्वभुमी.
थोडक्यात माणुस लहानाचा मोठा होताना मातीच्या गोळ्यासारखा घडत असतो, आणि त्याच्या आसपासच्या लहान मोठ्या, जिवंत मृत, व्यक्ती वस्तु घटना यांचा त्याच्यावर बरा वाईट परीणाम होत असतो. पुढच्या आयुष्यातील अनेक घटनांची मुळे या लहानपणातच शोधता येतात. तसेच साने गुरुजींचेही म्हणावे लागेल.
बाकी गविंनी केलेले परीक्षण एकदम चपखल वाटले.
एज ऑफ इनोसन्स" /"फिक्सेशन पॉईंट" /पेरिफेरल व्हिजन /"कोण जास्त महान" अशी स्पर्धा / पती पत्नी आणि स्वतःची अपत्यं यांचा एक वेगळा गट /वस्तुनिष्ठ तर्क /"सर्व्हायव्हल"ची भीती /आपला खास "ट्रेडमार्क" वगैरे तर खासच. लेख आवडला हेवेसांनल
5 Apr 2019 - 10:34 am | विजुभाऊ
दारिद्र्याचे इतके उदात्तीकरण केलेले दुसरे पुस्तक सापडणार नाही
5 Apr 2019 - 7:33 pm | मंदार कात्रे
"जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे "
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात अथवा २० व्या शतकाच्या पूर्वार्धात कोकणातील दळणवळणाची साधने अत्यन्त अपुरी असलेल्या खेडेगावातील परिस्थितीच २१व्या शतकातील चष्म्यातून केलेले निरीक्षण ...हे साहजिकच समतोल नाहीये . जयवन्त दळवींचे " सारे प्रवासी घडीचे " वाचावे असा सल्ला द्यावासा वाटला !
5 Apr 2019 - 9:52 pm | वीणा३
तकी नातेवाईकांची पोरं घरात ठेवून घेणं, "अडकून पडणं"
ह्याच कारण त्याकाळी जास्त माणसं घरात असणं हेच मुख्य वेळ घालवायचं साधन असावं. बाहेर जेवायला -फिरायला - मजा करायला जायचंय, कोणी आलं तर त्यात अडचण येणार आहे असा प्रकारनसावा . मुखत्वे लग्नकार्याला लोक बाहेरपडत असावेत .
मी लहान असताना माझी आई आणि इतर बायकांकडून शेजारच्या एका बाईबद्दल - "काय बाईचा पाय घरात ठरत नाही, सारखी कुठेतरी जात असते, जरा घरात राहावं, घरातली काम करावीत, सारखी हाटेलात जातात " हे उद्गार ऐकले आहेत. आता आई पण बदलली, इतर बायका पण बदलल्या. आता त्यांचे वॉकथान चे फोटो, हॉटेल मधले मैत्रिणीचे ग्रुप फोटो दिसतात. कदाचित माझी पूर्वीची आई असती तर फुल्ल टाइम माझ्या दिमतीला हजर असती. आता ती पण बिझी असते. मलातरी हा बदल एकूणच आवडतो.
5 Apr 2019 - 9:57 pm | वीणा३
लेख अतिशय आवडला हे सांगायचंच राहील. जे माझ्या मनात होत ते अगदी तंतोतंत लिहिलंय. अजूनही अशी कुटुंब ओळखीत आहेत, पण संख्या कमी होत्ये हे मात्र नक्की