सांग ही किमया कशाची?
मी नवी, जग हे नवे
सांगती माझी कहाणी
पाखरांचे हे थवे
पाहते मी रूप माझे
चांदण्यांच्या दर्पणी
कोण उधळित गंध फुलवी
संचिताच्या अंगणी
सप्तरंगी इंद्रधनूचे
रंगगहिरे ताटवे?
शोधले मी आज माझे
हरवलेले सूरही
आणि वा-याने सुरांना
बांधले नूपूरही
गीत माझे मोरपंखी
भावनांना जागवे
मीच गाणे कोकिळेचे
चातकाची मी तृषा
मीच कातर सांज हळवी
मी उषा अन मी निशा
ज्योत माझ्या अन्तरीची
वाट मजला दाखवे
प्रतिक्रिया
15 Mar 2009 - 3:02 pm | मनीषा
मस्त !
मीच गाणे कोकिळेचे
चातकाची मी तृषा
मीच कातर सांज हळवी
मी उषा अन मी निशा
ज्योत माझ्या अन्तरीची
वाट मजला दाखवे ......... सुंदर !!!
---
कविता आवडली .
15 Mar 2009 - 7:13 pm | प्राजु
अतिशय आशादायी कविता.
खूपच छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Mar 2009 - 2:54 pm | जयवी
पाहते मी रूप माझे
चांदण्यांच्या दर्पणी
कोण उधळित गंध फुलवी
संचिताच्या अंगणी............. अहा क्या बात है !!
16 Mar 2009 - 3:06 pm | जागु
आवडली कविता. छान आहे.