सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ५

स्वच्छंदी_मनोज's picture
स्वच्छंदी_मनोज in भटकंती
9 Jan 2019 - 1:25 pm

पहील्या चार भागांच्या लिंक्स.

सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग १ - https://www.misalpav.com/node/43030
सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग २ - https://www.misalpav.com/node/43057
सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग ३ - https://www.misalpav.com/node/43162
सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग ३ - https://www.misalpav.com/node/43378
------------------------------------------------------------------------

सकाळी ऑफीसमध्ये आल्या आल्याच मन विषण्ण करणारी बातमी आली. थोड्याश्या दुरच्याच पण माझ्या परीचयातल्या एक मित्रवर्याचे सकाळीच दुर्धरआजाराने निधन झाले. वय फार नसले तरी तसा तो गेले काही महीने आजारीच होता, घरापासून लांब (पण एका शहरातच) उपचार घेत होता पण काळ बलवंत झाला. ह्या बातमीचा विचार करतानाच माझ्या मनात विचार आला तो आपल्या सह्याद्रीतल्या दुर कोनाकोपर्‍यातल्या गावात राहणार्‍या आणि आजाराने किंवा वयोमानाप्रमाणे अंथरुणाला खिळलेल्या माणसांचा.

माझ्या ट्रेकिंग अनुभवामधे अश्या बर्‍याच गावात घरात अशी माणसे बघायला मिळाली. त्या माणसांविषयीच थोडेसे आज (जास्त लिहायचा मुड नाहीये) :(

--------------------------------------------------------------------------

शब्दचित्र अकरावे : वडाच्या पारंब्या की भिंतीतल्या मुळ्या

ट्रेक करत करत आपण सह्याद्रीतल्या सुदुर कोपर्‍यातल्या एखाद्या गावात पोचतो. गावात पोचल्या पोचल्या जरी ते गाव अगदी तालेवार जरी नसले आणि सर्वसाधारण नांदते असले (आता माझ्यामते सर्वसाधारण नांदत्या गावाची खुण म्हणजे तिथे भरत असलेली शाळा आणि एखादे मंदीर आणि वस्तीला येणारी एस्टी) तर आपल्याला लगेच कळून येते की गावात आपल्याला टेकायला कुठल्या घराचा आसरा घेता येऊ शकेल. "कोण आहे का ???", "ओ गाववाले..." अश्या हाका देताच घरातून कोणीतरी बाहेर येउन आपले स्वागत होते. आपण बाहेरच्या पडवीत बसतो, ओटीवर जातो किंवा डायरेक्ट माजघरात जातो. या बसा होते, पाणी विचारले जाते, कुठून आलात, कुठे चाललात, गाव कुठचे, बरोबर कोण, एवढे बोजे का (सह्याद्रीतल्या गावात ट्रेकिंग बॅगेला सर्रास बोजे म्हटले जाते. खरेय म्हणा ते...आनंदाची हमालीच ती :)) अश्या चौकश्या होत असताना आपली नजर घरात फिरत असते.

अगदी टिपिकल घर असते. एखादाच लाईटचा बोर्ड असतो, त्यावर मोबाईल चार्जर लटकलेला असतो. त्याच्याच वरती फोटोंची लाईन असते. थोडे ब्लॅक अँड व्हाईट, थोडे कलर फोटो. फोटो खाली (शक्यतो ब्लॅक अँड व्हाईट फोटो) "जन्म" "मृत्यु" अश्या तारखा टाकल्या असल्या तर आपण काय समजायचे ते समजतो. तश्या तारखा नसल्या (शक्यतो कलर फोटो) तर तो फोटो घरातल्या एखाद्या जोडप्याचा लग्नाच्या वेळेचा एकत्र (पहीला आणि बहुदा शेवटाचा :) ) फोटो असतो. शेजारीच एखादा मोठा आरसा, एखादा रेडिओ, निलकमल, सेलो किंवा अश्याच एखाद्या ब्रँडच्या दोन तीन प्लॅस्टीक खुर्च्या. माजघराच्या मधल्या खांबाशी एखादी मांजर. एखादीच ट्युबलाईट किंबा दोन ४० वॅटचे पिवळे बल्ब. भिंतीला काही कोनाडे आणि काही खुंट्या. कोनाड्यात काहीही असू शकते. पण शक्यतो कंदील (हल्ली हल्ली त्याची जागा एलईडी बॅटर्‍यांनी घेतलीय) किंवा रॉकेलचा भुत्या/दिवटी असते. अगदीच एखादा लग्नाचा तरूण असेल तर सलमान, शाहरुख, ऐश्वर्या, राणी मुखर्जी यांचेही पोस्टर्स असतात. खुंटीला शाळेत जाणारे कोणी असले तर दप्तर अथवा कर्त्या पुरुषाचा सदरा किंवा पँट शर्ट. भिंतीतली एक दोन कपाटे असतात. लाकडी दरवाजे असलेली. पण त्या घरी आपण अगदीच काही मिनीटांचे मेहमान असल्याने कपाटात काय असेल हे आपल्याला कळण्याची सुतराम शक्यता नसते. सगळीकडे कोबा टाईप टाईल्स घातलेल्या असतात. उत्तम सारवलेली जमीन तशी आता दुर्मिळ झालेय पण अगदीच नसते असे नाही.

माजघरातून आत जायला तिन चार दरवाजे असतात. त्यातला एखादाच दरवाजा उघडा असतो. पलीकडे काळोख असतो त्यावरून ओळखायचे की चुलीकडे जाणारा हा मार्ग आहे. काळोख असल्याने घर आत किती मोठे आहे चटकन कळत नाही. पण आपण माजघरातून नजर फिरवत फिरवत आतल्या समोरच्या पडवीचे निरीक्षण करतो. शेणाने नीट सारवलेली उत्तम जमीन, एका कोपर्‍यात जमिनीत ठोकलेली खुंटी. तिथे एखादी दुभती गाय तिच्या वासरासकट बांधलेली. तिच्या समोर वैरण. तिथेच शेतीची काही बाही हत्यारे नांगर, कुदळ, खुरपे, फावडे वगैरे वगैरे. दुसर्‍या कोपर्‍यात कणगी. त्यावर कोंबड्याचे डालगे, खुराडे (दिवसा गेलो असू तर रिकामे, रात्री पोचले असू तर फडफड करणारे) आणि शेजारी एक बाज. त्यावर घोंगडीत एक म्हातारा किंवा म्हातारी खोकत असलेला किंवा असलेली. पाणी पित आपण नजर फिरवत असताना इथे आपण येतो आणि थबकतो.

धड कलर फोटोमध्ये नाही की धड ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट फोटोमध्ये नाही अश्या स्थितीतल्या त्या घरातल्या वृद्ध माणसाकडे बघून उगाचच मनात अनेक विचार येतात. अनेक पावसाळे अनुभवलेला म्हातारा किंवा म्हातारी अश्या अवस्थेत बघताना आपल्यालाही हलून जायला होते तर ज्यांना दररोज यांची सोबत आहे त्यांना यांच्याविषयी काय वाटत असेल असे आपल्याला उगाचच वाटत राहते. माझ्या ओळखीतलेच घर असेल तर घरची परीस्थीती मला चांगली ठाउक असते सो बोलण्यासारखे काहीच नसते पण जर माहीत नसेल तर मनात सहजच विचार येतो की इथे एवढ्या आडमार्गावरील सह्याद्रीतल्या अंतर्भागातल्या गावात ह्यांना बाजेवर शेवटच्या क्षणापर्यंत पडून राहण्याशिवाय काय गती आहे. घरातील बाकी माणसांचे त्यांना असे ठेवण्यामागे काही रिझनिंग असेल किंवा कदाचित अगतिकता असेलही पण ज्यांनी त्यांच्या तरूणपणी सगळा भवताल तुडवला ते इथे साध्या पाण्यासाठी पण हलू शकत नबाकी, ही अगतीकता जास्त दुर्दैवी नाही का?

ट्रेकिंग दरम्यान मी बघीतलेल्या रीमोट गावातून सगळ्या वृद्धांची साधारणतः हीच कथा आहे. अर्थात ह्याला अपवाद आहेतच. उदाहरणादाखल एकोले गावचे आमच्या मधुकरचे बाबा (अफाट वल्ली माणूस. वयाच्या ८०व्या वर्षी रानात गाई चरायला जाताना असंख्य मधमाश्या चावून देखील स्वतः घरी चालत आलेला. ह्यांचा मधमाश्यांनी फोडून काढलेला चेहरा आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही), चकदेवच्या संतोषचे बाबा, केळदच्या लक्ष्मणचे बाबा, रायरेश्वरच्या दगडूचे बाबा, चोरवण्याच्या मंगेशचे बाबा, ढवळ्याच्या रविचे बाबा. पण हे सर्व सम्नाननीय अपवादच. नियम हाच की आजारी म्हातारा/म्हातारी घरातल्या बाजेवर रवाना होतो/होते. कडू असेल पण हेच सत्य आणि वास्तव आहे. आता खरेतर हे लोक्स सह्याद्री चा भुगोल कोळून प्यायलेले. ह्यांच्या तरूणपणी ह्यांनी अख्या घराचा गाडा स्वतःच्या खांद्यावर ओढलेला. परंपरेची शेती, सणवार, लग्नकार्य, गावगाडा, ऋतूचक्र, गावातले तंटेबखेडे ह्याचे हे साक्षीदार आणि भागीदारही. पण एकदा शरीर थकले की ह्यांनी दुसर्‍याला वाट करून द्यायची आणि आजारी पडले की पडवीतल्या कोपर्‍यातल्या बाजेवर जायचे हा साधारण नियम.

ह्याहूनही अत्यंत वाईट अवस्था मानसीक कमकुवत असलेल्या लोकांची. घराला (???), गावाला खरेतर नकोसे झालेले हे लोक जगाला नकोसे होईपर्यंत जगत राहतात. शहरात अश्या लोकांना सर्वसाधारण प्रवाहात सामावून घेण्याची धडपड तरी दिसते पण अगदी कोपर्‍यातल्या सह्याद्रीतल्या गावात अशी माणसे म्हणजे जिवंतपणीच मरणाचा सोहळा. अहिवंत गडाच्या पायथ्याशी आणि गुगुळशी गावच्या झापावर चार सहा वर्षांच्या अश्या दोन लहान मुलांना सांभाळताना त्यांच्या आईबाबांच्या डोळ्यातले अश्रू थांबवण्याची माझीतरी कुवत नव्हती. "बाबारे तुमी शहरातली शिकलेल्या माणसं. सांगा काय उपाय असेल तर. गेल्या साली ह्याला ताप आला, पंधरा दिवस गेलाच नाही. पार नाशीक पर्यंत दाखवले पण हा असाच करतो. काय करू???" अहिवंतगडाच्या पायथ्याच्या गावातल्या सहा वर्षांच्या मानसिक कमकुवत मुलाचे आई बाबा आमच्या समोर असे रडून सांगत असताना आम्ही सो कॉल्ड शहरातले असून त्याच्यासाठी काहीही करू शकत नव्हतो ह्याची बोच आजही मला आहे. त्यातही ती जर मुलगी असेल तर पुढे तरुणपणी तिचे काय भविष्य असेल (किंवा असू शकेल) हे आपल्याला अश्याच पेपर मधल्या बातम्या वाचून कळतेच :( .

आता कोणाची बाजू घ्यावी हे पटकन ठरवणे कठीण आहे. वेळ, परिस्थीती, घरातील वातावरण यावरुन घरातील जाणत्यांनी हा निर्णय घेतला असल्याचीच जास्त शक्यता आहे कारण असे वार्‍यावर सोडणारी आपली शिकवण नाही. सह्याद्रीतल्या गावातली तर नाहीच नाही. पण अश्या एका जागी आजारी खिळलेल्यां विषयी कणव येण्यावाचून आपण दुसरे काही करू शकत नाही. आज देवाज्ञा झालेल्या माझ्या मित्राला शेवटपर्यंत लढायला वैद्यकिय उपचारांचे शस्त्र तरी होते पण अश्या दुर्गम खेड्यातल्या आजारी म्हातार्‍यांना आजाराशी लढायला कुठले शस्त्र आणि कुठले काय. जिथे श्वास चालू आहे म्हणून जिवंत आहे असे म्हणायचे तिथे औषधोपचार म्हणचे चैनच की. यांची अवस्था म्हणजे इंधन संपलेली अन बंद पडलेली आणी उताराला लागलेली गाडीसारखी. उतार संपला की एका जागी थांबणार, कायमची. मग यांची रवानगी मृत्यूची तारीख टाकून भिंतीतल्या फोटोत होणार आणि पुन्हा कोणीतरी म्हातारा आजारी होईपर्यंत पडवीतल्या बाजेला कोणी विचारणार पण नाही.

ही जुनी खोडे म्हणजे वडाच्या पारंब्यासरखी. स्वतंत्र, मजबूत, मुळ घराला घट्ट बांधील. पण हीच खोडे जेव्हा आजारी पडतात तेव्हा यांचीच कथा बांधावर, भिंतीत उगवलेल्या मुळ्यां सारखी होते. कोणी विचारत देखील नाही अन खंडतही नाही. आता माझ्यासारखे शहरातले कधीकाळी त्यांच्या घरी जाणारे ट्रेकर्स त्यांच्या साठी फार काय करू शकतीलच असे नाही पण जेव्हा जेव्हा अश्या घरी पडवीतल्या बाजेवर म्हातारा दिसेल तेव्हा "काय बाबा...बरं आहे ना?" असे जरी विचारले तरी त्यांना आपण अजूनही नकोसे झालो नाही ह्या विचाराने हायसे वाटेल. त्यांच्यासाठी जगायचे छोटेसे टॉनिकच ते.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

काल ऑफीसमधल्या मित्रांशी अशीच पेटीएम, वॉलेट, पेबॅक अश्या विषयावर चर्चा चालू होती ती चर्चेच्या ओघात वॉलमार्ट, बिग बाजार, मोर, डीमार्ट अश्या विषयावर गेली. मग नेहेमीप्रमाणेच लोकल किराणा भुसार व्यापारी, त्यांची दुकाने ते चकचकीत सुपरस्टोअर्स, डीपार्टमेंटल स्टोअर्स ह्यांची तुलना अश्या मुद्द्यांवर गाडी गेली. मला कोणाचीच बाजू घ्यायची नव्हती पण आमची चर्चा चालू असताना बॅक ऑफ अ माईंड मला सह्याद्रीत असलेल्या अश्याच "मेगा" स्टोअर्स ( :) ) बद्दल राहून राहून आठवू लागले. मग विचार केला की मला ट्रेक्स मध्ये अशी बरेच किराणा दुकाने दिसलीत. जवळ जवळ प्रत्येक मोठ्या गावात. तर ह्या अश्या दुकानांवरच पुढचे शब्दचित्र लिहावे.

---------------------------------------------------------------------------

शब्दचित्र बारावे : सह्याद्रीतली वॉलमार्ट्स आणि बिग बाजार.

मला वाटते मीच पुर्वी काही ठिकाणी लिहीले होते की सह्याद्रीत अशी बरीच दुर्गम गावे आहेत की ज्या गावांना साध्या मिठ मिरची साठी पण पाच दहा किमीची तंगडतोड करावी लागते किंवा दोन अडीच हजार फुटांचा चढ उतार करावा लागतो. हे लिहीण्यामधे काहीही अतिशयोक्ती नव्हती किंवा उगाचच केलेली कल्पनाशक्ती पण नव्हती तर मी स्वतः बघितलेली सत्य परीस्थीती होती. हो.."नव्हती", "होती" असेच म्हणावे लागेल आता, कारण ज्या रीमोट गावांमध्ये तेव्हा अशी परीस्थीती बघीतली होती ती परीस्थीती आता तेव्हढ्या प्रमाणात राहीली नाहीये हे ही खरे. ही गावे आता अतीदुर्गम मधून दुर्गम कॅटॅगेरीत शिफ्ट झालीत. काहीतर रस्त्याने जोडली गेल्याने आता अगदीच फॉर्च्युनर, एन्डेव्हर गाड्यांच्या टप्य्यात आलीत (सुज्ञांस अधिक सांगणे न लगे :) ). आता गावेच दुर्गम न राहीली तर रस्ता, लाईट, शाळा अश्या सुधारणे बरोबर येणारे पुढचे पाउल म्हणजे गावातच सुरु झालेले वाणसामानाचे एखादे दुकान.

फार पुर्वी सह्याद्रीतील अश्या गावी बाजारपेठा वसवायचे काम शेटी (ईडली डोसा वाले नव्हे :) ) लोक करायचे. त्यांना आमंत्रण देऊन बोलवायला लागायचे आणि त्याबदल्यात दोन चार वर्शाचा सारा (म्हणजे जीएसटी हो :) ) त्यांना माफ असायचा. आता कुठल्यातरी किल्ल्याखालच्या, कुठल्यातरी मेटेवर असलेल्या कुठल्यातरी गावात अशी वाणसामानाची पेठ उघडायची तर असे आमिष दाखावायला लागायचेच. (हल्लीच नाही का व्यापार्‍यांना खुश करायला आणि धंदा वाढवायला सरकारने जीएसटीत २८% ते १८% कपात केली, त्याचेच हे पुर्वीचे रूप :) ). नाहीतर धुआंधार कोसळणार्‍या पाउस पाण्यात आणि मरणाच्या उन्हाच्या फुफाट्यात कोण दोन चार दमडीकरता साखर, मिठ आणि गुळ विकत बसेल. त्यात पण गाढवांच्या पाठीवरून कोकणातील बंदरातून किंवा वरघाटातून माल आणायचा आणि तो निम्मा उधारीवर विकायचा आणि निम्मा दरोडीखोर लुटमार करायचे. म्हणजे सगळा आतबट्याचाच व्यवहार. त्यामुळे पुर्वापार सह्याद्रीतली व्यापारी दुकाने ही मोठ्या किल्ल्याच्या आश्रयालाच राहीली किंवा जिथे सशक्त, हत्यारबंद आश्रय मिळाला तिथेच वाढली. ही वाण सामानाची दुकानेही काही खास होती असे नव्हे तर ज्याच्यावाचून सामान्य जनांचे अडेल असेच पदार्थ इथे असायचे. खास उदाहरण सांगायचे तर मिठ आणि गुळ. (अपवाद रायगड सारख्या प्लॅन्ड पेठांचा जिथे सगळेच मिळायचे). रेशीम किंवा इतर कपडे, मौल्यवान वस्तू, स्थानिक न पिकणार्‍या वस्तू ह्या घरोघरी "ऑन डिमांड" विकण्याची सर्रास पद्धत होती. बाकी सगळ्या लागणार्‍या वस्तूंकरता बारा बलूतेदार सिस्टीम स्ट्राँग होती आणि त्याकाळच्या समाज जीवनाला एकदम पुरेशी होती.

ही झाली तेव्हाची पद्धत. पण सध्या आता दुर्गम खेडेगावात किराणा भुसार (हा शब्द कसा निर्माण झाला असेल ह्याचे एक मला कोडेच आहे :) ) मालाची दुकाने गावात रस्ता पोचला की पाठोपाठ येतात. येतात म्हटले खरे पण ते तिथल्याच कोणी एकाने सुरु केलेली असतात. ही दुकाने सुरु झाली की एक गोष्ट होते ती गावातल्या आणी आजुबाजुला असलेल्या वस्ती वाड्यात राहणार्‍या लोकांना हक्काचे दुकान होते जिथे सर्व जिवनावश्यक सामान मिळू शकेल. ही दुकानेही काही नावाजलेली असतात असे नव्हे तर घरातलीच एखादी अडगळीत पडलेली खोली साफसुफ करून थोडीशी डागडूजी करून माल भरला जातो. मालही काही नावाजलेला असतो असे नव्हे पण गावात लागणारे सर्व आणि न लागणारे एकही नाही अश्या टाईपचे दुकान असते. किंबहुना अश्या टाईपचे दुकानच टिकू शकते. सकाळी सकाळी दुकान उघडल्या पासून दहा रुपयाची चायपत्ती ते दुपारी रुपयाची पेप्सीकोला किंवा लिमलेट गोळ्या ते संध्याकाळी दहाचे विडी बंडल ते रात्री दुकान बंद होताना दहाचा मेणबत्तीचा पुडा. कशाचीही मागणी होते आणि दुकानदारीण मावशी (मी बघीतलेल्या बहुतांश दुकानांचा कारभार घरातल्या बाईनेच सांभाळलेला होता) त्या सगळ्या मागण्या पुर्ण करत असते. काय मिळणार नाही अश्या ठिकाणी ही एक विचार करण्याचीच गोष्ट आहे. कदाचीत सगळेच मिळत असण्याचीच शक्यता जास्त.

आता हे गाव किंवा हे दुकान जर मोठ्या गावात किंवा पंचक्रोशीच्या ठिकाणी असेल तर मग मजाच वेगळी. पाच पैशाच्या बॉबी पासून (त्याच त्या आपण लहानपणी पाची बोटात घालून खायचो त्या पुंगळ्या :) ) पाच हजाराच्या वस्तूही तिथे मिळू शकतात. किंबहुना अश्या पंचक्रोशीच्या गावातले हे असे एक"च" दुकान असते की इथे आणि फक्त इथेच अश्या सर्व वस्तू मिळू शकतात. खेड्यातले वॉलमार्ट किंवा बिग बाजारचे हे. दुकान किती मोठे असणार हे ते दुकान शहराशी कसे कनेक्टेड आहे त्यावर ठरते. जर दुकानापर्यंत एखादी पिकअप येऊ शकत असेल तर मोठे नाहीतर छोटे. असा सरळ सरळ मामला. ह्याची उदाहरणे मला आंबिवली, नागशेत, खिरेश्वर, उचाट, भेलीव, जोर, ढवळे ह्या आणि अश्या अनेक गावात मिळाली. ज्या गावातल्या दुकानापर्यंत पिकअप जाते तिथे विज पोचलेली आहे हे तर अद्ध्याऋत आहेच त्यामुळे अश्या दुकानात मोबाईल रेचार्ज, कोल्ड्रींक, सिमीट (गावात सिमेंटला हेच म्हणतात :) ), जनावरांचे खाद्य, मॅगी, भाजीपाला, दुध, डाळी, तांदूळ, साखर, आईस्क्रीम, कुरकुरे, गोळ्या, वह्या, पेन, विड्या, तंबाकू, पाने, चुना, घराची कौले, पत्रे, रुपया कॉलींग वाला पीसीओ, पेट्रोल, जुजबी औषधे, काहीही वाट्टेल ते मिळू शकते किंवा असू शकते. आपल्याला ते काहीही वाटते पण दुकानदार हा शेवटी धंदेवाला असतो आणि गावातलाच असतो त्यामुळे गावात काय लागते ह्याची त्याला बरोब्बर माहीती असते. न लागणारी एकही वस्तू तो ठेवत नाही. आपल्या इथल्या डिपार्टमेंटल स्टोअर सारखे आधी भाराभार वस्तू डिस्प्लेला ठेऊन मग गिर्‍हाईकाला त्या विकत घेण्यास भाग पाडण्याचा मार्केटींग फंडा इथे अश्या गावात चालूच शकत नाही. इथे असल्या दुकानात जे लागते तेच असते. अर्थात यालाही अपवाद आहेतच, आत्ताच्या जिओच्या जमान्यात मी एका गावात एका दुकानात "रेल्वे रेझर्वेशन करून मिळेल" असा बोर्ड वाचून मी खुर्चीवरून पडायचाच बाकी होतो :).

अशी चालती बोलती नांदती दुकाने मग ती मोठी असोत कि छोटी ही अश्या दुर्गम गावात फक्त दुकानेच नसतात. गावातल्या गप्पांच्या आधुनिक चावड्या असतात. म्हातारे कोतारे, होंडा पल्सर उडवणारे, शेतावर जाणारे, एखाद दिवसाआड इथे टेकून जातातच. गावातली सगळी खबरबात इथूनच सगळीकडे पसरते. मदतीची सुत्रेही इथूनच हलतात. एका गावात घाटवाट ट्रेक करून उतरून एका दुकानात टेकल्यावर आमच्याबरोबर तोपर्यंत असणारा एकजण गावात आल्यावर गायब झालाय असे सांगून आम्ही अल्मोस्ट सगळ्या गावाची झोप उडवली होती :) . त्या दुकानदाराने समोरची गिर्‍हाईके तिथेच टाकून अख्या गावात जी बोंबाबोंब केली की ज्याचे नाव ते :) . अश्या वेळी गावाला एकत्र बांधून ठेवणारे असे काही ठिकाण, अशी काही संस्था असणे हे किती गरजेचे आहे ते पटते.

आता गाव तिथे रस्ता, रस्ता तिथे एस्टी आणी एस्टी तिथे दुकान अशी काहीशी नवीन म्हण वापरायला हरकत नाही अशी परिस्थीती सुदैवाने (अच्छे दिन म्हणा हवे तर :) ) बर्‍याच ठिकाणी दिसू लागलीय हे नक्कीच आशादायी आहे पण हे सुत्र काही सरसकट नाही. अजूनही अतिदुर्गम खेडे, वस्तीच्या ठिकाणी एखादे छोटे दुकान असणे ही लक्जरी आहे. त्यांच्या गरजाही त्याच असतात ज्या थोड्या मोठ्या गावाच्या लोकांच्या असतात पण जिथे दुकानदारालाच हमाली करत सामान भारायची वेळ येते तिथे तो गावातल्यांसाठी ते करेल अशी माणुसकी सगळ्याच गावांच्या नशीबी असतेच असे नाही. मग अश्या गावातल्या लोकांच्या नशीबी कुठले मेगास्टोअर आणि कुठले काय. गाडीला किल्ली मारून, कार्ड स्वाईप करून, तिथल्याच पिशव्या विकत घेउन, लांबलचक बिलाची प्रिंटा आउट मिरवत घरी यायची चैन ती आपल्याला. यांनी मात्र पायपिट करायची, तास दोन तास डोंगर चढा उतरायचे, सामान पिशवीत भरायचे मग पिशवी डोक्यावर उचलून तसेच तेव्हढीच तंगडतोड करत घरी यायचे. यांचे वॉलमार्ट डोंगर तळाशी असते किंवा यांचे बिग बाजार दहा बारा किमी वर असते तरी हे सह्यपुत्र न कुरकुर करता किराणा आणतात आणि ह्याच अश्याच मेहनतीने आणलेल्या किराणा सामानातून आपल्यासारखे भटके त्यांच्या घरी पिठले भाकरी जेवतात.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमशः

bhatakantisahyadritil shabdchitre

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

9 Jan 2019 - 3:06 pm | प्रसाद_१९८२

शब्दचित्रे आवडली.
--
मागील महिन्यात भिमाशंकरला खांडस गावातून गेलो होतो. तिथल्या गावातील एका दुकानात तर चक्क बॅगपायपरचे खंबे विकत मिळत होते. व स्वत:ला ट्रेकर/हायकर म्हणवून घेणारे लोक ते विकत ही घेत होते.

टवाळ कार्टा's picture

9 Jan 2019 - 4:07 pm | टवाळ कार्टा

घेतले तर घेऊदेत की....जो पर्यंत ते लोक दुसऱ्यांना त्रास नाही देत, कुठेही कचरा नाही करत तर काय हरकत आहे? अर्थात सगळेच असे नसतात हे सुद्धा मान्य आहेच

टवाळ कार्टा's picture

9 Jan 2019 - 4:05 pm | टवाळ कार्टा

खत्रा लिवलंय

प्रचेतस's picture

9 Jan 2019 - 5:52 pm | प्रचेतस

जबरदस्त लिहिलंस रे.
अनुभवांतून आलेलं सखोल चित्रण. तुझ्याइतका जर नाहीच पण काही प्रमाणात तरी सह्याद्रीत फिरलेलो असल्याने सर्वच मनाला भिडत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jan 2019 - 6:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी शब्दचित्रे ! बारीक निरिक्षणाने भरलेली, सहृदयतेने अनुभवलेले क्षण त्यांच्या शब्दाशब्दातून दिसत आहेत !

अजून वाचायला जरूर आवडेल.

यशोधरा's picture

9 Jan 2019 - 6:18 pm | यशोधरा

चांगलं लिहिलंय.

दुर्गविहारी's picture

9 Jan 2019 - 7:31 pm | दुर्गविहारी

अफलातून लिहीलय. हेच सगळे अनुभवले असल्याने सगळे डोळ्यासमोर आले.घरुन निघताना कितीही तयारी केली तरी काहीतरी विसरलेले असतेच, अशावेळी सह्याद्रीतील हिच दुकाने उपयोगी पडतात. खुपच सुंदर लिखाण, थेट मनाला भिडले. घरातील व्यक्तिचित्रेही भावली. पुढचा भाग लवकर येउ द्या.

सुबोध खरे's picture

10 Jan 2019 - 12:14 pm | सुबोध खरे

खेड्यात अशा वृद्ध माणसांची स्थिती केविलवाणी असते. वैद्यकीय उपचारांसाठी पैसा नसतोच. कारण जसे वय होत जाते तसे झिजलेले शरीर टिकवण्यासाठी जास्तीत जास्त पैसे लागतात. अशा खेड्यातून आलेले कर्करोगाच्या शेवटच्या पायरीपर्यंत पोचलेले अनेक रुग्ण मी पाहत आलो आहे.
स्तनांचा कर्करोग स्तन पोखरून पार छातीच्या पिंजऱ्यापर्यंत जाऊन बरगड्या खाल्ल्या गेलेली ५५ वर्षांची स्त्री पाहून आतून उन्मळून जायला झाले होते.
पोटात कर्करोग पसरून पाण्याने पोटाचा नगारा झालेले रुग्ण पाहून फार वाईट वाटतं.
अशा ठिकाणी काम केल्यावर नको ते सेवाभावी काम असेच वाटू लागते.
स्वतः जगात असलेल्या सुखासीन आयुष्याबद्दल खंत आणि अशा लोकांबद्दल कणव आणि आपण फार काही करू शकत नाही याबद्दल चीड आणि हतबलता अशी संमिश्र भावना येत राहते.
सुदैवाची किंवा दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हि माणसं बरीच दैववादी/ देवभोळी असल्याने त्यांना अशा रोगांना सामोरे जाताना फारसे मानसिक त्रास होत नसावेत. (त्यांनी प्राप्त परिस्थिती नाईलाजाने/ गरिबीने देवाची इच्छा/ नशीब म्हणून स्वीकारली आहे म्हणून असेल).
मुंबई पासून केवळ ८० -९० किमी वर असणारे असे रुग्ण टाटाला पाठवायचे( उपचार फुकट होणार असले) तरी त्या पायी होणारी यातायात आणि मुलाचा बुडणारा रोजगार आणि तेथे राहण्या जेवण खाण्याचा येणारा खर्च हा खरंच त्यांना परवडणारा नसतो.
हृदयविकार रक्तदाब याचे रुग्ण पाहिले तरी त्याबद्दल काही करणे शक्य नसते. कारण नायर के इ एम मध्ये पाठवले तरी उपचाराचा (बायपासचा) खर्च लाखभर होतो. रुग्ण पाठवल्यास एक खेप मारून एकंदर न परवडणारी स्थिती पाहून परत येतात. आहे त्या स्थितीत " डॉक्टर तुम्ही औषध द्या तुमच्या औषधाचा गुण चांगला येतो" सांगतात, ते परवडत नाही म्हणून कि खरंच तुमच्यावर श्रद्धा आहे म्हणून.
अशा अश्राप जीवन खोटा आधार देताना खरं तर फार लाज वाटत राहते
अत्यंत अगतिक स्थिती असल्यामुळे आताशा अशा सेवा शिबिरांना जावेसे वाटत नाही.

स्वच्छंदी_मनोज's picture

11 Jan 2019 - 12:25 pm | स्वच्छंदी_मनोज

तुमचे अनुभव चांगले तरी आहेत असे कसे म्हणू... :(
पण दुर दुर्गम खेड्यापाड्यात हीच सत्य परिस्थीती आहे.

स्वच्छंदी_मनोज's picture

11 Jan 2019 - 12:26 pm | स्वच्छंदी_मनोज

प्रतीसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Jan 2019 - 1:37 pm | राजेंद्र मेहेंदळे

ट्रेक संपताना आणि परतीच्या येस्टीची वाट बघताना अशा ठिकाणी मिळालेला अमृत तुल्य चहा, आणि ईतर काहीबाही आठवत राहिले लेख वाचताना.

पण असे पाहुणे म्हणुन जाउन तिथली व्यथा समजणे कठीण आहे . वर डॉ. खरे यानी लिहिल्याप्रमाणे ती पण एक दुखरी बाजु आहेच. शिवाय लवासा ,सहारा सिटी वगैरे चा दट्ट्या (पजेरो/फॉर्च्युनर/एन्डेव्हर वगैरे) आहेच. आपल्या मुला बाळांकरता हा सह्याद्री असाच राहिल का अशी शंका वाटते.

विजुभाऊ's picture

15 Jan 2019 - 3:53 pm | विजुभाऊ

किराणा भुसार (हा शब्द कसा निर्माण झाला असेल ह्याचे एक मला कोडेच आहे :) )

हा एक जोडशब्द आहे.
किराणा आणि भुसार
भुसार म्हणज एधान्य
किराणा असे म्हणजे असे धान्य / वस्तु की जे तयार करताना त्यावरील टरफलामुळे भुसा/ भुसकट निर्मान होते. उदा : गहू , डाळी ,जिरे ,ज्वारी , बाजरी व्गैरे.
किराणा म्हणजे असे भुसकट निर्माण होत नाहे असे पदार्थ म्हणते तेलबीया , मसाले ( लवंग वेलदोडा मिरची ई.) असे सर्व.

स्वच्छंदी_मनोज's picture

15 Jan 2019 - 4:53 pm | स्वच्छंदी_मनोज

ओह.. शब्दाच्या मागे असा काही अर्थ असेल असे वाटले नव्हते. नवीन माहीती माझ्यासाठी.

धन्यवाद विजुभाउ.