माझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
1 Jan 2019 - 8:48 am

माझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.

१ जानेवारी २००७ पासून मी माझा “कृष्ण उवाच” हा ब्लॉग लिहायला घेतला. ह्या वर्ष अखेर बारा वर्ष होतील ह्या लिखाणाला. गेली बारा वर्ष मी ह्या ब्लॉगवर
सातत्याने लिहीत आलो आहे.
हा एक-हजारावा पोस्ट मी माझ्या मुलीला समर्पण करीत आहे.
(माझे मित्र श्री.डोंगरे ह्यानी अलीकडेच मला एक लेख पाठवला होता.त्याचं शिर्षक होतं
“*’परदेशस्थ’ मुलीचं पत्र*
थोडक्यात पत्राचा गोषवारा असा होता की,परदेशात राहाणारी मुलं जन्मदात्या आईवडिलांना भारतात वा-यावर सोडून ही मुलं स्वत: परदेशात कशी चैनीत जगतात अशा प्रकारच्या चर्चा नेहमी ऎकल्या जातात.पण या परदेशात राहणाऱ्या, सेटल होणाऱ्या मुलांचीही काही बाजू आहेत.असं लिहून नंतर सत्य परिस्थितीला धरून त्या पर्त्रात मुद्दे मांडले आहेत.
तेच मुद्दे किंवा त्या जवळचे मुद्दे घेऊन नव्हेतर काहीवेळा जसेच्यातसे मुद्दे घेऊन एखाद्या परदेशस्थ मुलीच्या घरी जर का तिचे आईबाबा तिच्या जवळ येऊन कायमचे रहात असतील, तर त्या मुलीला काय वाटत असेल असा विषय घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न ह्या लेखात केला आहे.)

” हाय आई अणि बाबा

कसे आहांत? तसं हे विचारायचं आत्ता लगेच काही कारण नाही,कारण रोजच आपण संध्याकाळी भेटतो.कधी बागेत,तर कधी घरीच कधी तुमच्या बेडरूममधे तर संध्याकाळी तुम्ही आणि आई तुम्हाला आवडणार्‍या मराठी मालिका टीव्हीवर बघत असताना.
आपण एकमेकांना मिस करत आहो असं कदापीही मला म्हणावं लागत नाही. त्याचं विशेष कारण तुम्ही आमच्याजवळच इकडे अमेरिकेत कायम राहायलाच आला आहांत.एवढ्या दिवसांची सवय झालीय ना! मुलं तर आजी आजोबांना विशेष जवळची वाटतात.आपलं नेहमीचंच रुटीन चालू असतं.
भारतात तुम्ही तुमची मित्र मंडळींची गेट टूगेदर्स, गाण्याचे कार्यक्रम, जिम वगैरे मध्ये व्यस्त असायचा.पण हळू हळू ते तुमच्या आठवणी पुरतंच आता राहिलेलं आहे.आणि ते स्वाभाविक आहे म्हणा. आणि आम्ही आमचं काम, मुलांच्या शाळा, अशा रुटीन मध्ये व्यस्थ असतो म्हणा.
तसे आपण आठवड्यातून एकदा विकेंडवर भरपूर गप्पा मारीत असतो.आणि तसं न करायला वेळ मिळत नाही असं कधीच होणार नाही.कारण तुम्ही आमच्या जवळच असता.किती भाग्यवान आम्ही आहोत ना? आई,बाबा जवळ आहेत आणि आम्ही मुलं तुमच्या जवळ आहोत ह्याचं कारण तुम्ही त्यावेळी घेतलेला आमच्याजवळ रहाण्याचा निर्णय आज सुखावह वाटतो.तुमच्या ये-जाच्या चक्करा वाचल्या हे काय कमी आहे का?
हे सगळं खास कारणासाठी मुद्दाम लिहीत आहे.परदेशात राहणा-या, सेटल होणा-या भारतीय मुलांविषयी मिडिया मधून, बातम्यांमधून किंवा व्हाटस् अप मधून फिरणा-या पोस्टर्स मधून, ही मुलं कशी स्वार्थी, बेजबाबदार आहेत, जन्मदात्या आईवडिलांना वा-यावर सोडून ही मुलं स्वत: कशी चैनीत जगतात अशा प्रकारच्या चर्चा मी नेहमी ऐकते, वाचते.पण हे वाचून मी मात्र मुळीच अस्वस्थ होत नाही.
चित्रपटांमधून, टी व्ही वरच्या मालिकांमधूनही काही अपवाद वगळता पुष्कळदा असाच सूर आळवलेला असतो. काही अंशी ते खरं असेलही.
आम्ही शिक्षणासाठी इथे आलो तेव्हापासून, पहिली काही वर्ष खूप अवघड होती आपल्या दोघांसाठीही. रिकामं घर तुम्हाला खायला उठलं असणार आणि आम्ही पहिल्यांदाच घर सोडलेलं, तुमच्यापासून एवढं लांब असण्याची कधीच सवय नाही… बाकी सगळं सोडा, पण साधं स्वतःचं स्वतः करून खायचीही कधी गरज पडली नव्हती त्या आधी.
इथे आलो आणि सगळंच अंगावर पडलं तेव्हा आई बाबांचं नुसतं असणं म्हणजे काय चैन आहे याची पहिल्यांदा जाणीव झाली.

पण नवीन जग होतं, नवीन अनुभव मिळत होते आणि भरपूर उत्साह होता. त्याच्या जोरावर आम्ही इथे जम बसवला. शिक्षण झालं, काम सुरु केलं…
डोक्यात हा विचार पक्का होता इथे नोकरी करायची,पैसे मिळवायचे.इथं एक सुंदर घर घ्यायचं आणि आईबाबा म्हातारे होतील तेव्हा किंवा शक्य झाल्यास त्या अगोदर आपण त्यांना इकडे बोलवायचं आणि तेव्हा आपण त्यांच्या बरोबर असूच असू.
नंतर लग्न झालं, मग मुलं झाली. मुलांच्या निमित्ताने तुमच्या भरपूर फेऱ्या झाल्या इथे! आपल्याला परत एकमेकांचा छान सहवास मिळाला पण मुलांच्या जन्मानंतर काहीतरी बदलत गेलं आमच्या मनात, आमच्याही नकळत! आत्तापर्यंत भारतात परतण्याबद्दल मनात जी क्लॅरिटी होती, तिच्या जागी वेगवेगळे विचार डोकं वर काढायला लागले. तुमच्यासाठी, घरासाठी, जुन्या मित्र मैत्रिणींसाठी, नातेवाईकांसाठी भारतात परतण्याची मनापासून इच्छा अजूनही कायम होतीच. किंबहुना मुलांचं आपल्या परिवाराशी घट्ट नातं निर्माण व्हावं यासाठी परत जायलाच हवं असं ठामपणे वाटत होतं. आपण जसे वाढलो, भारतीय कल्चर मधल्या ज्या गोष्टींचा, ज्या संस्कारांचा आपल्या जडणघडणीमध्ये एवढा मोठा वाटा आहे, ते संस्कार आपल्या मुलांवरही व्हायलाच हवेत असं माझं तरी संपूर्णपणे ठाम मत होतं आणि आहे.
मागच्या खेपेला तुम्ही आणि आई आला होता त्यावेळी आपण ह्या अनुषंगाने चर्चा केली.आमचं नशीब एव्हडं चांगलं की तुम्हीसुद्धा सकारात्मक विचार करून थोडा त्याग थोडं प्रेम आणि भरपूर समजूतदारपणा ह्यांची सांगड घालून आमच्या कडे इकडे रहायचं कबूल केलं.आता तर सोडूनच द्या पण इथे रहायचा त्यावेळी, तुम्ही इथे रहाण्याचा निर्णय घेतला त्यावेळीसुद्धा भारतातल्या काही गोष्टींकडे पाहण्याची आपली दृष्टी हळूहळू बदलत आहे याची जाणीव मला व्हायला लागली होती.
भारतात,आपल्याकडल्या जीवनपद्धतीतले काही प्रश्न, जे फक्त स्वतःचा विचार करताना तितके महत्त्वाचे वाटले नव्हते तेच मुलांच्या दृष्टिकोनातून पाहताना जास्त ठळकपणे भेडसवायला लागले. प्रचंड प्रमाणात वाढलेली गर्दी, सदा सर्वदा जाम झालेलं ट्रॅफिक आणि प्रदूषण सगळ्याच बाबतीत आणि मुख्य म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत चालणारा भ्रष्टाचार, त्यातून मुलांच्या डोक्यावर स्पर्धेचं, यशस्वी होण्याच्या दडपणाचं असलेलं प्रचंड ओझं, एकूणच सततचा संघर्ष आणि सुरक्षिततेची भावना या आणि अशा कित्येक गोष्टी एक व्यक्ती म्हणून आपण सहन करू शकतो, किंबहुना या सगळ्याशी सामना करतच आपणही भारतात लहानाचे मोठे झालो आहोत हे खरं! पण दुसरीकडे, इतकी वर्षं दुसऱ्या देशात चांगला जम बसवून चांगला पर्याय, चांगल्या संधी आपण आपल्या मुलांसाठी निर्माण केलेल्या असताना त्यांनाही याच चक्रातून जायला
लावावं का असा प्रश्न जेंव्हा मी स्वतःला विचारला तेंव्हा त्याचं प्रामाणिक उत्तर ‘नाही’ असंच माझ्या आतून आलं.
इथे सगळं काही आहे, पण माझ्या आईबाबासकट आपलं कुटुंब नाही याकडे माझं मन कधीच दुर्लक्ष करू शकलं नाही. इथल्या लोकांची एंजॉयमेन्टची व्याख्या सुद्धा माझ्या कधीही पचनी पडली नाही. क्लबींग करणारी, ड्रिंक्स घेण्यात मिरवण्यासारखं काही आहे असं मानणारी मुलगी मी तेंव्हाही नव्हते आणि अजूनही नाही. माझ्या आनंदाच्या जागा होत्या माझे आई बाबा.
तुम्ही दोघांनी इथं रहाण्याचा निर्णय घेतल्यामुळे तुम्हाला सोडून रहायला येणारी अपराधीपणाची भावना माझ्या मनात मुळीच आली नाही. आपले आई वडील आणि आपली मुलं यांच्यामध्ये निवड करायची माझ्यावर माझ्या नशीबानें पाळीच आली नाही.आमचं तुमच्यावर अतिशय मनापासून प्रेम आहे.
काहिंचे आईबाबा इथे त्यांच्याबरोबर राहू शकले नाहीत.कारणे अनेक असतील आणि प्रत्येकाची परिस्थितीही निरनीराळी असेल आणि त्यांच्या दृश्टीने ते अगदी योग्यही असेल पण आईबाबांना सोडून इथे रहायचं ह्याचा विचार येऊन त्यांचं मन सद्गदीत होणं स्वाभाविक आहे.
इकडे कधी कधी आम्ही एकत्र भेटलो की, त्यातले काही बोलूनही दाखवायचे की,
“आई बाबांना सोडून कायमचं इथेच कसं काय राहायचं या एका प्रश्नावर विचार करण्यात आमचे कित्येक तास, कितीतरी शक्ती खर्ची पडली आहे. दर वीकेंडला इथल्या मित्र-मैत्रीणी बरोबर रात्र रात्र जागून ज्या चर्चा व्हायच्या त्यात हा विषय सगळ्यात मोठ्ठा असायचा. आम्हीही आता आई बाप आहोत. मुलांवरचं प्रेम म्हणजे काय असतं, ती अॅटॅचमेंट कशी असते याची आम्हालाही थोडीशी झलक मिळालीय. कालांतराने आपले आई वडील म्हातारे होतील, आत्ता त्यांना रिकामपण जाणवतंच पण काही काळानं आपली खरीखुरी, प्रत्यक्ष गरज पडेल. तेव्हा आपण वेळेला जाऊ शकू ना? अचानक त्यांच्या तब्येतीचं काही कमी जास्त झालं तर? देव न करो पण रात्री अपरात्री फोन तर नाही ना येणार एक दिवस? काही न बोलताच निरोप घ्यावा लागला तर.. हे विचार मनात येऊ द्यायचे नाहीत म्हटलं तरी, ब्रह्मराक्षसासारखं त्यांचं अस्तित्व सतत मनाच्या एका कोपऱ्यात जाणवत असायचं.”
अशा ह्या ब्रम्हराक्षकासारख्या विचाराचं दडपण माझ्यावर येत नाही.कारण तुम्ही दोघं आमच्या सभोवती कुठे ना कुठे असता.मला एक प्रसंग आठवतो.माझा एक बॉस होता.त्याची स्टोरी अशी की,
“तो हट्टानं त्याच्या आई वडिलांना इकडे घेऊन आला. मला सांगत होता की ते कधीच इथे रमले नाहीत. शेवटपर्यंत त्यांच्या घराची आठवण काढत असायचे. त्याचा गिल्ट असा की इथे आणूनही तो त्याच्या आई वडिलांना सुखी ठेऊ शकला नाही. मला म्हणाला की आयुष्यभर ही बोच राहील मनात.”

परंतु, तुमच्यावर हा निर्णय जबरदस्तीनं लादण्याचा आमच्यावर प्रसंग आलाच नाही आणि जिंकण्या हरण्याचा प्रसंग ह्यात मुळीच नव्हता ह्याची मला जाणीव होती.
मला वाटतं की हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक पिढी ही पुढच्या पिढीचा विचार करून निर्णय घेत असते. मागच्या पिढीशी नातं कितीही घट्ट असलं तरी जेंव्हा प्राधान्य कशाला द्यायचं ही वेळ येते तेंव्हा ती पुढच्या पिढीलाच द्यावी लागते किंवा दिली जाते. तुमचंही तसंच नाही का? तुम्ही दोघंही कोकणातून मुंबईत आलात. शिक्षणासाठी, नोकरीसाठी.. आमच्यासारखंच! मग आमचा जन्म झाल्यावर तुम्ही तुमच्या गावाला परत गेला असता, आम्हाला घेऊन? आम्हाला चांगल्या संधी मिळाव्यात, आमच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळावी म्हणून तुम्ही जसं गाव सोडून शहरात स्थलांतरित झालात, तसाच इकडे स्थायिक होण्याचा निर्णय मला आमच्या मुलांसाठी घ्यावासा वाटला. आता हा फरक आहेच की आपल्यातलं अंतर खूप जास्त आहे. तुम्ही, मनात आलं की तास दोन तासात तुमच्या आई वडिलांना भेटू शकत होतात. हेच लक्षात घेऊन तुम्ही माझ्याकडे रहाण्याचा व्यवहारीक निर्णय घेतलात.
आजारी पडलं की रात्र रात्र उशाशी बसून तुम्ही केलेली जागरणं आठवतात, कधी काही मनाविरुद्ध घडलं की तुम्ही समजावलेलं आठवतं, अपयश आलं तर तुम्ही दिलेलं प्रोत्साहन आठवतं, आम्हाला घेऊन केलेल्या ट्रिप्स आठवतात, अवघड आर्थिक परिस्थितीतही आमच्या गरजांना प्राधान्य दिलेलं आठवतं. कधीही काहीही अडचण आली तर पर्वतासारखा खंबीर आधार होतात तुम्ही माझा, आणि अजूनही आहात. तेंव्हा आता आमच्या ह्या वयातही तुम्ही आम्हाला सहवास देतात तेंव्हामला खूपच धन्य-धन्य वाटतं.
तुम्ही जो ठेवा आम्हाला दिलाय तोच आम्ही आमच्या मुलांना द्यायचा प्रयत्न करतोय.आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्या प्रक्रियेत तुम्ही आमच्याबरोबर साक्षीला आहात.अहो भाग्यम!
उद्या आमची मुलं आम्हाला सोडून दुसऱ्या देशात जातील. त्यांना काही वेगळी क्षितिजं खुणावतील.मग आम्ही तुमच्या जागी असू.आम्हाला हे स्वीकारणं कदाचित सोपं जाईल. कारण ती गेली तरी तुम्ही आमच्याबरोबर असणार.माझं हे म्हणणं जरा हास्यास्पद वाटेल तुम्हाला, पण मला तुमचा हेवा वाटतो कधी कधी.
आम्ही तुमच्या वयाचे होऊ ना, तेव्हा आमची मुलं तर नसतीलच आमच्यापाशी शिवाय मोजके चार मित्र सोडले तर बाकीही फार कोणी नसेल, कारण इथल्या लोकांशी तशी मैत्री, तसे संबंध निर्माण होऊच शकत नाहीत. पण आमची मुलं लहान असल्यापासून तुम्ही त्यांच्या संगतीत असल्याने तुम्ही आमच्यावर जसे संस्कार केलेत तसे नकळत त्यांच्यावरही कशावरून झाले नसावेत.निदान तसं वाटून घेणं गैर होईल असं मला वाटत नाही.
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये प्रेम व्यक्त करण्याची पद्धत नाही. प्रत्येक वेळी फोन वर बोलून झाल्यावर love you म्हणलं की ते प्रेमाचं प्रदर्शन वाटतं आपल्या लोकांना.आणि काही अंशी ते खरं आहे असं मला वाटतं.प्रेम व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती आहेत.आपण एकमेकांजवळ राहून त्या सहवासातून सतत प्रेम व्यक्त होतच असतं ही पण प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धतच नव्हे काय?
इथे राहिल्याने इथे येणारी आव्हानं वेगळीच!तुमचा इथे आमच्याबरोबर रहाण्याचा विचार पक्का झाल्यावर,इकडे रहाण्यासाठी लागणार्‍या इकडच्या जरूरीच्या प्रक्रिया करायला सुरवात करून तुम्ही ग्रीन कार्ड मिळवू शकला. आईवडील आणि मुलं ह्यांची फारकत करू देणं म्हणजे कुटूंबात विभक्ती होत असल्याने आईवडीलांएव्हडं जवळच नातं नाही असं समजून ग्रीन कार्ड देण्यासंबंधाचे इकड्चे कायदे तुमच्या दृष्टीने आपल्याला फायद्याचे ठरले.
नंतर सतत पाच वर्ष तुम्ही इकडे राहिल्याने अमेरिकन सिटीझनशीपसाठी पात्र ठरल्याने तुम्ही दोघांनी मेहनत घेऊन सिटीझनशीपच्या इंटर्व्य्हूसाठी लागणार्‍या माहीतीचा अभ्यास करून तुम्ही ती मिळवलीत.
अमेरिकेत कायमचंच आमच्याबरोबर रहायचा तुमचा इरादा कायम झाल्याने तुम्ही भारताततून जवळ जवळ गाशा गुडाळून इकडे आला.”गाशा गुंडाळणं”हा तुमचाच शब्द आहे हे मला निक्षून माहित आहे.त्याबद्दलचे बरेचसे किस्से तुम्ही मला सांगीतले आहेत ते मला आठवतात.
तुमचे हितचिंतक आणि तुमचे स्नेही तुम्हाला म्हणायचे,
“गाशा गुंडाळून तुम्ही जात आहात.पूर्ण विचार करा.”
“ताट द्यावं पण बुडाखालचा पाट देऊ नये.”
“आम्ही असल्या बर्‍याच “स्टोरीझ” ऐकल्या आहेत.पटत नाही म्ह्णून परत आलेले आहेत.”
“आता ठीक आहे पुढे जास्त वय झाल्यावर तिकडचा बर्फ आणि थंडी सोसण्याचा आपला पिंड नाही.मग विचार बदलावा लागेल.(अमेरिकेत सगळीकडे सतत बर्फ पडत असतो
आणि कायमची थंडी असते असं माझ्या काही जवळच्या नातेवाईकांना वाटतं असं तुम्ही त्यावेळी म्हणाला होता.)”

“जवळची माणसं इशारा देतात तो “भिवा” आणि इतर इशारा देतात ती “भीती”
असंही एकदा बोलता बोलता तुम्ही म्हणाल्याचं आठवतं. असो.
तुम्हा दोघांचं अमेरिकेत येऊन आमच्याबरोबर रहाण्याचं पक्क ठरलं होतं.त्यामुळे भिवा आणि भीती ह्या दोघांचीही पर्वा नकरता इकडे येण्याचा तुमचा निर्णय ठरलेला होता.आता तुम्ही जास्त वयस्कर होत राहिला आहांत.ह्या परिस्थितीत तुम्हाला मस्त मजेत ठेवणं आणि तुमच्या तब्येतीची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे.तुम्ही आणखी खूप वर्षं जगावं म्हणून प्रयत्नाची मी पराकाष्टा करीत रहाणार.त्यासाठी तुम्हाला वेळेवर डॉक्टरांकडे चाचाणीसाठी नेणं,तुमचं औषध वेळेवर आणणं आणि ते वेळेवर देणं ह्याची काळजी घेताना मनात भरून येतं.नातवंडं आपल्या आजीआजोबाकडून भरपूर लाड करून घेत आहेत,सारा वेळ एकत्र घालवता येत आहे आणि ह्याचं सर्व कारण की तुम्हाला fit रहाण्याशिवाय पर्याय नाही हे तुम्हालासुद्धा कळलं आहे हे किती उत्साहवर्धक वाटतं.
आणि तुम्ही सांगत आला आहात,की एकमेकाचे “संबंध” हे खणखणीत वाजणार्‍या नाण्या सारखे असतात.आणि ह्या “संबंधाचं नाणं” एका बाजूला “प्रेम” आणि दुसर्‍या बाजूला “त्याग” अशा दोन बाजूंचं असतं आणि त्या नाण्याची घडण ही “समजूतदारपणाच्या” धातूने बनलेली असते.ह्या तिन्ही गोष्टी चोख असतील तर ते नाणं खणखणीत वाजणार.म्हणजेच आता आपले संबंध आहेत तसे.
हे पत्र तुम्हाला लिहित असतानां,ज्यांचे आईबाबा त्यांच्याजवळ इथे येऊन रहात नाहीत (अनेक संयुक्तीक कारणं असतीलसुद्धा) त्यांना किती दु:ख होत असेल याची कल्पना मला आहे आणि त्यांच्या भावनेचा आदर माझ्या मनात आहे.
आणि ज्यांचे आईबाबा त्यांच्याबरोबर रहात असतील त्यांनाही माझ्यासारखी आनंदाची परिस्थिती असेल ह्याचीही मला खात्री आहे.

शेवटी,हे सर्व मी तुमच्याशी पत्ररुपाने बोलत असताना मला एक गोष्ट तुम्हालाच सांगाविशी वाटते ती अशी,की आपले आईबाबा आपल्या जवळ असण्याची जाणीव आईबाबांची उणीव वाटण्यापूर्वीच व्हायला हवी.ही एकच ओळ मला आनंदाने जगायला स्फुर्ती देत,आनंद देते.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

व्यक्तिचित्रविचार

प्रतिक्रिया

अमित खोजे's picture

1 Jan 2019 - 10:05 am | अमित खोजे

आपल्या मिसळपावच्या संस्कृतीला जागून मूळ पत्राचा व त्यावरील माझ्या प्रतिउत्तराच्या लेखांचा दुवा देत आहे.

मूळ पत्र टोरांटो मधील ओंकार संत यांनी फेसबुक वरील 'मराठी भाषिक मंडळ' या समूहात ८ डिसेंबर २०१८ रोजी लिहिले आहे. त्या पत्राचा दुवा खालील प्रमाणे.
https://www.facebook.com/groups/mbmtorontogroup/permalink/10157235016009...

हे पत्र वाचल्यानंतर मात्र मला राहवले नाही आणि त्यावर एक आई वडिलांची काय प्रतिक्रिया असेल त्यानुसार विचार करून मी त्यास उत्तर लिहिले. ते खालील प्रमाणे.
https://www.facebook.com/groups/mbmtorontogroup/permalink/10157238779354...

आनन्दा's picture

1 Jan 2019 - 5:38 pm | आनन्दा

तो ग्रुप प्रायव्हेट अहे. पत्त्र दिसत नाही.

अमित खोजे's picture

2 Jan 2019 - 9:33 am | अमित खोजे

मुलगा-मुलगी परदेशी गेल्यावर तेथेच स्थायिक व्हायचा निर्णय घेतात तेव्हा त्यांची काय अवस्था असते हे सांगणारा भावपूर्ण, सडेतोड लेख.....

*'परदेशस्थ' मुलीचं पत्र*

हाय आई अणि बाबा

कसे आहात? तसं हे विचारायचं आत्ता लगेच काही कारण नाही, कारण चार महिन्यांचा आमच्याकडचा मुक्काम संपवून कालच तुम्ही घरी परत पोचला आहात. प्रवास छान झाला आणि सुखरूप पोचलात हे महत्त्वाचं!

आता काही दिवस आपण एकमेकांना खूप मिस करू, कारण एवढ्या दिवसांची सवय झालीय ना! मुलं तर आजी आजोबांना विशेष मिस करतील, आणि तुम्ही पण त्यांना. मग हळूहळू परत आपलं रुटीन सुरु होईल. तुम्ही तुमची मित्र मंडळींची गेट टूगेदर्स, गाण्याचे कार्यक्रम, जिम वगैरे मध्ये व्यस्त व्हाल आणि आम्ही आमचं काम, मुलांच्या शाळा, अशा रुटीन मध्ये. तसे आपण आठवड्यातून एकदा तरी ऑन लाईन बोलतोच , पण कदाचित कधीतरी महिनाभर बोलायलाही वेळ होणार नाही आम्हाला. तुम्हाला थोडं वाईट वाटेल,बोलून दाखवाल की फोन करत जा, विसरु नका आई बापाला वगैरे. मग आम्हालाही अपराधी वाटेल जरा! असं वर्ष दीड वर्ष जाईल आणि मग आमची एक चक्कर होईल घरी, किंवा परत तुमची आमच्याकडे!

हे पत्र काही खास कारणासाठी मुद्दामच लिहीत आहे. परदेशात राहणा-या, सेटल होणा-या भारतीय मुलांविषयी मिडिया मधून, बातम्यांमधून किंवा व्हाटस् अप मधून फिरणा-या पोस्टस् मधून, ही मुलं कशी स्वार्थी, बेजबाबदार आहेत, जन्मदात्या आईवडिलांना वा-यावर सोडून ही मुलं स्वत: कशी चैनीत जगतात अशा प्रकारच्या चर्चा मी नेहमी ऐकते वाचते. आणि नेहमीच मी अतिशय अस्वस्थ होते. चित्रपटांमधून, टी व्ही वरच्या मालिकांमधूनही काही अपवाद वगळता पुष्कळदा असाच सूर आळवलेला असतो. काही अंशी ते खरं असेलही. पण या परदेशात राहणाऱ्या, सेटल होणाऱ्या मुलांचीही काही बाजू आहेच ना आणि ती मला मांडायची आहे. माझं म्हणणं सगळ्यांना कदाचित बरोबर वाटणारही नाही.

गेली दहा बारा वर्ष आपलं आयुष्य असच आहे नाही? आम्ही शिक्षणासाठी इथे आलो तेव्हापासून. पहिली काही वर्ष खूप अवघड होती आपल्या दोघांसाठीही. रिकामं घर तुम्हाला खायला उठलं असणार आणि आम्ही पहिल्यांदाच घर सोडलेलं, तुमच्यापासून एवढं लांब असण्याची कधीच सवय नाही… बाकी सगळं सोडा, पण साधं स्वतःचं स्वतः करून खायचीही कधी गरज पडली नव्हती त्या आधी. इथे आलो आणि सगळंच अंगावर पडलं तेव्हा आई बाबांचं नुसतं असणं म्हणजे काय चैन आहे याची पहिल्यांदा जाणीव झाली.

पण नवीन जग होतं, नवीन अनुभव मिळत होते आणि भरपूर उत्साह होता. त्याच्या जोरावर आम्ही इथे जम बसवला. शिक्षण झालं, काम सुरु केलं… डोक्यात हा विचार पक्का होता की काही वर्ष नोकरी करायची, पैसे मिळवायचे आणि मग गाशा गुंडाळून भारतात परत! आई बाबा म्हातारे होतील तेव्हा आपण त्यांच्या बरोबर असूच असू.

नंतर लग्न झालं, मग मुलं झाली. मुलांच्या निमित्ताने तुमच्या भरपूर फेऱ्या झाल्या इथे! आपल्याला परत एकमेकांचा छान सहवास मिळाला.

पण मुलांच्या जन्मानंतर काहीतरी बदलत गेलं आमच्या मनात, आमच्याही नकळत! आत्तापर्यंत भारतात परतण्याबद्दल मनात जी क्लॅरिटी होती, तिच्या जागी वेगवेगळे विचार डोकं वर काढायला लागले. तुमच्यासाठी, घरासाठी, जुन्या मित्र मैत्रिणींसाठी, नातेवाईकांसाठी भारतात परतण्याची मनापासून इच्छा अजूनही कायम होतीच. किंबहुना मुलांचं आपल्या परिवाराशी घट्ट नातं निर्माण व्हावं यासाठी परत जायलाच हवं असं ठामपणे वाटत होतं. आपण जसे वाढलो, भारतीय कल्चर मधल्या ज्या गोष्टींचा, ज्या संस्कारांचा आपल्या जडणघडणीमध्ये एवढा मोठा वाटा आहे, ते संस्कार आपल्या मुलांवरही व्हायलाच हवेत अशी माझं तरी संपूर्णपणे ठाम मत होतं. त्याच दृष्टीनं पावलं उचलायची म्हणून आम्ही तिथे घरही घेऊन ठेवलं.

पण आता मात्र भारतातल्या काही गोष्टींकडे पाहण्याची आपली दृष्टी हळूहळू बदलतीय याची जाणीव मला व्हायला लागली होती. आपल्याकडल्या जीवनपद्धतीतले काही प्रश्न, जे फक्त स्वतःचा विचार करताना तितके महत्त्वाचे वाटले नव्हते तेच मुलांच्या दृष्टिकोनातून पाहताना जास्त ठळकपणे भेडसवायला लागले. प्रचंड प्रमाणात वाढलेली गर्दी, सदा सर्वदा जाम झालेलं ट्रॅफिक आणि प्रदूषण, सगळ्याच बाबतीत आणि मुख्य म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत चालणारा भ्रष्टाचार, त्यातून मुलांच्या डोक्यावर स्पर्धेचं, यशस्वी होण्याच्या दडपणाचं असलेलं प्रचंड ओझं, एकूणच सततचा संघर्ष आणि सुरक्षिततेची भावना या आणि अशा कित्येक गोष्टी एक व्यक्ती म्हणून आपण सहन करू शकतो, किंबहुना या सगळ्याशी सामना करतच आपणही या देशात लहानाचे मोठे झालो आहोत हे खरं! पण दुसरीकडे, इतकी वर्षं दुसऱ्या देशात चांगला जम बसवून चांगला पर्याय, चांगल्या संधी आपण आपल्या मुलांसाठी निर्माण केलेल्या असताना त्यांनाही याच चक्रातून जायला लावावं का असा प्रश्न जेंव्हा मी स्वतःला विचारला तेंव्हा त्याचं प्रामाणिक उत्तर 'नाही' असंच माझ्या आतून आलं.

असं जरी असलं तरी आता कायमचं इथे रहायचं हा निर्णय घेणं अतिशय अवघड होतं. गेली बारा वर्षं हा निर्णय आम्ही लांबणीवर टाकत होतो याचं कारण हेच! इथे या परक्या देशामध्ये आपण रुजलो आहोत असं मला तरी कधीच वाटलं नाही. इथे सगळं काही आहे, पण आपलं कुटुंब नाही याकडे माझं मन कधीच दुर्लक्ष करू शकलं नाही. इथल्या लोकांची एंजाॅयमेन्टची व्याख्या सुद्धा माझ्या कधीही पचनी पडली नाही. क्लबींग करणारी, ड्रिंक्स घेण्यात मिरवण्यासारखं काही आहे असं मानणारी मुलगी मी तेंव्हाही नव्हते आणि अजूनही नाही. माझ्या आनंदाच्या जागा होत्या माझे आई बाबा, मित्र मैत्रीणींबरोबर केलेला टाईमपास, एकत्र साजरे केलेले सण, नाटकं सिनेमे बघणं, रस्त्यावर वडापाव पाणीपुरी खाणं, इतरांच्या लग्नांमध्ये केलेली धमाल.. अजून काय काय सांगू? हे सगळं कायमचं सोडायचं आणि इथेच राहायचं? कायमचं? ठीक आहे.. नोकरी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कदाचित आपण या गोष्टींना मिस करणार नाही, तेवढा वेळच मिळणार नाही, पण पुढे काय? म्हातारपणी, मुलं त्यांच्या त्यांच्या मार्गांनी गेली की आपण काय करणार? इथे हाताच्या बोटांवर मोजता येण्याएवढं आपलं मित्रमंडळ आहे. तेही आता वेगवेगळ्या शहरांमध्ये विखुरलंय.. मग इथे जगायचं कशाच्या जीवावर?

पण सगळ्यात अवघड गोष्ट सांगू? हा निर्णय घेतल्यामुळे आलेली अपराधीपणाची भावना! आपले आई वडील आणि आपली मुलं यांच्यामध्ये निवड करायला लागल्यामुळे आलेली. ती जन्मभर आम्हाला सलत राहणार आहे. आमचं तुमच्यावर अतिशय मनापासून प्रेम आहे. आई बाबांना सोडून कायमचं इथेच कसं काय राहायचं या एका प्रश्नावर विचार करण्यात आमचे कित्येक तास, कितीतरी शक्ती खर्ची पडली आहे. दर वीकेंडला इथल्या मित्रांबरोबर रात्र रात्र जागून ज्या चर्चा व्हायच्या त्यात हा विषय सगळ्यात मोठ्ठा असायचा. आम्हीही आता आई बाप आहोत. मुलांवरचं प्रेम म्हणजे काय असतं, ती अॅटॅचमेंट कशी असते याची आम्हालाही थोडीशी झलक मिळालीय. कालांतराने आपले आई वडील म्हातारे होतील, आत्ता त्यांना रिकामपण जाणवंतच पण काही काळानं आपली खरीखुरी, प्रत्यक्ष गरज पडेल. तेव्हा आपण वेळेला जाऊ शकू ना? अचानक त्यांच्या तब्येतीचं काही कमी जास्त झालं तर? देव न करो पण रात्री अपरात्री फोन तर नाही ना येणार एक दिवस? काही न बोलताच निरोप घ्यावा लागला तर.. हे विचार मनात येऊ द्यायचे नाहीत म्हटलं तरी ब्रह्मराक्षसासारखं त्यांचं अस्तित्व सतत मनाच्या एका कोपऱ्यात जाणवत असतं.

खरं तर तुम्ही इथे आमच्याबरोबर रहायला आलेलं आम्हाला अगदी मनापासून आवडेल! पण तुमचं मन इथे रमणार नाही हे माहितीय आम्हाला. माझा एक श्रीलंकन बॉस होता. त्याची स्टोरी सेम अशीच. तो हट्टानं त्याच्या आई वडिलांना इकडे घेऊन आला. मला सांगत होता की ते कधीच इथे रमले नाहीत. शेवटपर्यंत श्रीलंकेतल्या त्यांच्या घराची आठवण काढत असायचे. त्याचा गिल्ट असा की इथे आणूनही तो त्याच्या आई वडिलांना सुखी ठेऊ शकला नाही. मला म्हणाला की आयुष्यभर ही बोच राहील मनात. तसाच तुमच्यावर हा निर्णय जबरदस्तीनं लादुनही आम्ही जिंकणार नाहीच याची आम्हाला जाणीव आहे.

असं सगळं असूनही आम्ही इथे राहायचा निर्णय घेतलाय. का? मला वाटतं की हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक पिढी ही पुढच्या पिढीचा विचार करून निर्णय घेत असते. मागच्या पिढीशी नातं कितीही घट्ट असलं तरी जेंव्हा प्राधान्य कशाला द्यायचं ही वेळ येते तेंव्हा ती पुढच्या पिढीलाच द्यावी लागते किंवा दिली जाते. तुमचंही तसंच नाही का? तुम्ही दोघंही खेडेगावांमधून पुण्यात आलात. शिक्षणासाठी, नोकरीसाठी.. आमच्यासारखंच! मग आमचा जन्म झाल्यावर तुम्ही तुमच्या गावाला परत गेला असतात, आम्हाला घेऊन? आम्हाला चांगल्या संधी मिळाव्यात, आमच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळावी म्हणून तुम्ही जसे गाव सोडून शहरात स्थलांतरित झालात, तसाच इकडे स्थायिक होण्याचा निर्णय आम्हाला आमच्या मुलांसाठी घ्यावासा वाटतोय. आता हा फरक आहेच की आपल्यातलं अंतर खूप जास्त आहे. तुम्ही, मनात आलं की तास दोन तासात तुमच्या आई वडिलांना भेटू शकत होतात, त स्वातंत्र्य आम्हाला नाही. आणि याचं जेवढं दुःख तुम्हाला आहे तेवढंच आम्हालाही आहे.

आपल्याकडच्या टी व्ही सिरियलमध्ये सिनेमांमध्ये जेंव्हा अशी दृश्य दाखवतात ना ज्यात म्हातारे आई वडील मुलांबद्दल म्हणतात 'आमचा मुलगा / मुलगी परदेशात जाऊन आम्हाला पार विसरून गेले हो' तेंव्हा मला अगदी मनापासून वाईट वाटतं. मला मान्य आहे की जगात अशी मुलं नक्कीच आहेत. आणि फक्त भारतातच नाही तर इतर कुठल्याही देशांमध्ये अशी मुलं सापडतीलच. पण याच एका तराजू मधून सगळ्यांना तोलणं चुकीचं नाही का?आमच्यासारख्यांचं काय, जे आई वडिलांना मुळीच विसरले नाहीयेत, उलट आई वडील आणि आपली मुलं यांच्यामध्ये निवड करायला लागल्यामुळे आयुष्यभर अपराधीपणाची भावना घेऊन जगणार आहेत. तुमची खूप खूप आठवण येते आम्हाला! आजारी पडलं की रात्र रात्र उशाशी बसून तुम्ही केलेली जागरणं आठवतात, कधी काही मनाविरुद्ध घडलं की तुम्ही समजावलेलं आठवतं, अपयश आलं तर तुम्ही दिलेलं प्रोत्साहन आठवतं, आम्हाला घेऊन केलेल्या ट्रिप्स आठवतात, अवघड आर्थिक परिस्थितीतही आमच्या गरजांना प्राधान्य दिलेलं आठवतं. कधीही काहीही अडचण आली तर पर्वतासारखा खंबीर आधार होतात तुम्ही आमचा, आणि अजूनही आहात. या प्रेमाची कुठेही रिप्लेसमेंट मिळणं शक्य नाही हे पुरेपूर माहितीय आम्हाला. हे प्रेम हाच तर आमच्या जगण्याचा आधार आहे. पाया आहे. मग आम्ही तुम्हाला विसरलो असं कसं?

तुम्ही जो ठेवा आम्हाला दिलाय तोच आम्ही आमच्या मुलांना द्यायचा प्रयत्न करतोय. त्यांचा भक्कम आधार, राॅक साॅलीड सपोर्ट बनण्याचा प्रयत्न करतोय. उद्या तीही आम्हाला सोडून दुसऱ्या देशात जातील. त्यांना काही वेगळी क्षितिजं खुणावतील. मग आम्ही तुमच्या जागी असू. आम्हाला हे स्वीकारणं कदाचित तुमच्यापेक्षा सोपं जाईल कारण तशी मानसिक तयारी आमची आमच्या स्वतःच्या अनुभवामुळे झाली असेल. किंवा नाहीही जाणार, कोणास ठाऊक? माझं हे म्हणणं जरा हास्यास्पद वाटेल तुम्हाला, पण मला तुमचा हेवा वाटतो कधी कधी. तुमची मुलं तुमच्यापासून लांब गेलीयेत खरी, पण तुम्हाला किमान तुमची जागा माहितीय, तुमची स्वतःची, हक्काची जागा.. तुमच्या अवतीभवती तुम्ही जोडलेली कितीतरी माणसं आहेत जी एका हाकेत तुमच्यासाठी धावून येतील. आम्ही तुमच्या वयाचे होऊ ना, तेव्हा आमची मुलं तर नसतीलच आमच्यापाशी शिवाय मोजके चार मित्र सोडले तर बाकीही फार कोणी नसेल, कारण इथल्या लोकांशी तशी मैत्री, तसे संबंध निर्माण होऊच शकत नाहीत. ही आमची हक्काची जागा नाही आणि कधी होणारही नाही!

एवढं सगळं बोलण्याचं प्रयोजन हे की आमच्यासारख्या देश सोडून गेलेल्या अनेक मुलांकडे एकाच चष्म्यातून प्लीज पाहू नका. प्रत्येकाची कारणं वेगळी असतील, परिस्थिती वेगळी असेल पण किमान नव्वद टक्के मुलांना हा पर्याय निवडताना आई वडिलांना मागे सोडायला लागल्यामुळे genuinely दुःख झालेलं आहे. त्यातून कुठलीही support system नसल्यामुळे इथे येणारी आव्हानं वेगळीच! ही परिस्थिती बदलणं आता दोघांच्याही हातात नसलं तरी त्यांचं तुमच्यावर तितकंच प्रेम आहे हे तुमच्यापर्यंत पोचवणं मला गरजेचं वाटलं, आमची बाजू मांडणं गरजेचं वाटलं म्हणून हा प्रपंच. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये प्रेम व्यक्त करण्याची पद्धत नाही. प्रत्येक वेळी फोन वर बोलून झाल्यावर love you म्हणलं की ते प्रेमाचं प्रदर्शन वाटत आपल्या लोकांना. पण कधीच व्यक्त केलं नाही तर प्रेम आहे हे समजणार कसं? त्यामुळे आज सांगतीय.. आम्ही तुमच्या जवळ नसलो तरी आमचं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. तुमच्या वेळेला धावून येण्यासाठी आम्ही आकाश पाताळ एक करू, पण तरीही काही कारणानं पोचू शकलो नाही तर प्रेम नाही म्हणून आलो नाही असा गैरसमज प्लीज करून घेऊ नका.

बाकी मस्त मजेत रहा आणि तब्येतीची काळजी घ्या. आपल्याला अजून खूप साऱ्या trips करायच्यायत, मुलांना आजी आजोबांकडून भरपूर लाड करून घ्यायचेत, खूप सारा एकत्र वेळ घालवायचाय, त्यामुळे तुम्ही fit राहण्याला पर्याय नाहीये!

So, आत्तापुरतं अच्छा बाय बाय.. पुढच्या trip पर्यंत!

तुमची, तुम्हाला अजिबात न विसरलेली,

'परदेशस्थ' मुलगी

-- ओंकार संत

अमित खोजे's picture

2 Jan 2019 - 9:34 am | अमित खोजे

नुकतेच ओंकार संत यांनी आई-बाबांना लिहिलेले पत्र वाचनात आले. खूप छान लिहिले आहे. सर्व बाजू नियंत्रितपणे हाताळल्या आहेत. त्यात लिहिलेले सर्व मुद्दे पटले परंतु तरीही कुठेतरी मनाला खटकले कि काहीतरी चुकतंय. म्हटले जरा 'देशस्थ' आई वडिलांचे काय उत्तर असेल यावरती? असा विचार करून काही मुद्दे सुचतात का ते पाहुयात आणि त्यावर उत्तर लिहायला घेतले. चर्चा कुठेतरी सुरु करायची म्ह्णून हा एक प्रयत्न. त्यांच्या मूळ लेखावरच कमेंट टाकायचा प्रयत्न केला परंतु उत्तरमर्यादा ओलांडली गेली आहे त्यामुळे नवीनच पोस्ट तयार करतोय. मूळ लेखाची लिंक इथे.

https://www.facebook.com/groups/mbmtorontogroup/permalink/10157235016009...

हे परदेशस्थ मुली,

छान वाटले तुझे पत्र वाचून अन थोडे वाईटही वाटले. सगळ्या परदेशस्थ मुलांना एकाच तराजूत तोलायचे नसते हे आम्हालाही माहित आहे आणि हे टीव्ही मालिकांमधून उगीच भावनांना हात घालून आई बापाला वाऱ्यावर सोडले असे दाखवतात ते फक्त आणि फक्त त्यांची मालिका चालावी म्हणूनच असते. त्यावर चर्चा करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.

वाईट फक्त एवढे वाटते कि ज्या कारणासाठी तुम्ही परदेशात राहायचा निर्णय घेत आहात ते कारण म्हणजे तुम्ही ठरवलेला तुमचा स्वतःचा निर्णय नसून परिस्थिती हा आहे. त्यामुळे तो संपूर्णपणे विचार करून घ्या. फक्त निर्णय घेऊच नका तर त्याची जबाबदारीही घ्या. आणि आम्ही तुला लहानपणापासून शिकवत आलो आहोंत कि एखाद्या निर्णयाची जबाबदारी घेणे म्हणजे त्या निर्णयातून उत्पन्न होणारे सर्वच भले बुरे परिणामही स्वीकारणे होय.

आपल्या जीवनपद्धतीमधले प्रश्न; फक्त मुलांचा विचार करतानाच एवढे जास्त वाढले का कि ते टाळण्यासाठी परदेशातच स्थायिक होणे हा एवढाच पर्याय त्याला असू शकतो? तुझ्याच लिहिलेल्या प्रश्नांना उत्तरे देतो. अर्थात यावर फक्त तुम्ही नवरा बायकोने शांतपणे विचार करावा एवढीच अपेक्षा आहे. उगीच आम्ही भारतात परत येण्यास भाग पाडतो आहे असेही चुकूनही समजू नका.

आपल्या शहरात गर्दी झाली गर्दी झाली म्हणता ती नक्कीच झाली आहे. प्रदूषण सुद्धा खूप वाढले आहे. परंतु याचा अर्थ आपण काही आपले घरच सोडून जात नाही. तुम्ही ज्या शहरात राहात आहेत तेथेही किती गर्दी आहे ते आम्ही स्वतः येऊन पहिले आहेच. सकाळी गाडी घेऊन तुझ्या नवऱ्याला १५-२० किलोमीटर जाण्यासाठी का बरे एक दीड तास लागतो? ट्रॅफिक जाम झाली कि हळू हळू त्यातून गाडी पुढे रेटायची. त्यातून चुकूनही पुढच्या गाडीला धक्का लागला नाही पाहिजे याचा ताण मनावर घ्यायचा. त्या गर्दीतूनच किती धूर तुमच्या शरीरात जात असतो याची तुम्हाला कल्पनाही नसेल. सकाळी अन संध्याकाळी ट्रेन अन सबवे ला असणारी गर्दी आपल्या पुण्यामुंबईपेक्षा कमी असेलही पण त्या ट्रेन अन सबवे हि काही अगदी ओस पडलेल्या नसतात.

आता मुलांच्या शिक्षणाचं. तुम्ही दोघेही उच्च शिक्षित आहात. त्यामुळेच तुमची प्रगती झाली. तुम्ही परदेशात शिक्षणासाठी गेलात. तेथे तुम्हाला चांगली नोकरी मिळाली. दोघेही नोकरीवर जाता. पण मुलांचे काय? तुम्ही उच्चशिक्षित असून त्या शिक्षणाचा तुमच्या मुलासाठी तुम्ही थोडातरी उपयोग करता आहात का? मुलांना विविध विषय समजावून द्यायचे. त्यासाठी मुलांची मानसिकता कशी असते याचा थोडा अभ्यास करायचा. आजकाल तर सर्व ज्ञान ऑनलाईन उपलब्ध असते असे तू मागे मला सांगितले होतेस ना? मग त्यात मुलांना कसे शिकवायचे, विविध विषयांची ओळख कशी करून द्यायची हे सुद्धा असेलच कि. संध्याकाळी आले कि मुलांना देवासमोर शुभंकरोती म्हणायला लावायचे. त्यांचं अभ्यास घ्यायचा. मुलांना सरळ शाळेत किंवा पाळणाघरात टाकून दिले म्हणजे संपली आमची जबाबदारी एवढाच मुलांचे संगोपन या शब्दचा अर्थ उरला आहे या नविन पिढीसाठी असा काहीसा विचार मनात आल्यावाचून राहवत नाही.

जेव्हा ६ महिन्याच्या त्या बाळाला सकाळी ६ वाजता उठवून तुम्ही त्याला गाडीत घालून डे केअर मध्ये सोडता, तेव्हा जीव तुटतो गं. अगं पहिल्या ७ वर्षापर्यंत त्या मुलाला सर्वात जास्त गरज असते ती आईची - कुटुंबाची. सर्वात जास्त मेंदूची वाढ त्यांची वयाच्या सातव्या वर्षापर्यंत होत असते. त्याच वयात त्याला दुसऱ्यांच्या हाती सोपवून तुम्ही मोकळे होतात. अशाने त्याच्यावरती काय संस्कार घडणार आहेत? शाळेत जाण्याऱ्या मुलांचीही काही वेगळी परिस्थिती नाही. शाळेतून थेट डे केअर मध्ये अन तेथून घरी. तुम्हा दोघांना घरी येण्यास ७ वाजतात. तेथून पुढे त्या बाळात काय ताकद राहणार खेळायची अन काही शिकायची? संध्याकाळची शुभंकरोती तर तुम्हीच म्हणणे सोडून दिले. त्या मुलांनी देवासमोर हात जरी जोडले तरी पुष्कळ आहे असे म्हणावे लागेल आता. किती आरत्या तुलातरी आता आठवतात सांग पाहू? गणपती बसल्यानंतर आपण ११ आरत्या अगदी तालासुरात टाळ आणि टाळ्या वाजवत स्वतः म्हणायचो. आता तुम्ही तर युट्युबवर लावून नुसत्या टाळ्याच वाजवता. त्या मुलाला आपण आरती म्हणायची असते हेच कळत नाही. त्याच्यासाठी गणपतीची युट्युबवर लावलेली आरती आणि जस्टीन बिबरची बेबी यात काही फरकच नाही. आरती चालू असतानाही त्याच्या आय-पॅड वर तो गेमच खेळत असतो.

मुलांच्या शाळेत फक्त खेळणेच शिकवतात; अभ्यास काही घेत नाहीत असे तूच मला सांगत होतीस ना? मग त्यांना चांगले गणित येण्यासाठी कुमाऊँ किंवा तत्सम काहीतरी क्लास लावायचे. तरीही त्या मुलांचे पाढे काही पाठ होतच नाही अन शेवटी १५ + ५ करायला तुमचा कॅलक्यूलेटरच वापरावा लागतो. ज्या स्पर्धेतून तुम्ही बाहेर पडायचा प्रयत्न करताय त्याच स्पर्धेत तुम्ही मुलांना नकळत ढकलताय याचीतरी जाणीव तुम्हाला आहे का? आणि निकोप स्पर्धा कधी वाईट नसतेच. या स्पर्धेमुळे कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळेच तुम्ही एवढे कष्टाळू - अभ्यासू झालात, छान तयार झालात आणि त्यामुळेच तुम्हाला आज असलेली नोकरी त्या देशाच्या नागरिकांना न मिळता तुम्हाला मिळाली आहे हे मी सांगायची गरज नाही. तुमच्या मुलालाही त्याच संस्कृतीत वाढवून तसेच साधारण बनवायचे आहे का? एवढे असूनही तुम्हाला नसेल पाठवायचे मुलांना स्पर्धेत तर तो सर्वस्वी आपला प्रश्न आहे. आपल्या मुलांना तशी सारासार विचार करण्याची शिकवण देणे हे आपले कर्तव्य आहे. स्पर्धेपासून पाठ दाखवून पळून जाणे हे काही त्याचे उत्तर नाही. मुलांना तुम्हाला एक जबाबदार नागरिक बनवायचे आहे. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देणे हे तुमचे कर्तव्य आहे. त्या कर्तव्यात तुम्ही मागे पडलात तर मुले तुम्हाला कधीच क्षमा करू शकणार नाहीत.

मुलांचे शिक्षण तिथे झाले तर मग त्यांचे तेथील मित्र, त्यांना लागणाऱ्या तेथील सवयी, शिवाय नव्यानेच तुमच्या देशात लागू झालेला ड्रुग्ससंबंधी कायदा याने तुम्हाला वाटणारी भीती या सर्वांचीही तयारी ठेवायलाच हवी. लहानपणापासून त्या देशात वाढल्याने, तेथील संस्कृती पाहिल्याने ती त्यांना जवळची वाटते. त्यांच्या मित्रांप्रमाणे ते वागू इच्छितात. दुसरीकडे तुम्ही त्यांच्यावर लादत असलेली - सो कॉल्ड - "भारतीय संस्कृती" - जी त्यांनी कधी पाहिलेलीही नसते - त्यांना जवळची वाटतच नाही. त्यांच्या स्वतःमध्येच मग असा - आयडेंटिटी क्रायसिस - तयार करून तुम्ही त्यांना सोडून देता. मग स्वाभाविकपणे ते त्यांना नको असलेल्या गोष्टीचा म्हणजेच भारतीय संस्कृतीचा त्याग करणार. पुढे मोठे झाल्यानंतर त्यांनी केलेली आंतरधर्मीय लग्ने आणि पुढे त्यांना होणारी मुले - म्हणजेच तुमची नातवंडे - हि देखील परदेशीयच त्याचीही तयारी ठेवा.

आम्ही तुम्हाला दिलेला ठेवा त्यांना द्यायचा प्रयत्न करताय पण तो ठेवा त्यांना देण्यासाठी तुम्हीतरी किती जपून ठेवलाय याची शंकाच आहे. मुलांना आज्जी आजोबांचे प्रेम नाही. त्यांना काका, आत्या, मामा, मावशी, चुलत भाऊ, मामे-मावस भाऊ यांची सवयच नाही. नातेवाईक आपल्या घरी येतात, त्यांच्याबरोबर आपण दसरा दिवाळी साजरी करतो हे कधी त्यांनी पहिलेच नाही. फक्त दिवाळीला आई देवासमोर पणती लावते एवढेच त्यांना दिसते. पहाटे अंधारात उठून, छान ऊन पाण्याने उटणे लावून अंघोळ करणे, सुंदर नवीन कपडे घालून बाहेर फटाके फोडायला बाहेर पळणे, थोडे उजाडल्यावरती दमून भागून घरात येऊन लगेच दिवाळीचा फराळ सर्वांसोबत करायला बसणे याचा अनुभव त्यांनी कधी घेतलाच नाही. तुम्ही स्वतः दिवाळीला पहाटे उठता का? आजकाल तर दिवाळीचा फराळ देखील बाहेरून मागवण्याची स्टाईल सुरु झाली आहे. येथे दिवाळीच्या सुट्टीत सरळपणे बाहेर फिरायला निघून जातात. आपली संस्कृती म्हणजे तरी काय? फक्त मंदिरात जाऊन तेथील प्रसाद खाऊन येणे नाही तर या सणांच्या निमित्ताने, आपल्या माणसांबरोबर - कुटुंबाबरोबर सुट्टी घालवणे म्हणजे आपली संस्कृती. आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक सजीव निर्जीवाला देवासमान पुजून त्याचा आदर करणे हि आपली संस्कृती. दारात आलेल्या कोणत्याही माणसाला घरात बोलावून त्याला सर्वप्रथम पाणी देणे हि आपली संस्कृती. सर्व कामाचा - मग ते नवीन घर असो वा घरात येणारी नवीन गाडी-लॅपटॉप वा फ्रीज यांचा शुभारंभ गणेशपूजनाने करणे हि आपली संस्कृती. .

तुम्हाला आणि तुमच्या सारख्या इतर मुलांना एवढे नक्कीच सांगू इच्छितो. तुमच्या आई वडिलांना मागे सोडल्याचे तुम्हाला दुःख वाटत असेल तर तसे दुःख घेऊन कधीच जगू नका. प्रत्येक दुःखावर उपाय असतो व ते दुःख दूर करण्याची क्षमताही प्रत्येकाकडे असते. वपु म्हणतात तसे. आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर फक्त तीन गोष्टींमध्ये दडलेले आहे. १) माणूस २) पैसा आणि ३) वेळ. या पलीकडे कोणताही प्रश्न असूच शकत नाही. तो उपाय फक्त अवलंबायचा किंवा नाही याचा निर्णय घेणे आपल्या हातात असते. काहीजण इतर लोक काय म्हणतील या भीतीपायी उपरोक्त निर्णय घेतात किंवा काही जण तो निर्णय घेणे टाळतात आणि असलेले दुःख उराशी कवटाळून जगतात.

तुमचे आमच्या वरील प्रेमही आहेच गं आणि आम्ही तुम्हाला काही अडवून ठेवत नाही आहोत. परंतु 'out of sight-out of mind' हि म्हण सगळीकडे लागू होते हे सुद्धा लक्षात असू देत. तुम्ही इथे नसल्याने तुझी बहीण भावंडं, तुझ्या नवऱ्याची बहीण भावंडं, त्यांची मुले, तुझी मावशी-आत्या-काकू, त्यांना तुमच्या बद्दल वाटणारे प्रेम, सर्व काही कमी होत जाते हे हि सत्यच आहे. परवाच तुझी बेबीआत्या विचारात होती, कशी आहे मनू म्हणून; कधी तिलाही फोन करत जा. सर्वच जण काही आमच्या सारखे तुमच्याकडे वर्षातून एकदा येऊ शकणार नाहीत किंवा कदाचित कधीच येऊ शकणार नाहीत. मुले व्हायच्या अगोदरही तुम्ही वर्षातून एकदा घरी यायचे. आता मुले झाल्यानंतर त्यांची शाळा, विमानाची वाढलेली ४-४ तिकिटे यामुळे २-३ वर्षातून एकदा येणे होते. पुढे पुढे तो कालखंडही लांबतंच जाईन.

"इथल्या लोकांशी तशी मैत्री, तसे संबंध निर्माण होऊच शकत नाहीत. ही आमची हक्काची जागा नाही आणि कधी होणारही नाही!" असे म्हणता आणि तरीही तेथे राहण्याचा निर्णय घेता हे पाहून जरा वाईट वाटले. विशेषतः तुम्हाला तुमच्या घराची सर्व दारे उघडी असताना असे लाजिरवाणे जिणे तुम्ही का कवटाळताय हेच समजत नाही. आज येथेही तेवढ्याच संधी उपलब्ध आहेत. पगार सुद्धा सर्वांना खाऊन पिऊन वर पुष्कळ उरेल एवढे आहेत. त्यामुळे ते काही तेथे राहण्याचे कारण होऊ शकत नाही.

आमचे म्हणणे एवढेच आहे कि तुमच्या आयुष्याची दिशा हि बाहेरील परिस्थितीवर सोपवू नका. बाहेर घडणाऱ्या गोष्टींनुसार आयुष्यातील पुढील निर्णय घेण्यापेक्षा तुमच्या निर्णयाने आयुष्यातील गोष्टी घडवून आणा.

तुमच्या आयुष्याचा सुकाणू बाहेरील परिस्थितीवर सोपवून आयुष्य जगलात तर आयुष्याचा उत्तरार्ध कधी येईल हे तुम्हाला कळणारही नाही आणि मग त्या वेळेस तुम्हाला तुमचा 'पिंपळ' हरवल्याची जाणीव नको होउदे अशी देवाचरणी प्रार्थना करतो.

तुमचेच आणि सदैव तुमच्या पाठीशी असणारे

'देशस्थ' आईवडील

-- अमित खोजे

यशोधरा's picture

1 Jan 2019 - 12:48 pm | यशोधरा

सामंतकाका, बरेच दिवसांनी दिसल्यात मिपावर तुम्ही! बरे आसात मां?

मुक्त विहारि's picture

1 Jan 2019 - 12:54 pm | मुक्त विहारि

पत्र आवडले...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jan 2019 - 5:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जवळ जवळ एक तप सारखं लिहिताय. नक्कीच प्रशंसनीय.
लिहित राहा. शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jan 2019 - 10:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

अभिनंदन !

श्रीरंग_जोशी's picture

2 Jan 2019 - 8:19 am | श्रीरंग_जोशी

हृद्य लेखन.
हजारव्या ऑनलाइन प्रकाशनासाठी मनःपूर्वक अभिनंदन.
ही खूप मोठी कामगिरी आहे.

यापुढील लेखनप्रवासाठी शुभेच्छा!!

सुबोध खरे's picture

2 Jan 2019 - 10:15 am | सुबोध खरे

आज तिन्ही पत्रं वाचली. तिन्ही पत्रं आपल्या जागी बरोबरच आहेत. परंतु प्रत्येक पत्रात एका बाजुचा सूर दिसतो आणि सत्य या तिन्हीच्या मध्ये कुठेतरी आहे.
केवळ भारतात राहिल्यामुळे सगळे सणवार घरात होणारी घरं किती राहिली आहेत? आणि संध्याकाळी शुभंकरोती म्हणणारी घरं तरी किती आहेत? भारतात राहून संस्कृतीचा गळा काढणाऱ्या बऱ्याच लोकांना नववर्षी दारू पिऊन धुंद झालेलं पाहिले कि संस्कृतीबद्दल काढलेला गळा किती दांभिक होता हे जाणवते.
नातेवाईक काही सगळेच चांगले नसतात. सर्व तर्हेचे स्वार्थी नातेवाईक इथे राहूनही पाहतो आहे?
मी स्वतः लष्करात असल्यामुळे आपल्या आईवडिलांपासून दूर होतो तेंव्हा एकदा येऊन जा म्हणून आठवण काढणारे नातेवाईक मी सुटीवर आलो आहे सांगितल्यावर वेळ काढूनि न मला भेटायला येणारे नातेवाईक १० % सुद्धा नाहीत. नुसती बोलाची कधी आणि बोलाचा भात.
भारतात राहून आईवडिलांची किती निगुतीने देखभाल करतात हेही पाहिलेले आहे. वृद्धाश्रमात जाऊन पहिले तर बहुसंख्य (९०%) वृद्धांची मुले परदेशस्थ नसून स्वदेशस्थच आहेत असे दिसून येते.
आईवडिलांनी रात्र रात्र उशाशी जागून काढणे हा प्रकारच मला दांभिक वाटतो. हा प्रकार म्हणजे विशष काळजी विभागाच्या बाहेर असणारी नातेवाईकांची गर्दी( जिच्यातील दोन तीन सख्खे सोडून बाकी सर्व हजेरी लावण्यासाठी आलेले असतात.
मुलांना / आईवडिलांना आजारी असताना उत्तम वैद्यकीय सेवा आणी शुश्रुषा देणे हे मुलांचे किंवा पालकांचे कर्तव्यच आहे. त्याचा बाऊ करणे( दूध का कर्ज) हा प्रकार चूक आहे. मी माझ्या मुला/मुलींसाठी रात्र रात्र जागवली म्हणून त्याचे व्याज वसुल करणार असें तर मी एखाद्या बनिया पेक्षा वेगळा नाही.
आई वडिलांना/ मुलांना प्रेम देणे हे तुमच्या हातात आहे. त्याची परतफेड झाली पाहिजे हि अपेक्षा चूक आहे. तुमचे प्रेम जर मुलांच्या पायातील बेडी ठरणार असेल तर ते प्रेम स्वार्थी आहे इतकेच मी म्हणेन.
केवळ एखादा मुलगा परदेशी गेला म्हणजे तो स्वार्थ झाला आणि मी लष्करात( भारतातच ) होतो आणि जर आईवडिलांच्या आजारासाठी येऊ शकलो नाही तरी मी करतो ते देश भक्तीचे आहे हे म्हणणे मला पटत नाही. कारण कित्येक वेळेस अशी स्थिती होती कि अमेरिकेतून घरी परत येणे भारतातील दुर्गम ठिकाणहून परत येण्यापेक्षा जास्त सोपे आहे. बाकी फ्लॅट मध्ये शेजारच्या खोलीत झोपलेल्या मुलाला वडिलांची हाक ऐकू आली नाही म्हणून ते गेले हि स्थिती चाळीत असते तर झाली नसती अशी भंपक पोस्ट व्हाट्सअँप वर फिरत आहे.( चाळीत राहणाऱ्या मुलाला वैद्यकीय इलाज न परवडण्यामुळे मृत्युमुखी पडलेले अनेक आई बाप मी पाहिलेले आहेत)
हे गरिबीचे उदात्तीकरण आपण थांबवले पाहिजे.
मुलांना जिथे जायचे आहे तिथे जाऊ द्या त्यांच्या पायातली बेडी म्हणून राहू नका. तुमच्या शेवटच्या वेळेस मुलगा/ मुलगी असलिच पाहिजे हि अपेक्षा हा स्वार्थ आहे. माझ्या आजोबांच्या देहावसनाचे वेळेस मी विमानवाहू नौकेवर होतो आणि मला त्याबद्दलचा संदेश त्यांचा तेरावा झाल्याचा दिवशी मिळाला. हि स्थिती भारतात अत्यंत महत्त्वाचे काम करत असलेल्या मुलाच्या बाबतीत पण होऊ शकते हि गोष्ट लक्षात ठेवा.
आपण लोक दांभिक आणि मत्सरी आहोत. चाळीचे गोडवे गाणे आणि फ्लॅटला शिव्या देणे किंवा परदेशस्थ भारतीय मुलांना दूषणे देणे आणि भारतात राहणारी मुले कशी आईबापांची सेवा करणारे श्रावण बाळच आहेत हअसे गोडवे गाणे हे एकाच मत्सरी मनोवृत्तीचे लक्षण आहे.
दुसरा श्रीमंत झाला कि त्याचा हेवा करणे हा आपला स्थायीभाव झाला आहे.
आपल्या मुलांच्या प्रगतीचा आनंद मानण्यपेक्षा तो मोठा झाला म्हणून आमच्यासाठी वेळ देता येत नाही म्हणून रडणाऱ्या आईबापांची मला कीव येते.
या दांभिकतेतून बाहेर येणे आवश्यक आहे.

पलाश's picture

2 Jan 2019 - 11:15 am | पलाश

प्रतिसाद आवडला.

अशी मानसिकता भारतीय पालकांची होणे व त्यांना वास्तवाचे भान येणे खूपच आवश्यक आहे.प्रतिसादातला शब्दन शब्द पटला. असा विचार करणारे पालक झाले तर बरेचसे सामाजिक प्रश्न सुटण्यास मदत होईल. कारण जे काही तरुण आणि ज्येष्ठ मंडळी यांच्यातला संघर्ष आहे त्याचे मूळ कुठेतरी याच विचारसरणीत आहे.

NiluMP's picture

2 Jan 2019 - 9:29 pm | NiluMP

+१००

एकविरा's picture

3 Jan 2019 - 3:09 pm | एकविरा

सहमत आहे

डाम्बिस बोका's picture

4 Dec 2021 - 1:19 am | डाम्बिस बोका

आकाशी झेप घे रे पाखरा तोंडी सोन्याचा पिंजरा हे गाणे म्हणून मला खूप आवडते. आपल्या प्रेमाची बेडी करण्यापेक्षा आपल्या पाखराला उंच झेप घेऊ द्या
बाकी बरेच कुटुंब प्रेमाचे मुद्धे निव्वळ दांभिकपणाआणी मस्तरातून येतो हा तर जबरदस्त

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jan 2019 - 9:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! लेखनप्रपंचातील सुंदर मैलाचा दगड ! असेच लिहित राहण्यासाठी अनेक शुभेच्छा !

पद्मावति's picture

3 Jan 2019 - 3:12 pm | पद्मावति

अभिनंदन श्रीकृष्ण जी. पुढील लिखाणासाठी अनेक शुभेच्छा आपल्याला.

जुइ's picture

6 Jan 2019 - 4:55 am | जुइ

एक हजाराव्या पोस्ट निमित्त अभिनंदन! असेच लिहीत राहा.

चित्रगुप्त's picture

4 Dec 2021 - 12:18 am | चित्रगुप्त

या धाग्यातली सगळी पत्रे वाचनीय वाटली, शिवाय डॉ. खरे यांचा परखड प्रतिसादही मननीय वाटला.

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2021 - 9:31 pm | चौथा कोनाडा

खुप छान लिहिलाय १००० व्वा भाग !

आपले आईबाबा आपल्या जवळ असण्याची जाणीव आईबाबांची उणीव वाटण्यापूर्वीच व्हायला हवी.ही एकच ओळ मला आनंदाने जगायला स्फुर्ती देत,आनंद देते.

अगदी +१