शवविच्छेदन...... भाग - २

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
22 Dec 2018 - 9:04 pm

शवविच्छेदन...... भाग - १

......तरुणपणी डिसुझा विजापूरच्या मेडिकल कॉलेजमधे शिकत होता. ते कॉलेज आता मी जे प्रकरण सांगणार आहे त्या प्रकरणामुळेच बंद पडले. असो. कुठलीही गोष्ट पटकन शिकणे हे डिसुझाच्या रक्तातच होते. त्याच्याकडे अजून एक दैवी देणगी होती ती म्हणजे एकदा कुठली गोष्ट ऐकली की ती त्याच्य सदैव लक्षात राहायची आणि तो या देणग्यांचा यथोचित उपयोग करत असे. त्याला घरी काम करावे लागतच नसे पण कॉलेजमधे तो त्याच्या शिक्षकांची भाषणे अगदी लक्षपूर्वक ऐकायचा आणि विद्वत्तापूर्ण शंका विचारायचा. त्याची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती पाहून त्याच्या मास्तरांचे त्याच्याकडे लक्ष गेले. पण त्याच्याकडे लक्ष गेले त्याला फ्क्त हुशारीच हेच कारण नव्हते तर तो दिसण्यासही रुबाबदार आणि विद्वान होता हेही कारण होते. मास्तर त्याच्या बाह्यरुपाकडे पाहून त्याच्याकडे आकर्षित झाले हे ऐकून मला आश्चर्य वाटले पण तसे झाले होते खरं. त्या काळात त्या कॉलेजमधे शरीरचनाशास्त्र शिकविण्यास एक शिक्षक बाहेरून यायचे. तो काळ म्हणजे कॉलेजमधे शव विच्छेदन करण्यास धर्ममार्तंडांचा सक्त विरोध असायचा. कित्येक कॉलेजमधे ती सोयच नव्हती. अख्ख्या भारतात फक्त विजापूर आणि मद्रास येथे मला वाटते ती सोय होती आणि शरीरशास्त्र व शवविच्छेदन शिकण्यास देशभरातून येथे विद्यार्थी येत. या शिक्षकाचे नाव मी सांगणार नाही कारण ही व्यक्ती नंतर खूपच प्रसिद्ध झाली व त्याला ‘‘सर’’ हा किताबही मिळाला. पण आपण त्याला ‘‘प्रो.’’ हे नाव ठेवू. तुम्हाला त्या काळात रहीम नावाच्या ठगावर चालवला गेलेला खटला आठवत असेल. जेव्हा त्याला फासावर चढवा ही मागणी लोक करत होती तेव्हा प्रो. तोंड लपवत मुंबईच्या रस्त्यावर फिरत असे. तो काळ असा होता. पण नंतर काही दिवसातच प्रो.ची लोकप्रियता प्रचंड वाढली. त्याला मुख्य कारण होते त्याची विद्वत्ता आणि तो ज्या श्रीमंत वस्तीत राहात असे ती वस्ती आणि शिवाय कॉलेजमधील जे प्रोफेसर होते त्यांचे ज्ञान यांच्या ज्ञानापुढे फारच तोकडे होते. त्यामुळे हे विद्यार्थ्यांचेही लाडके झाले. त्यांच्यामुळेच आम्ही मोठे झालो असे विद्यार्थी शपथेवर सांगत... बाकीच्यांचे जाऊ देत पण डिसुझा तर तसंच मानायचा आणि त्याने जे काही कॉलेजमधे यश मिळवले होते ते या माणसाचा तो लाडका विद्यार्थी झाल्यावरच असं इतरजण उघडपणे बोलून दाखवायचे. अर्थात डिसुझा त्यांना प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पडला नाही कारण त्याला ते मान्यच होते. हा प्रो. ऐषारामी होता. त्यांची राहाणे अत्यंत उच्च होती आणि त्याचा विषय शिकविण्यात त्या काळात देशात त्यांचा हात धरणारा दुसरा कोणी असेल की नाही याची शंकाच आहे. वर्गात येताना ते पूर्ण तयारीनिशी येत आणि त्यात त्यांना अजिबात हयगय चालत नसे. ते स्वतः तयारी करून येत आणि ते इतर सहाय्यकांकडूनही तीच अपेक्षा करत. डिसुझासारख्या हुशार, तीव्र स्मरणशक्ती असलेल्या विद्यार्थ्याकडे त्यांचे लक्ष गेले नसते तर नवलच. दुसऱ्याच वर्षी डिसुझाला त्यांनी आपल्या पंखाखाली घेतले आणि त्याला सहाय्यकाची नोकरीही दिली. डिसुझालाही पैसे पाहिजे होतेच आणि त्याचे महत्वही यामुळे वाढले. तोही यावर खूष होता. ते या मेडिकल कॉलेजचे खरे मालक तेच होते अशीही अफवा होती... खरे खोटे देव जाणे.

या त्याच्या अर्धवेळ नोकरीत त्याच्यावर शल्यविभागाची व जेथे तास भरत त्या वर्गाची जबाबदारी होती. या विभागांच्या स्वच्छतेसाठी त्याला जबाबदार धरले जाई. एवढेच काय या विभागात इतर विद्यार्थ्यांच्या शिस्तशीर वागण्यासाठीही त्यालाच जबाबदार धरले जाई. एखाद्या वर्गाचा मॉनिटर असावा तसं.. या विभागाला लागणाऱ्या वस्तूंचा व शवांचा पुरवठा व वाटप सुरळीत ठेवणे हा त्याच्या नोकरीचाच एक भाग होता. आता या कामासाठी त्याला तेथे केंव्हाही हजर राहावे लागत असल्यामुळे प्रो.’ने डिसुझाच्या राहण्याची सोय कॉलेजमधेच केली होती. ही खोली शवविच्छेदनगृहाच्या मजल्यावर पण अगदी शेवटी होती.

दररोज संध्याकाळी मद्यपानानंतर, भेलाकांडत तो त्याच्या पलंगावर थकून भागून अंग टाकत असे, त्याच्या डोळ्यावरची धुंदी अजून उतरलेली नसायची नेमके त्याच रात्री त्याच्या खोलीचे दार ठोठावले जायचे आणि आलेले लोक त्याला सामान ताब्यात घेण्यासाठी खाली घेऊन जात. ही दरोडेखोरांसारखी दिसणारी माणसे शव घेऊन आलेली असत. डिसुझा या भयंकर लोकांसाठी दरवाजा उघडत असे. त्यांना ते शव जागेवर ठेवण्यासाठी मदत करत असे. ठरलेले पैसे देत असे. पैसे घेऊन ते निघून गेल्यावर मग तो त्या शवाच्या संगतीत एकटाच उरत असे. या अशा भयंकर रात्री मग तो एकदोन तास झोप काढण्यासाठी पहाटे त्याच्या खोलीत परत येई. रात्रीच्या त्या अनुभवानंतर दोन तीन तास झोप मिळाली त्याला बरं वाटे आणि मग मनाने ताजातवान होऊन तो दिवसभरातील दगदगींना तोंड देण्यास सज्ज होई.

फार कमी विद्यार्थ्यांना मुडद्यांच्या संगतीत राहून जिवंत माणसांवर काय परिणाम होतो याची कल्पना असेल... थोड्याच काळात डिसुझाचा इतर सर्व विद्यार्थ्यांमधील रस कमी होत गेला. त्यांचे काय होते आहे, कोण कुठे गेले आहे, कोणाला किती मार्क पडले अशा शुल्लक गोष्ठींची तो पर्वा करेना. तो आता स्वत:च्या इच्छा आकांक्षांचा गुलाम झाला. त्याशिवाय त्याला दुसरे काही सुचेना. त्याला कोणाबद्दलही प्रेम वाटेना, त्याचा स्वभाव प्रतिसादशुन्य झाला आणि स्वार्थीही झाला असं म्हणायला हवं. त्याचा सारासार विचार नष्ट झाला आणि मग जे होते ते झालेच. त्याला दारुचे व्यसन लागले. (जे आम्ही भेटायचो तेव्हाही होतेच). हाच सारासार विचार माणसाला दारु आणि चोरीपासून दूर ठेवतो असं म्हणतात. हे सगळे खरे असले तरी माणसाला दुसऱ्यांकडून होणारे कौतुक हवेहवेसे वाटतेच. विशेषतः मित्रांकडून व शिक्षकांकडून ! मग ते मिळविण्यासाठी त्याने त्याच्या अभ्यासात कठोर परिश्रमाचा मार्ग स्विकारला. अर्थात त्यात चूक काहीच नव्हते म्हणा ! मित्र मंडळी नसल्यामुळे मौजमजा संपली. त्या परिश्रमातच तो आनंद शोधू लागला. अभ्यास आणि प्रों.ना खुष ठेवणे हेच त्याचे इतिकर्तव्य झाले. दिवसभरातील कष्टांनंतर तो रात्री अभ्यास करून स्वतःची करमणूक करुन घेत असे, आयुष्याची मजा लुटत असे. ते एकदा झाले की त्याचा जो मन नावाचा अवयव होता त्याला समाधान प्राप्त होई.

प्रेतांचा पुरवठा म्हणजे त्याच्या व त्याच्या मास्तरांच्या दृष्टीने एक कटकटच होती. एक तर विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती आणि विच्छेदनासाठी प्रेते नेहमीच अपूरी पडत. या प्रेतांच्या पुरवठ्यात काही अनैतिक प्रवृत्तींचा शिरकाव झाला नसल्यासच नवल. पण प्रों.चे याबाबतीत धोरण अत्यंत स्पष्ट होते - " ते प्रेत आणतात आणि आपण त्याचे पैसे देतो, इतका साधा व्यवहार आहे.’’ एवढेच नाही तर ते त्यांच्या सहाय्यकांच्या अंगावर ओरडत, ‘‘ प्रश्र्न विचारू नका... कृपा करा आणि त्यांना आणि मला प्रश्र्न विचारु नका !’’ अर्थात या मुडद्यांचा पुरवठा कोणाचे मुडदे पाडून होत असावा असा कुठला पुरावाही नव्हता. त्यांना जर असं कोणी सांगितले असते तर त्यांच्या अंगावर काटाच आला असता हे निश्चित. पण ते हे सगळे इतके सहजपणे स्विकारत व सहजपणे त्या विषयावर बोलत की प्रेतांचा पुरवठा करणाऱ्यांनाही ते जे काही करत आहेत त्याचे काही विशेष वाटत नसे. उदा. डिसुझाही कधी कधी ही प्रेते एवढी ताजी कशी अशी शंका प्रदर्शित करत असे. पहाटे पहाटे त्याला उठवून त्याच्या ताब्यात प्रेते देणाऱ्यां ठगांचे चेहरे एवढे निर्विकार कसे याचे त्याला फार आश्चर्य वाटे. जेव्हा तो यावर विचार करे तेव्हा मनातल्या मनात त्याला शेवटी असे वाटू लागले होते की तो नैतिकतेचे फारच स्तोम माजवतोय. नाहीतर त्याच्या मास्तरांना काही वाटले नसते का ?’’ त्याला त्याची जबाबदारी चांगली माहीत होती. त्याने जे धोरण स्विकारले होते ते असे -
१ जे येते आहे ते ताब्यात घेणे
२ त्याची किंमत चुकती करणे आणि
३ या मागे कुठल्याही गुन्ह्याची शंका आल्यास तो नजरेआड करणे.

नोव्हेंबरच्या एका पहाटे त्याच्या या धोरणाला सुरुंग लागला. त्या रात्री तो दातदुःखीने हैराण झाला होता. रात्रभर त्याचा डोळाच लागला नव्हता. एखादे हिंस्र श्र्वापद येरझारा घालते तसा तो खोलीत येरझारा घालत होता, मधेच पलंगावर धाडकन अंग टाकत होता.. शेवटी पहाटे पहाटे डोळा लागतो ना लागतो तेवढ्यात त्याच्या कानावर दरवाजावरची घंटी वाजल्याचा आवाज झाला. दोन चार वेळा वाजल्यावरही उत्तर मिळत नाही हे पाहून कोणीतरी तो दरवाजा रागाने खटखटावला. त्याने मात्र डिसुझाला जाग आली. त्याने डोळे किलकिले करुन बाहेर नजर टाकली. खिडकीतून चंद्रप्रकाशाची तिरिप आत पडली होती आणि थंड बोचरी हवा वाहात होती. गावाला जाग येण्याआधी ज्या अस्पष्ट हालचाली चालू असतात त्या मात्र जाणवत होत्या. आज ते नेहमीपेक्षा जरा उशीराच आले होते आणि का कोणास ठावूक आज त्यांची जाण्याची फारच घाई चालली होती. पेंगुळलेल्या डोळ्यांनी डिसुझा त्यांना वर घेऊन गेला. त्यांची उर्दू मिश्रित भाषेत चालणारी कुजबुज स्वप्नात ऐकू येते की काय असे त्याला वाटत होते. त्यातील एकाने खांद्यावरील मुडदा खाली उतरवला तेव्हा डिसुझा भिंतीचा आधार घेत डोळे उघडण्याचा निकराने प्रयत्न करत होता. त्याने जागे होण्यासाठी अंग झटकले, मानेला हिसका दिला आणि त्यांच्या पैशाची सोय करण्यासाठी कपाट उघडले. त्याच्या चेहऱ्यावरील कंटाळा स्पष्ट दिसत होता. त्याने त्या पोत्याकडे दोन पावले टाकली आणि त्याची नजर त्या मुडद्याच्या चेहऱ्यावर पडली मात्र...

‘‘ अरे बापरे ! ही तर कुलसूम शेख ....! तो किंचाळला.

त्या माणसांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही ना कोणी यावर उत्तर दिले पण ते सगळे दरवाजात गोळा झाले.

‘‘मला ही माहीत आहे.... ही कालपर्यंत जिवंत होती. तिच्या मृत्यूची शक्यता शून्य आहे... हे प्रेत तुम्ही सरळ मार्गाने....’’

‘‘ मला वाटतंय तुमची काहीतरी चूक होतीय...’’ त्यातील कोणीतरी एक उद्धटपणे म्हणाला.

पण बाकिच्यांनी डिसुझाच्या डोळ्यात पाहिले आणि लगेचच पैशाची मागणी केली. हे सगळे भयानक होते. त्याची काही चूक होण्याची शक्यताच नव्हती. या सगळ्यातील धोक्याने त्याची घाबरगुंडी उडाली. थरथरत्या हाताने त्याने कसेबसे पैसे मोजले, माफ करा... माफ करा अशा अर्थाचे काहीतरी पुटपुटत त्यांना दिले व त्या भयंकर लोकांना निरोप दिला. ते गेल्या गेल्या त्याने घाईघाईने त्या प्रेताचे निरिक्षण केले. काल जिच्याबरोबर त्याने खिदळत काही क्षण घालवले होते ती तीच होती. त्याने मान हलवली. त्याला काय करावे ते सुचेना. त्याने त्या प्रेताचे परत निरिक्षण केले आणि तिच्या शरिरावरील जखमा पाहून त्याची खात्रीच पटली की... तो घाबरला, त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि धावत धावत त्याने आपली खोली गाठली. त्याचे शरीर अजून थरथर कापत होते... जरा शांत झाल्यावर त्याची बुद्धी काम करु लागली. प्रो.च्या सुचना आणि या बाबतीतले धोरण यात त्याचाच बळी जाणार हे त्याला स्पष्ट झाले. प्रकरण अत्यंत धोकादायक व गंभीर होते. त्याने बसलेल्या धक्क्यातून सावरताच त्याच्या एका सहाध्यायी पण वरीष्ठ विध्यार्थ्याचा सल्ला घेण्याचा विचार केला. तो दुसरे तरी काय करु शकत होता म्हणा.. हाही त्याच्यासारखाच प्रो.कडे अर्धवेळ नोकरी करत असे..

या तरुण डॉक्टरचे नाव होते दिपक मानकामे. अत्यंत हुशार, सर्व उनाड विद्यार्थ्यांमधे लोकप्रिय आणि छंदीफंदी! सद्सदविवेक बुद्धी त्याने खुंटीला टांगून ठेवली होती. एखादी गोष्ट पाहिजे असल्यास कुठल्याही थराला जाण्याची त्याची तयारे असे आणि हे त्याने वर्गात अनेक वेळा दाखवून दिले होते. तो परदेशात शिकला होता आणि बरेच देशही फिरला होता. बहुधा घरचा तो गडगंज श्रीमंत असावा. इतर विद्यार्थ्यांच्या मानाने त्याचे वागणे फारच आधुनिक होते. तो नाटकात उत्कृष्ठ काम करायचा, चांगले टेनिस खेळायचा... एक दोनदा त्याला लोकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांबरोबर गोल्फ खेळतानाही पाहिले होते. हे सगळे कमी होते की काय म्हणून साहेबांकडे एक फोर्डची मोटारही होती. त्याचे आणि डिसुझाचे संबंध चांगले आणि व्यावसायिकही होते. जेव्हा प्रेतांचा फारच तुटवडा पडे तेव्हा ते दोघे त्याच्या गाडीतून एखाद्या दुर्गम खेड्यात जात व एखाद्या निर्जन जागी असलेले थडगे उकरत व मिळालेले प्रेत गाडीत घालून पहाटे कॉलेजमधे परत येत. या कामात हळुहळु ते निर्ढावले व त्यांना त्यात काहीअनैतिक आहेअसे वाटेनासे झाले असावे. असो....

त्या दिवशी सकाळी मानकामे नेहमीपेक्षा शवविच्छेदन विभागात लवकर आला. डिसुझाने त्याला पायऱ्यांवरच गाठले व पहाटे काय झाले ते त्याच्या कानावर घातले आणि त्याची शंका बोलून दाखवली. दोघांनी परत एकदा ते प्रेत नीट डोळ्याखालून घातले.

‘‘हं ऽऽऽ काहीतरी गडबड आहे खरे !’’

‘‘मग आता काय करु मी ? ’’डिसुझाने विचारले.

‘‘... काय करु मी ! तुला काही करायचे आहे का? मला वाटते गप्प बसणे हे सगळ्यात उत्तम.’’

‘‘पण दुसरे कोणीतरी तिला ओळखेल... तशी ती सगळ्यांना माहीत होती तर काहींच्या ओळखीची होती.’’

‘‘ कोणी ओळखणार नाही अशी आशा करुया ! तू ओळखले नाहीस ना ? मग झाले तर ! लक्षात घे ! तू तिला ओळखलेच नाहीस... डिसुझा खरं सांगायचं तर हे बरीच वर्षे चालले आहे. तू हे गाडलेले मुडदे उकरलेस तर प्रो. नसत्या लफड्यात सापडतील. तू आणि मी दोघेही त्यात अडकू. मी किंवा तू आरोपीच्या पिंजऱ्यात कसे दिसू याची कल्पना करुनच माझ्या अंगावर काटा आला बघ ! माझ्या बाबतीत बोलायचे तर माझी खात्रीच आहे की आपण जी प्रेते फाडतो, ते सगळे मुडदे खून करुनच येथे आणलेले आहेत....’’

‘‘ दिपक ऽऽऽ’’ डिसुझा किंचाळला.

‘‘ डिसुझा किंचाळू नकोस ! जसे काही तुला हे माहीतच नव्हते...’’

‘‘शंका येणे वेगळे आणि माहीत असणे वेगळे...’’ डिसुझाला घाम फुटला.

‘’ बरोबर ! शंका येणे वेगळे, माहीत असणे वेगळे आणि मी त्यात अजून एक भर घालतो - पुरावा असणेही वेगळे.’’ त्या प्रेतावर टिचक्या मारत डॉ. मानकामे म्हणाला,

‘‘ मान्य आहे ... हे येथे यायलाच नको होते पण आता आलेच आहे तर ते न ओळखणे हे उत्तम...’’ पुढे तो शांतपणे म्हणाला,

’‘ मी तरी हे प्रेत कोणाचे आहे हे ओळखत नाही.... तुला ओळखायचे असेल तर तुझा तू मोकळा आहेस. पण माझा तुला सल्ला आहे.. या प्रेताची ओळख न पटवणे हेच आपल्या फायद्याचे आहे. या व्यवहारी जगात मला वाटते हेच ठीक .. आणि मला वाटते प्रों.चीही हीच इच्छा असेल.. लक्षात घे त्यांनी सगळ्यांमधून आपली निवड का केली? त्यांचा आपल्यावर विश्र्वास आहे म्हणूनच ना.. आणि दुसरे कारण म्हणजे नैतिकतेचे अवडंबर माजविणारे बुरसट सहाय्यक बहुतेक त्यांना नकोच असतील.’’

डॉ. मानकामेंच्या बोलण्याचा रोख न समजण्याइतका डिसुझा खुळा नव्हता. विचार केल्यावर दुसरा मार्ग नाही हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने मानकामेच्या सदऱ्याचे टोक हातात धरले आणि कुलसूम शेखच्या शवाचे त्याच दिवशी विच्छेदन झाले. कोणाच्या काही लक्षात आलेले दिसले नाही ना कसली कुजबुज झाली.

एक दिवस दुपारी कामे संपल्यावर , गावात जी दोन तीन हॉटेलं होती त्यातील एकात डिसुझा, मानकामे आणि एका माणसाला भेटायला गेला. हा माणूस बुटका आणि त्याचे डोळे घारे होते. त्याच्या रंगाशी एकदम विसंगत. चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज होते व गालावर एक जखमेचा व्रण. माणूस सभ्य वाटत होता पण तो बोलू लागल्यावर त्याचे खरे स्वरुप उघडे पडत होते. हा माणूस मानकामेला अत्यंत उद्धटपणे सूचना करत होता आणि आश्चर्य म्हणजे मानकामे एखाद्या गोगलगायीप्रमाणे खाली मान घालून त्याचे बोलणे ऐकत होता. त्या माणसाला वारंवार राग येत होता आणि तो मानकामेला चांगलेच झाडत होता. या आक्रस्ताळी माणसाला डिसुझा लगेचच आवडला. त्याने त्याला मद्याचा आग्रह केला व त्याच्या प्रगतीचे कौतुक केले. एवढ्या अडचणीतून तो वर आला याचे कौतुक केले आणि अर्थात अभिनंदनही. त्याने स्वतःबद्दल जे काही सांगितले त्यातील निम्मे जरी खरे मानले तरी तो एक नंबरचा बदमाश होता हे सिद्ध होत होते आणि त्याच्यासारख्या बारा गावाचे पाणी पिलेल्या माणसाने केलेले कौतुक ऐकून डिसुझाच्या अंगावर मुठभर मांस चढले नसते तरच नवल.

‘‘ मी तर वाईट प्रवृत्तीचा आहेच त्या बद्दल शंकाच नाही पण मानकामे या नाटकातील खरा नायक आहे.... दिप्या... मी त्याला प्रेमाने दिप्या म्हणतो... काय डॉ. दिपक मानकामे...’’ मधेच त्याने डॉक्टर मानकामेला जागेवरुन उठवले व हॉटेलच्या काउंटरवर जाऊन काहीतरी काम करायला सांगितले जे मानकामेला बिलकूल आवडले नाही. पण तो चरफडत उठला....

‘‘ मला परत त्या नावाने हाका मारु नका.... मला आवडत नाही ते...’’ डॉ. मानकामे करवदला पण सांगितलेल्या कामासाठी गेला.

‘‘ या डॉक्टरला मी आवडत नाही... खरंतर तो माझा तिरस्कारच करतो... मी सांगतो आत्ता त्याच्या मनात माझ्यावर चाकूचे घाव घालण्याचे विचार घोळत असतील...’’ तो माणूस हसत हसत म्हणाला. त्याच्या हसण्याला छद्मिपणाची किनार होती. एखादे मांजर उंदराला खेळवताना कसे हसले असते तसे..

‘‘ पण आमच्याकडे या पेक्षा चांगली व वेगळी पद्धत असते... ज्याचा आम्ही तिरस्कार करतो त्याला आम्ही मारत नाही.. आम्ही त्याचे विच्छेदन करतो.’’ डिसुझा गमतीने म्हणाला. ते ऐकताच डॉ. मानकाम्यांनी चमकून वर पाहिले. हा टोमणा बहुधा त्याच्या वर्मी लागला असावा...

क्रमशः

स्वैर अनुवाद : जयंत कुलकर्णी.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

नाखु's picture

23 Dec 2018 - 3:34 pm | नाखु

वाचतो आहे

स अर्जुन's picture

24 Dec 2018 - 2:35 pm | स अर्जुन

जबरदस्त एकदम, पुढिल भाग येउद्या लवकर

सविता००१'s picture

28 Dec 2018 - 4:17 pm | सविता००१

मस्त आहे हा पण भाग

प्रचेतस's picture

29 Dec 2018 - 8:47 am | प्रचेतस

खतरनाक कथा आहे. एकदम वेगळा विषय.