आपल्या हिंदूधर्मात गरुड हे विष्णूचे वाहन मानले जाते.परंतु ह्या गरुडांचे दिव्य वसतिस्थान आपल्याला पहावयाचे असेल तर मात्र मलेशियातील लंग्कावी ह्या बेटसमूहाला आपल्याला भेट द्यावीच लागेल.
लंग्कावी म्हणजे तांबूस,राखाडी गरुड.त्याची ही भूमि.९९ बेटांनी युक्त अशी ही भूमि म्हणजे निसर्गप्रेमींसाठी नंदनवन.
ह्याठिकाणी जाण्यासाठी विमान व जल असे दोन मार्ग आहेत्.जलमार्गाने जाताना सुरेख, वेगळाच अनुभव येतो.पेनांग,कुआलाकेडा येथून जेटीने जाता येते.
चार दिवस सलग सुट्टी मिळाल्यामुळे आम्ही सकाळीच कुआलाकेडाकडे प्रयाण केले.तिथून साधारण तासाभरात कुआ टाउनमध्ये पोहोचलो. जेटीच्या प्रवेशद्वाराशीच एका भल्या मोठ्ठया गरुडपुतळ्याने आमचे स्वागत केले.
येथे फिरण्यासाठी भाड्याने गाड्या मिळतात फक्त तुमच्याकडे इंटरनॅशनल लायसन्स हवे ! येथे पेट्रोल स्वस्त(२४ रु.)त्यामुळे तेच करणे परवडते. रस्त्याने जाताना एका बाजूला समुद्र आणि दुसर्या बाजूला घनदाट जंगल असेच सगळीकडे दिसत होते.
येथील केबल कार प्रसिध्द आहे त्यामुळे आम्ही तिकडेच मोर्चा वळविला.९१९.५मी.लांबीचे अंतर पार करून जाणार्या ह्या केबल कारमधून जाताना खाली गर्द जंगल,लांबवर दिसणारा अंदमानचा समुद्र,एकाबाजूला धोधो पडणारा धबधबा,फोफावणारा वारा हे दृश्य मनात किती साठवून घेउ असे झाले होते.
मनाची अगदी 'झपुर्झा' अवस्था झाली होती.वर दोन डोंगरांना जोडणारा एक लोंबता ब्रिज आहे .
तिथे जाण्यासाठी हिम्मत लागते,मी अर्थातच त्यामुळे मागे ! त्यानंतर आम्ही 'इगल फिडींग' साठी गेलो.एका होडीत बसून 'सुंगाइ किलिम पार्क'मध्ये जायचे,तिथे असलेल्या गर्द वनराईत हजारो गरुड पक्षी राहतात.नावाडी पाण्यावर मांसाचे तुकडे टाकतो आणि शेकडो गरुड ते खाण्यासाठी पाण्यावर झेपावतात.आपल्या पायांनी तो तुकडा हवेत उडवून ते चोंचीत पकडतात. हा देखावा फारच रमणीय असतो.
उपलब्ध वेळेनुसार हा खेळ कितीही वेळा खेळावा !पलीकडे थायलंडची समुद्रीय सीमा दिसते.
सगळीकडे पाणीच पाणी,आणि हिरवाई,तन आणि मन शांत शांत होत जाते.आपणही ह्या निरव,निशब्द देखाव्याचा एक भाग बनून जातो.तिथून थोड्या अंतरावर 'बॅटस केव'आहे. इतका गुडुप अंधार होता की बॅट्रीच्या प्रकाशातच आत जाता येत होते. आंतमध्ये हजारो वटवाघुळे लटकलेली दिसत होती.अगदी भीती वाटावी इतकी. जवळच एक 'फिश फार्म 'आहे.
तिथे अनेक प्रकारचे जलजीव पाहिले.कांही हातातसुद्धा घेता येतात.एवढे पाहून होईपर्यंत संध्याकाळ झाली.त्यामुळे होटेलवर परत आलो.समोरच विशाल सागर दिसत होता तिथे किनार्यावर जाऊन बसलो.अंदमान सागराचे वैशिष्ट्य असे की इथले पाणी हिरवे दिसते.
समोर क्षितिजावर अस्ताला जाणारा सूर्य,पसरत जाणारा अंधार,माणसांची तुरळक येजा,पाण्यात खेळणारी मुले,पाठीमागे पसरलेले गर्द जंगल जणू एखाद्या चित्रकाराने रेखाटलेले निसर्गचित्र! उठावेसे वाटत नव्हते,पण पोटातल्या भुकेने भाग पाडले.एका भारतीय होटेलमध्ये मस्त जेवण करुन निद्रादेवीच्या अधीन केव्हा झालो ते कळलेही नाही.
प्रतिक्रिया
15 Mar 2009 - 3:32 pm | मदनबाण
व्वा... मस्त फोटो.. :) लोंबता ब्रिज आणि त्याच्या वरचा फोटो जास्त आवडला.
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
15 Mar 2009 - 3:34 pm | सुनील
सुंदर वर्णन आणि फोटो.
इंडोनेशियन हवाई सेवेला गरुडा हे नाव आहे. बहासा मलायमध्ये गरुडाला काय म्हणतात?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Mar 2009 - 4:39 pm | स्वाती दिनेश
फोटो व वर्णन आवडले. पुढच्या भागात गरुडांचे वर्णन वाचण्यास उत्सुक आहे.भाग २ लवकर येऊ दे,:)
स्वाती
16 Mar 2009 - 7:27 am | सहज
हेच म्हणतो.
भाग दोन लवकर येउ दे.
15 Mar 2009 - 5:14 pm | गणपा
वैशाली ताई सगळे फोटो आवडले.
बसल्या जागी लंग्कावी बेटांची सुंदर सफर घडवुन दिल्या बद्दल आभार..
गणपा.
15 Mar 2009 - 8:26 pm | प्रकाश घाटपांडे
येउं द्यात मलेशियाल जायला लई पैशे पडतीन हित फुकटात टुर पदरात पाडुन घेतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
15 Mar 2009 - 9:36 pm | क्रान्ति
मस्त लेख आणि अप्रतिम फोटो! डोळ्यांच पारण फिटल! पुढील भागाची उत्सुकतेने वाट पहातेय.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
15 Mar 2009 - 9:40 pm | अवलिया
मस्तच :)
--अवलिया
15 Mar 2009 - 9:41 pm | प्राची
वैशालीताई,
घरबसल्या मलेशियाची सुंदर सफर घडवून आणता आहात,धन्यवाद.
पुढील ठिकाणांची वाट पाहत आहोत. :) :) :)
15 Mar 2009 - 9:51 pm | लवंगी
सुरेख फोटो. छान वर्णन.
15 Mar 2009 - 9:58 pm | रानी
मी पण जाणार आहे लंग्कावीला अप्रिल्मधे!!!!
किति खर्च येतो?
मी सिगापुरला राहते.
तुमचा लेख आवडला!!!!!!!
- रानी
16 Mar 2009 - 5:51 pm | वैशाली हसमनीस
खर्च आपल्या करण्यावर अवलंबून आहे.तसेच पर्यटकांच्या गर्दीवरही अवलंबून आहे.
18 Mar 2009 - 9:31 am | प्रदीप
सिंगापूरमधे उपलब्ध असलेली टूर पॅकेजेस पहावीत. ट्रॅव्हल एजंटस माहिती देऊ शकतात. अथवा विमान कंपन्यांच्या वेब साईटवरही उपलब्ध असतात. खर्च तुमच्या पॅकेजप्रमाणे कमी जास्त होऊ शकतो. लंग्कावीसाठी सिंगापूर एयरलाईन्स, सिल्क एयर, थाय एयर, मलेशियन एयरलाईन्स, गरुडा, कॅथे अथवा ड्रॅगनएयर ह्यांच्या साईटसवर खूप चांगली माहिती उपलब्ध असेल.
16 Mar 2009 - 1:22 am | जृंभणश्वान
डोंगरांना जोडणारा पूल आणि गरुडाच्या पुतळ्याचा फोटो भारीच आहे. वर्णनसुध्दा मस्त
16 Mar 2009 - 6:27 am | अडाणि
मलेशियातल्या जुन्या आठवणिंना उजाळा मिळाला....
-
अफाट जगातील एक अडाणि.
16 Mar 2009 - 8:52 am | विसोबा खेचर
अतिशय सुरेख फोटू आणि लेखन..
वैशालीताई, वेलकम ब्यॅक टू मिपा..
तात्या.
16 Mar 2009 - 10:41 am | ढ
फोटो आणि आपण केलेलं वर्णन फारच छान.
पुढील भागाची वाट पाहत आहे.
16 Mar 2009 - 6:18 pm | परिकथेतील राजकुमार
वा वा वा वैशालीतै एकदम नयनरम्य सहल घडवुन आणलीत. धन्याचे वाद तुम्हाला.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
16 Mar 2009 - 10:15 pm | प्राजु
दुसरा शब्द नाही. जबरदस्त!!
चित्रे म्हणजे तर मेजवानीच आहे. सुरेखच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Mar 2009 - 6:30 am | वैशाली हसमनीस
प्राजु,हा परिसरच जबरदस्त आहे.'फोटोहूनही प्रत्यक्ष उत्कट'
16 Mar 2009 - 10:25 pm | भडकमकर मास्तर
फार भारी आहेत फोटो...
एक शंका.. : त्या समुद्राला अंदमान सागर का म्हणतात?. गडबडीत वाचताना वाटले अंदमान कसे काय आले ?.तिकडून जवळ पडते काय?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
17 Mar 2009 - 6:26 am | वैशाली हसमनीस
आपल्यासारखीच शंका मलाही आली होती.पण तिथे अंदमान सागरच म्हणतात.अंदमान म्हटले की मा.सावरकरांची आठवण होते.माझ्याही अंदाजानुसार अंदमान जवळ असावे.(पण हा केवळ अंदाजच,खात्री नव्हे)त्यासाठी नकाशाच उघडावा लागेल.
16 Mar 2009 - 11:05 pm | भाग्यश्री
वा काय सही फोटोज .. लोंबता पूल भारी आहे!
हा सगळा परिसर त्या ह्रितिक-करीनाच्या यादें मधे आहे का? सायकलींची शर्यत, मग मगरींचा ऍटॅक, ह्रितिक बोटीला पोहत आणतो किनार्यावर वगैरे?!?
http://bhagyashreee.blogspot.com/
17 Mar 2009 - 6:17 am | वैशाली हसमनीस
हा परिसर नितांतरमणीय असल्यामुळे येथे अनेक हिंदी सिनेमांचे शूटिंग होते.उदा.डॉन्.'यादे'चे मला माहीत नाही.पिक्चर बघून नक्की सांगू शकेन.
17 Mar 2009 - 7:23 am | सँडी
अप्रतिम!!! धन्यवाद!
वटवाघुळांचे असले तर अजुन काही फोटु टाका.
आपल्याला लै आवडतात निशाचर प्राणी!
- एक वटवाघुळ
17 Mar 2009 - 1:40 pm | वैशाली हसमनीस
काय आहे कि वटवाघुळे अंधार्या जागांमध्ये वास्तव्य करुन असतात.आणि ह्या बॅटकेव्हसमध्ये प्रवेश करताना कुठल्याही प्रकारचा फ्लॅश मारण्यास मनाई आहे.
त्यामुळे फोटो काढणे शक्य झाले नाही.कदाचित प्रयत्न केला असता तर......डोळे गमवावे लागले असते बहुदा!
17 Mar 2009 - 10:56 am | धमाल मुलगा
तो...तो..गरुडाचा फोटो कस्सला भारी आलाय! एकदम हायकल्लास :)
वैशालीकाकू, सह्ही सफर करवलीत..एकदम गायडेड टूर :)
मस्तच. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
17 Mar 2009 - 1:08 pm | छोटुली
वैशाली काकु,
लय भारी लिव्ह्ता तुम्ही.असं वाटलं कि आपणच फिरुन आलो लंग्कावीला.
फोटो बेस्ट्च.....कोणी काढलेत हो?
18 Mar 2009 - 6:07 am | वैशाली हसमनीस
'ज्याच्या हाती कॅमेरा,तो फोटो खेची'.तुम्हाला म्हणून सांगते हं,कोणाला सांगू नका.फोटोची करामत माझ्या सूनबाईंची आहे.
17 Mar 2009 - 1:20 pm | दिपक
सुंदर फोटो आणि वर्णन. एका रमणीय ठिकाणाची सफर घडवलीत खुप खुप धन्यवाद.! :)
माश्यांचे , पुलाचे आणि गरुडाचे फोटो तर झकासच.
18 Mar 2009 - 6:18 am | शितल
फोटो, आणि वर्णन सुरेख.. :)