२००५ साली बी कॉम ची परीक्षा दिली नि मी नवीन कोर्स करिता कोकणातून मुंबईला येऊन दाखल झाले. ठाण्याला काकांकडे राहण्याची सोय झाली. स्टेशनपासून काकांचं घर अगदीच जवळ होतं. तशी मुंबईला राहायची आणि मुंबईची सवय करून घायची हि पहिलीच वेळ. याआधी कधीतरी फिरायला म्हणून कुणाबरोबर तरी मी मुंबई पाहिलेली. मुंबई बाहेरची असल्याने लोकल जिथपर्यंत जाते त्याला सगळ्याला मुंबई म्हणायचे. माझा क्लास विद्याविहार स्टेशन जवळ होता. तेव्हा रोज ठाणे ते विद्याविहार रोज लोकलचा प्रवास करावा लागणार होता. पूर्णपणे अनोळखी वातावरणात माझ्याबरोबर होती माझी मैत्रीण केतकी जीला थोडी तरी मुंबईची माहिती होती.
क्लासची फी वगैरे भरून वेळ वगैरे सगळी ठरली. आता माझी परीक्षा होती ती मुंबईची, लोकलची माहिती करून घेणे नि सवय करणे. सुरवातीला काकू बरोबर जाऊन महिन्याचा पास काढला. काकूबरोबर येऊन, पास काढण्यासाठीच ऑफिस, कुठल्या क्लासचा पास किती रुपये, तिथे लिहिलेले बोर्ड वाचणे, अर्थ समजावून घेणे या गोष्टी केल्या. काकूने साधारण रोज लागणारे इंडिकेटर कसे वाचायचे समजावून सांगितलं त्याचप्रमाणे साधारण कुठल्या प्लॅटफॉर्म वर कुठे जाणारी गाडी येते हे देखील सांगितलं. जेवढं जमेल तेव्हढं लक्षात ठेवलं. केतकीला यातली माझ्यापेक्षा जास्त माहिती होती. त्यामुळे ती बरोबर असल्याने मी थोडी निवांत होते. ठाण्याला काकांचं घर प्लॅटफॉर्म नंबर १ च्या इथून अगदी जवळ होत. मग केतकी नि मी एक जागा भेटण्याची ठरवून घेतली. २/३ वेळा काकूबरोबर येऊन नक्की रस्ता, स्टेशन यांची माहिती करून घेतली.
क्लास सुरु झाला. हळूहळू रोजची सवय व्हायला लागाली. क्लास दुपारी ४ ते रात्री ८ असायचा त्यामुळे दुपारी लोकलने जायला अजिबात गर्दी नसायची. आरामात बसून जायचो. पण येताना मात्र सुरवातीला काही दिवस भरलेली लोकल बघून सोडून द्यायचो. शक्यतो ठाणे लोकल पकडायचो. कि त्यातल्या त्यात कमी गर्दी. विद्याविहारला तशाही सगळ्या स्लो लकात थांबत असल्याने फास्ट लोकलचा संबंध नव्हता. केतकी आधी मुंबईत राहिली असल्याने तिला लोकल मध्ये चढण्याचा, गर्दीत घुसण्याचा कॉन्फिडन्स खूप लवकर आला. मीच जरा वेळ घेतला. मुबईची गर्दी टीव्हीवर बघायचे पण अनुभव पाहिल्यान्दाच होता. पण हळूहळू सवय व्हायला लागली.
क्लास आमचा जुलै मध्ये सुरु झाला. पावसाळ्याचे दिवस. थोडे दिवसात पाऊस पडून ट्रेन चुकणे,उशिरा येणे, बंद पडणे वगैरे नेहमीचे सोपस्कार सुरु झाले. अर्थात आमची काही ठरलेली लोकल नव्हती. स्टेशनला आल्यावर मिळेल ती लोकल पकडून जात असू.
एकदा असाच सकाळपासून पाऊस सुरु होता पण पाणी भरल्याची कुठे बातमी नव्हती. स्टेशनवर आलो तेव्हा ट्रॅक वर पाणी होते. पण ट्रेन उशिरा का होईना धावत होत्या. आम्ही १ नंबर ला ट्रेन पकडली. ट्रेनला फारशी गर्दी नव्हती. लेडीज डब्यात जेमतेम १०/१२ बायका होत्या. घाटकोपर सोडल्यावर आम्ही विद्याविहारला उतरायचे म्हणून दारात येऊन उभे राहिलो. स्टेशन जवळ आलं आणि अचानक गाडी ट्रॅक बदलून फास्ट ट्रॅक वर गेली. स्टेशन दिसतंय म्हणता म्हणता प्लॅटफॉर्म आमच्यापासून दूर जाऊ लागला. मी घाबरले. माझ्यासाठी पहिलाच असा प्रसंग.
"आता काय करायच?" मी केतकीला म्हटलं "पुढचं स्टेशन कुर्ला.आणि आपल्याला तर काहीच माहित नाही." मी पॅनिक झाल्याने फारच मोठ्या आवाजात हे म्हणाले. सगळ्यात आधी केतकीने मला कोपराने ढोसून शांत व्हायला नि आवाज खाली करायला सांगितला. पॅनिक होऊ नको, आणि उगाच आपल्याला काही माहित नाही हे बोंबलत फिरू नको म्हणून पुटपुटली. पुढे कुर्ला स्टेशनवर गाडी थांबली नि आम्ही उतरलो. मी तर पूर्ण गोंधळून गेले होते. केतकीने माझा हात पकडलंन नि जिना चढायला लागली. वरआडव्या ब्रिज वर गेल्यावर इंडिकेटर बघितलंन. प्लॅटफॉर्म १ ला ठाणे लोकल येत होती. सुदैवाने प्लॅटफॉर्म दाखवणारे बोर्ड जागेवर लावलेले होते. आम्ही तीच लोकल पकडून ठाण्याला परत आलो नि मी हुश्श केलं.
त्या दिवशी घेतलेला महत्वाचा धडा म्हणजे काही झालं तरी आपल अज्ञान नको तिथे पाजळायचं नाही. गैरफायदा घ्यायला आजूबाजूला लोक टपलेले असतात. अशा प्रसंगी आपण पण घाबरलेलो असतो नि मग लोकांच्या खोट्या बोलण्याला फसतो. अर्थात हे ज्ञान येताना मला केतकीने दिलंन. आणि मग मी ते अगदी पक्क मनाशी घोकून ठेवलं. तसंच आपला, गावात बोलण्याचा आवाज नि शहरात बोलण्याचा आवाज पण वेगवेगळा असावा. गावात ज्या टोनमध्ये नि जेव्हढ्या मोठ्याने सहजपणे बोलतो तसं शहरातून चालत नाही हे देखील कळलं.
प्रतिक्रिया
18 Dec 2018 - 2:01 pm | सुधीर कांदळकर
वाचले.
तसंच आपला, गावात बोलण्याचा आवाज नि शहरात बोलण्याचा आवाज पण वेगवेगळा असावा.
अगदी खरे. मी गावात राहायला आल्यापासून हे जाणवले. आमचे गावातले घर रस्त्यालगत आहे. कोणत्याही वेळी दुचाकीस्वार दुचाकीच्या इंजिनाच्या आवाजावर मात करणार्या कर्कश आवाजात बिनकामाच्या गजाली करीत जातात. पण आता सवय झाली आहे.
गैरफायदा घ्यायला आजूबाजूला लोक टपलेले असतात.
असे नेहमीच काही असू शकत नाही. हे विधान व्याकरणदृष्ट्या बरोबर असले तरी १०० टक्के वास्तव नाही. टपलेले असू शकतात एवढेच. मुंबईत चांगली माणसे पण भरपूर आहेत.
18 Dec 2018 - 3:45 pm | कंजूस
बरोबर लिहिलं आहे. सध्या मुंबईतच असाल तर आणखी काही धडे शिकण्याची गरज आहे आणि ते महिलामंडळाकडून घ्या.
18 Dec 2018 - 4:11 pm | गवि
नवे नवे मुंबईत आलेले असतानाचे अनुभव रोचक असतात. ते चांगले मांडले आहेत.
मात्र इन जनरल मुंबईत जागोजागी दिवसरात्र भरपूर लुटारु लोक मिळेल त्याला लुटण्याची, फसवण्याची वगैरे वाट पाहात सापळे लावून बसलेले असतात ही अतिशयोक्त समजूत काही हिंदी मराठी सिनेमांनी करुन दिली आहे असं वाटतं.
गर्दी आणि लोकसंख्येच्या प्रमाणात जरा जास्त पाकिटमार, ठकसेन आहेत पण अगदी असुरक्षित नाही. ठराविक वेळा आणि एरिया असे अपवाद वगळता.
18 Dec 2018 - 4:55 pm | चौथा कोनाडा
मस्त लिहिलंय !
मुंबै आणि मुंबै लोकल हा एक वेग़ळाच भन्नाट प्रकार आहे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत !
19 Dec 2018 - 11:41 am | सतिश गावडे
पदवीधर झालेली व्यक्ती लोकलमध्ये फक्त एक दोन स्टेशन पुढे उतरावे लागेल या कल्पनेने एव्हढी घाबरते? अवघड आहे.
19 Dec 2018 - 1:13 pm | माहितगार
:)) पदवी आणि घाबरण्याचा काय संबंध गावडेजी , पदव्युत्तर केल्याने भिती आणखी कमी होतात का काय :) नव्या गावात नव्या व्यक्तिंचा रुळेपर्यंत गोंधळ होणे स्वाभाविक असावे - न घाबरण्याची पिएचडी मोठी अवघड आणि कमी जणांकडेच असते :) - व्यक्ति स्वभावानुसार कमी जास्त एवढेच.
21 Dec 2018 - 8:27 pm | सुबोध खरे
"शैक्षणिक क्षमता" बद्दल जास्तच काथ्याकूट झाला असे वाटते.
पण पदवीधर व्यक्ती निदान काही वर्षे (किमान ५) कॉलेजात (आणि त्यापूर्वी १० वर्षे शाळेत) गेलेली असते. तिला लोकांच्या मिसळायची सवय असते( असायला हवी) शिवाय लिहिता वाचता येत असल्यामुळे मुंबईत सर्वत्र असलेले (रेल्वे स्थानकातही) मराठी हिंदी आणि इंग्रजीतील फलकहि वाचता येतात. या तुलनेत निरक्षर माणसाला त्रास होतोच.
हा अनुभव घ्यायचाच असले तर कोणत्याही दक्षिण भारतातील लहान शहरात जाऊन पहा (विशेषतः तामिळनाडू) तेथे आपल्याला हिंदी येत असेल तरी कोणीही बोलत / उत्तर देत नाही आणि छोट्या शहरात इंग्रजी येणारी माणसे फार कमी असतात.
दिल्लीत गेलात तर लोक नीट उत्तर देत नाहीत आणि बाहेरून आलेल्या माणसाला शेंडी लावणे हा तर त्यांचा स्थायीभाव आहे
या तुलनेत मुंबईत तुम्हाला लिहायला वाचायला येत असेल तर जास्त सोपे होते पण तोंड उघडून बोललात तर मुंबईत मराठी हिंदी किंवा इंग्रजी भाषेत लोक व्यवस्थित मदत करतात.
उत्तर प्रदेश बिहारहून आलेले निरक्षर भय्ये याबाबत बरे- "बाबूजी, बाबूजी" करत आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करत असले तरी लवकर शिकतात.
याउलट आपल्या बायकांची स्थिती आहे लोक काय म्हणतील म्हणून तोंड बंद ठेवून "भित्र्यासारख्या" वावरतात.
20 Dec 2018 - 8:11 am | मालविका
पदवीधर असण्याचा इथे काहीच संबंध नाही . मुंबईतल्या मुंबई मध्ये पण वेस्टर्न वरून कधीही सेंट्रल या न आलेल्या मुली मी पहिल्या आहेत .
मुंबईत पहिल्यांदा लोकलने प्रवास करणारा माणूस नक्कीच घाबरतो . त्यात साधारण जुलैच्या पहिल्या आठवड्यातील हि घटना आहे . मला जेमतेम लोकल प्रवास सुरु होऊन १५च दिवस झाले होते . त्यामुळे मी विद्याविहारच्या पलीकडे कधी गेलेच नव्हते .
28 Dec 2018 - 9:16 pm | Rajesh188
विद्देशी (युरोपियन) स्त्री आसू द्या नाहीतर पुरुष किती सहज वावरतात .आपण कधी शिकणार आणि कोणाची मदत तरी कशाला हवी .फक्त आत्मविश्वास हवा
20 Dec 2018 - 11:21 am | प्रसाद_१९८२
पदवीधर झालेली व्यक्ती लोकलमध्ये फक्त एक दोन स्टेशन पुढे उतरावे लागेल या कल्पनेने एव्हढी घाबरते?
<<
तुमच्या मते,
भितीची व्याख्या एकाद्याच्या शैक्षणिक क्षमतेवरुन ठरत असेल तर मुंबईत निरक्षर लोकांचे, भितीने काय हाल होत असतील ह्याचाच विचार करतोय.
19 Dec 2018 - 1:33 pm | माहितगार
नव्या परिसरात, नव्या गावातील वहानात आणि सार्वजनिक ठिकाणी अज्ञान जाहीर न करणे अधिक श्रेयस्कर असावे हे खरेच. झाकली मुठ सव्वा लाखाची अशी एक म्हण आहे ती महत्वाची असावी.
नव्या गावात पहिला पाय टाकल्या नंतर लॉजींग करायचे नसल्यास कमी गर्दीचे रेस्टोरंट तरी गाठतो. जरासे खाण्याची ऑर्डर दिल्या नंतर रेस्टॉरंटच्या गल्ल्यावर जे कुणि असेल त्याच्या कडून जावयाच्या परिसरात कोणत्या मार्गाने कोणत्या वाहनाने जाणे अधिक सोईस्कर रावाहनाचे रास्त भाव किती ह्याची माहिती करुन घेणे बरे पडते. रिक्शा टॅक्सीने कोणत्या मार्गाने जायचे विचारल्यास आपले अज्ञान प्रगट करावे लागत नाही कारण आधीच जराशी माहिती घेऊन झालेली असते.
रस्त्यावरून चालणार्या अनोळखी लोकांना माहिती विचारण्याचा मोह बर्याच लोकांना टाळता येत नाही हे वारंवार बघत असतो. रस्त्यावरुन चालणार्या व्यक्तिचा तुम्हाला फसवण्याचा उद्देश नसला तरी तोही नवा आणि अपरिपूर्ण माहितीचा असू शकतो त्याच्या कडुन चुकीची माहिती घेऊन आपण गोंधळू शकतोच त्या शिवाय आपण त्याला चुकीची माहिती का दिली हे परत फिरुन विचारु शकत नाही. त्या पेक्षा चार पाऊले अधिक चालून वर म्हटल्या प्रमाणे रेस्टॉरंट मॅनेजर किंवा ग्रोसरी, लाँड्री शॉप्स , सिलेंडर नेणारे, पोस्टमन आणि आऊट स्कर्ट मध्ये / इंडस्ट्रीअल एरीआत असल्यास टेंपो चालकांकडून माहिती काढणे सोईचे जाते. तसेच अजून वेगळ्या शॉप किपर कडून तिच माहिती पुन्हा विचारुन जुळते का याची खात्रीही करतो.
आजकाल ओला उबर इत्यादी कॅब सेवा उपलब्ध असूनही नव्या परिसराची गूगलवरुन माहिती करून घेणे बरे आणि एवढ्या तांत्रिक सुविधा असूनही स्थानिक शॉप किपर कडून माहिती घेतोच कारण संबंधीत परिसराची माहिती तेथिल अडचणींची माहिती त्यांना अधिक व्यवस्थित माहिती असण्याची शक्यता असते असे वाटते.
20 Dec 2018 - 3:48 am | पिवळा डांबिस
अनुभवकथनातला प्रांजळपणा आवडला. माझा मुंबैतच जन्म आणि लहानपण गेल्यामुळे थोडीशी गंमतही वाटली.
पण एक गोष्ट समजली नाही. ती म्हणजे ठाण्याहून विद्याविहारला क्लासला जातांना गाडी अचानक ट्रॅक बदलून कुर्ल्याला पोहोचलात ते समजलं. नंतर १ नंबरच्या फलाटावर जाऊन ठाणा गाडी पकडलीत हेही समजलं. पण मग परत येतेवेळी विद्याविहारला उतरून तुमच्या क्लासला न जाता एकदम परत डायरेक्ट ठाण्याला का आलांत ते नाही समजलं....
की घाबरून गेल्यामुळे 'मरो तो क्लास, आपण सरळ घरीच जाऊया' असा विचार केलांत? :)
20 Dec 2018 - 8:06 am | मालविका
अगदी खरे . क्लास रात्री सुटणार त्यामुळे रात्री कोण रिस्क घेणार त्यापेक्षा घर गाठणे जास्त बर वाटलं.
20 Dec 2018 - 8:14 am | मालविका
सगळेच लोक गैरफायदा घ्यायला टपलेले नसतात हे १००टक्के मान्य . पण कोणते लोक चांगले कोणते वाईट हे कळायला थोडा अनुभव येणं फार गरजेचं आहे .
20 Dec 2018 - 4:01 pm | श्वेता२४
चर्चगेटवरुन परत येताना मी नेहमीची बांद्रा स्लो लोकल गेली असल्याने उभ्या असलेल्या बोरीवली फास्ट मध्ये पहिल्यांदाच चढले. निवांतपणे दादर गेल्यानंतर उतरण्यासाठी उठले. दरवाज्याजवळ आधीच 5-6 बायका ओळीत उभ्या होत्या. मी पुढच्या बाईला विचारले बांद्रा? ती बया हा म्हणाली. पेहरावावरुन गुजराती दिसत होती. स्टेशन आल्यावर ती व तीच्या पुढची बाई उतरलेच नाहीत आणि खालून बायका चढण्यासाठी घुसल्यामुळे मला उतरताच आले नाही. पास पारल्यापर्यंतचा होता आणि आता तर अंधेरीला उतरण्याशिवाय पर्याय नव्हता . ती समोरची बाई उतरली नाही कारण तीही नवी होती आणि तीला माहित नव्हते कुठे उतरायचे होते. तीने उगाचच हा म्हणून ठोकले होते. तीच्या सोबतच्या बाईने सांगितले त्या बोरीवलीला उतरणार आहेत पण यात माझी गोची झाली ना. शेवटी कशीबशी अंधेरीला उतरुन विदाऊट तिकीटच बांद्रापर्यंत प्रवास केला. इतकी घाबरले होते की तिकीट काढायचेच लक्षात राहिले नाही. तेव्हापासून दारात उभे असणाऱ्या पहिल्या व्यक्तीपर्यंत मी कुठे उतरणार विचारायची सवय लावून घेतली.
20 Dec 2018 - 4:18 pm | कंजूस
सगाने थोडा विनोदी प्रतिसाद दिलाय.
पदवीचं सोडा, पूर्व पश्चिम जाण्यासाठी तीन रेल्वेपूल आहेत, त्यापैकी दोनांवर टिकेटचेकिंग होऊ शकते. पण घाबरत पलिकडे जातो॥ ( पकडल्यास २६५रु दंड घेतात. पाकिटाची भिती हो.
भुबनेश्वरला पलिकडेच हॅाटेल होते पण रिक्शावाला दूरच्या ओवरब्रिजने फिरून जायचे शंभर रु सांगू लागला॥ प्लॅटफार्म तिकिट काढून गेलो. बरं तिकडे एक्सप्रेस ट्रेनचा चार्ज घेतला असता तर तिकडेच पुरी यात्रा झाली असती.
शहरात घाबरलेले न दाखवता घाबरून राहाणे उत्तम.
20 Dec 2018 - 5:06 pm | श्वेता२४
शहरात घाबरलेले न दाखवता घाबरून राहाणे उत्तम.
एकदम सहमत
21 Dec 2018 - 6:54 pm | सुधीर कांदळकर
एक माणूस कर्जतला लोकलमध्ये बसतो. कल्याणच्या आसपास गाडी आल्यावर तो समोर बसलेल्या माणसाला विचारतो.
ददददद.. दादर कब आयेगा?
समोरचा माणूस गप्प. त्याच्या बाजूचा माणूस उत्तर देतो अब थोडा टैम है.
ठाण्याजवळ गाडी आल्यावर पुन्हा तोच प्रश्न.
समोरचा माणूस गप्प. त्याच्या बाजूचा माणूस उत्तर देतो अब और थोडा टैम है.
घाटकोपरच्या जवळ गाडी आल्यावर पुन्हा तोच प्रश्न.
समोरचा माणूस गप्प. त्याच्या बाजूचा माणूस उत्तर देतो अब और थोडा टैम है.
दादर आल्यावर तो माणूस उतरून जातो.
उत्तर देणारा माणूस उत्तर न देणार्याला विचारतो की आपने बताया क्यूं नही?
बबबबब.. बोलता तो झझझ .. झगडा नही होता?
21 Dec 2018 - 7:13 pm | गामा पैलवान
मालविका,
भास्कर कॉलनी की दादा पाटील वाडी की बी केबिन की शिवाजीनगर?
दोनअडीच दशकांपूर्वी पायाखालचा रस्ता होता म्हणून सहज विचारतोय.
आ.न.,
-गा.पै.
22 Dec 2018 - 8:27 am | मालविका
बी केबिन ला
21 Dec 2018 - 9:03 pm | मार्मिक गोडसे
आता पाय ठेवायला जागा नसते त्या रस्त्यावर खुराडा झालाय त्या भागाचा.
22 Dec 2018 - 10:24 am | जेडी
मी फक्त दोनदाच मुंबईच्या लोकलने प्रवास केला आहे . एकदा काका बरोबर होते आणि दादर वरून मुमबी सेंट्रल ला जायचे होते . पहाटे उतरल्याने लोकल तशी गर्दी नवहती. मी स्त्रियांच्या आणि ते पुरुषांच्या डब्यात चढलो पण मुंबईचा तो पहिलाच लोकल प्रवास असल्याने हृदयात धडधड चालली होती . मी दरवाजामध्येच उभी राहिले आणि सतत मागे वळून पाहत होते. प्रत्येकाला विचारात होते आले का मुंबई सेंट्रल . आता हास्यास्पद वाटतंय पण तेंव्हा हीच परिस्थिती होती .
नंतर मी बरेच वेळा म्हणजे वीकेंडला वापीला जायचे पण डायरेक्ट मुंबई सेंट्रल ला बस ने जाऊन पलीकडेच असलेल्या रेल्वे स्टेशनला जायचे . दीडची कर्णावती चुकलीच तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बसून राहायचे . पण मुंबई फिरून बघावी असे वाटले नाही .
पुन्हा एकदा मला डोंबिवलीला उतरून तिकडच्या कुठल्या तरी गावात जायचे होते पण तेंव्हा दीर बरोबर होता . पुण्याहून पकडलेली ट्रेन डोंबिवलीत थांबत नव्हती तेंव्हा कल्याण ला उतरून लोकल ने गेले होते(किंवा उलटे , आता आठवत नाही ) पण तेंव्हा अनुभवलेली लोकलची गर्दी मी विसरू शकणार नाही , श्वास कोंडायला झाला होता . प्रत्येकजण मलाच चिकटतोय असा भास होत होता . किती अंग चोरून चालले तरी तेच. माझ्या दिराच्या लक्षात आली माझी सिच्युएशन . तो म्हणाला , चालू पण नका . आपोआप पुढे जात राहाल . इथे असेच असते , जास्त विचार करू नका. बापरे , तेंव्हापासून मुंबईच्या लोकलची धडकीच घेतलीय .
30 Dec 2018 - 12:14 pm | मुक्त विहारि
मस्त लिहिले आहे...