दिव्य केरळी उच्चार आणि ती रहदारी
४ ऑक्टोबर २०००.
मडिकेरीच्या रम्य आठवणी घेऊन निघालो. मॅसाचे आभार मानले. त्यांनी सकाळी वेळेवर बिल दिले. तेल्लीचेरीला जाणार रस्ता कोठून जातो त्याचे अगत्याने मार्गदर्शन केले. सारथ्यांनी व्यवस्थित समजून घेतले. त्यांचे आम्ही सर्वांनी पुन्हा आभार मानले. सातसाडेसातला निघालो.
आता आम्ही वेगळ्या दिशेने जात होतो. रस्त्याला लागून डेरेदार वृक्ष. त्यापलीकडे दुतर्फ़ा चहाचे मळे. आल्हाददायक दृश्य. मी लहान मुलासारखा सीटवर गुढगे टेकून मागे तोंड करुन निसर्ग डोळ्यात साठवत होतो. बाजूच्या दोघापेक्षां मी नशीबवान होतो. मला संपूर्ण दृश्य दिसत होते.
मास्तरांनी विशिष्ट पद्धतीने साडी नेसलेल्या स्त्रिया दखविल्या. चहाच्या मळ्यावरील कामकरी स्त्रिया. कूर्ग जिल्ह्यातील चहाच्या मळ्यातील काम करणारी स्त्री अशा मथळ्याचे चित्र शाळेत असतांना भूगोलाच्या पुस्तकात होते ते मास्तराला त्वरित आठवले. आम्हा इतरांना नंतर आठवले. फ़ेटेधारी नसतांना. परंतु त्याला त्वरित आठवले. सामान्य पुरुष त्या नेसण्याच्या पद्धतीचे वर्णन करू शकत नाही. एखादी स्त्री किंवा एखादा पेहराव तज्ञ जरूर करू शकेल.
घाट चढतांना अप्रतिम सेट डोसा मिअळला होता. उतरतांना कां मिळू नये! वाटेत एक टुमदार गांव लागले. आठवड्याचा बाजार भरला होता. सुरेख हवेमुळे पोटतील कावळ्यांना काम आले. क्षुधा शांति भवन शोधूं लागलो. एके ठिकाणी पार्किंग मिळाले. हॉटेल काही दिसेना. करपल्लवीचा आधार घेतला. एकाने हॉटेल दाखविले. बेत काही खास नव्हत. काय खाल्ले आता आठवत नाही. निघालो. घाट उतरणे पुढे सुरु.
गाडीच्या चाकांची रस्त्याशी तीव्र उतारावर जी झटापट चालू होती त्या गडबडीत माझी बॅग माझ्या मानेवर यायला लागली. माझ्या मानेवर एक जूं आले असून ते अगदी योग्य आहे, किंबहुना ते येण्यास फ़ार उशीर झाला आहे, नव्हे ते जन्मत:च असायला हवे होते यावर इतर चौघांचे एकमत झले. अर्थात ऑल ग्रेट मेन थिंक अलाईक.
मी पुन्हा मागे तोंड करून गुढगे सीटवर ठेवून माझी बॅग त्याखालील बॅगवर दोरीने बांधायला लागलो. गाडीच्या मागच्या काचेतून नजर टाकली. विश्वास बसेना एवढे सुंदर दृश्य. घनदाट अरण्य म्हणजे काय? फ़क्त ब्रिज इन रिव्हर क्वाय सारख्या सिनेमात पाहिले होते. परंतु प्रत्य़क्ष दर्शन मात्र कल्पनातीत सुन्दर. मी शब्दप्रभू नाही. ते वर्णन करण्यासाठी कवीलाच तेथे उतरावे लागेल. ते अरण्याचे दृश्य मनावर कोरलेले आहे.
केरळ्च्या सीमेत प्रवेश केल्यावर एक फ़रक जाणवला. सीमेवरच्या गावातील बाजारालगतच रस्ता जातो. माणसांची प्रचंड गर्दी. आणि गावाला लागून गावे. निर्मनुष्य प्रदेशच नाही. पुढील ठिकाण होते मुन्नार. त्या रस्त्यावर आमच्या नकाशात केरळ्मधील थल्लीसेरी हे गाव दिसत होते. इंग्रजी स्पेलिंगप्रमाणे. डावीकडे पुढे देवा व मागे जाड्या होते. साहाजिकच रस्ता विचारण्याची जबाबदारी त्या दोघांची. थल्लीसेरी कोठे आहे कोणालाच माहिती दिसेना. तुमचे मुखचंद्र पाहून लोकांना पत्ता सांगावासा वाटत नाही किंवा ते तो विसरत तरी असावेत. आमची मल्लिनाथी. पण टिंगल आणि आचरट विनोद हा पर्याय नव्हे. वेग २० - २५ वर आला. "अरे तेच तेल्लीचेरी असणार." मास्तरांना साक्षात्कार झाला. आणि कपडे घालून युरेका. त्वरित प्रतिसाद मिळाला. (टंकतांना चुकून प्रीतिसाद टाईप केले होते. नवीन शब्द मिळाला. शिंप्याची चूक हीच फॅशन होय, या थाटात.) पावसाची रिपरिप चालू झाली. येथे मान्सून अद्याप कार्यरत होता. हवा मुंबईपेक्षा गरम.
आता आगेकूच सुरु झाली. केरळमधील कुशल सारथी चांगलेच हात दाखवू लागले. मोठ्या बसेस (अनेकवचन बशी करावे का?) आपल्या गाडीच्या मागे चिकटून जोराजोरात पांचजन्य करून बाजूला होण्यास सांगतात (साईड मागतात). डावीकडे जाऊन रस्ता दिला की अति जवळून अति वेगात पुढे जातात. सहाइंचाचे अंतर जरी ठेवले तरी शिक्षा असावी. रॅश हा शब्द लाजेल असे ड्रायव्हिंग. आणि जरा पुढे जाऊन एकदोन किलोमीटरवर थांबतात. कारण त्यांचा थांबा असतो. पुन्हा आपण पुढे जायचे. सुटलो म्हणून श्वास घ्यावा तो पुन्हा मागून पांचजन्य. तीच बस. अशा लडिवाळ रहदारीतून अखेर तेल्लीचेरी आले. शहरातील रहदारी कशी. तर मुंबईत दुपारी दवाबाजारात असते तशी. चिंचोळ्या गल्ल्या आणि मोठ्या वाहनांची बेशिस्त अशी प्रचंड गर्दी. नियम पाळल्यास मृत्युदंड असावा. ही केरळ स्पेशल रहदारी बरे का. मुंबई पुण्यात राहून याची कल्पना येणार नाही.
तेल्लीचेरीला लागूनच "माहे" हा केंद्रशासित प्रदेश (युनिअन टेरिटरी) आहे. तेल्लीचेरी कोठे संपते व माहे कोठे सुरू होते हे दुकानावरूनच कळते. तसा वाटेत एक छोट्या गावातील जकातनाक्यासारखा जकात नाका आहे. पण त्याने आम्हाला थांबविले नाही. एक शहराचेच दोन भाग, दुसरे काय! "युनिअन टेरिटरी ऑफ़ माहे अँड पॉण्डिचेरी" माहे कुठे पॉण्डिचेरी कुठे. सरकारी विनोद. दुसरे काय. गंमत म्हणजे पॉण्डिचेरीचे स्पेलिंग तेल्लीचेरी सारखे नाही. हा समाजवादाचा अभाव बरे. एवढा पंक्तिप्रपंच बरा नव्हे. कोण म्हणतो केरळमध्ये साम्यवाद्यांचा जोर आहे? आणखी एक गंमत. मुंबईच्या दवा बाजारात जेवढी औषधाची दुकाने नसतील त्यापेक्षा जास्त येथे दारूची आहेत. थोडक्यात म्हणजे मद्यप्रेमीचे तीर्थ़क्षेत्र. खरे म्हणजे एका सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय धर्मपीठाचेच नाव जिभेवर आलेले आहो. कोणते ते चतुर आणि चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच. कुतूहल म्हणून उतरून दर पाहिले. ७५० मि ली रम रू १२८, ७५० मि ली बकार्डी रू ४५० रेविएरा वाईन रू ६५० त्या वेळी यांचा मुंबईतील किंमती अनुक्रमे रू. २००, ८५० व १२०० होत्या. हे राज्य सगळीकडून केरळने वेढले आहे. पश्चिमेला समुद्रकिनारा असावा. मग वेगळ्या राज्याचे प्रयोजन काय. सरकारच जाणे. मद्यप्रेमींची चांगलीच सोय. केरळमधून ५० कि मी पर्यंत पासूनचे लोक येतात मद्यप्राशनाचा आनंद लुटतात व घरी (किंवा गटारात) जातात. जवळजवळ सर्व दुकानात पिण्यासाठी कक्ष देखील केलेले आहेत. श्रेष्ठ तळीरामांना राज्य सरकार तर्फ़े पुरस्कार दिले जातात की काय ठाऊक नाही. असल्यास माझा सलाम. नसल्यास कठोर निषेध. अथातो मद्यजिज्ञासा.
कालिकत. 'वास्को द गामा १४९८ साली कालिकत येथे आला' हे वाक्य आपण सर्वांनी शाळेत असतांना इतिहासात वाचले असेलच. या ठिकाणाबाबत एक गंमतीदार आठवण आहे. मी जेथे काम करतो (दुर्दैवाने पोटासाठी करावे लागते) तेथील डिस्पॅच खाते एकदा एकाच्या गैरहजेरीत मी सांभाळले होते. परचेस ऑर्डर पाहून माल कालिकतला पाठविला. बिलांच्या मूळ प्रती बॆंकेत पाठवायच्या वेळी त्यांच्या कार्यालयाचा व कारखान्याचा पत्ता वाचतो तर काय, कोझीकोडे. मी टरकलो. माझा मुखचंद्र पाहून सुमति नामक स्टेनो पण टरकली. वॉट्ट हॅप्पण्ड? तिने विचारले. मी म्हटले ऑर्डर फ्रोम रामेश्वर, गुड्स सेंट टु सोमेश्वर. कंप्लीट डिसऑर्डर ऑफ़ पर्चेस ऑर्डर. कालिकत का माल कोझीकोडे भेजा. ती बया हसायला लागली. ती केरळीच होती. डोंट वरी सर. बोथ्थ आर दी सेम. टू नेम्स ऑफ़्फ़ वन्न प्लेस. माझा जीव कालिकतच्या भांड्यात. असो. एका मैलाच्या दगडावर चक्क हिंदी पाटी दिसली. 'कोषिकोडे ---- किमी' अशी. धन्य ते केरळी स्पेलिंग. हे लोक जर आमच्या शाळेत शिकले असते तर झेब्र्यासारखे दिसले असते. शिक्षकांच्या छड्या खाऊन. पुढील गावांची विचित्र नावे मात्र इंग्रजी दगडावर बरोबर लिहिली होती. पोन्नान्नी, गुरुवायूर, इरिंजळकुड्डा. तरी चवक्कल कांही ठिकाणी तर काही ठिकाणी चव्वक्कड होते. पण फ़ार गफ़लत नव्हती.
मुन्नारला संध्याकाळपर्यंत पोचणे शक्य नव्हते. अंतर फ़ार. वाटेत कोठेतरी मुक्काम करावाच लागणार. तर जरासा वळसा घेऊन कालडी का पाहू नये. आद्य शंकराचार्यांचे जन्मस्थान. आम्ही जरी धार्मिक नसलो तरी एका लोकोत्तर पुरुषाच्या जन्मस्थानी जायला काय हरकत आहे? हजार अकराशे वर्षापूर्वी दळणवळणाची साधने काय होती असावीत? घोडा, बैलगाडी आणि घोडागाडी. आणि अर्थात विनोबांची अकरा नंबरची बस. या महापुरुषाने त्या काळी जवळजवळ संपूर्ण हिंदुस्थानाचा दौरा करून वादविवादात तत्कालीन पंडितांना जिंकून हिंदु धर्माचे पुनरुज्जीवन केले. केवढी अफ़ाट विद्वत्ता! आणि जीवनाचे एवढे प्रचंड ध्येय समोर ठेऊन ते चिकाटीने पूर्ण करणे हे अलौकिकच होय. अशा विद्वान आणि थोर व्यक्तीला वंदन करून आमचा स्वाभिमान काय कोसळणार की बुडणार होता? कालडीवरून जायचे एकमताने ठरले. धार्मिक शेटजी खूश्ह झाले. गुरूवायूर मात्र टाळले. तेथील मंदिर फ़ार सुंदर आहे असे आम्हाला वाटेत कोणीतरी पत्ता सांगणा-याने सांगितले. त्रिचूर (वा त्रिशूर) मार्गे कालडी. येथे थांबलो.
सुबक प्रवेशद्वार. आत कॅमेरा नेता येत नाही. तो प्रवेशाशी जमा करावा लागतो. पावती न घेता. प्रकाशचित्रे येथून निघतांना प्रवेशापाशी काढली. हे केंद्र आतून पाहतांना मला वरळीच्या नेहरू सेंटरची आठवण झाली. गोल इमारत. बाहेरील भिंतीला लागून आतील बाजूने जिना. दोनतीन फ़ूट लांबीच्या पाय-या. दर पांचसहा पाय-यांनंतर मजले किंवा कोनाडे केले आहेत. आद्य शंकराचार्यांच्या जीवनातील प्रसंगावरील व दंतकथांवरील देखावे आहेत. त्याबद्दल मी कांही लिहीत नाहीं. ते तेथेच जाऊन पाहावे. बहुतेक देखावे धार्मिक व श्रद्धाळूंसाठी आहेत. सुप्रसिद्ध 'मगर व शंकराचार्य' हा पण आहे.
संध्याकाळपर्यंत कोचीनपर्यंत पोहोचू असे वाटले होते. पण वाटेतच संध्याकाळ होऊ लागली. पावणेसहाच्यासुमारास इडप्पल नावाच्या छोट्या शहरसदृश गावात आलो. इडप्पल गावामधून्च रा.म.मा. १७ जातो. चांगले सोडाच, बरेसे देखील हॉटेल दिसेना. अखेर एका शॉपिंग सेंटरमध्ये हॉटेल बॉम्बे ची पाटी दिसली. जाऊन पाहिले. तीन खोल्यांचा ब-यापैकी सूईट होता. प्रशस्त लिव्हिंग रूम, प्रशस्त बेडरूम व अलीशान वेटिंग. भाडे रु. ३५०.०० फ़क्त. आश्चर्य वाटले. टॉवेल, साबण कांही नाही. गरम पाण्याची सोय नाही. हवा तर मुंबईपेक्षाआ जास्त उकाड्याची. चला, टेकायला स्वच्छ चांगली जागा तर मिळाली. ती देखील स्वस्तात.
आंघोळी करून फ़ेरफ़टका मारायला बाहेर पडलो. हे जे हॉटेल होते ते हॉटेल नव्हतेच. ते एक सभागृह वजा एक लग्नाचा हॉल होता. हॉल अगदी थेट पुण्यामुंबईच्या सिनेमा हॉलसारखा. लग्न गृह असल्यामुळे हॉलला लागून दोन सुईट होते. एक वरप़क्षासाठी वदुसरा वधूप़क्षासाठी. हे सुईट ते जेव्हा लग्न नसे तेव्हा 'बाँबे हॉटेल' होत असत. काय कल्पकता आहे. मुख्य म्हणजे गाड्या ठेवायला प्रशस्त तळघर होते. सुऱक्षा असलेले. गाडी धुवून पण मिळते.
मग फ़िरतांना जेऊनच हॉटेलात परतण्याचे ठरले. येथे पाहण्यासारखे काहीच नव्हते. जेवण्यासाठी हॉटेल शोधून ठेवत होतोच. ख्रिस्ती बंधूंची काही हॉटेले होती. दर मुंबईपेक्षा किंचित कमी. म्हणजे तसे महागच. चिकन/मटन मसाला रू. ७५.०० प्लेट च्या आसपास. बीफ़ रू. २५.०० फ़क्त. ईडली, डोसा कोठेच नव्हते. मल्याळमखेरीज दुसरी भाषा कोणाला येत नाही. दुकानांच्या पाट्यावर सगळ्या जिलेबी काढलेली. क्वचित एखादी फ़िरंगी पाटी. शेवटी एका हॉटेलातील वेटरने इडली, डोसा, चपाती, रोटी कोठे मिळेल ते मल्याळीमध्ये खाणा खुणा करून सांगितले. खाणाखूणा मात्र कळल्या. समोरच्या पदपथावर थोडे पुढे ते हॉटेल आहे असे त्याने सांगितले. एक गोल गरगरीत पण अतिशय आनंदी चेह-याचा मालक गल्ल्यावर बसला होता. फ़क्त गुडुगुडू. काय बोलतो कळेना. आम्ही काय बोलतो ते त्याला गुडुगुडू. त्याने एकाला हाक मारली. एक वेटर आला. त्याला मोड्तोड हिंदी बोलता येत होते. शाका. जेवायचे म्हटल्यावर आत एक वातानुकूलित क़क्ष होता तेथे नेले. थंड चिवट चपाती आणि सपक अळणी भाजी मिळाली. कसेबसे ढकलले. इडली डोसे फ़क्त सकाळी साडेआठला. इतर लोक थंड उकडा भात व थंड रस्सा खातांना दिसले. पण त्याचे रंगरूप पाहून ते न खाण्याचे ठरविले. पदार्थ चवदार नाही तर निदान गरम असला तर बरा लागतो हेहि या थोर लोकांना ठाऊक नसावे. चवीचे तर वावडेच असावे. प्यायला उकळते गरम पाणी. चहाच्या काढ्याच्या रंगाचे. त्यात कसलीशी पाने असतात. ते मात्र पिऊन पाहिले. बहुधा सर्वात चवदार पदार्थ हाच असावा. हे बहुधा त्या हवामानाला उपकारक असावे. पण हे गरम पाणी पिऊन तहान भागते हे खरे. दुसरे दिवशी सकाळी गरमागरम इडली व डोसा मिळणार. साडेआठला हॉटेल उघडल्यावर. चला, हेहि नसे थोडके. अर्धपोटी असल्यामुळे सकाळी येथेच न्याहारी करून निघण्याचे ठरले. वजन कमी होणार म्हणून वजनदार मंडळी खूष.
आता हे सगळे लिखाण एकसुरी(मोनोटोनस) व्हायला लागले आहे असे वाटते. खास काही घडले नाही, सामान्य गोष्टीच आम्हाला वेगळ्या अनुभवामुळे खास वाटल्या. माझ्या लिखाणाचा दर्जा मलाच सुमार वाटतो आहे. पुढे लिहावे की न लिहावे हा पेच पडला आहे. आपण उगाच वाचकांचा वेळ फ़ुकट घालवीत तर नाही ना असे वाटते. शैली बदलण्याचा प्रयत्न केला. पण मी भाषाप्रभू किंवा सिद्धहस्त लेखक नसल्यामुळे जमले नाही.
क्रमश:
प्रतिक्रिया
9 Mar 2008 - 6:34 pm | भडकमकर मास्तर
कालिकत अणि माहेचे वर्णन चांगले होते....
हे कालिकत आणि कोझीकोडे एकच हे मला देखील ठाउक नव्हते....
माझ्या लिखाणाचा दर्जा मलाच सुमार वाटतो आहे. पुढे लिहावे की न लिहावे हा पेच पडला आहे
अहो , या लेखात जाता जाता मित्रांबरोबर केलेल्या गमती आणि संवाद यांचे वर्णन कमी आहे ,त्यामुळे कदाचित तुम्हाला एकसुरी वाटत आहे... तुमच्या मित्रांची वर्णने आणि संवाद हे कदाचित तुमच्या आधीच्या प्रवासवर्णनातील सामर्थ्य असावे असे वाटते... पण अजून भाग येउद्यात्...छान चाललंय... :)
9 Mar 2008 - 8:11 pm | प्राजु
कालिकत म्हणजेच कोझिकोडे... वा ज्ञानात भर पडली.
दुकानांच्या पाट्यावर सगळ्या जिलेबी काढलेली. क्वचित एखादी फ़िरंगी पाटी. शेवटी एका हॉटेलातील वेटरने इडली, डोसा, चपाती, रोटी कोठे मिळेल ते मल्याळीमध्ये खाणा खुणा करून सांगितले. खाणाखूणा मात्र कळल्या.
हे मस्त. मला आमची कोडाईकॅनल ची ट्रीप आठवली.
- (सर्वव्यापी)प्राजु
9 Mar 2008 - 10:38 pm | प्रमोद देव
सुधीरराव असा धीर सोडू नका बुवा. दौरा मस्तच रंगतोय. पुढच्या ठिकाणी जायला आम्ही उत्सुक आहोत तेव्हा पेट्रोल भरून तयार राहा.
माझ्या लिखाणाचा दर्जा मलाच सुमार वाटतो आहे. पुढे लिहावे की न लिहावे हा पेच पडला आहे
असे म्हणून आम्हाला तुम्ही पेचात पकडताय. पण आम्ही तुम्हाला इतक्या सुखासुखी सोडणार नाही. पुढची कहाणी लवकरात लवकर पेश करावीत असा 'जनरल डायर' कडून आदेश काढायलाही आम्ही कमी करणार नाही. तेव्हा पुढे काय घडले ते शहाण्या मुलासारखे आम्हाला सांगा बघू.
10 Mar 2008 - 12:56 am | अनिकेत
कोझीकोडे हे तर आमचे घर.....
येथेच असतो सध्या...
माहि (माहे) केंद्रशासित प्रदेश आहे....दारू केरळाहून खूप स्वस्त....जाण्या येण्याचा खर्च सुटेल एवढी...
वायनाडला नाही गेलात?? अरेरे.....
केरळ...
(उसासे)
अनिकेत.
10 Mar 2008 - 1:16 am | अनिकेत
आता हे सगळे लिखाण एकसुरी(मोनोटोनस) व्हायला लागले आहे असे वाटते.
मुळीच नाही.... पुनःप्रत्ययाचा आनंद येतोय...
कालडीला मगरीने पकडल्यानेच आद्य शंकराचार्य संन्यासी बनले.. आणि बौद्धकाळात अद्वैतवाद आणि हिंदू धर्म वाचवला.... ब्राह्मसूत्र शांकरभाष्यात सर्वांचे खंडन केले...
येवढ्या लहान वयात संपूर्ण देश कसा काय हिंडले असतील? माझी अजून लोकल पकडायला फाटते...
गुरूवायूर miss केलेत? अरेरे...
अनिकेत
10 Mar 2008 - 7:27 am | सुधीर कांदळकर
सतलजजी, आपले डायाग्नोसिस बरोबर आहे. सूर सापडला. सुरुवात केली. मिपा कडून एवढे प्रेम मिळत आहे तर आता छळायला पुढील भाग टाकीनच.
10 Mar 2008 - 8:11 am | विसोबा खेचर
कांदळकरसाहेब,
लेखन छान सुरू आहे, ओघवतं होत आहे. वाचायला मौज येते आहे...
कृपया पुढील भागही येऊ द्या. नाउमेद होऊ नका. प
प्रतिसादांचं राजकारण, अर्थकारण वगैरे कसं करायचं, हे मी तुम्हाला सवडीने शिकवेन. :))
तात्या.
10 Mar 2008 - 8:36 am | बेसनलाडू
वर्णन उत्तरोत्तर रंगतंय. वाचत आहोत, लिहीत रहा.
(वाचक)बेसनलाडू
10 Mar 2008 - 2:21 pm | धमाल मुलगा
लय भारी...लय सापडली आहे की काका तुम्हाला.
अस॑ का म्हणताय? अहो तुम्ही लिहा हो बिनधास्त. मी आहे ना वाचायला! माणसान॑ कस॑ माझ्यासारख॑ रहाव॑...(राजासारख॑ वाच॑ल॑त का? तस॑ म्हणा हव॑ तर. ) वाटल॑... लिहिल॑... कोणाला आवडल॑ आन॑द वाटतो. नाही आवडल॑, माफ करा म्हणायच॑ पुढे चालू लागायच॑.
हे काय भलत॑च बोलताय?
आपल्या तर आवडल॑ बॉ. हे असले हाल मी बे॑गळूरला पहिल्या॑दा गेलो होतो तेव्हा सोसले होते. पण आता जमत॑ थोड॑ थोड॑ :)
असो,
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत....
-ध मा ल.
10 Mar 2008 - 8:16 pm | अभिज्ञ
सुधीरजी,
वर म्हणाल्य़ाप्रमाणे "लय भारी".
मला तर एकसुरि मुळिच वाटले नाही.
KEEP IT UP.पुढचे भाग हि लवकर येउ द्यात!
(आपल्यासारखाच एक भटक्या )अबब
10 Mar 2008 - 8:32 pm | चतुरंग
अहो तुमचा अनुभव जसा असेल तसेच प्रतिबिंब लिखाणात येणार, उगीचच ओढूनताणून प्रत्येक भाग नीटनेटकाच असावा असा आग्रह का? तो नैसर्गिक असणे जास्त मजेचे आणि खर्या आनंदाचे! वर सतलजने लिहिल्याप्रमाणे तुमच्या मित्रमंडळीतल्या खुसखुशीत संवादांची फोडणी मात्र जरा कमी पडली, ती तेवढी पुढच्या लेखात वाढवा. बाकी आम्ही वाचतोय काळजी नको.
चतुरंग
1 Dec 2018 - 10:09 pm | यशोधरा
ह्याचा पुढील भाग कुठे? का नाही लिहिलं पुढे?
2 Dec 2018 - 11:16 am | कंजूस
मी हे सावकाश वाचेनच. गोनिदांपेक्शा चांगलं लिहिताय.*१ / लिहिलय.
---
*१ गोनिदांचे दक्शिणवारा पुस्तक.
3 Dec 2018 - 7:18 am | सुधीर कांदळकर
लिहिले पण नेटवरच्या तांत्रिक अडचणींमुळे चढवता आले नाहीत. तेव्हा मुंबईत होतो.नेटवरचा माझा वावर चिकाटीचा नव्हता. संपर्क तुटला तर गडबड व्हायची. नंतर घरी येणार्या शाळकरी पोरांनी माझ्या नावाने ब्लॉग उघडून ब्लॉगवर चढवले.
http://pravaassudhirsange.blogspot.com/
इथे सापडतील.
इथे छोट्या गावात तर फार गडबड होते. मी मोबाईलची नेटसेवा वापरतो. मोबाईल खिडकीबाहेर ठेवावा लागतो. पावसाळ्यात पंचाईत होते. महागडा फोन प्लॅस्टीक पिशवीत घालून पावसात ठेवायला धीर होत नाही. ३जी नेट येतेजाते. कधी कासवगतीने चालणारे २जी. मी ते मोबाईलमधून हॉटस्पॉटने लॅपटॉपला संपर्क साधून वापरतो. कधी कधी दोनतीन वेळा मोबाईल आणि लॅपटॉप रीस्टार्ट केल्यावरच नेट मिळते. कधीकधी दोनदोन दिवस नेट मिळतच नाही. असो. आपण दाखवलेया स्वारस्याबद्दल धन्यवाद.
3 Dec 2018 - 3:13 pm | कंजूस
आताही हेच नेटचे प्रॅाब्लेम होतात? माझे ३जी फोन आणि वोडाफोनची गंडलेली ३जी सेवा याला उत्तर सापडलं. रिलाअन्स वाइफाइ रूटर. अलिबाग, गुजरात, राजस्थानमध्ये आढाच तपासले. पाच एमबीपीएस स्पीड मिळतोच. हजार रुपयाच्या डबीत काम झालं.