माध्यमांच्या प्रगतीचा प्रवास

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
9 Nov 2018 - 5:30 pm

(सूचना: हा लेख लिहितांना मी वापरलेली नावे किंवा वर्ष/साल मला उत्स्फूर्तपणे लेख लिहितांना जशी आठवली, सुचली तशी लिहिली आहेत. मुद्दाम त्यात अचूकपणा येण्यासाठी आणि नावांमध्ये आणखी भर घालण्यासाठी गुगलवर मी काहीही सर्च केलेले नाही नाहीतर त्यात कृत्रिमपणा आला असता. म्हणून कदाचित एखादे वर्ष किंवा कार्यक्रमाचे नाव इकडे तिकडे, पुढे मागे होऊ शकते, याची नोंद घ्यावी! उल्लेख केलेल्या माध्यमातली काही नावे, त्यावर मी व्यक्त केलेली मते आणि आवड नावड या माझ्या वैयक्तिक आहेत याची नोंद घ्यावी! येथे "माध्यमे" म्हणजे "प्रसार, संवाद, मनोरंजन, ज्ञान" माध्यमे आणि "माहिती साठवण्याची आणि पाठवण्याची" माध्यमे असे मी गृहीत धरले आहे! अर्थ मराठी २०१८ दिवाळी अंकात हा लेख प्रसिद्ध झाला आहे)

माझ्या मते "माध्यमे" म्हणजे त्या सगळ्या गोष्टी, ज्या फक्त बातम्याच नाही तर नवनवीन विचारांचा, कल्पनांचा आणि ज्ञानाचा सुध्दा सगळीकडे प्रसार करतात आणि त्यांची देवाणघेवाण करण्यासाठी सहाय्य करतात ज्याद्वारे समाजाची वैचारिक जडणघडण होत जाते. मग ती पुस्तके मासिके साप्ताहिके वर्तमानपत्रे असोत किंवा विविध टिव्ही चॅनल्स, चित्रपट, मालिका असोत किंवा मग पत्र, तार, लँडलाईन फोन, मोबाईल फोन, सोशल मीडिया असो! काही वेळेस प्रसारमाध्यमे आणि संवादमाध्यमे यांच्यातील सीमारेषा पुसट होऊन जाते. या सगळ्या माध्यमांच्या प्रगतीचा प्रवास आपण बघणार आहोत आणि त्यासोबतच माझ्या लेखन, वाचनाचा तसेच इतर छंदांचा प्रवासही!

मला तो काळ आठवतो जेव्हा मी जळगाव जिल्यातील रावेर तालुक्यातील केऱ्हाळे नावाच्या खेड्यात राहात होतो आणि शाळेत शिकत होतो. 1989 साली एके सकाळी आमच्या सायकलवरून येणाऱ्या पेपरवाल्याने नेहमीच्या वर्तमानपत्रासोबत एक नवीन मासिक टाकलं, "चित्रलेखा" नावाचं! माझ्या बाबांनी त्यांना विचारलं, "हे काय नवीन टाकलं?" सायकलवरून जाता जाता जात उंचावून तो म्हणाला, "सर, वाचून बघा, नवीन साप्ताहिक सुरू झालंय!" पुस्तक घरात पडल्या पडल्या मी हातात उचललं. सर्वच पानं गुळगुळीत असलेले पहिलेच मराठी साप्ताहिक मी बघत होतो. मी त्या पुस्तकाच्या पानांचा सवयीप्रमाणे वास घेतला. पाचच मिनिटांत बाबांना म्हणालो, "बाबा, आपण लावायचं का हे मासिक नेहमी करता?" बाबा हो म्हणाले कारण माझी वाचनाची आवड त्यांना माहीत होती. मुखपृष्ठावर बहिरी ससाण्याचे चित्र होते आणि किंमत होती 3 रुपये!

मग तेव्हापासून चित्रलेखा वाचनाची सवय झाली. चित्रलेखाने पहिल्याच अंकापासून वेगळेपणा जपलं. त्यातले मोजके पण प्रवाही भाषेत लिहिलेले लेख वाचनीय असायचे. "प्रभात पुष्प" पासून तर शेवटच्या "मसाला पान"पर्यंत! "मसाला पान" वरच्या बातम्या आणि शेवटी तळाशी वेलची सदरातील भन्नाट सुविचार हे सगळेच अफलातून वाचनानुभव द्यायला लागले. लोकप्रभाही छान साप्ताहिक! त्यात लेखांची संख्या जास्त आणि भरगच्च मजकूर असायचा. दोन्ही साप्ताहिके छान!

कालांतराने मग साप्ताहिक सकाळ, मार्मिक वगैरे आणि नंतर नंतर कॉलेज जीवन सुरू झाल्यापासून इंडिया टुडे, आऊटलुक अशा इंग्रजी मासिकांची ओळख झाली. 1995 ला दोन महिन्यांसाठी पुण्यात बारावीचे जोग क्लासेस केले तेव्हा पुण्यात सगळीकडे सकाळ पेपर प्रसिद्ध होता आणि चिंटू सुद्धा खूप लोकप्रिय होते. तसेच त्या काळापासून आजपर्यंत पुण्यात अमूलचे व्यंगचित्र असलेले पोस्टर्ससुद्धा लोक आवर्जून वाचतात. मात्र आमच्या गावाकडे तेव्हा "सकाळ"ची एवढी चलती नव्हती. आमच्याकडे लोकमत जास्त प्रसिद्ध होता. (अधून मधून "गांवकरी" यायचा. एक अतिशय वेगळाच पेपर वाटायचा मला तो!) आज पुण्यात रहात असल्याने सकाळ, प्रभात, महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता (जो माझ्या मते डोंबिवलीत जास्त लोकप्रिय आहे), पुण्य नगरी, सामना, संध्यानंद, नवा काळ वगैरे सारखी वर्तमानपत्रे वाचायला मिळायला लागली. मुंबईत नोकरीला असतांना, टाईम्स तसेच मिड डे हा उभ्या आकाराचा (टॅब्लॉईड) पेपर मी नियमित वाचायचो. लोकल ट्रेन मध्ये ही लोक हा पेपर वाचायचे पण आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. तसेच कधी कधी आफ्टरनून, मुंबई चौफेर असे पेपर बदल म्हणून वाचायचो. काही पेपर माझ्या माहितीप्रमाणे फक्त मुंबईत मिळायचे जसे फ्री प्रेस जर्नल, दि एशियन एज, नवशक्ती वगैरे.

त्या काळी आमच्या गावी दर शनिवारी लोकमत सोबत "चित्रगंधा" पुरवणी यायची आणि सोबतच "लोकमत कॉमिक्स" यायचे. त्यासाठी तर मी शनिवारची सकाळची शाळा कधी सुटेल आणि मी घरी जाऊन दोन्ही गोष्टी वाचेल असे मला होऊन जायचे. लोकमत कॉमिक्सच्या शेवटच्या पानावर "फँटम" या (अनेकांना फारशा न आवडणाऱ्या पण मला आवडणाऱ्या) सुपरहिरोचे मराठीत डब केलेले (भाषांतरित) क्रमशः कॉमिक्स छापले जायचे. आजच्या भाषेत ग्राफिक नॉव्हेल. ते मला भयंकर आवडायचे.लोकमत कॉमिक्स चा स्वतःचा असा एक गुप्तहेर होता पण त्याचे नाव आता आठवत नाही. त्या काळात दूरदर्शनवर महाभारत लागायचे त्याचा इत्यंभूत शूटिंग रिपोर्ट चित्रगंधा पुरवणी द्यायची. अधून मधून अमर चित्रकथा वाचायचो. त्याही काळात लोकमत गुरुवारच्या धूम नावाच्या पुरवणीत त्या काळच्या मानाने बोल्ड विषय असलेले लेख छापायचा. बाबांनी मला आणखी एक मासिक पोस्टाने लाऊन दिले होते: प्रगत विज्ञान, पण कालांतराने ते बंद पडले. चित्रलेखाचे "जी" हे सिनेक्षेत्रावर असलेले मासिक सुद्धा छान होते पण ते का बंद पडले काय माहिती?

"लोकमत कॉमिक्स" मध्ये वेगळ्याच प्रकारची अनिल मंडले यांची चित्रे बघायला मिळायची जी कुणातरी इंग्रजी चित्रकारासारखी (बहुदा मारिओ मिरांडा) होती नंतर कळले. लोकमत कॉमिक्समध्ये सुध्दा अनेक पौराणिक, ऐतिहासिक कथा असलेले जसे चाणक्य, महाभारत, रामायण यावर कॉमिक्स छापले जायचे. मला त्यामुळे ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टींची आवड निर्माण झाली आणि त्यात भर पडली ती माझ्या आजोबांनी (आईचे वडील) आम्हा सर्व मावस भावांसाठी "चांदोबा" ची वर्गणी भरली होती त्यामुळे! माझ्यासाठी ती एक पर्वणीच ठरली. तेव्हा चांदोबातली चित्रे काय सुरेख आणि अवर्णनीय होती! त्यातले विक्रम वेताळ तर पंचवीस कथांना कधीच पार करून गेले. वेताळ "पंचविशी" न होता दोघांनी मिळून चांदोबात कायम बस्तान बसवले. जणू काही "वेताळाच्या" अमर्यादित कथांचा तो जणू काही एक "विक्रमच" प्रस्थापित झाला होता. त्या वेळेस किशोर, कुमार, ठकठक, अमृत ही मासिकंसुद्धा मी वाचायचो. "अमृत" म्हणजे "रिडर्स डायजेस्ट" चे भारतीयीकरण!

मामांच्या गावी (आमच्या गावाच्या तुलनेत शहर) फैजपूर येथे (1993/94) 11वी आणि 12वी सायन्स शिकायला गेल्यानंतर बस स्टँडवर आणि तिथल्या लायब्ररीत विविध पुस्तके, मासिके आणि साप्ताहिके दिसायला लागली आणि वाचायला मिळत गेली. इंद्रजाल कॉमिक्स, राज कॉमिक्स, डायमंड कॉमिक्स (चाचा चौधरी, बिल्लू, पिंकी) वगैरे साठी आम्ही अक्षरशः नंबर लावायचो. इंद्रजाल मध्येही फँटम होताच, मॅड्रेक होता तसेच फ्लॅश गॉर्डन, फौलादी सिंग होते. लायब्ररीत आणि (सगळी भावंडं मामेभाऊ, मावस भाऊ मिळून) घरीसुद्धा! माझे मामा डिस्नेची डोनाल्ड डकची कॉमिक्स आणत त्यामुळे परदेशी कॉमिक्सची ओळख झाली.

माझे ड्राईंग चांगले असल्याने आणि वाचनामुळे लेखनाची आवड सुध्दा निर्माण झाली आणि मी अनेक कॉमिक्स स्वतः सुध्दा बनवू लागलो. अनेक व्यंगचित्रे बनवू लागलो. काही छापूनही आलीत. आम्ही कितीही घरे बदलली तरीही त्या ड्राईंग आणि लेखनाच्या वह्या आई नेहमी एका अल्युमिनियमच्या पेटीत सुरक्षित सांभाळून ठेवत होती. बारावीत असताना 1994 साली तर मी एक सायन्स फिक्शन कादंबरी सहज म्हणून लिहून काढली होती पण ती वही माझ्याकडून हरवली. तशीच काहीशी कथा काही वर्षांपूर्वी आलेल्या हॉलिवूडच्या "इंटरस्टेलार" चित्रपटाची होती.

गेल्या सहस्त्रकाच्या शेवटी शेवटी मुंबईत असतांना म.टा. आणि नव शक्ती मध्ये माझे लेख छापून यायचे. एकदा तर मराठी चित्रपटाच्या सासू सुनेच्या त्याच विषयांना कंटाळून मी म.टा. मध्ये लिहिलेल्या टीकात्मक लेखाला प्रदीप फाळके यांनी जोरदार प्रत्युत्तर देणारा लेख पुढच्या आठवड्यात दिला होता. आता मात्र मराठी सिनेमा अतिशय वेगवेगळे विषय हाताळतो आहे यात वाद नाही.

मामांकडे ज्युनिअर कॉलेज शिकत (1993/94) साल असतांना मला मामेभावकडून परदेशातील काही अनुवादित कादंबऱ्यांच्या जगाची ओळख झाली जसे डायरी ऑफ ऍन फ्रॅंक, नॉट विदाऊट माय डॉटर, गॉडफादर, बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य वगैरे. नंतर हळूहळू सुहास शिरवळकर, पु.ल. वगैरे अनके लेखकांची पुस्तके वाचली. नंतर नंतर सिडनी शेल्डन आणि इतर इंग्रजी लेखकांच्या कादंबऱ्या इंग्रजीतून मी वाचत असतो तसेच मी करत असलेल्या जॉबच्या अनुषंगाने लीडरशिप आणि मॅनेजमेंटवर सुद्धा अनेक पुस्तके वाचली. तसेच पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांवर सुद्धा!

1993 च्या सुमारास माझ्या एका मावसभावाने मला आम्ही सुटीत लहानपणी मामाच्या गावी भेटत असू त्यावेळेस "पेन फ्रेंड" ही संकल्पना सांगितली. IYS म्हणजे इंटरनॅशनल युथ सर्व्हिस ही संस्था जगभरातील पेन फ्रेंडशिप (पत्रमैत्री) करू इच्छिणाऱ्या मुलांकडून फक्त 35 रुपयात (त्यावेळच्या) एक फॉर्म भरून घ्यायची ज्यात आपली प्राथमिक माहिती, आपला देश, आवडी निवडी आणि ज्या देशाचा आपल्याला पेन फ्रेंड हवा आहे त्याचे नाव लिहायचे आणि मग काही दिवसांनी IYS कडून आपल्याला आपल्यासारख्याच आवडीनिवडी असलेला एका परदेशातील मुला/मुलीचा पोस्टल एड्रेस मिळायचा (आणि त्याला/तिला आपला). मग आपण आंतरदेशीय पत्राद्वारे व्यवहार सुरू करायचा. एकमेकांच्या देशाविषयी लिहायचे. एक वेगळाच अनुभव होता हा! माझ्या दिलेल्या अनेक देशांच्या चॉईसपैकी माझी सर्वात पहिली पेन फ्रेंड मला इटली देशातील मिळाली. तिचे नाव होते- गायडा ग्यूरियोला. दोनेक वर्षे पत्रव्यवहार चालला मग मी इंजिनियरींग कॉलेजला गेल्यानंतर कालांतराने बंद पडला. मग माझे इंजिनियरींग झाल्यानंतर इंटरनेटचा प्रसार झाला, हॉट मेल, याहू मेल, याहू मेसेंजर आले, ऑर्कुट आले, मग फेसबुकमुळे ऑर्कुट बंद पडले. मग ढीगभर सोशल मीडिया साईट्स आणि ऍप्स येऊन "सोशल प्रसार क्रांती" झाली. पण तरीही ही माझी पत्रमैत्रीण मला अजूनही कुठे सापडत नाही आहे. मात्र तिचे हस्ताक्षरातील सगळे पत्र अजूनही माझेकडे आहेत.

दूरदर्शन वगैरेचा प्रसार होण्यापूर्वी रेडीओ हे महत्त्वाचे प्रसार माध्यम होते. मात्र रेडिओलासुद्धा एफ एम मुळे आज चांगले दिवस आले आहेत. आमच्या गावात सर्वप्रथम रंगीत टीव्ही आला तो गावच्या सरपंचांकडे! 1984 साली जेव्हा इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती तेव्हा मला आठवतं की त्यांनी घराबाहेर तो टीव्ही ठेऊन दिला होता आणि त्या संदर्भातील बातम्यांचे थेट प्रक्षेपण बघायला अख्खा गाव तेथे लोटला होता. 1992 पर्यंत फक्त दूरदर्शन आणि सह्याद्री होते. काही केबल चालक त्या काळातही ओरिजिनल परदेशातील "स्टार टीव्ही" दाखवायचे, ज्यावर "क्रिस्टल मेझ" नावाचा कार्यक्रम मी बघायचो. पण मी ऐकलं की ते नंतर बंद करण्यात आलं म्हणे!

दूरदर्शनवर रविवारी रामायण महाभारत चाणक्य तसेच डक टेल्स, टेल्स स्पिन आणि इतर दिवशी ये जो है जिंदगी, देख भाई देख, चित्रहार, स्ट्रीट हॉक, सिग्मा, गोट्या, सुपर सिक्स, एक शून्य शून्य, परमवीर, शांती, चित्रगीत, द्विधाता, झोपी गेलेला जागा झाला, साप्ताहिकी, व्योमकेश बक्षी, किले का रहस्य, जंगल बुक, नुक्कड, सुरभि, भारत एक खोज, मुजरीम हाजीर है, हमलोग, एक आकाश संपलं अशा सिरीयल लागायच्या. आता अशा सिरियल्स पुन्हा होणार नाहीत. त्यावेळेस फक्त तेरा भागांची साप्ताहिक मालिका असायची पण आता मालिका वर्षानुवर्षे चालतात. धार्मिक आणि ऐतिहासिक मालिकांची आवड आणि प्रेक्षकवर्ग तेव्हाही होते आणि आताही आहेत, पण आता विविध सॉफ्टवेअरमुळे स्पेशल इफेक्ट्स देणे शक्य झाल्याने त्या सिरीयल आता आवर्जून बघव्याशा वाटतात.

2 ऑक्टोबर 1992 ला झी टीव्ही सुरू झाला आणि टीव्ही क्षेत्रात आमूलाग्र बदल व्ह्यायला सुरुवात झाली. फिलिप्स टॉप टेन, झी हॉरर शो, साप सीडी, बोले तारे, तारा (अति दीर्घ सिरीयल), सिनेमाचे ट्रेलर्स असलेला झलक असे कार्यक्रम लागायचे. झी टीव्हीने टीव्ही क्षेत्राचा चेहरा मोहराच बदलून टाकला. मग कालांतराने रोज रात्री दहा वाजता झी टिव्हीने बातम्या सुरू केल्या. भारतातील पहिल्या खासगी बातम्या सुरू करण्याचा मान झी टीव्हीलाच जातो. मराठीत पहिले चोवीस तास खासगी चॅनेल "अल्फा मराठी" तसेच चोवीस तास सिनेमा दाखवणारा "झी सिनेमा" वगैरे हे सर्वप्रथम झीनेच आणले.

सोनी हे चॅनल बोल्ड विषय असलेल्या कार्यक्रमांची निर्मीती करण्यात ट्रेंड सेंटर ठरलं. ("जस्ट मोहब्बत" ही सिरीयल मला चांगलीच लक्षात आहे आणि अगदी अलीकडची "ये उन दिनो की बात है"). सोनीने अनेक परदेशी सिरीयल 1997, 1998 च्या काळात हिंदीत डब करून आणल्या, जसे "आय ड्रीम ऑफ जिनी" आणि इतर काही बोल्ड थीम असलेल्या सिरियल्स!) तसेच "थोडा है थोडे की जरुरत है" ही अतिशय छान मालिका सोनीने दिली जात सचिन खेडेकरची छान भूमिका होती आणि अगदी अलीकडची "कुछ रंग प्यार के ऐसे भी" ही सुद्धा अशीच छान कौटुंबिक मालिका. सोनीने मात्र मराठी चॅनेल काढायला खूप उशीर केला म्हणजे 19 ऑगस्ट 2018!

झीने सुध्दा त्या काळात रात्री दहा वाजता थोडीशी बोल्ड "हसरतें" ही विवाहबाह्य संबंधांवर सिरीयल आणली होती (1995 सालाच्या आसपास बहुतेक) ज्यात माझा आवडता कलाकार "हर्ष छाया" होता पण त्याच्या ऑफिसातील त्याच्या सहकारी स्त्रीचे काम करणाऱ्या कलाकाराचे नाव आता आठवत नाही.

मग नंतर नंतर चोवीस तास बातम्या, चोवीस तास गाणे आणि चोवीस तास इतर बरंच काही दाखवणाऱ्या वाहिन्यांचा पूर आला. पण एबीसीडी मधल्या शेवटचे अक्षर (Z) वापरून सर्वात पुढे राहिली आणि बऱ्याच गोष्टींची सुरुवात करणारी ठरली. फक्त आता चोवीस तास हॉरर चॅनेल निघायचे बाकी आहे.

माहिती साठवण्याची माध्यमे पण वेगाने बदलत गेली. त्या काळात ऑडिओ आणि व्हिडीओ कॅसेट्स मिळायच्या.ऑडिओ कॅसेट्स मध्ये साईड A आणि B ला वेगवेगळ्या चित्रपटांची गाणी असायची. 40 ते 50 रुपयाला नवीन चित्रपटाची गाण्याची कॅसेट मिळायची. बाबांना गाणी ऐकण्याची फार आवड असल्याने ते नेहमी नवनवीन कॅसेट्स आणत. मग कालांतराने सीडी, डीव्हीडी आणि मग पेन ड्राइव्ह आणि आता तर मोबाईलच्या मेमरी कार्ड मध्ये हजारों गाणी (किंवा डझनभर सिनेमे) साठवता येतात. त्याही पुढे जाऊन आता तर मोबाईल मध्ये ऑनलाईन अँप्सद्वारे ऑनलाईन हवी ती गाणी शोधून ऐकता येतात. साठवण्याची गरज संपली. स्पीकर्समध्ये वायर जाऊन वायरलेस ब्लुटूथ स्पीकर, हेडफोन्स, इयर फोन्स आले.

अशीच काहीशी प्रगती संवाद माध्यामांची झाली. 1997 च्या आसपास मी इंजिनियरींगला होतो त्यावेळेस एसटीडी बूथची चालती होती. माझी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम इंजिनियरींग शाखा असूनही त्यावेळेस फक्त सेलफोन टेक्नॉंलॉजीवर आम्हाला एकच चॅप्टर होते कारण नुकतेच भारताचे मोबाईलच्या आगमनाची चाहूल लागली होती, पण सुरुवात झाली नव्हती. बाकी आम्हाला अँटेना, रेडिओ, टीव्ही (पिक्चर ट्यूबवाला) यांचा सगळा अभ्यास होता. आता तर एलसीडी, एलईडी टीव्ही आले. सिग्नल प्रक्षेपण (ट्रान्समिशन) आणि रिसीप्शनची पद्धत तीच. पूर्वी जागोजागी एंटेना, मग छोट्या केबल टीव्हीच्या डिश दिसायच्या मग सॅटेलाईट टीव्ही (आणि सिनेमा सुद्धा) आले आणि आता घरोघरी पर्सनल डिश टीव्ही दिसतात. आता तर इंटरनेट टीव्ही आला आणि सिरियल्स सुद्धा ऑनलाईन झाल्या. त्या आता "वेब सिरीज" झाल्या. चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहांची गरजच उरली नाही. मोबाईल कॅमेरामुळे अनेक हौशी लोकं स्वतः शॉर्ट फिल्म्स बनवून युट्यूब वर अपलोड करत आहेत. त्या फिल्म्ससुद्धा लोकप्रिय होत आहेत. या सगळ्या माध्यमांच्या प्रवासात आणि प्रगतीत काही नवनवीन व्यवसाय जोमाने फोफावले (उदा. सायबर कॅफे) तर काही व्यवसाय बुडालेसुद्धा!! या सगळ्या माध्यमांना मात्र जाहिरातींनी नेहमीच काबीज केले. आज (आणि पूर्वीही) असे कोणतेही माध्यम नाही ज्याद्वारे जाहिरातीचा प्रसार होत नाही. किंबहुना "जाहिराती" ह्या प्रत्येक माध्यमाचा जणू काही अविभाज्य घटकच (आणि त्या माध्यमांतून कमाई करण्यासाठी "गरजसुद्धा") झाल्यात!!

मोबाईल फोनबद्दल सांगायचे झाल्यास सुरुवातीला नोकियाचे साधे मोबाईल आले. त्यात मोनोफोनीक, पॉलिफोनीक रिंगटोन, मग स्मार्ट फोन्स आले. त्यात कोणतेही mp3 गाणे कट करून रिंगटोन वापरता यायला लागला. ब्लुटूथ आले. इन्फ्रारेड आले ज्याद्वारे मोबाईल फोनचा वापर टीव्हीचे रिमोट कंट्रोल म्हणून करता यायला लागला. मग वाय फाय आले. डाटा साठवता यायला लागला. डाटा साठवण्याचे माध्यम बदलत गेले. मग विविध मोबाईल ऑपरेटर टेलिकॉम कंपन्या आल्या आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली मग मोबाईल मध्ये इंटरनेट आले, त्यातील 2G, 3G, 4G आणि आता 5G येणार. आता तर रोज नवीन तंत्रज्ञान येत असतं.
या सगळ्या माध्यमांच्या बदलत जाणाऱ्या स्वरूपासोबत माझ्या लेखन, वाचन, चित्रपट, संगीत, चित्रकला या छंदांचेही व्यक्त होण्याच्या, लोकांपर्यंत ते पोहोचण्याच्या आणि ते साठवून ठेवण्याच्या पद्धतीत बदल होत गेले!

या सगळ्या माध्यमांच्या प्रगतीचा प्रवास हा असाच सुरू राहणार आहे. या प्रवासात आणखी पुढे काय काय स्टेशन्स येतील हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे!!

समाजमाध्यमवेध

प्रतिक्रिया

"या प्रवासात आणखी पुढे काय काय स्टेशन्स येतील हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे!!"

एकच गोष्ट परत परत लोकांना ऐकवत रहा हा मुलभूत नियम मात्र राहणारच.

लेख आवडला...

निमिष सोनार's picture

11 Nov 2018 - 6:43 pm | निमिष सोनार

.