समलिंगी संबंध ..

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
10 Nov 2018 - 8:02 pm

नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी मिपा वर आले आहे..
पुन्हा थोडी आता लिहित जाईन म्हणते.. तुमची मदत लागेल.. एक लेख लिहिते आहे..

समलैन्गिकत्व ...
लहानपणी म्हणजे साधारण ७वी मध्ये असताना एक मैत्रीण, घरी आलेले वर्तमान पत्र शाळेत घेऊन आली. आल्या आल्या तो पेपर हातात नाचवत म्हणाली.. ए हि बघा बातमी.. एका मुलीनं मुलीशीच लग्न केलं! असं म्हटल्या बरोबर आम्ही सगळ्याजणी त्या पेपर वर तुटून पडलो. नेमकं कसं कसं काय काय घडलं हे वाचायला प्रचंड उत्सुक होतो. बातमी निपाणी गावातली होती. हे असं काही घडणं म्हणजे किती चुकीचं वागतायत अशीच समजूत लोकांची होती, तेव्हाही आणि काही प्रमाणात आत्ताही!
आत्ता नुकत्यात न्यायालयाने कायद्या मधले कलम ३७७ काढून टाकले. काय होते हे कलम .. तर , जो व्यक्ती पुरुष, महिला, किंवा प्राण्याशी अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवेल त्याला तुरुंगवासाची शिक्षा होईल. तुरुंग वासाची हि शिक्षा १० वर्षापर्यंत वाढू शकेल, तसेच ती व्यक्ती दंडालाही पात्र ठरेल... हा कायदा १५० वर्षापासून अस्तित्वात होता. ब्रिटीश कालीन व्हिक्टोरियन नैतीकतेच प्रतीक म्हणुन त्याकडे पहिले जात होते. या कायद्याचा सर्वात मोठा जाच होत होता तो LGBT , म्हणजे लेस्बियन, गे, बाय सेक्शुअल आणि ट्रान्स जेन्डर लोकांना. कलम ३७७ हा जुनाट कायदा जरी आता रद्द झाला असला, तरी भारतीय समाज व्यवस्थेत अशा लोकांना समावेशक वागणूक द्यायला किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. या विषयावर जेव्हा बोलायचे ठरले तेव्हा बराच अभ्यास केला मी. आणि या संदर्भात माझे एक मित्र .. त्यांच्या परवानगीनेच त्यांचे नाव सांगते आहे.. डॉक्टर धनंजय वैद्य.. यांच्याशी फोन वर बोलले. कधी फेसबुक, कधी whats app च्या माध्यमातून त्यांच्याशी बरंच बोलणं झालं. शिक्षणाने एम बी बी एस आणि पी एच डी असलेले डॉक्टर मिसळपाव डॉट कॉम च्या निमित्ताने संपर्कात आले. उत्तम काव्य आणि ललित लेखक. जेव्हा तिथे इस्ट कोस्ट वाले मिसळपाव कर आम्ही भेटलो तेव्हा डॉक्टर बाल्टिमोर वरून ५ तास प्रवास करून न्यू जर्सी ला आले होते. तेव्हा त्यांच्याशी बोलताना, कविता ऐकताना, हास्यविनोद करताना कुठेही काहीही जाणवले नाही कि समोरची व्यक्ती स्ट्रेट नाही. मात्र एकदा मिसळपाव वर समलिंगी संबंधाबाबत बरीच जोरदार चर्चा झाली, वाद प्रतिवाद झाले.. आणि दुसरे दिवशी डॉक्टरांनी एक लेख लिहिला.. “कोणार्क च्या मंदिरातली शिल्पे” .. लेख वाचून डोकं सुन्न झालं होत. आपल्याशी बोलणारा, भरभरून चर्चा करणारा, इतका हुशार डॉक्टर माणूस गे असू शकतो यावर विश्वास ठेवणे कठीण होते. पण त्यांच्या लेखनातला संयतपणा, विषय मांडण्याची पद्धत, बाकीच्यांना पटो वा ना पटो पण मी माझे वेगळे असणे कबुल केले आहे.. मला मान्य आहे.. त्यामुळे मला त्यात काहीही लपवण्यासारखे वाटत नाही. .. हि त्यांची भूमिका कुठेतरी खोलवर घर करून गेली. त्यांच्या लेखनाबद्दल, ज्ञानाबद्दल आदर होताच पण त्यांच्या या निर्भीड आणि प्रामाणिक लेखनामुळे तो आदर दुणावला.

ते म्हणतात, “एखाद्या रणरणत्या दुपारी काही निमित्त असतं, आपण एकटे चालत चाललो असतो. म्हणतो, "रस्ता रिकामा कसा? इतकीही काही उन्हं नाहीत..." तसं आपलं आपल्याला ठीकठाकच वाटतं. पोचायचं तिथे पोचल्यावर कोणीतरी गडूभर पाणी आपल्यासमोर ठेवतं. पाणी घशाखाली उतरताना अंगावर काटा येतो. मग कळतं की त्या घोटाकरिता जीव केवळ तडफडत होता. अशीच, पण याहून कितीतरी मोठी जाणीव मला वयाच्या पंचविसाव्या वर्षी झाली.”

डॉक्टरकी शिकत असल्याने, स्त्री पुरुषाचं शरीर, त्यांच्या रचनेचं, क्रियांच ज्ञान तर त्यांना मिळतच होतं, पण आजूबाजूची मुलं मुलींना पाहण्यासाठी जशी बेजार होतात, तेव्हा स्पर्श करणे इतके सहज साध्य नसल्याने केवळ विचारांमध्ये , स्वप्नांमध्ये कशी ओली होतात, ते त्यांना माहित होतं.. ते ओलावण त्यांनीही अनुभवलं होतं .. पण तरीही कोणत्याही ‘तसल्या’ गप्पांमध्ये ते रमले नाहीत, कुण्या मुलीकडे चुकूनही त्यांनी चोरून पहिले नाही. मित्र त्यांना वैरागी म्हणत.. पण त्याबद्दलही त्यांना कधी तक्रार नव्हती. आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी, लायब्ररी मध्ये सहज समोर आलेलं समलिंगी संबंधावरच पुस्तक त्यांनी अभावितपणे चाळल आणि त्यांना स्वत:च्या गे असण्याचा साक्षात्कार झाला.. त्यांचं स्वप्नांमध्ये ओलावणं हे आपल्याच एखाद्या मित्राच्या विचारांनी होतं हे आठवलं आणि तिथून पुढचा प्रवास प्रचंड खडतर होता.. असे डॉक्टर म्हणतात. कारण स्वत:ची ओळख त्यांना इतकी १००% झाली होती, त्याबद्दल अर्थातच धक्का बसल्या नंतर “इतका का उशीर झालं ?” याची त्यांना खंत वाटली. मला इथे डॉक्टरांचा सकारात्मक दृष्टीकोन दिसतो. अर्थात हे आई वडिलांच्या पचनी पडणे प्रचंड अवघड होते. आणि पचनी पडल्यानंतर सुद्धा ते न स्वीकारणे, नातेवाईकांपासून लपवून ठेवणे.. या सगळ्याच गोष्टी झाल्या.. ! अर्थात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे.. आणि आज बाल्टिमोर मधल्या नामांकित वैद्यकीय संशोधकांपैकी एक अशी त्यांची ख्याती आहे.. मागच्या वर्षी डॉक्टरांनी ब्रायन McNally नावाच्या एका अशाच गे व्यक्तीशी लग्न केलं.. and they lived happily for ever there after! अशी हि डॉक्टरांची कहाणी. आज डॉक्टरांचे आईवडील ३-४ महिने पुण्यात ८ महिने अमेरिकेत त्यांच्या घरी असतात.. सुरुवातीला त्यांना आपला जावई म्हणून ब्रायनकडे पाहणं किती जड गेलं असेल याची कल्पना कदाचित आपण करू शकणार नाही. पण शेवटी माणसाचा स्वभाव हा प्रचंड जादूची चीज असते.. त्यांनी ब्रायन ला आपलंसं केलं.. किंबहुना ब्रायन ने त्यांना आपलंसं केलं. आज ते एक छानसं कुटुंब म्हणुन ताठ मानेने मेरीलँड प्रांतात राहत आहेत.

डॉक्टरांशी जेव्हा मी त्यांच्या लग्नाबद्दल बोलले तेव्हा ते म्हणाले.. की लोक काय म्हणतील म्हणुन बिन लग्नाचं राहणं हा पर्याय असू शकतो पण मला तसे करायचे नव्हते. माझ्या रिलेशनशिप मध्ये मला १००% द्यायचे होते. पुढे मुलं दत्तक घेणं वगैरे हा भाग नंतरचा पण, घर घेणे, जमीन घेणे या सारख्या गोष्टी लग्नामुळे खूप सोप्या होतात. यावरून एक जाणवलं कि तिथे समलिंगी संबंधांना विरोध तर नाहीच उलट या भारतासारख्याच, पण पुढच्या पायरीपर्यंत बदललेल्या अमेरिकेतील कायद्यामुळे त्यांनी लग्न करणे शक्य झाले आहे. आज spouse म्हणुन ब्रायनला सुद्धा डॉक्टरांसोबत त्यांच्या कॉन्फरन्सेस, पार्ट्या, गेट टुगेदर यांना आमंत्रण असतं. गणेशोत्सवाचा सण हे जोडपं पारंपारिक पद्धतीने तिथे साजरा करतं .. तिथल्या मराठी मंडळांमधून active असतं!

मानसोपचार तज्ञ म्हणतात कि, समलिंगी संबंध हा मानसिक आजार नाही. मानसिक नसेल तर ते नक्कीच शारीरिक आहे.. पण याला आजार कसं म्हणायचं? कारण हि शारीरिक भावना आहे जी समोरच्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण करते. जसे स्त्री पुरुष यांच्यात आकर्षण, प्रेम निर्माण होऊ शकतं तसच दोन स्त्रिया किंवा दोन पुरुष यांच्यामध्येही प्रेम आकर्षण असणारच! त्याला अनैसर्गिक असा शिक्का मारण्यात काय अर्थ आहे? गे किंवा लेस्बियन असणं हे कोणी मागून घेत नाही. ते जन्मत: आलेलं असतं! जसं एखादी स्त्री आपलं स्त्रीत्व मिरवते किंवा एखादा पुरुष आपलं पुरुषत्व गाजवतो, तसच या सगळ्यांनी समलिंगीत्व मिरवलं तर काय चुकलं? इतर देशातून जर त्यांना मानाची , सर्वसमावेशक वागणूक मिळते.. तर भारतातली माणसं काय काळ्या रंगाच्या रक्ताने बनलेली आहेत?? कि त्यांना आणखी जास्तीचा मेंदू दिला आहे देवाने? अहो माणसासारखा माणूस , तुमच्या बाजूला येऊन तो किंवा ती उभी राहिली तर समजणार सुद्धा नाही कि ते समलिंगी आहेत. त्यांचे इतर व्यवहार, हसणे, बोलणे सामान्य माणसांसारखेच आहे तर फक्त या एका शारीरिक बदलासाठी त्यांना वेगळी वागणूक द्यायची?

कायद्याने कलम ३७७ मागे घेतले तेव्हा भारतात बऱ्याच ठिकाणी दिवाळी साजारी झाली. आणि होणारच! या गोष्टीकडे प्रचंड सामान्य गोष्ट म्हणूनच पहिले गेले पाहिजे.. त्या व्यक्तींना सामान्य व्यक्ती म्हणूनच मान मिळाला पाहिजे.

जानेवारी २०१८ मध्ये यवतमाळ च्या हृषीकेश साठवणे नावाच्या ४४ वर्षाच्या एका गे तरुणाने विन नावाच्या अमेरिकन नागरिकाशी लग्न केले तेही यवतमाळ मध्येच.. हजारो लोकांच्या साक्षीने, पारंपारिक विवाह पद्धतीने! अगदी सप्तपदी वगैरे सगळ्या विधींसकट! अमेरिकास्थित असलेला हृषीकेश आपल्या लग्नाच्या गमतीजमती इतक्या सहजपणे सांगतो .. ते बघून मलाही खूप हसायला आलं. अर्थात त्याचेही आईवडील, सुरुवातीला धक्का, मग नाकारणे, मग लपवालपवी, मग स्वीकार या सगळ्या चक्रातून गेलेच. या लग्नाला कोणत्याही सामाजिक संस्थेचा विरोध होऊन प्रकरण चिघळू नये म्हणुन, ज्या हॉटेल मध्ये हे लग्न होते त्या बाहेर सुरक्षा रक्षक त्यांनी नेमले होते. हे असं सुरक्षा रक्षक नेमावे लागणे, किती चुकीचे आहेना..! पण हे लग्न म्हणजे माझ्या मते समानतेच्या बदलाकडे पडलेले एक पाऊलच म्हणावे लागेल.
डॉक्टर धनंजय काय किंवा हृषीकेश साठवणे काय... यांनी केलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे, घरच्यांच्या दबावाला आणि समाज भीतीला बळी पडून कोणत्याही मुलीशी लग्न करायला दिलेला ठाम नकार! पण जर त्यांनी असं केलं नसतं तर त्यांना दोष देण्यापेक्षा ती आपली चूक म्हणावी लागली असती. कारण आपण अजूनही जाहीरपणे समलिंगीना स्वीकारलेलं नाही. माणूस हा एकटा कधीही राहू शकत नाही.. त्याला कळपाची गरज लागतेच.. बाहेर फेकले जाण्याच्या भीतीने कितीतरी गे किंवा लेस्बियन व्यक्तीना आपली ओळख जगापासून लपवून ठेवावी लागत असेल. आणि लग्नही करावे लागत असेल.. एकावेळी किती आयुष्य उध्वस्त होत असतील!

स्त्री-पुरुष होण्यापेक्षा आधी माणूस होऊया.. माणूस होऊन त्या लोकांचा विचार करुया आणि मगच आपले स्त्रीत्व-पुरुषत्व इतरांवर गाजवूया! त्यांना.. आपले म्हणूया!
-प्राजू

मांडणीविचार

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

10 Nov 2018 - 10:47 pm | मुक्त विहारि

व्यक्ती तितक्या प्रकृती....

अर्धवटराव's picture

10 Nov 2018 - 11:26 pm | अर्धवटराव

समलैंगीकत्व मानसीकच असावं. स्त्री/पुरुषाच्या शरीरात तयार होणारे सेक्स हार्मोन्स स्ट्रेट्/नॉन स्ट्रेट टॅग लाऊन तयार होत नसावेत. त्या हार्मोन्सचं प्राबल्य होताना जे आकर्षक शरीर समोर आलं त्यानुसार सम/विषम लैंगीकता ठरत असावी. अर्थात, इव्हॉल्युशन प्रोसेसमधे विषम लैंगीकतेचं आकर्षण आपसूक अंतर्भूत झाल्यामुळे ते जास्त नॅचरल वाटतं. पण लहानपणापासुन भूक लागली असताना आपण घरी जे रेग्युलर अन्न खातो तशीच माणसाची आवड बनते. तसंच लैंगीक भूक डेव्हलप होत असताना जे कुठलं आकर्शक शरीर समोर आलं त्यानुसार स्ट्रेट/नॉन स्ट्रॅट वृत्ती तयार होतात.

नजीक भविष्यात भारतात एलजीबीटीचा स्वीकार फार काहि कठीण जाणार नाहि. एल/जी संख्या बर्‍यापैकी असेल तर त्याचा स्वीकार देखील लवकर होईल. आंतरजातीय विवाहांपेक्षा तर खचीतच लवकर होईल.

एल/जी चा बाऊ करण्याचं कारण नाहि. पण आपल्याकडे त्याचं फाजील कौतुक करण्याचा देखील धोका आहे. फाडफाड इंग्लीश बोलणं, दारु-सिग्रेट सेवन इत्यादी गोष्टी जशा ग्लॅमरच्या नावाखाली फोफावल्या तसच पुढेमागे गे/लेस्बो प्रकरण सुद्धा 'कूल' कॅटॅगरीत सामावल्या जाईल. गे/लेस्बो एका अर्थाने जसं नैसर्गीक/स्वाभावीक आहे तसच दुसर्‍या अर्थाने ते अनैसर्गीक वाटणं देखील स्वाभावीक आहे. कारण सेक्स प्रोसेसचा सरळ संबंध संतती उत्पन्नाशी आहे आणि तिथे गे/लेस्बो युसलेस होतं. संतती उत्पत्ती आणि त्याच्या पालन-पोषण-अधिकार ट्रान्सफरच्या पायावर कुटुंबव्यवस्था उभी राहिली, विवाह संस्था निर्माण झाली. त्याअनुषंगाने गे/लेस्बो काहि कामाचे नाहि. त्यावर तोडगे काढले आहेच, पुढेही काढले जातील. पण ते पॅचवर्क झालं.

असो. सर्वात महत्वाचं काय, तर सर्वेपी सुखिनः संतु | जो जे वांछील तो ते लाहो ||

मला थोडासा वेगळा प्रश्न पडतो...
हे नैसर्गिक म्हणावं की अनैसर्गिक?

नैसर्गिक म्हणावे कारण काही विशिष्ट हार्मोन हे कंट्रोल करतात असे म्हणतात.. आणि उत्क्रांती चा सिद्धांत जर पाहिला तर DNA कॉपी होताना होणाऱ्या error नुसार असे जीव जन्माला येणे पूर्णपणे नैसर्गिक आहे..
परंतु नैसर्गिक म्हटले तर निसर्गतः हे लोक यांच्या वेगळ्या रुचिमुळे पुनरुत्पादनास आणि पर्यायाने वंशसातत्यास मुकतात, म्हणजेच पर्यायाने निसर्गातून एलिमीनेट होतात..

आता प्रश्न असा आहे, की जे नष्ट होणे निसर्गाला अभिप्रेत आहे ते नैसर्गिक म्हणावे का? आणि याच न्यायाने मग डाउन सिन्ड्रोम असलेल्या मुलांच्या गर्भपातास विरोध का करू नये?