(अन्यत्र पूर्वप्रकाशित)
अस्वीकृती (Disclaimer) 1: या लेखातील काही भाग याअगोदर माझ्या फेसबुक भिंतीवर इंग्रजीत खरडलेला आहे.
अस्वीकृती 2: मी कायदा, मानवाधिकार, कामगार हक्क, लिंगसमानता, राज्यघटना यापैकी कोणत्याही विषयाचा अभ्यासक वा तज्ञ नाही.
अस्वीकृती 3: हा लेख केवळ एक वाचिक विचारच्छल (Loud thinking) म्हणून वाचावा. यातील सर्व मते ही माझीच आहेत, परंतु त्या दगडावरील रेघा नव्हे. सबळ तार्किक प्रतिवाद झाल्यास मी माझी मते प्रांजळपणे बदलतो.
---
शीर्षक कुणाला असंवेदनशील किंवा प्रक्षोभक वाटण्याची शक्यता, पण तसे काही नाही. उद्देश कळ लावून देणे हा नसून एक पर्यायी भूमिका मांडणे हा आहे. पर्यायी या अर्थाने की लैंगिक दुर्वर्तन या महत्वाच्या विषयाचे पदर अद्याप पूर्णतः सर्वांना स्पष्ट नसल्यामुळे मते बनविण्यात व व्यक्त करण्यात सामान्यजनांना (पटाईत कार्यकर्ते व विचारवंत वगळावेत) काही अडचणी येत आहेत असे मला दिसते. अनेकजण प्रयत्न करूनही आपल्या लिंगविशिष्ट अथवा पुरुषसत्ताकवादी विचारचौकटीपलीकडे जाऊ शकलेले नाहीत. सरसकट स्त्रीसमर्थक वा पुरुषसमर्थक ढोबळ भूमिका घेणारे तर खूप आहेत. काही तर निव्वळ व्यक्तिसापेक्ष भूमिका घेऊन ("अमका मनुष्य कधीही असे वागू शकणार नाही") आपले समाधान करीत आहेत. तसे करणे अज्ञानदर्शक असले तरी त्या त्या व्यक्तीचा तो प्रामाणिक विश्वास असू शकतो.
माझी व्यक्तिगत मतेही अजून विस्कळित आहेत हे आधीच मान्य करतो. लेखातही ती तशीच अस्ताव्यस्त रूपात येणार हे उघड आहे. पण वैचारिक सुसूत्रता व स्पष्टता येण्यासाठी ती मते आहेत त्या अनाकार शब्दांत व्यक्त करण्याची खटपट करणे व जाणकारांचे त्यावरील प्रतिसाद अभ्यासणे हा एकच मार्ग मला दिसला.
आपण सर्वप्रथम हे स्वीकार करू की मराठी भाषेत या विषयाची सांगोपांग चर्चा होण्याजोगी शब्दसंपदा अजून उपलब्ध नाही. असल्यास मला ज्ञात नाही. 'लैंगिक छळ' याच्या छटा मला पुरेशा व्यापक न वाटल्यामुळे मी 'लैंगिक दुर्वर्तन' असा शब्दसंच वापरतो. तोही पुरेसा समर्पक आहे का याची खात्री नाही, पण सध्या तरी चालवून घेऊ. यात अनुचित स्पर्श, अनुचित वर्तन-भाषा इथपासून ते पदसिद्ध सामर्थ्याचा गैरवापर, लैंगिक धमक्या आणि बलात्कार हे सर्व अभिप्रेत आहे. आदर्श पातळीवर हा प्रमाद लिंगनिरपेक्ष असणे गृहीत आहे.
या लेखापुरती मात्र 'व्यवस्थाडोलाऱ्याच्या अंतर्गत पुरुषाने स्त्रीप्रति केलेले लैंगिक दुर्वर्तन' ही मर्यादा आखून घेतलेली आहे.
दुसरी महत्वाची बाब ही की काही विशिष्ट कृत्ये हा गुन्हा ओळखला जात असला तरी व्यापक लैंगिक दुर्वर्तन हा मात्र दखलपात्र गुन्हा नाही (समजण्यात माझी चूक झाली असेल तर विधितज्ञांनी दुरुस्ती करावी). जोवर संबंधित व्यक्ती लेखी तक्रार करत नाही तोवर कायदेशीर प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही. किंबहुना यात कायदेशीर कारवाई ही किचकट, मनस्तापदायक व अंतिमतः निष्फळ ठरण्याचीच जास्त शक्यता असते.
तिसरी व सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात 'संमती' हा एकमेव कळीचा मुद्दा आहे. ही संमती सज्ञान व सबल असणे हे अध्याहृत आहे. उदा. वरिष्ठाने वेळेवर पगार दिला नाही अथवा नोकरीत कायम केले नाही तर जिची मुले उपाशी राहतील अशा स्त्रीने मनावर दगड ठेवून शय्यासोबतीस दिलेला रुकार ही संमती होऊच शकत नाही. कृपया नोंद घ्यावी की 'मुले उपाशी राहतील' हे केवळ एक उदाहरण आहे. शरीरसुखास रुकार न दिल्यामुळे कनिष्ठाची दूरगावी बदली करणे, विद्यार्थी(नी)स कमी गुण देणे हे याच वर्गात मोडेल. गरजांचा वैयक्तिक अग्रक्रम हा कार्यक्षेत्र व आकांक्षा यानुसार ठरतो आणि त्यात गैर काहीच नाही. 'पण लठ्ठ पगार तर मिळेलच ना?' किंवा 'तरीही नोकरी मिळाली की!' ही विधाने येथे गैरलागू ठरतात. तसेच 'तिची इतरही बरीच प्रेमप्रकरणे आहेत' हे विधानही अस्वीकार्य ठरते.
चौथा मुद्दा असा की (इथे बहुधा मजदिशेने तलवारी उपसल्या जाणार!) स्त्रीजातिप्रति पुरुषांचे अनावर आकर्षण हे संपूर्णपणे नैसर्गिक असून पुरुषांचे स्वतःचेच त्यावरील नियंत्रण कमालीचे डळमळीत असते. तसेच कोणत्याही स्त्रीकडे कोणत्याही पुरुषाने टाकलेला पहिला दृष्टीक्षेप हा निखळ शारीर व शारीरच असतो. हे अनादी सत्य असून त्यावर कुणाचाही इलाज आजवर चाललेला नाही. निसर्गाची योजनाच तशी आहे. कुणी रूपगुणगर्विता आसपास वावरत असेल तर पुरुषाच्या (मग तो कितीही सालस असेना) मानसिकतेवर त्याचा हमखास परिणाम होतो. सरसकटीकरणाचा धोका पत्करून मी असे म्हणेन की अगदी समलिंगी पुरुषही पहिल्या नजरेत आधी स्त्रीचे वजन-मापच जोखतो. लैंगिक गैरवर्तनावर चर्चा करताना पुरुषाची आदिम लैंगिक प्रेरणा हाच जणु काही गुन्हा आहे असे मानण्याची चूक होऊ नये. (हे लैंगिक दुर्वर्तनाचे समर्थन नाही).
या आकर्षणाचा आवेग कुणा पुरुषाला किती झेपेल हे सांगता येत नाही. कुणी ते लपवील, कुणी व्यक्त करील. ते ज्याच्या त्याच्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून आहे. माझे मत असे की हे आकर्षण प्रामाणिकपणे, निरलसपणे थेट त्या स्त्रीपाशी जाऊन शब्दांत कथन करणे हे लैंगिक दुर्वर्तन मानले जाऊ नये.
अर्थात मालक-नोकर, वरिष्ठ-कनिष्ठ, गुरु-शिष्य वगैरे असमतुल्य नात्यांत अशा आकर्षणास, नाहीतर मग त्या नात्यास तिलांजली देणेच योग्य हे ओघाने आले. पण तसे नेहमी होत नाही. पदसिद्ध अधिकार वापरण्याचा मोह कुणा पुरुषाला होणारच नाही अशी ग्वाही कोण देईल? पुरुषाची लैंगिक प्रेरणा कमालीची प्रबळ असते असे वर म्हटलेच आहे. ती विवेकबुद्धिचा प्रसंगी पराजय करू शकते. (येथे स्त्रीचा संमती-अधिकार कमी लेखणे हा माझा उद्देश मुळीच नाही).
'संमती' हा एक भलताच पेचात टाकणारा मुद्दा आहे. 'पिंक' हा चित्रपट पाहताना मी विचारात पडलो होतो. तो व्यावसायिक चित्रपट असल्यामुळे प्रेक्षकांच्या सोयीसाठी त्यातील खलनायक हा शुद्ध काळा दाखवलेला होता. परंतु संमती हा गुंतागुंतीचा मामला आहे. ती दिलेली होती का, असल्यास ती निखळ होती की काही छुप्या उद्देशाने दिलेली होती (ही शक्यता नाकारता येत नाही), संमती मागे कधी घेतली हे केवळ संमतीदात्रीच जाणते. लिखापढी होत नसल्यामुळे पुरावा उरत नाही. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या एकंदर गदारोळात इतरांना निश्चित भूमिका घेणे अशक्य होऊन बसते. इतकेच नव्हे तर अमुक एका घटनेवर कुणा त्रयस्थ अमक्याने-अमकीने काय भूमिका घेतली यावरून त्याचे-तिचे चारित्र्य व विचारबैठक याचा पंचायती निवाडा होऊ घालतो. यातून वातावरण गढूळ होण्यापलीकडे काही साध्य होत नाही.
लैंगिक 'संमती' ही स्पष्ट शब्दात किंवा लेखी कधीच दिली जात नाही. त्यामुळे जोपर्यंत लैंगिक मर्यादा व अपेक्षा यांची योग्य व्याख्या पुरुषाला (आणि स्त्रीलाही!) मुखोद्गत होत नाही, तोवर हा मुद्दा अनुत्तरितच राहणार.
एक विरुद्धदिशा उदाहरण घेऊ. एक पुरुष व स्त्री (दोघेही अविवाहित) यांचा परिचय होतो. ते भेटू लागतात. सोबत सिनेमा पाहतात. संवाद व स्नेह वाढतो. कदाचित शारीरिक जवळीकही वाढत असेल. एके दिवशी स्त्री विचारते, "आपण लग्न कधी करायचे?". यावर पुरुष म्हणतो, "असा माझा मुळीच विचार नाही. तुझ्याशी लग्न करीन असे मी कधी म्हटले?". शब्दशः तो सत्य बोलत असेलही. पण त्याच्या वर्तनातून स्त्रीने वाचलेले संकेत अगदी वेगळे होते.
असेच आपल्याला मीटूसंबंधी म्हणता येईल काय? आपल्यासोबत सवंग लैंगिक हास्यविनोदात भाग घेणारी, मद्यपान- धूम्रपान करणारी, आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करणारी महत्वाकांक्षी स्त्री शारीरिक जवळिकीस नकार देणार नाही असा समज जर कुणी पुरुषाने आपल्या बौद्धिक कुवतीनुसार करून घेतला तर तो अयोग्य आहे हे त्याला कसे समजवणार? (मी स्वतः असा समज कधीही करून घेणार नाही कारण माझी 'होकार' या शब्दाची व्याख्या वेगळी आहे. पण प्रत्येक पुरुष आणि स्त्री तसे नसतात.)
माझ्या काही परिचित स्त्री-सुहृदांच्या मते, जरी उघड संमती दर्शवली गेली नसली तरी स्त्रीकडून गेलाबाजार काहीतरी प्रोत्साहन मिळाले असल्याखेरीज असे प्रकार वारंवार घडूच शकत नाहीत (थेट बलात्कार वगळता). माझ्या काही वैयक्तिक अनुभवांवरून (आगाऊ खुलासा: हे सर्व विवाहपूर्व आहेत!) सांगू इच्छितो की स्त्रीने जर अशी तटबंदी आपल्याभोवती उभारली तर ती भेदणे पुरुषास केवळ अशक्य असते. 'छह दिन, लडकी इन' वगैरे बाष्कळपणा केवळ चित्रपटांतून पुरुष प्रेक्षकांना बहलवण्यासाठी अस्तित्वात आलेला असतो.
पण यावर अधिक भाष्य करण्यास मी, पुरुष असल्याकारणाने साहजिकच जरा बिचकतो. स्त्री वाचकवर्गाने ते आपल्या प्रतिसादांद्वारे करावे अशी विनंती. कारण या मुद्द्याचा सोक्षमोक्ष लावणे निकडीचे आहे.
तरीही, एकूण सामाजिक शक्ति-असमतोल पाहता, आरोप करणाऱ्या स्त्रीवर प्रथमदर्शनी विश्वास ठेवणे भाग आहे असे मी मानेन.
पण मुख्य मतभेद हे इथेच सुरू होतात. विषयाला सतराशे साठ फाटे फुटतात- फोडले जातात. परंतु यात परंपरागत पुरुषसत्ताक सामाजिक पूर्वग्रहांचा मोठा वाटा आहे असे जे समजले जाते ते खरेच तसे आहे का? हा यक्षप्रश्न मजसमोर कधीचा ठाकलेला आहे. Battle of the sexes हे अनंतकाळापासून चालत आले असून ते तसेच चालत रहाणार यात शंका नाही. लिंगविशिष्ट चौकटीबाहेर विचार करणे बहुतेक लोकांना शक्य होत नाही.
शिवाय याला दुसरी बाजूही आहे. लैंगिक आकर्षण हे स्त्रीलाही पुरुषाप्रति असते. कोण स्त्री कोणत्या पुरुषाकडे कोणत्या गुणासाठी आकर्षित होईल हे काही गणिती समीकरण नाही. पुरुष अविवाहित आहे का, निर्व्यसनी आहे का, त्याचा वयोगट, रंगरूप, आरोग्य वा सांपत्तिक स्थिती काय आहे, पूर्वेतिहास काय आहे वगैरे सांसारिक निकष प्रत्येक स्त्रीला तितकेच महत्त्वाचे वाटतील असे काही नाही. अश्मयुगीन लिंगश्रेष्ठत्वनियम पाळणारा, वर्चस्ववादी, पीळदार, हिंसक, बाहेरख्याली पुरुषही कुणा स्त्रीला आकर्षक वाटू शकतो. कुणी काय सांगावे? अगदी दारू पिऊन मारझोड करणाऱ्या नवऱ्याला मायेने सांभाळणाऱ्या अनेक बायका समाजात आढळतात. त्यामुळे सगळा प्रकार पराकोटीचा सापेक्ष होऊन बसतो. (स्त्रीचे निवडस्वातंत्र्य इथेही तितकेच लागू होते.)
खरेतर तो तसाच सापेक्ष असणे निसर्गास अपेक्षित आहे. कपट, शोषण व बळजबरी यावर आधारित नसलेले कोणतेही स्त्रीपुरुष नाते हे नैतिकच असते, इतका हा साधासोपा नियम आहे. परंतु हितसंबंध व शक्तिसमीकरणे यांच्या रक्षणासाठी मानवसमाज अनेक फुटकळ पोटनियम तयार करून ठेवतो व गुंतागुंत वाढते. आपली सामान्य सामाजिक धारणा अशी आहे की आपण लैंगिक व्यवहारांना इतर सामाजिक व्यवहारांपेक्षा वेगळे व अधिक मूल्यवान मानतो. वास्तविक पहाता हे विभाजन कृत्रिम व अनैसर्गिक आहे. लैंगिकता ही स्त्रीपुरुषसंबंधांचा अविभाज्य व महत्त्वाचा भाग असली तरी हे संबंध कालांतराने लैंगिकतेच्या पल्याड जातात, जावेच लागतात. परंतु शारीरिक संबंधांना आपला 'आधुनिक' समाज 'be all and end all' अशा दृष्टीने पहात असतो. व्यक्तींनाही तो दृष्टिकोन नाईलाजाने स्वीकारावा लागतो व यथावकाश व्यक्तिगत पातळीवरही त्याचे अंतर्गतीकरण (internalisation) होते.
लैंगिक दुर्वर्तन या समस्येचा प्रादुर्भाव नक्की किती आहे, कोणत्या समाजस्तरात आहे यावरही टोकाचे मतभेद दिसतात. एकीकडे पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेची विदारक वास्तविकता, राजरोस घडणारी अपहरणे- बलात्कार- लैंगिक दास्य, सामाजिक वैमनस्यातून होणारे भीषण लैंगिक गुन्हे आणि दुसरीकडे चित्रपटविश्वातील विरळ, झगमगाटी, ऐषोआरामी, चढाओढीच्या वातावरणात होणारे अर्धसंमत लैंगिक शोषण या दोहोंना एका तराजूत कसे तोलणार हा सवालही अगदी रास्त आहे. 'स्त्रीजातीची एकजूट' वगैरे घोषणा ऐकताना कितीही स्फूर्तीदायक भासल्या तरी जिच्या हाती माध्यमरूपी कर्णा आहे तिचाच आवाज सर्वदूर पोचणार हे उघड आहे.
मला न उलगडलेला सर्वात मोठा सवाल, या चळवळीत पुरुषांचा सहभाग किती व कोणत्या पातळीचा असावा हा आहे. ही 'समस्या' चार भिंतींआडून बाहेर काढून भरचौकात आणली गेली हे निःसंशय स्वागतार्ह आहे. हे स्त्रीवर्गाने केवळ स्वतःच्या हिंमतीवर, माध्यमक्रांतीचा सजग वापर करत साध्य केले आहे. सुजाण पुरुषांनी याला पूर्ण समर्थन द्यावे असे कुणीही (स्त्री!) म्हणेल.
परंतु प्रत्येक 'संता'ला भूतकाळ असतोच. प्रत्येकाच्या गतायुष्यात एखादी चित्तरकथा घडलेली असतेच (ज्यांची नसेल त्यांना माझा भक्तियुक्त दंडवत!). बालवयातील पुरुष, पौगंडावस्थेतील पुरुष, प्रौढ पुरुष हे कमीअधिक प्रमाणात उत्क्रांत (Evolve) होतच असतात. सामाजिक घटकांचा प्रभाव पडून त्यांची मानसघडण (conditioning) निरंतर चालू असते. शरीरात नैसर्गिक बदलही होत असतात. पुरुषाच्या हातून कधीकाळी, या विकासप्रक्रियेच्या विशिष्ट टप्प्यावर घडलेले एखादे अनुचित वर्तन (यातून कायदापरिचित अपराध वगळावे) त्याच्याविरुद्ध गणले जाईल व त्याचा जाहीर जमावनिवाडा होईल ही भीती अनेकांना भेडसावत असली तर त्यात आश्चर्य नाही.
असो. आजपर्यंत 'तोंडाला कुलूप' या तत्त्वावर टाळली जाणारी चर्चा आता प्रत्येकाच्या शक्त्यनुसार उघडपणे व निर्भीडपणे होऊ लागली असून चर्चाविषयाचा सखोल ऊहापोह करण्याचे प्रयत्न होत आहेत ही माझ्यामते सर्वात लक्षणीय गोष्ट आहे. ज्याप्रमाणे 2014मधील मोदी यांच्या देदिप्यमान विजयाने अनेक दुढ्ढाचार्यांना आपली भेकड, पोकळ धर्मनिरपेक्षता पुन्हा तपासून पाहण्यास भाग पाडले तसेच मीटू चळवळीमुळे आपण सर्व आपली गृहीतके व त्यांचे वेगळाले पैलू प्रामाणिकपणे पडताळून पाहण्यास उद्युक्त होऊ अशी आशा. मजकडून या चळवळीस सस्नेह शुभेच्छा.
प्रतिक्रिया
23 Oct 2018 - 5:39 pm | माहितगार
हा धागा चर्चा जरा वेगळ्या स्तरावर घेऊन जाऊ इच्छित दिसतो आहे, तरी पण मिपावर नाना आणि तनुश्री या धाग्यात काही अनुषंगिक चर्चा झाली आहे तेव्हा त्यचा दुवा इथे केवळ संदर्भासाठी
23 Oct 2018 - 6:26 pm | यशोधरा
सुरेख आणि अतिशय संयत लेख. खूप आवडला.
26 Oct 2018 - 12:17 pm | चलत मुसाफिर
धन्यवाद.
23 Oct 2018 - 7:29 pm | उगा काहितरीच
लेखामधे बराचसा समतोल साधल्या गेला आहे. काही ठिकाणी लेखकाची अपरिहार्यताही अधोरेखीत होते. (लेखकाने ते ही प्रांजळपणे नमूद केलेलेच आहे.) तसा विषय खरोखरीच चर्चा करण्यायोग्यच आहे. मुलभूतपणे , स्त्रीने हसून दाद दिली , खेळताखेळता अभावीतपणे टाळी दिली, कुठली व्यक्तीगत समस्या बोलून दाखवली इत्यादींचा अर्थ काढणे हे प्रसंगी पुरूषासाठी खूप अवघड असते. (असे माझे व्यक्तीगत मत) बहुतांशी हे स्वाभाविक असते यात कुठल्याही प्रकारचा इशारा नसतो. पण इशारा असेल तर काय ? हा प्रश्न खूप अवघड आहे. लैंगिक संबंधासंदर्भातील परवानगीची संदिग्धता हा एक खूप कळीचा मुद्दा आहे. याबाबतीत स्पष्टता ही काळाची गरज वाटते. पण निसर्गतः स्त्री स्वतः पुढाकार घेत नाही किंबहुना घेऊ इच्छित नाही हाच खूप मोठा विरोधाभास नमूद करावासा वाटतो. एकंदरीत स्त्रीने प्रौढपणे , कुठल्याही प्रकारच्या दडपणाला बळी न पडता स्वतःच्या भावनांचे प्रदर्शन योग्य व्यक्तीपुढे करणे शिकले पाहीजे आणि याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे स्त्रीच्या कुठल्याही प्रकारच्या जवळीकीला पुरूषाने त्याच नजरेने न पाहणे शिकले पाहिजे.
26 Oct 2018 - 12:18 pm | चलत मुसाफिर
लेखकाची अपरिहार्यता समजून घेतल्याबद्दल
:-)
23 Oct 2018 - 7:41 pm | नाखु
किमानपक्षी पाच सहा भाग एकाच धाग्यात गुंफून सत्यशोधन करायचा प्रयत्न केला आहे.
खरं सांगायचं तर वाचताना धाप लागली.
माहितगार यांचे नंतर लांब पल्ल्याची आणि जर तर च्या कसोटीत बसवलेला लेख आहे.
अर्थात धागा विषयाला अनेक कंगोरे, पैलू आहेत.
पदाचा, पैशाचा, परिस्थिती चा गैरफायदा घेतला जाऊ शकतो पण तोही दोन्ही बाजूंनी हेच लक्षात घेतले जात नाही.
तरीही परिस्थितीमुळे बांधकाम साईट पासून ते बहुराष्ट्रीय कंपनीत अशी किमान पंधरा ठिकाणी नोकरी करावी लागली त्या अनुषंगाने आलेल्या अनुभवांवर आधारित इतकं नक्की सांगू शकतो की,काम श्रेणी उतरंडीवर शेवटच्या पायरीवर असलेल्या स्त्री कर्मचारी सर्वात जास्त शोषणाचे बळी असतात.
आणि ते कौटुंबिक जबाबदारी असलेले असतील तर काहीच पर्याय उपलब्ध नाही म्हणून आयुष्य कंठतात.
निमशहरी व ग्रामीण भागात हे शोषण लोण अगदी शेतमजूर पातळीवर आहे.(एका बी बियाणे कंपनीत नोकरीला असताना गट अधिकारी यांनी सांगितले होते)
अधिक उणे क्षमा.
पांढरपेशा मिपाकर नाखु
26 Oct 2018 - 12:19 pm | चलत मुसाफिर
सहमत. हा मुद्दा सध्या दिसतो त्याहून अधिक व्यापक व कंगोरेदार आहे.
23 Oct 2018 - 8:29 pm | झेन
पण
या लेखापुरती मात्र 'व्यवस्थाडोलाऱ्याच्या अंतर्गत पुरुषाने स्त्रीप्रति केलेले लैंगिक दुर्वर्तन' ही मर्यादा आखून घेतलेली आहे.
एकाच दिशेने बघायचे ठरवलं की स्कोप मर्यादीत राहणार. विशेषतः आजकाल दोन व्यक्ती (कुठल्याहीस लिंगाच्या) सोईस्कर पणे दूस-याला वापरू पहातात नाही जमलं की सवडीने बोंब मारतात, हे चित्र फक्त पेज 3 बद्दल नाही नॉर्मल ऑफिसमधे सुध्दा हे प्रकार चालतात. अत्यंत सापेक्ष आहे.
26 Oct 2018 - 12:21 pm | चलत मुसाफिर
लेख बंदिस्त व्हावा यासाठी मर्यादा आखून घेतली होती. अधिक पैलू चर्चेतूनसमोर यावेत अशी अपेक्षा
24 Oct 2018 - 9:53 am | प्रकाश घाटपांडे
लैंगिकतेच शमन कि दमन?
हा लोकसत्ता ५ जाने २०१३ मधील मंगला सामंत यांचा लेख
लैंगिकतेचे शमन हवेच
हा लोकसत्ता १२ जाने २०१३ मधील मंगला सामंत यांचा लेख
हे लेख त्यावेळी निर्भया प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर असले तरी लैंगिकता समजावून घेण्यासाठी फार उपयुक्त आहेत. नैतिकता व लैंगिकता यांचा परस्पर संबंध हा फार गुंतागुंतीचा आहे आपल्या समाजात. असो...
26 Oct 2018 - 12:21 pm | चलत मुसाफिर
लेख आवडले
24 Oct 2018 - 10:29 am | सूर्यपुत्र
लेख खूप छान लिहिला आहे. मलाही काही शंका आहेत :
१: पिंक या सिनेमात सांगितल्याप्रमाणे ' नाही म्हणजे नाही.' ओके, नाही म्हणजे नाहीच हे मान्य. पण मग काय म्हणजे हो?
२: लग्नाआधी शारिरीक संबंधांची ईच्छा प्रदर्शित केली म्हणून ब्रेकअप झाले आणि या अनुभवावरुन धडा घेऊन पुढच्यावेळी शारिरीक संबंधांची ईच्छा प्रदर्शित केली नाही म्हणून ब्रेकअप झाले तर आता नक्की काय करायचे?
-सूर्यपुत्र.
24 Oct 2018 - 12:47 pm | मराठी कथालेखक
हा हा !!
आता पुढच्यावेळी अत्यंत किचकट भाषेत , जर तर चा प्रचंड वापर करत इच्छा व्यक्त करा...
26 Oct 2018 - 12:24 pm | चलत मुसाफिर
प्रामाणिक 'हो' म्हणण्याची सामाजिक किंमत स्त्रीकडून वसूल करणे पुरुषी समाजाने थांबवले तर स्त्रीला होकार व्यक्त करण्यात समस्या येणार नाही.
24 Oct 2018 - 10:46 am | श्वेता२४
समतोल मते आहेत. उ का यांच्या
एकंदरीत स्त्रीने प्रौढपणे , कुठल्याही प्रकारच्या दडपणाला बळी न पडता स्वतःच्या भावनांचे प्रदर्शन योग्य व्यक्तीपुढे करणे शिकले पाहीजे आणि याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे स्त्रीच्या कुठल्याही प्रकारच्या जवळीकीला पुरूषाने त्याच नजरेने न पाहणे शिकले पाहिजे.
या मताशी एकदम सहमत24 Oct 2018 - 12:00 pm | माहितगार
स्त्रीयांना काय वाटते ते पुरुषांना कळण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी काही स्मार्ट अॅप्स आहेत का ?
25 Oct 2018 - 1:03 am | विशुमित
या वयात काय उपयोग होणार आहे आपल्याला असल्या अॅपमुळे ?
(हा.घ्या)
25 Oct 2018 - 7:28 am | माहितगार
=)) खाली फडके साहेबांच्या मी२ मध्ये करेज नसण्या बद्दल लिहिले आहे त्या करेज नसलेल्या , आणि चुकीच्या पद्धतीने करेज दाखवनार्या सर्वांना आणि अप्रत्यक्ष स्त्रीयांनाही ऊपयुक्त ठरणर नाही का ? :)
25 Oct 2018 - 8:25 am | प्राची अश्विनी
:)
26 Oct 2018 - 12:25 pm | चलत मुसाफिर
मेंदू व हृदय ही दोन अॕप सर्वत्र उपलब्ध असतात.
24 Oct 2018 - 10:09 pm | रविकिरण फडके
Very well worded views. I did not find any looseness/ disconnectedness about them. To be uncertain is a virtue many of us do not possess, neither appreciate.
But
प्रत्येकाच्या गतायुष्यात एखादी चित्तरकथा घडलेली असतेच
This is not necessarily true.
I do not have any such 'chittarkatha' in my life - simply for want of enough courage. I suspect I will have some company in this, at least in my generation of 60+.
Looking at what is happening now, especially in the West, one can never be too careful.
I, e.g., always interviewed female candidates in open area or at least in cabins with full glass, and preferably with another female colleague present, even if that colleague had nothing to do with the subject. During my youth and middle age, I never offered a lift in my car to any female employee. People made a joke of this, terming it as morbid fear, but my policy was, better safe than sorry.
But I have infinite capacity to imagine all kinds of terrible things that can happen. I might have company here too.
25 Oct 2018 - 1:07 am | विशुमित
तुमचे 'गृहखाते' एकदम कडक असणार असे जाणवते.
...
आम्हीपण डिक्टो असेच वागतो.
26 Oct 2018 - 12:26 pm | चलत मुसाफिर
फडके साहेब, माझा आदरयुक्त दंडवत घ्यावा.
25 Oct 2018 - 10:08 am | वीणा३
भारतीय पुरुषाशी एकूणच बोलणं स्त्री म्हणून खूप विचित्र आहे. बाहेरच्या देशात सगळे लोक सगळ्यांकडे बघून हसतात. त्यामुळे मी सुद्धा स्वतःला ती सवय लावून घेतली कि समोरून कोणीपण चालत येताना दिसलं कि हसून हॅलो बोलायचं. पण प्रत्येक वेळेला भारतीय पुरुषांकडून मिक्स प्रतिसाद येतात.
१. ही आपल्याकडे बघून का हसत्ये म्हणून विचित्र बघतात आणि निघून जातात, आणि नंतर चक्क टाळतात. पण एकदा कळलं कि हि सगळ्याकडे बघून हसत्ये तर मग ठीक होतात
२. त्यांना पण इथल्या वातावरणाची सवय असेल ते पण फॉर्मली हसतात आणि निघून जातात
३. मागे लागतात. अक्षरशः ५-७ वेळा येऊन गप्पा मारायचा प्रयत्न करतात, खूप शांत राहून मैत्रीपूर्ण वागत राहावं लागतं, २-४ दिवसात हळू हळू कळत कि त्यांना काय खास वेगळं वागवत नाहीये सगळ्याबरोबरच असाच वागत्ये.
भारतातल्या ऑफिस मधल्या एक मुलगी अशीच सदा हसरी होती, एक तर लिटरली तिला चिकटून उभा राहिला, एच आर कडे प्रकरण गेलं तर म्हणे हसली माझ्याकडे बघून, म्हणून ती इंटरेस्टेड आहे - देवा. एवढाच सिग्नल दिलाय असं वाटत असेल तर जाऊन विचारावं कि गप्पा मारायला येतेस का, हळू हळू अंदाज घेता येत नाही का डायरेक्ट हात लावायच्या आधी? ती काय म्हणेल याचा अंदाज नाही म्हणून विचारात नाही पण हात लावायला जमतो :(
हे उलट बाजूने पण तसंच आहे, पुरुषांना पण मैत्रीपूर्ण वागण्याला विचित्र प्रतिसाद मिळत असतील, फक्त बायका जाऊन मागे लागतील हि शक्यता खूप कमी आहे असं वाटतं
एकूणच समाजात कसं वागायचं याचे कुठलेही नियम नाहीयेत आपल्याकडे आणि त्याचा त्रास प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी होतो. बाहेरच्या देशात पाहिल्यादि गाडी ठोकली तेव्हा माझ्या तोंडून पटकन "काय मध्येच ब्रेक मारतोय, काळात नाही का" हे उद्गार आले. मी आणि त्या माणसाने पुढे गाडी थांबवली. तो माणूस पटकन उतरून मागे आला आणि म्हणाला "तू ठीक आहेस ना", धक्का मीच मारला होता मागून, खरंतर चूक माझीच होती, पण माझी प्रतिक्रिया वैतागाची होती आणि त्याची काळजीची. स्वतःला किती आतून बदलायला हवं याची खूप जाणीव झाली त्या दिवशी :(
25 Oct 2018 - 10:20 am | वीणा३
लेख आवडला हे सांगायचंच राहिला.
26 Oct 2018 - 12:29 pm | चलत मुसाफिर
धन्यवाद
25 Oct 2018 - 12:15 pm | माहितगार
सद्य भारतीय स्थिती कुचंबणेची असेल, पण 'समाजात कसं वागायचं याचे कुठलेही नियम नाहीयेत आपल्याकडे...' हे विधान ट्रांसफ्रमेशनच्या स्टेज मधला सोशिओ-कल्चर नरेटीव्ह आणि जनरेशन गॅप पुरेसे लक्षात घेत नसावे. वाटेत क्रॉस होणार्या अनोळखी व्यक्तीला काही काम असल्या शिवाय हसून हॅलो हे भारतीय संस्कृतीत नव्हते आणि नाही. म्हणजे दोन अनोळखी पुरुष अथवा दोन अनोळखी स्त्रीयाही समोरा समोर आल्यास काम असल्या शिवाय हसून हॅलो करण्याची संस्कृती भारतात नाही आणि नव्हती. मी स्वतः अशी एक परदेशी संस्कृती पाहिलेली आहे जिथे रस्त्यात भेटलेल्या दोन अनोळखी व्यक्ती परस्पर जुनी ओळख असल्या सारख्या एकमेकांच्या कुटूंबांची विचार पूस करत प्रत्येका सोबत अर्धातास खर्च करत पुढे सरकतात :) एवढे टोकाला न जाता एकमेकांना हॅलो करण्यास तत्वतः हरकत नसली तरी आधी -ताई दादा, मानलेले- नाते जाहीर न करता स्त्री पुरुषांनी एकमेकांशी मनमोकळा संवाद आजही भारतीय मेट्रोपॉली मोठ्या शहरांपलिकडे गेलेला नाही.
दोन पिढ्या आधी मोठ्या शहरात , अगदी मोठ्या शहरातील काही जाती धर्म समुदायात किंवा छोटी शहरे आणि खेडे गावातून नाते रहीत संवादाचे अर्थ पुरुषच नव्हे तर स्त्रीयाही वेगळे लावतात. त्यामुळे सहाजिक बहुसंख्य पुरुष संवादात पुढाकार घेत नाहीत आणि त्यांनी पुढाकार घेतला तरी स्त्रीयाही दाद देत नाहीत. दोन पिढ्या आधी मोक्ळ्या संवादाचा कल्चरल नरेटीव्ह मधील अर्थच वेगळा होता, दोन स्त्री पुरुष पालकांच्या मर्जी शिवाय एकत्र येऊच शकत नाहीत या नरेटीव्हला मागच्या पिढीत शिक्षण एकत्र येण्याच्या अधिक संधी आणि चित्रपट यातून छेद दिला गेला . नविन काळात एकीकडे प्रेम व्यक्त करण्याची संधी देणारे व्हॅलेंटाईन डे अजून ही बहुसंख्य वर्ग नाकारतो , दुसरी कडे हसली म्हणजे फसली असा नरेटीव्ह तयार झाला आहे त्यावरचा अॅप्रोच केल्यास टाळण्यासाठी भैय्या/दादा/भाऊ म्हणून हाक मारण्याचा राखी जाऊन बांधण्याचा उतारा अजूनही बहुसंख्य केसेस मध्ये भारतात बर्या पैकी कामास येतो.
नाही म्हणजे हो असा अर्थाचा अनर्थ करणारा नरेटीव्ह कदाचित युरोमेरीकेतही असेल म्हणूनच त्यांनाही तिथे नाही म्हणजे नाही ची मोहीम राबवावी लागली, 'नाही म्हणजे नाही' या मोहीमेच्या स्टार्टींगला भारतातल्या मेट्रोपॉलीतून आत्ता कुठे सुरवात होईल. अर्थात ' नाही म्हणजे नाही'तूनही अपेक्षित पूर्ण प्रभाव पडत नाही म्हणून 'केवळ हो म्हटल्यावरच हो' अश्या नव्या संदेशाचा युरोमेरीकन मोहिमेस कितपत यश येते हे येणारा काळ सांगेल.
जनरेशन आणि कल्चरल नॅरेटीव्हज बदलत असतात भारतातही बदलतील. भैय्या/दादा/भाऊ म्हणून हाक मारण्याचा राखी जाऊन बांधण्यासारख्या नॅरेटीव्हज्ञा नवीन मेट्रोपॉलीटन नवी पिढी वेड्यात काढावयास लागली आहे ते ही योग्य वाटत नाही. कुणाला भाऊ न मानलेले नसतानाही व्यक्ती व्यक्ती मधले संबंध विश्वासार्ह व्हावेत हे मान्य पण त्यासाठी भाऊ मानणे आणि राखी बांधणे सारख्या अगदीच मोडीत काढाव्यात का या बाबतही साशंकता वाटते.
26 Oct 2018 - 11:59 am | मराठी कथालेखक
अनोळखी पुरुष बघून हसला तर सामान्यतः भारतीय स्त्रीची काय प्रतिक्रिया असेल ?
अनोळखी तर सोडा पण काही स्त्रिया तर ओळखीच्या पुरुषांकडे बघूनही हसत नाहीत !!
याचे कारण संगोपनात आहे अगदी बालवयापासूनच अनेकदा मुलांना मुलींपासून आणि मुलींना मुलांपासून दूर राहण्याचे संस्कार केले जातात
26 Oct 2018 - 12:32 pm | चलत मुसाफिर
ओळखीच्या स्त्रीला रस्त्याने जाताना पाहिले तर तिला लिफ्ट देण्याची हिम्मत पुरुषाची होत नाही.
लिफ्ट घेण्याची हिम्मत स्त्रीचीही होत नाही.
बघा कसा तिढा बसलेला आहे तो.
26 Oct 2018 - 12:29 pm | चलत मुसाफिर
कोणत्याही समाजात स्त्री-पुरुष संवाद हा संकेतांतूनच चालतो. हे संकेत चुकीचे वाचले जाण्याची शक्यताही प्रत्येक समाजात तितकीच असणार. फक्त वैयक्तिक सीमारेखांचे आरेखन समाजपरत्वे बदलते.
25 Oct 2018 - 11:49 am | सस्नेह
बापरे ! खरंच असं असतं ?
म्हणजे मग एखादा सभ्य पुरुष एखाद्या स्त्रीशी आदर व मैत्रीपूर्ण रीतीने वागत असेल आणि त्या स्त्रीलाही त्याच्याशी मैत्री करायला आवडत असेल तर असे पुरुषही मनातून याला लैंगिक भावनेस प्रतिसाद समजत असतील का ?
औघड आहे ...!!
25 Oct 2018 - 1:46 pm | माहितगार
धागा लेखकाचे आपण नमुद केलेले विधान जर-तर आणि विवीध शक्यतांचे आवश्यक पुरेसे आधार न घेता आलेले असेल का? सर्वसाधारण परिस्थितीत धागा लेखकाचे सदरहू विधाना नंतरचा पारंपराईक वैचारीक प्रवास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पडदा पद्धती आणि स्त्री स्वातंत्र्य नाकारण्याच्या दिशेने होतो पण सदर धागा लेखक पुढील वैचारीक प्रवास जरा वेगळा करताना दिसतो, त्यांची नंतरची काही विधाने "...लैंगिक दुर्वर्तनाचे समर्थन नाही..." , "...आकर्षण प्रामाणिकपणे, निरलसपणे थेट त्या स्त्रीपाशी जाऊन शब्दांत कथन करणे हे लैंगिक दुर्वर्तन मानले जाऊ नये. .....", "....येथे स्त्रीचा संमती-अधिकार कमी लेखणे हा माझा उद्देश मुळीच नाही....", "....कपट, शोषण व बळजबरी यावर आधारित नसलेले कोणतेही स्त्रीपुरुष नाते हे नैतिकच असते..." , "....लैंगिकता ही स्त्रीपुरुषसंबंधांचा अविभाज्य व महत्त्वाचा भाग असली तरी हे संबंध कालांतराने लैंगिकतेच्या पल्याड जातात, जावेच लागतात....."
धागा लेखकाच्या सदरहू विधानाला जर-तर आणि विवीध शक्यतांचे आवश्यक पुरेसे आधार नसल्यामुळे प्रतिसाद लेखिकेचे निष्कर्ष विधान मैत्री निखळ नसूच शकतात का ? कडून '...असे पुरुषही मनातून याला लैंगिक भावनेस प्रतिसाद समजत असतील का ?.." या दिशेने जाताना मनातून असलेली संयम बाळगलेली आणि सुसंस्कारीत खरी सभ्यता , मनातून नसलेली, संयम सोडणारी, संस्कार त्यागणारी सभ्यता व लैंगिक प्रेरणा असणे नसणे तशी प्रेरणा असल्यास अशा प्रेरणेची तिव्रता या बाबतच्या अधिक शक्यता / फरक लक्ष्यात घेतल्या जात नसल्याची शक्यता वाटते.
उपरोक्त वाक्य जरासे बदलू बघू
असा बदल करुन बघीतल्यावर केवळ उपरोक्तच नव्हे तर एका पेक्षा अधिक शक्यतांचा विचार करणे सोपे जाईल अशी आशा करुया .
25 Oct 2018 - 8:52 pm | सुबोध खरे
एखादा सभ्य पुरुष एखाद्या स्त्रीशी आदर व मैत्रीपूर्ण रीतीने वागत असेल आणि त्या स्त्रीलाही त्याच्याशी मैत्री करायला आवडत असेल तर असे पुरुषही मनातून याला लैंगिक भावनेस प्रतिसाद समजत असतील का ?
स्नेहांकिता ताई
असंच असतं असं नाही. पुरुष आपल्या बहिणीकडे किंवा मुलीकडे अशाच नजरेने पाहतो का? नक्कीच नाही. कारण मानवाची विचारशक्ती हि प्राण्यांपेक्षा वेगळी आहे आणि मानवाने वासनेवर/ विकारावर विचाराने विजय मिळवलेला असतो.
यामुळे सभ्य माणूस सुरुवातीला जरी एखाद्या परस्त्रीकडे वरपासून खालपर्यंत बघून घेत असेल तरी त्यात लैंगिक भावनाच असेल असे नाही. हे सर्व त्याच्या मानसिक जडणघडणीवर( social conditioning) अवलंबून असते.
परंतु एखाद्या परस्त्रीकडे पुरुष पाहतो तेंव्हा तो स्त्रीच्या शरीराकडे सौंदर्य दृष्टीने नक्कीच पाहतो. मग ते जाणिवेच्या पातळीवर असले नसले तरी नेणिवेच्या पातळीवर नक्कीच असते. त्यामुळे स्त्री त्याच्याकडे "कोणत्या भावनेने" पाहत आहे हे त्याला समजतेच.
शेवटी हा मेटींग गेम असला तरी सभ्य आणि असभ्य माणसातील फरक हा विचारशक्तीतीलच आहे.
25 Oct 2018 - 11:11 pm | मराठी कथालेखक
स्नेहांकिताजी,
घट्ट मैत्रीत /जवळीकीत खोल दडलेलं आकर्षण असण्याची शक्यता खूप जास्त आहे (मी सरसकटीकरण करण्याचं टाळतो म्हणून 'खूप जास्त' म्हणतो आहे). पण हे आकर्षण म्हणजे त्या स्त्रीला मिळवण्याची इच्छा असंच काही नाही. तसेच एखाद्या स्त्री बद्दल वाटणारं आकर्षण हे ती स्त्री आहे (केवळ एक चांगली व्यक्ती म्हणून नव्हे) म्हणूनच वाटत असलं तरी ते नेहमी शारिरिक पातळीवर उगम पावलेलं असेलच असं नाही तर कधी एखादी स्त्री एखादी भावनिक गरज पुर्ण करणारी म्हणून आकर्षण वाटू शकतं. थोडं घाईत लिहितो आहे पण फार रंजक मुद्दा आहे.. अनुभवाने सांगतो की पुरुष अल्प सहवासात अनाकर्षक वाटणार्या स्त्रीच्या प्रेमातही मैत्रीतून जवळीक निर्माण झाल्यावर पडू शकतो .
झालंच तर एखाद्या प्रगल्भ स्त्री-पुरुष मैत्रीत मित्र म्हणून जवळ असणार्या पुरुषाला आपण आवडतो वा आपल्या बद्दल आकर्षण /प्रेम आहे याची जाणीव स्त्रीला अस्वस्थ करत नाही तर उलट त्या मित्रावरचा विश्वास तिला आश्वस्तच करतो... अधिक विचार करता तुम्ही तुमचे "बापरे !! औघड आहे" हे शब्द मागे घ्याल याची मला खात्री वाटते.
26 Oct 2018 - 12:11 am | सस्नेह
हे चित्र खूपच आश्वस्तता देणारे आहे. अन्यथा सभ्य पुरुषांना स्त्रीची एखादी मैत्रीपूर्ण जवळीक म्हणजे भलतं आमंत्रण वाटेल, या विचाराने तिला टेन्शनच येणार :)
26 Oct 2018 - 11:55 am | मराठी कथालेखक
सभ्य आणि प्रगल्भ पुरुषाला जेव्हा त्याची एखादी मैत्रीण खूप आवडते पण तिच्या मनात त्याच्याबद्दल तशा भावना आहेत की नाहीत याचा नीट अंदाज येत नाही तोवर थोडा ताण निर्माण होवू शकतो. पण जर तिच्या मनाचा अंदाज आला आणि तिला आपल्याबद्दल तसे काही वाटत नाही हे जाणवले तर तो पुरुष आपल्या मर्यादा ओळखून वागतो पण अंदाज नाहीच आला तर स्वतःच्या भावना थेट व्यक्त करतो यावेळी स्त्रीनेही त्याला हळूवारपणे समजून घेणे आणि तिचा नकार असल्यास तो तितक्याच हळूवारपणे त्याला समजावून सांगणे गरजेचे आहे असे झाले तर मैत्रीला धक्का न लागता दोघांचे मैत्रीचे नाते अधिक घट्ट /प्रगल्भ होवू शकते.
26 Oct 2018 - 12:33 pm | चलत मुसाफिर
हे असेच असते. यात स्त्रीने घाबरून जाण्यासारखे वा दडपण घेण्यासारखे काहीच नाही.
25 Oct 2018 - 4:28 pm | सस्नेह
वेल, 'प्रतिसाद' हा शब्द व्यत्यासात फिट होत नाही, असे माझे मत आहे. कारण
याचा व्यत्यास मुळीच सत्य नाही. कारण स्त्रीच्या कोणत्याही पुरुषाप्रती प्रथम दृष्टीक्षेपात फक्त आणि फक्त शारीर भावना मुळीच नसते, तर काहीशी सावधगिरीचीच भावना असते.
25 Oct 2018 - 5:33 pm | माहितगार
ईतर वाचकांचा गैरसमज टाळण्याच्या दृष्टीने छोटा डिसक्लेमर की, मी उदाहरण म्हणून व्यत्यास करुन दाखवलेले वाक्य वेगळे आहे आणि त्याचाही उद्देश्य केवळ अधिक शक्यता दखवणे आहे.
विषय निघालाच आहे तर काही छोटे अनुषंगिक प्रश्न , एका वेळी एकापेक्षा अधिक भावना असण्याची शक्यता असू शकते का ? सावधगिरी ह्या शब्दाच्या व्याख्येत काळजी घेणे अभिप्रेत असणार, पण बर्याच वेळा व्यक्ती काळजी घेण्यएवजी काळजी करताना दिसतात, नुसतीच काळजी करणे आणि काळजी घेणे यात स्त्रीयांकडून फरक केला जातो का ? (माहित नाही म्हणुनच विचारतो आहे), सावधगिरीचा किती भाग जनुकीय वैशिष्ट्यातून येतो आणि किती संस्कार आणि सोशीओ-क्ल्चरल-रिलीजीयस नॅरेटीव्हच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभावातून येतो ? (माहित नाही म्हणुनच विचारतो आहे)
मी आधीच्या प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे धागा लेखकाचे उपरोक्त वाक्य सरसकटीकरणामुळे अंशतः ओव्हर स्टेटमेंट झाले आहे. आणि सगळ्याच पुरुषांची सभ्यता, संयम, संस्कार सरसकट ढळतातच हे गृहीत धरले की स्त्रीवर्गास सहज घाबरवणारे असावे, आणि सारेच पुरुष असे सरसकटीकरण करावे असे वाईट वागतात का ? यावर अधिक लिहिण्यासारखे आहे पण इतर मिपाकरंनाही व्यक्त होऊ देणे श्रेयस्कर
26 Oct 2018 - 12:35 pm | चलत मुसाफिर
माहीतगार साहेब, आपले ओळखनाव वाचूनच जरा बुजायला होते. प्रतिसाद समजायला जरा जड वाटला. :-)
26 Oct 2018 - 2:45 pm | माहितगार
पहिले तर आपल्या लेखातील चौथ्या मुद्याच्या सुरवातीस आपण स्वतःच म्हटले आहे '.(.इथे बहुधा मजदिशेने तलवारी उपसल्या जाणार!)..' म्हणजे आपल्या विधानांबाबत साशंकता उपस्थित केल्या जाण्याची शक्यता आपल्याला स्वतःला दिसते.
दोन, माझा प्रतिसाद समजला नसेल तरी वर डॉ. सुबोध खरे आणि मराठी कथालेखक या आयडींनी त्यांची वेगळी मते मांडलेली आहेत.
तीन, ''...कोणत्याही स्त्रीकडे कोणत्याही पुरुषाने टाकलेला पहिला दृष्टीक्षेप हा निखळ शारीर व शारीरच असतो...'' या वाक्याच्या मर्यादा ज्यांना लक्षात आलेल्या नाहीत त्यांनी हातात एक वही घ्यावी, या पुर्वी न पाहिलेल्या नायक नायिकांचे चित्रपट, टिव्ही सिरीयल मधील नायक नायिका, आणि 'टिव्ही बातम्या' पहाव्यात आणि तुमचा पहिला दृष्टीक्षेप शारिरीकच होता हे किती केसेस मध्ये झाले आणि शारीरीक नव्हता हे किती केसेस मध्ये झाले हे नोंदवावे. आणि तेच मग टिव्ही शिवाय रोजच्या जिवनात करावे. आणि मध्ये काही दिवस जाऊ देऊन पुन्हा असे अजून दोनदा करावे आणि मग हे विधान सरसकट रास्त आहे का ते ठरवावे .
चार, वर दॉ सुबोध खरे यांच्या प्रतिसादानुसार 'असंच असतं असं नाही. पुरुष आपल्या बहिणीकडे किंवा मुलीकडे अशाच नजरेने पाहतो का? नक्कीच नाही. कारण मानवाची विचारशक्ती हि प्राण्यांपेक्षा वेगळी आहे आणि मानवाने वासनेवर/ विकारावर विचाराने विजय मिळवलेला असतो.'
पाच, डॉ. सुबोध खरे म्हणतात त्या विचाराने विजय मिळवण्या मागे संयम असतो आणि संयमाच्या मागे संस्कारही, धागा लेखक प्रत्येक पुरुष आणि स्त्री समोरा समोर येतील तेव्हा पुरुषांचा संस्कार, संयम ढळतोच असे गृहीत धरुन चालत असतील ते प्रत्येक केस मध्ये वास्तवास धरुन नसावे.
सहा, माझ्या स्वतःच्या बाबतीत काही वेळा काहींच्या बाबतीत नैसर्गिक आकर्षण वाटते पण ते प्रत्येकवेळी प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही.
ऐश्वर्या राय - बच्चन यांना मी केवळ चित्रपटातच पाहिले पहिल्या पाहण्या पासून ते आजतागायत प्रत्येकवेळी त्या सुंदर वाटल्या पण आकर्षण एकदाही वाटलेले नाही. (तेच काही चित्रपट नायिकांच्या बाबतीत वाटले सुद्धा हेही कबूल करावे लागेल , खरेच सांगायचे अत्र एखाद्या चित्रपटात चित्रपटात भाऊ बहीण हे नाते रंगवले जात असतानाच्या नटीबद्दलही आकर्षण वाटते तेच अगदी रोमँटीक सीन मधल्या नटी बद्दल काहीच आकर्षण वाटतच नाही पण क्वचित ती बहीण , मुलगी वहीनी अश्या पवित्र नात्यात जाणवते. हम आपके है कौन मधली रेणुका शहाणे नेहमी दिर-वहीनीच्या पवित्र नात्यातलीच वाटली तर रिमा लागू आईच वाटते . या सर्वात चित्रपट दिग्दर्शक नट नटींची हातोटी किती ते आपल्या मनाचे खेळ किती याची कल्पना नाही)
हेच व्यक्तिगत जिवनातही होते कधी काही जणी नुसत्याच सुंदर वाटतात, काही सुंदर असो नसो आकर्षक वाटतात, तर काही स्त्रीया बहिणीसारख्या, मुलीसारख्या किंवा आईसारख्या पहिल्या दृष्टीत वाटून जातात.
ज्या महिलांबाबत काडिचेही आकर्षण वाटले नाही, आपण पूर्ण सभ्यता बाळगली तरी हातचे राखून कि आखडून कि वेगळे अनावश्यक अर्थ काढून वागतात तेही काही वेळा समजत नाही.
सात, पुरुषांमध्येही लाजाळू पणा असतो (त्याची टिंगल होत असली तरी असेही असते की नसते ?) , किंवा वर एका प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे पुरुषांमध्येही करेजचा अभाव ते सभ्यतेची शीस्त आणि संस्कारही असू शकतात. माझ्या स्वतःच्या बाबतीत आठवते दुसरीच्या वर्गात रामायणात रावणाची तिसरीच्या वर्गात दुर्योधनाची बनलेली नकारात्मक प्रतिमा, चौथीला परस्त्रीला माते समान मानणारे शिवाजी महाराज, सकाळी साडेपाच वाजता शुकासारीखे वैराग्याची महती गात जाणारे रामदासी, सकाळी सहा वाजता चालू होणार्या भावगीतातील गीतरामायण ते वर्षाकाठी रतीब घातलेल्या किर्तनातून परस्त्रीकडे पाहू नका सांगणारी कथाकारांची किर्तने, श्यामची आई सारखे आदर्श. वर्षाकाठी भावाला किमान तिनदा ओवाळणार्या नागपंचमी, राखी पौर्णीमा, भाऊ बीजा . त्या शिवाय शाळेत आवडत्या शिक्षक शिक्षीकांनी वर्गात सर्वच मुलांना सारखे केलेले समुपदेशन ते चुकारपणा करणार्या विद्यार्थ्यांच्या हातातवर झालेली रुळलागे झण झण. लहान पणा पासून ते मोठे होईपर्यंत दादा/भाऊ ताई, अक्का मावशी म्हणतच साधलेले संवाद, व्यक्ती संस्कारीत असेल तर चुकार होऊन होऊन किती चुकार होईल ? अशा सर्व संस्कारातून गेलेतरीही काही अपवादांचे कोनाड्यातल्या गप्पातून पुढे नकारात्मक वृत्ती स्विकारत पाय घसरत असतील नाही असे नाही . किंवा असेही समजा कि संस्कार आणि सभ्यता बाळगणार्यांचे प्रमाण व्यस्त म्हणजे कमी आहे तरी अपवादालाही नसते असे का कुणि गृहीत धरुन संस्कार , संयम सभ्याता बाळालेल्यांचे अस्तीत्व संपुर्णतः नाकारावे ?
आठ, याचा अर्थ या जगात पाय घसरणारे लोक होत नाहीत असे नाही, पण चोराची फाशी केवळ चोरालाच द्यावी असे वाटते.
नऊ, जग विश्वासावर चालते, संशयाचे प्रमाण जेवणातल्या मिठा एवढे असावे, संशयाच्या मिठाचे प्रमाण व्यस्त केले की आपलेच जिवन हकनाक खारट होण्याचा धोका असावा, असो.
26 Oct 2018 - 3:07 pm | टर्मीनेटर
+१
26 Oct 2018 - 7:57 pm | विशुमित
मला पहिल्या पासून तुमच्या लिखाणाचं अपरूब वाटले आहे.
कुठून स्त्रवतात एवढे सखोल विचार?
25 Oct 2018 - 5:59 pm | गामा पैलवान
स्नेहांकिता,
पहिल्या दृष्टीक्षेपांबद्दलचं तुमचं व धागालेखकाचं दोघांचं निरीक्षण योग्य आहे. पुरुषांचा पहिला दृष्टीक्षेप निखळ शारीर असतो तर बायकांचा जरा सावध असतो.
माझ्या मते नैसर्गिकरीत्या हे असेच हवेत. कारण की पुरुष स्त्रीकडे वेळ घालवायचं साधन म्हणून बघतो तर बाई पुरुषाकडे आयुष्य घालवायचं साधन म्हणून बघते.
आ.न.,
-गा.पै.
25 Oct 2018 - 6:23 pm | माहितगार
गा.पै. आणि धागा लेखक एकाच मतापासून चालू होतत पण वेगळ्या दृष्टीकोण आणि वेगळ्या निष्कर्षांवर पोहोचत असण्याची शक्यता असावी, असे गा.पैंच्या या पुर्वीच्या लेखनावरुन वाटते.
26 Oct 2018 - 1:38 pm | माहितगार
मी विधीतज्ञ नाही पण सद्य भारतीय स्त्री सुरक्षा विषयक कायदे आताशा बर्यापैकी मोठा परिघ कव्हर करत असावेत. "....व्यापक लैंगिक दुर्वर्तन हा मात्र दखलपात्र गुन्हा नाही...." हा वाक्यांश जनरलाईज्ड आणि वास्तविकतेस धरून नसण्याची प्राथमिक शक्यता वाटते. अगदी पुरुषांनी '..तसे पाहीले... ', 'शब्दां शिवायचे हावभाव' , ते पिक्चर 'स्टाईल पाठलाग' अशा बर्याच अधिक प्रकारांबाबत कायदा आता दखल घेत असावा असे वाटते.
अगदी धागा लेखक लेखात म्हणतो तसे '..माझे मत असे की हे आकर्षण प्रामाणिकपणे, निरलसपणे थेट त्या स्त्रीपाशी जाऊन शब्दांत कथन करणे...' हे संबंधीत स्त्रीस पटले नाही तर सध्याच्या कायद्यांनुसार दुर्वर्तन मानले
जाण्याची अंशतः शक्यता सध्याच्या कायद्यात आली असावी (चुभूदेघे), अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनेतील कलमांवर हि बाब अद्याप न्यायालयांमध्ये नीटशी तपासली जाणे बाकी असावे. (मीटू मधील काही केसेस सर्वोच्च न्यायालया पर्यंत जाऊन निकाल आले तर असे कोणते संवाद दुर्वर्तनात मोडणार नाहीत या बाबत अधिक स्पष्टीकरण येऊ शकावे असे वाटते.)
कायद्यातील बाबी नेमकेपणाने तपासण्यासाठी "....व्यापक लैंगिक दुर्वर्तन..." या टर्म मध्ये धागा लेखकास कोणती दुर्वर्तने अपेक्षीत आहेत हे पहावे लागेल. अर्थात मिपावर चर्चा करणे शक्य नसल्यास http://indiankanoon.org वर कदाचित शोध घेऊन पहाता येईल .
उत्तरदायीत्वास नकार लागू
27 Oct 2018 - 5:06 am | Ram ram
ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना जवळच्या नात्यातील सोडून कुणी स्त्री पुरुष एकत्र वावरताना दिसले की लगेच लफडे असल्याचा शिक्का मारला जातो. नाखु जी अल्प उत्पन्न असलेल्या गटातील स्रीयांमध्ये लैंगिक स्वैराचार तुलनेत जास्त आढळून आलेला आहे , तिथं विवाह बाह्य संबंधांचा बाऊ जास्त करत नाहीत. बऱ्याच स्रीया शरिराचा वापर अॅसेट म्हणून वापर करताना पाहिलंय. काहीवेळा स्री सुद्धा मोहात वाहवत जाते नंतर तिला उपरती होते व त्याचे खापर आपसूकच पुरुषावर फुटतं. डोळे उघडे ठेऊन बघितले तर आजची तरुण स्त्री कीती मुक्त झालीय हे लक्षात येईलच.
27 Oct 2018 - 5:28 pm | नाखु
दुरुस्ती करून प्रतिसादातील हे वाक्य पुन्हा एकदा वाचा
पदाचा, पैशाचा, परिस्थिती (व स्त्री सौंदर्याचाही) चा गैरफायदा घेतला जाऊ शकतो पण तोही दोन्ही बाजूंनी हेच लक्षात घेतले जात नाही.
27 Oct 2018 - 3:15 pm | वामन देशमुख
छान चर्चा सुरु आहे.
एखाद्या पुरुषाने एखाद्या ओळखीच्या स्त्रीला सभ्य शब्दात "मला तुझ्याशी संभोग करण्याची इच्छा आहे (I love you, वा तत्सम), तथापि मी तुझ्यावर कसलीही जबरदस्ती करणार नाही" असे म्हणण्यास कायदा परवानगी देतो का?
27 Oct 2018 - 4:47 pm | माहितगार
अस्वीकृती: मी वकील नाही. असा काही अनुभव पण नाही. भारतीय दंड संहितेची अद्ययावत प्रत ऑनलाईन कुठे उपलब्ध आहे याची कल्पना नाही. पण ईंग्रजी विकिपीड्यावर Criminal Law (Amendment) Act, 2013 हा लेख दिसतो (या नंतर अमेंडमेंट झाल्या असल्यास कल्पना नाही. इंग्रजी विकिपीडियावरील IPC Section 354A ii वाचन करता, तज्ञ वकीलांचा सल्ला घेतल्या शिवाय आपण म्हणता तसे वक्तव्य IPC Section 354A ii कायद्याच्या दृष्टीने जोखीमीचे असण्याची गंभीर शक्यता नाकारता येत नाही, असे वाटते.
सध्या केवळ स्वतःच्या घटस्फोट प्रक्रीया चालू न झालेल्या सद्य पत्नीशी असा संवाद साधण्यास कायदा परवानगी देत असावा - ( पण IPC Section 354A ii या अपवादाचा उल्लेख दिसत नाही. पण भारतीय विवाह कायद्यातील इतर तरतुदी तुर्तास तरी पत्नीशी संबंध ठेव्ण्यास अनुमती देत असाव्यात. चुभूदेघे )
तसेही प्रणय संवादाच्या कला कौशल्याच्या विशीष्ट स्तरा पर्यंत पोहोचून मगच अनुमती / संमती मागता येते, संमती तर तुम्ही म्हणालेल्या विधानाला सुस्पष्ट होकारार्थी संमती असावी (मी तर म्हणेन दोन साक्षीदारांच्या सही सहीत लेखी) पण असे सरळ विधान संबंधीत स्त्री, संभाषणाचे संकेत आणि वर म्हटल्या प्रमाणे IPC Section 354A ii च्या रोषास बळी पडणार नही हे सांगणे कठीण असावे.
आपण उल्लेखीलेले प्रश्नार्थक वाक्यास IPC Section 354A ii मधून घटनादत्त अभिव्यक्ती स्वातंत्र्यांतर्गत अपवद म्हणून सुटीस पात्र व्हावे म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या सुस्पष्ट निर्णयाची गरज असू शकावी असे वाटते. मी टू मधील काही खटले सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचून निकाल आल्यास सुस्पष्टता येण्यस मदत होईल असे वाटते.
उत्तरदायिकत्वास नकार
31 Oct 2018 - 10:18 am | माहितगार
* https://www.misalpav.com/node/43494
* https://www.misalpav.com/node/43530