सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानिमित्ताने: आप्मपनीयगो आप्मदेशसं

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
29 Sep 2018 - 8:05 am

२१ जून २०१२. हा दिवस एक खास दिवस होता. उत्तर गोलार्धातला वर्षातला सर्वात मोठा दिवस होताच. त्याहीपलीकडे या दिवसाला एक खास महत्त्व होते. बरोबर १०० वर्षांपूर्वी जगाच्या इतिहासाला कलाटणी देण्यांत सिंहाचा वाटा असणारा एक महामानव जन्माला आला होता. या थोर मानवाच्या १००व्या जन्मदिनानिमित्त त्या महामानवाच्या मॅन्चेस्टरमधील पुतळ्यासमोरून २०१२ सालच्या लंडन ऑलिंपिकसाठी ऑलिंपिक ज्योत समारंभपूर्वक मिरवणुकीने नेण्यात आली. काही माणसे काळाच्या पुढची असतात. अशापैकीच हे एक व्यक्तिमत्त्व. कोण होता हा महामानव?

यंत्रे विचार करू शकतील का? या प्रश्नाचा त्यांनी ध्यास घेतला होता. मानव विचार करू शकतो. यंत्रे देखील विचार करू शकतात. फक्त यंत्रांची विचार करण्याची पद्धत माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीपेक्षा वेगळी असते, असे त्यांचे मत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता – AI - आर्टीफिशिअल इन्टेलिजन्स - हा शब्दच तेव्हा अस्तित्त्वात नव्हता. १९५६ मध्ये जॉन मॅकार्थीने सर्वप्रथम हा शब्द वापरला. तरीही या महामानवाच्या संकल्पनांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रावर प्रभाव तर टाकलाच शिवाय मतमतांतरे घडवून आणली.

आम्ही बालपणी आमची बालगुपिते काही विशिष्ट भाषात एकमेकांस सांगत असूं. जशी चची चषाभा आहे तशाच आमच्या आणखीही काही भाषा होत्या. आता आधुनिक भाषेत कूटवेष्टिट किंवा ‘एनक्रिप्ट’ करतात तसे. मोठ्या माणसांना खरे तर आमची भाषा कळतही असे. परंतु आई, मामी, आजोबा वगैरे मंडळी आमचा हिरमोड होऊ नये म्हणून आपल्याला काहीच कळले नाही असे खोटे खोटे दाखवत. त्यांना आपले बोलणे कळत नाही हे पाहून आम्हाला इतका आनंद वाटे की सांगून सोय नाही. असेच काहीसे दुसर्‍या महायुद्धात देखील घडले होते.

१९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर सांकेतिक भाषेत एका ठिकाणाहून पाठवण्याच्या अति महत्त्वाच्या गोपनीय अशा जर्मन संदेशांचे एनिग्मा नावाच्या प्रणालीने कूटवेष्टित – एनक्रिप्ट – करीत. दोस्त राष्ट्रांचे संदेश जर्मनी कूटवेष्टनातून उलगडत असे परंतु दोस्त राष्ट्रांना मात्र ‘बराच काळ ‘एनिग्मा’ उलगडता न आल्यामुळे ती राष्ट्रे हैराण झाली होती.

एम आय ६ या इंग्रज गुप्तहेर संस्थेने ब्लेहले पार्क येथील एका इमारतीत गणितज्ञांचा एक चमू हे गुपित उलगडण्यासाठी नेमला होता. तुझे वय फक्त तेवीस वर्षे आणि तुला जर्मन भाषा येत नाही तरी तू जर्मन गुप्तसंदेश उलगडायची भाषा करतोस असे या चमूच्या प्रमुखाला उपहासाने विचारले गेले. अखेर त्या महामानवाची नेमणूक झालीच. रेडिओ केंद्राची यंत्रे बनवणारे एक केंद्र असे या केंद्राचे बाह्यस्वरूप होते. हे तसे सत्यही होते. कारण उलगडण्याचे संदेश हे रेडिओ संदेशच होते. ऍलन टूरिन्ग हे त्या महामानवाचे नाव होते. कोण होता हा ऍलन टूरिन्ग?

मातापिता दोघेही भारतात होते तरी त्यांना आपल्या पुत्राला म्हणजे ऍलनला लंडनमध्ये लहानाचे मोठे करायचे होते. मग ते लंडनमध्ये मायडा व्हेल इथे राहायला गेले. ऍलनचे पिताश्री श्री जूलीअस टूरिन्ग भारतात बिहार आणि ओरिसा प्रांतातील छत्रपूर येथे एक आयसीएस अधिकारी होते. मातुःश्री इथेल ही मद्रास रेलवेच्या चीफ इंजिनीयरची कन्या होती. ऍलन आणि आपल्या दुसर्‍या मुलाला देखील त्यांनी इंग्लंडमध्येच हेस्टीन्ग्ज इथे एका निवृत्त सैनिकाकडे (जोडप्याकडे) बेस्टन लॉज, अपर मेझ हिल, सेन्ट लेनार्ड्स-ऑन-सी या पत्त्यावर ठेवले होते. सध्या या ठिकाणी एक निळे भित्तीपदक (Plaque) आहे.

वयाच्या सहाव्या वर्षी ऍलनला २०, चार्ल्स रोड, सेन्ट लेनार्ड्स-ऍट-सी इथल्या शाळेत दाखल केले. हेडमास्तरीणबाईना त्याच्या बालबृहस्पती असण्याची ओळख पटली. तशी ती त्याच्या नंतरच्या शिक्षकांना देखील पटली. वयाच्या १३व्या वर्षी १९२६ मध्ये ऍलनने डॉर्सेच्या (Dorset) मार्केट टाऊन मधील शेरबॉर्न शाळेत प्रवेश घेतला. गंमत अशी की शाळेच्या पहिल्याच दिवशी ब्रिटनमध्ये सर्वसामान्य संप होता. ऍलन साउदम्प्टनला. शाळा ६० मैलांवर (९७ किमी) डॉर्सेला. पण निश्चयी ऍलन कुणाचीही सोबत नसतांना सायकलवरून ६० मैलांची (९७ किमी) रपेट करून रात्री एका खाणावळीत राहून शाळेत उपस्थित राहिलाच. (काहीसा असाच प्रसंग थोर शास्त्रज्ञ आणि शेंगदाणामानव डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या जीवनात देखील घडला होता. फक्त संपामुळे नव्हे तर सुटीचा दिवस असल्यामुळे शाळा बंद होती.)

गणित आणि विज्ञानाकडे कल असणार्‍या ऍलनची किंमत तिथल्या ‘क्लासिक्सप्रेमी’ ढुढ्ढाचार्यांना मात्र कळली नाही. तिथल्या प्राचार्यांनी त्याच्या आईबाबांबाना ‘जर ऍलनला पब्लीक स्कूलमध्ये राहायचे असेल तर त्याने शिक्षणाकडेच लक्ष दिले पाहिजे. ना धड इथे, ना धड तिथे अशी त्याची अवस्था होणार नाही अशी मला आशा आहे. निव्वळ विज्ञानतज्ञच बनायचे असेल तर पब्लीक स्कूलमध्ये उगाच त्याचा वेळ वाया जात आहे.’ यासारख्या अर्थाचे पत्र लिहिले. तरीही ऍलनने आपल्या आवडत्या क्षेत्रात आपली कर्तबगारी दाखवीत शिक्षण तिथेच सुरू ठेवले. १९२७ साली ऍडव्हान्स्ड कॅलक्युलसचे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता तो अत्यंत कठीण अशी उदाहरणे सोडवून दाखवीत असे.

मुले लहान असतांना ऍलनचे आईवडील नेहमी आपल्या मुलांना भेटायला भारतातून मायदेशी जात. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे ऍलनच्या प्रखर प्रज्ञेची झलक बालपणी अधूनमधून दिसे. नंतर मात्र ती ठळ्कपणे दिसून आली. १९२७ मध्यें आईबाबांनी मुलांसाठी गिलफर्ड इथे एक घर घेतले. मुले सुट्टीत तिथे राहायला जात.

१९२८ साली वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ऍलनने एक अचाट कामगिरी केली. शाळेच्या पुस्तकात मोघम माहिती. तरी न्यूटनच्या सिद्धान्ताविषयी अनेक प्रश्न उपस्थित करून ऍलनने आईनस्टाईनचा सापेक्षता सिद्धान्त फक्त समजून घेतला नाही तर गणिताने सिद्धही करून दाखवला.

१९३१ ते १९३४ या काळात टूरिन्गने किंग्ज कॉलेज लंडन इथे स्नातकपूर्व शिक्षण घेतले. इथे त्याला गणितात फर्स्ट क्लास ऑनर्स मिळाला. १९३५ साली वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी त्याची किंग्ज फेलो म्हणून निवड झाली. कारण ‘सेन्ट्रल लिमिट’ चा सिद्धान्त त्याने सिद्ध करून दाखवला. खरे तर हा सिद्धान्त १९२२ सालीच जार्ल वॉल्डेबर लिन्डबर्ग यांनी सोडवून दाखवला होता पण ही गोष्ट परीक्षक समितीच्या नजरेतून सुटली.

१९२८ साली जर्मन गणितज्ञ डेव्हीड हिलबर्ट याने Entscheidungsproblem ऊर्फ ‘डिसीजन प्रॉब्लेम’ या नावाने ज्ञात असलेल्या प्रमेयाकडे जगाचे लक्ष वेधले. ‘लिमिट्स ऑफ प्रूफ ऍन्ड कॉम्प्यूटेशन’ च्या कुर्ट गोडेलच्या १९३१ च्या प्रचलित औपचारिक गणिती भाषेतील निष्कर्षांची टूरिन्ग याने अतिशय साध्यासोप्या रचनेतील उपकरणांच्या साहाय्याने पुनर्रचना केली. या उपकरणांनाचे पुढे ‘टुरिन्ग मशीन्स’ असे बारसे झाले. ‘ऑन कॉम्प्यूटेबल नम्बर्स, विथ ऍन ऍप्लीकेशन टू Entscheidungsproblem’ या नावाच्या आपल्या या प्रबंधात त्याने सिद्ध करून दाखवले आहे की जर एकामागोमाग येणार्‍या सूत्रबद्ध पायर्‍यांच्या मालिकेची मांडणी (अलगोरिथम) केली तर अशी यंत्रे त्या पद्धतीनुसार होणारी गणिती आकडेमोडी करू शकतात.

सत्तरच्या दशकात मी काही महिने महाराष्ट्र सरकारच्या विक्रीकर खात्यात नोकरीला होतो तेव्हा बेरजा करण्यासाठी ग्रामोफोनला चावी द्यासाठी असायचे तसे हॅंडल असलेले फॅसिट कंपनीने बनवलेले यंत्र वापरीत होतो. तेही अचूक बेरजा करीत असे. पूर्वी या यंत्राला टूरिन्ग मशीन असेच म्हणत. स्कूटर-मोटारींमधले जुने यांत्रिक ओडोमीटर्स तसेच अगदी पाचदहा वर्षांपूर्वीपर्यंत वीजपुरवठा करणार्‍या कंपनीने घराला बसवलेले वीजमापक मीटर देखील अशाच पद्धतीच्या यांत्रिक चक्रांच्या मदतीने चालत असत. परंतु हे यंत्र विचार करू शकेल असे म्हणायला कोणीही धजावणार नाही.

एम आय ६ या इंग्रज गुप्तहेर संस्थेने ब्लेहले पार्क येथील एका इमारतीत गणितज्ञांचा एक चमू हे गुपित उलगडण्यासाठी नेमला होता हे वर आलेच आहे. आपल्या कामात या चमूला अनेक अडचणी आल्या. कूटवेष्टनप्रणाली दीर्घकाळ न उलगडल्यामुळे चमूवर सरकारकडून प्रचंड दबाव येत राहिला. हा प्रकल्पच बंद होण्याचा धोका निर्माण झाला. प्रकल्प बंद करण्याची मागणी करणार्‍या सरकारी अधिकार्‍य़ांत काही परराष्ट्रीय गुप्तहेर देखील होते. अशा अनेक अडचणी या चमूला दूर कराव्या लागल्या.

अखेर अनेक अडचणींवर मात करून या चमूने हे रहस्य उलगडलेच. परंतु इंग्रज इतके धोरणी की हे रहस्य उलगडले हे त्यांनी जाहीर केलेच नाही. तसे जाहीर केलेच तर जर्मन लोक पुन्हा नवी कूटवेष्टन प्रणाली वापरेल या भीतीने. आलेल्या संदेशांचे यथोचित मूल्यमापन करून मोक्याचे, अति जोखमीचे, प्रचंड मोठे नुकसान जिथे टाळता येईल तिथेच त्यांनी उलगडलेले संदेश वापरले. इतर ठिकाणी वापरलेच नाहीत व जर्मनांनी केलेल्या इतर हल्ल्यातले नुकसान होऊं दिले. त्यामुळे आपले संदेश पकडले जाऊन उलगडले जाताहेत हे जर्मनांना महायुद्ध संपले तरी कळले नाही. इंग्रजांनी पण हे गुपित दीर्घकाळ, अगदी अलीकडच्या काळापर्यंत जपले. या कामगिरीमुळे महायुद्ध जवळजवळ दोन वर्षे अगोदरच संपले आणि किमान १ कोटी चाळीस लाख लोकांचे प्राण वाचले असे तज्ञांचे मत आहे.

आपल्या असामान्य प्रज्ञेने आणि प्रतिभेने मानवजातीचे असे कल्याण करणार्‍या २१ जून १९१२ रोजी जन्मलेल्या ऍलन टूरिन्गची शोकांतिका मात्र चटका लावणारी आहे. हा समलैंगिक होता. तत्कालीन ब्रिटीश कायद्याला हे संमत नव्हते. टूरिन्ग याच्यावर ‘इन्डिसेन्सी’ indecency हा आरोप ठेवून १९५२ साली खटला भरला गेला. खटल्यात वैद्यकीय उपचार वा तुरुंगवास असे दोन पर्याय त्यांच्यापुढे ठेवले गेले. वैद्यकीय उपचारांचा पर्याय त्याने निवडला. DESचे म्हणजे रासायनिक खच्चीकरणाचे – केमिकल कॅटस्ट्रेशन - उपचार त्यांना दिले गेले (यात इस्ट्रोजेनसारख्या स्त्री संप्रेरकाचा देखील अंतर्भाव होता असे म्हणतात). त्या उपचारांमुळे तोल जाणे, हातपाय थरथरणे, हातांची बोटे पिळवटणे इ. शारीरिक व्याधी त्याला जडल्या. मानसिक आणि भावनिक परिणाम झाले असतीलच. मनोदौर्बल्यातून उद्भवलेल्या औदासिन्यातून अखेर त्याने अखेर ०७ जून १९५४ रोजी वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी आत्महत्त्या केली. आत्महत्त्येसाठी सायनाईड वापरले गेले असे आंजावर काही ठिकाणी म्हटलेले आहे.

शेरबॉर्नला शाळेत असतांना ऍलनची आपला एक सहाध्यायी ख्रिस्तोफर मार्कोम याच्याशी मैत्री झाली. ही मैत्री वैशिष्ट्यपूर्ण होती. दोघे समलिंगी होते आणि हे ऍलनचे पहिले प्रेम होते.

परंतु ख्रिस्तोफर समलिंगी होता एवढेच जनसामान्यांच्या लक्षात राहते. हा देखील असामान्य, चमकदार प्रतिभेचा प्रज्ञावंत असावा. ‘द इमिटेशन स्टोरी’ या चित्रपटात गुप्तभाषा कशा उलगडाव्या याविषयीचे पुस्तक ख्रिस्तोफर ऍलनला देतो असे दाखविले आहे. या प्रेमाने ऍलनला पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळाली असे जालावर म्हटलेले आहे. परंतु हे प्रेम अल्पजीवी ठरले. १९३० मध्ये आतड्याच्या क्षयरोग विकोपाला गेला आणि ख्रिस्तोफरचा मृत्यू झाला. काही वर्षापूर्वी रोगग्रस्त गायीचे दूध प्याल्यामुळे हा रोग त्याला जडला होता.

दुःख बुडवायला ऍलन टुरिन्गने त्याने आपले गणित आणि विज्ञानातील कार्य जास्त जोमाने सुरू ठेवले. आपल्या पत्रात ऍलनने ख्रिस्तोफरच्या आईला पुढील अर्थाचा मजकूर लिहिला आहे: ‘ख्रिस्तोफरएवढा कुशाग्र बुद्धिमत्तेचा तरीही निरभिमानी आणि ओढ लावणारा मित्र मला अन्यत्र मिळाला नसता. माझ्या कामात त्याला स्वारस्य होते आणि त्याने मला ज्या विषयाची ओढ लावली त्या खगोलशास्त्राविषयी आम्ही एकमेकांशी बोलत असू. त्याच्या देखील माझ्याबद्दलच्या भावना अशाच होत्या असाव्यात. तो असता तर त्याला मी ज्या प्रमाणात मेहनत घेईन असे वाटले असते तेवढे जमले नाही तरी आता मात्र मला नक्कीच पुरेपूर जीव ओतून काम केले पाहिजे.’

काहींचा कयास असा आहे की ऍलनच्या नास्तिक असण्यामुळे आणि मटेरिऍलिस्टीक असल्यामुळेच ख्रिस्तोफरचा मृत्यू झाला. पण तशी शक्यता फारशी दिसत नाही असे जालावर एकेठिकाणी म्हटलेले आहे. याउलट आयुष्याच्या या वळणावर ऍलनचा आत्मा आणि जीवनोत्तर अस्तित्त्व यावर विश्वास असावा. ख्रिस्तोफरच्या आईला ते पुढे लिहितात त्याचा पुढीलप्रमाणे ढोबळ अर्थ आहे: आत्मा आणि वस्तू यांचा काहीतरी अतूट असा परस्परसंबंध असावा परंतु अशरीरी (वा अशारीर) अशा काहीतरी वेगळ्या बंधाचा असे माझे वैयक्तिक मत आहे. जेव्हा मी आत्मा आणि शरीर यांचा विचार करतो तेव्हा मला जाणवते की जिवंत आणि सचेत असलेले शरीर आत्म्याला धरून ठेवते. शरीर निद्राधीन झाल्यावर काय होते ते ठाऊक नाही परंतु मृत्यू झाल्यानंतर मात्र शरीराची आत्म्याला धरून ठेवण्याची यंत्रणा नष्ट होते आणि आत्म्याला यथावकाश, कदाचित त्वरितच, दुसरे शरीर मिळते. तेव्हा तो नास्तिक वगैरे काही नसावा असे वाटते.

टूरिन्ग मशीनला आद्य संगणक आणि ऍलन टूरिन्ग यांना ‘आधुनिक संगणकाचा पिता’ असे आजही म्हटले जाते. संगणकीय सेवा क्षेत्रातून आर्थिक प्रगती साधणार्‍या आपल्या भारतावर पण त्यांचे अप्रत्यक्ष रीत्या उपकारच आहेत. भारताशी त्याचे नाते मात्र त्याच्या जन्मापूर्वीचे आहे. ऍलनचे पिताश्री श्री जूलीअस टूरिन्ग भारतात बिहार आणि ओरिसा प्रांतातील छत्रपूर येथे एक आयसीएस अधिकारी होते. मातुःश्री इथेल ही मद्रास रेलवेच्या चीफ इंजिनीयरची कन्या होती हे वर आलेच आहे. ज्या घरात ऍलनचा जन्म झाला त्या घरावर मात्र त्याचा या घरात २३ जून १८१२ रोजी झाला असे लिहिलेली निळी पाटी आहे.

काही माणसे चुकीच्या काळात जन्माला आली असे वाटून जाते. काही कर्मठ परंपरांच्या वा रीतीरिवाजांच्या जोखडाखालून समाज मुक्त होण्याच्या आधीच या व्यक्ती त्या रीतीरिवाजांना बळी गेल्या. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या बंधूभगिनींवर समाजाने बहिष्कार घातला. कारण काय तर त्यांच्या तीर्थरूपांनी संन्यासानंतर पुन्हा संसारात प्रवेश केला. रघुनाथ धोंडो कर्व्यांवरचा बहिष्कार तर एवढा कडक होता की त्यांच्या पत्नीच्या अंत्ययात्रेत मृतदेह हातगाडीवरून न्यावा लागला आणि अग्नि देतांना त्यांच्याबरोबर केवळ एक मित्र होता. त्यांच्यावरचा ध्यासपर्व हा चित्रपट फारच छान आहे.

गॅलीलीओला अनेक वेळा इन्क्विझीशनला सामोरे जावे लागले. ऑर्थर एडिंग्टनच्या, खरे तर गोर्‍या साम्राज्यशाही ब्रिटिशांच्या गुलामीतल्या भारतीयांविषयी असलेल्या आकसामुळे डॉ. चंद्रशेखरांना त्यांच्या सन १९३५च्या सुमाराच्या संशोधनाला मान्यता मिळून नोबेल मिळायला १९८३ साल उजाडावे लागले.

जन्मशताब्दीच्या वर्षी २०१२ साली टूरिंगचा गौरव करून ब्रिटीश सरकारने समाजावरील त्याचे ऋण मान्य केले. हल्लीच भारतीय सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक असणे हा गुन्हा नाही असा निर्णय दिल्यामुळे ऍलन टूरिंगच्या चटका लावून गेलेल्या स्मृतीला उजाळा मिळाला. समलिंगी असणे हे गैर मानले गेल्यामुळे ऍलनला शारिरिक यातना भोगाव्या लागल्या हे पाहून वाईट वाटते. खरे तर ऍलन टूरिंगवर दुसरे कुणी लिहीते काय याची वाट पाहात होतो. त्या निमित्ताने हा सहा वर्षांपूर्वी खरवडलेला आणि नंतर अडगळीत पडलेला अर्धकच्चा लेख पुन्हा शोधून काढला. ऍलन टूरिंगवर तसेच त्याच्या कार्यामधील आणखी संशोधनासंबंधी, इमिटेशन गेम इ. प्रयोगांबद्दल आणखी बरेच काही आहे. परंतु विस्तारभयास्तव ते टाळले आहे.

समाजमाहिती

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

29 Sep 2018 - 11:19 am | श्वेता२४

या लेखाच्या निमित्ताने वेगळी माहिती दिली. धन्यवाद

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Sep 2018 - 12:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक आणि मनाला चटका लावणारी माहिती ! संशोधकांचे संशोधन नेहमीच चर्चेत असते पण त्यांच्या जीवनातल्या चढउतारांबद्दल फार कमी वेळा वाचायला मिळते.

ऍलन टूरिंगवर तसेच त्याच्या कार्यामधील आणखी संशोधनासंबंधी, इमिटेशन गेम इ. प्रयोगांबद्दल आणखी बरेच काही आहे. परंतु विस्तारभयास्तव ते टाळले आहे. हे वेगळ्या लेखात/लेखमालेत जरूर लिहा. प्रतिक्षा आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Sep 2018 - 12:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

आप्मनीयगो आप्मदेशसं हे आप्मपनीयगो आप्मदेशसं असं असायला होते काय ?

टर्मीनेटर's picture

29 Sep 2018 - 1:37 pm | टर्मीनेटर

‘आधुनिक संगणकाचा पिता’ ऍलन टूरिन्ग बद्दलच्या हृदयद्रावक माहितीसाठी अनेक आभार.

यशोधरा's picture

29 Sep 2018 - 1:54 pm | यशोधरा

खूप सुरेख लिहिले आहे. आश्चर्यकारक आहे, तसेच शेवट चटका लावणारा.

आणखी संशोधनासंबंधी, इमिटेशन गेम इ. प्रयोगांबद्दल आणखी बरेच काही आहे. परंतु विस्तारभयास्तव ते टाळले आहे.

दुसरा भाग करून लिहा अशी विनंती.

कुमार१'s picture

29 Sep 2018 - 6:30 pm | कुमार१

कूटवेष्टित >> शब्द आवडला.

सध्या प्रत्येक ऑनलाईन व्यवहाराला आपण जो CAPTCHA नोंदवतो त्यातील T = Turing test आहे याचे यानिमित्ताने स्मरण करून देतो.

दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत !

सुधीर कांदळकर's picture

29 Sep 2018 - 6:56 pm | सुधीर कांदळकर

श्वेता२४ ताई, डॉ. म्हात्रेसाहेब, टर्मिनेटरजी, यशोताई, डॉ. कुमार१साहेब आपणांस अनेक, अनेक धन्यवाद.

@ डॉ. म्हात्रेसाहेब: धन्यवाद. बरोबर. आप्मनीयगो आप्मदेशसं हे आप्मपनीयगो आप्मदेशसं असंच असायला होते. मेंदू आणि कळफलक यातली कम्यूनिकेशन गॅप.