काल अमरावतीच्या अंबा आणि एकविरा मातेच्या मंदिरात जाण्याचा योग्य आला. एकविरा मंदिरात काही खास गोष्टी आहेत.
१. श्रीकृष्णाची पत्नी रुख्मिणी हिचे जन्मस्थान कौडण्यपूर हे अमरावतीपासून पन्नास किमी अंतरावर आहे. पुराणकथेप्रमाणे श्रीकृष्णाने रुख्मिणीला कौडण्यपूर येथून पळवून नेले. त्यासाठी रुख्मिणीच्या घरापासून अमरावती पर्यंत भुयार तयार केले गेले. ह्या भुयाराचे एक द्वार एकविरा मंदिराच्या जमिनीत आहे असे आम्ही लहानपणापासून ऐकत होतो. काही वर्षांपूर्वी एकविरा मंदिराचे नूतनीकरण करताना हे भुयार सापडले आहे. सध्या ते भुयार एकविरा मंदिरात बघता येते. अर्थात भूयाराच्या आत जाऊन शहानिशा करण्यात आली आहे का याविषयी मला कल्पना नाही. भुयारात बघितले असता काही पायऱ्या दिसतात. या भुयारातून रुख्मिणीला घेऊन बाहेर आल्यावर अमरावती जवळच असलेल्या भातकुली गावाजवळ श्रीकृष्ण आणि रुख्मिणीचा भाऊ रुख्मी ह्यांचे घमासान युद्ध झाले असे पुराणकथेत लिहिलेले आढळते.
२. तीन-चार वर्षांपूर्वी अमरावतीच्या माता खडकी मंदिरात श्रीकृष्णाची निद्रावस्थेतली एक मूर्ती सापडली. श्रीकृष्णाच्या विरहात असताना रुख्मिणीने तिच्या मनातील श्रीकृष्णाच्या प्रतिमेला अनुसरून हि मूर्ती तयार केली असं म्हणतात. ह्यात श्रीकृष्णाच्या चरणाशी रुख्मिणीने लक्ष्मीदेवीच्या ऐवजी स्वत: ला स्थान दिले. त्यानंतर एके दिवशी क्रोधात असताना रुख्मिणीने ही मूर्ती विहिरीत टाकून दिली. त्यानंतर कित्येक शतके ही मूर्ती सापडली नाही. स्वत: श्रीकृष्ण आणि रुख्मिणीने ही मूर्ती शोधण्याचा प्रयत्न केला. ह्या मूर्तीचे साधर्म्य केरळमधील पद्मनाभ मंदिरातील मूर्तीशी आढळते. पुरातत्त्व खात्यानुसार ही मूर्ती ६००० वर्ष जुनी असून ज्ञात असलेली ही श्रीकृष्णाची सर्वात प्राचीन मूर्ती आहे. ही मूर्ती सध्या एकविरा मंदिरात पाहावयास मिळते.
३. साधारण चार वर्षांपूर्वी संस्थानाने, एकविरा देवीची नवीन मूर्ती मंदिरात स्थापन करण्याचे ठरविले. हा निर्णय का घेण्यात आला ह्याविषयी मला कल्पना नाही. नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातल्या मंदिरातून पुजारी,पंडित यांना बोलावण्यात येणार होते. आणि यानिमित्त मोठा सोहळा आयोजित करण्यात आला. सोहळ्याच्या चार दिवसांपूर्वी एक विलक्षण गोष्ट घडली. देवीच्या स्वयंभू मूर्तीचा मुखवटा आणि लेप आपोआप गळून पडला. आणि देवीची अत्यंत प्राचीन मूळ मूर्ती दिसू लागली. गावात बातमी पसरल्यावर दर्शनासाठी मंदिरात प्रचंड गर्दी झाली. लोकभावना लक्षात घेता संस्थानाने नवीन मूर्ती स्थापनेचा बेत रद्द केला.
प्रतिक्रिया
27 Aug 2018 - 12:41 pm | टर्मीनेटर
तीन वर्षांपूर्वी ह्या सुंदर मंदिरात गेलो होतो.
माझ्या बरोबर त्यावेळी अमरावतीच्या श्री शिवाजी सायन्स कॉलेजच्या एक प्राध्यापिका होत्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार "वर्षानुवर्षे त्या स्वयंभू मूर्तीवर भाविकांनी लावलेले कुंकू, गुलाल, शेंदूर ह्यांचा खूप जाडसर थर साठला होता तो त्यावेळी गळून पडला आणि आतली मूर्ती तिच्या मूळ स्वरुपात दिसायला लागली."
तुमच्या धाग्यामुळे त्या मंदिरभेटीच्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.
27 Aug 2018 - 8:05 pm | दुर्गविहारी
बरीच नवीन माहिती मिळाली. फोटो टाकले असते तर बरे झाले असते.
पुण्यातील कसबा गणपतीवरील असाच शेंदुराचा थर राजा केळकर म्युझियममधे ठेवला आहे.
27 Aug 2018 - 8:32 pm | प्रसाद गोडबोले
६००० ? आर यु किडिंग मी ?
६०० असेल !
कॉलिंग वल्ली सर ...
27 Aug 2018 - 10:21 pm | अभ्या..
थाम्ब जरा, आधी मिसळीचे वय निश्चित करु दे त्याला. ;)
28 Aug 2018 - 8:57 am | धर्मराजमुटके
ते स्पेशली आपणांस किडत नसावे, टायपो झाला असण्याची शक्यता आहे.
28 Aug 2018 - 4:34 pm | चिनार
सर ६००० च आहे. ही माहिती तिथल्या पाटीवर लिहिली आहे. मूर्ती साधारण ३-४ वर्षापासून प्रकाशझोतात आली आहे.
पण मी पुरातत्व खात्यात जाऊन शहानिशा केलेली नाही.
27 Aug 2018 - 10:57 pm | निशाचर
देवळाचे फोटो बघायला आवडेल.
लिहिताना चूक झाली असावी. एवढी जुनी नसेल मूर्ती.
28 Aug 2018 - 8:42 am | प्रचेतस
तीन्ही दंतकथा दिसताहेत.
28 Aug 2018 - 4:40 pm | चिनार
सर...पहिली आणि दुसरी दंतकथा असू शकेल...
पण मूर्ती आणि भुयार मंदिरात पाहायला मिळू शकते...
तिसरी घटना घडलेली आहे. पण ती ईश्वरी योजना होती असा दावा मला करायचा नाही. योगायोग असू शकतो.
एकविरा देवीची ती प्राचीन मूर्ती मी बघितलेली आहे.
28 Aug 2018 - 5:36 pm | नाखु
भुयारात मिसळीबाबत काही तपशील, किमानपक्षी मिसळद्रोण आढळला तर बरं होईल,एकाच पुराव्यात दोन प्रकरणांचा निपटारा होईल.
मामो "चिनार्या देवीला (देवालयातील) काही साकडं घातलं का नाही.क्षेमकुशल आहे ना!"मामो आऑफ