आमचे अण्णा!-१

VINOD J. BEDGE's picture
VINOD J. BEDGE in जनातलं, मनातलं
18 Aug 2018 - 2:53 pm

आमचे अण्णा!-१

आमचे अण्णा म्हणजे माझे आजोबा एक अतरंगी व्यक्तिमत्व,एकदम दिलखुलास. सात बहिणींच्या नंतर झाले असल्याने पणजोबांनी लाडावून ठेवलेले त्यामुळे सगळे रंगढंग,मजामस्ती आणि काय काय असतील ते सगळे अनुभव गाठीला असलेले. तसं आमचं गाव कवठेमहांकाळ तालुक्यातलं आता दुष्काळी पण आजोबांच्या वेळी पाऊसपाणी चांगल असलेलं त्यामुळे हळद ,पानाच मळा, ज्वारी,असं सधन आणि चार पैसे राखून असलेले लोक, एकंदर सुखी म्हणावं असं गाव.
तर असे हे एकुलते चिरंजीव आणि त्यांचे एक आप्पा नावाचे मित्र फुल धिंगाणा करायचे. तसा साती बहिणीचा अण्णांवर फार जीव आणि पणजोबांनी वेचून वेचून सगळ्या गरीब घरात ह्यांची लग्नं लावून दिलेली, त्यामुळे त्यांना अण्णांचा मोठा आधार वाटे. तर असे आण्णा भरपूर आळशी,एकदा पणजोबांनी त्यांना म्हशी चरायला पाठवून दिलं तर हे आणि अप्पा तिकडे जाऊन झाडाखाली उताणे पडून टंगळमंगळ करत होते. म्हशींनी भरपूर दिवसांनी दावण सोडली असल्याने आणि माळावरचा वारा कानात शिरल्याने म्हणा म्हशी बेफाम उधळल्या आणि शेजारच्या शेतात घुसायला लागल्या. त्यांना सारखा जाऊन परत बाहेर काढायला लागायच त्यामुळे ह्यांच्या गप्पात व्यत्यय यायला लागला तसे अण्णा भडकले आणि दोन म्हशींच्या शेपट्या एकमेकांना बांधून टाकल्या वर दोघीना चाबकाचा एक एक तडाखा दिला ठेवून.व्हायचं तेच झालं आणि एकीची शेपूट तुटली,आणि पणजोबांनी अण्णाला जाम तुडवला.
एकदा मी पाचवीत असताना एक म्हातारे गृहस्थ अण्णांना विचारत घरी आले. ते अण्णांचे शाळेतील मास्तर होते, त्यांनी सांगितलं एकदा अण्णांनी मास्तरच्या खुर्चीवरच्या गोणपाटाखाली निवडुंगाच पान ठेवलेल, नंतर मास्तरांना आठ-दहा दिवस नीट बसता आलं नाही. त्यानंतर अण्णांची शाळा सुटली ती सुटली.तर अश्या ह्या अण्णांना सहचारिणी म्हणून भेटली माझी आजी,एकदम गोरीपान आणि अन्नपूर्णा. तिच नाव आहे रत्ना , एकदम साजेसं. आजीला अण्णांनी जाम त्रास दिला,ती बिचारी फार सोशिक,आता गेम उलटी आहे हा भाग निराळा.एकदा अण्णांची मोठी बहीण घरी आलेली आणि पुरणपोळी शिकरणाचा बेत होता,तिने अण्णांना आणि अप्पाला जेवायला हाक दिली. हे दोघं रामोशीवाड्यातुन पहिल्या धारेचा तांब्या भरून घेऊन आलेले आणि तीर्थप्राशन सुरु होतं,हाक ऐकून दोघांनी तांब्या केतकीच्या झुडपात लपवला आणि जेवायला बसले. जेवणात ह्यांच काही लक्ष नव्हतं ,पोळी,शिकरण,भात सगळी मिसळ करून कालवत बसले, सगळं ध्यान केतकीच्या झुडपात. अप्पाने एक आयडिया लावली आणि पाण्याच्या तांब्यात थोडी थोडी घेऊन आला,नंतर घास आणि घोटाचा जो खेळ चालू झाला ते आजीला कळलं,तिनं एक एक मिठाचा खडा हळूच दोघांच्या तांब्यात टाकला, दोघंजण दिवसभर उलट्या करत होते.
आमच्या लहानपणी आम्हाला अण्णांचा फार धाक वाटे, त्यांच्या वामकुक्षीत कुणी दंगा केला तर पाठीवर चाबूक पडे.तसे हे अण्णा एकदम नव्या विचारांचे आहेत,माझ्या कॉलेज मधल्या मैत्रिणीबाबत जेव्हा अण्णाला कळले तेव्हां म्हणाले,आवडली असली तर बिनधास्त पळवून आन वगैरे. गावात पहिली द्राक्षबाग अण्णांनी लावली, बेदाणा तयार केला. मोठं चौसोपी घर बांधलं,त्याच्या उंबऱ्याला तक्क्या समजून रेलून एका हातात चारमिनार असलेली त्यांची मूर्ती अजून डोळ्यासमोर आहे, आता वय झाल्याने उंबरा हाडांना रुततो, शुगर बीपी मुले बाकी सगळं बंद केलं आणि माळकरी झाले. त्यांच्याबरोबर कितीतरी एकादश्या मी पंढपूरला गेलेलो आहे. अगदी लहानपणीच रामायण,महाभारत, अण्णांनी वाचायला दिलं. मला ते करमणूक म्हणूनच आवडायचे हा भाग वेगळा.

क्रमशः

वावरलेख

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

18 Aug 2018 - 6:28 pm | पद्मावति

छान लिहिताय. वाचतेय.

टर्मीनेटर's picture

18 Aug 2018 - 8:31 pm | टर्मीनेटर

तुमचे अण्णा आवडले.

सिरुसेरि's picture

20 Aug 2018 - 8:18 am | सिरुसेरि

छान . पुभाप्र .

Ram ram's picture

20 Aug 2018 - 3:42 pm | Ram ram

मस्त. लिहिते व्हा.

बरेच विस्कळीत झाले आहे लिखाण , सुधारणेसाठी प्रयत्न करत आहे .

अभ्या..'s picture

20 Aug 2018 - 5:25 pm | अभ्या..

मस्त लिहित आहात हो बेडगेअण्णा,

दिपस्तंभ's picture

21 Aug 2018 - 2:03 am | दिपस्तंभ

कोणतं गाव... मी मळणगाव चा :)

VINOD J. BEDGE's picture

21 Aug 2018 - 6:25 pm | VINOD J. BEDGE

मळणगाव ! वा वा ! साहित्य परंपरा आहे तुमच्या गावाला. माझं गाव खरशिंग.