- डॉ. सुधीर रा. देवरे
बाजरी, गहू, हरभरा, ऊस, कामोड्या (कापूस), मका, दादर, कांदे आणि काही प्रमाणात भाजीपाला अशी आमची उत्तर महाराष्ट्र वासियांची पारंपरिक शेतातली पिकं होती. जळगाव भागात केळी, नाशिकच्या जवळपास (निफाड, पिंपळगाव बसवंत आदी भागात) द्राक्ष, अशीही त्यातल्यात्यात विभागणी असायची. आमच्या गावात शेताच्या कडेला उभं राहिलं की नजर जाईल तिकडे एकच एक पिक दिसे. खरिपात बाजरी आणि रब्बीत गहू. गावकर्यांनी केलेली सामुहीक शेती म्हणजे पाट थळ आणि ज्याची त्याची खाजगी शेती अशा पिकांनी बहरलेली दिसायची. या पिकांना सेंद्रिय खते (लेंडी खत, मेंढी खत, शेण खत, गाळ खत, पुंजं खत, सोन खत, राख आदी) दिली जायची. आणि फवारेही सेंद्रिय मारले जात.
पण अलीकडे रासायनिक खते आणि फवारे मोठ्या प्रमाणात वापरले जातात. काळाच्या ओघात इथला शेतकरी केव्हा व्यावसायिक- कमर्शियल झाला हे त्यालाही कळलं नाही, इतक्या सहज पध्दतीने तो व्यापारी पिकांकडे वळला. मध्यतंरी तीस- पस्तीस वर्षांपूवीँच्या आसपासच्या काळात इथल्या शेतकर्याने (द्राक्ष पिकवणार्या भागाव्यतिरिक्त) द्राक्षांची लागवड सुरू केली. हळू हळू द्राक्षांसोबत आता तो डाळींब पिकांकडे वळला. आणि अधूनमधून भरपूर पैसे कमवू लागला, असं कोणाला वाटत असलं तरी ही पिकेही बेभरवश्याची आहेत हे त्याच्या लक्षात येऊ लागलं. तेल्या या रोगापासून तर अवकाळी पाऊस आणि गारपिटींमुळे बागपिकांचे नुकसान भरून न येणारं आहे. फवारणीसह अन्य मजूरींसाठी भरपूर भांडवल शेतकर्याला या बागेत गुंतवावं लागतं. आता शेतकरी डाळिंबाची निर्यात करू लागला. हे शेतकर्याच्या आर्थिक फायद्याचं असलं तरी यातून काही वेळा शेतकर्याचे भांडवलही वसूल होत नाही. व्यापारी पिके घ्यावी की पारंपरिक अशा मनस्थितीत आज इथला शेतकरी सापडला. कांदा हे व्यापारी पिक असलं तरी तेही बेभरवश्याचं झालं. काळी, बैडं, थळ, चाकोले, बागायती, जिरायती, पांढरी (गाव वस्ती) आदी शेतीतले आणि गाववस्तीतले काही प्रकार आहेत. जमिनीचा कस पाहून पिकं घेतली जातात.
आपलं संपूर्ण शेत खरिपात बाजरीने आणि रब्बीत गव्हाने वा हरभर्याने उभ्या दिसणार्या शेतात आता बाजरीचा वा गव्हाचा दाणा पिकत नाही, हे अघटीत वाटतं. ज्यांच्याकडे शेती नाही त्यांच्याप्रमाणेच शेतकरी सुध्दा आता गहू- बाजरी मार्केटमधून व्यापार्याकडून विकत घेताना दिसतो हे दृश्य डोळ्यांनी पाहवत नाही. (हा गहू पंजाब, मध्यप्रदेश आदी राज्यातून मागवला जातो.)
आधी लाकडी नांगर नंतर लोखंडाचा नांगर म्हणून त्याचे लोखंड्या हे नामकरण आणि आता ट्रॅक्टरने शेतीची कामं होऊ लागली. या बदलामुळे बैल आणि बैलगाडी शेतकर्यांकडे दिसत नाहीत. (एक बैलगाडी लुप्त झाल्याने बैलगाडी संदर्भातले भाषेतले अनेक शब्द आणि वाक्प्रचार लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.) लाकडी नांगर, वखर, पांभर, कोळपणारं, फळी देण्यातली लाकडी फळी आदी औतं दिवसेंदिवस नामशेष होऊ लागली. धान्य काढायचं मशीन आल्याने कोणी शेतकरी पाथेवर बैल हाकताना दिसत नाही. म्हणून बैलाच्या तोंडावरचं मुचकंही इतिहासजमा झालं. बाजरी खुडणे, पाथ धरणे, खळे सारवणे, खळे लावणे, कणसं कांडणे, मोगरी, च्याहूर, पाट्या देणे, उपणणे, वार्याची वाट पहाणे, मुचकं आदी शब्दही मान टाकू लागले. बाजरीचे कणसं खुडायला माणसं लावल्याचं कुठं दिसत नाही. गावाजवळची खळवाडी दिसेनाशी झाली.
विहिरीतून मोटेने शेतीला पाणी भरण्याच्या काळात मोटेवरची गाणीही रानात शिरताच सहज ऐकायला मिळत. नंतर रॉकेलवर चालणारी वेगवेगळ्या कंपनींची इंजिनं आली आणि आता इलेक्ट्रीक मोटारी सगळीकडे दिसू लागल्या. दिवसेंदिवस विहिरींचं पाणी तळाला चाललं. विहिरींची खोली वाढू लागली. पाण्याचा तुटवडा पडू लागला तसं जास्त पाणी लागणारं आणि वर्षभर पोसावं लागणारं ऊसासारखं पिक घेणं कमी होऊ लागलं. शेताला म्हणजे विहिरींना जोपर्यंत महामुर पाणी होतं, तोपर्यंत विहिरीतलं पाणी मशिनने वा इलेक्ट्रीक मोटरने हौदात पडून सारंगने वहात शेतात जात असे. शेतकरी शेतातल्या वाफ्यांना वा बेल्यांना बारा देऊन पाणी भरायचे. ‘बारा देणे’ हा वाक्प्रचारही कालांतराने भाषेतून लुप्त होईल. आता तुषार सिंचन वा थेंब (ठिबक) सिंचनाने शेताला पाणी दिलं जातं. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मात्र या शोधाचं स्वागतच करावं लागेल.
शेतकर्याला भौतिक सुख मिळावं, त्याच्या हातात दोन पैसे खेळावेत याबद्दल कोणाचंही दुमत असणार नाही. पण आपली पारंपरिक पिकं अजिबात न घेणं हे मनातल्या मनात खडळतं. व्यापारी पिकांसोबत आज थोडीफार पारंपरिक शेतीही व्हायला हवी, असं वाटत राहतं. आज शेती वाटेहिश्यांमुळे अनेक तुकड्यांत विभागली गेली. म्हणून मशीनने सलग एकाच पिकाची शेती करणे कठीण होऊन बसले.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
प्रतिक्रिया
16 Jul 2018 - 12:10 am | कपिलमुनी
नुसताच गोल गोल गुंडाळला ! पुढं काय ? असलाच टीनपाट लेख शहर , नोकऱ्या , कम्प्युटर याबद्दल पाडता येईल . तात्पर्य काय ??
16 Jul 2018 - 8:48 am | जेम्स वांड
त्यांना अतिशय उत्तम साहित्यमुल्य असलेलं वगैरे वाटतं, त्याबद्दल कुठलंही स्पष्टीकरण द्यायला ते बांधील नसतायत. तुम्ही बसा ठणाणा करीत.
16 Jul 2018 - 11:51 am | नाखु
या मुन्याला काय माहीती शेतकर्यांचे प्रश्न, इतकी सुंदर माहीती देतात तर वाच की?
शहरी झुडुपातला नाखु पांढरपेशा मिपाकर
16 Jul 2018 - 6:11 pm | डॉ. सुधीर राजार...
तू मुन्या असशील. तुला शेतातलं काही कळलं असतं तर असे तारे तोडले नसतेस तू
16 Jul 2018 - 6:38 pm | नाखु
गदाधारी भीम शांत.
कपीलमुनी आमचे मित्र असून त्यांना आम्ही मुनी म्हणतो.
आपल्यासारख्या तेजस्वी, अभ्यासू आणि प्रकांड पांडित्य असलेल्या ज्ञानतपस्वी , विनयशील उच्चशिक्षीत व्यक्तीचा उपमर्द करण्याचा विचार स्वप्नात ही करणार नाही.
आपण मोठ्या प्रयासाने शोधून आणलेल्या या अनमोल ज्ञानखजिन्याबद्दल आपले आभार मानतो.
अखिल मिपा साक्षर ते सुशिक्षीत एक वैचारिक चळवळ या संघाचा चार आणे सभासद नाखु वाचकांची पत्रेवाला
17 Jul 2018 - 5:53 pm | डॉ. सुधीर राजार...
नारद मुनी म्हणा. म्हणजे कळ लावून गंमत पाहणारे. आपण टीका केली की लोकही टीका करतील असं वाटत असावं त्यांना.
16 Jul 2018 - 6:09 pm | डॉ. सुधीर राजार...
करा
16 Jul 2018 - 6:08 pm | डॉ. सुधीर राजार...
पाडा
16 Jul 2018 - 6:13 pm | डॉ. सुधीर राजार...
पाडा
17 Jul 2018 - 5:52 pm | डॉ. सुधीर राजार...
लिहिता येत नाही म्हणून तर लपून छपून लिहिता.खर्या नावाने या
18 Jul 2018 - 11:53 am | कपिलमुनी
खर्या नावाने या??
इथे तसे काही कंपल्शन नाही. तुमचे नाव , डॉ वगैरे खरे कशावरून ?
इथे बर्याच जणांना भेटलोही आहे , त्यामुळे तुमचे लपून छपून वगैरे खिशात ठेवा.
तुमच्या लेखाबद्दल काय करायची ती चर्चा करा , आयडीच्या उखाळ्यापाखाळ्या नकोत.
लेखाबद्दल >>>
शहरातल्या लोकांनी हवा तो जोब करायचा , त्यासाठी धूर सोडत गाड्या फिरवायच्य, जंगल तोडून , नद्या बुजवून घरे बांधायची , इंड्स्ट्रीने केमिकल नदी मध्ये सोडायचे , कार्बन हवेत सोडायचा आणि सेंद्रीयच्या गप्पा फक्त शेतकर्यांसाठी ! हुमणी वर कोणता सेंद्रीय औषधे चालतात ते सांगा ?
>>शेतकरी सुध्दा आता गहू- बाजरी मार्केटमधून व्यापार्याकडून विकत घेताना दिसतो हे दृश्य डोळ्यांनी पाहवत नाही.
हे कॉमेडी आहे , आता काय लागणारे सगळे पीक स्व्तःच्या शेतात पिकवायचे का ? जर मला गहू आणि बाजरी बाजारात स्वस्त मिळत असेल तर ते करायच्या भानगडीत का पडायचे ? त्यापेक्षा तेच रिसोर्स वापरुन शेतकरी नगद पैसा देणारे पीक घेइल .
कारण मुलांना शिकवायला , दवाखान्यात गहू बाजरी देउन वस्तू विनिमय चालात नाही. तिथे रोकडा कॅश लागते.
आधी लाकडी नांगर नंतर लोखंडाचा नांगर म्हणून त्याचे लोखंड्या हे नामकरण आणि आता ट्रॅक्टरने शेतीची कामं होऊ लागली. या बदलामुळे बैल आणि बैलगाडी शेतकर्यांकडे दिसत नाहीत.
आता पेजर कोणी वापरते का ? किंवा प्रवासासाठी घोडागाडी ? बैलगाडी ?
बाकी सगळ्या जगाने आधुनिकता , तंत्रज्ञान स्विकारले आणि त्याच सोबत शेतकर्याने देखील स्विकारले तर त्यात काय प्रोब्लेम आहे?
त्याबद्द्लचे शब्द डिक्शनरीत राहू द्या. तेवढ्यासाठी शेतकर्याने पारंपारीक शेती करुन स्वःत खड्ड्यात जावे का?
भाषा प्रवाहि असते , सोपि म्हणून लिहिलेली ज्ञानेश्वरि आज दुर्बोध वाटते. तशीच ५० वर्षापुर्वीची भाषा आता बदलणारच .
पारंपरिक पिकं वगैरे भानगडीत ना पडता जे फायद्याचे आहे तेच शेतकर्यांनी करावे . कारण त्यांची चूल पेटवायला असले लेख उपयोगी नाहीत.
एवढ टंकनश्रम घेण्याच्या योग्यतेचा लेख नव्हता, पण तुम्हि उगा भलत्य दिशेला गोळ्या मारायला लागला म्हणून हा प्रपंच!
18 Jul 2018 - 5:41 pm | डॉ. सुधीर राजार...
लेखात काय आहे हेच तुम्हाला कळलं नाही. मी शेतकर्याचा- कुणब्याचा मुलगा आहे. लहानपणी शाळा शिकत शेतात राबलो आहे. कंपल्शन नसले म्हणून तर भोंड्या नावांमांगे लपून गोळ्या मारता. आधी चांगले बोलायला लिखायला शिका नंतर योग्यता काढा. तुमची लायकी काय आहे हे तुमच्या भाषेवरून समजलेच.
18 Jul 2018 - 7:00 pm | कपिलमुनी
शेतकर्याचा- कुणब्याचा मुलगा ? शेतीवर लिहायला / प्रतिक्रिया द्यायला ही पात्रता असावि लागते का ?
लेखात काय आहे हे बरेच जणांना कळले नाही , याचा अर्थ लेख फसला आहे..
पारंपारीक शेती आणि तिचि भाषा / संस्कृती नामशेष होत आहे याला शेतकर्यांशी का जोडता ? हे टिकावे म्हणून त्यांनी आतबट्ट्यात पारंपारीक शेती करावी हा आग्रह का ?
आणि
>>तू मुन्या असशील. तुला शेतातलं काही कळलं असतं तर असे तारे तोडले नसतेस तू
>>नारद मुनी म्हणा. म्हणजे कळ लावून गंमत पाहणारे.
>>भोंड्या नावांमांगे लपून गोळ्या मारता. आधी चांगले बोलायला लिखायला शिका नंतर योग्यता काढा. तुमची लायकी काय आहे हे तुमच्या भाषेवरून समजलेच.
हे सगळे वैयक्तिक प्रतिसाद आहेत . मी तुमच्या लेखाला नावे ठेवली होती , त्यावर बघुधा प्रतिवाद नसावा म्हणून चिखलफेक केलीत .
वरती लेखाच्या मुद्द्यावर प्रतिसाद दिला आहे . तिथे प्रतिवाद करायचा सोडून तुम्ही तर शेतकर्याचा- कुणब्याचा मुलगा वगैरे सुरू झालात .
आणि टीका सहन होत नसेल तर ब्लोग किंवा चेपुवर आरत्या ओवाळून घ्या..
..
कारण मिपा- सोशल मिडिया म्हणजे खिडकी वगैरे ... इति गुरुवर्य
16 Jul 2018 - 9:57 am | सुबोध खरे
आज शेती वाटेहिश्यांमुळे अनेक तुकड्यांत विभागली गेली. म्हणून मशीनने सलग एकाच पिकाची शेती करणे कठीण होऊन बसले.
हि वस्तुस्थिती कोणी लक्षात घेत नाही. बाकी चालू द्या.
16 Jul 2018 - 10:54 am | कपिलमुनी
>>पारंपरिक शेतीही व्हायला हवी
शेवटचे वाक्य सोडल्यास त्यांचा सगळा भर पारंपरिक शेती पारंपरिक पध्धतीने व्हायला हवी यावर आहे.
त्यावर बरेच काही लिहू शकतो , पण धागाकर्ता धागा काढून गायब होतो असा अनुभव आहे.
>>शेती वाटेहिश्यांमुळे अनेक तुकड्यांत विभागली गेली
लोकसंख्या आणि उपजाउ जमीन याच्या गुणोत्तरामुळे तसे झाले आहे . मी विदर्भात १००-१२० एकर असलेले अतिशय गरीब शेतकरी पाहिले आहेत . तेच सांगली कोल्हापूर पट्ट्यात २ एकरात एक कुतुम्ब सुखाने रहाते. केवळ मशिन हा भाग महत्वाचा नाहि . जमिनिचा प्रत , मार्केट अशा बर्याच गोष्टी आहेत.
16 Jul 2018 - 6:13 pm | डॉ. सुधीर राजार...
केवळ पारंपरिक असं नाही. लोकसंस्कृती लयाला गेली की भाषा कशी मरते या दृष्टीने पहा
18 Jul 2018 - 11:57 am | कपिलमुनी
अश्मयुगीन संस्कृती लयाला गेली की आणि त्यांची भाषा मेली.
16 Jul 2018 - 6:09 pm | डॉ. सुधीर राजार...
खरं आहे
16 Jul 2018 - 11:31 am | ज्योति अळवणी
शेती विषयक माहिती... असे शीर्षक हवे होते
16 Jul 2018 - 6:58 pm | सतिश गावडे
अतिशय गोल गोल फिरुन नुसता शब्द पिसारा फुलवला आहे. मुद्दा काय आहे हे शेवटपर्यंत कळतच नाही.
शेतकऱ्यांनी पारंपारीक पिके घेणे सोडले, पारंपारीक औजारे सोडली, पारंपारीक शेतीच्या पद्धती सोडल्या म्हणून उसासे टाकत आहात म्हणजे तुम्ही आधुनिक सुधारणा, सोयी सुविधा वापरत नसावे म्हणावे तर चक्क इंटरनेट वापरत आहात.
16 Jul 2018 - 7:18 pm | उगा काहितरीच
"लेख" आवडला.
(लेखकाला चर्चा अपेक्षित नव्हती असं वाटतंय , नाहीतर लेख काथ्याकुट मधे आला असता. )
बाकी , चालूद्या !
17 Jul 2018 - 5:49 pm | डॉ. सुधीर राजार...
चर्चा आवडते. पण त्या चर्चेतून काही उजवे यायला हवे.ऊर्फ नाव घेऊन कोणालाही ठोकता येते. मी इथे वेगळ्वा नावाने अवतरलो तर सगळ्यात जास्त ठोकेन. पण मला ते बरं वाटत नाही. जेव्हा टीका करायची ना तेव्हा स्वत:च्या खर्या नावाने करावी. ही आंधळी कोशींबीर नाही.
16 Jul 2018 - 8:02 pm | प्रसाद गोडबोले
शेती कधीच फायद्याची असु शकत नाही हे मी पुराव्याने शाबित करु शकतो.
तुर्तास फक्त थेरॉटिकली आणि अर्ग्युमेन्ट्स करुन सिध्द केल आहे , ईम्पिरिकल इव्हिडन्स नाही त्यामुळे आम्ही आमचा शोधनिबंध प्रकाशित केलेला नाही :)
17 Jul 2018 - 5:50 pm | डॉ. सुधीर राजार...
मान्य
18 Jul 2018 - 6:12 am | कंजूस
शेतीचं जुनं चित्र मी पाहिलं आहे. त्याकाळी फोटोग्राफी परवडणरी नवहती. आता महामूर झाली पण दृष्ये गायब.
18 Jul 2018 - 5:18 pm | सोमनाथ खांदवे
डॉ.देवरे साहेब ,
तुमच्या भागातील सध्या नवीन पद्धतीने केली जाणाऱ्या शेती ची माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या सादर केली आहे , पारंपरिक पद्धतीने शेती कोणी करत नसल्याची खंत या लेखात जाणवते .
तुम्ही मिपाकारांची एक ' इको टूर ' काढा ,
सगळ्या नां एक टी टी इंजेक्शन द्या आन लावा खुरपायला शेतात .
शेती वरील लेखाला विरोध कर्तात म्हणजे काय ?
18 Jul 2018 - 5:44 pm | डॉ. सुधीर राजार...
पहिल्यांदा आपले अभिनंदन यासाठी करतो की आपण आपल्या खर्या नावाने मिपावर आहात. धन्यवाद
18 Jul 2018 - 5:49 pm | प्रचेतस
उत्तम लेख.
खानदेशातील पारंपरिक शेतीची थोडीशी माहिती मिळाली.
18 Jul 2018 - 7:50 pm | राही
मलाही चांगली माहिती म्हणून लेख आवडला. मते किंवा निष्कर्ष म्हणून नाही. आणि काही वैयक्तिक प्रतिसाद आवडले नाहीत. ओपन फोरमवर टीका होतेच. भाषा सौम्य ठेवली तर उत्तर देणे किंवा दुर्लक्ष करणे, दोन्ही सोपे जाते.