आजच्या घडीला आपल्याकडे जी आहे ती शिक्षण पद्धती ( EDUCATION SYSTEM ) आहे कि परीक्षा पद्धती (EXAMINATION SYSTEM)आहे!

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
30 Jun 2018 - 8:02 pm

आजच्या घडीला आपल्याकडेजी आहे ती शिक्षण पद्धती ( EDUCATION SYSTEM ) आहे कि परीक्षा पद्धती (EXAMINATION SYSTEM)आहे.

"९८१ भागिले ९ किती होतात रे?" कंपनीत आमच्या सेक्शनमध्ये नव्यानेच जॉईन झालेल्या ट्रेनी पोराला विचारले. "कितीही वेळ लागुदे, मनात कर किंवा कागदावर. पण calculator, कॉम्प्यूटर किंवा इतर कुणाची मदत नाही घ्यायची.स्वत;चे स्वत: करायचे." ( डिप्लोमा-ट्रेनी म्हणजे डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला आहे हा पोरगा.)
“ह्या! त्याची काय गरज आहे? ९८१ भागिले ९ ना... सोप्पे तर आहे उत्तर ९९.”तो म्हणाला
मी शांतपणे म्हटले “कागदावर कर. तुला हवा तेवढा वेळ घे. म्हटलंय ना...”
त्याने तेच गणित आत्मविश्वासाने कागदावर केले , उत्तर बरोबर ९९ आले. मी शेजारी बसलेल्या राहुलला म्हटले, “राहुल्या मुलगा शिकला, पुढे गेला. अरे ८० चा फरक पडलाय १९ पेक्षा ९९ बरोबर उत्तराच्या जरा जास्त जवळ आहे. आता थोडेच अंतर राहिलेय.”
आमचे म्हणणे ऐकत असलेला तो ट्रेनी पोरगा लगेच म्हणाला, “ओ चुकलोच! सॉरी सॉरी, १९ च बरोबर...”
मी पुन्हा राहुलकडे बघितले आम्ही दोघेही हसलो आणि तो म्हणाला “चला काम करू, त्याचा पगार घेतो आपण...”
शिक्षणाच्या निरनिराळ्या मुद्द्यावर अप्रतिहत बडबड करणाऱ्या, म्हणजे शिक्षणाचे माध्यम, मातृभाषा, शाळा चालकांची मुजोरी, शिक्षकांची लायकी, शाळांची भरमसाट फी वाढ, इ इ मुख्यत: बाह्य गोष्टीवर बोलणारे कुणीही शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपावर, दर्जावर बोलत नाहीत असे का ...
आम्ही बरोबर ऊत्तर देणारे अजून शोधतोय...कालच ३० जण झाले, ४ लोकाना जमले ...पाहू आम्ही आशावादी आहोत
(तुम्ही करून बघा हवंतर, फक्त calculator, कॉम्पुटर वापरायचा नाही किंवा इतर कुणाची मदत नाही घ्यायची.)
माझी बायको मानसोपचारतज्ञ आहे. तिनेच हि आयडीया दिलीये. अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाईम्समध्ये राजीव तांबे ह्यांचा “प्राथमिक शिक्षणातील ९८१/९” ह्याशिर्षकाचा(बहुधा)एक लेख आला होता त्यावरून तिने हा प्रयोग करून पहिला .तिच्याकडेही अनेक पालक मुलाना घेऊन येतात तिच्या कडची आकडेवारी वेगळे चित्र दाखवत नाही. फक्त आपल्या मुलाना एवढे साधे गणित देखील येत नाही ह्याचे वैषम्य पालकाना वाटत नाही.(खिशातल्या मोबाईल मध्ये चांगला calculator असताना हे सगळे तोंडी/ कागदावर करायची गरज काय? असे त्याना वाटते. ठीक आहे पण गुणाकार भागाकार अशा अगदी प्राथमिक गणिती क्रिया म्हणजे नक्की काय हेच त्याना समजत नाही त्याचे काय.दुकानात किंवा वास्तवाच्या अधिक जवळ जायचे तर Mall मध्ये १३.३८ रु किमतीच्या चार वस्तू घेताना किती वेळा हात खिशातल्या मोबाईलकडे जातो, माझाही जात नाही पण डोक्यात १३ चोक ५२ अधिक ३८ चोक १५२ म्हणजे एकूण ५३.५२ रु असे गणित होत असते ते नको व्हायला.) त्याना स्वत:ला ही ते बरेचदा येत नसते. उत्तम म्हणजे ८०- ९०% मार्क पडणाऱ्या मुलाना प्रश्न विचारले तर घोकून ठेवलेली उत्तर येतात त्या उत्तरावरून प्रश्न विचारला तर भंबेरी उडते, ह्याची गरज काय?परीक्षेत हे प्रश्न येणार नाहीत असे म्हणतात. २x२ जर ४ उत्तर असेल तर ते तसे का आहे हे विचारायचे नाही, फक्त घोकायचे ....

ही १९९३ सालाची गोष्ट, अगदी खरी-खुरी, माझ्याच बाबतीत घडलेली. मी तेव्हा दहावीत होतो आणि शाळेत एक बऱ्यापैकी हुशार विद्यार्थी होतो अगदी हा पुढे कदाचित बोर्डात येऊन आपल्या शाळेची ख्याती वाढवेल असा भ्रम शिक्षकांना व्हावा इतपत हुशार . पण त्यांच्या भ्रमाचा भोपळा दहावीच्या परीक्षेच्या आधीच फुटला. तो पण त्यांनाच काय, मलाही अनपेक्षित अशा पद्धतीने. आई बाबाना, (खास करून आईला) एकंदरीतच माझ्या वकुबाची जाणीव असल्याने ते काही मी बोर्डात येईन असली दिवास्वप्न पाहत नसत, पण ते ही चकित झाले इतका तो धक्का अनपेक्षित होता.
झाले असे कीं नेहमी प्रमाणे त्यावर्षी बोर्डाच्या परीक्षे आधी आमची प्रिलिम झाली आणि त्यात मराठीत मला अगदी जुजबी म्हणजे ४५ /१०० इतकेच गुण मिळाले बाकीच्या विषयात उत्तम गुण होते अगदी ९०-९५ पर्यंत पण मराठीची अगदीच लाजिरवाणी अवस्था होती.देशपांडे म्हणजे माझे वडील मराठी आणि इंग्लिश साहित्याचे उत्तम जाणकार, त्याकाळीच आमच्या कडे १५०० च्या आसपास पुस्तक होती . माझा भाषा विषयाचा पूर्ण अभ्यास त्यांनी घेतला होता आणि त्यांच्या मते माझी तयारी अतिशय उत्तम होती (ते खरच छान शिकवायचे. त्यांनी शिकवलेले आजही माझया चांगलेच लक्षात आहे .),
(देशपांडे म्हणजे आमचे वडील.आमचं मूळचं आडनाव देशपांडे पण त्यांनी मी दुसरीत असताना ते बदलून कोरडे केलं . त्यांना म्हणे बाबासाहेब पुरंदऱ्यान्नी सांगितलं कि आमचे पूर्वज रघुनाथ पंत कोरडे हे शिवाजी महाराजांच्या पदरी वकील होते आणि आग्र्याहून महाराज निसटताना हे मागे राहिले होते ते नेमके सापडले , त्यांचा औरंगजेबाने खूप छळ केला पण त्यांनी महाराज कोणत्या वाटेने महाराष्ट्रात परतणार ह्याचा थांग पत्ता काही मोगलांना लागू दिला नहि. पुढे ते (म्हणजे आमचे पूर्वज कोरडे) सुटले तेव्हा त्यांच्या ह्या स्वामिभक्ती साठी शिवाजी महाराजांनी म्हणे त्यांना नाशिक जवळचे वतन (देशपांडे वतन) दिले. त्यामुळे म्हणे आम्ही मूळ कोरडे होतो त्याचे देशपांडे झालो. त्यामुळे भारावून जाऊन वडलांनी स्वतःचे आडनाव परत कोरडे केले.( आता खरेतर ह्या लॉजिक नुसार शिवाजी महाराजांनी दिलेले वतन जे आता नाही राहिले त्याचे निशाणी म्हणून देशपांडे हे नाव अभिमानाने मिरवायला हवे होते ...असो ) मला हे भिकारडे कोरडे आडनाव अजिबात आवडले नव्हते आजही आवडत नाही पण मी तेव्हा लहान होतो. आणि माझ मत कुणी विचारलं नाही, माझ्या आईचाही नाव बदलण्याला विरोध होत पण तो म्हणजे असली काम नीट पूर्ण होत नाहित काहीतरी कुठे तरी राहते अन मग ऐन वेळेला त्यामुळे महत्वाची कामं अडतात असा technical कारणासाठी होता जो आजही खरा आहे-म्हणूनच आवडत नसूनही मी माझ आड नाव परत देशपांडे केलं नहि.पण पुढे मी बाबांना ओ ,देशपांडे! अशीच हाक मारत असे अजूनही त्यांचा उल्लेख मी देशपांडे असाच करतो. - आपला एक छोटासा सूड म्हणा हवा तर याला …पण ते एक असो!)
पण मग प्रिलिम मध्ये काय झाले? पेपर हातात देतानाच मराठीच्या शिक्षकांनी मुख्याध्यापकांना जाऊन भेटायला सांगितले आणि मुख्याध्यापकांनी काहीही न रागावता बोलता उद्या बाबाना घेऊन ये म्हटले आणि पेपर काढून घेतला. मला सॉलिड टेन्शन, सालं झालय काय?,पेपर पूर्ण बघता आला नव्हता फक्त मार्क पाहिलेले . गप घरी गेलो आणि देशपांड्याना सगळे सांगितले. तेही विचारात पडले त्यांना एवढे कमी मार्क ऐकून धक्काच बसला . दुसऱ्या दिवशी चक्क रजा काढून ते माझ्या बरोबर शाळेत आले आणि मुख्याध्यापकांना भेटले. आमचे मुख्याध्यापक, टिळेकर सर म्हणाले जसा पेपर त्याने प्रिलिम मध्ये लिहिलाय ना तसा जर बोर्डाच्या परीक्षेत लिहिला तर ४५ मार्क सोडा तो पास देखील व्हायचा नाही. आणि त्यांनी पेपर वडलांच्या देशपांड्यांच्या पुढ्यात टाकला. देशपांडे तो पेपर पाहत असतानाच सर बोलू लागले. अहो त्याने धंड्या ची उत्तरे लिहिताना तो धडा लेखकाच्या ज्या पुस्तकातून घेतला आहे त्याचे संदर्भ, त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतले संदर्भ दिलेत. ठराविक निबंध आम्ही घोकून घेतलेला असताना स्वत:च्या मनाने ३-३ पानी निबंध लिहिलाय. 'मराठी असे आमुची माय बोली'ह्या विषयावरच्या निबंधात संस्कृत सुभाषित काय करतय ? दीर्घोत्तरी प्रश्न झाला म्हणून दीड दीड पान उत्तर कोण लिहितं . कुणाला एवढा वेळआहे वाचायला? वृत्ताची लक्षणे देताना पण पाठ्य पुस्तका बाहेरची उदाहरणे दिलीत ... देशपांडे तसे बोलायला खडूस आणि टिपिकल पुणेरी, किमान शब्दात कमाल अपमान करणारे पण पोरा च्या दहावी कडे पाहून त्यांनी भावनांना आवर घातला असावा , ते म्हणाले,"अहो पण पाठ्य पुस्तकाबाहेरची असली तरी वृत्ताची उदाहरण बरोबर आहेत ना, संस्कृत सुभाषित लिहिलं तरी त्याचा अर्थ लिहिलाय ना मराठीत ? मग .." सर म्हणाले, "तुम्हाला मुद्दा कळात नाहीये, ह्याचा पेपर आमच्याकडे नाही तर अख्या पुणे विभागात कुठेही जाणार तपासायला. जो माणूस तपासणार त्याला समजले पाहिजे ना ह्याने लिहिलंय ते बरोबर कि चूक ते. त्यांना नमुना उत्तर पत्रिका दिलेली असते. त्यात ठरलेली उत्तरे, उदाहरणे आणि वृत्ताची लक्षणे वगैरे असतात , त्याबरहुकूम तो तपासतो. ज्याचे उत्तर तंतोतंत त्याच्या नमुन्याशी जुळते त्याला पैकीच्या पैकी गुण . हे असले पाठ्य पुस्तकाबाहेरचे लिहून विद्वत्ता दाखवली तर शून्य मार्क मिळतील त्याची शैक्षणिक पात्रता आणि त्याला मिळणारी बिदागी आणि कामाचा बोजा ह्याबद्दल ना बोललेलेच बरे, काय काही समजतंय का?"
आता देशपांड्याच्या डोक्यात प्रकाश पडला ते म्हणाले, "अहो पण हे चूक आहे मूळ शिक्षणाच्या उद्दिष्टाच्या अगदी विरोधात आहे."
"हो आहे. मग काय करणार आहोत तुम्ही आम्ही ? पहा बुवा मी सांगायचे काम केले ह्या उप्पर तुमची मर्जी आणि त्याचे नशीब..." ,
आता देशपांड्यांच्या डोक्यात उजेड आणि पोटात खड्डा दोन्ही पडले. त्यांना समजले काय ते पण मला समजेल का ? पेपर लिहिताना चांगलं व्यवस्थित उत्तर येतंय तरी फक्त पुस्तकातले घोकलेले लिहायला जमेल का?उदाहरण फक्त पुस्तकातलीच लिहायचे आठवेल का ? हा मोठा प्रश्न होता. मला घरी जाऊन त्यांनी समजावून सांगितले खरे पण मला समजले नाहीच. मी अगदी मनसोक्त पेपर लिहिला आणि दहावीला मराठीत शंभर पैकी ६१ मार्क घेतले. इतर विषयात ९०-९२ टक्के होते पण एकट्या मराठीमुळे एकुणात ८५. ८५ टक्के पडले.
२५ वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही शाळेत जात होतो तेव्हा गाईड, २१ अपेक्षित वापरणे अगदीच निषिद्ध मानले जात नव्हते पण स्वत: अभ्यास करून मनाने लिहिलेले उत्तर समजण्या / तपासण्या इतकी कुवत शिक्षकांमध्ये खासच होती त्यातील अनेक जण अशा स्वत: लिहिलेल्या उत्तराला अधिक गुण देत जाहीर कौतुक करत . पण हळू हळू पाया भूस भुशीत होऊ लागला होता दहावीच्या शेवटी हा प्रसंग घडला नसता तर आम्हाला त्याकाळीहि हा कॅन्सर किती पसरला होता ह्याची जाणीव झाली नसती. आणि आज , आज काय परस्थिती आहे?...शिक्षण का घ्यायचे तर परीक्षा उत्तीर्ण होण्या साठी, नुसते उत्तीर्ण नाही तर जास्तीजास्त मार्क मिळवूंन उत्तीर्ण होण्यासाठी मग.विषय येवो ना येवो, समजो न समजो. आजच्या भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्रवास भरकटलेला जो दिसतोय ना, त्याची सुरुवात कधी तरी २५-३० वर्षांपूर्वी आमच्या वेळी झाली असावी, जाणकारांना त्यावेळी हे अंत:प्रवाह दिसले नसावेत किंवा त्यांनी जाणूनबुजून त्याकडे कानाडोळा केला असावा पण आज त्यामुळे काय दिसतंय आपल्याला , साधारण ७० मुलं आहेत यंदाच्या वर्षी दहावी दिलेली ज्यांना १०० पैकी १०० गुण, एक दोन नाही सगळ्या विषयात मिळालेत. कसे शक्य आहे हे! घोकून पाठ केलेली उत्तरे आणि तशी पाठ केलेली उत्तरेच तपासु शकणारे परीक्षक... काही समजतंय का ? माझ्या मुलीच्या मराठीच्या शिक्षिकेला मराठीत स्वर १२ कि १४ माहिती नाही बाकी वृत्त, अलन्कार वगैरे सोडूनच द्या . मराठीत तरी तहान/तहानलेला ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द भूक/भुकेला आणि नवरा ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बायको कसा काय असू शकतो? पण हे शब्दश: खरे आहे.अर्थात इतर कुठल्याही विषयाची अवस्था फार वेगळी नाही.
शिक्षणात म्हणजे विषयात काही कमी वर्णभेद नाहीत. गणित, शास्त्र हे उच्च वर्णीय, भाषा त्याच्या खाली तर इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हे शूद्र.चित्रकला संगीत नाच हे तर विषयच मानले जात नाहीत. वास्तविक ह्या तीन गोष्टी प्रत्येक न प्रत्येक माणसाने त्याच्या लहानपणी केलेल्या असतात कि नाही.अगदी कोणतेही सर्वेक्षण न करता ९९.९९ % मुलाना चित्र काढायला आवडते, नाचायला आवडते गायला आवडते म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.मुल स्वत:ला व्यक्त करताना चित्र नाच गाणी ह्यांचा किती आधार घेतात.स्वत:ला व्यक्त करता येणे आणि ते सुद्धा जितके विविध प्रकारे, कल्पकतेने करता येईल तितके ते मुलांच्या व्यक्तिमत्वविकासाला पोषक ठरणारे असते मग किती शाळात हे विषय पुरेशा गांभीर्याने शिकवले जात असतील ? आणि किती आई बाबा आपल्या मुलांची ह्या विषयातली प्रगती-अधोगती ह्यावर लक्ष ठेवत असतील. मूल गणित विषयात नापास झाले तर आणि चित्रकलाविषयात कमी गुण मिळाले तर त्यांच्या प्रतिक्रिया सारख्याच येतील का?शाळा चित्रकला नृत्य(हो नाच नाही म्हणायचे)संगीत ह्याविषयाना गुण तरी देतात का? आणि एकंदरीत गांभीर्याने त्याकडे पाहतात का? हा एक प्रश्नच आहे आणि त्याचे उत्तर अर्थातच फारसे सकारात्मक नाही.
इंग्रजी मध्यम आणि त्यात पुन्हा CBSE, ICSE, केम्ब्रिज बोर्ड वगैरेंचा दिमाख तर काही औरच त्यांच्या शाळाही भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या. त्यांच्यापुढे SSC बोर्ड कीस झाड कि पत्ती! शाळेत असताना आणि नंतरही अनेक वर्षे मला माझे शिक्षण ज्याप्रमाणे झाले तो SSC बोर्ड म्हणजे CBSE, ICSE,पेक्षा कमतर वाटत असे. केम्ब्रिज बोर्ड तर माहितीच नव्हता. त्यांच्या शिक्षणाच्या दर्जाबद्दल माहिती नसल्याने एक प्रकारची भीती वाटत असे. आपण त्यांच्या समोर टिकू शकणार कसे! असे ही वाटत असे. (आपली ही समजूत किती चुकीची होती ह्याचा प्रत्यय पुढे नोकरीत जसजसा अनेक नवनवीन जॉईन होणाऱ्या लोकांशी संपर्क आला तेव्हा आला...असो)
परीक्षेत बऱ्यापैकी मार्क मिळवलेला मुलगा किंवा मुलगी आपल्याला कला शाखे कडे जायचे आहे असे म्हणाला /म्हणाली तर घरात कुणी गेल्याप्रमाणे सुतकी कळा पसरते. त्याने इंजिनियरच व्हायला पाहिजे किंवा डॉक्टर. अर्थात घरातले कुणी आधीच डॉक्टर असेल किंवा तसा व्यवसाय असेल तर तर त्याला त्याची ही सक्ती होतेच. त्याची आवड आणि बौद्धिक पात्रता असो व नसो.(हे मी वैयक्तिक अनुभवावरून लिहितोय.)
बर तो मुलगा पुढे इंजिनियर झाला तरी तो इंजिनियरिंगशी संबंधीत काम करेल ह्याचे शक्यता कमीच.
आता विषय निघालाच आहे म्हणून ह्या इंजिनियरिंग बद्दल थोडे लिहिलेच पाहिजे. एखाद्या देशात महामारीचा प्रकोप होऊन सगळीकडे रुग्णच रुग्ण दिसावे तसे काहीसे भारतात इंजिनियरिंग पदवीधरांचे होऊ लागले आहे.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा पासून एकही नोबेल पारितोषिक शास्त्र-अभियांत्रिकी विषयातल्या संशोधनासाठी/ कामासाठी भारतीय नागरिकालाला मिळालेले नाही. पण भारतात दरवर्षी सगळ्यात जास्त इंजिनियर तयार होतात. काम कोणतेही करो पदवी मात्र इंजीनियरीन्गची. नितीश कुमार , अरविंद केजरीवाल, जयराम रमेश, क्रीति सेनोन (कि कीर्ती सेनोन), सुशांत सिंग राजपूत, राम गोपाल वर्मा, कादरखान, रघुराम राजन हे लोक शिक्षणाने इंजिनियर आहेत पण काम इंजीनियरचे करत नाहीत. भारतात दरवर्षी जवळपास १५ लाख मुलं इंजिनियरिंगची पदवी घेऊन बाहेर पडतात. १५ लाख हा आकडा कदाचित तुम्हाला आपली १२५-१३० कोटी लोकसंख्या ऐकून फार वाटत नसेल तर जगात इतर काही प्रमुख देशात दरवर्षी बाहेर पडणाऱ्या इंजिनियरची संख्या बघा म्हणजे तफावत लक्षात येईल
रशिया ४५४४३६
अमेरिका २३७८२६
इराण २३३६९५
जपान १६८२१४
द कोरिया १४७८५८
इंडोनेशिया १४०१६९
युक्रेन १३०३९१
मेक्सिको ११३९४४
फ्रान्स १०४७४६
ही जगाशी तुलना आणि आकडेवारी झाली. पण भारतातदरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांची संख्या किती आहे? तर ती आहे ५२हजार, उच्च शिक्षण घेतलेल्या म्हणजे MD MS अशा तज्ञांची संख्या धरली तर साधारण ६० हजार दरवर्षी. तफावत कळतेय का? १५ लाख कुठे आणि ६०-६५ हजार कुठे.ह्यात डिप्लोमा म्हणजे पदविका प्राप्त करणारे इंजिनियर धरले नाहीत.
त्याहून आश्चर्य आणि दु:खाची गोष्ट अशी कि त्याना काम द्यायला पुरेशा संधी नाहीत असे नव्हे( ते तर झालेच) पण ह्यापैकी फक्त ७-७.५% पदवीधरच एखादे इंजिनियरिंगचे काम करण्याच्या पात्रतेचे असतात.बहुतांश इन्जिनियर मुलांना Core Engineering असलेली कामे नको असतात. मार्केटिंग, सेल्स, विमा–रिस्क असेसमेंट अशा अनेक ठिकाणी काम करायचा त्यांचा कल असतो.पण अगदी हार्ड कोअर इंजिनियरिंग नसले तरी साधे अप्लाईड-इंजिनियरिंग असलेले काम देखिल त्याना नको असते.मशीनवर जाऊन हात काळे करणे सोडूनच द्या. मी स्वत: Tata Motors सारख्या एका इंजीनियरीन्गशी संबंधीत कंपनीत काम करत असल्याने मी हे गेल्या कमीतकमी २३ वर्षांचे निरीक्षण लिहिले आहे.
https://www.indiatoday.in/education-today/featurephilia/story/engineerin...
रशिया अमेरिका जपान फ्रांस असे देश विकसित राष्ट्र आहेत त्यांच्याकडे दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडणाऱ्या लोकाना द्यायला काम असेल ही पण भारताचे काय , आपल्या कडे एवढ्या नोकर्या आहेत का?काम आहेका? बाजारात मागणी आणि पुरवठा ह्यांचा ताळमेळ बिघडला कि भाव प्रचंड वाढतात तरी किंवा पडतात तरी हे आपल्याला माहिती आहेच तसे काहीसे आता होऊ लागले आहे. तरीही इंजिनियरिंगकडे लोकांचा कल वाढतोच आहे.असे का होत असावे.
नुकताच एका नातेवाईकाशी शिक्षण ह्या विषयावर संवाद झाला. त्याचा मुलगा दहावीला ८९% गुण मिळवून पास झाला. आता पुढे काय? म्हणून पत्नीकडे कल चाचण्या करून घ्यायला आला होता. त्याच्याशी बोलताना integrated कॉलेज/क्लासेस ह्या नव्या प्रकाराबद्दल समजले म्हणजे तसे थोडेफार ऐकून होतो पण हा खरा प्रकार काय आहे ह्याची त्याच्या कडून मिळालेली माहिती चकित करून गेली. आणि थोडा फार उलगडा झाला.बर्याच जणाना माहिती असेलच पण तरीही ज्याना माहिती नसेल त्यांच्या साठी थोडक्यात माहिती अशी-
integrated कॉलेज/क्लासेस म्हणजे असे कोचिंग क्लासेस ज्यांनी एखाद्या कॉलेजशी संधान साधून, एखादा करार केलेला असतो. हे कोचिंग ११वी १२वी शास्त्र शाखेसाठी असते. साध्या कोचिंग क्लासेस मध्ये फक्त ११वी किंवा १२वीच्या विषयांचीच तयारी करून घेतली जाते पण integrated कॉलेज/क्लासेसमध्ये १२वी नंतर होणाऱ्या इंजिनियरिंगच्या प्रवेश परीक्षांची-म्हणजेच JEE-Main (Joint Entrance Examination)ची खास तयारी चांगली २ वर्षे करून घेतली जाते. आजकाल इंजिनियरिंगच्या प्रवेश परीक्षेत नुसते बरे किंवा चांगले मार्क मिळवून उपयोग नसतो तर चांगलेच, पैकीच्या पैकी मार्क पडले पाहिजेत नाहीतर IIT किंवा त्याच्या तोडीच्या इतर नामचीन इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश मिळणार नाही. आणि चांगल्या म्हणजे नामांकित कॉलेज मधून जर पदवी मिळाली नाही तर चांगली( म्हणजे गलेलठ्ठ पगाराची)नोकरी किंवा परदेशी जायची संधी कशी मिळणार! त्यामुळे अशा पैकीच्या पैकी मार्क मिळवून देण्याची हमी देणाऱ्या integrated कॉलेज/क्लासेसचे हल्ली पेव फुटले आहे.त्यांची फीही अर्थात तशीच असते. पुण्यात नामांकित(!) क्लासेस साधारण ४ ते ५ लाख रुपये फी आकारतात तर अहमदनगर, सातारा अशा ठिकाणी ही फी २.५ ते ३ लाख असते. ११ वी १२ वी करता फीची आकारलेली भरमसाट रक्कम सोडता ह्यात काही गैर असेल असे वरकरणी कुणाला वाटणार नाही पण तसे ते नाही. हे क्लासेस साधारण दिवसाला ६-७ तास मुलांची इंजिनियरिंगच्या प्रवेश परीक्षांची-म्हणजेच JEE-Main (Joint Entrance Examination)ची खास तयारी करून घेण्यासाठी खातात. आता ११वी १२वी शास्त्र शाखेला प्रयोगशाळा, जर्नल्स, रोजचे तास, त्याला उपस्थिती ह्यांना किती महत्व! पण मग हे integrated कॉलेज/क्लासेसच्या ६-७ तासांचे कसे नियोजन करायचे. तर ह्या क्लासेसच्या मालकांनी कॉलेजेसशी आधीच संधान बांधून ठेवलेले असते. मुलांनीपूर्ण दिवस ह्या क्लास मध्येच तयारी करायची. मुलांनी करायचे प्रयोग, त्याची निरीक्षणे अगदी त्यांची उपस्थिती हे सगळे manage(!) केले जाते. (काही बाबतीत तर सकाळी ९ ते संध्याकाळी ८ असे १०-१२ तास विद्यार्थी इथे काढतात) ही गोष्ट पालकांपासून लपवून ठेवली जात नाही, तर उलट ही कशी अभिनव क्लृप्ती आहे. अशा पद्धतीने सादर केली जाते, अभिमानाने.जणू ११वी १२वी ही दोन वर्षे फक्त प्रवेश परीक्षेच्या तयारी साठीच आहेत . हा एक गंभीर गुन्हा तर आहेच आणि ह्यात पालकांपासून ते कॉलेजेस पर्यंत आणि त्यापुढे ही अनेकजण सामील आहेत.पण त्यातला बळी जाणारा घटक जो विद्यार्थी आणि त्याचे पालक, तो देखील स्वखुशीने त्यात सामील होतो आहे.म्हणजे अपराध करणारा आणि तो ज्याचे नुकसान करतोय तो बळी दोघेही एकत्र येऊन अभिनव युती करताहेत. ह्या प्रकाराला जगात तोड नाही.
मी स्वत: बिबवेवाडी पुणे परिसरातल्या एका नामवंत क्लासला भेट देऊन केलेले निरीक्षण सांगतो. हा क्लास उघड पणे स्वत:ला integrated कॉलेज/क्लास म्हणवत नाही, अजूनतरी. तितका नामवंत नसल्याने दोन वर्षांची फी फक्त ३.५लाख रुपये, ती जर एकरकमी आणि रोख भरली तर २०-२५हजार रुपये कमी होणार. (हवी असल्यास) रीतसर पावतीही मिळणार (काळे धन वगैरे काही नाही.) २५० मुलांचे प्रवेश आधीच झालेत. आता सगळेजण काही एकरकमी पैसे भरत नाहीत, भरू शकत नाहीत तर त्याना हप्ते बांधून दिले जातात (म्हणजे दोन वर्षाच्या ८ कोटी ७५ लाखाची सोय झाली)एका बिल्डींगचे दोन मजले ह्यांचेच. बाकी खेळण्याचे मैदान, प्रयोगशाळा सोडाच पार्किंगची ही सोय नाही. डबे खायला कॅन्टीन नाही.पिण्याच्या पाण्याची मात्र सोय चांगली होती आणि प्रत्येक वर्ग वातानुकुलीत होता. मुलगे आणि मुलींसाठी वेगवेगळे स्वच्छतागृह आहे पण एका मजल्यावर मुलांसाठी आणि दुसर्या मजल्यावर मुलींसाठी, ते सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या पाहता अपुरे, आणि का असावे? कागदोपत्री हा साधा क्लास म्हणजे शिकवणी आहे जिथे दिवसाचे एखाद दोन तास फक्त विद्यार्थी येतात. पण प्रत्यक्षात ते तिथे दिवसाचे १० ते १२ तास घालवतात.११वी १२वीचा अभ्यास कॉलेजेस मध्ये होतच नाही. इंजिनियरिंगच्या प्रवेश परीक्षांची तयारी करताना तो आपोआप होतोच असे मला सांगितले गेले. ती तयरी करून घेणार्या शिक्षकांच्या पात्रतेचे काय? त्याना किती पगार दिला जातो असल्या प्रश्नाची उत्तरे मिळाली नाहीत आणि संशय आल्यामुळे लवकरच माझी तिकडून गोड बोलून बोळवण करण्यात आली.अनेक क्लासेस आता स्वत:चीच खोटी कॉलेजेस सुरु करतात . एका खोलीत ऑफिस आणि बाकी काही नाही बाकी सगळे पैसे खायला घालून manage करतात. मिकीज कॉलेज, ग्लोबल कॉलेज , राव कॉलेज, भाटीया कॉलेज ही असली नाव असलेली कॉलेजेस आपण कधी कुठे ऐकली होती?
अक्ख्या पुणे शहरात असे किती क्लासेस असतील आणि ह्यात किती मोठा आर्थिक(गैर) व्यवहार आणि किती मोठमोठ्या लोकांचे हितसंबंध गुंतले असतील? कसे झाले हे एवढे मोठे? कुणी ह्याना पोसले? आपण सारासार विचार हरवून बसलेल्या पालकांनी.
भारतात दरवर्षी साधारण १०-१२ हजार जागा IIT प्रवेशासाठी उपलब्ध असतात.( देशभरात २३ IIT संस्था आहेत) आणि परीक्षेला बसणारे विद्यार्थी असतात साधारण १२-१५ लाख.ह्या १२-१५ लाख मुलांपैकी पहिल्या अडीच लाख मुलाना दुसर्या प्रवेश परीक्षे साठी प्रवेश मिळतो (JEE Advanced). उपलब्ध जागा आणि परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांची संख्या ह्यातली तफावत लक्षात घेता हे क्लासेस आणि पालक किती दडपण आणत असतील मुलांवर ह्याची कल्पनाच केलेली बरी. अजूनतरी केंद्रीय परीक्षा बोर्डाच ह्यांनी खिशात टाकले असून आता ते निकालही पैसे भरून manage केले जातात असे काही खात्रीलायक रीत्या समजलेले नाही त्यामुळे आपले नाव टिकवायचे असेल तर ह्या क्लासेसना मुलाना चरकात घालून पिळून काढावच लागतं.
११वी १२वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्या मुलांच्या पालकाना कळकळीची विनंती,( अर्थात फक्त आणि फक्त शास्त्र शाखा आणि त्यातूनही पुढे ज्याना अभियांत्रिकी शाखेकडे जायचे आहे अशांसाठीच, बाकीचे तेवढे महत्वाचे नसतात! हो ना!) integrated कॉलेजनावाच्या भूलभुलैयाच्या मागे लागून स्वत:चा पैसा मुलांचा वेळ आणि मुख्य म्हणजे मुलांच्या आयुष्याशी खेळू नका. असो...शिक्षणातल्या इंजिनियरिंग बद्दल एवढे पुराण पुरे झाले.आता बाकीच्या महत्वाच्या मुद्द्याबद्दल पुढच्या भागात बोलू.
क्रमश:

शिक्षणविचार

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

30 Jun 2018 - 9:53 pm | प्रमोद देर्देकर

खूप मस्त माहिती साहेब पण यावर उपाय काय ते ही सांगा .
सध्या मी सुपात आहे . कारण मुलगा 9 वी त आहे.
तेव्हा तुम्ही मार्गदर्शन करा.

आदित्य कोरडे's picture

1 Jul 2018 - 7:04 am | आदित्य कोरडे

मुलाला त्याच्या इच्छेप्रमाणे करियर निवडू देणे , मुलगा ही गोंधळलेला असेल तर मुलाची कल चाचणी करून , समुपदेशकाक्डून मार्गदर्शन मिळू शकते, डॉक्टर इंजिनियर सीए असे ठराविक प्रसिद्ध अभ्यासक्रम सोडले तर इतर अनेक मार्ग असतात पण गैर प्रकार म्हणजे हे integreted कॉलेजेस वगैरेच्या मागे न लागणे श्रेयस्कर , अहो काय सांगू सध्या ११वी १२वी साठी जेवढा पैसा लोक ह्या क्लासेस मध्ये वाया घालवतात तेवढ्यात आवड असेल तर बऱ्यापैकी कॅमेरा कीट येऊन उत्तम व्यवसाय सुरु होऊ शकतो ...हे फक्त एक उदाहरण आहे. नोकरी बरोबर व्यवसाय संधीही चांगल्या असतात, शिक्षण फक्त नोकरी मिळवण्याच्या हेतूने झाले कि मग बरीच गोची होते ...
प्रतिसादात सगळे लिहिता येणे मुश्कील आहे .

दशानन's picture

1 Jul 2018 - 12:54 am | दशानन

आईचा घो!
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

शब्दानुज's picture

1 Jul 2018 - 8:09 am | शब्दानुज

११ वी १२ वीला क्लासेस ? अहो पुण्यात ९-१०लाच जेईईचे क्लासेस चालू होतात शाळेत. आहात कुठे !

कानडाऊ योगेशु's picture

1 Jul 2018 - 7:24 pm | कानडाऊ योगेशु

पण पुढे मी बाबांना ओ ,देशपांडे! अशीच हाक मारत असे अजूनही त्यांचा उल्लेख मी देशपांडे असाच करतो.

तुमचा बाप अगदी जिंदादील माणुस असणार! :)

प्रसाद गोडबोले's picture

1 Jul 2018 - 9:35 pm | प्रसाद गोडबोले

बाकी ते आधुनिक शिक्षण पध्दतीत " वडीलांचा , त्यांच्या निर्णयांचा आदर करावा " असा एक मुल्यशिक्षणात धडा घालायला हरकत नाही नै !

आदित्य कोरडे's picture

3 Jul 2018 - 6:44 am | आदित्य कोरडे

बाकी ते आधुनिक शिक्षण पध्दतीत " वडीलांचा , त्यांच्या निर्णयांचा आदर करावा " असा एक मुल्यशिक्षणात धडा घालायला हरकत नाही नै !
काहीच हरकत नाही , वडीलांचे निर्णय न पटले तरी आदरच करावा असे ना, म्हणजे त्यानी जाती बाहेरची मुलाशी / मुलीशी लग्न करायचे नाही हुंडा मान पान घ्यायचाच , मुलगा झालाच पाहिजे वाटल्यास गर्भ लिंग निदान करून मुलगी असेल तर ती गर्भपात करावा अये निर्णय घेतले तरी मूल्य शिक्षणात धडा असल्याने चालवून घ्यायचे, नै का?( बाकी हे 'नै का?' वगैरे लिहायची पद्धत आवडली ...ती ही शुद्धालेखाना शिक्षणात घ्यायला हवी)

छान लिहिले आहे. आपल्या देशातील समग्र शिक्षणव्यवस्था काही मोजके अपवाद वगळता सडलेली (खरे तर मुद्दाम सडवलेली) आहे. असो.

स्वधर्म's picture

2 Jul 2018 - 5:32 pm | स्वधर्म

माझी मुलगी यंदाच दहावी झाली. तिच्या अनेक वर्गमित्रमैत्रिणिंनी क्लासेस लावले अाहेत. पिअर प्रेशर अाहेच. पण अजूनतरी अांम्ही तो निर्णय घेतलेला नाही. ११वी १२वीचा अभ्यास खूप जास्त अाहे. म्हणजे दहावीला गणितात ८-१० प्रकरणे असतील, तर ११वी १२वी मिळून ३७ अाहेत. हा अभ्यासक्रम शासनाने राज्य बोर्डातील मुले नीट, जेईई, सीईटी वगैरेमध्ये मागे पडू नयेत, म्हणून वाढवला अाहे. त्याला ईलाज नाही. पण मुलगी अजून तरी क्लास लावायचाच म्हणत नाही. अाधी बघून गरज वाटली, तर लावायचा निर्णय तिचाच राहील. शाळेत, काॅलेजमध्ये या परिक्षांची तयारी करून घेत नाहीत. परीक्षांचे तंत्र शिकवत नाहीत. अाणि या परीक्षा दिल्याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश नाही. त्यामुळे पालकांसमोर एक नाईलाज असल्याची परिस्थिती तयार झाली अाहे. परंतु माझे स्वत:चे मत असे अाहे, की स्वयंअभ्यासाला पर्याय नाही. मुलांनी अापलं डोकं झिजवल्याशिवाय कोणताही क्लास त्यांना वरचा नंबर (यादीत) मिळवून देऊ शकत नाही. बघू मुलगी काय ठरवते ते.
या फेजमधून जात असल्याने लिहीण्यासारखं खूप अाहे… भीती अाणि हाव, यावरच कोणतेही उत्पादन विकले जाते. क्लासेसही त्याला अपवाद नाहीत.

आदित्य कोरडे's picture

3 Jul 2018 - 6:47 am | आदित्य कोरडे

खरा आहे तुमच म्हणणं, सगळीकडेच परिस्थिती इतकी विचित्र आहे कि क्लास किल्वा पालक किंवा शासन अशा कुणा एकाला दोषच देता येत नाही ...

खूप अभ्यासपूर्ण लेख. प्रत्येक शब्दाशी सहमत. Integrated colleges बद्दल प्रथम कळल तेव्हा मलापण खूप आश्चर्य वाटल होत..मला वाटत की आपली भरमसाठ लोकसंख्या आणि त्यामानाने संधीचा अभाव हेच ह्या सगळ्या बजबजपुरीचे मूळ कारण आहे..