गूढ अंधारातील जग -९ पुढे

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
16 Jun 2018 - 11:24 am

गूढ अंधारातील जग -९ पुढे

पाणबुडीतील सैनिकांचे मानसिक प्रश्न

हे सामान्य सैनिकांपेक्षा वेगळे असतात.

धातूच्या नळकांड्यात बंद असताना बाहेरचे काहीही दिसत नाही. जेवढे दिसते ते यंत्राच्या पडद्यावरच, ते सुद्धा प्रकाशमान बिंदूंची आकृती, जी आपण प्रत्यक्षात कधीच पाहिलेली नसते. त्यातून तुम्ही शत्रूच्या प्रदेशात किंवा जवळ गस्तीसाठी जाता तेंव्हा शत्रूने पेरून ठेवलेले पाणसुरूंग किंवा शत्रूच्या गस्त घालणाऱ्या पाणबुड्या यांच्याशी सामना होण्याची सतत असणारी भीती. शिवाय शत्रूचे टेहळणी करणारे उपग्रह किंवा विमाने आणि जहाजे यांची भीती. कारण तुम्ही परक्याच्या प्रदेशात प्रवेश केला आणि त्यांनी तुमची पाणबुडी बुडवली तर जगाला/ तुमच्या देशाला/कुटुंबाला काहीही न कळत तुमचा बुडून मृत्यू येईल. आणि तुम्हाला अंत्यसंस्कार सुद्धा नशिबाला येणार नाहीत याचे मनाच्या कोपऱ्यात असणारे भय हे कायम सोबत असते.

(जसे दुसऱ्या देशात हेरगिरी करणारे गुप्तहेर यांची मनस्थिती असते कि आपण जर पकडले गेलो तर आपला देश आपले अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही आणि परक्या देशात हाल हाल होऊन "नाही चिरा नाही पणती"स्थितीत आपला मृत्यू होईल आणि त्या देशाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात तुमचे पार्थिव फेकले जाईल.)

दुसऱ्या देशाच्या जल विभागात टेहळणी करताना तुम्हाला प्रतिहल्ला चढवणे हे जवळ जवळ अशक्य असते. कारण तेथे तुम्हाला तुमची जहाजे किंवा विमाने संरक्षण देऊ शकत नाहीत. शिवाय शत्रूच्या पाणबुडीशी/ जहाजाशी टक्कर होण्याची किंवा एखाद्या खडकावर आपटण्याची शक्यताहि असते.

२००९ मध्ये ब्रिटिश शाही अणू पाणबुडीची फ्रान्सच्या अणुपाणबुडीशी टक्कर झाली त्यावेळी दोन्ही पाणबुड्यावर आंतरखंडीय अणुक्षेपणास्त्रे ("डागण्यास तयार स्थितीत तैनात") होती
https://en.wikipedia.org/wiki/HMS_Vanguard_and_Le_Triomphant_submarine_c... अर्थात दोन्ही देशांनी यावर बऱ्यापैकी मौन बाळगले होते.

त्यामुळे शत्रुप्रदेशात टेहळणी करताना ड्युटीवर असलेले सोडून बाकी सर्व सैनिक आपल्या बंकवर शांतपणे पडून असतात. पायात बू ट घालायची नाही, टेपरेकॉर्डरवर किंवा तत्सम साधनावर मोठ्याने गाणी लावायची नाहीत इतकेच काय तर मोठ्याने बोलायचे पण नाही. भांडी घासायची नाहीत. सगळी हवा खेळती ठेवण्याची (ventilation), वातानुकूलन यंत्रे आणि फ्रिज पण बंद ठेवलेले असतात. त्यामुळे आतमधील वातावरण गरम आणि आर्द्र होते, त्यामुळे घाम फार येतो.
अशी सक्तीची विश्रांती आणि असहाय्यता सैनिकाच्या मनोबळावर फार मोठा परिणाम करू शकते. या मुळे वैफल्यग्रस्त होणे आणि तणाव संपवून टाका एकदाचा म्हणून आत्महत्येचे विचारहि त्यांच्या मनात येतात. त्यातून पाणबुडीतुन आपल्या कुटुंब किंवा मित्रांशी संवाद बंद असतो.

अशा अत्यंत तणावपूर्ण स्थितीत असताना बहुसंख्य अधिकारी आणि सैनिकांच्या मनात आपल्या हाताचे किंवा पायाचे हाड मोडून घ्यावे आणि पाणबुडीसेवेतून कायमचे बाहेर जावे असे विचार येतात.

माझ्या स्वतःच्या कच्च्या अंदाजाप्रमाणे साधारण ९० -९५ % सैनिकांच्या मनात असा विचार निदान एकदा तरी आला असावा. हि गोष्ट सर्व वरिष्ठांना माहिती असतेच परंतु याला अधिकृत दुजोरा कधीच मिळणार नाही.

परत आल्यावर काही महिन्यांनी परत अशा लांब गस्तीला जाण्याच्या अगोदर बरेच सैनिक काहीतरी कारण काढून ते टाळण्याचा प्रयत्न करतात. हि स्थिती बहुतकरुन सैनिकांच्या जीवनात मोठा बदल आणणारी घटना घडल्यावर जास्त प्रमाणात आढळते. उदा. जवळच्या नातेवाईकाचा( आई वडील इ ) मृत्यू झाला आणि तुम्ही अंत्य दर्शनालाच काय पण क्रिया कर्म करताना सुद्धा हजर नव्हता.परत येता तेंव्हा फक्त एक मंद तेवणारा दिवा मात्र दिसतो.

किंवा
नवीनच लग्न झालंय आणि दोन तीन महिने झाले आहेत आणि नवीन घर मिळून तुम्ही जरासे स्थिर स्थावर होतंय तेंव्हाच परत गस्तीवर जायला लागते आहे.(साधारण लग्न झाल्यावर ३-४ महिने अशा सैनिकाला लाम्बच्या गस्तीवर(long patrol) ला पाठवत नाहीत). अशा वेळेस मुंबई सारख्या शहरात आपली मंडी डबवाली (हरियाणा) जवळच्या खेड्यातील बायको एकटी आहे याचा तणाव सैनिकाला जाणवत असतो.

परंतु नौदलामध्ये "जोडीदार" पद्धत असते ज्यात दोन जवळचे मित्र ( सहसा एकाच राज्यातील किंवा साधारण घरचे वातावरण सारखे असलेले) कायम एकत्र असतात त्यामुले एकाला उद्भवणारे प्रश्न हा जवळचा मित्र जास्त चांगल्या तर्हेने समजू किंवा सोडवू शकतो. यामुळे सैनिकांना भेडसावणारे बरेच प्रश्न सुटण्यास मदत होते.
असे असले तरी मानसिक आजार पृष्ठभागावर दिसतात त्यापेक्षा खोल किती आहेत याची खोली सहज सहजी लागत नाही. नैराश्य (DEPRESSION) वैफल्य (FRUSTRATION), लायकीच नाही (WORTHLESSNESS) अशा वरून न दिसणाऱ्या भावभावनांचा प्रत्यक्ष किती अंतर्भाव आहे हे सांगणे कठीण आहे.

दुर्दैवाने लष्करी मानसोपचार तज्ज्ञांना पण एखाद्या माणसाला पाणबुडी शाखेत अपात्र ठरवण्या अगोदर फार विचार करावा लागतो कारण एक तर त्याच्या प्रशिक्षणावर झालेला खर्च आणि त्यासाठी गुंतवलेला काळ गृहीत धरावा लागतो त्याशिवाय त्याला मानसिक कारणासाठी अपात्र ठरवल्यास त्याच्या वर समाजाकडून मारला जाणारा शिक्का आणि त्याला शाखेत ठेवून होणारा फायदा/तोटा याच्याशी ताळमेळ घालणे वाटते तितके सोपे नाही. शिवाय स्पष्टपणे निदान न होणारे आजार किंवा निरोगी आणि आजारी यांच्या सीमारेषेवर असणारे सैनिक हे मनोविकारात जास्त असतात.

जगभरात नौदलात पाणबुडी शाखेत मानसिक आजारांचे प्रमाण जास्त आहे परंतु कोणतेही सरकार/ नौदल ते मान्य करत नाही/ करणार नाही.

काही वर्षे झाली कि बहुसंख्य सैनिक अशा ताणतणावाला आणि मानसिक दोलायमान स्थितीला निर्ढावतात. ( BATTLE HARDENED SOLDIER).

बाकी जास्त संवेदनशील सैनिक एकतर पाणबुडी शाखा सोडून पृष्ठभागी नौदलात जातात किंवा १५ वर्षे झाल्यावर निवृत्त होऊन नौदल सोडून नागरी जीवनात परत जातात. तेथेही त्यांची परवड होते कारण सोनार चालवण्याचा, तोफ डागण्याचा अनुभव नागरी जीवनात कुचकामी असतो त्यामुळे एक तर सुरक्षा रक्षक सारखी (किंवा इतर अशाच चतुर्थ श्रेणीतील) नोकरी मिळते जेथे नागरीक त्याला सन्मानाने वागवत नाहीत अन्यथा हे आपल्या गावी परत जातात. तेथे सुद्धा त्यांचे भाऊबंद त्यांना चांगली वागणूक देतातच असे नाही कारण घरच्या उत्पन्नात एक हिस्सेदार आला अशीच भावना असते.

त्यामानाने तांत्रिक ज्ञान असणारे सैनिक बऱ्या परीस्थितीत असतात. त्यांच्या शिस्तशीरपणा आणि उत्तम तांत्रिक अनुभवामुळे नोकऱ्याही चांगल्या मिळतात. आणि मुळात बऱ्या स्थितीतील असल्याने तांत्रिक शिक्षण घेऊन आलेले असतात म्हणून घरची परिस्थिती जास्त चांगली असते.

अशा अनेक सैनिकांना ज्यांनी आपले तारुण्य/आयुष्य देशासाठी वाहून टाकले माझा मनोमन नमस्कार

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jun 2018 - 11:40 am | डॉ सुहास म्हात्रे

माहितीपूर्ण लेखमाला.

पाणबुतील सैनिकांच्या मनोवस्थेचा उहापोह करणारा हा भाग वाचून त्या जीवनातील खाचखळगे समजायला बरीच मदत होईल. हा लेख वाचून बहुदा, "सैनिक काय, पगारदार नोकरच शेवटी" अशी मानसिकता असणार्‍यांना आपले विचार परत एकदा ताडून पाहण्याची बुद्धी होईल, असे वाटते.

पुभाप्र.

एस's picture

16 Jun 2018 - 11:57 am | एस

_/\_

मोहन's picture

16 Jun 2018 - 1:33 pm | मोहन

खरे साहेबांचे आभार मानावे तेवढे थोडेच. पाणबुडीवरचे खडतर आयुष्य समजण्यास खूप मदत झाली.

माहितगार's picture

16 Jun 2018 - 2:22 pm | माहितगार

__/\__

मार्मिक गोडसे's picture

16 Jun 2018 - 3:02 pm | मार्मिक गोडसे

हेच खरे 'बिग बॉस '.

दुर्गविहारी's picture

16 Jun 2018 - 3:13 pm | दुर्गविहारी

एका पुर्ण वेगळ्या जगाची सविस्तर ओळख करून दिलीत याबद्दल शतशः आभार. बहुतेकदा पायदळ, वायुसेना याच्याविषयी पाहून, ऐकून, वाचून माहिती असते. मात्र चित्रपटात दाखवतात त्यापेक्षा पाणबुडीचे जग किती खडतर आहे हे आपल्यामुळे समजले. एरवी एखाद्या पाणबुडीचे जलावतरण होते, त्या बातमीपुरता या गोष्टीचा संबंध येतो. या मालिकेबध्दल धन्यवाद. ___/\____

सोमनाथ खांदवे's picture

16 Jun 2018 - 10:17 pm | सोमनाथ खांदवे

खरे साहेब , आमच्या सामान्य बुद्धीत पाणबुडी चा विषय सोप्या भाषेत सांगून भर टाकली .असेच चालू राहू द्या , अहो आम्हाला चार ओळी प्रतिक्रीया लिहायला 10 मिनिट लागतात तर तुम्हाला लेख लिहायला किती वेळ लागत असेल याची कल्पनाच करवत नाही .

नाखु's picture

16 Jun 2018 - 10:56 pm | नाखु

सगळेच करतात पण कर्तव्य (तेही परिणाम माहीत असून) फक्त सैन्य आणि सीमा सुरक्षा दल यांच्यात असेल अपवादात्मक नक्षलग्रस्त भागातील पोलिस हेही.
सुरक्षित जमीनीवरचा नाखु

निशाचर's picture

17 Jun 2018 - 4:21 am | निशाचर

_/\_

अर्धवटराव's picture

17 Jun 2018 - 8:42 am | अर्धवटराव

तर प्रत्यक्ष बंदुकीची गोळी छातीत घुसली नसेल तरी त्याच पातळीचं दु:ख सतत वागवावं लागतं... ते ही एक-दोन दिवस नाहि तर काहि महिने.
राजु हिरानी सारख्या माणासाने हे रिअल लाईफ हिरो पडद्यावर आणावे राव. त्या सलमान वगैरे मंडळींचं कौतुक बघुन डोक्याला शॉट लागतो.

सोमनाथ खांदवे's picture

18 Jun 2018 - 3:27 pm | सोमनाथ खांदवे

मला काय आठवना राजू हिराणी आणि सलमान खान चा पाणबुडी बद्दल कंचा शिनीमा हाये , डोक्याला शॉट लागल्या मूळ दुपारची झोप लागणास झालय .

Nitin Palkar's picture

17 Jun 2018 - 2:55 pm | Nitin Palkar

_/\_

सुधीर कांदळकर's picture

18 Jun 2018 - 6:20 am | सुधीर कांदळकर

हा प्रश्न जाणवत असेल का हो? तिथे परमेश्वर ही संकल्पना नाही, धर्म या प्रकारावर बंदी आहे अशी माझी ऐकीव माहिती आहे. तिथे मरणोत्तर क्रियाकर्म वगैरे करतात की नाही ठाऊक नाही. तरीही समाजाच्या आधाराविना राहणे हे तिथेही कठीण असावे की ठाऊक नाही. आपल्याकडील माहिती काय म्हणते?

लेखमाला सुदरच चालली आहे. धन्यवाद.

सुबोध खरे's picture

18 Jun 2018 - 6:29 pm | सुबोध खरे

साम्यवादी देशात .....हा प्रश्न जाणवत असेल का हो? तिथे परमेश्वर ही संकल्पना नाही, धर्म या प्रकारावर बंदी आहे अशी माझी ऐकीव माहिती आहे. तिथे मरणोत्तर क्रियाकर्म वगैरे करतात की नाही ठाऊक नाही. तरीही समाजाच्या आधाराविना राहणे हे तिथेही कठीण असावे की ठाऊक नाही.

मला प्रश्न कळला नाही कृपया विशद करून सांगता येईल काय?

टर्मीनेटर's picture

18 Jun 2018 - 9:12 pm | टर्मीनेटर

साम्यवादी देशांतसुद्धा मरणोत्तर क्रियाकर्म वगैरे होतात. कम्युनिस्ट विचारधारा हि निरीश्वरवादी ,नास्तिक आहे. धर्म ह्या प्रकारावर बंदी नसून धार्मिक विधी, सोहळे , समारंभ जाहीररीत्या करण्यावर बंदी आहे/ होती. जो काय धर्म पाळायचाय तो तुमच्या घरात, चर्च किंवा मशिदीत, सार्वजनिकरित्या करण्यास मनाई आहे/ होती. तसेच कोणत्याही धर्माचा प्रसार / धर्मपरिवर्तन करण्यास मनाई आहे/ होती.

आमच्यापैकी अनेकांची पाणबुडी या प्रकाराविषयी भलतीच समजूत असते. अत्यंत थ्रिलिंग, गूढ आणि मनोरंजक वलय असतं. ते रोमांचक चित्र ज्यूल्स व्हर्नच्या साय फाय कथांवरून किंवा मॉरिशस वगैरेला समुद्रतळाची शोभा दाखवणाऱ्या काचेरी वाहनावरून वगैरे बनलेलं असतं.

विस्तीर्ण काचेतून आसपासचे जलचर आणि समुद्रतळ दिसतो आहे अशा केबिन्स, खाणेपिणे मजा, अधेमधे समुद्रतळावर ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फेरफटका वगैरे अशा अफाट कल्पना खरोखर मनात होत्या.

अगदी पाणबुडीच्या चित्रातही विमानासारख्या खिडक्या दाखवणे हा प्रकार पाहिला आहे.

त्या पार्श्वभूमीवर ही लेखमाला फारच धक्के देऊन गेली.

पुन्हा एकदा धन्यवाद.

यशोधरा's picture

18 Jun 2018 - 12:19 pm | यशोधरा

लेखमालिका आवडली.

श्वेता२४'s picture

18 Jun 2018 - 4:13 pm | श्वेता२४

हे असं काही असू शकेल याचा कधीही विचार केला नव्हता. ही बाजू प्रकाशात आणल्याबद्दल तुमचे धन्यवाद . आणि त्या पाणबुडीत राहून कर्तव्य बजावणाऱ्यांना दंडवत.

समीरसूर's picture

18 Jun 2018 - 4:55 pm | समीरसूर

ही लेखमालाच एका कादंबरीचा ऐवज आहे. अफलातून लिहिलं आहे...

सोन्या बागलाणकर's picture

19 Jun 2018 - 4:27 am | सोन्या बागलाणकर

उत्तम लेखमाला खरे साहेब !
मी या विषयावरचा Das Boot नावाचा जर्मन सिनेमा पाहिला होता त्याची आठवण आली हा लेख वाचून.
थरारक!

स्वराजित's picture

13 Jul 2018 - 4:52 pm | स्वराजित

खरे साहेब आपले खुप खुप आभार .