एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १३

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
24 Jun 2009 - 3:57 pm

(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?)

आधीचे भाग येथे वाचा :
भाग एक - http://misalpav.com/node/8127
भाग दोन - http://misalpav.com/node/8138
भाग तीन - http://www.misalpav.com/node/8149
भाग चार - http://misalpav.com/node/8172
भाग पाच - http://www.misalpav.com/node/8189
भाग सहा - http://www.misalpav.com/node/8204
भाग सात - http://www.misalpav.com/node/8219
भाग आठ - http://misalpav.com/node/8233
भाग नऊ - http://misalpav.com/node/8251
भाग दहा - http://misalpav.com/node/8282
भाग अकरा - http://www.misalpav.com/node/8295
भाग बारा - http://misalpav.com/node/8309

१ सप्टेंबर

आज कॉर्पोरेशन बीट्च्या दोगलेने राजीनामा दिला. तसे तो बरेच महीने वैतागला होता - अगदी संपादक आगलावेंनी मीटिंग घेवून आमच्या पेपरची नवी पॉलिसी म्हणजे क्राईम, सेक्स, सनसनाटी बातम्या ही त्रिसूत्री जाहीर केल्यापासून. बिचार्‍याच्या बीटवरून बातम्या तरी काय येत होत्या तर कचरा, रस्ता पाणी या विषयावरच्या. म्हणजे शहरातला कचरा नीट उचलला जात नाही, अस्वच्छता आहे, रस्त्यांवर खूप खड्डे पडलेत, अपुरा किंवा दुषीत पाणी पुरवठा होतो अश्या. फार फार तर राजकारण्यांच्या कोलांट्याउड्या किंवा जनरल बॉडीत त्यानी एकमेकांवर किंवा एकत्र येवून प्रशासनावर केलेले आरोप सनसनाटी असतात पण त्यात पुढे कधीच काही होत नाही. दुसर्‍या दिवशी तोच राजकारणी मी असे म्हणलोच नाही किंवा माझ्या म्हणण्याचा अर्थ वेगळा होता, पत्रकारांनी पराचा कावळा केला म्हणुन मोकळा होतो. बिचारा त्यात सुद्धा प्रयत्न करायचा बातम्या आकर्षक - एखाद्या रस्त्यावर खड्डे पडले की शहर गेले खड्ड्यात वगैरेसारखी शब्दरचना वापरुन किंवा एखाद्या राजकारण्याने दुसर्‍यावर केलेल्या आरोपांची बातमी देताना गेम वाजवली, कानाखाली आवाजच काढ्ला, चिखलफेक केली, धुळवड रंगली असे लिहून. पण तरी एकूण सनसनाटी बातम्यांची तर वानवाच तिथे मग त्याच्या बातम्या छापुन तरी कश्या येणार.

तसे कॉर्पोरेशन बीटचे रिपोर्टर म्हणजे या धंद्यातले उच्चवर्णिय. एका अर्थाने या धंद्याची एक वेगळीच जातीव्यवस्था असते. ती जन्मावर नाही तर कामाच्या स्वरूपावर अवलंबुन असते - म्हणजे कॉर्पोरेशन, पॉलिटीकल बीटचे रिपोर्टर सर्वोच्च स्थानी, त्याना सर्वाधिक मान मिळतो. त्याखालोखाल स्थान क्राईम रिपोर्टरचे, त्यानंतर बिझिनेस रिपोर्टरचे, शि़क्षण वगैरे फुटकळ समजले जाणारे बीट बघणारे लोक तर आणखी खाली अन सांस्कृतिक बीटवाले, फीचर डिपार्टमेंटवाले तर गावकुसाबाहेरचे लोक - त्यांचा रिपोर्टिंगशी संबंध असतो की नाही हाच प्रश्न पडावा असे त्यांचे स्थान. पण संपादक आगलावेंची नवी त्रिसुत्री आली अन आमच्या पेपरमधे एकदम सोशल इंजिनीअरींग, संपुर्ण सामाजिक क्रांती वगैरे झाली. दोगलेचे सर्वोच्च स्थान गेले अन ते मिळाले क्राईमचा मी, फीचरच्या यशदा मॅड्म वगैरे मंडळीना. कसे खपणार ते दोगलेला?

पण दोगलेने राजीनाम्याचे कारण हे नाही दिले. कारण दिले या व्यवसायातल्या कामाच्या वेळा, जबाबदार्‍या यामुळे घरी लक्ष देता येत नाही असे. पी आर चा व्यवसाय करणार आहे म्हणे आता तो. कानावर येतेय की तीन महिन्यांनी कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत त्यासाठी प्रचार करण्याचे कंत्राट बर्‍याच इच्छुकांनी त्याला दिले आहे. पण त्याने दिलेले कारण या व्यवसायातल्या कुणालाही पटेल असेच आहे. ईतर सगळे लोक संध्याकाळी ऑफिसातुन घरी येतात, शिरा-पोहे खातात, चहा पीतात अन बायकापोरांना घेवून बागेत फिरायला, सिनेमाला वगैरे जातात. पण पत्रकार मात्र रात्री दहा-अकरा-बारावाजेपर्यंत कामावरच. उलट संध्याकाळी त्यांना खाजवायला पण वेळ नसतो. डेडलाईनमधे काम संपवायचे असते ना? घरी जाईतो घरचे सगळे झोपलेले असतात मग करुन ठेवलेले गार अन्न गिळायचे अन झोपायचे. सकाळ तर सगळी पेपर वाचणे, फोन घेणे यातच जाते. सगळ्यांबरोबर बसुन बोलणे, एकत्र जेवण वगैरे आठ्वड्यातून एकदा, साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी. ते ही सगळ्यांचा सुट्टीचा दिवस एक असेल तर. आपले काही लग्न झालेले नाही पण आपलीसुद्धा सामानगिरी, टगेगिरी ही नोकरी लागल्यापासुन बंद झालीच ना?

***

५ सप्टेंबर

च्यायला सगळ्या फ्यूज उडालेल्या पत्रकारांचे झगे बाराथे साहेब मला घालणार असे दिसतेय! आज सकाळी त्यांनी मला बोलावुन सांगितले की दोगलेचा नोटीस पिरीअड संपल्यावर मला कॉर्पोरेशन बीट बघावा लागेल. दोगले तीन महिन्यांच्या नोटीसवर आहे पण मला उद्यापासूनच कॉर्पोरेशन बीटवर जाणे सुरु करायला सांगितले आहे. दोगले कामावर असेपर्यंत आम्ही दोघे कॉर्पोरेशन बीटवर जाणार अन नंतर मी एकटा. क्राईमवर नवीन आलेला ट्रेनी प्रशांत जाणार आहे. सध्या मला प्रशांतला पण मदत करायची आहे.

त्या तोडकरवर गेम पडली अन मी क्राईम बीटवर गेलो. तेव्हापासूनचा बराचसा वेळ तर क्राईम रिपोर्टिंग शिकणे अन तोडकरने केलेली घाण निस्तारण्यातच गेला. आत्ता कुठे क्राईम रिपोर्टिंग करायला मजा यायला लागली होती तर दोगलेनं राजिनामा दिला अन माझ्यावर परत गेम पडली. बाराथे साहेबांजवळ मी माझी नाराजी दाखवली तर ते म्हणाले, "नशीबवान आहेस तू. आत्ता कुठे जॉईन झालास अन एव्हड्यात दोन्ही महत्वाचे बीट कव्हर करायला मिळताहेत. आम्ही पत्रकारीतेत आलो तर जवळजवळ वर्षभर फक्त स्थानिक कार्यक्रमांची यादी अन पत्रकांवरुन बातम्या केल्या. अन त्यानंतरही तीन वर्षे पुस्तक प्रकाशन सारखे फुटकळ कार्यक्रमच केले." शेवटी केले कबुल बीट बदलायचे. करणार काय, नोकरी करायची आहे ना इथे?

***

२१ सप्टेंबर

गेले पंधरा दिवस कॉर्पोरेशन बीटवर जातोय पण इथे काम करायचा मूडच येत नाहीये. कंटाळा येतो. क्राईम बीटवर असताना कसा लवकर घराबाहेर पडायचो अन कमीशनर ऑफिस किंवा पोलिस स्टेशनला जायचो. दुपारी प्रेस रूम वर दोन तिन तास अन नंतर ऑफिस. सगळा दिवस अ‍ॅक्शन पॅक! इथे सगळा ढिसाळ कारभार.

पहिल्या दिवशी क्राईम बीटवरच्या सवयीने दुपारी अकरा बारा वाजताच पालिकेत गेलो तर तिथे कुणिच पत्रकार नाही. अधिकारी पण कुणीच जागेवर नव्हते. चार वाजेपर्यंत फक्त पायाला भिंगरी लावून फिरत होतो गरागरा सगळीकडे उगीचच! नंतर हळुहळू उगवले सगळे. दिवसभर काय काम करायचे असते इथे कुणाला ठावूक?

***

१५ ऑक्टोबर
छ्या! हा कॉर्पोरेशन बीट म्हणजे एकदम बोरिंग आहे बुवा! इथे काम असे काही नसतेच. पहिल्या दिवशीच्या अनुभवाने मी मात्र आता शहाणा झालोय. सकाळी ऑफिसला एखादी चक्कर मारतो मग परत घरी जातो. जेवण, वामकुक्षी वगैरे आटोपुन मग चार वाजल्यावर पालिकेत प्रेस रूम. तिथे थोडा वेळ इतर पत्रकारांशी गप्पा वगैरे टाईमपास. कोणि ना कोणि कॉर्पोरेटर काही ना काही पत्रक घेउन येतो तेव्हा चहा-खारी वगैरे होतातच. नंतर मग काही अधिकारी, पदाधिकारी याना आम्ही सगळे एकत्र जावुन भेटतो. त्यानंतर परत एकत्र बसुन आज कोणत्या बातम्या द्यायच्या ते ठरवतो. मग ऑफिसमधे साडेसात-आठ वाजता जायचे अन चार बातम्या टाकायच्या. पण तरी अजुन काही कळत नाही इथे बातम्या कशा मिळवायच्या ते. दोगलेला कश्या सगळ्या बातम्या मिळतात ते बघीतले पाहीजे. क्राईमवर कशा खत्रीसाहेबांकडुन टिपा घेतल्या तसा काहीतरी जुगाड केला पाहिजे इथेपण!

कथाविनोदविडंबनसमाजनोकरीप्रकटन

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

24 Jun 2009 - 4:01 pm | विशाल कुलकर्णी

देवा...छानच लिहीताय. पण एकच भाग चार चार वेळा का पोस्ट केलाय. काही मजकुर संपादित केलाय का?

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

श्रावण मोडक's picture

24 Jun 2009 - 4:09 pm | श्रावण मोडक

हे काय लफडं आहे? प्रतिक्रिया गेली कुठं माझी?
जुगाड जमव पम्या लवकर. हे बीट पण भारी आहे. आत्ता पुण्यातच बघ, एक कॅप्टन आत, एक सिटी इंजिनिअर आत. मजा येईल. त्यात तुझी नजर भारी आहे. बातम्या टिपणारी आहे. जमव, जमव.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jun 2009 - 5:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

झकास! पुन्हा एक मस्त खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह!

अनंत छंदी's picture

24 Jun 2009 - 5:14 pm | अनंत छंदी

म्हणजे असा प्रवास झाला म्हणायचा कॉर्पोरेशन बीटपर्यंत... :?
आवडतंय.... लेखन आवडतंय ;)

संदीप चित्रे's picture

24 Jun 2009 - 8:56 pm | संदीप चित्रे

समजली :)
ह्या सगळ्यात 'स्पोर्ट्स' वगैरे कव्हर करणारे कुठे असतात?
की ते ही गावकुसाबाहेर?