(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?)
आधीचे भाग येथे वाचा :
भाग एक - http://misalpav.com/node/8127
भाग दोन - http://misalpav.com/node/8138
भाग तीन - http://www.misalpav.com/node/8149
भाग चार - http://misalpav.com/node/8172
भाग पाच - http://www.misalpav.com/node/8189
भाग सहा - http://www.misalpav.com/node/8204
भाग सात - http://www.misalpav.com/node/8219
भाग आठ - http://misalpav.com/node/8233
भाग नऊ - http://misalpav.com/node/8251
भाग दहा - http://misalpav.com/node/8282
५ ऑगस्ट
"हम्म्म्म....." विचारमग्न बाराथे साहेबांचा उदगार..... अन नंतर एक मोठ्ठा पॉज... एकदम अटलबिहारी वाजपेयी, गेला बाजार विक्रम गोखले स्टाईल..... ही रिअॅक्शन पक्याची सगळी रामकहाणी ऐकल्यावर आली होती....
काल पक्याच्या प्रश्नावर रात्रभर विचार केल्यावर मी या विषयावर बाराथेसाहेबांशी बोलण्याचा निर्णय घेतला. हो! आपण काही तोफ नाही.... आत्ताच पत्रकार झालो म्हणुन नाहीतर आज पक्या ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत आपण पण असु शकलो असतो. कश्याला उगीच आपली मंदबुद्धी चालवून मित्राच्या आयुष्याशी खेळायचे? आज सकाळी सकाळी बाराथेसाहेबांच्या घरी पोचलो अन त्याना सगळे सांगितले.....
"प्रमोद तू आत्ता फक्त तुझ्या मित्राचा विचार करतो आहेस, पण मला तर हा त्यापेक्षा खूप मोठा प्रश्न दिसतोय. हा आख्ख्या शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. काहीही करून फ कंपनीचा हा प्लॅन मोडून काढ्लाच पाहिजे. अन हे करताना तुझ्या मित्राचेही संरक्षण केले पाहिजे," बाराथे साहेब म्हणाले.
अन त्यानंतर मी बघितले एक अनुभवी, निष्णात पत्रकार अश्या प्रसंगी सर्व बाजुंनी विचार करून कसे पटापट निर्णय घेतो ते. "प्रमोद हा प्रश्न आपण स्वतः पत्रकार या नात्याने हाताळू. एक तर ही आपली नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. त्यात आत्ताच आपण तुझ्या मित्राला उजेडात आणु नये असे मला वाटते. त्याची ओळख लपवण्यात त्याचीच सुरक्षीतता आहे," ते म्हणाले.
"पण असे करण्याने आपल्या जिवाला धोका निर्माण होईल," मी विचारले. माझ्या डोळ्यासमोर भर बाजारातुन मी धावतो आहे अन मागे फ गँगचे गुंड गोळ्या झाडत पाठलाग करीत आहेत असे फिल्मी दृश्य तरळत होते.
"मान्य आहे! पण हे आपले एक नागरीक म्हणून कर्तव्य तर आहेच पण असे धोके घेणे हा आपल्या व्यवसायाचा अविभाज्य भागच आहे. शिवाय आपण पत्रकार असल्याने गँग आपल्याला त्रास देणार नाही ही सुद्धा शक्यता आहे,"बाराथेसाहेब म्हणाले. मलाही हे पटले.
मग सर्वप्रथम बाराथे साहेबांनी संपादक आगलावे साहेबांना फोन केला अन त्यांना सर्व प्रकाराची माहिती दिली.... "जेव्हा अश्या धोकादायक कामगिर्या आपण करीत असतो तेव्हा नेहमी कुणालातरी आधीच विश्वासात घेवून ठेवावे. अगदी आणिबाणीची वेळ आलीच तर ते उपयोगी पडते," ते म्हणाले.
त्यानंतर त्यांनि त्यांच्या ओळखीच्या एका नामवंत वकीलाला फोन केला अन त्याचा सल्ला विचारला. त्याच्याशी बोलल्यावर मला पक्याकडून या सर्व प्रकाराची माहिती देणारे एक पत्र माझ्या नावे क्राईम रिपोर्टर या नात्याने लिहुन घ्यायला सांगितले. "त्यामुळे तुझी माहिती लिखीत स्वरुपात राहील अन नंतर पुढे मागे गरज पडलीच तर तुझा मित्र त्यानेच हे सर्व उघडकीला आणले हे सिद्ध करु शकेल," ते म्हणाले. मी एव्ह्डा भारावून गेलो होतो की मी लगेच पक्याला फोन करुन वोलावुन घेतले अन त्याच्याकडून तसे लिहुन घेतले.
नंतर बाराथे साहेबांनी पोलिस कमीशनर गोळेसाहेबांना फोन केला आणि एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे असे सांगुन त्यांची लगेचची अपॉइंट्मेंट घेतली.
अर्ध्याच तासात आम्ही कमीशनर गोळेसाहेबांसमोर बसलो होतो. बाराथे साहेबांनी त्याना पक्याचे नाव वगळून सारे काही सांगितले अन म्हणाले, "माझ्या तुमच्याकडून दोन अपेक्षा आहेत... सर्वप्रथम तुम्ही आम्हाला खबर देणार्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवून ईतर सर्व परिणामांपासुन वाचवावे ही.... अन दुसरे म्हणून या माहीतीच्या आधारे तुम्ही ज्या धाडी घालाल तेथे आमच्या रिपोर्टर अन फोटोग्राफरला बरोबर न्यावे ही." कमीशनर गोळेसाहेबांनी हे लगेच मान्य केले अन डी सी पी गोटेना बोलावून घेतले. त्यांना सर्व माहिती दिली अन ताबडतोब कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
गोटेसाहेबांनी मग आम्हाला त्यांच्या ऑफिसमधे नेले अन एसीपी जाधव, पीआय फटके ना बोलावले. तिथे आमचे जबाब नोंदवले.... आम्ही सगळा घटनाक्रम सांगितला अर्थात पक्याचे नाव वगळून. त्यानंतरच्या तासाभरात गोटेसाहेबांनी जवळपास शंभर पोलिस बोलवून घेतले. आम्हीपण आमच्या डोळस फोटोग्राफरला बोलावून घेतले अन त्यानंतर सुरु झाले धाड्सत्र.....
तीन तासात पोलिसांनी पाच गोदामांवर अन तीन ऑफिसांवर धाडी घातल्या, जवळपास सत्तर माणसांना अटक केली अन जिलेटीन, ईतर स्फोटके, दारुगोळा, शस्त्रे असा मोठा साठा जप्त केला.
संध्याकाळी कमीशनर गोळेसाहेबांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केले की काही पत्रकारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे धाडी घालून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात स्फोटके, दारुगोळा, शस्त्रे जप्त केली अन प्रजासत्ताक दिनी घातपात घडवून आणण्याचे कारस्थान उधळून लावले म्हणून.
परत ऑफिसमधे गेलो तर सगळी माहिती आधीच पोहोचलेली. सगळ्यांनी एकच गिल्ला केला अभिनंदन म्हणून. संपादक आगलावे साहेबांनी पण केबिनच्या बाहेर येवून शेक हँड केला आपल्याशी अन कॉन्ग्रॅट्स असे म्हणले. आज पान एक वर तेव्हडीच बातमी - बोम्बाबोम्ब पेपरने शहर वाचवले अश्या हेडिंगसह! वर माझी अन बाराथे साहेबांची एकत्र बायलाईन - त्यात बाराथे साहेबांनी त्यांच्याआधी माझे नाव दिले.
६ ऑगस्ट
आज सकाळपासून फोन नुसता घणघणतोय. बातमी वाचून कोणाकोणाचे अभिनंदनाचे फोन येताहेत. मंदामावशी नेहमी आईशी आखडूपणे वागते. तिचा नवरा बिल्डर आहे अन मुलगा दहावीत आहे म्हणुन... पण तिचाही फोन आला आईला. नंदे तुझ्या पम्याने नाव काढ्ले गं घराण्याचे.... तरी मी कायम सांगत होते, एक दिवस तो खूप मोठा होईल असे म्हणत. च्यायला! ही कधी असे म्हणाली?
पण मोठी गोची झालीय..... पक्याचे नाव कुठूनतरी लीक झालेय.... त्याचा फोन आला होता, धमक्यांचे फोन येत आहेत म्हणुन..... साला आपला तर भेजाच आउट झाला हे ऐकुन. करायला गेलो गणपती अन झाला माकड अशी गत.......
प्रतिक्रिया
22 Jun 2009 - 3:46 pm | श्रावण मोडक
हा भाग अगदी ओके-ओके वाटला बुवा. कारण तो थांबला मध्येच.
22 Jun 2009 - 8:00 pm | घाटावरचे भट
असेच म्हणतो.
22 Jun 2009 - 9:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
क्रमशःची वेळ चुकली! पण आधीच्या पुण्यकर्मांमुळे तुम्हाला क्षमा केली! ;-)
23 Jun 2009 - 7:56 am | सहज
चलता है! पुढला भाग होउन जाउ दे.
23 Jun 2009 - 2:11 am | स्वप्निल..
मस्तच..वाचतोय..
पु भा प्र..
स्वप्निल
23 Jun 2009 - 8:20 am | सुचेल तसं
मस्त चालू आहे. पुढचा भाग लवकरात लवकर टाका..
27 Jun 2009 - 4:04 am | Nile
मला आवडला. जरा कामात असल्यामुळे मी मागे पडतोय पण तुमची डायरी सोडवत नाही राव. येउद्या जोरात. :)