गोवा जवळ असूनही जाऊ-जाऊ करत राहतच होतं. गोव्यात नौदलाच्या हवाई शाखेचं संग्रहालय असल्याचं बऱ्याच वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. त्यातच नौदलाच्या हवाई शाखेबद्दल आणि त्यातही विमानवाहू जहाजांबद्दल आकर्षण असल्यामुळं ते संग्रहालय पाहावं अशी खूप इच्छा होती. बरीच वर्ष अपुरी राहिलेली ती इच्छा पूर्ण करण्याचा अखेरीस निश्चय केला आणि म्हटलं की, फक्त संग्रहालय पाहायला का असेना गोव्याला धावती भेट देऊन यायचंच.
सी हॅरियर आणि का-२५
हे संग्रहालय पाहण्यासाठी मोठ्यांना 100 रुपये आणि लहानांना 50 रुपये तिकीट आहे. पूर्वी कॅमेरासाठी वेगळं शुल्क भरावं लागत असे, पण आता एकाच तिकीटात सगळे शुल्क समाविष्ट आहे. तिकीट खिडकीजवळ जातानाच संग्रहालयाच्या खुल्या दालनात ठेवलेली काही विमानं, हेलिकॉप्टर्स आजूबाजूला दिसू लागली होती. आता मी एका वेगळ्याच विश्वात प्रवेश केलेला होता. त्यातच अगदी समुद्रकिनाऱ्याजवळच हे विमानतळ आणि संग्रहालय असल्यामुळं इथलं वातावरणही अतिशय मोहक वाटत होतं. आजपर्यंत केवळ फोटो आणि टी.व्ही.वर बघितलेली नौदलाची विमानं प्रत्यक्षात, इतक्या जवळून पाहायला मिळत असल्यामुळं खूपच रोमांचित वाटत होतं. परिणामी भान हरपून मी तिथं मांडलेली प्रत्येक गोष्ट न्याहाळू लागलो होतो. तिथं ठेवलेल्या एक-एक विमान-हेलिकॉप्टरचे फोटो काढून घेऊ लागलो.
ही सगळी विमानं-हेलिकॉप्टर्स भारतीय नौदलात सेवा बजावून निवृत्त झाल्यावर आता इथं व्यवस्थितपणे जतन करून ठेवण्यात आलेली आहेत. त्यांच्या भोवतीनं walkaround चीही सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळं त्या प्रत्येक विमान-हेलिकॉप्टरला वेगवेगळ्या कोनातून सहज पाहता येतं. Super Constellation हे या संग्रहालयात ठेवलेलं सगळ्यात मोठं विमान आहे. या विमानानं आधी इंडियन एअरलाईन्समध्ये, त्यानंतर भारतीय हवाईदलात आणि अखेरीस भारतीय नौदलात सेवा बजावलेली होती.
सी हॉक
भारतीय नौदलाचं पहिलं विमानवाहू जहाज असलेल्या भा. नौ. पो. विक्रांतवर (INS Vikrant) कार्यरत असलेली सी हॉक (Sea Hawk) आणि एलिझे (Elize) ही लढाऊ विमानं या संग्रहालयात पाहायला मिळतात. याच विमानांनी बांगलादेश मुक्तिसंग्रामात 4 डिसेंबर 1971 ला पूर्व पाकिस्तानातील चितगाँग आणि कॉक्स बाजारावर हवाई हल्ले केले होते. त्या हल्ल्यांमुळे त्या युद्धाला निर्णायक वळण मिळालं होतं.
भारतीय नौदलातून काही वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झालेलं सी हॅरियर हे लढाऊ विमानही इथं पाहायला मिळालं. सी हॅरियरच्या शेजारीच कामोव्ह-25 हे पाणबुडीविरोधी युद्धतंत्रात उपयुक्त ठरणारं हेलिकॉप्टरही पाहता येतं. त्यांच्या मागच फेअरी फायरफ्लाय आणि शॉर्ट सीलँड-2 ही विमानं ठेवलेली आहेत. नौदलाच्या हवाई शाखेत सामील करण्यात आलेली ती पहिली विमानं होती. जगात आता शॉर्ट सीलँड-2 ही तीनच विमानं अस्तित्वात असून इथं ठेवलेलं विमान त्यांच्यापैकीच एक आहे. खुल्या दालनात असलेलं ह्युजेज हे सर्वात लहान हेलिकॉप्टर, तर चुकार-3 हे वैमानिकरहीत विमानही लक्ष्यवेधक आहे. या खुल्या दालनात एकूण पंधरा प्रकारची विमानं, हेलिकॉप्टर्स, त्यांची इंजिनं, रडार आणि इतर शस्त्रसामग्री मांडलेली आहे.
Super Constellation
स्वच्छ हवा, निळं आकाश, स्वच्छ उन्हात आणखीनच झळाळून निघालेली संग्रहालयामधली विमानं आणि नजरेस पडत असलेली संग्रहालयाच्या मागच्या बाजूच्या धावपट्टीवरून हवेत झेपावलेली प्रवासी तसेच नौदलाची विमानं असं वातावरण संग्रहालयात फिरताना खूपच रोमांचित करत होतं. आता मी नौवहन संग्रहालयाच्या आच्छादित (Indoor) दालनांच्या दुमजली इमारतीत प्रवेश केला होता. या इमारतीला Wings of Valour असं नाव दिलं आहे. या इमारतीचं एका बाजूचं प्रवेशद्वार भारतीय नौदलातील दुसरं विमानवाहू जहाज असलेल्या विराटच्या केबिनच्या दाराप्रमाणं केलेलं आहे. या इमारतीत पराक्रम, अध्वन, यश, विमान, स्तुती, शस्त्र, क्षितिज, व्यूह, अद्वितीय, सशक्त, दृष्टी आणि शक्ती अशी दालनं आहेत. इमारतीच्या काही भिंतींवर नौदलात सेवा बजावलेल्या विविध विमानं-हेलिकॉप्टर्सची चित्रं रेखाटलेली आहेत. बांगलादेश युद्धाच्यावेळी भारतीय नौदलानं चढवलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी नौदलाच्या झालेल्या हानीबाबतची आणि अमेरिकन नौदलाच्या हेरगिरी करणाऱ्या विमानाच्या भारतीय हवाई हद्दीतील घुसखोरीविषयीची माहिती एका दालनात करून देण्यात आलेली आहे. सागराच्या पृष्ठभागाखालील लक्ष्यांचा शोध घेण्यासाठी नौदलाच्या विमानांवर वापरले जाणारे संवेदक इथं एका दालनात प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. भर समुद्रात असताना आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास नौसैनिकांकडून योजल्या जाणाऱ्या विविध उपायांची माहिती एका दालनात करून देण्यात आलेली आहे. अशा प्रसंगी वापरली गेलेली जीवरक्षक साधनंही इथं पाहता येतात.
व्हर्च्युअल रिॲलिटी कॉर्नरला स्वप्नपूर्ती करणारं दालन म्हणूनही ओळखलं जातं. कारण या दालनात बसवलेल्या सिम्युलेटरच्या मदतीनं एखाद्या लढाऊ विमानाच्या कॉकपीटमध्ये बसून विमान उडवत असण्याचा अनुभव आपल्याला घेता येतो. पण हे दालन नुतनीकरणासाठी बंद असल्यामुळं मला पाहता आलं नाही.
भारत-पाक युद्धांमधील, विशेष करून 1971 च्या युद्धामधील नौदलाच्या हवाई शाखेच्या उल्लेखनीय कामगिरीची सचित्र माहिती करून देणारं मोठं दालन इथं आहे. नौदलाच्या हवाई शाखेत वापरली गेलेली विविध प्रकारची शस्त्रास्त्र आणि वेगवेगळ्या विमानांची इंजिनंही संग्रहालयात जागोजागी मांडलेली आहेत. विमान दालनात नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या आणि सध्या वापरात असलेल्या विमानं-हेलिकॉप्टर्सची तांत्रिक माहिती आणि सोबतच त्यांची छोटी मॉडेल्स ठेवण्यात आलेली आहेत. संग्रहालयाच्या सर्वात मोठ्या कक्षात भारतीय नौदलाच्या हवाई शाखेचा इतिहास सांगणारी आणि गोवा मुक्तिसंग्रामाशी संबंधित अनेक छायाचित्रंही लावलेली आहेत. एका दालनात तर आपल्याला नौदलाच्या हवाई शाखेच्या आजपर्यंतच्या वाटचालीची थोडक्यात माहिती एका ध्वनिचित्रफितीतून करून घेता येते. भारतीय नौदलाच्या आजपर्यंतच्या प्रमुखांची आणि नौदलाच्या वेगवेगळ्या हवाईतळांची ओळख करून देणारी अनुक्रमे यश आणि अद्वितीय ही दोन दालनं इथं आहेत. सशक्त दालनात एरोस्पेस मेडिसीन, लढाऊ विमानामधली वैमानिकाची सीट, वैमानिकांसाठीची आपत्कालीन बचाव साधनं, हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणा यांची माहिती करून घेता येते.
भारतीय नौदलाच्या हवाई शाखेची स्थापना झाल्यापासून मातृभूमीचं रक्षण करताना ज्या वैमानिकांनी असीम त्याग केला आहे, त्या सर्व शहिद वैमानिकांची नावं इमारतीतील व्हरांड्याच्या भिंतीवर सोनेरी अक्षरांमध्ये ग्रॅनाईटवर कोरलेली आहेत. त्यांच्या स्तृतींना वाहिलेल्या पराक्रम या दालनात गेल्यावर तिथल्या वातावरणामधलं गांभीर्य लगेच जाणवायला लागतं.
ग्लास कॉकपीट कॅफे
संग्रहालयात असलेल्या Glass Cockpit Café मध्ये थोडंफार खाऊन मी संग्रहालयातून बाहेर पडण्याआधी, माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणं आठवण म्हणून मी इथून काही भेटवस्तू (souvenirs) खरेदी केल्या. त्यानंतर बाहेर जात असतानाच टीयू-142 एम विमानाचा भलामोठा पंखा नजरेस पडला. भारतीय नौदलात 2017 पर्यंत हे दीर्घपल्ल्याचं विमान सागरी गस्त आणि पाणबुडीविरोधी कारवायांसाठी वापरलं जात होतं. नौदलात अतिशय प्रभावी कामगिरी बजावलेलं हे विमान मात्र या संग्रहालयात पाहायला मिळालं नाही याची रुखरुख होती. भविष्यात हे विमान इथं ठेवलं जाण्याचीही शक्यता वाटत नाही, कारण त्या भल्यामोठ्या विमानाला सामावून घेण्याइतकी जागा इथं आता तरी शिल्लक नाही.
अमर जवान दालन
संग्रहालयाच्या संपूर्ण भेटीत लष्करी टापटिपीची छाप सगळीकडे दिसत होती. नुतनीकरणाच्या कामामुळं बंद असलेली संग्रहालयामधली काही दालनं पाहायची राहून गेली असली तरी बरंचसं संग्रहालय पाहायला मिळाल्यामुळं मला खूप रोमांचित वाटत होतं, आणि आठवणी आल्या की आजही तसंच व्हायला होतं!
समुद्रावरील आकाशातील भारतीय नौदलाच्या शक्तीची ओळख करून घेण्यासाठी गोव्यातील नौवहन संग्रहालय (Naval Aviation Museum) एक महत्वाचे साधन ठरत आहे. म्हणूनच या पूर्ण नुतनीकृत संग्रहालयाला पुन्हा-पुन्हा भेट द्यायची माझी खूप इच्छा आहे.
https://avateebhavatee.blogspot.com/2023/11/blog-post_10.html
प्रतिक्रिया
12 Nov 2023 - 12:02 pm | कर्नलतपस्वी
पुढच्या वेळेस नक्कीच बघेन. धन्यवाद