परदेशस्थ भारतीय

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
6 Jan 2023 - 10:03 pm

लोगो

इंदोरमध्ये 8 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान पार पडत असलेल्या 17व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या #pravasibharatiyadivas संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यंदाच्या प्रवासी भारतीय दिवसाची संकल्पना – समुदाय : अमृतकाळातील भारताच्या विकासासाठीचे विश्वासार्ह भागीदार (Diaspora : Reliable partners for India’s progress in ‘Amrit Kaal’) अशी ठेवण्यात आली आहे. यंदाच्या संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून भारतीय वंशाचे Cooperative Republic of Guyana चे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद इर्फान अली यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.

प्रवासी भारतीय दिवसाची संकल्पना
9 जानेवारी 1915 ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतले होते. त्या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी 9 जानेवारीला भारतात प्रवासी भारतीय दिवस पाळला जातो. त्या दिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या संमेलनाद्वारे प्रवासी भारतीयांचा भारताशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रवासी भारतीयांचं त्यांच्या मातृभूमीशी असलेलं भावनिक नातं अधिकाधिक घट्ट करून त्यांना भारताच्या विकासात भागीदार करून घेण्याचा हेतू त्यामागं असतो.

भारतीय समुदाय आणि भारताचं परराष्ट्र धोरण
भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये भारतीय समुदायाचा सहभाग महत्वाचा ठरत आहे. त्याद्वारे भारताच्या परराष्ट्र धोरणातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यात तसेच संबंधित देशाबरोबरच्या संबंधांना अधिक मजबूत करण्यातही मदत होत आहे. आज जगाच्या विविध भागांमध्ये स्थायिक झालेल्या प्रवासी भारतीयांची संख्या जवळपास 3 कोटी 15 लाख इतकी झाली आहे. त्यात सुमारे 1 कोटी 34 लाख भारतीय वंशाचे लोक, तर 1.80 कोटी अनिवासी भारतीय (Non-Resident Indian) #NRI आहेत. हे सर्व जण जगाच्या विविध भागांमध्ये स्थायिक झालेले आहेत. त्यांच्या हितसंबंधांचं संरक्षण करणं हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक उद्दिष्ट आहे.

19व्या शतकापासून भारतातून विविध देशांमध्ये स्थलांतरित झालेल्यांना तिथं अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं अशा भारतीय लोकांच्या अडचणी दूर करून त्यांना संबंधित देशात सन्माननीय राहणीमान उपलब्ध व्हावं यासाठी भारत सरकार प्रयत्नशील असतं.

भारतीय समुदायाची सुरक्षा
भारताच्या सर्वसमावेशक सुरक्षेत देशाच्या सुरक्षेबरोबरच परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेलाही तितकेच महत्व आहे. जगाच्या कोणत्याही ठिकाणी राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहण्याला भारताच्या परराष्ट्र धोरणात महत्वाचं स्थान आहे. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतीय सैन्यदलांची भूमिका महत्वाची ठरत आहे. अलिकडच्या काळात येमेन, इराक, लिबिया, दक्षिण सुदान, अफगाणिस्तान, युक्रेन यांसारख्या संघर्षग्रस्त प्रदेशांमधून भारतानं आपल्या नागरिकांची सुखरुप सुटका केली आहे. त्याचवेळी भारतानं मानवी दृष्टिकोनातून अन्य देशांच्या नागरिकांचीही सुटका केली आहे.

प्रवासी भारतीय व्यवहार मंत्रालय
प्रवासी भारतीयांनी भारताच्या विकासात सहभागी होण्याचं महत्व लक्षात घेऊन त्यांच्याशी व्यवहार करण्यासाठी 2004 मध्ये स्वतंत्र मंत्रालय Ministry of Overseas Indian Affairs स्थापन करण्यात आलं होतं. या मंत्रालयाच्या माध्यमातून प्रवासी भारतीयांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी, सामान्य जनतेशी संपर्क वाढवण्यासाठी तसेच अन्य बाबींविषयी सहकार्य करण्यात येत होतं. या मंत्रालयांतर्गत गुंतवणूक आणि व्यवसायात सहकार्य करण्यासाठी प्रवासी भारतीय सुविधा केंद्र, स्थलांतरितांना सहकार्य आणि परदेशात रोजगाराच्या संधी इपलब्ध करून देणारे केंद्र, प्रवासी भारतीयांच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी प्रवासी भारतीय केंद्र इत्यादी विभाग कार्यरत होते. मात्र कामकाजाची द्विरुक्ती टाळून त्यात गती यावी या हेतूनं प्रवासी भारतीय मंत्रालयाचे 7 जानेवारी 2016 ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात #MEA विलिनीकरण करण्यात आले.

प्रवासी भारतीयांचे इंडिया डेव्हलपमेंट फाऊंडेशन
- प्रवासी भारतीयांसाठी स्थापन करण्यात आलेला हा लाभेतर ट्रस्ट आहे. भारतातील सामाजिक आणि विकास प्रकल्पांमध्ये प्रवासी भारतीयांना लोककल्याणाच्या हेतूनं निधी देता यावा यासाठी या ट्रस्टची सुरुवात करण्यात आली आहे.
- भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियान #swachhbharat आणि गंगा शुद्धिकरणासाठीचे राष्ट्रीय अभियान तसेच राज्य सरकारांनी निश्चित केलेल्या प्रकल्पांना प्रवासी भारतीयांकडून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ट्रस्टद्वारे केले जात आहेत.
- #स्वच्छता, शिक्षण, पेयजल, महिला सशक्तीकरण इत्यादी क्षेत्रांमध्ये या ट्रस्टच्या माध्यमातून राज्य सरकारांबरोबर सहकार्य केलं जात आहे. या ट्रस्टमध्ये प्रवासी भारतीय वैयक्तिक, सामुहिक किंवा एखाद्या भारतीय असोसिएशनच्या कार्यात निधी देऊ शकतात.
- या ट्रस्टमध्ये जमा झालेल्या निधीतून कोणत्याही प्रकारचा प्रशासकीय खर्च भागवला जात नाही.

युवा प्रवासी भारतीय संमेलन
भारतात युवकांची संख्या जगात सर्वाधिक असल्यामुळं त्याला युवा देश असंही म्हटलं जातं. या युवकांमधील ऊर्जेचा तसेच ज्ञानाचा उपयोग करून घेत देशाचा विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय युवक आणि प्रवासी भारतीय युवक यांच्यातील संपर्क वाढवून त्यांच्यात देवाणघेवाण वाढावी या हेतूनं 2015 मधील प्रवासी भारतीय दिवस संमेलनापासून युवा प्रवासी भारतीय संमेलन आयोजित करण्यास सुरुवात झाली. प्रवासी भारतीय युवकांना भारताविषयी अधिकाधिक माहिती व्हावी यासाठी #knowindia programme राबवला जात आहे. त्याद्वारे अनेक प्रवासी भारतीय युवक भारताच्या विविध भागांना भेटी देऊन येथील समाजजीवन, कला, संस्कृती यांची ओळख करून घेत आहेत.

प्रवासी भारतीय सन्मान
परदेशात राहून सामुदायिक सेवा, समाज सेवा, कला व संस्कृती, व्यवसाय, शिक्षण, सार्वजनिक सेवा, औषधी, लोककल्याण, पर्यावरण इत्यादी विषयांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रवासी भारतीयांना प्रवासी भारतीय दिवस संमेलनात प्रवासी भारतीय सन्मान दिला जातो.

अशा रितीनं विविध देशांमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांचं परस्परांशी तसेच त्यांच्या मूळ भूमीशी नातं निर्माण करून परस्परांमधील आदानप्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रवासी भारतीय दिवस संमेलन महत्वाचं व्यासपीठ ठरत आहे. भारतातील विकास योजनांमध्ये प्रवासी भारतीयांनी गुंतवणूक करून योगदान देण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून केले जात असते. भारतात पर्यटन क्षेत्राच्या विकासाला बराच वाव आहे. अशावेळी प्रवासी भारतीयांनी भारतात पर्यटनासाठी यावं यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. कारण पर्यटन क्षेत्रात देशाला परकीय चलन आणि रोजगार मिळवून देण्याची मोठी क्षमता आहे. त्यात वैद्यकीय पर्यटनाचाही समावेश आहे.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2023/01/23.html

धोरणसंस्कृतीइतिहासमुक्तकसमाजदेशांतरविचारसमीक्षालेखमाहिती