आमार कोलकाता - भाग ९ (अंतिम) - बंगभोज

Primary tabs

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
6 Nov 2019 - 3:55 pm

लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील :
भाग १ - http://www.misalpav.com/node/45320
भाग २ - http://www.misalpav.com/node/45361
भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433
भाग ४ - https://misalpav.com/node/45481
भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533
भाग ६ - http://www.misalpav.com/node/45569
भाग ७ - https://misalpav.com/node/45585

आमार कोलकाता - भाग ९ (अंतिम) - बंगभोज

मनुष्यजीवनात खाण्यापिण्याचा संबंध फक्त पोट भरण्यापुरताच नाही. जाणते-अजाणतेपणी अनेक सूक्ष्म भावभावना अन्नाशी जुळलेल्या असतात. प्रेम, वात्सल्य, अभिमान, स्वच्छता, सुरक्षा, संस्कृती, समाज, धार्मिक समजुती, परंपरा, भूगोल, इतिहास ... सगळ्यांचे प्रतिबिंब त्यात पडलेले असते. प्रत्येक घराच्या, समाजाच्या काही खास खाद्यपरंपरा असतात. ह्या खाद्यपरंपरा म्हणजे आपल्या समाजसंस्कृतीचा आरसा.

आपण ज्या चंगळवादी वातावरणात वावरतो आहोत तेथे खाण्यापिण्याचे भरपूर पर्याय आपल्यासमोर हात जोडून उभे आहेत. नवनवीन चवी चाखणे सोपे होत आहे. उर्वरित भारताप्रमाणेच कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीतही प्रचंड वैविध्य आहे. 'ग्लोबल इज लोकल' ह्या नारा सगळीकडे आहे. याची दुसरी बाजू म्हणून 'लोकल इज ग्लोबल' असेही होत आहे. पिझा-पास्ता शहरात रुळला आहे पण स्थानिक ‘बंगाली फूड’चे चाहते कमी न होता वाढताहेत. कोलकात्याच्या बल्लवाचार्यांनी अ-बंगाली रहिवासीयांना परंपरागत बंगाली भोजनाची चटक लावली आहे, ‘बंगभोज’ आता ग्लोबल झाले आहे.

‘बंगभोज’

मत्स्याहारावर मनापासून प्रेम करणाऱ्या बंगालीजनांसाठी निसर्गानेही मुक्तहस्ते जलचरांची उधळण केली आहे. इतकी की बंगाली भाषेत माश्यांना 'जलपुष्प' म्हटले जाते. कोलकात्याला तर एकाचवेळी समुद्राच्या खाऱ्या पाण्यातले, हुगळीच्या नदीपात्रातले, गंगासागरच्या नदीमुखातले, मुबलक असलेल्या पोखरा-तलाव आणि पाणथळ जागांमुळे गोड्या पाण्याच्या तळ्यातले असे समस्त जलचर ताजे आणि भरपूर मिळण्याचे वरदान मिळालेय. ‘माछेर झोल आणि भात’ हे बंगाली भोजन प्रसिद्धच आहे. मत्स्याहार पसंत नसलेला बंगाली माणूस दुर्मिळ. ज्या दिवशी जेवणात मासे नसतील तो दिवस आयुष्याचा मोजणीत धरू नये अशा अर्थाची मजेशीर म्हण स्थानिकांमध्ये आहे.

‘बांगलार सामिष भोज’

पारंपरिक बंगाली जेवणाला चार उपांगे आहेत - चर्ब्या (संस्कृत-चर्व्य, चावण्यासाठी), चोष्य (चोखुन खाण्यासाठी), लेह्य (चटणीसारखे चाटून खाण्यासाठी) आणि पेय म्हणजे पिण्यासाठी. घरोघरी केल्या जाणाऱ्या रोजच्या स्वयंपाकात ह्या चारही प्रकारच्या पदार्थांचा समावेश असतो. मराठी पाककृतींच्या लेखनात जे स्थान 'रुचिरा'कार कमलाबाई ओगल्यांचे तेच बंगालीत विप्रदास मुखोपाध्याय यांचे. उत्तम बंगाली भोजनाचा मेन्यू काय असावा याबद्दल विप्रदास सुचवतात:- लूची (पुरी), बेगुन भाजा (वांग्याचे तळलेले काप), गुलेल कबाब, प्रॉन कटलेट, तळलेले भेटकी मासे, मत्स्यमंजिरी (अगदी छोटे मासे), मासे टाकून केलेले मुगाचे वरण, चोखा (बटाटा रस्सा भाजी), फुलकोपीर भाजा (फ्लॉवरचे तळलेले तुरे), फिश मलाई करी (पांढरे मासे वापरून), बेदाणे टाकून केलेला जाफरानी पुलाव, फिश पुलाव, साखरपाकातले कैरीचे लोणचे, पपईची चटणी, मिष्टी दोई, पायेश, कलाकंद, पोस्तो (खसखस) बर्फी, साधा भात, तळलेले बटाटा काप, पापड आणि मोरांबा.

इतके सगळे प्रकार रोजच्या जेवणात अर्थातच कुणी करत नाही, पण विविध प्रकारचे मासे, बटाटे, मोहरी आणि खसखस बंगाली स्वयंपाकघरात प्रचंड प्रमाणात वापरल्या जातात. आलूर चॉप, आलूर दम, पोस्तो दियेर आलू, आलू पुरी, आलूर तोरकारी, आलू दियेर खिचुरी, मांगशोर आलू, झुरी आलू भाजा, आलू परोठा, आलू दियेर बिर्यानी...... कोलकात्याच्या बंगाली भोजनात बटाटा प्रेम डोकावते. वैष्णवपंथाच्या प्रभावामुळे काहींनी शुद्ध शाकाहार अंगिकारला तेव्हापासून 'खिचुरी' उर्फ खिचडीला बंगाली जेवणात ध्रुवपद मिळालेय. शहरवासीयांचे 'कम्फर्ट फूड' असलेल्या खिचुरीचे भरपूर प्रकार घरोघरी रांधले जातात.

विशिष्ट प्रसंगांच्या सामिष बंगाली मेजवानीत कोळंबी अनिवार्य! मलाई चिंगरी, डाभ चिंगरी (नारळपाणी पिण्यासाठी वापरतो तसल्या कोवळ्या ओल्या नारळात शिजवलेली कोळंबी) आणि चिंगरी दिये मोचार घोंटो (केळीची फुले वापरून) सारख्या पाककृती बंगाली खाद्यजीवनातले सुखनिधान आहे.

‘चिंगरी दिये मोचार घोंटो’

मूळचे पश्चिम बंगालमधील आणि ढाका-खुलना-जसोर-सिल्हेट म्हणजे आताच्या बांग्लादेशात मूळ असलेल्या लोकांच्या (घोटी आणि बांगला) पारंपारिक खानपानात आणि एकच पदार्थ रांधण्याच्या पद्धतीत सूक्ष्म फरक असल्याचा दावा खवैये करतात. इलीश (हिल्सा) मासे खावे तर ‘बांगला’ घरात आणि ‘चिंगरी’ (कोळंबी) खावी ती घोटी गृहिणीच्या हातची असे तत्व अनेक बंगालीजन पाळतात. आज्या-पणज्यांच्यावेळी हा मुद्दा बरोबर असला तरी आता सगळेच पश्चिम बंगालमध्ये राहत असल्याने ह्या मुद्द्याला फारसा अर्थ राहिला नसल्याचे अनेकांचे मत आहे. असे असले तरी खास बांगलादेशी पद्धतीचे 'शुक्तिमाश' (सुकट) आणि रोहू-इलीश माछेर झोल खाण्यासाठी शहरातल्या 'पद्मापारेर रोंगघर' सारख्या 'बांग्लादेशी' रेस्तराँत कोलकातावासी गर्दी करतात.

* * *

कोलकात्यातील सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव म्हणजे दुर्गापूजा आणि पोटपूजा हा उत्सवातला महत्वाचा भाग. सार्वजनिक दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये खाण्यापिण्यासाठी जंगी व्यवस्था असते. खिचुरी, पुरी, बेगुन भाजा, छेनार पायेश असा 'भोग' (प्रसाद) बहुतेक ठिकाणी असतो. जुन्या श्रीमंत जमीनदार कुटुंबांच्या दुर्गापूजेत हाच 'भोग' अनेकदा ६० पेक्षा जास्त पदार्थांचा असतो! घी भात, वासंती भात, राधावल्लभी (सारणयुक्त पुऱ्या), गोडाच्या पुऱ्या, कोचू साग, खिचुरी, अनेक प्रकारचे वडे, शोर भाजा, निमकी असे 'हटके' पदार्थ आणि सीताभोग, जोयनगरेर मोआ, पंतुआ, लवंग लतिका, जिलबी, छेनार जिलपी, खीर कदम, मालपुवा, केशर पायेश, संदेश, इंद्राणी, हिरामणी, रसमणी, दुर्गाभोग, रसमोहन, खीरकदम, चमचम, लांगचा, खीरमोहन, कांचागोला, चंदन खीर, तालशांश, चंद्रपुली, पंतुआ, पान गाजा, जोलभरा संदेश, लेडी किनी, मिहीदाना अश्या मनोरम नावांच्या डझनावारी प्रकारच्या बंगाली मिठायांचा भरगच्च मेन्यू दुर्गाभक्तांच्या दिमतीला असतो.

नोलेन गुरेर संदेश

मांसाहाराचा नैवद्य ही देशात सगळीकडेच प्रचलित असलेली परंपरा. अनेक बंगाली कुटुंबात 'ब्रिथा' म्हणजे 'नैवैद्याचे नसलेले' मांस खाणे निषिद्ध मानले जाते. ह्याचे निवारण करण्यासाठी कोलकात्यातल्या मांसविक्रेत्यांनी एक नामी शक्कल लढवली आहे - प्रत्येक प्राणी कापण्याआधी दुकानातच ठेवलेल्या काली प्रतिमेला त्याचा नैवेद्य दाखवण्याची! म्हणून आता कोलकात्यात कोठेच ‘ब्रिथा’ मांस मिळत नाही, अगदी दुकानमालक हिंदू नसला तरीही.

* * *

काही अपवाद वगळता कोलकाता शहरात सर्वभक्षी लोक बहुसंख्य असल्यामुळे खाण्यापिण्याच्या प्रांतात परकीय-परप्रांतीय-परधर्मीय लोकांशी संघर्ष न होता उलट देवाण-घेवाणच जास्त घडली आहे. कोलकात्यात अरबांनी नान आणि मोगलांनी बिर्यानी आणली तर पोर्तुगीझांनी दुधापासून पनीर आणि चीझ बनवण्याची कला. ब्रिटिशांनी ब्लॅक टी उर्फ बिनदुधाचा चहा पिण्याची सवय स्थानिकांना लावली. चिनी-नेपाळी-तिबेटी बांधवांनी स्थानिकांना मोमो, नूडल्स, थुकपा, शेजवान राईस, पोर्क सूप अशा पदार्थांची चटक लावली तर मारवाड आणि वाराणसीच्या हलवायांनी इथे उत्तर भारतीय मिठाया, समोसे आणि चाट सारखे पदार्थ रुजवले. स्थानिकांचे 'छेना'वंशीय मिठायांवरचे प्रेम, जलचरांची प्रचंड विविधता आणि नवनवीन पदार्थ चाखून बघण्याची हौस ह्यामुळे कोलकात्याचे खाद्यजीवन समृद्ध आहे. खाण्यापिण्यातला चोखंदळपणा कोलकातावासीयांचा खास गुण.

दुपारच्या जेवणात फक्त 'कॉंटिनेंटल' पद्धतीचे खाणाऱ्यांची सुदीर्घ परंपरा शहरातल्या भद्रलोकात आहे. ग्रेट ईस्टर्न, पॉलिनेशिया, फ्रिपोज अशी खास 'कॉंटिनेंटल ओन्ली' रेस्तराँ आता बंद पडली असली तरी त्यांच्यासारखी अनेक नवीन रेस्तराँ शहरात आकाराला आली आहेत. अनेक पक्क्या यूरोपीय पदार्थांचं कोलकात्यानं संपूर्ण बंगालीकरण करून टाकलं आहे. याचवर्षी शंभरी पूर्ण केलेल्या प्रसिद्ध 'ब्रिटानिया' बिस्कीट ब्रँडचा जन्म कोलकात्याचा. ब्रिटानियाने कोलकात्याला बिस्कीट आणि बेकरी पदार्थाची गोडी लावली असली तरी त्याहीआधी ब्राम्होसमाजी सुधारकांनी बिस्किटे आणि शेरीचे सेवन इथे रुजवले. त्याकाळी शहरात हे पदार्थ बनवणारे लोक हमखास मुस्लिम किंवा तथाकथित शूद्र समाजातले असल्यामुळे भद्राजनांनी हे पदार्थ खाण्यामागे एक प्रकारे सामाजिक बंधने तोडण्याचा अविर्भाव असे. खाण्यातून समाज बदलतो तो असा!

बीफचा खप शहरात प्रचंड आहे, बहुधा भारतातल्या कोणत्याही शहरापेक्षा अधिकच. सध्या या विषयावरून वातावरण गढूळ झाले असले तरी अनेक शहरवासी फार आधीपासून बीफ आवडीने खातात. पार्क सर्कस भागातल्या 'हॉटेल जमजम'ची बीफ बिर्यानी स्थानिकांमध्ये लोकप्रिय आहे. तुलनेनी स्वस्त असल्यामुळे बीफला शहरातल्या कष्टकरी जनतेची विशेष पसंती आहे. दररोज संध्याकाळी फ्री स्कूल स्ट्रीटचे 'मोकाम्बो' आणि पार्क स्ट्रीटवरचे 'ऑलीपब' सारखी रेस्तराँ बीफप्रेमी खवैयांनी खच्चून भरलेली असतात. तिबेटी-नेपाळी प्रकारच्या चिली बीफ, फाले, बीफ मोमो इत्यादींचे चाहते सौ. डोमा वांग यांचे 'शिम-शिम' रेस्तराँ गाठतात. आयरिश स्टीक, बीफ स्टीक सिझलर, बीफ सॉसेज, ऑक्स टंग सूप, स्मोकड हंगेरियन सॉसेज अशा पदार्थांवर ताव मारणाऱ्या लोकांमध्ये अँग्लो इंडियन आणि मुस्लिम तरुणांसोबत चॅटर्जी-बॅनर्जी मंडळीही भरपूर असतात. ह्याबाबतीत कोलकाता शहर जातीधर्मावरून भेदभाव करत नाही.

* * *

शहरातला मारवाडी समाज शाकाहाराचा आग्रह धरणारा असल्यामुळे पार्क स्ट्रीट सारख्या उच्चभ्रू भागात 'शुद्ध शाकाहारी' रेस्तराँची रेलचेल आहे. इतकेच काय भारतातल्या मोजक्याच 'मिशिगन स्टार' दर्जा असलेल्या दुर्मिळ आणि अति-महागड्या रेस्तराँपैकी कोलकात्याच्या 'Yauatcha' मध्ये शाकाहारी ग्राहकांच्या मागणीनुसार वेगळा शुद्ध शाकाहारी विभाग आहे !

'ग्लोबल फूड' शहराला नवे नाही, त्यामुळे त्याचे फार कौतुकही नाही. पिझा-पास्ता-सँडविचपेक्षा चायनीज नूडल्स-सूप-मोमो-थुकपा स्थानिकांना जवळचे वाटतात, अपवाद शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा. सिंघाडा (छोटे समोसे) आणि चीज कटलेट, एग रोल यांना भरपूर मागणी आहे. रस्तोरस्ती हातगाड्यांवर मिळणारे काठी रोल, फिश/पनीर चॉप आणि फुचका (पाणीपुरी), झालमुरी (भेळ) खाल्ल्याशिवाय कोलकात्याच्या खाद्ययात्रा अपूर्णच.

झालमुरी आणि फुचका 1

झालमुरी आणि फुचका 2

* * *

'बडा साहिब' लोकांसाठी असलेले कोलकात्यातले उच्चभ्रू 'क्लब्स' एका वेगळ्या खाद्यपरंपरेचे पाईक आहेत. विदेशी उंची मद्यात सोडा मिसळून पिण्याची परंपरा कोलकात्याच्या क्लब्समध्येच सुरु झाली असे एक मत आहे. पाणी आणि बर्फाच्या शुद्धतेविषयी खात्री नसलेल्या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांकडे तिचे जनकत्व असावे. आजही क्लबच्या सदस्यांना आणि त्यांच्या पाहुण्यांना 'भेटकी सिसिले', 'डाकबंगलो मटन रोस्ट' आणि 'बॅनबेरी अँपल पाय' सारख्या पदार्थांचा अनोखा अँग्लो-इंडियन 'खाना' पेश करणाऱ्या ह्या राजेशाही क्लब्सची समृद्ध खाद्यपरंपरा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

* * *

साखरेचे खाणार त्याला कोलकाता देणार.

'मिष्टी' उर्फ बंगाली मिठाया हा कोलकात्याचा 'वीक पॉईंट'! रसगुल्ला -रोशोगुलाचे जन्मगाव बंगालचे कोलकाता की ओडिशाचे जगन्नाथपुरी ह्याबद्दल भरपूर वाद असले तरी रसगुल्ल्याचे जनक कोलकात्याचे 'नबीन चंद्र दास' हेच असल्याबद्दल स्थानिक मंडळी ठाम आहेत. दासबाबूंचे 'के सी दास अँड कंपनी' हे बागबझार भागातले प्रख्यात दुकान गेली १५१ वर्षे रसगुल्ले आणि उत्तमोत्तम बंगाली मिठाया विकत आहे. आता त्यांच्या अनेक शाखा शहरभर आहेत, सगळीकडे भरपूर गर्दी असते. पण दास एकटेच नाहीत, कोलकात्याच्या मिठाईप्रेमाला दाद देण्यासाठी आणि जगावेगळ्या मिठायांचा भरपूर पुरवठा सतत करण्यासाठी इथे शेकडो दुकाने सज्ज आहेत. ४८ प्रकारचे रसगुल्ले आणि ६४ प्रकारचे ‘संदेश’ विकणारी दुकाने ग्राहकांनी खच्चून भरली असली तरी खरे दर्दी असल्या प्रकारांना ‘प्रयोगशील मिठाईविक्रेत्यांनी प्रसिद्धीसाठी केलेला आचरटपणा’ म्हणून नाक मुरडतात.

‘राजकीय ‘संदेश’ देणारे 'संदेश'

कोपऱ्यावरच्या दुकानातून मिठाया विकत घेणे अनेकांना आवडत नाही. बंगाली मिठायांचे खरे दर्दी चित्तरंजनच्या ताज्या गरम रसगुल्ल्यांसाठी, भीम नागच्या 'लेडीकिनी' मिठाईसाठी, गंगुराम हलवाईंच्या 'जोलभरा संदेश'साठी, बलराम मलिक-राधारमण मलिकच्या 'छेनार जिलपी'साठी, बांछारामच्या 'गोविंदभोग'साठी कोलकात्याच्या भयंकर गर्दीतून २०-२० किमी प्रवास करायलाही एका पायावर तयार असतात असा त्यांचा लौकिक आणि असा त्यांचा महिमा.

‘कोलकात्याची प्रसिद्ध 'मिष्टी’

पहाटे पाचला सुरु होणाऱ्या आणि रात्री उशिरापर्यंतही न संपणाऱ्या शहराच्या खाद्ययात्रेत 'काउन्ट द मेमोरीज, नॉट द कॅलरीज' हे खवैयांचे ब्रीदवाक्य शब्दशः जगणाऱ्या कोलकातावासीयांचे प्रतिबिंब पडलेले दिसते.

समाप्त.

(अन्यत्र पूर्वप्रकाशित. लेखातील कोणताही भाग लेखकाच्या परवानगीशिवाय अन्यत्र वापरू नये. काही चित्रे जालावरून साभार.)

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयलेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

6 Nov 2019 - 6:00 pm | कुमार१

अहो, त्या पदार्थांनी तोंडाला पाणी सुटले हो !
मस्तच.
पु लेखमालेस शु !

यशोधरा's picture

6 Nov 2019 - 6:22 pm | यशोधरा

बेष्ट समारोप. सुरेख झाली मालिका.

तेजस आठवले's picture

6 Nov 2019 - 6:57 pm | तेजस आठवले

झक्कास की हो! आवडले.

जेम्स वांड's picture

6 Nov 2019 - 7:12 pm | जेम्स वांड

परत एकदा रसना खवळून उठली! खल्लास फोटो अन खाद्ययात्रा.

एक हलकीफुलकी दुरुस्ती सुचवतो, गोड मानून घेणे

इतकेच काय भारतातल्या मोजक्याच 'मिशिगन स्टार' दर्जा असलेल्या

हा मिशिगन स्टार नसून मिशलीन स्टार होय असे वाटते, १९व्या शतकात स्वयंचलित चारचाकी गाड्या प्रसिद्धी पावल्या तसे त्यांना पूरक-एकमेकांस पूरक उद्योग पक्षी पोलाद, रबर टायर वगैरे उभे राहिले, अशीच एक टायर कंपनी होती मिशलीन (michelin) त्यांना टायर्सचा खप वाढवायचा होता पण लोकांनी गाड्या फिरवल्याच नाहीत तर टायर्स झिजून जुनी होणार कशी?? अन नव्या टायर्सचा खप वाढणार कसा?? त्यातून मिशलीन पडली अस्सल फ्रेंच कंपनी, फ्रेंच लोक खवय्येगिरीत वंगबंधूंचे कार्बन कॉपी किंवा एकाला झाकावे दुसऱ्याला काढावे इतकेच दर्दी, कुठं सोव्हिग्नोन कॅबरीनेट रेड वाईन उत्तम मिळते, कुठले मिमोलेत चीज सर्वोत्तम, बॅगवेत ब्रेड ताजी कुठे मिळते वगैरे सतत हुडकणारे म्हणजे फ्रेंच.

झालं, मिशलीन मधल्या एका हुशार पात्राने शक्कल लढवली आणि दरवर्षी ते लोक एक मिशलीन गाईड काढू लागले सुरुवातीला (१९००-१९२२) गाईडमध्ये फक्त गाडीचे तेलपाणी वंगण वगैरे माहिती असे १९२२ पासून मिशलीननं फ्रेंच लोकांचे खाद्यप्रेम ओळखून गाईडमध्ये उत्तमोत्तम जिन्नसा मिळणारी हॉटेल्स अंतर्भूत करायला सुरुवात केली अन गम्मत म्हणजे त्यानंतर लोक गाड्या जास्त फिरवू लागले, टायर्सचा खप वाढला!! त्यानंतर मिशलीननं गाईड जरी प्रकाशित केली न केली तरी कंपनी दरवर्षी जगातील सर्वोत्तम उपहारगृह/भोजनालयांचे रेटिंग नक्कीच करते, ही प्रोसेस भयानक खडतर असते अन नावाजलेला ब्रिटिश शेफ गॉर्डन रामसे चक्क एकदा मिशलीन परिमणांवर नापास सुद्धा झालाय, त्या कडक चाचणीतून पार होणाऱ्या हॉटेल्सला वर्षभरासाठी मिशलीनकडून १,२ किंवा ३ स्टार दिले जातात ही रेटिंग बदलत असतात, म्हणून कायम मिशलीन रेटिंग मध्ये राहणे म्हणजे अशक्यप्राय असते, जे हॉटेल सतत दोन वर्षे राहिले ते तर म्हणजे सर्वोत्तम हॉटेल गणले जाते.

अशी ही कथा "मिशलीन स्टार्सची"

अनिंद्य's picture

6 Nov 2019 - 8:45 pm | अनिंद्य

@ जेम्स,

बरोबर आहे तुमचे 'मिशलीन' स्टारच पाहिजे होते. आता संपादकांनी केली तरच दुरुस्ती होईल.

मिशलीनच्या जन्मकथेबद्दल खूप आभार. आता हा 'ऑल हायप लिटिल सबस्टन्स' प्रकार झालाय असे वाटते. फार माहिती नाही.

ह्या लेखमालेत तुमचे अभ्यासपूर्ण पण मिश्किल प्रतिसाद वेळोवेळी आले, त्यामुळे न कंटाळता पुढील भाग लिहीत राहिलो.

असाच लोभ ठेवा _/\_

अनिंद्य

कंजूस's picture

6 Nov 2019 - 7:37 pm | कंजूस

लेख मिशलीन स्टार आहे.

अनिंद्य's picture

6 Nov 2019 - 8:52 pm | अनिंद्य

:-)

अप्रतिम लेखमालेचा सुरस शेवट फार आवडला. माशांना "जलपुष्प" म्हणतात हे वाचल्यावर ज्या कोणी हा शब्द पहिल्यांदा वापरला असेल त्याचं कौतुक वाटलं. छानच शब्द आहे.
बंगाली मिठाईंची नावंसुद्धा खूप गोड आहेत. वाचायलाही आवडली. खायला त्या ठिकाणी जायलाच हवं.
पुढील लेखनाची प्रतिक्षा आहे.

अनिंद्य's picture

11 Nov 2019 - 12:20 pm | अनिंद्य

@ पलाश

"जलपुष्प" ..... मासे खात नसलो तरी मलाही शब्द मजेदार वाटतो :-)
तुम्ही वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

वाह वाह वाह !!! ती थाळी आत्ता बसून खावीशी वाटत्ये !!!अप्रतिम माहिती, आणि मस्त लेखमाला :)

बबन ताम्बे's picture

6 Nov 2019 - 10:13 pm | बबन ताम्बे

काही भागांवर मी प्रतिसाद लिहायचा कंटाळा केला,पण सर्व भाग आवर्जून वाचले. अप्रतिम लेखमाला. बंग (की वंग ?) संस्कृतीची विस्तृत ओळख झाली. पुढील लेखमालेस मनपूर्वक शुभेच्छा.

अनिंद्य's picture

7 Nov 2019 - 10:49 am | अनिंद्य

@ बबन ताम्बे,

कंटाळा करू नका हो, बरे-वाईट जसे वाटले ते सांगत चला :-)
इथे मिळणारे अभिप्राय / सूचना / सल्ले / प्रतिसाद यामुळे चुका समजतात, हुरूप येतो.

जॉनविक्क's picture

6 Nov 2019 - 11:14 pm | जॉनविक्क

समारोप _/\_

सुमो's picture

7 Nov 2019 - 11:00 am | सुमो

लेखमाला. आणि आणि त्यावर कळस म्हणजे हा समारोपाचा बंगभोज !!!

मत्स्यमंजिरी काय, शहाळ्यातल्या मलईत शिजवलेले प्रॉन्स काय, माछेर झोल काय....!!

छ्या....
जायला लागतंय कोलकात्याला.

श्वेता२४'s picture

7 Nov 2019 - 11:04 am | श्वेता२४

मिपावरील माझ्या आवडीच्या लेखमालांपैकी ही एक लेखमाला.बंगालचा ऐतिहासिक,सामाजिक, सांस्कृतिक व चालिरीतींचा विस्तारपूर्वक सचित्र धांडोळा आपण सर्वांसाठी खुला केलात. त्याबद्दल अनेक आभार.

अनिंद्य's picture

11 Nov 2019 - 12:16 pm | अनिंद्य

@ श्वेता२४

मालिकेवर पहिलावहिला प्रतिसाद तुमचाच होता.

पूर्ण बंगाल नाही तरी कोलकाता शहराबद्दल विस्तृत सांगण्याचा प्रयत्न होता, तुम्हाला लिखाण आवडले याचा आनंद आहे.

_/\_

बंगाली शाकाहारी जेवण म्हणजे मोठे तुकडे असलेली वांग्याची आणि बटाट्याची भाजी आणि भात इतकीच धारणा होती (पुण्यातली काही बंगाली जेवण मिळणारी हाटेलं). तुमच्या लेखाद्वारे त्यातील वैविध्याचाही प्रत्यय आला. बाकी बंगाली मिठायांबाबत काही प्रश्नच नाही. आहाहाहा.

ही लेखमाला खूपच छान झाली, ओघवते लेखन, विपुल माहितेने लेखात आलेली समृद्धता.

तुमच्या पुढील अशाच एखाद्या रोचक माहितीच्या प्रतिक्षेत.
-प्रचेतस

अनिंद्य's picture

11 Nov 2019 - 12:11 pm | अनिंद्य

बंगाली जेवणात शाकाहार थोडा डावा पडतो, खरे आहे.
पण बंगाली मिठाया लाजवाब :-)
अभिप्रायाबद्दल आभार !

नरेश माने's picture

7 Nov 2019 - 11:29 am | नरेश माने

सुंदर लेखमालेचा तेव्हढाच सुंदर समारोप. बाकी बंगाली खाद्यपदार्थांची नावे खुपच गमतीदार आहेत.

कोलकाता शहराच्या जडणघडणीची एव्हढी सुंदर माहिती तुमच्या लेखमालेमुळेच मला मिळाली. त्याबद्दल तुमचे खुप आभार!

मालिकेचा पहिला आणि हा शेवटचा भागच वाचला आहे. गलेमा आणि दिवाळी अंक वाचत असताना ह्या रसरशीत लेख मालिकेतले मधले भाग वाचायचे राहून गेले त्याची चुटपूट लागून राहिली आहे!

ह्या भागातील 'जोलभरा संदेश' आणि 'रसगुल्ला' हे शब्द वाचून खूप साऱ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. वडील मध्य रेल्वेमध्ये अधिकारी होते, महिन्या दोन महिन्याआड त्यांची कामानिमित्त एकतरी कलकत्ता (तेव्हा ह्या शहराला कोलकाता म्हणत नव्हते. त्यामुळे कलकत्ताच 😀 ) वारी होत असे. ते कलकत्याला गेले कि मी आणि माझी मोठी बहिण खूप खूष व्हायचो, कारण ते येताना आम्हा दोघांच्या आवडीचे 'जोलभरा संदेश' आणि 'रसगुल्ला' व आणखीन काही दर्जेदार मिठाया तर आणायचेच, वर मला जास्ती आनंद व्हायचा तो प्रत्येक वेळी त्यांनी माझ्यासाठी आणलेल्या 'स्पोर्ट्स शूज' साठी!
कलकत्तावासीयांच्या फुटबॉल प्रेमामुळे कि अन्य काही कारणाने ते माहित नाही, पण तेव्हा मुंबईतही उपलब्ध नसलेल्या इतक्या वेगवेगळ्या रंगाचे आणि डिझाईनचे स्पोर्ट्स शूज कलकत्याला मिळायचे. तेव्हा मला अक्कल आणि जतन करून ठेवण्या एवढी जागा असती तर त्या मिठायांचे खोके, पत्र्याचे डबे आणि माझ्या बालपणापासून ते त्यांच्या रीटायरमेंट पर्यंत सुरु राहिलेल्या ह्या परंपरेत त्यांनी आणलेल्या शूज चे एक मस्त म्युझियम बनवता आले असते 😀

असो, लेख खूप आवडला, आता मधले वाचायचे राहिलेले भाग सलग वाचून काढतो...
धन्यवाद.

अनिंद्य's picture

7 Nov 2019 - 6:25 pm | अनिंद्य

@ टर्मीनेटर,

तुमच्या लहानपणीच्या / वडिलांच्या कलकत्ता भेटीच्या आठवणी बंगाली मिष्टीसारख्याच गोड आहेत :-) वस्तूंचे नसले तरी या आठवणींचे म्युझिअम तुमच्या मनात कायम राहीलच.

कोलकात्यातून निघतांना विमानात बसण्यापूर्वी घरातील सर्वांच्या आवडीच्या मिठाया योग्य त्या प्रमाणात घेतल्याची खात्री करावी लागते मलाही. तो टोल दिल्याशिवाय दार उघडले जात नाही :-)

मधले भागही अवश्य वाचा. प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.

अनिंद्य

आंबट गोड's picture

7 Nov 2019 - 12:34 pm | आंबट गोड

लेखमाला. थोडी त्रोटक वाटली...अजून खूप काही लिहीता आले असते.
खरे म्हणजे हे फक्त कोलकत्याचं वर्णन होतं..पूर्ण बंगाल नव्हे.
बंगाल मधे टागोर आणि शांतिनिकेतन, चैतन्य महाप्रभू, स्वामी विवेकानंद व प्रभु रामक्रिष्ण, शरद्चंद्र, सुभाषबाबू ......इ इ खूपच गोष्टी येतील........
आता पुढची लेखमाला कशावर?

भूतान वर लिहा. :-)

अनिंद्य's picture

7 Nov 2019 - 2:40 pm | अनिंद्य

@ आंबट गोड,

..... फक्त कोलकत्याचं वर्णन होतं..पूर्ण बंगाल नव्हे.....

अगदी बरोबर. मालिकेचे शीर्षक आणि प्रस्तावना दोन्हीकडे स्वतःसाठी 'आमार कोलकाता' असे कुंपण घातले होते, नाहीतर विषयाचा आवाका फार मोठा होतो, त्यावर पुस्तकच लिहावे लागेल. कुणी सांगावे, लिहीनही. :-)

..... लेखमाला थोडी त्रोटक वाटली....

शहराची तोंडओळख होईल इतपत लिहायचे होते, तरीही नऊ भाग झाले.

अभिप्रायाबद्दल आभारी आहे.

संजय पाटिल's picture

8 Nov 2019 - 11:35 am | संजय पाटिल

सर्व भाग वचले, अप्रतिम वर्णन....
पुढील लेखमलेच्या प्रतिक्षेत....

नि३सोलपुरकर's picture

8 Nov 2019 - 1:11 pm | नि३सोलपुरकर

धन्यवाद अनिंद्य सर ,
लेख खूप आवडला .

आणी स्टार द्यायचे झाल्यास माझ्याकडुन मिशलीन ३ स्टार

नि३

अनिंद्य's picture

11 Nov 2019 - 12:03 pm | अनिंद्य

@ कुमार१
@ यशोधरा
@ तेजस आठवले
@ वीणा३
@ जॉनविक्क
@ सुमो
@ नरेश माने
@ संजय पाटिल
@ नि३सोलपुरकर,

उत्साह वाढवणाऱ्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार _/\_

अप्रतिम भाग आणि मालिकाही.
फार छान गोड शेवट केला आहे.
सगळे प्रचि तोंपासु.

फार खुणावत असलेले हे शहर, हा भाग वाचल्यानंतर हात पसरून आलिंगन द्यायलाच तयार आहे असे वाटले.

पुलेशु

अनिंद्य's picture

18 Nov 2019 - 11:07 am | अनिंद्य

@ कोमल,

सगळे भाग वाचून अभिप्राय दिलात, अनेक आभार.

सुधीर कांदळकर's picture

12 Nov 2019 - 7:11 pm | सुधीर कांदळकर

लागलीच.

जलपुष्प शब्द आवडला. जालमुरी, फुचका, संदेश आणि मिश्टी वा! सांगता करायला स्वीट डिश हवीच. मजा आली. एका अपूर्व लेखमालेबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

अनिंद्य's picture

18 Nov 2019 - 11:14 am | अनिंद्य

@ सुधीर कांदळकर,

मालिकेच्या प्रत्येक भागावर विस्तृत आणि नेमके प्रतिसाद आहेत तुमचे, त्यामुळे पुढे लिहिण्याचा उत्साह कायम राहिला.

अनेक आभार.

रातराणी's picture

29 May 2020 - 12:20 pm | रातराणी

भीषण सुंदर! काही भाग वाचून, सगळे भाग प्रकाशित झाल्यावर वाचायचे म्हणून अर्धवट सोडलेली ही मालिका पुन्हा पहिल्यापासून वाचली. तुमचा अभ्यास, त्याची मुद्देसूद मांडणी आणि सोबत सुरेख प्रकाशचित्रांची जोड ही त्रिवेणी सुरेख जमलीये. मनाने त्या त्या ठिकाणी जाऊन आले मी. _/\_

अनिंद्य's picture

6 Jun 2020 - 11:24 am | अनिंद्य

@ रातराणी,

Thank you !

मालिका तुम्हाला आवडली हे वाचून आनंद वाटला.

अनिंद्य's picture

24 Aug 2020 - 7:52 pm | अनिंद्य

याबद्दल थोडाफार वाद असला तरी विंग्रजी तारखेप्रमाणे आज २४ ऑगस्ट कोलकात्याचा बड्डे आहे.

त्यानिमित्ताने रसगुल्ला खाऊन गोडतोंडी शुभेच्छा !