एक वादळी जीवन: ओशो!
सर्व मान्यवरांना नमस्कार! हा लेख उघडल्याबद्दल धन्यवाद. नुकतीच ओशोंची पुण्यतिथी झाली, त्या निमित्ताने लिहिलेला लेख आपल्यासोबत शेअर करत आहे. मी ओशोंवर पूर्वी लिहिलेला लेख इथे वाचता येईल.
विसाव्या शतकात भारतामध्येच नाही तर जागतिक पातळीवरील क्रांतीकारी व्यक्तींमध्ये ओशोंचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. १९३१ ते १९९० ह्या ५९ वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे वादळ निर्माण केलं ते अजूनही सुरू आहे. १९ जानेवारी १९९० रोजी त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. आज त्याला सत्तावीस वर्षं झाली, पण अजूनही त्या वादळातील नाट्य अजिबातही कमी झालेलं नाहीय. ओशो आणि कॉन्ट्रावर्सीज ह्यांचा अतूट संबंध. ओशोंसारख्या व्यक्तिमत्वांच्या बाबत एक गोष्ट नेहमी आढळते. त्यांच्यासंदर्भात दोनच प्रकारचे संबंध असू शकतात- एक तर त्यांना मानणारे; त्यांचे भक्त किंवा शिष्य आणि दुसरे ते खोटे आहेत; ते कसे चुकीचे होते हे सांगणारे त्यांचे विरोधक! तिसरा मार्गच अशा रॅडिकल व्यक्तिमत्वाच्या संदर्भात उरत नाही. नुकत्याच झालेल्या नोटाबंदीसंदर्भात त्यांचा एक विचार व्हॉटसअपवर फिरत होता. त्यांनी एका ठिकाणी म्हंटलं होतं की, चलन ह्या शब्दाचा अर्थच मुळी प्रवाह आहे (करंसी- करंट). चलन ही शाश्वत वस्तू नसून केवळ एक मान्यता आहे, एका रात्रीत सरकारने त्या कागदाला दिलेली मान्यता काढून घेतली तर चलन कवडीमोल होतं! आणि तसंच झालेलं आपण बघितलं. असे अतिशय स्पष्ट व जगावेगळ्या विचारांच्या ओशोंविषयी थोडक्यात बोलायचा प्रयत्न करतो.
जैन धर्मीय कुटुंबातून आलेल्या ओशोंनी- अर्थात् आचार्य रजनीशांनी १९६८ मध्ये 'संभोग से समाधी की ओर' ह्या प्रवचन मालेद्वारे पूर्ण देशामध्ये एकच खळबळ उडवून दिली! ज्या काळी चित्रपट सृष्टीमध्ये चुंबनाचं दृश्य जवळजवळ नसायचं, त्या काळात ह्या अवलियाने लैंगिकतेवर अतिशय रॅडिकल आणि मौलिक मांडणी केली. एकाच वेळेस अध्यात्म- परमार्थ- साक्षात्कार ह्यावर ते बोलायचे आणि त्याच वेळेस माणूस आत्ता ज्या गर्तेमध्ये व अंध:कारामध्ये आहे, त्याविषयीही बोलायचे. ईश्वराचं महात्म्य, परम ज्ञान ह्यांचं विवरण करणा-या गुरू व संतांपेक्षा वेगळं- आज माणूस जिथे आहे; तिथून त्याला इश्वराभिमुख करण्याचं अतिशय वेगळं व दुर्मिळ कार्य त्यांनी केलं. आणि त्यामुळे पारंपारिक धर्म, पुजारी व सत्ता नेहमी त्यांची विरोधक राहिली.
ओशोंचे विचार सांगणं अतिशय अवघड आहे. कारण ते फक्त विचार नाहीत; त्यामध्ये 'निर्विचारता' सुद्धा आहे. ते सुरुवातीच्या काळात त्यांच्या प्रवचनाची सुरुवात "मेरे प्रिय आत्मन्" ने करत आणि प्रवचन संपताना म्हणत "आपके भीतर बैठे परमात्मा को प्रणाम करता हूँ, मेरा प्रणाम स्वीकार करें.” लोकांनी स्वत:मधली भगवत्ता ओळखावी असं त्यांना अपेक्षित होतं. आणि १९७३ नंतर त्यांनी स्वत:ला भगवान असं म्हणण्यास सुरुवात केली होती. त्याचाही हेतु हाच होता की, सगळे जणच भगवानस्वरूप आहेत, फक्त ते मान्य करण्यासाठी हिंमत हवी. मी स्वत:ला भगवान म्हणतो आणि तुम्हांलाही स्वत:मधला ईश्वर बघण्यासाठी प्रेरित करतो, असं ते म्हणतात. त्यावेळी त्यांना शेकडो पत्र आली की तुम्ही कसले स्वयंघोषित भगवान, स्वत:ला भगवान कसे काय म्हणता इ. इ. त्यावर ओशोंनी म्हंटलं, 'जेव्हा मी तुम्हांला प्रणाम करायचो, तुमच्यातल्या ईश्वराचा उल्लेख करायचो, तेव्हा मला एकानेही 'का' असं विचारलं नाही. कारण ते तुमच्या अहंकाराला अनुकूल होतं. पण जेव्हा मी स्वत:चा उल्लेख भगवान असा केला, तेव्हाच मग मला तुम्ही का विचारलं? तेव्हा एकानेही प्रश्न केला नाही आणि आता इतके जण विचारत आहेत.' त्यांनी नंतर म्हंटलं आहे की, भगवान नसण्याचा पर्यायच नाहीय. जे काही आहे, ते सर्व भगवानस्वरूपच आहे. फक्त ते उघड्या डोळ्यांनी बघणं किंवा न बघणं, इतकाच फरक आहे.
ओशोंनी जी मांडणी केलेली आहे, ती अतिशय जोरदार आहे; युनिक आहे. फक्त वेगवेगळे धर्मपंथ आणि साधना मार्गच नाही; तर त्यांनी प्रचलित समाज; प्रोजेक्टेड ट्रूथ; देश-काळ ह्याविषयी जे काही भाष्य केलं आहे; ते अतिशय विलक्षण आहे. एका प्रवचनात ते म्हणतात की एक राजा होता. त्याचा मुलगा तरुण असताना एका वेळेस त्यांचं भांडण झालं आणि तो राजवाडा सोडून निघून गेला. तरुण राजकुमार घराबाहेर पडला. राजाने अनेक वेळा त्याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. अनेक वर्षं गेली. खूप काळानंतर राजाच्या प्रधानाने एका भिका-याला राजवाड्यात येताना बघितलं. कफल्लक असलेला एक कंगाल भिकारी भीक मागण्यासाठी आशेने उभा होता. निरखून बघितल्यावर प्रधानाला कळालं की, अरे, हा तर तोच राजकुमार आहे! त्याने लगेच राजाला जाऊन सांगितलं. आपण राजकुमार होतो आणि इथलेच होतो, ह्याची त्याला काहीही शुद्ध नव्हती.
राजा अवाक् झाला. काय करावं त्याला सुचलं नाही. म्हणून त्याने प्रधानाचं विचारलं. प्रधान म्हणाला की, त्याला लगेच खरं ते सांगितलं तर त्याचा विश्वासच बसणार नाही. तो पळून जाईल. म्हणून त्याला हळु हळु सांगूया. त्यानुसार पहिले प्रधानाचा एक सेवक त्या भिका-याला बोलवायला गेला. सेवकाला बघून तो पळूनच जाणार, तेवढ्यात सेवकाने त्याला सांगितलं की, राजा तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला इथे काम दिलं जाणार आहे. जरा घाबरतच तो भिकारी तिथे थांबला. मग आधी त्याला चांगले कपडे दिले; आंघोळ घालण्यात आली. मग त्याला जुजबी काम देण्यात आलं. काही काळाने त्याला थोडं मोठं काम दिलं गेलं. नंतर पुढे त्याला आणखी वरच्या दर्जाचं काम दिलं आणि शेवटी तो तिथे रुळल्यावर राजाने सांगितलं की, तो भिकारी नसून राजकुमार आहे; राज्याचा वारस आहे. आणि आता मात्र त्याला ते लगेच पटल, समजलं.
ओशो म्हणतात की, अगदी तीच परिस्थिती आपली सगळ्यांची आहे. आपण आहोत तर ईश्वरमय; आपण ईश्वराचे अंश आहोत, पण स्वत:ला कफल्लक मानतो. जर लक्षात आलं तर एका क्षणात उमगू शकतो. पण आपला स्वत:वरच विश्वास नाही; स्वत:वरच श्रद्धा नाही. मी आणि ईश्वराचा अंश? शक्यच नाही, कारण मी तर. . . ओशो म्हणतात म्हणून मी तुम्हांला ध्यानाच्या विधी देतो, साधना देतो. त्यातून हळु हळु तुमचा विश्वास वाढतो; स्वत:वर तुमची श्रद्धा उत्पन्न होते. मग तुमच्यामध्ये ही वस्तुस्थिती बघण्याची समज येते; हिंमत येते. पण मला विचाराल तर तुम्ही आत्ताही भगवानस्वरूपच आहात, दुसरे होऊही शकत नाही. . .
प्रसिद्ध विचारवंत शिवाजीराव भोसले ह्यांनी म्हंटलं होतं की, केवळ 'संभोग से समाधी की ओर' ह्या प्रवचनांसाठी ओशो नोबेल पारितोषिक मिळवण्यास पात्र आहेत. मोहम्मद, कृष्ण, जीसस, भगवान बुद्ध, कबीर, महावीर, लाओ त्सू, मीराबाई, सहजो अशा असंख्य ज्ञानी पुरुषांविषयी व स्त्रियांविषयी ओशोंनी अतिशय सुंदर भाषेमध्ये निरूपण केलेलं आहे. भारतामध्ये त्यांनी नव संन्यास आंदोलन सुरू केलं. यशवंत देव, कवयित्री शिरीष पै असे मराठी दिग्गज आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले विजय आनंद, विनोद खन्ना असे स्टार्स त्यांचे शिष्य बनले. त्यांचा संन्यास हा जगापासून पलायन करणारा संन्यास नव्हता तर जगामध्ये- बाजारामध्ये राहून जागरूक होण्याचा मार्ग होता. विनोद खन्ना ह्याला संन्यास देतांना ओशोंनी सूत्र दिलं- तू अभियन असा कर की जणू अभिनय हे वास्तविक जीवन आहे. आणि वास्तविक जीवनात जगताना तू असं जग की तो जणू अभिनय आहे. कुठेच आसक्त न होता डोळसपणे जगण्याचा हा मंत्र! पुढे विनोद खन्ना अर्थात् स्वामी विनोद भारती ह्यांनी ओशोंच्या अमेरिकेतल्या रजनीशपुरममधल्या कम्युनमध्ये काही वर्षं बागकाम केलं! जगभरातून मानसशास्त्रज्ञ, बुद्धीजिवी, डॉक्टर्स, शिक्षणतज्ज्ञ, त्यांच्या पुण्यातल्या आश्रमात आणि नंतर पाच वर्षे अमेरिकेतल्या आश्रमात एकत्र आले.
संत गोरा कुंभार ह्यांनी म्हंटलं आहे की, गुरू हा घड्याला आकार देणा-या कुंभाराप्रमाणे असतो. बाहेरून तो घड्यामध्ये असलेले दोष दूर करतो; त्यातल्या कमतरता बाहेर काढतो आणि आतमध्ये हात ठेवून तो घड्याला आधार देतो. अगदी तसेच गुरूही एका बाजूने शिष्यातले दोष, आणि वरवरचे लेप बाजूला काढतात आणि एका बाजूने त्याला धीर देतात; त्याला आधारही देतात. आणि ह्याचीच प्रचिती ओशोंना ऐकताना येते. एका बाजूला त्यांचा प्रेमळ स्वर वेगळ्याच सफरीवर आपल्याला नेतो आणि त्याच वेळी मनातल्या असंख्य जळमटांना साफ करतो... ओशोंची अतिशय रसाळ प्रवचनं इंटरनेटवर आणि पुस्तक रुपाने उपलब्ध आहेत. इच्छुकांनी त्यांचा आवर्जून आस्वाद घ्यावा. ओशोंनी एका ठिकाणी म्हंटलं आहे की, मला तुम्ही गुरूही मानू नका आणि मित्रही मानू नका. तुम्ही रस्त्यावर जाताना तुम्हांला भेटणारा एक अनोळखी वाटाड्या समजा. मित्र जरी मानलं तरी माझ्याप्रती आसक्त व्हाल. मला एक अनोळखी वाटाड्या मानून माझ्यामध्ये अडकून न पडता तुम्ही मी दाखवतोय त्या मार्गाने फक्त जा...
माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत.
प्रतिक्रिया
25 Jan 2017 - 11:56 am | अत्रन्गि पाउस
एकंदरीतच रजनीश आणि त्यांची फिलॉसॉफी ह्या विषयी कुतूहल म्हणा किंवा जिज्ञासा आहेच त्यामुळे अजून काही कळले तर हवेच आहे ...
तथापि विनोद खन्ना सारखी लोक्स परत संसारात का आले हे हि जाणून घायचंय..
अर्थात अध्यात्म आणि तत्वज्ञान ह्यात डिस्क्लेमर्स आले कि मन थोडं खट्टू होतं..म्हणजे असं कि रामकृष्ण परमहंस ज्या प्रमाणे नरेंद्रला ठासून म्हणाले होते कि "हो मी देव पहिला आहे आणि मी तो तुलाही दाखवू शकतो" तसं कुणी म्हटलं कि जे वाटत ते "तुझा तू बघ ...परिणाम तुझ्या हातात नाहीत ... " वगैरे ऐकलं कि जरा कन्फ्युज होतं
असो विषय मोठा आहे आणि असंख्य फाटे फुटू शकतात त्यामुळे
लेखन सीमा
25 Jan 2017 - 8:29 pm | पैसा
ओशोंच्या कथा निव्वळ मनोरंजन म्हणून वाचल्या तरी उत्कृष्ट वाटतात.
25 Jan 2017 - 11:20 pm | गामा पैलवान
मार्गी,
लेख आवडला. ओशोंची ओळख प्रभावीपणे करून दिलीये. मी ओशो फारसे वाचले/ऐकले नाहीयेत. वरवर पाहता त्यांचं म्हणणं पटतं. फक्त एकाच गोष्टीला माझा आक्षेप आहे. तो म्हणजे संभोगातून समाधीकडे जाण्यास.
संभोगातून समाधीकडे जाता येतं. नाही असं नाही. पण त्यासाठी खडतर साधना करावी लागते. आता असं बघा की ओशो प्रस्थापित धर्मांवर अनावश्यक म्हणून टीका करतात. त्यांच्यातल्या निर्बंधांना गुलामगिरी म्हणतात. ठीकाय, काही हरकत नाही. पण मग खडतर साधना कशी करायची? जर निर्बंधच झुगारून लावायचे झाले, तर मग साधना या शब्दाला अर्थंच उरंत नाही.
बिनसाधनेने संभोग करायला गेलं तर काय समाधीची प्राप्ती होणारे का? शक्यंच नाही. याचं ढळढळीत उदाहरण कोरेगाव पार्कात आहे. अनिर्बंध संभोगामुळे तिथलं रुग्णालय सदैव भरलेलं असे. या समस्येवर उपाय नाही. ओशो यांचे विचार कितीही श्रेयस्कर असले तरी संभोगातनं समाधीकडे थेट जाता येत नाही.
शेवटी एक गोष्ट सांगतो. नवनाथ भक्तिसारातली आहे. मच्छिंद्रनाथ स्त्रीराज्यात सुखाने कालक्रमणा करंत होते. त्यांना तिथे मुलगाही झाला. ते गोरक्षनाथांचे गुरू. गोरक्षनाथ आपल्या गुरूंना शोधंत शोधंत स्त्रीराज्यात आले. तिथल्या सर्व संकटांवर मात करंत गुरुंसमोर उभे राहिले. शिष्यास पाहून गुरू प्रसन्न झाले. साहजिकंच गुरुपत्नी कीलोतळेसही आनंद झाला. तिने मोठ्या आग्रहाने गोरक्षास ठेवून घेतलं. पुढे अतिरिक्त पाहुणचारामुळे योगधर्माचा विसर पडू लागला. तेव्हा गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांस युक्तीप्रयुक्तीने स्त्रीराज्यातून बाहेर काढलं. अशा रीतीने मच्छिंद्रनाथ परत साधुजीवनी विराजमान झाले. स्त्रीराज्यातनं बाहेर पडल्यावर गोरक्षास म्हणाले की आपण दोघेही जीवन्मुक्त आहोत. आपण कसेही वागलो तरी आपल्याला पाप लागंत नाही. मग तू तिथून का निघालास? यावर गोरक्षनाथांनी दिलेलं उत्तर मोठं मननीय आहे. गोरक्षनाथ म्हणतात की, आपण दोघेही जीवन्मुक्त योगी आहोत हे खरंय. पण लोकांना तुमचा योग दिसणार आहे का? लोकं तुमचे भोगविलासंच लक्षात ठेवणार. लोकं तुमचा योग आचरणार नाहीयेत. आपला जन्म तर लोकांच्या उद्धारार्थ झाला आहे. कालानुक्रमे विलास नशिबात आले तरी ते कसोशीने मर्यादित केले पाहिजेत.
ओशोंचं जीवन विलास मर्यादित करायला शिकवतं का?
आ.न.,
-गा.पै.
26 Jan 2017 - 2:14 am | संजय क्षीरसागर
मी अध्यात्मावर लिहीणं बंद केलं कारण नव्वद टक्के लोक भक्तीमार्गी असतात आणि देव ही केवळ मानवी कल्पना आहे असं म्हटलं की जनक्षोभ उसळतो. त्यामुळे अशा फोरमवर निखळ अध्यात्मिक चर्चा होऊ शकत नाही. तरीही हा लेख आला आहे आणि ओशो काय चिज आहे याची किमान कल्पना तरी यावी म्हणून लिहीतो.
ओशो सिद्ध होते किंवा नाही याबद्दल मनात संदेह असेल तर त्यांच्या वाटेलाच न जाणं श्रेयस कारण तो संदेह ओशोंची बायोग्राफी बघतो आणि ते काय म्हणतायंत याच्याशी कधीही रिलेट होऊ शकत नाही. मी ओशोंना पूर्णपणे आत्मसात करु शकलो कारण मला तो संदेह नव्हता आणि नाही. १९९२ च्या सुमारास मी कम्युनची मेंबरशीप घेतली तेव्हा ओशो नव्हते आणि इतर साधक काय करतात किंवा दुनिया काय म्हणते याची मला कणमात्र फिकीर नव्हती. जवळजवळ पाच वर्ष मी तिथे इतकी मनःपूर्वक साधना केली आणि इतकं व्यापक वाचन केलं की माझ्याकडे त्यांच्या पुस्तकांची चाळीसएक हजार रुपयांची पर्सनल लायब्ररी होती. एकदा उलगडा झाल्यावर मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांच्या समाधीकक्षात जाऊन जे ध्यान केलं ते शेवटचं. त्यानंतर मी वाचन बंद केलं आणि सगळी पुस्तकं ज्या मित्रांना उपयोगी होतील असं वाटलं त्यांना भेट देऊन टाकली.
थोडक्यात, ओशो सिद्ध होते हा माझा अनुभव आहे आणि जगातल्या कुणाशीही, कोणत्याही फोरमवर, म्हणाल त्या वेळी मी ओशोंविषयी निर्विवादपणे चर्चा करायला तयार आहे. शिवाय ओशोंना कुणीही कितीही शिव्या घातल्या आणि त्यांचा कसाही अपमान केला तरी मला शून्य फरक पडतो. माझ्या लेखी ओशोंची थोरवी अशीये की त्यांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला सत्य गवसू शकतं हा अफलातून संदेश जगाला दिला आणि आपल्या अफाट व्यासंगातून प्रचलीत अध्यात्मामुळे सामान्यांच्या मनात घर करुन बसलेला सिद्धत्वाविषयीचा इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स पूर्णपणे पुसून टाकला.
आता तुमचा मुद्दा :
संभोगातून समाधीकडे जाता येतं. नाही असं नाही. पण त्यासाठी खडतर साधना करावी लागते.
समाधीची तुमची कल्पना काय आहे यावर सगळी दारोमदार आहे. समाधीचा साधा आणि सरळ अर्थ समत्वाला आलेली चित्तदशा असा आहे. थोडक्यात, जीवनातल्या कोणत्याही प्रसंगात आणि शेवटी मृत्यूच्या वेळी सुद्धा तुम्ही मजेत राहू शकता हे समाधीचं फलीत आहे.
संभोग समाधीकडे नेतो म्हणजे संभोगात, शरीराच्या कमालीच्या रिलॅक्सेशनमुळे आणि मनाचा कोलाहल काही काळ संपूर्ण शांत झाल्यानं, आपल्या जाणीवेचा रोख जो सतत जगाकडे लागलेला असतो, तो पुन्हा स्वतःप्रत येतो आणि आपण खुद्दच ती समस्थिती आहोत हा उलगडा होतो. त्यामुळे सिद्ध कायम संभोगाचं सुख उपभोगतो असं अध्यात्मात म्हटलं जातं.
तस्मात, संभोग ही स्वतःप्रत येण्याची प्रक्रिया आहे. एकदा स्वरुपाचा उलगडा झाल्यावर साधनेची गरज राहात नाही. म्हणजे संभोग जीवनातून हद्दपार होतो असा नाही तर आपण कायम समचित्त दशेत राहातो. संभोग सिद्धाला उद्दिपित करु शकत नाही. त्यामुळे शिवाच्या तंत्रसाधनेत असं म्हटलंय की सिद्धाबरोबरचा संभोग साधकाला (टू बी स्पेसिफिक साधिकेला) समचित्तदशेत आणू शकतो. शिवलींगाचा प्रतिकात्मक अर्थ दि अपोझिट जेनीटल्स इंटरग्लूड टुगेदर असा आहे.
ओशोंनी हे सांगायचा प्रयत्न केला. पण साधकांचं अवधान जर स्वतःकडे असण्याऐवजी संभोगाकडे असेल तर जाणीवेचा रोख स्वतःकडे वळण्याची शक्यता शून्य. मग संभोग ही साधना होत नाही, ती नेहेमीची कामक्रीडा होते. दुनियेला संभोगातच रस असल्यामुळे ओशो काय म्हणतायंत ते बाजूला राहीलं आणि संभोग करत करत एक दिवस आपण समाधीला पोहोचू असा सोयिस्कर अर्थ काढला गेला.
आता संभोग साधना म्हणून केला तर जाणीवेचा रोख स्वतःप्रत येण्याची शक्यता आहे. ती साधना खडतर नाही तर साधकाचं आकलन महत्त्वाचंय.
आणि माझ्या म्हणण्याचा नेमका प्रत्यय तुमच्याच प्रतिसादातल्या गोरक्षनाथांच्या वचनात आहे :
पण लोकांना तुमचा योग दिसणार आहे का? लोकं तुमचे भोगविलासंच लक्षात ठेवणार.
लोक ओशोंना भोगी समजण्याचं कारण त्यांची उत्सुकता संभोगात आहे. संभोगातून स्वतःप्रत येण्यात नाही.
26 Jan 2017 - 3:22 am | संदीप डांगे
वाह! सुंदर प्रतिसाद. अर्थातच सहमत...
27 Jan 2017 - 11:56 am | मराठी_माणूस
सिद्ध असणे म्हणजे काय ?
27 Jan 2017 - 1:31 pm | संजय क्षीरसागर
अ मिलीअन डॉलर्स क्वेस्टशन ! पण या फोरमवर आता अध्यात्मावर लिहीणे नाही !
26 Jan 2017 - 10:24 am | मार्गी
वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद!!!
झालेली चर्चा आवडली.
इतकंच म्हणेन की ओशो महासागरासारखे आहेत आणि त्यांना समजून घेण्यासाठी आपल्याला आपली क्षमता वाढवावी लागते; पहिले ब्लँक मनाने सहमत/ असहमत होण्याचा मोह टाळून त्यांना फक्त समजून घ्यावं लागतं. ज्यांना गंभीर रस असेल, त्यांनी इथून त्यांच्या प्रवचनांमधली संकलित बायोग्राफी डाउनलोड करून आवर्जून वाचावी. १३०३ पानांच्या बायोग्राफीपैकी किमान १०० पानं वाचून मग मत द्यावं/ जजमेंट करावं. धन्यवाद.
26 Jan 2017 - 10:25 am | मार्गी
त्यांच्या प्रवचनांमधली संकलित बायोग्राफी
26 Jan 2017 - 12:21 pm | संजय क्षीरसागर
ओशोंच्या जीवनाचा आभ्यास करण्यापेक्षा (बायोग्राफी), तुम्हाला भिडलेल्या त्यांच्या एखाद्याच वचनाची खुमारी रोजच्या जगण्यात उतरवता येईल का हा ध्यास घ्या, त्यानं आयुष्य बदलू शकतं.
सहाशेहून जास्त टायटल्स असणारे ओशो स्वत : च्या वक्तृत्वशैलीबद्दल जे म्हणतात त्याचा मराठीत गोषवारा असा आहे :
मी कोणतीही पूर्वतयारी न करता बोलतो कारण पूर्वतयारी असेल तर चूक होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे मला चुक होण्याची भीतीच नसते. इतकंच काय मला मी पुढचं वाक्य काय बोलणार ते सुद्धा माहित नसतं. तुम्हाला जेव्हा मी काय बोललो ते कळतं तेव्हाच मलाही कळतं.... तुम्हीच मला ऐकता असं नाही, मीही स्वतःला ऐकत असतो.
या त्यांच्या वक्तव्यानं माझ्या मनाचा पुरता ठाव घेतला. एखादी व्यक्ती दोन-तीन हजार लोकांसमोर इतकं चित्तवेधक, क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवत नेणारं तास-दीड तासाचं प्रवचन कोणत्याही पूर्वतयारीशिवाय देऊ शकते तर तीचा आत्मविश्वास काय कमाल असेल. जी व्यक्ती समोरचा हजारोंचा जनसमूह आणि त्याचं आपल्याकडे वेधलेलं अवधान स्वतःच्या जाणीवेतून पूर्णपणे काढून स्वतःच स्वतःला ऐकत असेल तर ती वर्तमानाशी किती एकरुप असेल या विचारांनी मी इतका हर्षित झालो की सगळं आयुष्यपणाला लावून मी ओशोंच्या त्या चित्तदशेचा वेध घेण्याचं ठरवलं. कम्युनची मेंबरशिप घेतली, अनेकानेक दिवस तिथे जाऊन सकाळी सहा वाजता सुरु होणारं त्यांनी डिजाइन केलेलं डायनॅमिक मेडिटेशन केलं. बुकशॉपमधे जाऊन रोज एक पुस्तक वाचायचं आणि एक विकत घेऊन घरी आणून वाचायला लागलो. पुस्तक इतकं भन्नाट असायचं की कधीकधी रात्रीचे दोन-अडीच होऊन जायचे. मग एका उत्तररात्री असंच एक झेनवरचं पुस्तक वाचतांना माझी चित्तदशा संपूर्ण शून्य झाली आणि त्या क्षणी माझ्या जाणीवेनं अचानक यू टर्न घेतला. आपण स्वतःलाच शोधत होतो हा उलगडा झाला. माझा शोध संपला !
त्या दिवसापासून मीही असाच जगायला लागलो. वर्तमानाशी संपूर्ण संलग्न असल्यामुळे भविष्याची कणमात्र चिंता नाही. भूतकाळ तर निव्वळ स्मृती आहे त्यामुळे त्याचं ओझं नाही. पुढच्या क्षणी मी काय करेन याचा माझ्याकडे कोणताही प्लान नाही. अस्तित्व जे काही समोर आणेल त्याला तितकाच सहर्ष प्रतिसाद देऊन मी जगतो. अपयशाची मला भीती नसते कारण यशापयाचा धसका घालणारं मन मी पाराभूत केलं आहे. थोडक्यात, आधी मनानी ठरवलं आणि मी अनुसरण केलं असं आयुष्य नाही. जे घडतं ते केवळ उत्सफूर्त असतं . घटना, तिची जाणीव आणि मन कायम एकरुप असतात आणि मी त्या एकरुपतेची मजा घेत असतो.
27 Jan 2017 - 10:42 am | मार्गी
संजयजी, आपल्या साधनेविषयी कळून आनंद वाटला. आपल्याशी व्यक्तिगत बोलायला आवडेल. आपण इतकी वर्षं कम्युनमध्ये होतात तर आपले साधना अनुभव ऐकायला आवडतील.
मी बायोग्राफीचा उल्लेख यासाठी केला की ओशोंना समजून घेण्याचा तो एंट्री पॉईंट आहे असं मला वाटतं. आणि माझ्या साधनेबद्दल, माझ्या प्रवासाबद्दल म्हणाल तर मी इथे त्याविषयी लिहिलं आहे. आणि आपल्याशी व्यक्तिगतरित्याही त्यावर बोलू इच्छितो. धन्यवाद.
27 Jan 2017 - 12:16 pm | संजय क्षीरसागर
सिद्धामधे आणि इतर यशस्वी व्यक्तीत हाच तर फरक आहे !
A realized one has no biography ! तो मुक्त आकाश झालेला असतो. त्यामुळे सिद्धाचा जीवनपट हा एंट्री पॉइंट नाही. त्याचं वक्तव्य हा वेध घेण्याचा मार्ग आहे.
27 Jan 2017 - 1:05 pm | मार्गी
अर्थातच, पण महासागर बघण्यासाठी एखाद्या किना-यावर तर उभं राहावं लागेल ना? मी त्यांच्याबद्दल म्हणत नसून त्यांना आपण कसे- कशा पद्धतीने समजून घेण्याकडे जाऊ शकतो, हे म्हणतोय. ते महानाट्य कसं उलगडत गेलं ह्यांची त्यांच्याच प्रवचनात त्यांनी सांगितलेल्या आठवणींमधून लोकांच्या सोयीसाठी केलेली संकलित बायोग्राफी. म्हणजे मग ते कोण होते, त्यांनी नक्की काय केलं अशा WH प्रश्नांची उत्तरं नवख्यांना मिळू शकतात, म्हणून त्यांच्यासाठी.
26 Jan 2017 - 10:26 am | मार्गी
http://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=2&ved=0CD...
26 Jan 2017 - 1:27 pm | Ranapratap
लेख आणि प्रतिसाद फारच उत्तम. ओशो बद्दल फार छान माहिती मिळाली.
26 Jan 2017 - 4:16 pm | Ram ram
मी इतरत्र दिलेल्या प्रतिक्रियांत संजयजीं बद्दल आदरानेच बोललो आहे, मला आज उलगडा झाला कि हा माणुस इतका चांगला विचार कसा करीत असेल. संजयजी क्षीरसागर मला आपला वैयक्तिक दूरभाष संपर्क मिळू शकेल काय?
27 Jan 2017 - 12:12 pm | संजय क्षीरसागर
पाहावा.
26 Jan 2017 - 8:08 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
तुमचा वरचा संदेश वाचला. ओशोंबद्दल तुम्ही जे लिहिलंत ते तो स्वानुभव आहे. त्यामुळे त्याबद्दल शंकाच नको. ज्याच्यामुळे आत्मानुभव आला त्याच्याबद्दल आत्मीयता वाटणं अत्यंत साहजिक आहे. त्यामुळे तुम्हांस ओशोबद्दल आत्मीयता असणं नैसर्गिक आहे.
आता असं पहा की, तुमच्यासारखे ओशोंचे ऋणी असलेले पंथबांधव भलत्यासलत्या कल्पनांत अडकून पडले आहेत. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही ओशोंबद्दल असलेले गैरसमज दूर करायचा प्रयत्न करावा. तुम्हाला जमेल ते. 'ओशो कसे बघावे' अशा स्वरूपाचं काही लेखन (पुस्तक, जालनिशी, वगैरे) करावं म्हणून सुचवेन. मात्र तत्पूर्वी तुम्हाला स्वत:ला संभोगातनं समाधीचा अनुभव आला आहे का हे लेखनात स्पष्ट करा. अर्थात, शेवटी निर्णय तुमचाच. ज्ञानेश्वरांनी बुडती हे जन न देखावे डोळां म्हणून लोकांना धीर देण्यासाठी लेखन केलं. तुम्हीही करा.
जाताजाता, ज्ञानेश्वरांवरून आठवलं की तुम्ही समाधी म्हणजे काय म्हणून विचारलं होतं. याचं उत्तर माऊलींनी देऊन ठेवलंय. समाधी म्हणजे कुंडलिनी जागृत करणे. संभोगातनं कुंडली जागवायच्या वज्रोली क्रियेची रूपरेखा इथे आहे : http://nikhil-alchemy2.blogspot.co.uk/2010/09/vajroli-kriya-and-sahastra...
आ.न.,
-गा.पै.
26 Jan 2017 - 8:58 pm | संजय क्षीरसागर
मला ओशोंविषयी कृतज्ञता आहे पण मी स्वतःच सत्याचा उलगडा करु शकतो त्यामुळे ओशोंना प्रमोट करण्यात मला रस नाही.
तुम्हाला स्वत:ला संभोगातनं समाधीचा अनुभव आला आहे का हे लेखनात स्पष्ट करा
मी सांख्यमार्गाचा पुरस्करता आहे. सत्याचं आकलन हा बोध आहे त्यासाठी क्रियेची आवश्यकता नाही याविषयी मी ठाम आहे. एकदा बोध झाल्यावर कोणत्याही प्रणालीच्या वॅलिडिटीबद्दल तुम्ही निश्चयात्मकरित्या बोलू शकता. संभोगाविषयीचा माझा वरचा प्रतिसाद त्याला साक्षी आहे.
ज्ञानेश्वरांनी बुडती हे जन न देखावे डोळां म्हणून लोकांना धीर देण्यासाठी लेखन केलं. तुम्हीही करा.
अध्यात्मावरचं माझं सर्वंकष पुस्तक मार्च महिन्यात प्रकाशित होईल.
समाधी म्हणजे कुंडलिनी जागृत करणे. संभोगातनं कुंडली जागवायच्या वज्रोली क्रियेची रूपरेखा इथे आहे
इतकी काँप्लीकेशन्स करण्यापेक्षा ज्ञानेश्वरांनी ही किती सोपी प्रक्रिया सांगितली आहे पाहा :
अधिक देखणे जरी निरंजन पाहणे,
योगीराज विनवणे मन आले ॐ मयी |
27 Jan 2017 - 10:38 am | मार्गी
इतक्या विविधांगी प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
मला इतकंच वाटतं की, बौद्धिक चर्चा करण्यापेक्षा त्या गोष्टीचा आस्वाद घेतला; चव घेतली तर आपोआप ती काय चीज आहे हे कळतं. श्रीखंड गोड आहे हे सांगून कळणं वेगळं आणि चाखून कळणं वेगळं. त्यामुळे प्रचिती हवी असेल तर तितकं ते चाखूनच बघावं लागतं. आणि प्रत्येक व्यक्ती ही अतिशय युनिक असते; त्यामुळे एकच मार्ग सगळ्यांसाठी असं नसतं. व्यक्ती तितके मार्ग, तितके पंथ! अस्तु.
27 Jan 2017 - 11:25 am | पैसा
:)
27 Jan 2017 - 1:51 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
तुमचा इथला संदेश वाचला.
१.
मैथुनातून समाधी साधण्याची प्रक्रिया अस्तित्वात आहे एव्हढं सांगण्यासाठीच वाज्रोली क्रियेचा उल्लेख केला होता. ती आचरणांत आणावी असा सूर अभिप्रेत नाही. :-) किंबहुना ती वामपंथी क्रिया असल्याने तिच्यापासून दूरंच राहावे असं माझं मत आहे.
२.
बोधोतर क्रिया देखील असते. त्यास ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. अतिरिक्त पाहुणचारांपायी गोरक्षनाथांना योग्धर्मविचारांचा विसर पडू लागला होता. हे ज्ञानोत्तर कर्म क्षीण झाल्याचं निर्देशक आहे. म्हणूनंच त्यांनी स्त्रीराज्य सोडण्याचं ठरवलं.
३.
तुमच्या निर्णयाचा आदर आहे.
आ.न.,
-गा.पै.
27 Jan 2017 - 2:13 pm | संजय क्षीरसागर
थोडं क्लॅरिफेकेशन करतो
बोधोतर क्रिया देखील असते. त्यास ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात.
बोधोत्तर स्थितीत आराधक, आराध्य आणि त्या दोहोंमधला संबंध भक्ती, लोप पावतो. कारण सत्य एकल आहे हा उलगडा झालेला असतो. तस्मात ज्ञानोत्तर भक्तीची गरज उरत नाही. सगळं जीवन मस्त आणि मजेत जगायला उपलब्ध होतं .
अतिरिक्त पाहुणचारांपायी गोरक्षनाथांना योग्धर्मविचारांचा विसर पडू लागला होता. हे ज्ञानोत्तर कर्म क्षीण झाल्याचं निर्देशक आहे. म्हणूनंच त्यांनी स्त्रीराज्य सोडण्याचं ठरवलं.
रियली डोंट नो. देह म्हणजे आपण नव्हे हे कळल्यावर स्त्री-पुरुष हा भेद फारशी एक्साइटमेंट निर्माण करत नाही. ज्ञानोत्तर कर्म क्षीण होण्यापेक्षा सॉलीड मजेचं होतं असा अनुभव आहे कारण अकर्ता गवसल्यानं कर्म स्वच्छंद झालेलं असतं.
27 Jan 2017 - 10:55 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ दोघेही राजमहाली आणि भिक्षाटनात दोन्ही परिस्थितींत सारखेच आनंदी होते. मात्र तरीही त्यांना ज्ञानोत्तर योगभक्तीची गरज वाटंत होती. लोकोद्धार करणे ही त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता होती. तुमच्या बाबतीत हे बंधन नाही, हे मान्य.
आ.न.,
-गा.पै.