पहिला भाग लिहील्यानंतर बर्याच लोकांनी अकॅडेमिक नको म्हणून सांगितलं. तरीही काही मूलभूत संकल्पना ठाऊक असणं आवश्यक आहे असं म्हणून अट्टहास करतोय. मात्र जोकरच्या झोपडपट्टी लेखातला १२०० स्क्वेफु चा मुद्दा (कुणी तरी इथं लिंक अपडेट करावी अशी विनंती) ऐरणीवर आल्यानंतर तदनुषंगिक मुद्दे आणि संकल्पना मांडावेत असं वाटलं म्हणून ते लिहीत आहे. थोडं विस्कळीत होतंय पण पुन्हा गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न होईल. किंवा कदाचित .... बघू ओ पुढचं पुढं!
--------------
प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपलं स्वतःचं हक्काचं घर.
'माझं एक टुमदार दुमजली छानसं घर असावं' अशी अपेक्षा माणूस करत असतो. त्या दृष्टीनं प्रयत्न करताना लक्षात येतं की आपापल्या कुवतीनुसार किंवा खिशाच्या बजेटनुसार हे फारसं शक्य होत नाहीये तेव्हा किमान 'माझं एक घर असावं' अशा अपेक्षे ला माणूस येऊन पोचतो आणि त्यानुसार धावायला सुरुवात होते. आवश्यक त्या कागदपत्रांची जुळणी आणि सोबतीला घरासाठी जागा शोधणं किंवा घर शोधणं हे सगळं सुरु होतं.
जागा मनासारखी मिळाली तरी तिची खरेदी आवाक्यात असणं आवश्यक असतं. लहान शहरात किंवा खेड्यात ते शक्य होतं देखील मात्र मोठ्या शहरात ते अजिबातच शक्य होत नाही त्यामुळं आपण विचार करतो तो एखादं सोसायटीमधलं घर घेण्याचा. इथंच सुरुवात होते ती जागाविषयक आवश्यक बाबींची माहिती समजून घ्यायला.
प्लॉट : म्हणजे एक कुठलंही जागा किंवा जागेचं क्षेत्रफळ ज्यावर इमारत बांधली जाणार आहे.
(अशा जमिनीच्या तुकड्याला प्लॅट असंही संबोधन हिरव्या देशात वापरलं जातं.)
फ्लॅट : म्हणजे इमारतीमधली एक सदनिका. यालाच अपार्टमेण्ट असं देखील म्हटलं जातं.
प्लॉट आणि फ्लॅट मधला फरक बर्याच वेळेला गोंधळ करतो. आम्ही प्लॉट घेतला म्हणताना काही जण प्रत्यक्षात फ्लॅट घेतलेले बघून आपण फ्लॅट व्हायची वेळ आलेली असते. तर असा हा प्लॉट आणि फ्लॅट मधला फरक.
प्लॉट किंवा मोकळी जागा शक्यतो चौकोनी किंवा आयताकार असणं फायदेशीर असलं तरी प्रत्येक वेळी ते शक्य नसतं.
उपलब्ध जागेनुसार इमारत उभी करावी लागते. वास्तुशास्त्राचा विचार वगैरे या लेखमालेत करण्याचा मानस नसल्यानं त्या अनुषंगानं शक्य प्रत्येक त्या गोष्टी नसलेल्या बर्या.
जमिन, पैसा आणि सत्ता या गोष्टींसाठी अनादि कालापासून माणसं एकमेकांच्या जीवावर टपलेली आहेत. बर्याचदा कागदोपत्री अमुक आकाराचा प्लॉट खरोखरी वेगळ्याच आकारात नि वेगळ्याच नावावर असतो. काही सुवर्णमध्य काढून प्लॉट हाती पडतो. जागा मिळाल्यानंतर त्या जागेचं रेकॉर्ड तपासलं जातं. पोलिसी पंंचनाम्यासारखे किमान तीन बिंदू आणि त्यापासूनचं अंतर सापडल्यानंतर प्रत्येक कोपरा पक्का केला जातो. या सगळ्या गोष्टी पूर्वी किंवा आताही सिटी सर्व्हेचे लोक करत असत. आता अधिकृत सर्व्हेयर या गोष्टी करु शकतात. अनेकदा रस्त्यात एका तिपाईवर एखादं इलेक्ट्रॉनिक यंत्र घेऊन त्याला डोळा लावून असलेले लोक तुम्ही पाहिले असतील. ज्याला टोटल स्टेशन म्हणतात. त्यात आराखड्यानुसार बिंदू दिले की ते बरोबर ते ते बिंदू दाखवतं. हे लोक रस्त्या चे सर्व्हे करत असतात.
इमारती साठी देखील अशाच प्रकारे सर्व्हे होतात. त्यानुसार प्लॉटच्या सीमा निश्चित होतात. पूर्वी अत्यंत क्लिष्ट प्रकारे आणि कंटाळवाण्या पद्धतींनी हे सर्व्हे व्हायचे कारण त्याला मानवी मर्यादा होत्या. आता इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे या गोष्टी अतिशय सोप्या झाल्या आहेत. एकदा प्लॉट पक्का झाला की त्याच्या क्षेत्रफळाचा विचार होतो. भूमितीचा वापर करुन लांबी रुंदी चा विचार करुन अमुक एक क्षेत्रफळ नक्की ठरतं. पूर्वी किंवा आता देखील साधारण पणं स्क्वेअर फूट किंवा गुंठ्यामध्ये जागांचा विचार व्हायचा. त्याबरोबर मोठ्या क्षेत्रफळासाठी एकर किंवा हेक्टर हे वापरलं जायचं किंवा जातं.
अगदी प्राथमिक विचार म्हणजे १ फुट गुणिले १ फुट म्हणजे १ वर्गफुट्/स्क्वेअर फुट.
(एक फुट म्हणजे साधारण ३० सेमी)
३३ फुट गुणिले ३३ फुट अशा क्षेत्रफळाला एक गुंठा असं म्हणतात. या चा गुणाकार १०८९ स्क्वेफुट असला तरी हल्ली वरचे ८९ जाऊन १००० स्क्वेफुट म्हणजे एक गुंठा असंच गणित झालंय. हा एक गुंठा १००० स्क्वेफुटाचा कुठल्याही लांबी रुंदीनुसार ठरवता येतो. सरासरी २५ फुट गुणिले ४० फुट चे तुकडे जास्त उपयुक्त ठरतात.
चाळीस गुंठ्यांचा एक एकर (४०००० स्क्वेफुट) नि अडीच एकराचा एक हेक्टर असं गणित आहे. काही ठिकाणी यार्ड/ बिघे वगैरे देखील एकक म्हणून असतात.
तर एखाद्या जागेचं क्षेत्रफळ नक्की झाल्यानंतर त्या त्या भागातल्या आधिकारीक समितींच्या द्वारे ठरवले गेलेले नियम वापरुन त्या जागेमध्ये किती बांधकाम करता येतं हे ठरतं.
इथं एफ एस आय FSI किंवा एफ ए आर FAR चा संबंध येतो.
FSI = Floor Space Index / FAR = Floor Area Ratio म्हणजे
बांधलेल्या जागेचं क्षेत्रफळ्/ त्या जागेचं क्षेत्रफळ.
उदाहरणार्थ - एका मोकळ्या जागेचं क्षेत्रफळ १०,००० स्क्वेफुट असेल आणि त्यावरचं बांधकाम ५,००० स्क्वेफुट असेल तर ०.५ येतो.
आता खरंतर हे उलट असतं. अमुक एवढी मोकळी जागा असेल तर त्या भागातल्या आधिकारीक समितीनं ठरवल्याप्रमाणं त्या जागेवर अमुक एवढं बांधकाम करण्याची परवानगी असते. त्या त्या नुसार ठराविक क्षेत्रात ठराविक एफ एस आय दिला जातो.
उदाहरणार्थ
नगरपालिका क्षेत्रात १.२ असेल तर १०,००० स्क्वेफुट जागा असताना बांधकाम १२,००० स्क्वेफुट करु शकतात.
हाच एफ एस आय १.८ असेल तर १०,००० स्क्वेफुट जागा असताना बांधकाम १८,००० स्क्वेफुट करु शकतात.
हे बांधकाम आवश्यक त्या मोकळ्या जागा आणि चतु:सीमा सोडूनच करावं लागतं. (हे नियम (बाय लॉज ) वास्तुविशारद जास्त सविस्तर आणि सखोल प्रकारे सांगू शक्तात) या आतल्या चतु:सीमा सोडल्यानंतर उरलेल्या जागेमध्ये बांधकाम करण्याचं आव्हान वास्तुविशारदावर असतं. पूर्ण प्लॉटवर आडवं बांधकाम करणं किंवा आजूबाजूची जास्त जागा सोडून उंच इमारत बांधणं हे एका मर्यादेपर्यंत वास्तुविशारदावर ठरतं.
समजा,
१२,००० स्क्वेफुट बांधकाम करता येत असेल
६००० स्क्वेफुटाचे दोन मजले,
४००० स्क्वेफुटाचे तीन मजले,
किंवा ३००० चे चार मजले किंवा आणखी इतरही काँबिनेशन करण्याचं स्वातंत्र्य वास्तुविशारदाला असतं अर्थातच सगळे नियम पाळून.
FSI किती असावा हे ठरण्याचे नियम वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या लोकवस्त्यांच्या भागांमध्ये, वेगवेगळ्या रस्त्यांच्या रुंदीनुसार आणि त्याच्या स्थानानुसार आणि संभाव्य विकासाच्या शक्यता लक्षात घेऊन वेगवेगळे असतात.
जागा विकसक बांधकाम करताना याच गोष्टीचा विचार करुन बांधकाम करतात. यामध्ये आणखी काही जागा जसं की मोकळे व्हरांडे, जिने, उद्वाहक इत्यादींसाठी सवलत असू शकते.
याचं मुख्य कारण जागा विकसीत करताना मुख्यत्वे आर्थिक गणितं जुळणं आवश्यक असतं. जागा खरेदी पासून ग्राहकाला हातात चावी दे ईपर्यंतचा आणि त्यानंतरचा देखील भरपूर खर्च यात समाविष्ट करावा लागतो. खर्चाची डोकी अनेक असतात तर आवक एकाच मार्गे येत असते. मग सुरु होतात ती आक ड्यांची गणितं नि किंमतीच्या स्पर्धा.
कशा? ते पुढच्या भागात.....
(सर्व छायाचित्रं आंतरजालावरुन)
प्रतिक्रिया
27 Oct 2015 - 7:43 pm | अभ्या..
मस्त. एकदम सिम्प्लीफाईड अन हल्लूहल्लू माहीती देणारी लेखमाला.
जिओ प्यारेलाल.
सविस्तर प्रतिसाद अन क्वेर्या नंतर.
27 Oct 2015 - 7:58 pm | चांदणे संदीप
टेलीपथी का म्हण्तात तसं झालय इथे. मी व्यनि करायाला मिपावर यायला आणि हा लेख इथे प्रकटायला, एकच वेळ!
27 Oct 2015 - 8:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
झकास ओ प्यारे भाउ :)
28 Oct 2015 - 6:12 pm | सुबोध खरे
+१००
28 Oct 2015 - 8:29 pm | खटपट्या
+१०१
28 Oct 2015 - 9:33 pm | टवाळ कार्टा
१०२
27 Oct 2015 - 8:58 pm | कंजूस
वाचतोय.चांगला आहे लेख.
27 Oct 2015 - 9:18 pm | प्यारे१
कंजूस काका अच्चा बोला बोले तो जीव फॉलन इन द भांडा.
अर्थात काका प्रोत्साहन देत आहेत हे समजतंय.
फिल्ड एवढं मोठं आहे आणि त्यातही एक बिल्डींग किंवा प्रोजेक्ट हीच एक एक लेखमाला होऊ शकते.
27 Oct 2015 - 9:04 pm | अस्वस्थामा
उत्तम माहीती प्यारे भौ..FSI बद्दल थोडी कल्पना होती पण तुम्ही संकल्पना चागली समजावून सांगितलीत. बादवे, पार्किंग(बेसमेंट) अथवा गार्डन ओव्हर पार्कींग अशा बांधकामांना FSI चे नियम कसे लागू होतात ? तुम्ही सांगितलेत तसेच की अजून वेगळे ?
28 Oct 2015 - 5:30 pm | प्यारे१
पार्किंग ही मुळात एक बेसिक अॅमिनिटी असल्यानं उपलब्ध जागेत बसवायची असते.
तिला एफ एस आय लागत नाही. थोडक्यात बांधकाम क्षेत्रात (बिल्ट अप एरिया मध्ये) पार्किंग पकडत नाहीत.
याबरोबरच जिने, लिफ्टरुम्स, पाण्याच्या टाक्या, सर्विस रुम्स, रेफ्युज एरिया, सोसायटी ऑफिस, काही ठराविक एरिया पर्यंत जिम इ.इ. गोष्टी यामध्ये येत नाहीत. पण ते बांधावे लागतात. (बिल्डर लोक याचा भार शेवटी ग्राहकावरच टाकतात. तेच लोडींग असतंय)
27 Oct 2015 - 11:05 pm | आरोह
माहितीपूर्ण लेख
28 Oct 2015 - 12:14 am | एस
मस्त लेख. अजून विस्तृत हवा. मिपाकरांची वाचनभूक अतिप्रचंड आहे. :-)
पुभाप्र.
28 Oct 2015 - 1:35 am | उगा काहितरीच
वाचतोय...
28 Oct 2015 - 6:41 am | बाबा योगिराज
मस्तच, सोप्या भाषेत समजावून संगीतलत. FSI बाबत थोड़ी कल्पना होती, परंतु आत्ता निट कळाल.ह्या छोट्या छोट्या गोष्टी फार कमी लोकांना माहिती असतात, त्यामुळे बऱ्याच वेळा फसवणूक होण्याची शक्यता असते. जमेल तशी लेखनमाला पूर्ण करा.
अजूनही माहिती येऊ द्या. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
पुलेशु.
28 Oct 2015 - 8:21 am | कंजूस
तीन गुंठ्यांत घर होतं असं नेहमी म्हणतात ते असं-
एक गुंठा ३३x३३ फुट आणि तिनाचे ३२६७ sq ft म्हणजे अंदाजे ६० फुट बाइ ५५ फुटांचा प्लॅाट( जमिनीचा तुकडा ) धरा.नगरपालिकेच्या नियमानुसार रस्त्याकडून १५ फुट आणि इतर तीन बाजूंनी दहादहा फुट मोकळी जागा सोडल्यास आतमध्ये ३५ बाइ ३५ फुटांचे चांगले ऐसपैस घर कोणीही बांधू शकतो.यामध्ये वरती पहिला मजला पुढे बांधाल ही अपेक्षा धरली आहे.वर जाण्यासाठीचा जिना सहजच १०x१० जागा खाऊन टाकतो.वर वाढवायचेच नसेल तर ती एक खोली वाढीव मिळते.
28 Oct 2015 - 4:18 pm | मार्मिक गोडसे
हे काही समजले नाही. जिन्याची प्रत्येकी लँडींग ४ फुट पकडली तर ८ फुट लँडींगलाच लागतील २ फुटात पायर्या कशा बसतील ?
आणि वर १०x१० ची एक खोली कशी मिळेल? हेडरूम ठेवावा लागेल ना?
28 Oct 2015 - 4:33 pm | प्यारे१
प्रत्येक लँडींग ४ फुटी म्हणजे?
जिना वेगळं युनिट नाही. घरात जिना असल्यानं वरच्या मजल्यावर लँडींग थेट पॅसेज मध्ये होतं. वरचा आणि खालचा जिना मध्ये जिथं मिळतो तिथं मिडलँडींग ३ फुट रुंदीचं आणि साधारण ६ ते ७ फुट लांब (३+३ फुट जिन्याचे) पुष्कळ झालं. (वैयक्तिक घरासाठी)
मजल्याची उंची किती? साधारण १० फुट. मध्यभागी उंची ५ फूट. म्हणजे साधारणपणे ७ इंच उंचीच्या ९ पायर्या. मध्ये मिडलँडींग आणि पुन्हा ९ पायर्या. ९ पायर्यांची रुंदी १० इंच ते १ फूट असते. म्हणजे ८ किंवा ९ फूट + ३ फुट. यात मिडलँडींग चा भाग बाहेर काढून तेवढी जागा वाचवली जाते.
साधारण १० बाय ८ एवढी जागा पुरेशी.
वर वाढवायचं नसेल तर खोली निघेल असं काका म्हणत आहेत.
28 Oct 2015 - 5:16 pm | मार्मिक गोडसे
ओके. जिन्यासंबंधीत शंकेचे समाधान झाले. प्रशस्त घरासाठी काकांनी जिन्याची रूंदी १० फुट ठेवली त्यामुळे मला लँडींग ४ फुटाची योग्य वाटली. अशा जिन्याला ६ ते ६.५ चा रायजर योग्य वाटला. ७ चा रायजर वयस्कर व्यक्तींसाठी जास्त वाटतो.
वर वाढवायचे नसेल तर १०x१० ची खोली कशी मिळेल अर्धा भाग तर वर येणार्या जिन्यात जाणार. त्यावर १०x१० ची रूम कशी निघेल?
28 Oct 2015 - 5:22 pm | प्यारे१
वर वाढवायचेच नसेल तर (जिना येणार नाही त्यामुळे) ती एक खोली वाढीव मिळते.
28 Oct 2015 - 7:28 pm | मार्मिक गोडसे
मी ह्या क्षेत्रातील तज्ज्ञ नसल्यामुळे माझी शंका योग्य त्या तांत्रिक भाषेत मांडू शकत नाही, तरीही एकदा जमेल तसा प्रयत्न करून बघतो.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे छताची उंची १० फुट असल्यास वरचा आणि खालचा जिना मध्ये जिथं मिळतो तिथं मिडलँडींग ५ फुटावर येते. तेथून वरच्या मजल्याच्या पॅसेजमधे मिडलँडींग पासून ५ फुट उंचीवर लँडिंग होते. वरच्या पॅसेजमध्ये छताची उंची १० फुट असणार. आता आपण वर मजला बांधनार नसल्यामुळे मिडलँडिंगपासून छताची उंची १५ फुट येईल, परंतू आपल्याला वर जाण्यासाठी जिना काढायचा नसल्यामुळे पॅसेजच्या पातळीवर स्लॅब टाकावा लागेल जो मिडलँडिंगपासून ५ फुट उंचीवर येईल. म्हणजे मिडलँडिंगच्या अर्ध्या भागात फक्त ५ फुटाचा हेडरूम मिळेल जो वावरण्यास योग्य नसेल.
त्या जागेत एक स्टीप जिना काढून पोटमाळा काढू शकतो जेथे जेमतेम ५ फुटाचा हेडरूम मिळेल. खोली निघणे अशक्य वाटते
28 Oct 2015 - 7:35 pm | प्यारे१
तुम्चा मुद्दा लक्षात आला. पण कंजूस काका काय म्हणत आहेत ते एकदा पुन्हा पहा.
ते म्हणतात की घर वरच्या मजल्यावर वाढवायचं नसलं तर (ही अट आहे.) जिन्याची गरज नाही. म्हणजे जिन्याचं काहीच येत नाही. अशा केस मध्ये जिन्याच्या जागेतच एक खोली येऊ शकेल.
जि ना ना ही.
28 Oct 2015 - 10:02 am | ज्ञानोबाचे पैजार
प्यारे गुरुजिंचा विजय असो.
एफ एस आय बद्दलच्या बर्याच शंका दूर झाल्या.
पुभाप्र
पैजारबुवा,
28 Oct 2015 - 11:00 am | सस्नेह
soil आणि तिचे प्रकार व त्याचा फौंडेशन शी संबंध यावर पण लिही.
28 Oct 2015 - 3:55 pm | चौकटराजा
उत्तर दक्षिण ई दिशाना वृत्ति -प्रवृत्ति चिकटवून जे भम्पक वास्तुविद्न्यान साम्प्रत उदयाला आले आहे तसा काही हां लेख नाही तर वास्तुसम्बंधी योग्य व् जिव्हाळ्याची माहिती दिली जात आहे याबद्दल अभिनन्दन !वास्तुवर एकूण सहा बाबींचा प्रभाव पडत असतो त्यात बांधकाम साहित्य,संस्कृति,हवामान, भौगोलिक स्थान यांचा समावेष असतो हे नमूद करावेसे वाटते.उदा शाहाबाद बागलकोट भागात घरावर कौले म्हणून चक्क फारशा टाकलेल्या दिसून येतील.
28 Oct 2015 - 5:28 pm | प्रसाद गोडबोले
मस्त अभ्यासपुर्ण लेख !
_________________________________________________
अवांतर : हे उगीचच काडी सारणे वगैरे ....
समस्त म्हणती घर माझें । हें मूर्खहि म्हणे माझें माझें ।
सेवट जड जालें वोझें । टाकिला देश ॥ ४७॥
अवघीं घरें भंगलीं । गांवांची पांढरी पडिली ।
मग तें गृहीं राहिलीं । आरण्यस्वापदें ॥ ४८॥
किडा मुंगी वाळवी मूषक । त्यांचेंच घर हें निश्चयात्मक ।
हें प्राणी बापुडें मूर्ख । निघोन गेलें ॥ ४९॥
ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचीती ।
जन्म दों दिसांची वस्ती । कोठें तरी करावी ॥ ५०॥
28 Oct 2015 - 5:33 pm | प्यारे१
व्यवहार व्यवहाराच्या जागी उत्तम पार पाडावा.
मात्र आत मध्ये आपण 'हे' नाही याची जाणीव कायम असावी.
दोन्हीमध्ये घोळ करु नयेच. मी घरात राहावं, माझ्यात घर राहू देऊ नये (सातत्यानं त्याचा विचार नको). वस्तुचा त्याग नाही, संगत्याग करावा.
28 Oct 2015 - 5:53 pm | प्रसाद गोडबोले
एक्झ्यॅक्टली !
28 Oct 2015 - 7:50 pm | कैलासवासी सोन्याबापु
ओये होय!!, हमार भैबा तो लूट लेइस महफ़िल!! का समझाए हो बंधो! मजा आन गया हो!
28 Oct 2015 - 8:16 pm | कंजूस
जिना ?
मी पुन्हा मांडतो: तळ मजल्याला जिथे जिना सुरू होऊन वर जाण्याकरता वळतो तिथला मी १०x १० चा भाग खोली न काढता आल्यामुळे वाया जातो असं म्हणायचं आहे.प्यारेनी ती १०x८ धरली.एकूण फारसा फरक नाही.इथे आपण हिंदी सिनेमातल्या बंगल्यातला जीना धरत नाही अथवा बोटीवरच्या केबिनचाही नाही.जरा मध्यम घेतला आहे कारण तीन गुंठ्यातलं ३५x३५ ( बाहेरचं माप) चं घर आहे.वरच्या मजल्यावरमात्र कमी जागा वाया जाईल कारण आणखी वरचा मजला नसेल तर.
28 Oct 2015 - 8:28 pm | प्यारे१
मूळात जागा वाया जाते हे म्हणणं मान्य नाही.
तरीही मुंबईकर अप्रोच असला तर तसं एकवेळ मान्य करता येईल. पण त्यासाठी काही उपाय वापरुन जागेची बचत करता येऊ शकते. जिन्याखालच्या जागेचा काही स्टोअरेज सारखा वापर करता येतो किंवा तिथं शोकेस वगैरे ठेवता येतं. अर्थात तीन गुंठे जागा आणि गुंठाभर बांधकाम करणारा एवढी 'कंजूस'गिरी करायचा नाही. ;)
एवढ्या घराची साफसफाई करताना घरातली गृहीणी किती वेळा तुमचं नाव काढेल ते नक्की सांगा.
28 Oct 2015 - 8:31 pm | सूड
सवडीने वाचायला वाखुसा. पुभाप्र
28 Oct 2015 - 9:21 pm | कंजूस
खोली न करता येणे हा मुद्दा सांगायचा आहे फक्त.
28 Oct 2015 - 11:37 pm | मार्मिक गोडसे
सगळी गडबड ह्या वाक्याने झाली. मी तळमजल्यावरुन पहिल्या मजल्यावर जिना आहे असे समजलो व दुसरा मजला बांधायचा नसेल तर दुसर्या मजल्यावर एक वाढीव खोली कशी मिळेल अशी माझी शंका होती.
29 Oct 2015 - 5:43 am | कंजूस
मला वाटतं या भागात फक्त स्वत:चं घर हा विषय घ्यावा आणि त्या अनुषंगाने इंटिअरिअर,बाग,पोर्च,टेरस अधिक गार्डन हे यावे.
जिना: या विषयी इतका काथ्याकूट कशाला हा विचार येईल.स्वत:चेच घर असले तरी पुढे मागे मुलं दुसरीकडे राहिला गेल्यावर घर न विकता उपयोग करायचा असेल तर एखादा मजला भाड्याने काही काळ देता येण्यासाठी जिना स्वतंत्र असल्यास भाडेकरूस वेगळा अॅकसेस राहतो.तळमजल्याच्या अंगातूनच जिना ठेवल्यास तसं करता येत नाही.हा सगळा विचार घर बांधण्या अगोदरच केला तर पुढे सोय वाढते.आमच्या एका ओळखिच्यानी अलिबागला तळ मजल्यावर एक छोटी खोली आणि सेपरेट टॅाइलट ठेवल्याने कार -ड्राइवर आणणाय्रा पर्यटकासाठी सोयीचं पडतं.
29 Oct 2015 - 7:18 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
FSI आणि त्या विशिष्ट भागामधे उपलब्ध असणार्या इन्फ्रास्ट्रक्चरचा, लोकसंख्येच्या घनतेचा काही संबंध असतो का? म्हणजे एखाद्या नव्या भागामधे इन्फ्रास्ट्रक्चरच्या (कमी पाणी, वीज वगैरे) अभावे सरकारला लोकसंख्येची घनता कमी करायची असेल तर निवासी जागांचा FSI कमी करुन बांधकाम क्षेत्रावर मर्यादा टाकु शकतात का? त्याचा असा काही वेगळा निकष असतो का?
29 Oct 2015 - 7:55 am | एक एकटा एकटाच
लेख आवडला
29 Oct 2015 - 8:10 am | कंजूस
८५ साली तळ अधिक दोन मजले इमारतींना अनुमती ह होती आणि आता त्याच प्लॅाटात रिडेवलपमेंट नावाखाली पंचवीस मजली मनोरे आले. कसं काय? वाहता झरा घ्या श्रात धुऊन.
29 Oct 2015 - 1:48 pm | प्यारे१
कंजूस काका आणि वर जॅक स्पॅरो या दोघांसाठीही.
कारण प्रश्न वेगळे असले तरी उत्तर एकच आहे. सत्ता आणि संपत्तीचं राजकारण आणि मुख्यत्वे अर्थकारण सगळ्या नियमांना बाजूला पाडत असल्यानं कितीही नियम नि कायदे असले तरी अवघड होतं. या लेखमालेमध्ये 'काय असायला हवं' यावर फोकस जास्त देण्याचा प्रयत्न आहे.
जाता जाता: महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यानं नगररचना आणि विकास हे खातं स्वतःकडं'च' ठेवलेलं आहे. :)
29 Oct 2015 - 8:10 am | कंजूस
*हात धुऊन*
29 Oct 2015 - 2:09 pm | तर्राट जोकर
खूप मस्त लेख.... संकल्पना समजावून सांगण्याची हातोटी आवडली...
29 Oct 2015 - 10:19 pm | स्वतन्त्र
फारच अप्रतिम आणि सर्वांना समजेल असे !
30 Oct 2015 - 3:04 am | श्रीरंग_जोशी
एकदम सहजपणे थोड्या क्लिष्ट असणार्या संकल्पना समजावून सांगितल्या आहेत. लेखमालिका अधिकाधिक रोचक होत जात आहे. पुभाप्र.
जिना वाया घालवत असलेल्या जागेवरून जरा वाद प्रतिवाद होत आहे. जागा वाचवण्यासाठी धातूचा चक्राकार जिना पाहिला आहे. त्यामध्ये अडचण अशी असते की अवजड सामान (जसे फर्निचर किंवा रेफ्रीजरेटर, वॉशिंग मशिन वगैरे) त्या जिन्याने वर नेणे अथवा खाली आणणे अवघड असते.
30 Oct 2015 - 6:17 am | कंजूस
**सत्ता आणि संपत्तीचं राजकारण आणि मुख्यत्वे अर्थकारण सगळ्या नियमांना बाजूला पाडत असल्यानं कितीही नियम नि कायदे असले तरी अवघड होतं.**
पुर्वी खिडक्यांना वेंटिलेटर पाहिजेतच हा नियम होता.त्या डिजाइनशिवाय प्लान पास करत नव्हते.आता सर्व खिडक्या वेंटिलेटर नसलेल्या.खिडक्या ( बहुतेक अॅल्यु स्लाइडिंग) बंद केल्या की कपडे वाळत नाहीत आणि घरातली गरम शिळी हवा बाहेर जात नाही.स्लाइडिंगची एक जाळीवाली असली तरी ती वरती नसते.
4 Dec 2015 - 8:52 pm | मार्मिक गोडसे
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.