योगायोगाने मध्ये एकदा शाम्या भेटला. मोऱ्याचा विषय निघाल्यावर तो देखील त्याच्या लग्नाच्या मुद्द्यावरून “पिडीतग्रस्त” होता. चला मोऱ्याचे लग्न ही माझी एकट्याचीच डोकेदुखी नसून त्याने सगळ्या जवळच्या मित्रांना कामाला लावले होते. त्यामुळे मोऱ्याच्या लग्नाच्या बाबतीत मि आणि शाम्या समदुःखी होतो. मोऱ्या रोज कितीही डोक्याला चावत असला तरी एकदा त्याचे लग्न होऊन त्याची गाडी मार्गी लागावी असे मनापासून वाटत होते. आणि आमची या कचाट्यातून सुटका होण्याचा “मोरोपंतांचे लग्न” हाच एकमेव मार्ग होता. देणेकरी, हप्तेवले यांच्या तगाद्या पेक्षा मोऱ्याचा ससेमिरा अधिक कष्टप्रद होता.
एका शनिवारी मोऱ्या सकाळी सकाळी नाक्यावर भेटला. रात्री अपरात्री गल्लीतले कुत्रे मागे लागल्यावर घरी पोहोचण्याची जी घाई असते तश्या घाईत स्वारी अण्णाकडे धडकली. लगेच अण्णाला हुकुम सोडला “५ मावा दे दो …. बहोत घाई में है”. अण्णा तितक्याच लगबगीने म्हणाला “कल के ५ मावा का पैसा?” मोऱ्या म्हणतो “देता है ना …. किधर भाग के जाने वाला है क्या? आजतक कभी तेरा पैसा बुडाया है क्या?” अण्णा मिश्कील हसला “इतना बाग बाग के आया … इसलिये मुझे लागा अबी आयेगा नाही” अण्णा आणि मोऱ्याची अशी जुगलबंदी नेहेमीच चालायची. अण्णाने ५ मावा चोळून हातात दिले आणि मोऱ्या ते घेता घेता मला म्हणाला “चल जरा घाईत आहे. ४-५ दिवसांनी भेटू.” माझ्या चेहेऱ्यावरचे अनावश्यक कुतूहल बघून मोऱ्या म्हणाला “सांगतो रे बाबा … सविस्तर भेटून… आता मला जाऊंदे.” असं बोलून मोऱ्या निघून गेला. आता नेहेमीप्रमाणे ३-४ दिवस तरी शांतता राहणार होती. मि अण्णाला विचारलं “किधर गया रे ये कमीना?” असं विचारल्या बरोब्बर अण्णा फिसकटला, “क्या मालूम. सठीया गया है. ये उमर में कौन करेगा इसके साथ शादी. हमेशा बोलता रेहेता है की घर का खाना नाही मिलता … वो इतने सारे पोली भाजी के दुकान है उसमे तो घर जैसा ही मिलता है. कुछ नाही … अपने कॉ क्या चुतीया समझता है …. रात को औरत के बिना निंद नाही आती होगी….. खाने पिणे केलिये कम और सोने केलिये उसको बीवी चाहिये.” इतकी पार टोकाची प्रतिक्रिया ऐकून मि सुन्न झालो … कदाचित बायको शोधण्याच्या कामाला मोऱ्याने अण्णाला पण लावला असणार.
५-६ दिवसांच्या पाहुणचारासाठी गेलेला मोऱ्या दुसऱ्या दिवशी नाक्यावर दत्त म्हणून हजर. केस रंगवलेले, तुळतुळीत दाढी .. वा! मोऱ्या नुसता चमकत होता. कानातील अत्तराच्या बोळ्याचा वास अधिक तीव्र झाला होता. खिशातले कागदाचे चिठोरे गायब झाले होते. प्यांट जिथे असायला हवी तिथेच होती. बेल्ट चे बक्कल बरोबर मधोमध टिकून राहिले होते. मोऱ्याच्या एकूणच पर्सनॅलिटीमध्ये एका रात्रीत बराच फरक झालेला होता. या मेक ओव्हरचे कारण काय असेल याचा अंदाज बांधत असतानाच मोऱ्या हात पुढे करत म्हणाला “आनंदा लेका, हात मिलाव …. मेरा शादी फिक्स हो गया… साला इतना शोधने के बाद बाजू वाली गल्लीकी औरत निकली”. मि तीनताड उडालो आणि पानवाल्या अण्णाचे तोंड बराच वेळ उघडे राहिले. मि स्वप्नात नाहीये ना हे बघण्यासाठी मोऱ्यालाच चिमटा काढला आणि मोऱ्याने बोंब मारली. मग मि जरा त्याची टर खेचायला लागलो. त्याच्या एकंदरीत दिसण्यावरून, अत्तराच्या वासा वरून. अण्णा पण त्याची मस्त पिळत होता. मि म्हटलं “चायला काय रे …. ५-६ दिवसांनी भेटतो म्हणून निघून गेलास आणि परत पण आलास?? का गेलाच नाहीस?” “अरे तीच तर गम्मत आहे …. मि गेलोच नाही” मोऱ्या रंगात येउन सांगायला लागला आणि ती जी काही गम्मत आहे ती ऐकण्यासाठी माझ्या पेक्षा अण्णाच कान देऊन ऐकायला लागला. “अरे आज सकाळीच राजापूरला जायला निघणार तेवढ्यात दामल्यांचा फोन आला. काही दिवसांपूर्वी त्यांचं स्थळ बघितलं होतं. मला पसंत होतं पण त्यांच्या कडून काही उत्तर आलं नव्हतं. ते आज सकाळी आलं. दामले म्हणाले मुलगी तयार आहे … केंव्हा बोलणी करायची? त्यामुळे म्हटलं बा झवत गेलं ते राजापूर प्रकरण, आधी चायला मुलगी सापडली आहे तेंव्हा लग्नाचं बघू. मग सकाळीच त्यांना भेटलो आणि सगळं ठरवून आलो” मि हळू हळू चाट पडत होतो.
मोऱ्याने हे दामले प्रकरण माझ्यापासून लपवून ठेवलं म्हणा किंवा सांगायला विसरला …. काहीही असलं तरी मला त्याचे हे वागणे अजिबात आवडले नव्हते. मोऱ्या बऱ्याच गोष्टी एकदम रंगात येऊन सांगत होता. त्याच्या या रंगाचा बेरंग होवू नये म्हणून मि त्याला काहीच बोललो नाही. पण शेवटी न राहवून त्याला टोमणा हाणलाच “मग काय लग्न व्हायचंय का ते पण करून आलास??” या शाब्दिक दणक्याने जरा मनाला बरं वाटलं आणि मोऱ्याच्या चेहेऱ्याचा रंग बदलला. “अरे तुला सांगणारच होतो पण आपला योग येत नव्हता. साहेब तुम्हाला लग्नाला बोलावल्याशिवाय कसं चालेल? तारीख ठरली की नक्की सांगेन” मोऱ्या ने जरा सावरून घेतलं. मि परत त्याला हाणला “बघ हा …. नाहीतर असंच एके दिवशी येशील तुझ्यातला नवरा मिरवत मिरवत आणि सांगशील अरे लग्नाची तारीख सांगणार होतोच पण आपला भेटीचा योगच नाही आला” मोऱ्या जे काही कळायचं होतं ते कळून चुकला होता. त्याच्या चेहेऱ्यावर अपराधीपणाची छटा दिसायला लागणार त्याच्या आताच मि तिथून काढता पाय घेतला. रात्री बायकोला सांगितलं तेंव्हा ती नेहेमी प्रमाणेच म्हणाली “बघ तुला सांगतच होते. शेवटी त्याने तुला अंधारात ठेवलाच ना. सगळेच मित्र असेच तुझे. तु आपला मार मार मारतोस त्यांच्यासाठी आणि त्याने साधे लग्न ठरल्याचे पण इतक्या लेट सांगितले?” आता या मोऱ्या वर ही का उखडली होती कोण जाणे …. तरी बरं हिची किंवा माझी कुणी लांबची अडलेली नातेवाईक त्याच्या गळ्यात मारायची नव्हती …. नाहीतर …. विचार न केलेलाच उत्तम.
दुसऱ्या दिवशी मोऱ्याने कान पकडले …”तुला सांगायचे नव्हते असं काहीच नव्हतं … पण माझ्या कडून राहून गेलं हे मात्र निश्चित. मनातून मोऱ्या खुपच खजील झाला होता. शेवटी न राहवून मीच म्हटलं “सोड रे …. होता है ऐसा …. झालं ठरलं ना तुझं? सुटलास एकदाचा (आणि आम्ही पण सुटलो). मोऱ्याने खिशातून त्याच्या भावी बायकोचा …. सुनंदा दामल्यांच्या फोटो दाखवाला. आणि नाव सांगतानाच वरून ही पण कोटी केलीन “तिच्यात काहीच ‘सु’ नसल्याने तिला सगळे नंदा दामले म्हणतात. मि आपलं त्याच्या कमरेवर चिमटा काढून तुला इतक्यात काय ‘सु’ आहे आणि काय ‘कू’ आहे हे कसं काय कळलं म्हणून पिडायला लागलो. आपलं विषय बदलायचं निमित्त म्हणून मोऱ्या नंदा दामलेचा फोटो माझ्या डोळ्यासमोर नाचवत होता. फोटो बघितला मि मनात म्हटलं …ही sssssssssssssssssssss??? (नाही नाही …. ती काय माझ्या ओळखीची नव्हती. पण एकंदरीत फोटो बघून अनपेक्षित धक्काच बसला होता.) गौर वर्ण सोडला तर सगळंच दमदार प्रकरण होतं. मोऱ्या पेक्षा अंगापिंडाने आडवी आणि बुटकी … म्हणजे एकदम लंबगोल. मोऱ्या वाटोळा आणि ही लंबगोल … या दोघांची जोडी म्हणजे मोरयाच्या साथीला गोरा पैलवान. कधी कधी दोघांना कंटाळा आला तर ती आरामात मोऱ्याला पाठुंगळीला मारून पूर्ण मजल्यावर ‘कांदे-बटाटे’ खेळू शकेल. मोऱ्या एखादा अहवाल वाचून दाखवावा या प्रमाणे मला माहिती पुरवत होता. मोऱ्याच्या प्रत्येक वाक्याला “अरे वा” “हो का” या शिवाय काही बोलण्याची गरज पडली नाही म्हणण्यापेक्षा मोऱ्या तितकी उसंतच देत नव्हता. त्याने दिलेल्या अवांतर माहितीचा विचार करता दामल्यांचे स्थळ म्हणजे मोऱ्याला ज्याकपॉटच होता. सुनंदा दामले एका सरकारी कचेरीत नोकरीला होत्या, स्वतःची राहायची जागा होती. आधीच्या विवाहातून झालेली एक ७-८ वर्षाची मुलगी देखील होती. कदाचित या सगळ्याचा वजनदार विचार करूनच मोऱ्याने तिचा वजनाकडे दुर्लक्ष्य केले असणार.
मोऱ्याचे “नंदा पुराण” संपले आणि त्याने आमची रजा घेतली. जाता जाता “काहीही करून तुला लग्नाला यावच लागेल” असं उडत उडत आमंत्रण द्यायला विसरला नाही. “बघू किती जमतंय ते” असं गुळमुळीत उत्तर दिलं असलं तरी मि जाणार होतोच. हे ऐकताच मोऱ्याने अख्या नाक्याला ऐकू जाईल अश्या आवाजात बोंब मारली “रविवारच आहे. कुठलीही सबब चालणार नाही … असशील तिथून उचलून घेउन जाईन” असं ऐकल्यावर मात्र नाईलाज होता … जाणं भागच होतं. कारण उचलून घ्यायला तो आला तर ठीक आहे …. सुनंदा तर माझ्या संपूर्ण कुटुंबासकट मला उचलून घेउन जाऊ शकते याची कल्पना होतीच. मागे एकदा मोऱ्या नोंदणी पद्धतीने लग्न करणार असं ओझरतं बोलला होता. कदाचित तिथे त्याच्या बाजूने साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करायला कुणी नसावे म्हणून हा मला गळ घालत असावा. तो गेल्यावर “सुटलो एकदाचे” असे अविर्भाव माझ्याच नाही तर त्या पानवाल्या अण्णाच्या चेहेऱ्यावर देखील झळकत होते. एकंदरीत काय मोऱ्या “थंड” झाला होता आणि त्याचा तगादा देखील संपला होता. अश्या रीतीने मोऱ्याचा खाण्यापिण्याचा, राहण्या झोपण्याचा … सगळाच प्रश्न दामलेने एक हाती सोडवला होता. अधून मधून आम्ही मोऱ्याला चिडवायचो “बापटा तुला दामले दमवणार बर का” आणि मोऱ्या नवपरिणीत नवऱ्यासारखा लाजायचा. मोऱ्याने लग्नाचे आवताण नाक्यावरच दिले. अण्णाला बोलवायला पण तो विसरला नाही. याचाच अर्थ मोऱ्या रजिस्टर लग्न करणार नसून सगळे विधीवत करणार असल्याचे पक्के झाले. आमची Bachelor’s Party पण एकदम “झोकात” झाली आणि त्या झोक्यावरच मोऱ्याचे केळवण पण आम्ही उरकून घेतले.
मोऱ्याची खरेदी पण झटपट झाली, दुकान ठरलेले …. काय घ्यायचे ते ठरलेले. खरेदीसाठी मि होतोच…. अगदी अचानक न सांगता “जरा इथेच जाऊया” असे सांगून मला घेऊन गेला. माझ्या आग्रहाखातर त्याने एक छानसा मोतिया रंगाचा सलवार कुर्ता पण घेतला. नंदा वहिनीना साडी घेण्याच्या वेळेस मात्र वांदा झाला. मोऱ्याला त्यांची आवड निवड विशेष माहीत नसावी. साड्यांच्या दुकानात घाबरत घाबरत शिरलो आणि आम्ही नवशिके गिऱ्हाईक आहोत हे त्या दुकानदाराने लगेच ओळखले. बऱ्याच साड्या बघून सुद्धा पसंती काही जमत नव्हती. तो दुकानदार अगम्य भाषेत इरकली हवी का वल्कलं हवी? तनछोई हवी का जोर्जेट हवी? काठ पदराची हवी का साधी हवी? मोऱ्याने हळूच मला कोपराने ढोसून विचारले “साधीला पदर नसतो का रे?” मि वैतागून म्हटलं “नसत्या उठाठेवी कुणी अंगावर घ्यायला सांगितल्या आहेत तुला? तिच्या साड्यांची खरेदी तु का अंगावर घेतलीस?” तसं तो हळूच म्हणाला “अरे तिच्या साड्यांची खरेदी तीच करणार आहे. मि ही साडी तिला पहिल्या रात्री देणार आहे” असं म्हणून मला हळूच डोळा मारला. मि म्हटलं “लेका पहिल्या रात्री जी गोष्ट उतरवायची तीच काय तिला देतोस” मोऱ्या सॉलिड पेटला होता …. पहिली रात्र काय …. साडी काय …. एकदम रंगात आला होता. लगेच माझ्या डोळ्या समोर मोऱ्या खाटेवर बसलाय … दामलेबाई हातात दुधाचा पेला घेऊन येतात …. मोऱ्याने तिला बाजूला बसवले …. आणि मोऱ्या तिला घेतलेली साडी देतोय …. बास बास उगाच कुणाच्या मधुचंद्राचा आपण कशाला जास्त विचार करायचा.
लग्नाच्या आधी छान पैकी फेशियल करून, केसांना रंग लावून मोऱ्या बोहोल्यावर उभं राहिला तयार झाला. होणाऱ्या बापट वहिनींची तशी एक दोन वेळा तोंड ओळख झाली होती. दाखवलेल्या फोटो पेक्षा बऱ्या दिसत होत्या. अगदी मोजक्या माणसांच्या उपस्थितीत … अगदी लिमिटेड एडिशन प्रमाणे घरातल्या घरातच लग्न होतं. समस्त मित्र परीवारापैकी मि आणि शाम्या दोघेच, लग्न लावायला एक पुरोहित, वर आणि वधू धरून इनमीन १५ माणसांचा लवाजमा. लग्नाचे विधी अगदी विधीवत पार पडले. पण जेवणाची हालचाल काही दिसेना आणि तो संभ्रम माझ्या आणि शाम्याच्या चेहेऱ्यावर बघून मोरोपंतांनी रीतसर आवाहन केले “सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था श्री. भागवतांच्या खानावळीत केलेली आहे. जेवण झाल्यावर परत लग्नघरी येऊन चहापानाचा कार्यक्रम होईल. त्या नंतर हा समारंभ संपन्न होईल” (म्हणजेच तुम्ही सगळे आपापल्या घरी जायला मोकळे आणि आम्हाला मोकळे सोडा). भागवतांच्या खानावळीतले मोरेश्वर बापटांच्या खास लग्ना प्रित्यर्थ बनवलेली सुग्रास “राईसप्लेट” खाऊन परत मोऱ्याच्या घरी आलो. ओळख पाळख गप्पागोष्टी होता होताच ४ वाजले तसं मोऱ्याने सुनंदा वहिनीना चहा करण्यासाठी इशारा केला. आणि नवी नवरी चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात गेली. वहिनी अतिशय सराईत पणे घरात वावरत होत्या हे मला शाम्याने आधी खुणेने आणि मग दबक्या आवाजाने सांगितले. मुद्दाम मोऱ्याची खोडी काढायची म्हणून शाम्या म्हणाला “अहो मोरोपंत, जा आत वहिनींना साखर चहा पावडर कुठे आहे ते दाखवा” आणि मोऱ्या सहज बोलून गेला “तिने आधीच बघितलंय सगळं” तसा मी जवळ जवळ ओरडलोच “सगळं ssssss?” अर्थामधला अनर्थ जाणवल्याने मोऱ्या लाजत म्हणाला “अरे लग्ना आधी घर लावायला आली होती ही. घरी बघणारं कुणीच नव्हतं ना …..” शाम्या म्हणाला “बास बास आता पुरे झालं तुझं पाल्हाळ. आता आली ना बायको घरात”
पुढे मोऱ्याचे नाक्यावर येणं कमी झालं. आला तरी संध्याकाळीच पानाची तजवीज करून जायचा. जेंव्हा केंव्हा भेटायचा तेंव्हा निघण्याची घाई असायची. मी मुद्दाम त्याला चिमटे काढायचो “साल्या लग्ना अगोदर जेंव्हा माझे तास तास खायचास तेंव्हा काय आमची लग्न झाली नव्हती?” परत तो त्याच्या खास शैलीत लाजायचा. आता मोऱ्या कलकत्ता १२०/३०० पानाच्या सोबत खास चांदीचा वर्ख लावलेले मघई मसाला पान पण घेऊन जायला लागला. अधून मधून हा बापटांचा जोडा बाजारात, बागेत फिरताना पण दर्शन देऊ लागला. मोऱ्याची बायको काही बारीक झाली नाही पण मोऱ्या मात्र एका महिन्यात तिच्याशी स्पर्धा करू लागला होता. अश्या सुधृढ बांध्याच्या बायकोची जमेची बाजू म्हणजे तिची असलेली सरकारी नोकरी आणि तिची ८ वर्षाची छोकरी. त्यामुळे “एकावर एक फ्री” या थाटात एका लग्नामुळे दोन दोन नाती मोऱ्याच्या पदरात पडली आणि मोरेश्वर बापट उर्फ मोऱ्या उर्फ मोचि कृतकृत्य झाले.
मोऱ्याचा एकटेपणा दूर झाला, घर खेळतं झालं आणि काही वर्षापूर्वी पहाटे पहाटे उमटणाऱ्या चादरी वरच्या सुरकुत्या परत उमटू लागल्या. (आणि मी, अण्णा आणि शाम्या मुक्त झालो).
समाप्त.
प्रतिक्रिया
19 Aug 2012 - 5:29 pm | संजय क्षीरसागर
एकदम बहारदार! लिहित रहा.
19 Aug 2012 - 5:40 pm | बॅटमॅन
उत्तम! शेवटावरून गटणेच्या जीवनातला साहित्यिक बोळा निघाला त्याची आठवण झाली :)
19 Aug 2012 - 5:43 pm | आनंद भातखंडे
तसा करायचा नव्हता पण झाला ..... ;)
21 Aug 2012 - 11:34 am | मी_आहे_ना
खुमासदार लेखन आवडले...
19 Aug 2012 - 6:00 pm | जाई.
इति भातखंडेकृत मोऱ्या बापट पुराण समाप्तम्||
व्यक्तिचित्र आवडल
19 Aug 2012 - 6:24 pm | शुचि
फारच बहारदार व्यक्तीचित्रण. विशेषतः सुखांत - "नांदा सौख्याभरे" असल्याने खूप मजा आली. परत एकदा सर्व भाग सावकाशीने वाचून काढेन. वाचनखूण म्हणून साठविणारदेखील आहे.
एक विनंतीवजा सूचना - यापुढे जेव्हा एकापेक्षा अधिक भाग टाकाल तेव्हा कृपया आधीच्या भागांचे दुवे देत चला.
19 Aug 2012 - 6:24 pm | पैसा
शेवट काहीतरी उदास दु:खान्त केला नाहीत हे अजून छान!
19 Aug 2012 - 6:48 pm | खेडूत
खूप खूप छान !
मजा आली. :)
19 Aug 2012 - 9:42 pm | Dipankar
आनंद, भट्टी सही जमली आहे
20 Aug 2012 - 8:11 am | ५० फक्त
मस्त लिहिलं आहेस रे, शेवट गटणेंची कॉपी वाटला. असो.
20 Aug 2012 - 10:21 am | चैतन्य दीक्षित
खूप छान व्यक्तिचित्र उभं केलंत.
लिहीत रहा असेच.
-चैतन्य
20 Aug 2012 - 11:12 am | दिपक
आवडले.
20 Aug 2012 - 12:30 pm | सन्कु
वा एकदम मस्त...........
20 Aug 2012 - 1:10 pm | मन१
चांगले जमले आहे.
20 Aug 2012 - 1:38 pm | इरसाल
शेवट सुखद केलात ही जमेची बाजु.
20 Aug 2012 - 2:11 pm | शिल्पा ब
आवडेश.
20 Aug 2012 - 3:18 pm | सस्नेह
ओघवती व रंगतदार लेखनशैली !
शेवट सुखांत हे आवडले.
20 Aug 2012 - 3:26 pm | किसन शिंदे
सह्हीच!!
पहिल्या भागानंतर तीनही भाग आज एकत्रच वाचून काढले. व्यक्तिचित्र छानच झालंय.
20 Aug 2012 - 9:17 pm | मदनबाण
झकास !
बोळा निघाला ! ;)